पाताळभैरव

Submitted by Theurbannomad on 8 March, 2020 - 01:08

सुरा हे वाळवंटातल्या गोड्या पाण्याच्या झऱ्याकाठी ऐसपैस पहुडलेलं एक सुखवस्तू गाव होतं. गावात मोजकेच लोक असले, तरी ते सगळे गुण्यागोविंदाने राहात होते. गावात कोणीही एकमेकांशी भांडण करणं, मारामार्या करणं असले प्रकार करत नसत. दार आठवड्याला शुक्रवारी जिरगा ( पंचायत ) जमवून सगळ्या तक्रारींचा निवाडा व्हायचा आणि दोन्ही बाजू ऐकून मौलवी, पंच आणि गावातले ज्येष्ठ हे सगळं कामकाज चालवायचे.

ओमार या गावात जन्माला आला, वाढला आणि तिथेच त्याचं कुटुंबदेखील वाढलं. त्या गावची संस्कृती अशी होती, की कोणीही कोणालाही मदतीला नाही म्हणत नसे. या ओमारकडे सुद्धा असाच एके दिवशी कोणीतरी वाटसरू आला आणि आपण मक्केला जात आहोत आणि मध्ये निवाऱ्यासाठी जागा शोधात आहोत असं म्हणालं. ओमारने त्याला आपल्याच घराच्या एका खोलीत छान जागा करून दिली आणि नीट खाऊ-पिऊ घातलं। दुसऱ्या दिवशी आपल्या वाटेवर जायला निघाल्यावर त्या वाटसरूला ओमारने २-३ दिवस पुरेल इतकं खाण्याचा जिन्नस बांधून आणि पाणी पखालीत भरून दिलं. तो वाटसरू त्या आदरातिथ्याने भारावला आणि त्याने ओमारला विचारलं, ' तू माझी इतकी बडदास्त ठेवलीस, त्यामुळे मला तुला काहीतरी देणं भाग आहे,पण अल्लाहच्या दरबारात मी उपकारांची ओझं घेऊन कसा जाऊ?तू माग तुला काय हवाय ते, मी देईन'

हा भटका भणंग वाटसरू आपल्याला काय देणार, याचा ओमर विचार करत होता. मागणं त्याला कससंच वाटत होता आणि ना मागून त्या वाटसरूंची अडचण सुद्धा समजत होती. शेवटी मला तुम्ही यथाशक्ती असं काहीतरी द्या, जे मी सोडून कोणालाच मिळू शकणार नाही अशा मोघम शब्दात त्याने आपली इच्छा बोलून दाखवली. त्या वाटसरूने झोळीत हात घालून एक मोठी लोखंडी चावी काढली आणि ती त्याने ओमारला दिली। ' ही चावी इथून उत्तर दिशेला एक बारिद लांब ( १ बारिद = २३ किलोमीटर ) असलेल्या एका डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या दरवाजाची आहे. तो दरवाजा थेट पाटलाच्या रस्त्याचा दरवाजा आहे। त्याचं रक्षण करणारे 'इफरीत' ( एक प्रकारचं पाताळाची रक्षा करणारं पिशाच्च ) तुला आत येऊ देणार नाहीत, पण त्यांना तू जिंकलंस तर पाताळलोकात तू कधीही येऊ जाऊ शकशील.' अशी माहिती देऊन तो तिथून झपझप पावलं टाकत निघून गेला.

पाताळलोकाची चावी आपापल्या हातात आहे हे ओमारला आधी खरं वाटत नव्हतं, पण तो सीर मक्केला जात होता , त्यामुळे त्याच्या तोंडून खोटं निघणार नाही अशा त्याचं मन त्याला सतत बजावत होतं. शेवटी विषाची परीक्षा घ्यायचा त्याने निर्णय घेतला आणि व्यापाराच्या निमित्ताने आपण १-२ महिने बाहेर जाणार आहोत असं सगळ्यांना सांगून तो त्या डोंगराच्या दिशेला निघाला. त्याचं खेचर फार काळ चालू शकत नसल्यामुळे मजल दरमजल करत त्याने ३-४ दिवसात तो डोंगर गाठला. एक अक्खा दिवस शोधाशोध केल्यावर त्याला एका वाळूच्या ढिगाखाली एक दरवाजा सापडला आणि त्याच्या अंगावर आनंदाने गुलाबपाणी शिंपडलं गेलं.

