मार्टिन ऑयर : समीर आणि त्याचं बाळ
मार्टिन ऑयरबद्दल आधी एकदा सांगितले होते. 'तो काय करतो?', 'त्याच्याकडे का लक्ष द्यावे/देऊ नये ?' इ. प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हे बघा -
http://www.martinauer.net/
इथले The Poetry Machine अवश्य बघा. ही जर्मन भाषेतील Lyrikmaschine ची इंग्रजी आवृत्ती आहे, हे मूळ जर्मन काव्ययंत्र इंग्रजी यंत्रापेक्षा जास्त विस्तृत आहे. याउप्परही 'तो माणूस कोण आहे?' यासारख्या प्रश्नांमध्ये रस असेल तर हे बघा -
http://www.martinauer.net/author.htm
.
ऑयरचे साहित्य अपघातानेच वाचनात आले. मोठ्यांतल्या छोट्याने छोट्यांसाठी लिहिलेले साहित्य... की मोठ्यातल्या छोट्याने मोठ्यांसाठी लिहिलेले... की आणखी काही ? ते वाचले. आवडले. परत वाचले, जास्त आवडले. असे तीन वेळा झाल्यावर त्याला पत्र लिहिले (लिहावे लागले). 'मला तुमचे साहित्य आवडले, मराठीत अनुवाद करू का?' त्यावर त्याचे उत्तर होकारार्थी आले. तेव्हा काही कवितांचा (स्वैर) अनुवाद करण्याचा प्रयत्न करत आहे. यापुढे साधारण आठवड्याला एक अनुवाद इथे द्यावा असा मानस आहे. मूळ कवितेचा दुवा कवितेच्या खाली आहे.
I would like to express my heartfelt thanks to Mr Martin Auer for giving me the wonderful opportunity of translating his poems into Marathi.
.
समीर आणि त्याचं बाळ
.
समीर एकदा म्हणाला, "मला बाळ होईल."
"हॅ ! मुलांना बाळं होत नसतात काही," सई म्हणाली.
"होतच्चय मला," समीरने तिला सांगितलं.
.
समीरचं पोट वाढतंय.
सईने त्याला विचारलं, "तुझं बाळ कसंय रे ?"
"छान मोठं होतंय. आता तर ते बोलतंसुद्धा,"
"हॅ ! पोटातली बाळं बोलत नसतात काही !"
"माझं बोलतच्चय," समीरने तिला सांगितलं.
.
"मी एकटंच का आहे ?" पोटातल्या बाळाने समीरला विचारलं.
"मी आहे ना तुझ्याबरोबर, बाळा."
.
समीर एकदा बाळाला म्हणाला, "हे बघ, बाहेर घरं आहेत, बागा आहेत, कुंपणंसुद्धा आहेत... आणि हो, निळं आकाश आहे !"
"मला माहितीये," बाळ उत्तरलं.
.
"तुला पोटातून बाहेर यायचंय ?" समीरने एकदा बाळाला विचारलं.
"मी पोटातून बाहेर आलो की मग काय होईल ?"
"सगळंच... जे नेहमी होत असतं ते सगळं."
"हं... बघतो मी," बाळ म्हणालं.
"पण घाबरू नकोस बरं का !"
.
"अरे, तुझं बाळ कुठेय ?" सईने विचारलं.
"ते गेलं निघून बाहेर."
"हॅ ! बाळं काय अशी निघून जात नाहीत."
"माझं तर गेलं," समीरने तिला सांगितलं.
.
समीरला एकदा स्वप्न पडलं सकाळच्या समुद्राचं... गडद अंधार्याशा.
"वारा जोरात सुटलाय... ते लांबट करडे ढग बघ कसले जोरात चाललेत !"
"माहितीये मला," बाळ म्हणालं.
त्या सकाळी बाळ समुद्राकडे गेलं आणि वाळूत एकटंच खेळायला लागलं...
