©राक्षसमंदिर - अंतिम भाग

Submitted by अज्ञातवासी on 12 April, 2020 - 13:45

©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे रूपांतरण किंवा पुनर्मुद्रण करताना लेखकाची परवानगी आवश्यक असेन, अन्यथा कायदेशीर कारवाई अनिवार्य आहे.

मनोगत -
राक्षसमंदिर ही दीर्घकथा पूर्ण करून वाचकांच्या हाती देताना मला अतिशय आनंद होत आहे. या कथेचा शेवट पहिला शब्द लिहिण्याआधी माझ्या डोक्यात होता, जे सहसा होत नाही. जी ए कुलकर्णी आणि नारायण धारप यांच्या साहित्यवाचनामुळे ही कथा माझ्या मनातल्या विचारानुसार मांडता आली, व वातावरणनिर्मिती करता आली. मात्र ही संपूर्ण स्वतंत्र कथा असून, यात कुठलाही भाग कॉपी केला गेलेला नाही.
अजून एक, ही कथा लिहिताना माझ्या अर्धवट सोडलेल्या कथांचाही प्रत्येक भागात उल्लेख झाला, आणि मी तो मनापासून एन्जॉयही केला. यामुळे आपणा सर्वांना माझ्या कथा वाचण्याची किती उत्सुकता आहे, हे नव्याने कळलं. या अपूर्ण कथांसाठी मी वाचकांची माफी मागतो, व भविष्यात त्याही कथा लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन.
ही कथा पूर्ण झाली असली, तरी जर वाचकांना ही कथा समजली नाही, तर तिचा उपसंहार लिहीन. पण ही कथा समजण्यास काहीही अडचण येणार नाही अशी आशा बाळगतो!
धन्यवाद!
अज्ञातवासी।

