मार्टिन ऑयर : समीर आणि त्याचं बाळ

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

मार्टिन ऑयरबद्दल आधी एकदा सांगितले होते. 'तो काय करतो?', 'त्याच्याकडे का लक्ष द्यावे/देऊ नये ?' इ. प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हे बघा -
http://www.martinauer.net/
इथले The Poetry Machine अवश्य बघा. ही जर्मन भाषेतील Lyrikmaschine ची इंग्रजी आवृत्ती आहे, हे मूळ जर्मन काव्ययंत्र इंग्रजी यंत्रापेक्षा जास्त विस्तृत आहे. याउप्परही 'तो माणूस कोण आहे?' यासारख्या प्रश्नांमध्ये रस असेल तर हे बघा -
http://www.martinauer.net/author.htm
.
ऑयरचे साहित्य अपघातानेच वाचनात आले. मोठ्यांतल्या छोट्याने छोट्यांसाठी लिहिलेले साहित्य... की मोठ्यातल्या छोट्याने मोठ्यांसाठी लिहिलेले... की आणखी काही ? ते वाचले. आवडले. परत वाचले, जास्त आवडले. असे तीन वेळा झाल्यावर त्याला पत्र लिहिले (लिहावे लागले). 'मला तुमचे साहित्य आवडले, मराठीत अनुवाद करू का?' त्यावर त्याचे उत्तर होकारार्थी आले. तेव्हा काही कवितांचा (स्वैर) अनुवाद करण्याचा प्रयत्न करत आहे. यापुढे साधारण आठवड्याला एक अनुवाद इथे द्यावा असा मानस आहे. मूळ कवितेचा दुवा कवितेच्या खाली आहे.
I would like to express my heartfelt thanks to Mr Martin Auer for giving me the wonderful opportunity of translating his poems into Marathi.
.
समीर आणि त्याचं बाळ
.
समीर एकदा म्हणाला, "मला बाळ होईल."
"हॅ ! मुलांना बाळं होत नसतात काही," सई म्हणाली.
"होतच्चय मला," समीरने तिला सांगितलं.
.
समीरचं पोट वाढतंय.
सईने त्याला विचारलं, "तुझं बाळ कसंय रे ?"
"छान मोठं होतंय. आता तर ते बोलतंसुद्धा,"
"हॅ ! पोटातली बाळं बोलत नसतात काही !"
"माझं बोलतच्चय," समीरने तिला सांगितलं.
.
"मी एकटंच का आहे ?" पोटातल्या बाळाने समीरला विचारलं.
"मी आहे ना तुझ्याबरोबर, बाळा."
.
समीर एकदा बाळाला म्हणाला, "हे बघ, बाहेर घरं आहेत, बागा आहेत, कुंपणंसुद्धा आहेत... आणि हो, निळं आकाश आहे !"
"मला माहितीये," बाळ उत्तरलं.
.
"तुला पोटातून बाहेर यायचंय ?" समीरने एकदा बाळाला विचारलं.
"मी पोटातून बाहेर आलो की मग काय होईल ?"
"सगळंच... जे नेहमी होत असतं ते सगळं."
"हं... बघतो मी," बाळ म्हणालं.
"पण घाबरू नकोस बरं का !"
.
"अरे, तुझं बाळ कुठेय ?" सईने विचारलं.
"ते गेलं निघून बाहेर."
"हॅ ! बाळं काय अशी निघून जात नाहीत."
"माझं तर गेलं," समीरने तिला सांगितलं.
.
समीरला एकदा स्वप्न पडलं सकाळच्या समुद्राचं... गडद अंधार्‍याशा.
"वारा जोरात सुटलाय... ते लांबट करडे ढग बघ कसले जोरात चाललेत !"
"माहितीये मला," बाळ म्हणालं.
त्या सकाळी बाळ समुद्राकडे गेलं आणि वाळूत एकटंच खेळायला लागलं...
"माझ्याबरोबर खेळशील ?" त्याने समुद्राला विचारलं अन् मग समुद्र आणि बाळ एकत्र खेळले.
.
एकदा बाळ परत आलं, "मी मेलो... आणि आता परत तुझ्या पोटात आलोय."
"हं ! खरं तर बाहेर मोठमोठी जहाजं, बोटी, असलंसुद्धा आहे... अन् ती मोठ्ठाली यंत्रं तर बरंच काय काय करू शकतात म्हणे," समीर म्हणाला.
"मला माहितीये."
.
सई म्हणते, "हॅ ! बाळं थोडीच अशी परत पोटात येतात ?!"
"माझं येतं," समीर तिला सांगतो.
----------------------------
मूळ कविता - http://www.martinauer.net/tommy/tommyeng.htm

प्रकार: 

असामी, माझ्याजवळ देखिल संदर्भ नव्हते. मी इकॉनॉमीच्या अनुशंगानी माझाच काही तरी अर्थ लावला होता Happy अशा प्रकारांमध्ये संदर्भ अतिशय महत्वाचे असतात. आवश्यक असतात असे मुळीच नाही. अनेकदा चांगले मॉडेल्स (चांगल्या नव्हे) अनेक वेगवेगळ्या परिस्थीती दर्शवु शकतात.
--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद

आज तब्बल चार वर्षांनी परत या कवितेकडे आलो.
आज मी सहा वर्षाचा बाप आहे, या अनुभवाने असेल कदाचित, पण अत्यंत तीव्रतेने पार आतपर्यंत घुसलीच ही कविता.
अस्वस्थपणा आला आहे.

वेगळीच कविता,जाणकारांची,(रैना,स्लार्टी अन इतर )चर्चाही गहन अन अभ्यासू,धन्स हे सर्व इथे आणण्यासाठी अन आता वर काढण्यासाठी.

पण कोणतेही पूर्वसंदर्भ न घेताही कविता आवडली.तिचा संपूर्ण अर्थ लावत न बसता एकदा विरूपिकेच्या, एकदा लहान मुलांच्या अतार्किक प्रगल्भ कल्पनाशक्तीच्या अंगाने तिला न्याहाळले..जगातली सगळी दु:खं,भयं लहान मुलं वास्तवातल्या स्वप्नरंजनात अन खरोखरीच्या स्वप्नात सरमिसळ करत समजून घेत असतात..

एरवी अर्थनिर्णयनासाठी दादशी सहमत.जाईजुईचा,नंदिनीचाही प्रतिसाद आवडला.

Pages