"माझ्याबरोबर खेळशील ?" त्याने समुद्राला विचारलं अन् मग समुद्र आणि बाळ एकत्र खेळले.
.
एकदा बाळ परत आलं, "मी मेलो... आणि आता परत तुझ्या पोटात आलोय."
"हं ! खरं तर बाहेर मोठमोठी जहाजं, बोटी, असलंसुद्धा आहे... अन् ती मोठ्ठाली यंत्रं तर बरंच काय काय करू शकतात म्हणे," समीर म्हणाला.
"मला माहितीये."
.
सई म्हणते, "हॅ ! बाळं थोडीच अशी परत पोटात येतात ?!"
"माझं येतं," समीर तिला सांगतो.
----------------------------
मूळ कविता - http://www.martinauer.net/tommy/tommyeng.htm
तुमचं
तुमचं बाळंतपण करायचय का..?
स्लार्ट्य
स्लार्ट्या,
मस्त अनुवाद..
जबरी रे
जबरी रे स्लार्ट्या.
वेड लागलं रे वाचून. ह्या माणसाशी ओळख करुन दिल्याबद्दल अनेक कोटी धन्यवाद.
मोठ्यांतल्या छोट्याने छोट्यांसाठी लिहिलेले साहित्य... की मोठ्यातल्या छोट्याने मोठ्यांसाठी लिहिलेले... की आणखी काही>>>>> अगदी अगदी यथार्थ वर्णन.
Alles was immer ist,
Es gibt den Wind", sagt Tommy, "und lange, graue Wolken, die schnell sind,
Meins aber schon..
मस्त आहे ओ.
मस्त आहे ओ.
मला तर प्रो. कवितेंसारखीच वाटली.
(स्लार्टी,धन्यवाद या कविशी ओळख करुन दिल्याबद्दल.
आणि माबो,धन्यवाद प्रों. शी ओळख करुन दिल्याबद्दल !)
स्लार्ट्य
स्लार्ट्या सुंदर अनुवाद आणि धन्यवाद...
----------------------------------------
फिर वोही रात है.. फिर वोही.. रात है ख्वाब की....
स्लार्टी
स्लार्टी भावु... अनुवाद तर अगदी सोप्या भाषेत आहे... पण अर्थ मात्र काहीच नाही कळला... अनुवादाबरोबर माझ्या सारख्या ( आजुन बरेच आहेत अस मला अत्ताच कळलं) कच्च्या लिंबाना थोडा नेमक्या अर्थाचा संदर्भ दिला तर फार बरं होईल.... आणी मला माहीत आहे ही कदाचित संदर्भ दिल्यावर त्यात काव्यात्मक काही राहत नाही पण मग आमच्या सारख्यांचं या बद्दल ज्ञान वाढतच नाही...
अर्थ कळल्यावर कदाचित आम्ही कवितेच्या विषयाचा, अर्थपुर्ण रचनेचा आनंद घेवु शकु..
मला पण
मला पण विशेष काही कळलं नाही..
नयनिश म्हणाल्याप्रमाणे अनुवाद सोप्या भाषेत आहे.. पण मुलाचं बाळ, मग ते बोलतं, मग ते मरतं, मग परत येतं... अजिबात नो झेप्स.. ! कसलं रुपक किंवा प्रतिकात्मक वगैरे आहे का???
मला पण
मला पण विशेष काही कळलं नाही..
-----------------------------------
अडम, तुला विशेष कळले नाही.. मला तर अजिबातच काही कळले नाही
स्लार्टी भाय,
आम्हाला समजावुन सांगा ना
स्लार्टी
स्लार्टी सांगेलच, तरी एक प्रयत्न.
