रानाईची गढी !!... ( त्या किंकाळीचे रहस्य ?? )

Submitted by Sujata Siddha on 3 July, 2020 - 05:21

https://www.maayboli.com/node/75204 (1) 
https://www.maayboli.com/node/75214  (2)
https://www.maayboli.com/node/75292  (3)

रानाईची गढी !!... ( त्या किंकाळीचे रहस्य ?? )

... दोघी रूम वर आल्या , तो तिच्या इथे टेलिफोन कनेक्शन देण्याचं काम चाललं होतं , हौसाक्का कंबरेवर हात ठेऊन जातीने उभ्या होत्या. तिला बघून त्या म्हणाल्या, “ वायरी व्हत्याच हितपर्यत आणलेल्या ,फकस्त जोडण्याचं काम करतुया तो, लगेच व्हईल, थांबा वाईच .आन बाह्येरचा लंबर लावायचा आसल तर झिरो लावून डायल करा “ यावर ती काहीच बोलली नाही.त्यांचं होईपर्यंत खिडकी जवळच्या कट्टयावर बसून बाहेरचं निरीक्षण करत राहिली . समोरच्या लांबलचक मैदानात हिरवळीवरून दोन घोडेस्वार दौडत येताना तिला दिसत होते , ते जवळ येताच वाड्यातून दोन -तीन नोकर पळत बाहेर येऊन त्यांच्या हातात काही वस्तू होत्या त्या देऊन पुन्हा घाईघाईने वाड्यात गेले , आलेले घोडेस्वार पुढे वळून जंगलाच्या दिशेने निघून गेले .
...................
“हॅलो आई ..”
“हॅलो , देवी अगं फोन लागत नाहीये बाळा तुझा, पोहोचलीस का तू अमरापूरला सुखरूप ? “
“ हो आई , पोहोचले , बाबांना फोन देतेस का जरा ?”
“देते , पण आधी माझ्याशी बोल की , दुपारी जेवण झालं का नीट ? शाही खाना होता का गं , सरदार लोकं काय खातात गं ? आपल्यासारखंच खातात की अजून काही ?”
“आई अगं सांगते , ? तू आधी बाबांना दे बरं फोन , मला जरा महत्वाचं बोलायचंय त्यांच्याशी “
“बरं थांब देते , हे घ्या हो , बोला तिच्याशी , काहीतरी महत्वाचं सांगायचं म्हणतेय .. “
“ हॅलो बाबा , ‘सारंग , निलेश आणि ऋता , मैत्रयी यांचे नंबर आहेत ना तुमच्या मोबाईल मध्ये , “
“आहेत की, का गं ? “
“बाबा इथून ना रेंज मिळत नाही , जरा प्लिज त्यांच्याशी बोलून मला कळवा ना , ते लवकर येऊ शकतील का इकडे ? “
“बरं कळवतो ,काय झालं बंड्या ? एवढ्यात कंटाळलीस ? तिथे सगळं ठीक आहे ना? “
“ अ ? हो , खरं म्हणजे कळत नाही काही , ठीक आहे कि नाही .”
“म्हणजे ?”
“म्हणजे सकाळी मी आले ना ,तेव्हापासून एकतर सुहृद मला भेटलाच नाहीये ,इकडे पोहोचल्यानंतर डोकेदुखीचं निमित्त करून तो जो त्याच्या रूम वर गेला परत आलाच नाहीये .”
“हात्तीच्या एवढंच होय ? मला वाटलं काय झालं ..”
“तसं नव्हे बाबा ,अजुन एक गोष्ट म्हणजे आल्यानंतर मी रूम मध्ये आवरत असताना मला एक जोरदार किं.. … “
खट दिशी आवाज होऊन फोन डिस्कनेक्ट झाला , देवयानीने चमकून पाहिलं , तर तो फोन सोनाने डिस्कनेक्ट केला होता ,. तेवढं करून झाल्यावर ती पुन्हा देवयानीने दिलेलं पेन आणि कागद घेऊन चित्र काढत बसली . देवयानी तिच्या जवळ गेली , “सोना असं का केलंस तू बाळा ? फोन डिस्कनेक्ट का केलास गं ?” यावर सोनाने काही प्रतिक्रिया दिली नाही , शांतपणे चित्र काढत राहिली , देवयानी परत काही बोलणार तोच तिचं लक्ष सोना काढत होती त्या चित्राकडे गेलं आणि तिचे पुढचे शब्द ओठातच विरले . शहारून तिने ते चित्र हातात घेतलं , केस मोकळे सोडलेली , दात विचकलेले अशा एक भेसूर स्त्रीचं ते चित्र होतं ,लहान १० वर्षाच्या मुलाला जसं काढता येईल तसं , रेघोट्या मारून काढलेलं !!!...सुन्न झालेली देवयानी किती वेळ तशीच उभी राहिली .