प्रथम भाग -
https://www.maayboli.com/node/74084

द्वितीय भाग -
https://www.maayboli.com/node/74090#new

तृतीय भाग -
https://www.maayboli.com/node/74100

चतुर्थ भाग -
https://www.maayboli.com/node/74111

पंचम भाग -
https://www.maayboli.com/node/74116

मल्लापा डोकं धरून बसला होता.
"मल्लराज हे उत्तर पुढच्या काही क्षणात अपेक्षित आहे, नाहीतर मोहिनीअस्त्राचा प्रभाव सुरू होण्याच्या अगोदर आपल्याला आपलं काम संपवता येणार नाही."
"पण अधीरराज इथे माझी मती कुंठित झालीये. आजपर्यंत मी फक्त देवतांना पूजनीय मानलं, म्हणून मी सरळ देवतांची निवड केली असती, परंतु माझं पूर्वायुष्य मी राक्षस म्हणून घालवलय, त्यामुळे आता मी राक्षसमार्ग म्हणून निवडावा का?"
"मल्लराज, निवड तुम्हांस करावयाची आहे. पण लक्षात घ्या, चुकीची निवड आपणा दोघांस मृत्यूच्या दारात घेऊन जाऊ शकते."
मल्लापाने क्षणभर विचार केला, आणि त्याने राक्षसमार्गावर पाऊल ठेवलं.
क्षणार्धात देवमार्गावरील सर्व आकृत्या गळून तिथे एक खोल विवर दिसू लागलं.
"अद्वितीय मल्लराज, अद्वितीय. बरोबर मार्ग निवडलात." अधीरराजानेही राक्षसमार्गावर पाऊल ठेवलं.
"अधिरराज, आता मी तुम्हाला काहीतरी सांगतो. लक्षपूर्वक ऐका."
मल्लापा कसल्यातरी खोल विचारात गढला.
"मानवी आयुष्य नियतीनेच निर्धारित केलेलं असतं, आणि प्रारब्ध कधी चुकत नसतं. माझ्या जन्माच्या रात्रीच माझा बाप या राक्षसमंदिरातल्या द्रव्याच्या लोभापायी कायमचा दूर हिरावला, ती आमची नियतीच.
आपण आमच्याजवळ आलात, आपणांस या जागेच्या रहस्याचा शोध लागला, ही आपली नियतीच, आणि मी इथे आलो, हीसुद्धा नियतीच."
"मानव, देव किंवा राक्षस, त्यांची नियती कुणीही बदलू शकत नाही. महाप्रतापी बळीराजाला एक बटु पाताळात धाडू शकतो किंवा या जगात माझ्या परवानगीशिवाय एक पान हलू शकत नाही म्हणणाऱ्या श्रीकृष्णाला एक साधा पारधी मृत्यू देऊ शकतो."
"अधिरराज, माझ्या नियतीत जे लिहिलंय तेच होईल, तेच घडेल. मग मी मार्ग कुठलाही निवडला असता तरी चाललं असतं. माझी ओळख आजपर्यंत एक मानव म्हणून होती. मी कुणाच्या खिजगणतीतही नव्हतो, पण जेव्हा तुम्ही मला माझी राक्षस म्हणून ओळख करून दिलीत, तेव्हाच मला माझी नियती कळली. माझा पुनर्जन्म झाला, पण पूर्ण राक्षस होण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता होती, एक म्हणजे माझ्या पूर्वसुरींनी दाखवून दिलेल्या मार्गावर चालणं, त्यासाठी मी त्यांनी दाखवलेला मार्ग निवडला. आणि..."
मल्लापा बोलायचा थांबला.
"दुसरी गोष्ट कोणती मल्ल..." अधिरराजाचे बोलणं संपतं न संपतं तोवर त्याच्या गळ्यावर सुरा अतिशय वेगाने चालला. त्याच्या गळ्यातून रक्ताच्या सहस्त्र धारा लागल्या, आणि तो जागीच गतप्राण झाला...
"दुसरी गोष्ट म्हणजे राक्षसी कर्म अधिरराज. तुझ्या या मानवी रक्ताने आज या माझ्या पूर्वजांनी अंघोळ केली, त्यांना आज शांती लाभली असेल."
"बुद्धिवान माणसाची सोबत कायम उत्तम, परंतु त्या बुद्धिवान माणसाला आपले सर्व भेद माहिती असतील, तर तो सगळ्यात मोठा धोका संभावू शकतो. या राक्षसमंदिरातील सर्व भेद तुला माहिती होते अधिरराज, त्यायोगे तू शेवटच्या क्षणी मलाही रस्त्यातून बाजूला करू शकला असतास."
"मी योग्य मार्ग निवडला अधिरराज, आणि त्यानंतर माझी नियती मला कळली, आणि या मार्गावर चालणं तुझी नियती नाही."
