वास्तु १४

Submitted by जयश्री साळुंके on 12 August, 2019 - 13:42

कारण रिया जर जंगलातून बाहेर पडली तर त्याच्या बद्दल सर्व सगळ्यांना कळेल, त्यामुळे आता रिया च्या शरीराला उपभोगण्यापेक्षा तिचं मरणं त्याच्यासाठी जास्त गरजेच होतं.
जंगलातुन बाहेर निघायला दोनच रस्ते होते. एक होता सरळ गावात येणारा, जो बर्यापैकी सुस्थितीत होता आणि दुसरा गावाच्या मागच्या बाजूने. अघोऱ्याने दोघ रस्त्यांवर लक्ष ठेवायला सुरुवात केली, तो काही क्षण एका रस्त्यावर तर काही क्षण दुसर्या रस्त्यावर थांबत होता. पण रिया वेगळ्याच मार्गाने बाहेर पडत होती, तो मार्ग म्हणजे नदी. जंगलातुन जाणाऱ्या नदी पात्रात तिने उडी मारली होती. अंधारात नदीतुन ती हळु हळु पुढे निघाली होती. नदीच्या प्रवाहामुळे ती दुसऱ्याच गावात पोहचली होती. थकव्यामुळे किनाऱ्यावरचं तिची शुद्ध हरपली. जीव धोक्यात होता तोपर्यंत अंगातली सगळी ताकद तिने पणाला लावली होती. दुसऱ्या दिवशी गावातल्या बायकांनी तिला नदीवर बघितलं. तिला शुद्धीवर आणायचा प्रयत्न केला पण व्यर्थ. गावातल्या वैद्याने काही औषधी दिल्यात. सरपंच बाईने पोलिसात कळवून तिला स्वतःच्याच घरात ठेवलं, जोपर्यंत तिला शुद्ध येत नाही तोपर्यंत तिची काहीच माहिती मिळणं शक्य नव्हतं.
इकडे वाड्यात रात्रीच्या जेवणाला सुद्धा रिया आली नाही म्हणुन सर्व जण काळजीत पडले, वाडा पुर्ण शोधून झाला होता, रियाचा कुठेच पत्ता नव्हता. घरातले काही लोक तिला शोधायला बाहेर पडलेत. वेद देखील विचारात पडला, कारण त्याने बराच वेळ जंगलात शोधाशोध केलेली पण ती जंगलात कुठेच सापडली नव्हती, ना तिच्या पाऊलखुणा त्याला जंगलात कुठे सापडल्या होत्या. नदीच्या पात्राबद्दल त्याच्या मनात एकदा शंका येऊन गेली होती, पण नदीच्या त्या प्रवाहात जर रियाने उडी मारली असेल तर ती आत्ता ह्या जगात कुठेच सापडणार नाही याची त्याला खात्री होती, सापडलं तर तिचं प्रेत नक्कीच सापडेल. म्हणुन तो निश्चिंत झाला होता. आणि वाड्यात सर्वांसोबत शोध घेत फिरत होता. त्याच्या दृष्टीने हे बरचं झालं होतं कारण सौम्य पुन्हा एकटा पडला होता, त्यात तो रियाचा शोध घेण्यात वेळ वाया घालवणार म्हणजे अमावस्येपर्यंत सौम्यपेक्षा जास्त शक्ती वेद कडे असणार होत्या.
“मी एकटा, सर्वांत राहून, सगळ बघून, सगळे घाव सोसून, मी एकटाच. येणारे येत राहणार, जाणारे जात राहणार. मी इथेच आहे. अभेद्य. अजिंक्य. अविचलीत. कोणाच्या येण्याचा आनंद नाही. कोणच्या जाण्याचं दुखः नाही. पण खरच असं वागता येत का? म्हणजे जेव्हा एखाद्याच्या सानिध्यात तुम्ही वर्षानुवर्ष राहता तेव्हा जीव जडत नाही? वास्तू असलो म्हणुन मला भावना असणं, अशक्य आहे? अयोग्य आहे?”
“ह्या सर्व गोष्टी मी बघत होतो, समजून घेत होतो, मदत करणं शक्य झालं असत तर सौम्य आणि रियाची मदत करायची वेळ आलीच नसती, कारण मी त्या अघोऱ्याला पाहिला बळीच घेऊ दिला नसता. आता माझ्या हातात काही नव्हतं, पण कोणास ठावूक सईवर माझाही जीव जडलेला होताच कि. पोर अगदी लहान होती तेव्हा पासुन बघतोय तिला, म्हणजे तिचा जन्मच मुळात माझ्या डोळ्यांसमोर झाला. मला काही तरी करावंच लागणार होतं. सौम्यचे प्रयत्न बघून माझा जीव जळत होता. रिया जाऊन बरेच दिवस झालेले. आणि अमावस्येला मोजून ३ रात्री बाकी होत्या. मुळात वास्तुपुरुष म्हणुन माझी निर्मिती हिच घराचं रक्षण करण्याहेतूने झाली आहे. आणि आता ज्यावेळी घरातल्या एका व्यक्तीच्या जीवावर प्रसंग बेतला आहे तेव्हा मी शांत बसणं हे योग्य नाही. त्यामुळे आता फक्त भिंत बनून हवा-पाण्या पासुन रक्षण करतांनाच बाहेर ह्या माणसांत जाऊन सईला वाचवणं हे माझं कर्तव्यच आहे.”
क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults