वास्तु १२

Submitted by जयश्री साळुंके on 25 July, 2019 - 23:59

“मला माहिती आहे कि त्या अघोऱ्याला काय पाहिजे आहे. तो ह्या मिनिटाला शेवटच्या बळीच्या शोधात आहे, आणि हा शेवटचा बळी म्हणजे सई. सईच्या पूर्वजांपैकी एक मुलगी आणि अघोर्याची पहिली बळी हि इथेच आहे, त्याला त्याने सुरु केलेला हा फेरा सईच्याच बळीने संपवावा लागेल तरच त्याला इच्छित शक्ती मिळतील. पण तो सध्या आहे कुठे हा शोध घेण हे इतकं सोप्प नाही, तो कोणाच्याही रुपात असू शकतो, अगदी आत्ता इथे आजू बाजूला असू शकतो, कोणीच त्याला ओळखू शकत नाही. पण मी ओळखू शकते. मी बघितलं आहे त्याच खर रूप. तो खऱ्या रुपात वावरत नाही कधी आणि मला तो फक्त खऱ्या रूपातच दिसतो, अगदी त्याने कोणाचही रूप घेतलं तरी. जसा डाग माझ्या हातावर आलेला अगदी तसाच डाग त्याच्या पाठीवर आहे. त्याने कितीही रूपं बदललेत तरी तो हा डाग नाही लपवू शकत.
सौम्य जोपर्यंत त्याचा मृत्यू होत नाही किंवा तो स्वतः आमचही सुटका करत नाही तोपर्यंत आम्हाला मुक्ती मिळणार नाही. आणि आधी जर त्याने सईला मारलं तर मात्र त्याला संपवण केवळ अशक्य आहे. त्याच्या कडच्या शक्ती इतक्या अमर्याद होतील कि त्याला जगातल्या कोणत्याही सजीव-निर्जीवा पासून धोका नसेल, ना तो मारला जाईल ना त्याच्या शक्तींना आळा घालता येईल. येत्या अमावस्येपर्यंत तुझ्याकडे वेळ आहे, त्याच्या शक्तींना सध्या मर्यादा आहेत. तो बर्याच शक्ती फक्त अमावस्येला वापरू शकतो. मुळात जो माणुस रूप बदलू शकतो त्याच्या शक्तींचा अंदाज आम्ही तरी नाही घेऊ शकत. पण तुला मात्र तो घेता येईल.
त्याच्या पाठीवरचा तो डाग म्हणजे त्याचा सगळ्यात मोठा श्राप आहे. तो डाग ज्याला दिसला त्याच्यासमोर तो स्वतःच खर रूप लपवू शकत नाही. आणि तिथेच तो अर्धी लढाई हरतो. बाकी त्याचा कसं मारता येईल हे तुझ तुलाच शोधाव लागेल, त्यात मी तुझी कोणतीही मदत नाही करू शकणार. आता तू इथून जा. आणि शक्य तितक्या लवकर तो कोण आहे याचा शोध घे, त्याने तुझ पुढचं काम जरा सोप होईल.”
एवढं बोलून गिरीजा आणि बाकीच्या पाच जणी देखील हवेत विरून गेल्या. आजुबाजूचं वातावरण कोंदट आणि अंधारलेलं दिसत होतं. भाऊ आणि सौम्य माघारी फिरलेत, अगदी पंधरा मिनिटात गावाच्या रस्त्याला लागलेत. आणि अचानक त्यांचे मोबाईल देखील सुरु झालेत, घड्याळात वेळ आणि तारीख बघता त्यांना ह्या रस्त्याला लागून फक्त अर्धा तासचं झालेला. सौम्य वाड्यावर परत जाताना अगदी शांत होता, त्याच्या डोक्यात फक्त एकच विषय होता तो म्हणजे कि रूप बदलून आता नक्की अघोरी कोणाच्या वेशात असेल. त्याने वाडा जवळ येताच भाऊला सांगून ठेवलं होत कि कोणालाही आपण कुठे गेलो होतो आणि काय केल हे सांगू नका.
आता दिवस सरे पर्यंत सौम्यकडे बरीच माहिती गोळा झालेली होती. सगळ्यात महत्वाच म्हणजे सईला संमोहन केलेलं नसून हा काही तरी अघटीत प्रकारच आहे हे तर अगदी निश्चित झालेलं. पण हि माहिती कोणालाही सांगायची नाही, जेणे करून अघोरी सावध होणार नाही हे त्याने मनाशी पक्क केल. आता अमावस्येपर्यंत त्याच्या कडे दोन महत्वाची काम होती, पहिलं म्हणजे तो अघोरी सध्या कोणाच्या वेशात आहे ते शोध घेणं आणि दुसर म्हणजे त्याला मारता कसं येईल याचा शोध घेणं. आणि त्या दृष्टीने तयारी करणं.
वेळ कमी होती, सौम्य जरी चांगल्या कामासाठी आलेला असला आणि त्याच पूर्वसंचीत जरी खुप चांगल असलं तरी आघोऱ्याकडे कित्येक शतकांची तपश्चर्येची शक्ती होती, आधीच्या सहा बळींची ताकद होती. त्या ताकदी पुढे सौम्य किती वेळ तग धरू शकेल याबाबत माझ्या मनात थोडी शंका एव्हाना यायला लागलेली. सौम्यवर मला विश्वास होता, त्याची धडपड मी बघत होतो, पण तो अघोरी देखील माझ्या डोळ्या समोरच होता. त्याने तर आता वाड्यातल्या एका न वापरल्या जाणाऱ्या खोलीत स्वतःच छोटसं सामान थाटलं होतं, तिथेच त्याची वेळ मिळेल तशी पूजा आणि तपस्या चालू होती, आणि ह्या सगळ्याची सौम्यला कोणत्याही प्रकारे खबर लागणार नाही याची काळजी तो घेत होता.
आता सौम्यला कोणाच्या तरी आधाराची, मार्गदर्शनाची गरज होती. विचार करून करून त्याच डोकं भंजाळलं होतं, प्रत्येक व्यक्तीवर तो बर्यापैकी लक्ष ठेवून होता, ह्या कामात तसा भाऊ त्याची मदत करत होता पण भाऊची मदत हि अमानवी शक्तीच्या पुढे खुप कमी होती. सौम्यला गरज होती ती एका अश्या व्यक्तीची जो ह्या कामात अघोऱ्याच्या तोडीस तोड असू शकेल. आणि अश्यातच एके दिवशी सकाळी सईचे शहरात राहणारी आत्या आली. तिच्यासोबत तिची एक मैत्रीण देखील होती. रंगनाथ रावांनी आत्याला फोनवर सगळा प्रकार सांगितलेला. आणि आत्याची मैत्रीण, रिया, हि आत्याच्या कंपनीमध्ये कामाला होती, आणि बाकी ती भुताटकीचे प्रकार देखील बघायची. अवघ्या तीस वर्षाची पोर, सावळीशी, छोट्या चणीची. तिच्या कडे बघून कोणी म्हणणार नाही कि ती तीस वर्षांची आहे. तिच्या शहरी भाषेत ती होती “पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीस्ट”

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कथा मस्त वळणावर आलीय.
छोटे भाग आहेत पण उगीच फाफट पसरा नाही आणि रिपिटेशन नाही त्यामुळे कंटाळा न येऊ देता कायम उत्कण्ठा वाढवणारी कथा !

छान
उत्सुकता वाढवणारी कथा..
पु.ले.शु.