आता हा दरवाजा कसा उघडायचा आणि इफरीतला आपण कसं तोंड द्यायचा, याची त्याने मनातल्या मनात उजळणी केली. आपल्या बायको-मुलांची आठवण काढून बरावाईट झालं तर त्यांची काळजी घे म्हणून विधात्याला करुणा भाकली आणि धडधडत्या छातीने त्याने त्या दरवाज्याला हात घातला। चावी दोन वेळा फिरवल्यावर त्या दरवाज्याचा अक्राळविक्राळ आवाज झाला आणि तो सताड उघडला. आत चक्क अंधार गुडूप होतं. दरवाज्याच्या आत सूर्याची किरणं शिरतंच नव्हती. आत डोकावल्यावर त्याला काहीही ना दिसल्यामुळे तो थोडासा हिरमुसला. मशाल पेटवून त्याने दरवाज्याच्या आत हात घातला, तेव्हा त्याला समजला कि त्या दरवाज्याच्या आत कोणताही प्रकाश शिरू शकत नाही.

ना राहवून त्याने आत डोकं घालून हाका मारल्या. दोन मिनिटं शांतता झाली आणि आतून एक खणखणीत आवाज आला, ' तुला काय हवं? आत यायचा असेल तर विश्वासाने उडी मार....तुला काहीही होणार नाही। पण माझ्या तीन प्रश्नांची उत्तर तू देऊ शकला नाहीस किंवा खोटी दिलीस तर तुला मी परत जाऊ देणार नाही. ' ओमारने अल्लाहचे नाव घेतलं, मशाल टाकली आणि आत उडी मारली. पूर्णपणे अंधार असलेल्या आणि काहीही दिसू ना शकणार्या त्या गुहेत तो झपाट्याने खाली जात होता. थोड्या वेळाने त्याचे पाय जमिनीला टेकले आणि अचानक त्याला समोरचं दिसू लागलं. समोर एका हाडांनी आणि कवट्यांनी तयार केलेल्या सिहासनावर एक आकृती बसलेली होती. त्या आकृतीच्या डोळ्यांच्या जागी लाल रंगाचे दोन ठिपके होते आणि हातात एक हाडांनी तयार केलेला दंड होता. ती आकृती पूर्णपणे दिसणं शक्य नव्हतं कारण त्या आकृतीवर काळ सोडला तर कोणताही रंग नव्हतं। डोक्यावर दोन शिंग तेव्हढी स्पष्ट दिसत होती.

' तुला अंधारात दिसतंय कारण मी तुझ्या डोळ्यांना तशी शक्ती दिलीय. इथे माझ्या मर्जीशिवाय काहीही होऊ शकत नाही. मी इफरीत, या पाताळाचा सर्वेसर्वा. माझ्याबरोबर चांगले आणि वाईट जिन्ना आहेत, ते तू खरं बोलतोयस कि खोटं, ते मला सांगतील। माझे प्रश्न आता मी तुला विचारणार आहे.

ओमारने डोळे मिटले, अल्लाहच नाव घेतलं आणि प्रश्न ऐकायला तो तयार झाला.

' अशी कोणती गोष्ट आहे, जी वाटल्यावर वाढते?' 'चांगली दुआ'

' कशापासून लांब गेलं तरी आपण त्या गोष्टीच्या जवळच जातो?' ' आई आणि वडील '

' ज्याने तुला हि चावी दिली, त्या सीर चा नाव काय?' ' मी विचारल नाही, मी त्याला वाटसरू म्हणून खाऊपिऊ घातल इतकच'

इफरीत जागेवरून उठला, त्याने आपले हात वर केले आणि त्या अंधाऱ्या जागेत लक्ख प्रकाश पडला. गुहेत सोना-नाण्यांचा खच होता. भरपूर फळफळावळ होती आणि दुधाचा अखंड झरा वाहत होता. एक मधाचा तलाव होता. भिंतींवर अनेक जिन्ना लटकलेले होते. ' तू प्रामाणिक आहेस, मनाने साफ आहेस आणि नेक बंडा आहेस, म्हणून मी प्रसन्न आहे. काय हवं ते माग'

