वास्तु १६

Submitted by जयश्री साळुंके on 29 March, 2020 - 23:51

रक्त उष्ण, चिकट, लिबलिबीत. त्या स्पर्षानेच मला जाणवलं की आता हा त्याचा आजचा शेवटचा वार आहे. हे रक्त खरं की खोटं हे बघायची वेळ अजुन झाली नव्हती. कारण आत्ता जर मी किंवा सौम्य ने डोळे उघडले तर हे अधिष्ठान पुन्हा सुरु करावं लागणार. आणि यात उगाच वेळ वाया जाणार. म्हणजे हा एक सापळा देखील असू शकतो. आणि सौम्य?? त्याने डोळे उघडले तर?
देवा!!! कसला प्रसंग हा?
माझ्या मनात विचार तर खुप चालू होते, पण शेवटी डोळे न उघडण्याचा माझा निर्णय योग्य ठरला. अधिष्ठानाचे शेवटचे क्षण देखील संपलेत. डोळे उघडल्यावर आजूबाजूला काळोख असून सुद्धा हजार दिव्यांच्या प्रकाशामुळे डोळे दिपतील इतका उजेड होता. कित्येक दिवसांनी आज सौम्यच्या चेहऱ्यावर आनंद आणि तेज पुन्हा दिसत होतं. अधिष्ठान संपल्यावर आमच्याकडून त्याच्यावर पहिला वार होणार होता, त्याने आधीच तीन वार केलेले पण त्यात खुप शक्ती त्याने खर्च नव्हती केलेली. त्याला फक्त आमची तयारी कुठपर्यंत आली आहे तेव्हढच बघायचं होतं. त्यामुळे खरी लढाई आता सुरु होणार होती. कोणत्याही युद्धाला काही अलिखित नियम असतात. जसं रणांगणावर होणारं युद्ध सूर्य अस्ताला जाण्यापर्यंतच चालतं तसं हे युद्ध त्रियामा प्रहर सुरु होण्यापूर्वी संपणार होतं. कारण त्यानंतर दैवी शक्ती त्यांचं काम सुरु करतात आणि अघोरी शक्ती शिथिल होतात. पण हा नियम फक्त त्याला लागु पडणार होता, मला नाही. सौम्य देखील अघोरी पद्धतीने वार करणार असल्यामुळे त्याच आणि अघोऱ्याचं युद्ध हे निशिथ प्रहरात चालणार होतं. तर मी मात्र दैवी शक्तींचा वापर करणार असल्यामुळे त्रियामा प्रहर माझ्यासाठी उत्तम होता.
निशिथ सुरु व्हायला अजुन बराच वेळ होता. तोपर्यंत दिव्यांना पुन्हा एकदा तेल टाकायचं काम आम्ही सुरु केलं. रात्रीची जेवणं तिथेच आटोपलीत. एव्हाना वेळ होत आलेली. अंतिम तयारिच्या टप्प्यात अनेक बाधा येतात, अश्याच काही अडचणींना आम्हाला सामोरे जावे लागणार आहे याची मला खात्री होती. आता त्या परमेश्वराच्या मनात काय चालू होत कोणालाच सांगता येत नाही. अचानक वादळाला सुरूवात झाली, हवेचा वेग इतका होता की सगळे दिवे एकदम विझलेत. अचानक झालेल्या ह्या प्रहाराने सौम्य भाम्बावुन गेला. आणि अचानकच त्याची नजर एका ठिकाणी स्थिर झाली. तिकडे बघितल्यावर ती चालत येत असलेली दिसली. जुनट हिरवी नऊवारी नेसलेली, अंगावरचे सगळे तेच जुने दागिने, चालण्यात तोच थाट, नजरेत तीच जरब पण जरब असून सुद्धा शांती दिसत होती त्या डोळ्यांत, कपाळावर तेच ठसठशीत कुंकू, हातातला हिरवाकंच चुडा... सौम्य तिच्याकडे टक लावून बघत होता, त्याला दिसत होती त्याची सई.
पण मला, मला मात्र एक वेगळीच झलक तिच्यात दिसत होती. आधी बऱ्याचदा बघितली होती ही अशी चाल... अगदी एकीला झाकून दुसरीला काढा एवढं साम्य...
पण ती आता कशी आली इथे??? की हा आघोऱ्याने केलेला वार होता??? जर ही तिच असेल तर ती का आली?? आणि जर ती खोटी असेल तर तिला परतवून कसं लावायचं???
सगळे विचार डोक्यात चालू असतांना सौम्य कडे लक्षच नाही राहिलं माझं. लक्ष गेलं तोपर्यंत तो तिच्या अगदी जवळ पोहचला होता आणि तिच्या नजरेत ती जरब जाऊन आता तिथे अंगार दिसत होता.

क्रमश:

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults