चला आपण यांना मदत करूया.

Submitted by हर्पेन on 13 April, 2020 - 07:40

मैत्रीचा लढा करोनाशी

टाळेबंदीच्या परिस्थितीमुळे अनेक जणांचा रोजगार बुडतोय, आणि ज्यांचे हातावर पोट आहे अशा अनेक जणांना उपाशी दिवस काढावे लागत आहेत.

मैत्रीचे सांगोल्याचे मित्र शाम पवार अशा अनेक कुटूंबांच्या संपर्कात आहेत.

आवाहन क्र. १

राजस्थान, डोह येथील रहिवासी असून एकूण 57 लोकांचा कबिला आहे यामध्‍ये 13 कुटुंबीय, ज्यामधे पंधरा मुली आणि 17 मुले आहेत, डोंबारी काम व औषध विक्री हा त्यांचा व्यवसाय आहे. जत शहराच्या बाहेर चार किलोमीटरवर पाल टाकले आहे. अजून यांना कसलीही मदत मिळाली नाही.

आवाहन क्र. २

हत्तीद, ता. सांगोला, जिल्हा सोलापूर हे ४७६४ लोकसंख्या, ७८९ कुटूंब असलेलं गाव. गावातल्या ३० कुटूंबांना अशाच मदतीची गरज आहे. यात विधवा, परित्यक्ता महिला व वृध्द, निराधार कुटूंब आहेत. यादी

IMG-20200413-WA0053.jpg

आवाहन क्र. ३

जत चे यल्लमा देऊळ प्रसिद्ध आहे. देवळात दर्शनासाठी येणारे भाविक इथल्या देवदासींना भिक्षुकी देत असतात. पण सध्या देऊळ बंद आहे. परिणामी या देवदासींवर भुकेलं रहायची वेळ आली आहे.

या ४५ जणी जवळच्या देवदासी वस्तीत राहतात. त्यांना अजून कुठलाही मदत मिळालेली नाही.

यापैकी काही देवदासींना मुलेही आहेत.

आवाहन क्र. ४

IMG-20200413-WA0054.jpg

जत शहरातच राहणारे हे मदारी लोक. एकूण 34 कुटुंब, ज्यात 55 मुले आणि 52 मुली आहेत. सापाचे व माकडाचे खेळ दाखवून हे पोट भरतात. सध्या त्यांना काही काम नाही.

IMG-20200412-WA0063.jpg

या लोकांना १५ दिवसाचे राशन द्यायचं आहे, त्यासाठी आपल्याला निधी हवा आहे. प्रत्येक कुटुंबाला निदान १५ दिवस पुरेल इतके साहित्य देण्याचा प्रयत्न आहे. याचा खर्च प्रत्येकी रु. ८५० आहे.

IMG-20200413-WA0055.jpg

तुम्हाला शक्य असेल तेवढा निधी द्यावा असं या कुटूंबांच्या वतीने आवाहन करत आहोत.

ONLINE DOMESTIC DONATION
Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank
Branch : Kothrud, Pune
Savings Account Number : 01491450000152
Account Name : Maitri
MICR : 411240009
Details for RTGS / NEFT / IFS Code : HDFC0000149

ONLINE FOREIGN DONATION
Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank Limited
Branch : Kothrud, Pune, Maharashtra, India.
Savings Account Number : 01491170000017
Account Name : Maitri
MICR Code : 411240009
Swift Code : HDFCINBB

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनापासून धन्यवाद
मैत्री ऑफीस ला कळवले आहे. तुम्हाला संपर्कातून एक मेलही पाठवली आहे.

मी xoom.com वापरून पैसे पाठवले आहेत. Confirmation मिळाले की अपडेट करेन. काहीवेळा ते नाकारतात.

@अ‍ॅडमिन : हा धागा कायम वर राहील असे काही करता येइल का ?

धन्यवाद vijaykulkarni
तुमचा पत्ता, ईमेल पत्ता फोन नंबर हे ही कळवाल का
सध्या माबो संपर्कातून ईमेल येत जात नाहीयेत बहुतेक. मला माझ्या फोनवर (९८८११५२८८४) कळवलेत तर बरे पडेल.

सर्वच लोकांना विनंती आहे की मैत्रीला मदत करून झाल्यावर कृपया आपापले तपशील जसे की पत्ता, ईमेल पत्ता फोन नंबर हे कळवलेत तर खूप बरे होईल.

@अ‍ॅडमिन : हा धागा कायम वर राहील असे काही करता येइल का ? >>>हेच मनात आले होते.
मैत्री कडून पोचपावती मिळाली आहे &/ धागा वर आणत आहे Happy . धन्यवाद.

कोरोनाकाळातील झुंज (भाग ५)

=====

आज वेळू गावातील सुमारे बावीस कुटुंबांना मोठ्या प्रमाणावर धान्य देण्यात आले. यात प्रत्येकी वीस किलो तूर डाळ, मूग डाळ, साखर व गोडेतेल यांचा समावेश आहे.

हातावर पोट असणाऱ्या व सध्याच्या काळात संघर्ष करावा लागत असणाऱ्या महिलांनी मोठ्या आनंदाने ही भेट स्वीकारली.

मागच्या अपडेट नंतरच्या श्री. शाम ह्या आपल्या मित्राने केलेल्या काही नोंदी

हत्तीद येथील सर्व एकल महिलांना मराठी शाळेत बोलाविले होते. त्यावेळी गावातील  ग्रामपंचायत  कर्मचारी, तलाठी आणि सरपंच व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहिले. गावातील लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला.  त्यांना आम्ही एकत्र जमू नका म्हणालो पण तरीही लोक आले. त्यांनी मैत्रीचे आभार मानले. एवढच नाही तर मैत्रीची रांगोळीही काढली आणि माझा सन्मानही केला. खरंतर हे अपेक्षित नव्हते परंतु ग्रामस्थ ऐकेनात. माझाही नाईलाज झाला.

WhatsApp Image 2020-04-20 at 22.39.50 (1).jpeg

राजस्थानी, किन्नर आणि काही देवदासी असे सगळे मिळून एकूण ६४ किट वाटप झाले.

आधी दिलेल्या लोकांनी कीट तपासून आवर्जून असे सांगितले की मैत्री ने दिलेल्या कीट मधे रोजचे जेवणखाण बनवण्याकरता लागणारी सर्व सामग्री नीट यादी करून दिलेली असल्याने अजून वेगळे काहीही विकत आणायला लागणार नाहीये.

ग्रेट, हरपेन

(मोबाईलवर तुमचे सदस्यनाम मला नीट लिहिता येत नाही, क्षमस्व)

खरोखरच मैत्रीचे काम ग्रेट आहे;
स्वयंसेवक आणि हितचिंतक नेहेमीच फार मोलाचा हातभार लावतात. मी फक्त सांगतो इथे.

आणि नावाचे असू द्या हो बेफिकीर. मलाही नुक्ता देता येत नाही तुमचे सदस्य नाम लिहिताना Happy
हर्षद म्हटलेत तरी चालेल.

मैत्रीचा स्वयंसेवक, ओंकार भोपळे याला टिंगरेनगर जवळ बिगारी कामगारांची वस्ती आहे, ज्यांच्यापर्यंत अजून कुठलीही मदत पोहोचलेली नाही असं समजलं. एकूण 18 कुटुंब या वस्तीत राहतात. या लोकांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी मैत्रीने टिंगरेनगर व जवळपास कोणी स्वयंसेवक आहेत का हे शोधले. मैत्रीने केलेल्या आवाहनाला बिबवेवाडीतल्या श्री प्रधान व टिंगरेनगरच्या मोहित सूर्यवंशी यांनी लगेच प्रतिसाद दिला. त्यांनी त्या भागातील किराणा दुकानात संपर्क साधून सामान घेतले व किट तयार केले. एक हॉल या कामासाठी उपलब्ध करून देण्यात आला आणि हाॅलच्या मालकाने किटमध्ये कांदे बटाट्यांची भर घातली.

श्री व सौ प्रधान आणि मोहित सूर्यवंशी या तिघांनी मिळून वस्तीत जाऊन तेथील वाघमारे यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या मदतीने तेथील 18 कुटूंबांना दिनांक 28 एप्रिलला दुपारी राशन किट दिले.

या किटमधले सामान -
गव्हाचे पीठ- 5 kg
तांदूळ- 5 kg
तूर डाळ-1 kg
तेल - 1 kg
मीठ- 1/2 kg
कांदा लसूण मसाला -200gm
हळद -200gm
साखर-2kg
चहा-1 पॅकेट
पोहे -1 kg
बेसन - 1 kg
कांदे- बटाटे .

टाळेबंदी सुरु राहिल्यास गरज असल्यास त्यांच्यापर्यंत पुन्हा साहित्य पोहोचवण्याचा मैत्री चा मानस आहे.

जोरदार मदत होत आहे तुमची! कडक सलाम!

परवा आम्हीही कासुरडी येथे kits घेऊन जात आहोत. उद्या शिरवळ ला मास्क आणि temperature gun नेत आहोत.

एक मदत एकत्र करूयात. शक्यतो सातारा रोड, पौड रोड, सिंहगड रोड या भागात जमले तर उत्तम!

