( रानाईची गढी !!.. - गढीत घडणाऱ्या विचित्र गोष्टी )

Submitted by Sujaata Siddha on 28 June, 2020 - 12:17

https://www.maayboli.com/node/75214

“या आवरून !.. “ हौसाक्का गेल्या , जाताना दार लावून गेल्या , ती हि मग उठली , तिचं सामान आधीच आणून नीट नेटकं लावून ठेवलेलं होतं , बॅग उघडून तिने वरच्यावर असलेला टॉवेल , साबण वैगेरे साहित्य काढलं आणि ती बाथरूम मध्ये जायला आत वळली , तोच एका स्त्रीची एकदम एक जीवघेणी किंकाळी तिला ऐकू आली, आणि तिचे पाय जागच्या जागीच थबकले !!!...एक क्षण सावरून मग धावत ती दरवाजापाशी गेली , आणि दार उघडून बाहेर पाहू लागली , बाहेर सगळं निपचित !.. धडधडत्या अंत:करणाने तिने आवाज कुठल्या दिशेने आला याचा अंदाज घ्यायला सुरूवात केली , पण तिला तो लावता येईना , पाच - दहा मिनिटे गेली , नकळत तिचं मन परत काही ऐकू येतयं का यासाठी कानोसा घेऊ लागलं , पण नंतर काही आवाज आला नाही , थोडंसं गंभीर होऊन मग तिने सुहृद ला फोन लावायचा प्रयत्न केला , पण मोबाईलला रेंज नव्हती , ती अस्वस्थ झाली , आपण लगेच त्याला भेटून सोक्षमोक्ष लावूया असं ठरवून दार लावून ती आत बाथरूम मध्ये गेली , आत अगदी पुरातन काळी असायचं त्यापद्धतीचं तांब्याचं घंगाळ होतं . एक गार पाण्याचा , आणि एक गरम पाण्याचा नक्षीदार पितळी नळ , वाळा -चंदन मिश्रित साबण , आणि कितीतरी आकर्षक गोष्टी ज्या एरवी देवयानी ला खूप आवडल्या असत्या , पण आत्ता नुकत्याच ऐकलेल्या किंकाळीने ती काहीशी अस्वस्थ झाली होती . बाथ घेऊन फ्रेश झाल्यावर तिला जरा बरं वाटलं , आरशा समोर आवरत असतानाच दारावर थाप पडली . तिने पटकन जाऊन दरवाजा उघडला , तर समोर कोणीच नव्हतं . दरवाजा तसाच उघडा ठेऊन ती उभी राहिली . ‘या अवाढव्य वास्तूच्या मागच्या बाजूला जिथे कोणाचाही वावर नाही अशा ठिकाणी आपण राहतोय ‘ या विचारांनी क्षणभर तिला भय वाटून गेलं ,
तेवढ्यात ‘हॉ !.. “ असा आवाज काढून कुणीतरी एकदम खळखळून हसलं , देवयानीने बाहेर डोकावून पाहिलं , दाराच्या मागे १०-११ वर्षांची एक चिमुरडी तोंडावर हात ठेऊन खुदुखुदू हसत उभी होती . तिला पाहताच देवयानीच्या चेहऱ्यावर हसू फुटलं , “अय्या तू ? घाबरले ना मी … . “
तिचा तो अभिनय बघून ती छोटी मुलगी खूष झाली आणि टाळ्या वाजवत हसली .
“ये आत “ देवयानीने प्रेमाने तिला आत घेत म्हणाली “तुझी आई म्हणाली कि तुझं नाव मुकी आहे , पण मला नाही आवडलं हे नाव , कसली क्युट दिसतेस तु मी तुला सोना म्हणू? “
मुकीने ‘हो ‘ अशा अविर्भावात या टोकापासून त्या टोकापर्यंत मान डोलावली .
“गुड गल “ हाय फाईव्ह दे !..
मग देवयानी ने तिला हाय फाईव्ह द्यायला शिकवलं आणि त्या दोघी रमतगमत जेवणघरात पोहोचल्या .
