रक्तसमंध

Submitted by Theurbannomad on 8 March, 2020 - 01:16

" हे घे, माझ्या शरीरातून बाहेर पडणारं उष्ण रक्त तुझी तहान भागवायला पुरेसं असेल, तर हे घे..." हाशिम आपल्या हातावर धारदार सुरीच्या पात्याने जखमा करत ओरडला. त्या भयाण स्मशानात आजूबाजूला काहीही दिसत नसलं, तरी अदृश्य रूपात का होईना, ते रक्तसंमंध आहे आणि त्याची तहान मनुष्याच्या रक्ताशिवाय कशानेच भागात नाही हे त्याला माहित होत. प्रत्येक अमावास्येच्या रात्री तो असाच गावाबाहेरच्या त्या कब्रिस्तानात यायचा. इथे लोक दिवसासुद्धा पाऊल ठेवायला घाबरायचे. कोणी गावात गेलं तरच गावातली इतर मंडळी इथे यायची. लहान मुलं, स्त्रिया आणि जनावरांना तर इथे आणायला सक्त मनाई होती. या कब्रिस्तानात एक रक्तपिशाच्च राहतं आणि तिन्हीसांजेनंतर सकाळचं तांबडं फुटेपर्यंत आपली रक्ताची तहान भागवायला कब्रस्तानाच्या वेशीच्या आजूबाजूला एखाद्या जिवंत मनुष्याला अथवा जनावराला शोधत असतं अशी गावात वदंता होती.

हाशिम तेव्हढा एकटा या सगळ्याला ना जुमानता प्रत्येक अमावास्येला कब्रिस्तानात यायचा. त्याला गूढविद्या, जारण-मारण आणि काळी जादू हस्तगत करायची होती. चांगल्या-वाईट जीनांना आपल्या ताब्यात ठेवायचं होतं. पिशाच्चनना आणि समंधांना वश करून घ्यायचं होतं. त्यासाठी तो कुठून कुठून अघोरी उपासनेची माहिती काढायचा आणि त्या उपासना स्वतः करायचा. अशीच कोणीतरी त्याला रक्तसामंधाची उपासना सांगितली होती आणि ती करण्यासाठी तो गेले काही महिने कब्रिस्तानात यायला लागला होता. अनेक अमावास्येच्या रात्री त्याने रक्तसमंधाला आपलं रक्त अर्पण केलं होतं, तरीही त्याला कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता.

आज मात्र हाशिम इरेला पेटला होता. समोरच्या मातीच्या भांड्यात त्याच्या हातावरच्या जखमेतून उसळणारं रक्तं जमा होत होतं. रक्तपिशाच्च आज तरी येईल म्हणून त्याने जखम खोलवर केली होती. शेवटी अति रक्तस्त्राव होऊन त्याला घेरी आली आणि तो खाली कोसळला. त्याचे डोळे आता हळू हळू बंद व्हायला लागले. आपण आता स्वतःच्या पायांनी घरी पोचत नाही, याची त्याला जाणीव पटली. सकाळनंतर कोणी आलाच तर त्याला काय सांगायचं, याची उजळणी त्याने मनात सुरु केली. हळू हळू त्याची शुद्ध हरपायला लागली आणि अचानक त्याला बर्फ़ासारखी गार हवेची झुळूक सर्वांगाला स्पर्श करून गेल्यासारखी जाणीव झाली.

कसेबसे डोळे उघडून त्याने त्या दिशेला बघितले, तो त्याला दोन भले मोठे पाय जमिनीपासून वर तरंगत आपल्या दिशेने येताना दिसले. हळू हळू त्याने डोळे वर केले, तेव्हा त्याला ती आकृती स्पष्ट दिसायला लागली. डोक्याला शिंग , तोंडातून धारदार सुळे बाहेर आलेले आणि शरीराच्या जागी नुसता पांढरा धुक्याचा गोळा अशी ती आकृती म्हणजे आपल्याला अनेक रात्रींपासून आपण ज्याची प्रतीक्षा करत होतो, तो रक्तसंमंध आहे हे हशिमला समजलं.

त्याच्या अंगात आता त्राण उरले नव्हते. नुसताच पडून राहात तो त्या समंधांकडे बघत राहिला. समंधाने त्या मातीच्या भांड्यातील रक्त प्राशन केले. त्याची सुद्धा अनेक रात्रीची तहान भागली असावी, कारण समाधानाने डोळे मिटले आणि दोन मिनिटांनी डोळे उघडून हाशीमकडे बघितलं. हाशिम डोळे उघडून शांत पडला होता. समंधाने हात पुढे करून हशिमला उठवलं आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला. अचानक हशिमला शरीरात शक्ती संचारत असल्यासारखी जाणीव झाली. त्याच्या अंगात अचानक प्रचंड बळ एकवटलं आणि काही मिनिटातच तो ताजातवाना झाला.