ओमारने काय मागावं असं विचार केला। आपल्याकडे सगळंच आहे, नवीन काय मागावा असं त्याला सतत वाटत होतं. तितक्यात त्याला त्या वाटसरूंकडे त्याने केलेली मागणी आठवली आणि त्याने तीच मागणी इफरीतकडे बोलून दाखवायचा ठरवलं.' तुम्ही यथाशक्ती असं काहीतरी द्या, जे मी सोडून कोणालाच मिळू शकणार नाही' अशी त्याने मागणी केली. इफरीत हसला आणि त्याने ओमारला वरदान दिलं, ' माझ्या या गुहेच्या तोंडाशी दर आठवड्यांनी तुला सोन्याच्या पाच मोहोरा मिळतील. त्या फक्त तुलाच मिळतील आणि कोणी इतर जात तिथे आलं तर त्याला मी पाताळात ओढून घेऊन माझ्या सिंहासनाखाली गाडून टाकेन' ओमारने मान्य करताच तो आपोआप क्षणार्धात गुहेच्या दाराशी आला आणि ते दार त्याला बंद झालेलं दिसलं.

गावात आल्यावर ओमारने सगळ्यांना आपल्याला त्या डोंगराच्या गुहेत खजिना सापडल्याचं सांगितलं आणि प्रत्येक आठवड्याला पाचच मोहोर मला आणता येतील हेही सांगून टाकलं. आणलेल्या पाच मोहोरा त्याने गावात सगळ्यांसाठी काही ना काही करायच्या दृष्टीने जिरगामध्ये दान केल्या। प्रत्येक आठवड्यात तो पाच मोहोरा घेऊन यायचा आणि त्यातून गावाची सगळी कामं व्हायची. हळूहळू त्याला गावाने आपला गावप्रमुख नेमला आणि त्याच्या संमतीशिवाय गावात काहीही होऊ शकणार नाही असा ठराव केला. त्याच्या या ऐश्वर्याची आणि मानापमानाची चर्चा सगळीकडे होऊ लागली आणि काही तरुण मंडळींमध्ये हळू हळू त्याच्याबद्दल असूया निर्माण झाली. त्यातला एक जण - अहमद - एकदा सगळ्या समविचारी तरुणांना एकत्र आणून ओमारला कसा खाली खेचायचं याची खलबतं करायला लागला.

शेवटी ओमारची ती चावी चोरून आपण त्या गुहेत जायचं आणि पैसाअडका कमवून श्रीमंत व्हायचं असं त्यांनी ठरवलं. एका रात्री गुपचूप अमरच्या घरात घुसून अहमदने आणि त्याच्या मित्रांनी अमरच्या खोलीत ठेवलेली त्याची ती चावी पळवली आणि घोड्यावर बसून रात्रीच त्या डोंगराकडे प्रयाण केलं. सकाळी सगळा प्रकार समजल्यावर ओमारने जिरगा बोलावून सगळ्यांना इफरीत बद्दल माहिती दिली आणि त्या चावीचा नियम सुद्धा सांगितला। गावातल्या लोकांनी ताबडतोब घोडे सज्ज केले आणि ओमारसोबत डोंगराच्या दिशेने दौड ठोकली.

अहमद आणि त्याचे चार साथीदार डोंगरापाशी पोचले होते. दार शोधायची घाई सगळ्यांना होती आणि त्यासाठी त्यांनी अक्खा डोंगर पालथा घातला. शेवटी एकदाचा तो दरवाजा त्यांना दिसला. इतक्यात दूरवर त्यांना धुळीचे लोट दिसले आणि गावचे लोक आता आपल्या मागावर आहेत, याची त्यांना खात्री पटली. लवकरात लवकर दरवाजा उघडावा आणि मिळेल तो खजिना घेऊन विरुद्ध दिशेला असलेल्या गावात जावं असं त्यांनी ठरवलं.

ओमर लांबून त्यांना चावी ना लावायची विनंती ओरडून ओरडून करत होता. आजूबाजूचे लोक सुद्धा त्या सुरात सूर मिळवून त्यांना दाराला चावी लावण्यापासून रोखण्याचा सल्ला ओरडून ओरडून देत होते. ते दृश्य पाहून अहमद अजून घाबरला आणि त्या सहा जणांनी शेवटी घाईघाईत चावी त्या दाराला लावून दोन वेळा फिरवली.....