तिला तिथे सोडून मुकी खेळायला निघून गेली ,गडी माणसं आजुबाजुला फिरत होती , ती सुहृदची पाहुणी होती म्हणूनही असेल तिच्याकडे बघायला देखील सगळे बिचकत होते , मग ती आजूबाजूचं निरीक्षण करण्यात गुंतली , टेबलवर अनेक पदार्थांची रेलचेल होतीच पण बाजुच्या कोनाड्यांमधून मोठाल्या जड चांदीच्या थाळ्यांमध्ये निरनिराळे फळफळावळ भरून ठेवले होते , प्रत्येक वस्तू जुन्या काळातल्या चांदीने बनवली असावी , ती ज्या टेबलवर बसली होती त्याची कडाही चांदीचीच . हे सगळं बघून झाल्यावर ती सुहृदची वाट बघत बसली , असं खूप वेळ एकटं बसायचा तिला कंटाळा आला ,भूकही प्रचंड लागली होती , नानाविविध पदार्थांचा खमंग वास सुटला होता , ती आत स्वयंपाक घरात डोकावून बघायच्या विचाराने उठली तोच आतून पारंपारिक वेषात एक नोकर भली मोठी थाळी हातात घेऊन आला . आणि मोठ्या अदबीने तिच्यापुढे ठेऊन वेगाने निघून गेला . शाही भोजन असावं तसं सगळं पान भरगच्चं वाढलेलं होतं , वरच्या बाजूला मध्यभागी मीठ, डाव्या बाजूला निरनिराळ्या चटण्या,चार -पाच कोशिंबिरी, लोणची, पापड, भजी, कुरडया, खीर आणि पुरण . उजव्या बाजूला तोंडली,मटार -बटाट्याची भाजी ,भरलं वांगं , सांबार ,पानाच्या मध्यभागी पोळ्या, पुऱ्या ,वाटल्या डाळीचे कढीवडे, कोथिंबीर वडी , कोबीची वडी , मठ्ठा, २ प्रकारच्या खिरी (शेवयाची आणि गव्हल्याची), पुरण पोळ्या, शेजारी घीवर, आमरस, श्रीखंड ,बासुंदी, साखरभात, जिलबी , लाडू , पुरणपोळी , केशरपाण्याची एक छोटी चांदीची नक्षीदार वाटीही होती पानात ,( असं म्हणायचे कि पेशवाईच्या काळात ही पध्द्त होती , एक पक्वान्न खाल्ल्यावर त्याची चव दुसऱ्या पक्वान्नाला लागू नये म्हणून त्यात आधी बोटं बुडवायची हे तिला वाचून माहिती होतं ), बेत तर एकदम शाही आहे , एवढं सगळं खायला मला दोन तीन दिवस लागतील ,डाएट चा धुव्वा !... ती स्वतः:शीच उद्गारली “ पण हा सुहृद येणार आहे कि नाही ? “ कंटाळून तिने पुन्हा फोन हातात घेतला , त्याला रेंज नव्हती . तिने इकडे तिकड़े बघितलं , एक नोकर हातात काही सामान घेऊन बाहेर जाताना दिसला त्याला तिने बोलावून घेतलं . “इथे कोणीच आलं नाहीये का? जेवायला मी एकटीच आहे का ? सुहृद कुठे आहे , त्याच्या माँ पण दिसत नाहीयेत . “
तो काहीच न उत्तरता तिच्याकडे मख्ख चेहेऱ्याने पहात राहिला . “अहो मी तुमच्याशी बोलतेय , हौसाक्का कुठे आहेत ? “ तितक्यात समोरून हौसक्का आल्या. “ हे काय ताई जेवायला सुरूवात न्हाई केली अजून ?”
“ अहो पण मी एकटीच ? सुहृद कुठे आहे ?त्याच्या घरातलं कोणीच नाही जेवायला ? “
