©राक्षसमंदिर - ४

Submitted by अज्ञातवासी on 11 April, 2020 - 23:37

©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे रूपांतरण किंवा पुनर्मुद्रण करताना लेखकाची परवानगी आवश्यक असेन, अन्यथा कायदेशीर कारवाई अनिवार्य आहे.

प्रथम भाग -
https://www.maayboli.com/node/74084

द्वितीय भाग -
https://www.maayboli.com/node/74090#new

तृतीय भाग -
https://www.maayboli.com/node/74100

मल्लापा तंद्रीतच घरी आला. त्याच्या डोळ्यासमोर ती चित्रे आणि अधीरराजाने सांगितलेली कथा तरळत होती.
अम्माला झोपलेली बघून त्याला हायसे वाटले. तोसुद्धा अंथरुणावर पडला, आणि झोपी गेला.
दिवस चांगलाच वर आला, तेव्हा मल्लप्पाला जाग आली. अम्मा स्वयंपाकघरात काहीतरी करत होती.
तो अम्माजवळ गेला.
अम्मा अतिशय आनंदात होती.
"मल्लापा, बरं झालं माझं ऐकलस बाबा. तुला बघून किती आनंद होतोय सांगू. तुझा बाप असाच रात्री म्हाताऱ्याबरोबर गेला, आणि परत आला नाही. जा, आवर पटकन. भरपूर कामे आहेत."
मल्लापा निमूटपणे स्नानाला गेला.
त्यानंतर थोडंस खाऊन तो कामाला लागला. सर्वात आधी तर त्याने एक अतिशय उच्च प्रतीचा सरळ खाणीतून आणलेला लोखंडाचा तुकडा घेतला. त्यानंतर त्या तापवून हातोडीने घाव घालत तो हवा तसा आकार देऊ लागला.
"मल्लपा, अरे विळे बनवायचं सोडून हे काय बनवत बसला आहेस? उद्या बाजारात जायचं आहे ना?"
मल्लपा हसला. आज रात्रीनंतर त्याला पुन्हा कधीही बाजारात जायची गरज नव्हती.
"अम्मा, कोतवालाने त्वरेने एक मोठा सुरा बनवण्यास सांगितले आहे. जर कसूर झाली, तर दंड होईल असं म्हणाला. जर कोतवाल खुश झाला, तर सर्व विळे विकून जेवढी रक्कम मिळणार नाही, तेवढी एक सुराच देऊन जाईल. उद्या सकाळीच हा सुरा त्याला पोहोचता करायचाय."
"मग बनव. कोतवालाची कामगिरी म्हणजे भाग्यच." अम्मा अभिमानाने म्हणाली.
मल्लापा हसला, आणि घाव घालू लागला.
संध्याकाळी मल्लापाने काम थांबवलं.
त्याच्यासमोर एक धारदार सुरा पडला होता..
एक हात लांब सुरा, त्याला पाव हात लांब मूठ. मुठीवर अनेक आकृत्या कोरलेल्या. एक बोट रुंद दुधारी पात लखलखत होतं!
त्याने अंगठा हळुवार पात्याच्या धारेवर अलगद टेकवला, आणि वर उचलला.
...मात्र त्यानेही रक्ताची धार लागली..
आपलंच रक्त बघून मल्लापा खुशीने हसला!
रात्री जेवणे झाली. उद्या सकाळी लवकर कोतवालाकडे निघायचं म्हणून मल्लापा लवकर झोपला. मल्लापाचं बोट कापलं, म्हणून अम्मा कळवळली, पण इतका धारदार सुरा बघून तिला अभिमानही वाटला. कोतवालाकडून घसघशीत रक्कम मिळणार म्हणून ती खुश झाली, आणि समाधानाने झोपली.
अम्मा झोपल्याची चाहूल लागताच मल्लापा उठला, आणि धर्मशाळेकडे चालू लागला.
आजही धर्मशाळेत फक्त एका खोलीतला दिवा तेवत होता. मल्लापा त्या खोलीच्या रोखाने गेला.
अधिरराजाच्या काळ्याकुट्ट चेहऱ्यावर आज निळा फेटा अतिशय विनोदी दृश्य निर्माण करत होता. ते बघून मल्लापालाही हसू आवरले नाही.
"मल्लराज, फेट्याला हसताय ना. लक्ष्मीच्या स्वागताला भुंड्या डोक्याने जाऊ नये, असं शास्त्रवचन आहे."
