मराठी चित्रपट कसा वाटला? - 1

Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23

चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देऊळ पिक्चर खूप आवडला.
देऊळ बंद अजिबात नाही आवडला. त्यात स्वामी समर्थ हे आइन्स्टाईन वगैरे दाखले देऊन छद्मविज्ञान शिकवतात आणि ते एका वैज्ञानिकाला पटतं हे बघून फार विचित्र वाटलं. मोहन जोशींचा अभिनय हीच काय ती जमेची बाजू. संहिता गंडली आहे.

देऊळ सिनेमा मलाही आवडला. सर्व बाबा-बुवा करणार्‍यांच्या मुस्काटात लावलेली आहे अ‍ॅन आय ओपनर. अजुन एक म्हणजे "तू झोप-मी जागा आहे" हे गाणे कहर आहे. देवाचे नारळ मागल्या दाराने रिसायकल होत असतात हे तर उघड गुपित आहे. आणि तरीही हार-फुले-नारळ हे वाहीले जातात. श्रद्धा बलियसि.

डीजे पूर्ण पोस्ट पटली. रस्त्याच्या कडेला बायोस्कोप वर चित्रपट दाखवायचे आणि ते दाखवणार्‍याचे निवेदन सुरू असायचे तसा प्रकार आहे.

गोष्ट एका पैठणीची
युट्युबवर पाहिला. छान भावनिक नाट्य.
सायली संजीव, सुव्रत जोशी उत्तम .

एक प्रश्न -
'पारध' नावाचा जुना मराठी चित्रपट हिचकॉक यांच्या कथेवरून प्रेरित आहे का ? ज्यात नूतन, सचिन, सारिका आणि श्रीराम लागू आहेत. नूतन शेवटी लागूंना विष देऊन मारते. गुप्तधन किंवा खजिन्यासाठी लागूंनी सचिनला मारलेले असते. नूतन त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी त्यांना तळघरात कोंडून मारते. खतरनाक होता सिनेमा.

हिचकॉक यांच्या कथेवरून असल्यास कुणाला मूळ कथेचं नाव माहीत आहे का ?

या प्रकारच्या कथेवर राखीचा एक चित्रपट होता. श्रद्धांजली कि उपासना असं नाव होतं.
हा मूळ प्लॉट वाचलेला आहे. त्या कथेची अनेक वेगवेगळी नभोनाट्ये ऐकलेली आहेत. मूळ कथा बहुतेक एका आडगावात राहणारी एक वृद्ध स्त्री आणि तिच्याकडे येणारा एक आगंतुक अशी आहे. शेवटी ती वृद्ध स्त्री त्याला जे पेय देते त्यात विष होतं असे सांगते. ती अंध असते. पण आपल्या मुलाचा मारेकरी आपल्याकडे निश्चित येईल ही खात्री तिला असते.

श्रद्धांजली कि उपासना असं नाव होतं. >>> श्रद्धांजली मध्ये राखी आपल्या नवर्‍याच्या खूनाचा बदला घेते. आणि सुरेश ओबेरॉयला पाण्यात बुडवून मारते, विषाने नाही. 'लोग पानी के बीना मरते है मै तुम्हे पानी पिला पिला के मारुंगी' असा कायसा डायलॉग पण आहे.

हिचकॉक यांच्या 'द लॉजर' कथेशी थोडी मिळतीजुळती आहे पण प्रेरित नाही म्हणे. श्रद्धांजली सिनेमा इंट्रेस्टींग वाटतोय.

ओह, इथे वाढलंय जेवण आणि पलिकडच्या वाड्यात पानावर बसून आलो.
नभोनाट्य वाटसरूच बहुतेक. पुरूषोत्तम जोशी असावेत.

पूर्वी दूरदर्शनवर एकांकिका असत; त्यातील "वाघनख" नावाची ह्याच गोष्टीवर आधारित होती. आशालता वाबगावकर, नीना कुलकर्णी आणी दिलीप कुलकर्णी होते. आशालता वाबगावकर, आई आणि नीना कुलकर्णी मुलगी असते.