" तुला काय हवं? तू इथे का आलायस? मला स्वखुशीने आपलं रक्त तू का दिलंस?" समंधाने हशिमला विचारलं.

" मला पिशाचशक्ती हवी आहे. मला जगातला सर्वशक्तिशाली मनुष्य व्हायच आहे आणि जिन्ना, इफरीत अशा सगळ्या काळ्या शक्तींना माझ्या हाताखाली ठेवायचं आहे. "

" पण हे सगळं करून तुला काय सध्या करायचं आहे?"

" मला या जगावर माझा राज्य हवं आहे. मी म्हणेन ते सगळ्यांनी ऐकावं, मी सांगेन तसं सगळ्यांनी करावं अशी माझी इच्छा आहे. "

" मी तुला माझ्या बाजूने हे सगळं देऊ शकत नाही. पण मी तुला एक वचन देतो, कि जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल, तेव्हा तू तुझ्या शरीराच्या रक्ताचा एक थेम्ब जमिनीवर ठेव आणि माझा स्मरण कर, मी हजर होईन. "

हाशिम घरी परतला तेव्हा सकाळ व्हायला काही मिनिटांचा अवकाश होता. स्वतःच्या रात्रीच्या कामावर तो बेहद्द खूष होता. अनेक वर्षांनी आज त्याला त्याच्या ध्येयाच्या वाटचालीतील एक मैलाचा दगड सापडला होता. तो आता सर्वशक्तिमान व्हायच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकणार होता.

सकाळ झाल्यावर त्याने न्याहारी केली आणि घरची साफसूफ केली. तो एकटा जीव असल्यामुळे त्याला कोणाचं आणि कशाचं बंधन नव्हतंच. दर दिवशीप्रमाणे त्याने सकाळच्या वेळात हातातली कामं उरकून घेतली आणि जेवण तयार करायला घेतलं. एक एक बोटी निखाऱ्यावर खरपूस भाजत तो विचार करत होता. आता त्याला जिनांना आपल्या ताब्यात आणायचं होतं. जीन चांगले असतात आणि वाईटही. परंतु ते ज्याच्या ताब्यात असतात त्यांना सर्वतोपरी साहाय्य करतात. त्यासाठी नक्की काय करावं हे आपण त्या कालच्या समंधालाच विचारावं, असं विचार करून त्याने जेवण उरकलं आणि दुपारी विश्रांती घ्यावी म्हणून जमिनीवर अंग टाकलं.

रात्र झाल्यावर त्याने घरचे दरवाजे आणि खिडक्या लावून आतून कड्या घातल्या. हातात सूरी घेऊन त्याने बोटाला छोटीशी जखम केली, रक्ताचा थेम्ब जमिनीवर सांडला आणि समंधाला बोलावलं. समोर ते समंध प्रगट झालं.

" हाशिम, माझी आठवण का काढलीस?"

" हे समंधा, या जगात असलेल्या सगळ्या जिनांना मला माझ्या हुकुमाचा गुलाम बनवायचं आहे. त्यासाठी मी काय करावं ते मला सांग. "

" तुला त्यासाठी अतिशय खडतर मार्गावर जावं लागेल. तुला त्या जीनांना आपल्या हातात ठेवायचं असेल, तर आजपासून प्रत्येक रात्री तुला एका जिवंत मनुष्याचा बळी त्या जिनांना द्यावा लागेल. ज्या दिवशी तू ६६६ बाली पूर्ण करशील, त्या दिवशी ते सगळे तुझ्या ताब्यात येतील."

हाशीमने ते ऐकलं आणि त्याला अतिशय आनंद झाला. त्या दिवसापासून त्याने गावातल्या एका एका मनुष्याला रात्री मारायला सुरुवात केली. समंध त्याच्या आज्ञेत असल्यामुळे त्याला कोणीही काहीही करू शकत नव्हतं. गावातल्या लोकांना कशामुळे आपल्यातली माणसं अचानक नाहीशी होतं आहेत, याचा उलगडा होतं नव्हता. हाशीमने आजूबाजूच्या १०-१५ गावातल्या लोकांना एक एक करून संपवायला सुरुवात केली. सगळीकडे प्रचंड दहशतीचा वातावरण तयार झालं आणि शेवटी सगळ्यांनी मिळून त्या परिसरातल्या भल्या मोठ्या जुम्मा मशिदीत जाऊन जीव वाचवायचं ठरवलं.