साधारण ज्या देशांनी दुस-या महायुध्दाची भयानक झळ भोगली- एक कर्त्या पुरुषांची पिढीच जिथे नाहीशी झाली ,आणि वर्षानुवर्ष ज्यांच्या मुलाबाळांच्या कानात फक्त दचकविणारे बॉम्बहल्ल्यांचे आवाज पार्श्वसंगीत म्हणून राहिले, ज्यांनी/ज्यांच्या मुलांनी कल्पनाही करवणार नाही असे मनुष्यदेहाचे तुकडेच/रक्त/मांस सर्वत्र विखुरलेले पाहिले, ज्यांना युद्धकाळात दोनवेळेचे जेवण आणि थंडीत गरम आसरा मिळायला मुष्कील झाले, युद्ध संपल्यावर ज्यांनी वर्षानुवर्ष आर्थिक पुनर्बांधणीत अतोनात कष्ट केले- अशा देशांमध्ये Anti War/ Anti Nuke साहित्याची एक लाट आली. लहानपणीच्या निरागस वयातच, पण मनुष्ययोनीचे पाहू नये तेच सर्व पाहिलेली ही युद्धकालीन लहान मुलांची पिढी. अशा अनुभवातून आणि एकुणातच जीवनाच्या क्षणभंगूरतेतून निर्माण झालेले साहित्य. संगतवार / तार्कीक अर्थ लागणे कठीण, तरीही त्यांच्या आयुष्यातली ती पोकळी लक्षात घेतली तर, आयुष्यात संगतवार असे खरंतर काहीच नसते असे वाटायला लागणारे ते साहित्य.
विचारधारा: हा पृथ्वी नावाचा ग्रह खरचं राहण्यालायक आहे का ? मानवी आ़कांक्षांनी जीवनाला काहीच अर्थ राहिला नाही, या एवढ्या कष्टप्रद जगात काय म्हणून कोवळी निरागस बालकं जन्मायला घालायची ? त्यांना बालपण तर आपण देऊ शकत नाही. नुसता द्वेष, मत्सर, आणि हिंसा भरले आहेत या जगात. उलट न घालून , आपण त्यांचे अनेक युद्धांपासून, संहारापासून संरक्षणच करत नाही काय ?
हा संदर्भ मनात ठेवून वाचायला घ्या.
धन्यवाद
धन्यवाद रैना. तुझी पोस्ट वाचल्यावर पुन्हा एकदा स्लार्टीचा अनुवाद वाचला आणि मूळ कविता पण वाचली. (उगिचच) अर्थ लागल्यासारखे वाटतेय. पुरुषाला बाळ आणि ते बाळ पुन्हा पोटात जाणे ह्यात अघटित असे काही सुचवायचे आहे का ?
स्लार्टी, धन्यवाद. कविची आणि अशा प्रकारच्या साहित्यकृतींची ओळख करुन दिल्याबद्दल.
रैना,
रैना, तुझ्या सांगण्यात तथ्य असेल नक्कीच. पण तरीही पुन्हा एकदा कविता वाचूनही काहीही कळली नाही. मूळ कविताही काही कठीण नाही खरंतर. पण ह्या कवितेतला खरा अर्थ काही लक्षात येत नाहीये. त्यामुळे चांगली आहे असं कसं म्हणू?
आणि रैना, तुझ्या पोस्टमध्ये जर्मनमध्ये काय लिहिलं आहेस?
बालसाहित्
बालसाहित्य साधारण कसे असते?
आपल्याकडे बोधपर - पंचतंत्र, बिरबलाच्या गोष्टी, बोलीभाषेतील बडबडगीतं वगैरे (इसापनीती आपली नाही, पण बेमालूमपणे आपली वाटते). साधारणतः लहान (समजत्या वयाच्या)मुलांना नीतीमत्तेचे पाठ, जीवनदृष्टी देण्यासाठी
बडबडगीते प्रकारचे- आपडी थापडी, गुळाची पापडी ला खरं तर काय अर्थ आहे ? पण त्यातले नाद, शब्दांची लय (जूळलेली यमकं) चिमण्यांना आकर्षीत करतातच की नाही ? अशी कित्तीतरी उदाहरणं दिली जाऊ शकतात. तर बरीचसे Nonsense lyrics/ nonsense rhymes प्रकारचे. मराठीत मला मंगेश पाडगावकरांनी आणि करंदीकरांनी (अहाहा - पिशी मावशी) वगैरे खूप लिहिले आहे.