नीना कुलकर्णी प्रेमापोटी वाईट संगतीत अडकते. Smuggling चा माल वाडय़ात आणते. नंतर तिचा त्या मालाच्या वाटणीच्या वादातून खून होतो.

नाटक सुरु होते तेव्हा दिलीप कुलकर्णी वाडा विकत घ्यायला आलेला असतो आणि आशालता त्याचे आदरातिथ्य करते, पण काही कारणाने विक्रीची किम्मत , दिलीप कुलकर्णी agree झाल्यावरही वाढवीत रहाते. शेवटी तो वैतागून जाऊ पहातो पण तो हलूही शकत नाही आणि मरणाच्या दारात असतो; तेंव्हा आशालता त्याला सांगते की "मला माहीत आहे की तू माझ्या मुलीला मारले आहेस. कारण तूला माहित आहे की माल ह्या वाड्यातच आहे. म्हणुनच जरी मी बोलताबोलता किम्मत वाढवत नेली आणि तू ती मान्य करत होतास. मला तुला शिक्षा द्यायची होती. Revenge is complete"

पारध (१९७७) आहे युट्युबवर:
https://www.youtube.com/watch?v=phQW31l2VVI

माडगुळकरांनी लिहिलेले वाटसरू फारच लोकप्रिय नभोनाट्य झाले होते त्या काळात. त्याची नक्की कथा आठवत नाही आता (पुढे एक कथानक लिहितोय तेच आहे का?)

मुळात नभोनाट्य हा प्रकारच भारी होता. केवळ आवाजावरून नाट्य उभे करत. श्रोत्यांच्या कल्पनाशक्तीला चांगलाच ट्रिगर मिळत असे. आता तो फॉर्म कुठेच अनुभवायला मिळत नाही.

>> शेवटी ती वृद्ध स्त्री त्याला जे पेय देते त्यात विष होतं असे सांगते. ती अंध असते.

मी जी एक कथा वाचली होती व त्यावर मला वाटते एक सिनेमा सुद्धा आला होता. वृद्ध जोडपे झोपडीत राहत असते. मुलगा बरीच वर्षे बाहेरगवी असतो. अनेक वर्षांनी तो येतो एक दिवस. हे ओळखत नाहीत. सरप्राईज द्यायचे म्हणून हा सुद्धा आपण कोण आहे हे त्यांना सकाळी सांगायचे ठरवून रात्री झोपी जातो. पण हे त्याला लुटमारीच्या उद्देशाने रात्री झोपेतच मारून टाकतात. तो त्यांचा कैक वर्षांपासून "उद्योग"च असतो. जाणायेणाऱ्या वाटसरूना झोपडीत विसावा द्यायच्या निमित्ताने बोलवून रात्री मारून खून करून पैसाअडका लुटत असतात. मुलासाठी पैसा कमवत असतात असे काहीसे आहे त्यात. मला वाटते माडगुळकरांनी लिहिलेले वाटसरू नाट्य असेच आहे का (?) पण असा एक मराठी/हिंदी सिनेमा सुद्धा होता.

नाव आठवत नव्हतं, पण सुरेखा सिक्रि असलेली टेलिफिल्म होती दूरदर्शन वर (देसाई आठवत नाहीये, ज्ञान शिवपुरीही होता का त्यात, सुरेखा सिक्रिच प्रामुख्याने आठवतेय, जबरी रोल), ते त्यांच्याकडे उतरणाऱ्या लोकांना मारून त्यांची संपत्ती हडप करत असतात, त्यांच्या मुलाला लहानपणीच शिकायला दुसरीकडे पाठवतात, त्याच्या लग्नालाही जात नाही, तो सरप्राईज द्यायला येतो, नवरा बायको पैकी एकजण म्हणतो की आता हे थांबवूया, पण दुसरा म्हणतो ही शेवटची हत्या, नंतर नाही करायचं हे.

दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची सून येते की माझा नवरा, तुमचा मुलगा आलाय तुमच्याकडे, तुम्ही ओळखता का त्याला, हे बघायचं होतं त्याला, तो पर्यटक म्हणून आलाय, तेव्हा ते shocked.

राजस्थान ची पार्श्वभूमी असलेला असाच एक पिक्चर बघितलाय पूर्वी. त्यात करमचंद मधली किट्टी होती.

सुरेखा सिक्रि असलेलाही राजस्थानमधला होता, वाळवंट दाखवलेलं.

मी गुगलवर चेक केलं, प्रकाश झा चा पिक्चर होता, मला टेलिफिल्म वाटली पण नाही. मामीने लिहिलेलं जास्त बरोबर आहे, देसाई पण आहे त्यात. शिवपुरी नाहीये.

मला वाटते माडगुळकरांनी लिहिलेले वाटसरू नाट्य असेच आहे का (?) पण असा एक मराठी/हिंदी सिनेमा सुद्धा होता. <<<<<<<

नाही.. माडगूळकरांच्या कथेचं मुलाचा काही उल्लेख नाहीये.

>> टेलिफिल्म होती दूरदर्शन वर
बरोब्बर! हीच टेलिफिल्म मी म्हणत होतो. फार प्रभावी चित्रण आणि अभिनय होता सगळ्यांचा. इतक्या वर्षांनी सुद्धा लक्षात आहे.

>> नाही.. माडगूळकरांच्या कथेचं मुलाचा काही उल्लेख नाहीये.

हो मला वाटते माडगूळकरांची कथा अशी नाही. थोडी वेगळी आहे. वाचली होती कथा आणि ते नभोनाट्य सुद्धा ऐकले होते. विसरलो. वरच्या तुम्ही दिलेल्या लिंकवर पुन्हा ऐकायला हवी.

'ही अनोखी गाठ' बघितला. #स्पॉयलर्स असतील.‌
श्रेयस तळपदे, गौरी इंगवले, सुहास जोशी, शरद पोंक्षे आणि ऋषी सक्सेना ( 'काहे दिया परदेस' मधला शिव)

सगळ्यांचा अभिनय कृत्रिम आहे. गाणी बरी वाटतात पण नंतर आठवत नाहीत. शरद पोंक्षे 'चिडक्या बिब्ब्याच्या रोलमधे अडकला आहे. 'बाई पण' मधेही भाजी- चटणी वरुन किरकिर करत होता. इथंही बायकोला कानाखाली देतो, मुलींना ताब्यात ठेवतो. मोठ्या मुलीचं बळच लग्न ठरवतो जी एम ए करत असते आणि तळपदेचं पात्र आठ वर्षांनी मोठं दाखवलं आहे. मोठी मुलगी अचानक मरते मग गौरी इंगवले - आम्ला तिचं नाव, जी त्याच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असते. तिला अचानक बोहल्यावर उभे करतात.

ऋषी कॅमेरामन असतो हिला नाचताना बघून ती त्याला आवडायला लागते. ही दोनतीन भेटीत स्वतःला काडीमात्र प्रेम नसतानाही बळजबरीच्या लग्नाआधी पळून जायला बघते तर ऋषी तिला स्टँडवर घ्यायला येत नाही. ह्यापेक्षा थक्क करणारं म्हणजे तरीही ती लग्नानंतर सुद्धा त्याच्यामागे जाते. सातत्याने येणारा एकही रेड फ्लॅग तिला दिसत नाही. तिचंही कुणावरच प्रेम नसतं, कुणाचंच कुणावर प्रेम नसतं. तरीही टॉक्सिक पेट्रियार्कीला शर्करावगुंठीत करून त्याचा 'हम दिल दे चुके सनम' केला आहे. सिनेमाला कणाच नाही.