(आग्रह नाही, सहज सुचवले, स्माईल)

मैत्रीचे करमाळा येथील मित्र प्रमोद झिंजाडे यांच्या निदर्शनास आले की जालना व उस्मानाबाद जिल्ह्यातील, उपजिविकेच्या शोधात करमाळा येथे आलेले नाथपंथी डवरी गोसावी समाजाची माणसे लाॅकडाऊनमुळे करमाळा मधे अडकून पडले आहेत आणि जवळील अन्नधान्य संपल्यामुळे त्यांची उपासमार होत आहे.

WhatsApp Image 2020-04-30 at 10.53.04.jpeg

मैत्रीने प्रमोद झिंजाडे यांच्या मदतीने त्या तेरा कुटुंबांना ( आबालवृद्ध सगळे मिळून जवळपास ४० जण आहेत) गव्हा- तांदुळापासून ते मीठ मोहरीपर्यंत शिवाय ज्यामधे आवर्जून डेटॉल साबण यांचा अंतर्भाव करण्यात आला होता सर्व समावेशक किट वाटप केले.

हर्पेन आणि बेफिकीर, फारच उत्तम कार्य सुरू आहे आणि अपडेटसबद्दल धन्यवाद.

एक कुतुहल म्हणून विचारते की या लोकांना पाणी आणि इंधन कसं काय उपलब्ध करून दिलं जात आहे?

जत परिसरातील मदारी कुटुंबियांना मदत वाटप करते वेळेची पुढची नोंद

यावेळी कीट एकत्र बनवायला जमले नाही त्यामुळे वाटप करताना प्रत्येकाला आपापली पिशवी घेऊन यायला सांगितले होते. आपल्या ठरलेले आणि विकत घेतलेले सर्व जिन्नस यादीनुसार त्यांना एकेक करून देत गेलो. यावेळी PI साहेबही आले होते परंतु त्यांनी प्रत्यक्ष वाटपात भाग घेतला नाही. विशेष म्हणजे त्यांनी १५ नवीन साड्या आणल्या होत्या त्या गरजू महिलांना द्या म्हणाले.

वाटप करते वेळचा फोटो १
Jat Madari 1.jpg

वाटप करते वेळचा फोटो २
Jat Madari 2.jpg

मामी अजून काही फोटो बघण्यात आले आहेत त्यानुसार तीन दगडांच्या चुलीवरच स्वैपाक शिजवतात ही मंडळी असे दिसते. पाण्याची जवळपास काही सोय असल्याखेरिज पाल तिकडे टाकत नसावेत त्यामुळे काहीतरी सोय असेलच.

हर्पेन आणि बेफिकीर, फारच उत्तम कार्य सुरू आहे आणि अपडेटसबद्दल धन्यवाद.>>>>>खरच

गव्हा- तांदुळापासून ते मीठ मोहरीपर्यंत शिवाय ज्यामधे आवर्जून डेटॉल साबण यांचा अंतर्भाव करण्यात आला होता सर्व समावेशक किट वाटप केले.>>>>>>किती छान आणि thoughtful .
खरच तुम्ही स्वयंसेवक सातत्याने जे कार्य करता ते देणगीपेक्षा कितीतरी अनमोल आहे. Hats off. Happy

आदिश्री, मामी >> अनुमोदन.

(अ‍ॅडमिन जरा अजुन ईमोजी द्याकीहो. शाब्बासकी द्यायची, नमस्काराची, टाळ्यांची वगैरे).

सध्या तरी मी प्रत्यक्ष काम काहीच करत नाहीये. निरोप्या आहे फक्त. सेतु म्हणू शकतो फारतर. Happy

शाब्बासकी टाळ्या नमस्कार हे सगळे प्रत्यक्ष काम करणारे अनेक स्वयंसेवक आहेत त्यांच्याकरता वापरूया.

मी निर्वासितांच्या आसराठिकाणांची टीवीवर दाखवत असलेली काही दृश्ये पाहिली. महिला, पुरुष, तरुण मुली एका शेडखाली योग्य अंतराने चटयांवर बसले होते. अर्ध्या वयाच्या मुलींना आवश्यक अशा सोयी, साधने, आडोसा पुरवता येत असेल का? अन्न मिळतच असेल पण बाकी? ह्या मुली कित्येकदा शाळाकॉलेजात जाणाऱ्या असतील, स्वच्छ राहाणीशी नक्कीच तोंडओळख असेल. यांना मदत कशी पोचवावी? मदतसंचात काही गोष्टी समाविष्ट करता येतील का? मी यावर मुख्यमंत्री ऑफिस आणि एकदोन ठिकाणी ट्वीट केले होते. अर्थात जिथे पुरेसे अन्नपाणी पोचवणेच कठिण तिथे आणखी लक्ष कोण देणार?
किरकोळ गोष्ट आहे पण लिहावीशी वाटली.

Pages