वास्तु १५

Submitted by जयश्री साळुंके on 25 August, 2019 - 22:47

अंगावर भगवी कफनी, गळ्यात मोजता येणार नाही इतक्या वेगवेगळ्या माळा, कपाळी भस्म, डोळ्याच्या केसांच्या जटा, डोळ्यात जाड काजळ, मोठ्या वाढलेल्या दाढी मिश्या. अश्या अवतारात मी दाराच्या आत येऊन उभा होतो. अमावस्येला आता मोजून दोन दिवस उरलेले, त्यामुळे मला येणं गरजेचं होतं. घरातल्या लोकांच सध्या कशातच लक्ष लागत नव्हतं, एक पोरगी आजारी, एक हरवलेली, घराला नेमकी कोणाची दृष्ट लागली तेच कळायला मार्ग नव्हता. त्यामुळे तो अंगणातल्या मंदिरात नेमका केव्हापासून येऊन बसला आहे हे कोणाला माहित नव्हतं. जेव्हा घरच्यांच्या लक्षात आलं, तेव्हा मला घरात घेतलं, वास्तुशांती नंतर आज पुन्हा अगदी पोटभर जेवलो मी. आता खाल्ल्या मिठाला जगणं भाग होतं. पण नेमका त्याच दिवशी अघोरी घर सोडुन गेला होता. त्याला देखील त्याच्या पूजेसाठी तयारी करायची होती. त्यामुळे माझी आणि त्याची भेट तर झाली नाही, पण सौम्यला देखील याबद्दल आता सांगायची वेळ झाली होती.
सौम्यच्या खोलीत पुस्तकांचा ढीग पडलेला होता, त्याला काहीही करून असं काही शोधायचं होतं ज्याने गिरिजाला मुक्ती आणि सईची सुटका होईल. गेल्या काही दिवसांपासून तो झोपला देखील नव्हता. आणि हे असचं जर चालू राहिलं तर मुख्य लढाईच्या वेळी त्याच्या अंगात त्राण राहणार नाही. मी त्याच्या खोलीत गेलो तेव्हा देखील तो काही तरी वाचत होता. घरातल्या लोकांना एकंदरीत परिस्थितीचा अंदाज असल्यामुळे मिळेल ती मदत ते घेत होते. म्हणुन मला कोणीही अडवलं नाही.
सौम्य मला बघून जरा चकित झाला. पण मदतीचा हात पुढे आल्यामुळे त्याच्या मनाला देखील जरा शांती मिळाली. त्याच्या चेहऱ्यावरचं तेज पुर्ण लोप झालेलं होतं. त्याला आरामाची प्रचंड गरज होती, त्याला शांत झोपायला लावून मी विहिरीकडे निघालो. कारण ती विहीरच शेवटच्या क्षणी आमच्या लढाई साठी मैदान बनणार होती. तिथे आत्तापासून काही पूजा करण्याची गरज होती. जेणेकरून तिथला वाईट शक्तींचा वास थोडा कमी होईल. आणि हि पूजा आज रात्री होणंच गरजेच होतं. कारण एक रात्र सोडुन अमावस्या होती. मी पूजेच्या तयारीला लागलो. तिमिरातून तेजाकडे जाण्याच्या पूजेसाठी सर्वात आधी वातावरणातला अंधार नाहीसा करण गरजेच असतं. म्हणुन सर्वात आधी व्यवस्थित साफसफाई करून तिथे एक हजार एक दिव्यांची रास लावण्यात आली. मदतीला पुर्ण वाड्यातली लोकं होती. तोपर्यंत सांजवेळ झालेली होती. आवश्यक त्या सूचना देऊन मी तिथेच थांबलो, सोबतीला दोन लोकांना थांबवून बाकीच्यांना तिथून जायला लावलं. दिव्याचं तेल उद्याच्या सूर्य दर्शनापर्यंतसंपायला नको होतं. त्यामुळे त्या दोघांना रात्रभर जगावं लागणार होतं. सौम्य देखील आराम करून पुन्हा आलेला. विहिरीतल्या पाण्यानेच त्याला स्नान करवून माझ्या जवळचे सफेद कपडे घालायला दिले. आज आमच्या पहिल्या अधिष्ठानाला सुरुवात होणार होती. आणि आजचं आम्ही पहिला वार करणार होतो.
त्याच्या शक्तींचा अंदाज मला होता. त्यामुळे त्याला आताच अशक्त करायची गरज होती, जेणेकरून अमावस्येच्या रात्री त्याच्याकडच्या शक्ती थोड्या प्रमाणात विस्कळीत असतील. अधिष्ठान साधारण एक तास चालणार होतं, त्यात होमाची तयारी झाल्यावर मी आणि सौम्य दोघ अधिष्ठानाला बसलो. हि होती मानसिक शांती आणि शरीराची ताकद समजावून घेण्याची पहिली पायरी. ह्या एका तासात काहीही झालं तरी हलायचं नाही, डोळे उघडायचे नाहीत एवढाच नियम होता. फक्त श्वास चालू आहे हे एकच सत्य जगायचं. बाकी सर्व इंद्रियांवर ताबा मिळवायचा प्रयत्न करायचा नाही, शरीरात जे होत आहे ते तसचं चालू द्यायचं. अश्याप्रकारे अधिष्ठान सुरु झालं. आमच्या अधिष्ठानाचा त्याला देखील सुगावा लागला. मी कोण आहे हे माहित नसल्यामुळे, अधिष्ठान अर्धचं झालेलं असतांना त्याने पहिला वार करण्याचा प्रयत्न केला. पण तो काळा वार चुकवायला म्हणुन दिवे लावलेले होते. त्या दिव्यांनी आमच रक्षण केलं. त्याने थोडा वेळ जाऊ दिला आणि पुन्हा एकदा तो वार करायला तयार झाला. शांतता भंग करण्यासाठी म्हणुन अचानक सगळे पक्षी किलबिलाट करू लागले. माझ्या ते लक्षात आलं. पण सौम्य अगदी निष्ठेने बसलेला होता. अघोऱ्याचा दुसरा वार देखील रिकामा गेला. एव्हाना अधिष्ठान संपत आलेलं. शेवटच्या काही क्षणात तो मोठा वार करेल हे मला माहित होतं. आणि अचानक खाली असलेल्या माझ्या पायाला गरम चिकट प्रवाह जाणवू लागला. ते रक्त आहे हे कळायला जास्त वेळ जायची गरज नव्हती. पण नेमकं कोणाचं रक्त. ह्या क्षणी तिथे आम्ही चार लोक होतो.
क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

त्यामुळे तो अंगणातल्या मंदिरात नेमका केव्हापासून येऊन बसला आहे हे कोणाला माहित नव्हतं. जेव्हा घरच्यांच्या लक्षात आलं, तेव्हा मला घरात घेतलं,

>>> यातील तो आणि मी एकच व्यक्ती ना!
आणि ही व्यक्ती कोण ?