रानाईची गढी !!!!....

Submitted by Sujaata Siddha on 23 June, 2020 - 06:16

रानाईची गढी !..

रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी फुलून आलेल्या सोनेरी गवतांच्या त्या आकर्षक माळांकडे देवयानी हरखून बघत होती ," जुन्नर इतक सुंदर आहे माहिती नव्हतं मला सुहृद ,पुण्याच्या इतक्या जवळ असून येण झालं नाही रे कधी " , गाडी चालवताना एकदा सुहृदने तिच्याकडे कटाक्ष टाकला ,सोनचाफ्या सारखी नितळ तेजस्वी पिवळसर अंगकांती, सुरई सारखी घाटदार दिसणारी उंच मान, त्यावरचा काळाभोर टपोरा तीळ ,आणि तिरप्या नजरेने ती बाहेर बघत असतानाही दिसत असलेल्या, तिच्या घनदाट ,लांबलचक पापण्या या सर्वांवरून मोठ्या प्रयत्नाने लक्ष काढून समोर वळवलं त्याने , " अष्टविनायक केलं असशीलच की कधीतरी "
"हो आले होते , पण खूप लहानपणी , आता एवढं आठवत नाही !. "
" लहानपणीच्या गोष्टी आठवत नाहीत तुला ? मठ्ठच आहेस , मला बघ एकूण एक घटना आठवतेय लहानपणीची, i have very sharp memory , you konw ? "
अरे ssss मी एक वर्षाची होते त्यावेळी.. ,आईबाबा आले होते मला घेऊन कडेवर ,कळलं? त्याला वेडावून दाखवत ती पुढे म्हणाली “ म्हणे , i have very sharp memory . म्हणून काल प्रॅक्टिकल च्या वेळेस विकेट उडाली होती वाटतं ? देवी मला हे सांगतेस ? , देवी मला ते सांगतेस ? “ .. आता कसा गप्प बसलास ? आहे का आवाज काही ? बोल की अं ? “
"अगं ए ssssssss भांडोरी!.. भांडोरी आहेस तू एक नंबरची माहितीये का तुला ? " सुहृद खदाखदा हसत म्हणाला .
" असू दे !काय शब्द काढलाय भांडोरी म्हणे ,,हं “ चेहेऱ्यावर रेंगाळणाऱ्या रेशमी बटा हातांनी सावरत, मानेला एक नाजूक झटका देऊन ती गाल फुगवून ती बाहेर बघत राहिली. सुहृद खुसुखुसु हसत राहिला,
अर्ध्या पाऊण तासानंतर दुरून काळ्याभोर घडीव दगडाचं अतिभव्य प्रवेशद्वार दिसायला लागलं तशी देवयानी सरसावून बसली, मुळचे मोठे असलेले डोळे कमालीच्या उत्सुकतेनं ताणून अजून मोठे करत ती उत्साहाने जवळजवळ ओरडलीच , “सुहृद... आलं की रे अमरापूर ! लांबूनही कसली भारी दिसतेय तुमची गढी , i am so excited ..... ”

