मराठी चित्रपट कसा वाटला? - 1

Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23

चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाळ २ अप्रतिम सिनेमा आहे असे महेश मांजरेकरांनी सांगितले आहे. पण कमी प्रेक्षक असल्याने नालायक सिनेमे आपण पाहतोच त्यासोबत हा ही पहा अशी पुस्तीही जोडली आहे.

मराठी सिनेमा अप्रतिम असणे आणि गर्दी नसणे हे रडगाणं चालूच आहे. कुठेतरी आता प्रेक्षकांना सुद्धा जबाबदार धरायला हवेय. वर्ल्डकपचं कारण म्हणावं तर टायगर ने दोन दिवसात १०० कोटी रूपये जमवले. दिवाळीत फक्त सेलेब्रेशन मूडचे चालतात म्हणावं तर मग वेगळ्या विषयावरचे सिनेमे वर्षभर रिलीज होत असतात, ते ही चालत नाहीत.

मार्केटिंगचं कारण द्यावं तर सैराटनेही मार्केटिंगवर मेहनत घेतलेली नव्हती. ना देऊळ ने. राझी ने सुद्धा माफक पब्लिसिटी केली होती.
लोकांना मराठी चित्रपटाला जाणं कमीपणाचं वाटतं का अशी शंका येते.

२ करोड लोक सिनेमा हिट करतात. हेच २ करोड लोक सगळेच सिनेमे बघत नसावेत. थ्री इडीयट्स, सैराट ,राझी असे सिनेमे पाहणारं पब्लीक पण असावं. काही कॉमन असतील. पण एकंदरीतच हुल्लडबाजीचे सिनेमे पाहणारे जास्त संख्येने आणि जास्त सक्रीय असतील.

दुसरीकडे ना़ळ २ किंवा आत्मपॅम्फ्लेट हे सिनेमे अनुक्रमे ९०० आणि ५०० स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्याने ते हिट होण्याची शक्यता दुरापास्तच आहे. भावाचा एक मित्र दिग्दर्शक आहे. त्याचं म्हणणं आहे कि कमी स्क्रीन्स त्यातून गैरसोयीचे शोज असतील तर मी सिनेमा प्रदर्शितच करणार नाही. सरकारने पॉलिसी बनवायला पाहिजे.

मराठी चित्रपटांचा कॅनव्हास मुद्दाम मोठ्या पडद्यावर पाहावा असा भव्यदिव्य मुळातच नसतो हे कारण असेल का? साध्या-(अति)सोप्या कौटुंबिक नाहीतर प्रेमकथा (चरित्रपटदेखील याच चौकटींत!) बघायला मोठा पडदा कशाला हवा असा विचार प्रेक्षक करत असतील तर त्यात काय चूक?

खरं तर बरेच दिवसात थिएटरला जाऊन सिनेमा पाहिला नाही त्यामुळे मराठी चित्रपट कसे आहेत हे सांगता येत नाही. कट्यार आवडला होता. तसाच श्वास, सैराट अनाहत सुद्धा. बालगंधर्व राहून गेला पहायचा.

नाळ चा अनुभव छान असेल तर मोठा / छोटा पडदा हा फॅक्टर गौण असेल.

मात्र संदूक आणि तत्सम किंवा तुम्ही उल्लेख केलेले चरित्र पट किंवा ऐतिहासिक लाटपट मोठ्या पडद्यावर पाहू शकणार नाही.

मराठी चित्रपटांचा कॅनव्हास मुद्दाम मोठ्या पडद्यावर पाहावा असा भव्यदिव्य मुळातच नसतो हे कारण असेल का? साध्या-(अति)सोप्या कौटुंबिक नाहीतर प्रेमकथा (चरित्रपटदेखील याच चौकटींत!) बघायला मोठा पडदा कशाला हवा असा विचार प्रेक्षक करत असतील तर त्यात काय चूक?>> करेक्ट. मी मोठ्या पडद्यावर फक्त oppenheimer , MI, Top Gun सारखे सिनेमे बघणे प्रेफर करतो. Movies on big screen should be a visual treat considering the money spend on tickets. ना़ळ २ किंवा आत्मपॅम्फ्लेट हे सिनेमे ott वर ठीक. जवान, पठाण etc तर ott वर बघायच्या लायकीचे पण नाहीत पण ते सुपरहिट आहेत. पसंद अपनी अपनी Happy

मार्केटिंगचं कारण द्यावं तर सैराटनेही मार्केटिंगवर मेहनत घेतलेली नव्हती
>>> सैराटचे मार्केटिंग चांगले केले होते. फक्त ते हिंदी चित्रपटात करतात तसे अंगावर येणारे नव्हते.

दुसरे म्हणजे स्ट्रेसफुल आयुष्यात चार घटका करमणूक म्हणून जर कोणी चित्रपट बघणार असेल तर त्याला/तिला इंटरेस्टिंग वाटेल असे तर प्रोमो पाहिजेत ना. शिवाय अशा वेळी व्हेंटिलेटर, कासव वगैरे चित्रपट आवर्जून कोण पाहील? हे चित्रपट वाईट नाहीतच. पण ते पाहण्याच्या मनस्थितीत प्रेक्षक आहे का हाही महत्वाचा प्रश्न आहे. इतर वेळी साहित्य, संगीत, चित्रपट यात उत्तम अभिरुची असलेल्या व्यक्तींनी कठीण परिस्थितीतून जात असताना 'दबंग' पाहून एन्जॉय केल्याचे पाहिले आहे.

चित्रपटाला ड्रीम मर्चंटाईझ म्हटले तर आजूबाजूच्या आयुष्यात घडणाऱ्या दुःखद, अन्यायी, किचकट, स्ट्रेसफुल गोष्टी पैसे देऊन बघायला कोणाला आवडेल? पाहायचेच असेल तर निदान पॅकेज तरी चांगले पाहिजे ना? 'सैराट - ऑनर किलिंगवर भाष्य करणारा हार्ड हीटिंग चित्रपट' अशी जाहिरात केली असती तर किती जण हौसेने गेले असते?

आणि मोठ्या पडद्यावर पाहायचे तर व्हिज्युअल ट्रीट पाहिजे हा पण महत्वाचा मुद्दा आहे.

तिकीटाचे दर आणि व्हिज्युअल ट्रीटमेन्ट पटण्यासारखे आहे.
पण मग प्रेक्षकांना हेच हवे असेल तर ब्रह्मास्त्र, पठाण, जवान, टायगर असेच सिनेमे येणार.

मल्याळम किंवा बांगला आणि तमिळ तेलगू त सुद्धा कंटेट चांगला असलेल्या चित्रपटाला सुद्धा यश मिळते आणि कमर्शियल सिनेमाला सुद्धा.

पण मग प्रेक्षकांना हेच हवे असेल तर ब्रह्मास्त्र, पठाण, जवान, टायगर असेच सिनेमे येणार. >>> सैराटही होताच की

माझेमन,सहमत आहे.पण महाराष्ट्रात मराठी चित्रपटाला फेअर टाइम स्लॉट(माफ करा इंग्लिश लिहितेय घाईमुळे) मिळालेच पाहिजेत.पिक्चर कितीही साधा सामान्य असला तरी तर एक था टायगर किंवा पठाण ला 3 स्क्रीन आणि दर 3 तासाने शो मिळत असतील तर मराठी चित्रपटाला विकेंड ला एका स्क्रीन वर 7.3० pm किंवा 8 pm चा शो किंवा सकाळच्या 9 चा शो मिळालाच पाहिजे.
अतिशय मूर्खांसारखे स्लॉट असतात.दुपारी 3, दुपारी 12.45 वगैरे.सन्माननीय अपवाद फक्त सिटीप्राईड कोथरूड.
पिक्चर कसाही असेल.पण प्रेक्षकांना तो पाहून टुकार आहे हे ठरवायला चित्रपटाला योग्य थिएटर्स योग्य प्राईम स्लॉट चा फेअर चान्स हवा.

अनु +1

झिम्मा, वाळवी, बाईपण हे काही अप्रतिम चित्रपट आहेत असे नाही. मनोरंजन नक्कीच करतात. पण स्पेशल इफेक्ट्स, व्हिज्युअल्स नसतानाही हिट झालेत.

आताशा व्हिज्युअल इफेक्ट्स कसे करतात हे माहीत झाल्यावर निव्वळ त्यासाठीच जाणारे नक्कीच कमी होत जाणार. गरज असेल तिथे बेमालूम इफेक्ट्स असावेत. नसले तरी उत्तम छायाचित्रण, लोकेशन्स पुरेसे आहे.

कथेला साजेसे चित्रीकरण हा महत्वाचा मुद्दा आहे. उदा. फोटोप्रेम हा मराठी चित्रपट. कथेचा जीव छोटासा असला तरी चांगला आहे. फारच लिमिटेड स्कोप आहे व्हिज्युअल्ससाठी. तो अमेझॉन प्राईमवर रिलीज झाला.
'कला'ही नेटफ्लिक्सवर रिलीज झाला.
प्रत्येक गोष्टीला थिएटरच पाहिजे असे नाही.

चांगले सिनेमे थिएटरला चालले नाहीत तर संपूर्ण टीमवर फ्लॉप चा शिक्का बसतो. त्यांना कामच मिळाले नाही किंवा त्यांनी सिनेमे बनवणे सोडून दिले तर ओटीटी वर त्यांचे सिनेमे कसे येणार?

मांजरेकरांचा मुद्दा हा आहे.

एक नवी ट्रेंड आहे.. काही निर्मात्यांना चांगले सिनेमे बनवायचे असतात. तिकीटबारी हे त्यांचे ध्येय नसते. थेटर रिलीझच्या निमित्ताने थोडीफार पब्लिसिटी आणि मग ओटीटी. त्या अधेमधे फिल्म फेस्टिव्हल्स , अवॉर्ड्स.