मल्लापा हळूहळू पावले टाकत दरवाजाकडे जाऊ लागला.
'आह!!!!'
दरवाज्याच्या आतून कानठळ्या बसवणारा आवाज आला.
'नियती आणि आज काळसुद्धा!!!' मल्लापा स्वतःशीच हसला.
तो दरवाजाजवळ पोहोचला, जोर लावून त्याने दरवाजा उघडला...
...समोरच एक अतिशय विशाल मूर्ती होती. मूर्तीच्या शरीराच्या तुलनेत मुख अतिशय मोठं होतं. त्या मुखाचा आकार रांजणसारखा होता व लालभडक डोळ्यांच्या पापण्या व जाडजाड लोंबलेले ओठ त्या मूर्तीच्या विद्रुपपणात अजून भर घालत होते. मूर्तीची छाती अतिशय अरुंद होती व खाली ओघाळलेली होती. खांदे मात्र वे उचललेले होते. खांद्यापासून कोपरापर्यंत हात रुंद असून लांब होते, मात्र तिथून पंजापर्यंत हात कृश व थोटके होते. पंजा मात्र भलामोठा होता.
तशीच तऱ्हा पायाचीही होती. मांडीपासून गुडघ्यापर्यंत पाय लांब व रुंद होते, मात्र तिथून घोट्यापर्यंत पाय अतिशय कृश व अरुंद होते, आणि पुन्हा पावले भलीमोठी होतं होती.
मात्र मूर्तीचा सर्वात विचित्र अवयव होता, तो म्हणजे पोट...
लोंबलेल्या छातीपासून सुरू झालेल पोट मांड्यांच्याही खाली येऊन संपत होतं, आणि आता ते मधून कुणीतरी धडका मारत असल्यासारखं खालीवर होत होतं. तो मधला गोल मध्येच इकडेतिकडे घरंगळे, जे मूर्तीच्या भेसूरपणात अजून भर घालत होतं.
'आह!!!!'
पुन्हा मूर्तीच्या आतून आवाज आला. मात्र हा आवाज मागच्यापेक्षा दसपटीने मोठा आणि अतिशय पुरुषी व भसाडा होता.
मल्लाप्पा हे दृश्य बघून हादरलाच. त्याची क्षणभर चलबिचल झाली.
'...मोहिनीअस्त्र पुन्हा प्रभाव टाकू शकत, हे अधिराजाचे शब्द त्याला आठवले...'
त्याने सुरा काढला, व तो मूर्तीच्या दिशेने पावले टाकू लागला.
'मल्लराज, अक्षय सोनं, गर्भश्रीमंती!'
'संगी, ब्रह्मपुत्रा. अम्मा'
'नियती, राक्षस.'
मूर्तीच्या पोटाची हालचाल वाढली होती.
मल्लापा मूर्तीच्या अतिशय जवळ पोहोचला. जवळ पोहोचल्यावर त्याला मूर्तीचा बीभत्सपणा अजून जाणवला.
...सर्व धैर्य एकवटून त्याने मूर्तीच्या ओटीपोटावर सुरा फिरवला...
...त्याक्षणी मूर्तीच्या पोटातून रक्ताचा सडा पडला, व एक भलामोठा काळा मांसल गोळा बाहेर पडला...
तो गोळा वरखाली होत होता...
मल्लापा भांबावला...
'हंडा, हंडा कुठेय?'
मल्लप्पा बिथरला. त्याच्या डोळ्यासमोर अक्षय सोन्याचा हंडा तराळत होता.
भान हरपून तो त्या गोळ्यावर सुरा चालवू लागला. त्याने त्या गोळ्याचे अनेक तुकडे केले.
'हंडा कुठेय?'
तो ओरडला, त्याने डोके गच्च आवळून धरले.
'मल्लापा!!!!!'
मागून धीरगंभीर आवाज आला.
मल्लापा जागच्या जागी स्तब्ध झाला. त्याच्या अंगातून भीतीची एक लहर दौडत गेली.
'मी... मी अमित्र...' मल्लापाच्या तोंडून शब्द फुटले.
'अमित्र...' एका खोल विहिरीतून रुदन करताना यावा तसा आवाज आला.
मल्लापाला एक मोठी सावली त्याच्या दिशेने येताना दिसली.
...आणि पुढच्याच क्षणी मल्लापाच शीर धडापासून वेगळं झालं...
त्या मूर्तीचा हळूहळू आकार बदलला, व एका पुरुषदेहात त्याचं रूपांतर झालं. त्याने पोट चापपून बघितलं. आता त्या पोटात त्याला काहीही जाणवत नव्हतं.
तो विद्युतवेगाने अधीरराजाकडे धावला.
अधिरराजाचं मृत कलेवर जमिनीवर पडलेलं होतं.
"अमित्रा..." म्हणून त्याने हंबरडा फोडला!
...आणि पुढच्याच क्षणी त्याने पोटात सुरा खूपसुन घेतला.
त्या रात्री राक्षसमंदिरात तीन कलेवरे पडली होती.
एक माणसाचं...
...व दोन राक्षसांची!!!!