आता मात्र मल्लराजाला स्वतःचीच शरम वाटली.
"उदास होऊ नका मल्लराज, शूरांची वीरता हाच त्यांचा शिरपेच आणि बुद्धिवानांची विद्वता हाच त्यांचा फेटा असतो, असंही वचन आहे. माझ्यासारख्या अभाग्याकडे दोन्ही नसल्याने नाईलाजाने फेटा बांधावा लागला." अधिरराज हसून म्हणाला.
मल्लापाही हसला.
"चलायचं?" म्हणून अधिरराजाने खोलीला टांगलेली एक छोटी पिशवी घेतली, व तो चालू लागला.
मल्लापाही त्याच्या पाठोपाठ निघाला.
अतिशय अंधारी रात्र होती, पण अधिराजाच्या हातातल्या मशालीमुळे रस्ता उजळून निघाला होता.
"तर मल्लराज, हा सुरा बघून तुम्ही बलवान असूनही कलाकार आहात याची खात्री पटते." अधीरराज चालता चालता म्हणाला.
"अधीरराज, पण मला हंडा मिळवून देण्यात तुमचा काय फायदा"? मल्लापाने विचारले.
"मल्लराज, भटका कुत्रा असेल, तर शिळ्या भाकरीच्या तुकड्याची ददात असते, मात्र तोच राजाचा लाडका कुत्रा असेल, तर दास्या त्याच्या दिमतीला असतात. हंडा मिळाला, तर तुम्ही तर राजाच्याही पुढे जाल. पण या कामातला तुमचा एक सहकारी म्हणून तुम्ही मला सदैव आपला मित्र मानाल, याविषयी माझ्या मनात यत्किंचितही शंका नाही."
"नक्कीच अधिरराज." मल्लापा हसून म्हणाला.
"अजून एक मल्लराज, आणि तितकंच महत्वाचं आहे. इथून आता दोन मैलावर राक्षसमंदिर आहे, मात्र मोहिनीअस्त्राचा प्रभाव मंदिर नजरेस पडलं, तरी सुरू होऊ शकतो. म्हणून ही विभूती कपाळाला लावा."
अधिराराजाने पिशवीतून हळुवार थोडी विभूती काढली, व मल्लापाला लावली, आणि स्वतःही लावली.
"यामुळे मोहिनीअस्त्र आपल्यावर प्रभाव पाडू शकणार नाही. परंतु या विभूतीचाही प्रभाव थोडावेळच टिकतो. ही विभूती स्मरणअस्त्राने मंत्रित आहे. तेवढ्या वेळात आपलं काम होईल की नाही, याविषयी माझ्या मनात शंका होती, पण सुऱ्याची धार व तुमचा धीर बघता आता यत्किंचितही ती शंका मनात राहिली नाही."
मल्लापाचा उर अभिमानाने भरून आला.
"मल्लराज. अनेक वर्षांपूर्वी माझे आजोबा हेच कार्य सिद्धीस नेण्यासाठी आले होते. आपल्या वडिलांच्या आणि आपल्या चेहऱ्यात साम्य असल्याने चित्रातील व्यक्ती हीच, या गैरसमजातून त्यांच्याकडून प्रमाद घडला. मात्र आज सगळ्या चुकांच परिमार्जन होऊन नव्या आयुष्याची पहाट होईल."
अधिरराज भावविवश होऊन बोलत होता.
"नक्कीच." मल्लापा पुटपुटला.
ते दोघेही बरच अंतर चालल्यावर अधीरराजाने मल्लापाला थांबवले...
रात्रीच्या अंधारातही तो विशाल संगमरवरी घुमट चमकत होता. त्याच्या खाली एक विशाल चौकोनी संगमरवरी बांधकामात छत चमकत होतं. छताला आधार देण्यासाठी बारा खांब होते, व प्रत्येक खांबावर सुरेख कोरीवकाम होतं. छताच्या चारपट आकाराच्या जोत्यावर ते मंदिर बांधलं होतं. वर जायला संगमरवरी पायऱ्या होत्या.
"मल्लराज, हेच ते राक्षसमंदिर, ज्यात आजपर्यंत फक्त एकदा दोघाजणांनी प्रवेश केला होता. त्याव्यतिरिक्त इथे देवतानाही प्रवेश नाही." अधिरराज अभिमानाने म्हणाला.
"मल्लापा भारावून मंदिराकडे बघत राहिला."
आणि ते दोघेही मंदिराच्या दिशेने निघाले.