चार एकरांच्या विस्तीर्ण परिसरात पसरलेली,ती गढी जशी जशी जवळ यायला लागली तशी तिची गूढता आणि भव्यता जास्तच नजरेत भरायला लागली ,अमरापूरच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देत अठराव्या शतकापासून अनेक विविध घडामोडी पाहत एखाद्या पुराण पुरूषा सारखी भक्कम पणे पाय रोवून उभी असलेली ती गढी . एखादा घोडेस्वार घोड्यावर बसूनच आत जाईल एवढ्या उंचीचं दगडी घडीव चिरेबंदी प्रवेशद्वार , त्याच्या कमानीवर कोरलेली कमळ पुष्प आणि शरभ शिल्पांची वेलबुट्टी म्हणजे म्हणजे शिल्पकलेचा अत्यन्त उत्कृष्ट नमुना होता. जवळपास वीस फुट उंच आणि सहा-सात फुट रुंद असलेली तटबंदी आणि तिच्या बाजूला आठ एक मोठे मोठे भक्कम बुरुज, आत दोन्ही बाजूला प्रशस्त दगडी देवड्या. प्रवेश द्वारापाशी पोहोचल्यावर त्याच्यावर असलेल्या रेखीव जाळ्यांच्या सुंदर गवाक्षांचं देवयानी थक्क होऊन निरीक्षण करत होती ते बघून दिंडी दरवाजातून आत शिरता शिरता सुहृद तिला म्हणाला ,” मॅडम चला आत , नंतर बघा निवांत, ते बघायलाच आला आहात आपण “
“ My God !.. सुहृद तु इथे राहतोस ? इथे ???? “
उत्तरादाखल तो फक्त हसला , चल आत जाऊया , ‘“ माँ वाट पाहत असतील आपली “
तितक्यात एका तांब्यात पाणी , भाकरतुकडा घेऊन, आरतीचं ताट घेऊन साधारण पन्नास-पंचावन्नच्या आसपास वय असलेली एक स्त्री लगबगीने समोरून येऊ लागली , गोरीपान , कपाळावर ठसठशीत कुंकू , नाकात टपोऱ्या पाणीदार मोत्यांची भली मोठी नथ घातलेली , पायातली जोडवी टचटचा वाजवत ती जवळजवळ पळतच येत होती . तिच्या मागोमाग आणखीही दोन गडी पळत आले ,सुहृदने सामान काढण्यासाठी गाडीची चावी त्यांच्या हातात देत त्यांची विचारपूस केली ,मग त्याने देवयानी ची त्या स्त्री शी ओळख करून दिली , “देवी या हौसाक्क्का, मला आईसारख्या आहेत , नमस्कार करतो हौसाक्का “ बोलता बोलता तो वाकला ,” आई म्हाळसाई माझ्या लेकराला उदंड आविष्य दे ग माय !.. “ असं म्हणून हौसक्काने त्याच्या कपाळावरून बोटं फिरवून कडाकडा मोडली . “हौसाक्का हि देवयानी, माझी कॉलेजमधली मैत्रीण . “ देवयानीने लागलीच हसून त्यांना नमस्कार केला , “या आत या !.. “. खाली ठेवलेला चांदीचा तांब्या आणि ताट लगबगीने उचलण्याच्या नादात देवयानी कडे त्यांनी पाहिलंच नाही( की मुद्दाम दुर्लक्ष केलं ????...)
“ देवी , चल आत जाऊया , माँ वाट पहात असतील आपली “
तो आल्यामुळे गढीत एकंदरीत उत्साहाचं वातावरण पसरलं होतं , सगळ्या गाडीमाणसांची लगबग सुरू होती , त्याच्याशी बोलायची सर्वांना ईच्छा होती ,आणि तो हि आत जाता जाता सराईत पणे पूर्वीचे धनिक किंवा सरदार आपल्या नोकरांशी जसं अधिकाराने , जिव्हाळ्याने वागतात तसं वागत होता . देवयानी हे सगळं एकीकडे पाहत नवलाने पाहत त्याच्या मागे जात होती . प्रवेशद्वारातून आत वाड्याकडे जाईपर्यंतच्या मार्गात एक विस्तीर्ण चौक आणि त्याच्या बरोब्बर मध्यभागी उसळणारं अतिशय सुंदर कारंज ,
“Woww … simply beautiful !..”
“हजारी कारंज आहे ते, i mean हजार पाकळयांचं !..” पुढे चालता चालता सुहृदने माहिती पुरवली , आत वाडयात जाईपर्यंतचा परिसर गर्द दाट वनराईने व्यापला होता. आंबा ,वड, जांभूळ, पिंपळ , चिंच चालणाऱ्याच्या डोक्यावर छत्र चामरं ढाळत होती. त्यांच्या गार आणि दाट सावलीतून चालताना देवयानी मनात विचार करत होती , केवढं भव्य आहे हे सगळं , आपल्याला नव्हतं माहिती सुहृद एका सरदार
घराण्यातला आहे , त्यानेही सांगितलं तर नाहीच कधी आणि जाणवूनही दिलं नाही कधी. कॉलेजमध्ये आपण सगळे त्याची किती चेष्टा मस्करी करतो ,त्याला कामाला लावतो, कसंही वागवतो , तोच का हा सुहृद ?
गढीच्या आत प्रचंड मोठा दुमजली , चौसोपी वाडा होता. सर्वत्र भव्यता , समृद्धी आणि वैभवाच साम्राज्य होतं , जिथे बघू तिथे हंड्या, झुंबर , चांदीच्या मोठाल्या फुलदाण्या यांची अक्षरशः रेलचेल होती .

क्रमशः

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्सुकतेने वाचायला आली, पण ही कथा क्रमशः आहे तर शिर्षकात तसे लिहायचे न, म्हणजे भाग पहिला वगैरे.

पूर्ण वाचल्यावर शेवटी क्रमशः वाचून हिरमोड होतो, मला नाही आवडत क्रमशः कथा वाचायला

मस्त दमदार सुरुवात केलीय. असेच खुप सारे उत्कंठावर्धक नाविन्यपूर्ण भाग येणार म्हणून क्रमशः वाचून बरे वाटले.