©राक्षसमंदिर - २

Submitted by अज्ञातवासी on 10 April, 2020 - 21:42

©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे रूपांतरण किंवा पुनर्मुद्रण करताना लेखकाची परवानगी आवश्यक असेन, अन्यथा कायदेशीर कारवाई अनिवार्य आहे.

प्रथम भाग - https://www.maayboli.com/node/74084

"तर अम्मा, तुम्हास आठवत असेल, त्या रात्री आमचे आजोबा तुमच्या घरी आले होते. तेव्हा आपण गरोदर होतात. तुमचे पती त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या अधीरतेने सामोरे गेले. तुम्हालाही त्या पुरुषाचं तेज बघून अतिशय प्रसन्न वाटलं होतं."
"हो आठवतंय." अम्मा खाली मान घालून म्हणाली.
"तर तो पुरुष काय म्हणाला हे आठवत असेलच."
अम्माच्या चेहऱ्यावर तीव्र वेदना जाणवल्या.
"मल्लापा, या राक्षसाला हाकलून लाव इथून, तुझ्या अम्माचा जीव जाईन रे."
अम्माच्या चेहऱ्यावर आसवे जमा झाली आणि बघता बघता ती मोठमोठ्याने आक्रोश करू लागली.
"अम्मा रडू नको. ये पोतडीवाल्या, तू चालायला लाग."
"मल्लराज, अविचार करू नका."
"ही तप्त सळई तुझ्या जिभेवर ठेवण्याआधी, चालता हो."
"मल्लराज, क्रोधमय वाणीतून अलक्ष्मीची लक्षणे दिसतात. ठीक आहे, मी जातोय, पण मला भेटायला यावयाचे असेल तर गावाच्या खालच्या डोंबाच्या वस्तीत मी आज रात्री भेटेन. यानंतर आपली पुन्हा भेट होणे नाही."
अधीरराजाने आपली पोतडी उचलली, आणि तो चालता झाला.
मल्लापाने अम्माला शांत केले. अम्मा हळूहळू शांत झाली.
मल्लापाने यंत्रवतपणे कामे आवरली, संध्याकाळ झाली. त्याने भट्टी थंड केली, व पडवीत येऊन विसावला.
अम्मा त्याच्याजवळ आली. "काही खायला आणू?"
मल्लापाने यंत्रवतपणे 'नाही' अशी मान हलवली.
मल्लापा, अम्मा कठोरपणे म्हणाली. "तो अधीरराज कोण कुठला, आणि तू त्याच्या भाकडकथेवर विश्वास ठेवतो?"
"अम्मा ती भाकडकथा नव्हती, आणि हे तुलाही माहितीये. पण मी तुला विचारणार नाही." मल्लपा शांतपणे म्हणाला.
"हो, हो, नव्हती." अम्माचा इतक्या वेळ आवरून ठेवलेला बांध फुटला.
मल्लापाने तिला पुन्हा शांत केलं. बऱ्याच वेळ ती मुसमुसत होती.
...आणि एके क्षणी ती शून्यवत होऊन बोलू लागली.
"त्या रात्री तो म्हातारा आला होता. अतिशय तेजस्वी, प्रभावी. त्याला बघताच तुझ्या बापाने त्याला वंदन केलं, आणि आदराने एका चौरंगावर बसवलं.
मला उठवत नव्हतं, पण त्या म्हाताऱ्याच्या तेजापुढे मी नतमस्तक झाले, आणि मी त्याच्यासमोर गेले.
त्याने मला आशीर्वाद दिला, आणि हे सोन्याचं भलंमोठं ओमपान तुझ्यासाठी दिलं."
अम्माने त्याच्या छातीकडे बोट केला.
"रात्रभर तुझे वडील आणि तो म्हातारा, दोघेही काहीतरी खलबत करत होते. मला झोप अनावर झाली, आणि मी झोपले. सकाळी उठून बघते तर दोघांचा पत्ता नव्हता. होती फक्त एक चिट्ठी. त्यात लिहिलं होतं."
'लक्ष्मी, आपलं आयुष्य गरिबीत गेलं, पण आपल्या होणाऱ्या बाळासाठी मला फक्त गर्भश्रीमंती पाहिजे आहे. त्यामुळे मी राक्षसमंदिरात जात आहे. परत येताना अक्षय, अविनाशी सोन्याचा मार्ग घेऊन येईल, जो आपल्याला गर्भश्रीमंत बनवेन.'
मी ते वाचून सुन्न झाले. अनेक दिवस लोटले, महिने लोटले, वर्ष लोटलीत, पण तुझा बाप परत आला नाही.
"अप्पा माझी शपथ घे, त्या मार्गाला जाणार नाही. घे माझी शपथ."
"अम्मा, शांत हो. मी कधीही त्या मार्गाला जाणार नाही."
अम्मा डोळे पुसून आत गेली. मल्लापा ओट्यावर येऊन बसला.
'अक्षय सोनं, गर्भश्रीमंती.
दिवसरात्र भट्टीच्या तापात पोळण, विस्तवाशी खेळणं आणि हातोडा चालवणं.
एक मार्ग, अक्षय श्रीमंतीचा!
संगीताचा बाप तालेवार स्थळे शोधतोय, जर आपल्याला सोनं मिळालं तर?
संगी काय, जमीनदार राघवेन्द्रची ब्रह्मपुत्रासुद्धा आपल्या जवळ असेन.'