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारीच !
यावर्षी संपेलच कथा... अशी अपेक्षा ठेवून वाचायला घेतली. Wink

छान सुरुय
यावर्षी संपेलच कथा... अशी अपेक्षा>> आताच्या गतीने कदाचित ह्याच आठवड्यात संपेल आणि तो आजवरच्या मायबोली जीवनातला मोठ्ठा रेकॉर्ड ठरेल अशी आशा ...

यावर्षी संपेलच कथा... अशी अपेक्षा ठेवून वाचायला घेतली.>>>> कथा पूर्ण व्हायच्या आधी लॉकडाऊन संपू नये, अशी प्रर्थना करा! Wink

पुभाप्र...

संपेल संपेल कथा, ही कथा 2020 सालच्या रामायणाच्या वेगाने रोज 2 भाग येत आहेत.>>> अरे हो! आधीचा आणि हा भाग रामायणाच्याच वेळी आले....

संपेल संपेल कथा, ही कथा 2020 सालच्या रामायणाच्या वेगाने रोज 2 भाग येत आहेत.>>> अरे हो! आधीचा आणि हा भाग रामायणाच्याच वेळी आले....

नवीन Submitted by पद्म on 12 April, 2020 - 11:21

राक्षसमंदिराच्या कथेला राक्षसराज रावणाचा कृपाशिर्वाद. दुसरे काय?
Lol

पाफा Biggrin
तिकडे बेंबीत बाण मारणार आणि इकडे सुरा खुपसणार Wink

कथा डेंजर आहे.परत पूर्ण वाचणार सर्व भाग झाल्यावर.
खरोखर याचे कॉपीराईट घेऊन ठेवा.वेब सिरीज ला चांगलं मटेरिअल आहे.

@मन्या - धन्यवाद
@किल्ली - धन्यवाद
@सिद्धी - तथास्तु! Lol
@अज्ञानी - तथास्तु अगेन!
@पद्म - धन्यवाद! Lol
@धनुडी - धन्यवाद!
@पाफा - धन्यवाद!
@मी अनु - धन्यवाद
@ मीनल - धन्यवाद
@पिंटी - धन्यवाद
@नौटंकी - धन्यवाद
@cuty - धन्यवाद
@आबासाहेब - धन्यवाद
पुढील भाग पोस्ट केला आहे.

मल्लराज. अनेक वर्षांपूर्वी माझे आजोबा हेच कार्य सिद्धीस नेण्यासाठी आले होते. आपल्या वडिलांच्या आणि आपल्या चेहऱ्यात साम्य असल्याने चित्रातील व्यक्ती हीच, या गैरसमजातून त्यांच्याकडून प्रमाद घडला. मात्र आज सगळ्या चुकांच परिमार्जन होऊन नव्या आयुष्याची पहाट होईल.">>>>>>> हा काय प्रमाद घडला होता अधिरराजाच्या आजोबांकडून? , मलाही अजून थोडे प्रश्न पडलेत, , परत आधीचे भाग वाचून काढतेय.