©राक्षसमंदिर - ३

Submitted by अज्ञातवासी on 11 April, 2020 - 11:37

©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे रूपांतरण किंवा पुनर्मुद्रण करताना लेखकाची परवानगी आवश्यक असेन, अन्यथा कायदेशीर कारवाई अनिवार्य आहे.

प्रथम भाग -
https://www.maayboli.com/node/74084

द्वितीय भाग -
https://www.maayboli.com/node/74090#new

अधीरराज क्षणभर थांबला. त्याने घोटभर पाणी घेतलं.
"मित्राचं स्त्रीमध्ये रूपांतर होऊन झालं. दोघेही सदैव सोबत असत. दोघांना एकमेकांशिवाय क्षणभरही करमेना. त्याचवेळी चाणाक्ष मित्राने आपल्या हंड्यावर इतर राक्षसांची नजर आहे हे ओळखलं आणि तो हंडा कुशलतेने आपल्या गर्भाशयात लपवला.
दिवसामागून दिवस जात होते. एके दिवशी मित्र असाच एका देवतेचे दागिने घेऊन जात असतांना त्याला इतर राक्षसांनी घेरले, व पुरुषत्व सोडल्याबद्दल त्याची यथेच्छ टिंगल व निर्भत्सना केली. यामुळे मित्र दुखावला. तो तसाच दागिने घेऊन देवतेकडे गेला. त्या देवतेने दागिन्यांची प्रचंड स्तुती केली. मात्र मित्राचे स्तुतीकडे लक्ष नव्हते. न राहवून देवतेने त्याच्या दुःखाचे कारण विचारले. मित्राने त्याची आपबीती सांगितली."
"मित्रा, जर तुझ्या दुःखाचे हे कारण असेल, तर याक्षणी मी तुला पुरुष करायला तयार आहे." देवतेने सांगितले.
मित्राने आनंदाने सहमती दिली, आणि त्याक्षणी त्याचे पुनःश्च पुरुषात रूपांतर झाले.
मित्र आनंदात घरी आला. मित्राला मूळ रुपात बघून अमित्राला आश्चर्याचा धक्का बसला, आणि प्रचंड दुःख झाले. आपल्या वरदानाची मित्राने अशी हेटाळणा केल्याबद्दल तो रागावून अज्ञातवासात निघून गेला.
मित्राने अमित्राला शोधण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण अमित्राचा थांगपत्ता लागला नाही. अशातच मित्राला काही शारीरिक बदल जाणवू लागले. त्याकडे त्याने सुरुवातीला दुर्लक्ष केलं, पण काही दिवसांनी त्याच्या पोटात दुखू लागले, त्याच्या पोटात काही हालचाली जाणवू लागल्या. त्याने कुशल वैद्यांना दाखविले, आणि कारण ऐकताच मित्राला आश्चर्याचा धक्का बसला.
मित्राला स्त्रीरुपात असताना अमित्राकडून दिवस गेले होते...
आपल्या अविचाराने केलेल्या कृतीचं हे फळ मिळेल याचा मित्राने कधीही विचार केला नव्हता. मित्राने देवतांकडे धाव घेतली. देवतांनी एकदा अव्हेरलेलं वरदान पुन्हा द्यायला स्पष्ट नकार दिला. त्याने वैद्यांकडे धाव घेतली, वैद्यानाही मार्ग समजेना. मित्र कासावीस झाला. शेवटी त्याने दैत्यगुरु शुक्राचार्य यांच्याकडे धाव घेतली.
"मित्रा, तू तुझ्या प्राणप्रिय सख्याशी प्रतारणा केलीस. ती करताना अविचाराने तू स्वतःवर हे संकट ओढवून घेतलेस. तू स्त्री असताना केलेल्या कर्माचा तुला विसर पडला. तो हंडा तू गर्भाशयात लपवला होतास, त्यामुळे देवतांच वरदान म्हणून तो हंडा गर्भाशयासहित सुरक्षित राहिला. आणि त्यातच ते अजन्मलेलं बालक वाढतंय."
"हे देवतांच वरदान आहे. शाप नव्हे. पण मी तुला शाप देऊ शकतो, ज्यायोगे तो तुझ्या कार्यात सिद्ध होईल."
"हे मित्रा, मी दैत्यगुरु शुक्राचार्य तुला शाप देतो की, हा गर्भ तू गर्भाशयात लपवलेल्या अक्षय्य हंड्यात कायम वाढत जाऊन तुला नऊ महिन्यातून एकदा प्रचंड गर्भकळा सहन कराव्या लागतील, आणि त्यानंतर तू पुन्हा मूर्ती होऊन पडशील. आजपर्यंत तू दागिने बनवताना लोहाला तुच्छ समजत राहिलास, पण कलियुगात तुझा सखा अमित्र लोहराच्याच रूपाने येऊन तुझी या वेदनेतून मुक्तता करेन व तो अक्षय हंडा त्याच्याकडे ठेवून घेईल. त्यानंतर तू पाताळात परत येशील."
त्यानंतर शुक्राचार्यानी राक्षसमंदिरात मित्राला स्थान दिले, व त्याभोवती मोहिनीअस्त्राची योजना केली. त्यामुळे लोक राक्षसमंदिरात गेल्यावर भ्रमिष्ट होतात."
अधीरराज बोलायचा थांबला.
"मल्लराज, तुम्ही प्रश्न विचारू शकतात."
"म्हणजे मी? अमित्र?... "मल्लापाने उत्सुकतेने विचारले.
"हो मल्लराज. थांबा, तुम्हास काही दाखवतो."
अधीरराजाने पोतडीतून एक जुनाट ग्रंथ बाहेर काढला. त्याने काही पाने चाळली. आणि एका पानावर येऊन तो थांबला.
"हे बघा मल्लराज."
मल्लापा उत्सुकतेने त्या ग्रंथाकडे बघू लागला.
त्या पानावर एका सुंदर स्त्रीच व एका पुरुषाचं चित्र होतं...
...पण तो पुरुष हुबेहुब मल्लपा सारखा दिसत होता.
"मल्लराज, पुराव्याशिवाय तर पिताही पुत्राला आपला मानायला तयार होत नाही. म्हणून ही पोतडी घेऊन फिरतोय. अनेक पुरावे आहेत यात. प्रत्येक गोष्ट चाळून बघा. आजची पूर्ण रात्र फक्त तुम्हाला अभ्यासासाठी आहे. उद्याची रात्र मात्र आपणासाठी अतिशय महत्वपूर्ण असेल."
दर नऊ महिन्यांनी रात्री राक्षसमंदिरातून विचित्र आवाज का येतात, याचा आज मल्लपाला अर्थ कळाला...
अधीरराजाने पोतडी मल्लापाजवळ सरकवली, व तो डोळे मिटून पडला.
मल्लापाने ती पोतडी उघडली. अनेक जुने ग्रंथ, ताम्रपट वगैरे या गोष्टीनी ती पोतडी गच्च भरली होती.
मल्लपाला त्यात शब्दही कळत नव्हता, पण चित्ररूपाने बऱ्याच गोष्टी कळल्या.
तो शेवटच्या पुस्तकाकडे वळला, एक पुरुष लोखंडी सुरीने एका राक्षसाच पोट फाडून तिथून एक हंडा बाहेर काढत होता...
...तो पुरुष हुबेहूब मल्लापासारखा दिसत होता...
रात्र मध्यावर आली तसा मल्लापा उठला. अधीरराजाला उठवावे की नाही, या संभ्रमात तो पडला.
"मल्लराज, परक्या गावात श्वाननिद्रा हा चतुर पुरुषाचा गुण असतो. उद्या एक अतिशय धारदार सूरी व तेल तयार ठेवा. आज ज्या वेळेस आलात. त्याच वेळेस या."
...आणि अधिरराज ताडकन उठला. त्याने मल्लपाच्या डोळ्यात डोळे घालून बघितले.
"मित्राच्या गर्भातूनच तुमच्या श्रीमंतीचा उदय होईल मल्लराज, हीच ती गर्भश्रीमंती!!!!"