किंवा मग थेट ott रिलीज करावे
थिएटर्स च्या मांजर उंदीर खेळात चित्रपट कलाकार आणि तंत्रज्ञ टीम ची निराशा नको.

त्यांना सुपरनोवा म्हणता येईल.
चार दिन कि चांदनी. आज यहा कल वहा.
लक्ष वेधून घेणे किंवा सध्याच्या व्यवसायात पैसा कमवत राहून एक हौस पूर्ण करणे असा प्रकार असेल.

नियमित / सिरीयस फिल्ममेकर्स ना यशाची गरज असते.

अनु
थेट ओटीटी ला त्या नावाची पत पाहूनच पतपुरवठा होणार..
पूर्वी सारखे नेफ्लि, प्राईम वर ताज्या दमाच्या लोकांना संधी नाही.

नेफ्लिच्या सेक्रेड गेम्स साठी अनुराग कश्यपलाच बोलवलं होतं. तिकीटबारीवर यशस्वी आहे तो.

तरी उत्तम छायाचित्रण, लोकेशन्स पुरेसे आहे. >>> व्हिज्युअल ट्रीट मध्ये हेही येतंच
फक्त व्हीफक्स म्हणजे भारी असं नाही

तुंबाड एकदम परफेक्ट उदाहरण यासाठी
थिएटरमध्येच बघावा असा सिनेमा

Hidden agenda नसलेले चित्रपट चालतात, जसे की वाळवी, बाईपण.
रितेश देशमुख राजकारणी असला तरी त्याचा वेड मुव्ही एका साऊथ मुव्हीचा सरळ साधा रिमेक होता, तो छान चालला.
बाकी मग श्यामची आई नाळ आत्मा whatever यांच्यावर अजेंडा चा शिक्का आधीच बसलेला असतो आणि सामान्य प्रेक्षक लांब राहतात. म्हणजे यातला प्रत्येक चित्रपट अजेंडा पट असेलच असं नाही. पण पुरोगामी कोणतंही काम करणार ते प्रचारकीच असणार असा समज आहे. चित्रपट कोण प्रमोट करतोय, कोणता समाज एखाद्या डिरेक्टरचं यश co-opt करतोय हे सोशल मीडियावर बघून लोक फुली मारून टाकतात.
भाऊबळी असं नाव असलेला एक चित्रपट तमाम काँग्रेसी डावे प्रमोट करत होते. तो इतका वाईट पडला..
हेच काही वेळा राईट विंग चं ही होतं. आहे हे असं आहे.

काही चित्रपटांची नावे लिहून त्यांची संभावना अजेण्डा अशी करून प्रतिसाद बॅलन्स आहे असे वाटण्यासाठी शेवटच्या ओळीत राईट विंग असा शब्दप्रयोग केल्याने संतुलित प्रतिक्रिया म्हणतो आणि थांबतो.

इथे वाचून झी 5 वर 'नाळ' बघितला. काय सुंदर चित्रपट आहे!
मनाला भिडला एकदम. सगळी पात्रं एकदम जिवंत उभी केली आहेत. चैत्या ( श्रीनिवास पोकळे) चा अभिनय तर बेस्ट! शेवटशेवटचे प्रसंग तर कोरून काढल्यासारखे परफेक्ट आहेत.
एवढा चांगला सिनेमा मराठीत येऊन आपल्याला अजूनपर्यंत माहिती नव्हता, याचं वैषम्य वाटलं!

तीन अडकून सीताराम चा डिटेल मध्ये रिव्ह्यू लिही की अस्मिता! पहावा की नाही ठरवता येईल Happy
>>> रमड, काहीच नाही गं त्यात- झाला रिव्ह्यू, नका बघू. Proud

मला वैभव तत्त्ववादी व ऋषिकेश जोशीचं काम आवडलं, बाकीच्यांचंही वाईट नाही पण सिनेमाच रटाळ वाटला. इथेही लंडनचं शूटिंग आहे, त्यामुळे आपली इथली चर्चा आठवली व 'तीन सबसिडाईज्ड सीताराम' नाव ठेवलं. Wink प्राजक्ता माळी ओव्हर कॉन्फिडन्ट वाटली, दुसरी हिरोईन कोण होती माहिती नाही. आलोक राजवाडे कुठेही गेला तरी नेहमी भाडिपा मोड मध्येच वाटतो. त्याचे उच्चार स्पष्ट व आवाज स्वच्छ आहेत पण. कुणाचंच काम खटकत नाही पण मजा येत नाही.

मराठी कलाकार 'आम्ही काय भारी करतोय बघा/आता तुमचे डोळेच दिपवून टाकतो की नाही बघा'- हा जो आव आणतात त्याचं 'बारा ओटीटींचा अर्क' काढलेल्या प्रेक्षकांना काय अप्रूप वाटणारे..! हे नेहमी मराठीच्या 'मानाने' सिनेमे काढतात आणि स्पर्धा विसरतात. प्रेक्षक कशाला सबसिडी देईल, तो काही 'युके' नाही. Happy

Pages