मल्लापाच्या डोक्यात अक्षय सोन्याचा, गर्भश्रीमंतीचाच विचार होता.
तो रात्री लवकर झोपला. ते बघून अम्माही निवांत झोपली.
थोड्या वेळाने अम्माच्या घोरण्याचा आवाज ऐकू येऊ लागला.
मल्लापा उठला, आणि डोंबांच्या वस्तीकडे निघाला.
डोंबांची वस्ती गावाच्या बाहेर होती, तिथेच वाटसरूसाठी एक धर्मशाळा बांधलेली होती. तसं बघायला गेलं तर वस्ती फारशी मोठी नव्हती पण त्यामानाने धर्मशाळा फार मोठी होती.
मल्लापा झपाझप पावले टाकत धर्मशाळेत पोहोचला. अधीरराज इथेच उतरला असणार याची त्याला जाणीव होती.
मात्र आज धर्मशाळेत चिटपाखरूही दिसत नव्हतं, फक्त एका खोलीत मिणमिणता प्रकाश दिसत होता.
मल्लापा त्या खोलीकडे निघाला. खोलीचं दार अर्धवट लोटलेलं होतं. त्यामधून मधली अधिरराजाची आकृती स्पष्ट दिसत होती.
"यावे मल्लराज..."
मल्लापा चमकला, व ओशाळल्यागत पुढे झाला.
"अक्षय सोन्याने तुम्हाला इथे आणलं तर." अधीरराज हसला. त्याच्या काळ्याकुट्ट चेहऱ्यावर शुभ्र दंतपंक्ती चमकल्या.
"मला काय करावं लागेल?" मल्लापाने विचारले.
"धीर धरा मल्लराज, धीर हा पुरुषाचा सर्वात मोठा गुण आहे, तर चंचलता स्त्रीचा."
मल्लप्पा वरमला.
"एक कथा सांगतो, ती ऐका, म्हणजे तुमच्या शंकांचं समाधान होईल."
मल्लप्पाने मान हलवली. अधीरराजाने कथा सांगण्यास सुरुवात केली.
"सत्ययुगात मित्र आणि अमित्र नावाचे दोन राक्षस होते. दोघांची मैत्री इतकी अतूट होती, की देवतानाही अचंबा वाटे. मित्र हा दागदागिने बनवण्यात कुशल होता. इतका की देवतांनी सोनं, चांदी व जडजवाहिर यांच्या मनोवांछित कामनेचा वर त्याला दिला, व एक गोल हंडा दिला. हा हंडा कायम भरलेला असे व या वरामुळे मित्राला दागिन्यांसाठी लागणाऱ्या धातूची, जवाहिरांची ददात नसे.
अमित्र हा शस्त्र निर्माण करण्यात पटाईत होता. त्याचा शस्त्रनिर्मितीत हात कुणीही धरु शकत नसे.
देवतांनी मित्राला वर दिला होताच. पण मित्राने अमित्रालाही काहीतरी वर देण्याची मागणी केली. देवतांनी संतोषाने ती मागणी मान्य केली, व अमित्रास वर मागण्यास सांगितले.
"देवा, आमच्या दोघांची जोडी कायम सोबत राहू दे!" अमित्राने वर मागितला.
तथास्तु, म्हणून देव अंतर्धान पावले.
... आणि त्याक्षणी मित्राचं एका सुंदर स्त्रीत रूपांतर झालं.
मित्र आणि अमित्र दोघेही चकित झाले. हे असं कसं झालं म्हणून त्यांनी शुक्राचार्यकडे धाव घेतली.
"बाळांनो, कायम सोबत जोडीने तर फक्त पती पत्नी राहतात. तुमचा वर तुम्हाला मिळाला आहेच. मित्रात स्त्रीत्व जास्त असल्यामुळे त्याचं स्त्रीत रूपांतर झालं. आता तुम्ही सुखाने संसार करा."
दोघांनी गुरूचा आदेश मानला, व ते सुखाने संसारात रममाण झाले.

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

पुर्ण झाल्यावरच वाचते कथा. इकडे लोक कथा अर्धवट सोडून गायब कधी होतील, काही सांगता येत नाही. Lol Lol Lol ++1

चांगली चाललीय कथा. पण गर्भश्रीमंत हा शब्द चुकीच्या अर्थाने वापरला गेला आहे असे वाटते. गर्भश्रीमंत म्हणजे जन्मजात श्रीमंत, जन्मायच्या आधीपासून श्रीमंत, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला म्हणतात तसा अर्थ आहे. इथे तो लागू होणार नाही. इथे गडगंज श्रीमंती म्हटल्यास चालेल.

@च्रप्स - धन्यवाद
@पाफा - धन्यवाद. क्रमशःही टाकलं.
@minal - धन्यवाद
@मन्याS - धन्यवाद
@नौटंकी - धन्यवाद
@पद्म - धन्यवाद
@सिद्धी - धन्यवाद. आणि ते पुढचं लिहिलेलं काट नका मारू, तर बोल्ड करा. Lol
@योगीताकीरण - धन्यवाद
@मैत्रेयी - काही चुका मुद्दाम केल्या जातात. Happy धन्यवाद!
@मामी - धन्यवाद

पुढचा भाग टाकला आहे....