रात्रीचं जेवण देवयानीने खोलीतच मागवून घेतलं , ती ज्या उत्सहाने सकाळी गढीत आली होती , तो उत्साह आता पूर्ण मावळून गेला होता . सुह्रदच्या वागण्याचा तिला राग आला होता , केवळ त्याच्या भरवशावर या अनोळखी जागेत ती आली होती आणि आल्यापासून तिला असं गडीमाणसांच्या भरवशावर टाकून तो बेपत्ता झाला होता . आपण तिकडे जेवणघरात गेलो नाही तर तो निदान चौकशी करायला म्हणून तरी येईल हा तिचा अंदाज फोल ठरला . तिच्या सोबतीला म्हणून राहिलेली सोना केव्हाच झोपी गेली होती , देवयानी मात्र जागीच होती , दिवसभराच्या घटनांचं विचारचक्र तिच्या डोक्यात चालू होतं ,त्यात एक गोष्ट तिच्या लक्षात आली ते म्हणजे संध्याकाळी बाबांशी फोन वर बोलताना सोनाने बरोब्बर महत्वाचं सांगत असताना फोन कट केला , म्हणजे तिला हि गोष्ट माहितीये आणि आपण ती बाबांना सांगू नये अशी तिची ईच्छा होती , पण का ? बाहेर गढीबद्दल काही वाईट पसरू नये ही काळजी तिने घेतली का ? पण तेवढं कळण्याइतकं तिचं वय नक्कीच नाही , मग दुसरं काय ? इथून आपण बोललेलं दुसरं कोणी ऐकत असेल का ?..कोणी म्हणजे हौसक्का वैगेरे ? आणि हे सोनाला माहिती असेल ? … ?? .. या विचारसरशी दचकून ती उठून बसली . थोडा वेळ शांत बसून राहिली , मग तिच्या मनाने एक सुज्ञ विचार केला , इथे काही का असेना आपण विचार करून डोकं का शिणवतोय उगाच ? तसंही काही धोकादायक वाटलं तर आपल्याला आपल्या घरी जायचा पर्याय आहेच की .
घड्याळात पाहिलं तर आत्ताशी कुठे आठ- साडे आठच झाले होते , एवढ्या लवकर झोपल्यावर पुन्हा मध्येच जाग यायची , त्यापेक्षा जवळच एक चक्कर मारून यावी असा विचार करून , शाल पांघरून , देवयानी खाली आली . दूरपर्यँत मिट्ट काळोख आणि रातकिड्यांची किरकिर , मध्ये मध्ये पलिते दिसत होते , तसेच दिव्याचे खांबही , ‘जागते राहो sssss “ अशी आरोळीही मधून मधून ऐकू येत होती . अगदी मध्यरात्र झाल्याचा भास होत होता , तिच्या खोलीच्या खिडकी जवळच एक गुलमोहोराचं झाड होतं त्याची खूण तिने लक्षात ठेवली , आणि खोली दृष्टीपथात राहील एवढं लक्षात ठेवून ती निघाली, गार वाऱ्यवार आल्यावर तिला जरा बरं वाटलं , चार पावलं चालली असेल नसेल तोच ती , काळीज चिरत जाणारी भयानक किंकाळी पुन्हा तिच्या कानावर आदळली . या वेळेला तिला आवाजाची दिशा कळाली , अंधारातूनही चन्द्राच्या क्षीण प्रकाशात गूढ वाटणाऱ्या जंगलाच्या दिशेने तो आवाज आला होता , कोणी स्त्री संकटात असेल तर तिला मदत केली पाहिजे या विचारसरशी , तिने पावलांचा वेग वाढवला आणि जवळजवळ पळतच ती निघाली . उंच उभ्या झाडांमधून तसं वाट काढणं कठीण नव्हतं, पण काळोख सोडला तर दृष्टीपथात काहीही येत नव्हतं .किती तरी वेळ ती अर्धवट चालत अर्धवट पळत राहिली ,आत आत किती आत आली कोण जाणे , बराच वेळ झाला काही गवसलं नाही ,थकून परत फिरावं असा विचार करून ती वळली आणि त्याच वेळी ती किंकाळी पुन्हा एकदा तिला ऐकू आली , यावेळेस अगदी जवळून , तिच्या डाव्या बाजूने , आता देवयानी डाव्या बाजूला वळली , पण एव्हाना तिच्या लक्षात आलं की दिसत काहीच नाहीये फक्त आवाज येतोय बास , आवाजाच्या आधारावर असं किती पुढे जाणार, ? , त्यापेक्षा परत फिरावं , उद्या आपल्या आपल्या घरी निघून जावं , in fact बाकीच्या चौघाना फोन करून सांगावं की येऊ नका , काहीतरी ‘Fishy ‘आहे इथे !!!.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण तिला तेव्हा कुठे ठाऊक होतं , की हा पर्याय तिच्याकडून कधीच काढून घेतला गेलाय !.. >> ह्यामुळे उत्सुकता कमी होतेय. स्पॉयलर काढून टाका.
वाचतेय Happy