ह्या सगळ्याचा अर्थ शब्दशः घ्यायचा नसतो. मुलांमध्ये जे कुतुहूल आणि कल्पनेच्या भरा-या असतात आणि अतार्किक विचारपद्धीती असते, शूद्ध निर्मळ आनंद असतो त्याचा ह्या प्रकारामध्ये निव्वळ अविष्कार असतो.
कोकणचा राजा झिम्मा खेळतो- आता कोकणातला कुठला राजा , इ.स किती साली आणि मुलींचा झिम्मा का बरं खेळतो असा विचार आपण करतो का ?(ह्यावर पुलंचा एक सुरेख लेख आहे.)
उदा- अॅलिस ईन वंडरलॅड- ह्याचा किती तार्किक अर्थ लागतो ?
आता कवितेबाबत मला जे समजले, ते अल्पमतीप्रमाणे. कोणाला अजून काही अर्थ गवसल्यास नक्की लिहा.
तर वरील कविता ही ह्या दोन्ही संदर्भांचे (युद्ध आणि बालसाहित्य )थोडेसे मिश्रण आहे.
लहानगी आगाऊ ठकी त्या लहानग्या छोट्याला ठासून सांगतेय की हॅ- मुलग्यांना बाळं होतचं नसतात- पण तो म्हणतो मला होणरेयच्च मुळी. मग ते गर्भातलं बाळ दिसामासांनी वाढतं - ती विचारते कसय रे तुझं बाळ ?- वाढंतय/हुकांर देतय/बोलणं पण ऐकु यायला लागलय. हॅ गर्भातली बाळं बोलत नसतात काही. बोलतयच्च मुळी.
बाळ : मी एकटा का आहे ? टॉमी: तु माझ्याबरोबर आहेस रे सोन्या . (लहान मुलांना आईचं अस्तित्वच पुरेसं असतं. मग तीच नाही का त्याला जगातल्या सगळ्या चैतन्याशी ओळख करुन देत? ती चिऊ दाखवते म्हणून तोही चिऊ म्हणतो. तर पुढचं कडवं)
टॉमी: अरे, तिथे घरं आहेत, बागा आहेत/ कुंपणं ही
आणि आकाश
(पोटातल्या पाण्यात डचमळणा-या त्या गर्भाला माय/बाप सांगताहेत बाहेर आल्यावर काय काय आहे पृथ्वीवर ते. बाळा तिथे आसरा आहे (तुझी म्हणून म्हणायला एक जागा आहे, निसर्ग आहे आणि मानवनिर्मीत कुंपणं ही) आणि अनादी अनंत आकाशाचे आवरणही आहे).
बाळः माहितीये ( हे कारण आईच्या पोटाबाहेर यायला त्याला पुरेसं चांगलं आहे की नाही कोण जाणे. तर पुढच कडवं)
तुला जन्माला यायचय कारे ?
आल्यावर काय होईल ?
नेहमी होतं तेच सगळं की ( आयुष्यात जेजे काय काय होण्यालायक असतं ते सगळच होईल की कालौघात)
एकदा जन्म घेउन पहायला हरकत नाही
घाबरु नकोस हां पण ( बाहेरचे जग भयंकर असले तरी पहा एकदा तरी जन्म घेऊन)
अच्छा
अच्छा अच्छा तर हे बालगीत आहे !
एवढे गहन आणि अगम्य विचार ज्यांचे तुम्ही विवेचन केले आहे.....ते आम्हालाच नाही झेपले! कदाचीत वाचायला उशीर झाला आहे.लहान असताना वाचायला हवी होती वाटते. असो ! धन्यवाद!