||समाप्त||

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त Happy
पण मला अजून एकदा वाचावी लागेल
शेवट समजला नाही
मा बु दो असेल

तुमचे पुण्याचे पारडे जड होतेय अज्ञा Happy

तुमचे पुण्याचे पारडे जड होतेय अज्ञा 

नवीन Submitted by किल्ली on 12 April, 2020 - 23:21

>>>
अज्ञा, नळाला मोटार लावून गंगेच्या पाणी परत पाठवू का? Wink

म्हणजे अधीरराज अमित्र राक्षस होता ? अमित्र हा शस्त्र निर्माण करण्यात पटाईत होता. मग त्याने मल्लापा ची मदत का घेतली.

मस्त , खिळवून ठेवणारी कथा..
पण एकदाच वाचून शेवट कळला नाही, पुन्हा नीट वाचावी लागेल.

भारी लिहीलीय! आवडली Happy शेवटपर्यंत उत्कंठा वाढत गेली. थरारक लिहिलंय.
ते मलाप्पाला कोणी मारलं ते मात्र सममजलं नाही..

मलाप्पाला कोणी मारलं>>> शापमुक्त (खरं तर वरदान आणि उशाप मुक्त झालेल्या) मित्र राक्षसाने अमित्रच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या मल्लाप्पाला मारले.

सुंदरच. मल्लापा मरणार हे माहीत होते पण असा शेवट अपेक्षित नव्हता.>>>> ++1111 छान शेवटपर्यंत उत्कंठा कायम ठेवलीत

@पाथफाईंडर - धन्यवाद पाफा. तुमचे प्रतिसाद मी मनापासून एन्जॉय केलेत, आणि किंबहुना या कथेचा जो एक स्ट्रेस मनावर होता, तोसुद्धा निघून गेला.
तुम्हाला शुद्ध पाणी मिळावं अशी मी मनापासून कामना करतो. मोटर लावण्यास मात्र महापालिकेकडून परवानगी घ्या. Lol
@किल्ली - धन्यवाद. समजली नसेल, तर काही दिवसांनी याचा उपसंहार लिहिण्याचा विचार करतोय. पण समजण्यास अडचण नसावी.
तुमचे पुण्याचे पारडे जड होतेय अज्ञा >>>>>>>> धन्यवाद. खूप मोठा रिलीफ मिळाला. नाहीतर आजकाल माझ्या स्वप्नात ती डोळे बांधलेली हातात तराजू घेतलेली बाई बऱ्याचदा यायची.
@च्रप्स - धन्यवाद. अधीरराज सगळं खरं बोललाच असं थोडीच आहे? Happy
@मीनाक्षी कुलकर्णी - धन्यवाद. पुन्हा वाचा, नक्की समजेन.
@ द्वादशांगुला - विपूत येऊन अमानवीय धमक्या देणारे सदस्य मायबोलीवर असल्यामुळे ही कथा पूर्ण करण्यात आली. Lol
पुन्हा वाच, नीट समजेन. थन्क्स
@ अज्ञानी - धन्यवाद
@ नौटंकी - धन्यवाद
@सिद्धी - धन्यवाद. अभिनंदन नम्रपणे स्वीकारण्यात आलं आहे. Lol
@धनुडी - धन्यवाद
@ मीरा.. - धन्यवाद

अज्ञातवासी अभिनंदन , अनपेक्षितपणे खूपच लवकर कथा पूर्ण केलीत. आत्ताच सगळे भाग वाचले, शेवट थोडा नाही कळला पुन्हा एकदा वाचून काढते.

@अज्ञातवासी, मला काही लिहता येत नाही, पण जे लिहीतात, त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो आणि बदल्यात त्या धाग्यावर बागडतो.
तुमच्या सारखे अनेक माबो आयडी मला सहन करतात, त्याबाबत मी त्यांचा ऋणी आहे. धन्यवाद Happy

असे का म्हणता पाफा कि तुम्हाला लिहिता येत नाही... बायकोला बर्थडे गिफ्ट काय द्यावे. तुमचा पार्टनर तुमचा वाढदिवस लक्षात ठेवतो का असे उत्तम धागे तुम्हीच लिहिलेत...

च्रप्स धन्यवाद , पण कोतबो विनोदी धागे वेगळे आणि सिध्दहस्त लेखणीचे धागे वेगळे. माझा सल दुसर्या प्रकारच्या धाग्यांबद्दल आहे.

@पाफा - ज्या धाग्यावर तुम्ही जास्तीत जास्त बागडाल, तो त्या धाग्याचा बहुमान असेल Happy
आणि तुम्हाला मी कधीही कुठल्याही धाग्यावर सहन करायला तयार आहे याची नोंद घ्यावी, with pleasure.

@अथेना - धन्यवाद. बऱ्याच दिवसांनी दिसलात. Happy छान वाटलं.
@प्रवीण - धन्यवाद. आपणसुद्धा बऱ्याच दिवसांनी दिसलात. Happy छान वाटलं.

मस्तच.. कथा प्रचंड आवडली.

तुंबाडप्रभाव जाणवला.. कथेची लांबी अजुन असती तर अजुन मजा आली असती..

@पाफा - लांबडवर तर तुमची धमाल चालुये. वाचतोय मी Lol
@अजय - धन्यवाद. कथेचा जीवच तेवढा असल्याने जास्त वाढवण सयुक्तिक वाटलं नाही.