छान

वाचतेय. कवठीचाफाच्या एका गोष्टीची आठवण आली प्लॉट वाचून. पण प्लीज कथा मध्येच सोडून देऊ नका.

थोडे मोठे भाग टाका ना.. सुरू केले वाचायला की संपतोय..
माफ करा हं ..पण मी जरा हावरट आहे आवडलेल्या गोष्टींसाठी

थोडे मोठे भाग टाका ना.. सुरू केले वाचायला की संपतोय..
माफ करा हं ..पण मी जरा हावरट आहे आवडलेल्या गोष्टींसाठी>>>>>> me too.. Wink
असं वाट्टंय या कथेचं पुस्तक असावं हातात आणि फडशा पाडून टाकावा एका दमात.
सगळं वर्णन छान वाटतंय वाचायला पण ते वाचता वाचताच भाग संपून जातोय.

सगळे भाग एका मागोमाग वाचले. पुढील भाग वाचण्याची उत्सुकता वाढली आहे. रहस्यनिर्मिती मस्त जमवुन आणली आहे.

मला २ प्रश्न पडलेत. ती देवयानी रानाई ला गेली आहे की अम्रापुर ला?. आणि वाड्यात येई पर्यंत देवयानी ला जर माहित नवते की आपण सरदार घरात जात आहोत तर तिच्या आईला आधीच कसे कळले? ती कसे काय जेवणा विषयी विचारते?

विनिता.झक्कास  , रूपाली विशे - पाटील , तुषार विष्णू खांबल  , मन्या ऽ ,  माऊमैया,   अज्ञानी , स्वाती२  , अनघा. ,  सिम्बा , maitreyee ,  स्वप्ना_राज  , योगिताकिरण , मी चिन्मयी  , आसा. , मीरा.. सर्वाना मनापासून धन्यवाद !..  रोहिणी चंद्रात्  : कथेत तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे आहेत .