“ कंठाजीरावांचं डोकं दुखतया , आन वहिनी सरकारांची आज एकादशी हाये , त्या फकस्त ज्यूस घेतात . तुम्ही जेवा बिनघोर , अन ताई हिथं सरदारास्नी कंठाजी राव म्हनत्यात , त्या बिगर बाकी कोनतं बी नाव कोनाला ठावं न्हाई तवा गडी मानसाला काई इचारू नका , उत्तरं देनार न्हाई कोनीबी . “ एकतर आपण त्या नोकराशी बोलत असताना ह्या बाईने कसं ऐकलं ? इथे ती नव्हतीच , त्यातून असं सडेतोड बोलणं , याचा तिला राग आला आणि मुळात असं एकटं जेवायला बसवलेलंही तिला आवडलं नाही ,समोरच्या वाढलेल्या पानाला नमस्कार करून ती उठली . “हौसाक्का मला भूक नाहीये , मला जरा प्लिज सुहृदची रूम दाखवा .”
“आवं ताई हे काय ? भरल्या पानावरुन असं उठावं का ? जेवा बरं मुकाट्यानं , नाहीतर पावन्यास्नी उपाशी ठेवलं म्हनून वहिनी सरकार रागावतील .“
“हौसाक्का सुहृदची रूम कुठे आहे प्लिज सांगा “
“ सरदार झोपले असताना आमी कुनीबी तिथं जात न्हाई “ .. एव्हना हौसाक्का अतिशय डॅम्बीस आहे ,हे देवयानीला कळून चुकलं . आलेला राग मनातच गिळून , तिने म्हटले ,”ठीक आहे , तो उठला कि त्याला ताबडतोब माझ्या रूमवर पाठवा .आणि “ इथे मोबाईलला रेंज कुठेच येत नाही का? लँडलाईन वैगेरे कुठे असतो ? मला जरा घरी फोन करायचा आहे . “
“ करा की सावकाश , काय घाई येवढी ? अदुगर आराम करा जरा ,”
“ इथे सगळं तुमच्यावरच सोपवलंय का? “ कपाळावर आठ्या चढवून देवयानी तरातरा जेवणघराच्या बाहेर आली आणि अंदाजानेच उजव्या बाजूला निघाली , सकाळी येताना ज्या दिशेला तिने माँ ची रूम पाहिली होती त्या बाजूला ती जाऊ लागली . हौसाक्का तिच्या मागून पळत आल्या , “ताई असं कुटबी फिरू नका , त्यो रस्ता वहिनी सरकारांच्या महाला कड जात न्हाई , तुमाला रस्ते ठावं न्हाईत , चुकला तर हिथं तुम्हाला माझ्या बिगर कोनी ओळखत बी न्हाई .सरळ उचलून खाली टाकतील तळघरात “
“असं पण आहे का ? पाहुण्यांना बोलावतात कशाला मग तुमचे सरदार ?तळघरांत टाकायला ? कुठल्या शतकात वावरतात तुमची सरदार मंडळी ? तुम्ही एक काम करता का हौसाक्का ?, मला बाहेर जायचा रस्ता दाखवा , मी घरीच जावं म्हणते इथून आता “
“अवो ताई एकदम असं रागावू नका , माज़ काही चुकलं असलं तर माफी करा , गढीतले नियम आनी बाहेरचे नियम येगळे आहेत . म्हनून जरा सावध क्येलं एवढंच ,कंठाजी राव उठले की लगोलग मी सांगावा धाडतेच ”
तितक्यात लाल रंगाचं मखमली छत्र डोक्यावर दोन जणांनी धरलेलं अशी माँ साहेबांची स्वारी येताना देवयानीला दिसली , जवळ येता येता त्यांनी विचारलं , “ भोजन आवडलं का देवयानी तुम्हाला ? इथे फक्त पारंपारिकच जेवण असतं हं ,आणि माफ करा तुमच्या बरोबर पंगतीला कोणी नव्हतं आज , काय आहे ना , कंठाजीराव डोकेदुखी ने त्रस्त आहेत , त्यांचे वडिल बंधू आपल्या पिताजींसोबत फॅक्टरीच्या कामासाठी गावी गेले आहेत आणि आमच्या कन्या आपल्या आजोळी गेल्या आहेत गिरवली ला ,हौसक्काकांकडे सांगावा धाडला होता मी तसा “ त्यांच्या आपुलकीच्या शब्दांनी तापलेली देवयानी जरा शांत झाली . चेहेऱ्यावर सौम्य हसू आणत ती उत्तरली ,
“नाही मला भूक नव्हती फारशी, मी रात्री तुमच्याबरोबर खाईन.पण आत्ता तुम्ही या बाजूने कशा आलात ? i mean तुमची रूम उजव्या बाजूला आहे ना ?
“ हाहाहाहा फसलात ना तुम्ही पण ? अहो इथे भुलभुलैय्या आहे सगळा. दिशा ज्ञान होत नाही पटकन.पूर्वीचं स्थापत्य शास्त्रच असं जबरदस्त आहे, शत्रूला हुलकावणी द्यायला ,बांधलंय अशा पद्धतीने की नवीन माणसाला कुठून आलो ,कुठे गेलो समजत नाही . “
“ओह , मग सध्या तरी तुम्ही मला एक गाईड दिला पाहिजे .”
“अलबत, म्हणून तर हौसाक्का आणि मुकी दोघीना तुमच्याच तर दिमतीला ठेवलंय “
“हो पण हौसाक्का इतर कामात व्यस्त असतात “
“अहो पण मुकी आहे की , तिला बोलता येत नाही म्हणून तुम्हाला वाटलं असेल , पण ती भयकंर हुशार आहे .गढीतले जवळजवळ सगळे रस्ते तिला ठाऊक आहेत “
“ मला फोनही करायचा होता माझ्या घरी मी इकडे सुखरूप पोहोचल्याचा ,घरी आई बाबा काळजीत असतील . “
“हौसाक्का , तुम्ही रूम मध्ये यांना कनेक्शन द्यायला सांगितलं नाही का ? आनंदाला बोलावून आजच्या आज ते काम करून टाका , कंठाजीरावांच्या पाहुण्यांकडून काहीही तक्रार येता कामा नये , बाकीची दोन -चार कामं कमी करा . बरं देवयानी , तुम्ही जेवला नाहीत तर निदान आमच्या बरोबर फळांचा रस घ्या ,आणि आपल्या आमराईतल्या आंब्यांची चव बघा , बाकी सगळे आंबे विसरून जाल “ . पायात घोळणाऱ्या आपल्या डाळिंबी रंगाच्या रेशमी शालूच्या निऱ्या किंचित वर उचलत , पुढे चालता चालता त्यांनी आर्जवाने म्हटलं “अं ? ...हो घेते “ जेवणघरातून फळांचा रस घेऊन ती मुकी बरोबर बाहेर पडली , “सोना तुला मॅप म्हणजे काय माहिती आहे ? “ नाही अशा अर्थाने सोनाने मान हलवली .
“मॅप म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर तो रस्ता आणि त्या मार्गावरच्या खाणाखुणा याचं चित्र . तुला चित्र काढायला आवडतात ? “
सोनाने खुशीने होकारार्थी मान हलवली .
“मग चल माझ्या रूमवर , तुला देते साहित्य, शाळेत जातेस ?कितवीला आहेस ? “
सोनाने नाही अशा अर्थाने मान हलवली .

क्रमशः 

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Nice's

मस्त रंगतेय कथा... गुढ काहीतरी भयंकर असणार असे दिसतंय..

बाकी ते जेवणाचे वर्णन वाचूनच आजचा उपास मोडल्यासारखे वाटले. असे ताट जर माझ्यासमोर ठेवले तर आजूबा़जूला भुतं जरी असतील तरी मी पहिल्यांदा जेवणावर ताव मारेन.

असे ताट जर माझ्यासमोर ठेवले तर आजूबा़जूला भुतं जरी असतील तरी मी पहिल्यांदा जेवणावर ताव मारेन. --- अगदी अगदी Happy

प्लीज पुढचा भाग लवकर टाका. विसरायला होतंय मागचं. पुन्हा पुन्हा मागचे भाग वाचावे लागतील. लिंक नको तुटायला.

नवीन प्रतिसाद लिहा