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुंबाड चा प्रभाव जाणवतोय कथेवर. Wink

तुंबाडचे सुरवातीचे 18+ दृष्य पण रंगवणार का इकडे? ( सध्या फार हॉट टॉपीक आहे ना इकडे म्हणून न राहवून विचारले ) Rofl

ओघवती आहे कथा . एक थरारक वेब सिरीज होऊ शकते यावर . कॉपीराईट्स जपून ठेवा .क्लायमॅक्स मध्ये ट्विस्ट असावा असे वाटत आहे .

@पाफा - धन्यवाद. कथेची गरज असल्यास १८+ वर्णने आलीत तर ते शास्त्रानुसार निषिद्ध नाहीत. पण विनाकारण ती कथेत घुसडलीत तर सरस्वती नाराज होते असं शास्त्रवचन आहे. माझ्या कथेची ती गरज नाही, त्यामुळे तसली वर्णने येणार नाहीत. आपला भ्रमनिरास झाला असल्यास क्षमस्व Wink
@ मी माझा - धन्यवाद
@ प्रज्ञा - पुढील भागात कथेच्या अंताच्या आरंभाची सुरुवात होईल. धन्यवाद.
@कटप्पा - धन्यवाद! कॉपीराईट तर जपून ठेवेनच, पण अपने किरदार मे रहो. Happy
@नौटंकी - धन्यवाद
@मन्याS - धन्यवाद
@द्वादशनगुला - धन्यवाद
@मी अनु - धन्यवाद. जी एन च्या कथा नेहमी मार्गदर्शक असतात. माझे सगळ्यात आवडते लेखक. त्यांच्या जवळपासही पोहचणार लिखाण करता येणं म्हणजे अहोभाग्य
@पद्म - धन्यवाद

पुढील भाग टाकला आहे.