त्या रात्री हशिमला कोणीही मनुष्य गावात नसल्याचं कळलं. त्याने समंधाला बोलावून आजूबाजूच्या गावांमध्ये कोणी मनुष्य आहे का ते तपासायला सांगितलं. समंधाने त्याला सगळे जण मशिदीत जमले असल्याची खबर सांगितली. मशिदीवर कोणत्याही काळ्या शक्तीचा अंमल चालणं शक्य नव्हतं. रात्र सारत चालली होती आणि आज जर बळी देण्यात खंड पडला तर आपली तपस्या वाया जाईल अशी भीती हाशीमला वाटायला लागली. आदळआपट करून त्याने आपल्या परीने लोकांना मशिदीच्या आवाराबाहेर आणायचे प्रयत्न केले. त्या लोकांना हाशीमच्या कृत्यांची माहिती नसल्यामुळे ते उलट त्यालाच मशिदीत यायला सांगायला लागले. शेवटी हाशिम वैतागला. डोळ्यासमोर त्याला आपली साधना वाया जात असल्याची चिंन्ह स्पष्ट दिसायला लागली आणि त्याने शेवटी आततायीपणाने एक निर्णय घेतला....

कोणीही बळी मिळत नाही, म्हणून त्याने आपल्या हातातला सुरा आपल्याच छाताडात खुपसला. त्याच्या शरीरातून रक्ताचे पाट वाहायला लागले. काही क्षणातच तडफडत त्याने प्राण सोडले. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा शरीराबाहेर आला आणि त्याने समंधाला विचारलं, " मी शरीर सोडून आत्म्याच्या रूपात माझी तपस्या सुरु ठेवेन. सर्वशक्तिशाली होईन. माझी तपस्याच व्यर्थ नाही ना जाणार?"

त्या समंधाने गडगडाटी हास्य करत हशिमला सांगितलं, " हाशिम, ज्या क्षणी शरीर त्यागलास, त्या क्षणी तू आत्म्याच्या लोकात आलायस. तुझ्या पाप-पुण्याचा हिशोब होऊन आता तुला जन्नत मिळेल किंवा जहन्नुम. तुझ्या कृत्यांमुळे तू आधीच जहन्नुममध्ये आपली जागा निश्चित केली आहेस...तिथला राजा कोण आहे माहित आहे तुला? इफरीत. त्याचा मी सरदार आहे. तू आजपासून माझ्या तावडीत आहेस आणि मी सांगेन ते तुला आता करावं लागेल..."

" पण तू तर माझ्या हातात...."

" हाशिम, वाईट शक्ती कोणाच्याही हातात राहू शकत नाही. काल मी तुझा गुलाम होतो, आज तू माझा गुलाम आहेस. "

हाशीमला आपल्या कृत्यांची आता जाणीव झाली. सैतानी शक्ती आपल्याला फक्त रसातळाला घेऊन जाते याची त्याला आता प्रचिती येत होती. त्याने केलेल्या कृत्यांची शिक्षा आता त्याला अनेक वर्षे भोगावी लागणार होती आणि सर्वशक्तिमान व्हायची स्वप्न बघणारा तो आज किडेमुंग्यांसारखे भोग भोगणार होता. रक्तासमंधाने आपला डाव साधला होता. हाशीमच्या राक्षसी महत्वाकांक्षेला खतपाणी घालून त्याने शेवटी हशिमलाच संपवले होते.

हाशीमने आपल्या छातीत सूर खुपसल्याचा दृश्य गावकऱ्यांनी बघितलं तेव्हा भीतीने त्यांची गाळण उडाली. दिवस उजाडल्या उजाडल्या त्यांनी आपलं सामान-सुमान बांधून त्या गावातून काढता पाय घेतला. आजूबाजूच्या अनेक गावांमधल्या लोकांनी तोच कित्ता गिरवला आणि त्या वाळवंटातली ती गाव ओसाड पडली. आजही त्या गावात पडझड झालेली घरं आणि तरीही दिमाखात उभी असणारी ती जुम्मा मशीद हेच दृश्य जाणार्या-येणाऱ्यांना दिसतं आणि देवापुढे काहीही मोठं नाही याची खात्री पटते.

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users