वीज चमकावी तसा एक प्रकाशाचा लोळ तिथे तयार झाला. दर करकरून उघडलं आणि एक एक करत ते सहाच्या सहा जण त्या अंधाऱ्या पोकळीत नाहीसे झाले. चावी त्यांच्यामागोमाग आत पडली आणि दार बंद होऊन पुन्हा एका क्षणात त्यावर वाळू जमून ते दार दिसेनासं झालं. ओमर आणि इतर गावकरी हताशपणे घोड्यावरून उतरले आणि चार-पाच लोभी आणि स्वार्थी व्यक्तींमुळे अक्ख्या गावाचं झालेलं नुकसान त्यांना डोळ्यासमोर दिसू लागलं. चावी गेलीच, सहा तरणीताठी मुलं सुद्धा बरोबर घेऊन गेली आणि त्या दरवाज्याच्या आत जाण्याचे सगळे रस्ते बंद झाले असल्यामुळे हात हलवत सगळे जण परत गेले.

काही महिन्यात तोच वाटसरू परतीच्या वाटेवर पुन्हा एकदा ओमारला भेटला. त्याच्याकडे पाहुणचार घेऊन सुखावला आणि दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा ओमारला तोच प्रश्न केला. आधीच्या अनुभवामुळे शहाण्या झालेल्या ओमारने त्यांना तेच उत्तर दिले आणि त्या फकिराने झोळीतून अजून एक चावी काढली. ती चावी दक्षिणेकडे असलेल्या डोंगरातल्या इफरीतच्या दुसऱ्या गुहेची होती. ओमारने ती चावी घेतली, फकिराला निरोप दिला आणि दुसऱ्या दिवशी गावापासून लांब समुद्राच्या किनाऱ्यावर तो गेला. चावी काढून त्याने समुद्रात फेकून दिली आणि मनोमन अल्लाहला प्रार्थना केली, 'फकिराला माझ्याकडे तितके वेळा पाठव जितक्या चाव्या त्याच्याकडे आहेत, म्हणजे मी त्या समुद्रात फेकून देईन!'

त्याची प्रार्थना अल्लाहने ऐकली कि नाही कुणास ठाऊक, कारण पुन्हा तो फकीर त्या गावी कधीच आला नाही. आजसुद्धा त्या गावात ओमारच्या पुतळ्याच्या बाजूला त्या फकिराच्या पुतळा आहे, आणि तिथे येणाऱ्या प्रत्येकाला एक चावी भेट म्हणून दिली जाते. चावीवर लिहिलेल असत, ' लोभ, माया, मोह, मत्सर अशा सगळ्या भावनांपासून दूर जायचा रास्ता ज्या दरवाज्याच्या पलीकडे आहे, त्याची हि चावी ! स्वतःच्या मनातलं तो दरवाजा ओळखा आणि या चावीने तो उघडून आयुष्य आनंदाने जगा ! "

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

कथेचा संदर्भ दिला तर अजून माहितीत भर पडेल

माझ्या UAE मधल्या १०-१२ वर्षांच्या प्रवासात मला छान छान गोष्टी सांगणारे आजोबा भेटले , वेगवेगळ्या लोककथा रंगवून रंगवून सांगणारे गोष्टीवेल्हाळ भेटले आणि कधी कधी लहान असताना स्वतःच्या आज्जी-आजोबांकडून ऐकलेल्या गोष्टी मला सांगणारे समवयस्क मित्रही भेटले. जगाच्या पाठीवर कुठेही जा , आज्जी-आजोबांकडून ऐकलेल्या गोष्टी आणि स्थानिक लोककथा या दोन गोष्टींचा खजिना सापडतोच सापडतो. अनेक लोकांनी यातल्या लोकप्रिय गोष्टी - उदाहरणार्थ ARABIAN NIGHTS - लहानपणी नक्कीच ऐकल्या किंवा वाचल्या आहेत. इसापनीतीमध्ये सुद्धा अनेक गोष्टी अशा आहेत ज्यांचं अरबस्तानाशी घट्ट नातं आहे. या सगळ्या गोष्टींपलीकडच्या अरबी लोकांमध्ये प्रचलित असलेल्या शेकडों स्थानिक लोककथा आणि गूढकथा यांची ओळख करून द्यायचा हा एक प्रयत्न.
या कथा मी ज्या लोकांकडून ऐकल्या त्यांनी मला त्याबद्दल इतकंच सांगितलं की या पुस्तकरूपाने किंवा इतर तत्सम माध्यमातून प्रकाशित झालेल्या नाहीत कारण त्या घरी गप्पांच्या मैफिलीत सांगितल्या गेलेल्या 'गुजगोष्टींसारख्या' आहेत.

मस्त