श्रेयसचा चष्मा फारच विचित्र आणि विनोदी आहे. त्यात तो साधासरळ दिसावं म्हणून वेडगळासारखं हसत होता.
'अलबेला सजन'चा अभिनिवेश दाखवत विनोदी पद्धतीने सादर केलेले शास्त्रीय वाटावे असे गाणे आणि नृत्यही आहे. जे मागच्या सुंदर घरासाठी बघितले. घर , कोकण आणि पाचगणी परिसर सुंदर दाखवला आहे, त्यामुळे मी पूर्ण केला आहे.

श्रेयस तिला गुपचूप फिश खाऊ घालतो आणि नसलेल्या लफड्याला सपोर्ट करतो. ते बघून व हा ऋषी इकडे 'लिव्ह इन' कर म्हणतो ते तिला नको असतं कारण तिला लग्न करायचं असतं. शिवाय तो वाईनही पित असतो हे बघून तो अकस्मात/ सोयीस्करपणे वाईट होतो व ती नवऱ्याकडे परत येते. शिक्षण व फिल्ममधलं करिअर सोडून संसाराला लागते. शेवट अपेक्षित होता तरीही विचित्र पद्धतीने हाताळला आहे. गौरी ओव्हरॲक्टिंग करते पण वाईट नाही. श्रेयस तळपदे ऑकवर्ड वाटत रहातो आणि तिशीचा वाटत नाही, चाळीशीचाच वाटतो. सुहास जोशी कृत्रिम म्हातारी वाटते. पोंक्षे नेहमीचाच.

मला मराठी चित्रपटांशी फारसं रिलेट होता येत नाहीये, काय बिनसलं आहे माहीत नाही. फारच उच्चभ्रू उगाच उसासे टाकत गुंतागुंतीचा आभास निर्माण करणारी पण प्रत्यक्ष साडीवर सुरकुती सुद्धा नसलेली पात्रं असतात (उदा. मृणाल कुलकर्णी) नाही तर एकदमच उथळ, सवंग, उगाच चीप विनोद व अंगविक्षेप करणारी, तेचतेच बोलणारी तरी..! (उदा. प्रथमेश परब)

जबरदस्त लिहिलं आहेस.एकंदर बघू नये.
मी शेवटच्या पॅरा शी एकदम सहमत आहे.आता सध्या पंचक पहिला थिएटर ला जाऊन.मला अजिबात आवडला नाही.मुळात कथेचा जीव तिळाएवढा.त्यात सर्व पात्रं प्रचंड ओव्हरऍक्ट करत होती.शिवाय पोस्टर वर प्रभावळकर या एका आशेच्या किरणाने मला थिएटरमध्ये पिक्चर बघण्याची माती खावी वाटली होती, तो आशेचा किरण पहिल्या 5 मिनिटात अंधार झाला.मी सनी देओल असते तर पडदा फाडून फेकून आपटला असता.चित्रपटात 5 मिनिट असलेला माणूस पोस्टर वर मध्ये बसलेला दाखवणे हे चिटिंग आहे.
'आम्ला'?अमला नाही का?नावाच्या धाग्यावरून इथे आल्याने हे आधी डोळ्यात शिरलं.
एकंदर विवाहबाह्य प्रेम ओढून ताणून आणलेलं दिसतंय.

आम्लाच ऐकू आलं मला, मग सारखं आम्लपित्त आठवू लागलं. विवाहबाह्य नाही की विवाहपूर्व नाही, संबंध येऊच दिले नाहीत त्यांनी. Lol जे संबंध आलेच नाहीत ते तोडून नवऱ्याकडे परत येते.

मी सनी देओल असते तर पडदा फाडून फेकून आपटला असता.>>> Lol मी बघणार होते 'पंचक' पण का बघणार होते ते विसरून गेले आहे.

Pages