सायो - अगं
सायो - अगं म्हणू नकोसच चांगलं- समजल्या शिवाय.
मला ख्ररं तर नयनिश चे वाचून आणि पार्ल्यातले वाचून एकदम रहावले नाही म्हणून. एकदम प्रामाणिक वाटल त्यांच विचारणं.
आणि मला जे समजलय तेच बरोबर आहे असं नाहीच मुळी. फक्त हा नादखूळा आणि डार्लींग सारखा प्रकार नाही एवढेच सांगायचे होते. दुर्बोध हे ब-याचदा आपल्या जाणीवेच्या पातळ्यानिहाय असतं.
म्हणजे ज्ञानेश्वरांचे साधे शब्द ही मला हृदयनाथ मंगेशकरांनी सांगे पर्यंत समजत नाहीत. तसंच.
पुढे लिहू का पूर्ण कवितेचा अर्थ ?
रैना, हो हे
रैना, हो हे समजत नाहिये तोवर चैन पडायच नाही.
माझ्या
माझ्या फक्त सोप्या गोष्टी कळणार्या डोक्याच्या मते मला तर हा ओवरऑल मुलांविषयी (किंवा मुलांच्या आयुष्या विषयी) एका पुरुषाचा असलेला दृष्टीकोन वाटतो.. बाप म्हणुन मुलांविषयी प्रेम, कौतुक तर जाणवतय पण त्याच बरोबर जीवनाकडे (साद्य परिस्थिती कडे?) बघण्याचा पुरुषाचा "Practical"(वास्तवादी?) दृष्टीकोन सुद्धा आहे...
आईच्या मुलांबद्दल प्रेमाशी, विचारांशी तुलना ही केलेली दिसते.....
थोडक्यात .. जसं एकंदरित सगळ्या वडिल मंडळीना मुलांविषयी प्रेम जरी असलं तरी त्यांना वास्त्वाशी "डील" करावं लागेल ही विचारसरणी बाळगुन असतात... मग ते वासत्व किती कठोर का असेना.... याला जर खरच महायुद्धाचा रेफेरन्स असेल तर शेवटची ओळ "बाळं परत पोटात येत नसतात (आईचा विचार), माझं आलं" चपखल बसतं....
सायोनाराल
सायोनाराला अनुमोदन..
कवितेचा शब्दशः अर्थ काही फारसा कठीण नाही. पण त्यातला गुढ्/गर्भितार्थ असेल तर तो अजुन लागत नाही आहे.
रैना,
बालगीते, बडबडगीते सहसा "आनंदी" टोन ची असतात. या कवितेतील टोन काहीसा उदास/न्युट्रल वाटतो त्यामुळे बालगीतामधे याला मोजणे जरा कठीण जातेय.
स्लार्टी म्हणतो तसे "मोठ्यातल्या छोट्याने मोठ्यांसाठी लिहिलेले" असे काहीसे वाटते. असो.
पण तुझा विश्लेषणाचा प्रयत्न उत्तम आहे.
Bottomline, अर्थ अजुन नाही कळला!
पुढे लिहू
पुढे लिहू का पूर्ण कवितेचा अर्थ ? >> लवकर लिही...
पुढे लिहू
पुढे लिहू का पूर्ण कवितेचा अर्थ ? >> लवकर लिही... >>>> हो हो हो.
मला पण बडबडगीत म्हणुन थोडे विचित्रच वाटले. पण तुम्ही (जाणकार) म्हणताय तर असेल
तुमच्यापै
तुमच्यापैकी कोणी खानोलकरांची "रात्र काळी घागर काळी" नावाची कादंबरी (पुर्ण) वाचली आहे का?
ती जर पुर्ण वाचुन कळली असेल तर ही कविता कळणे कठीण नाही
नाही,
नाही, माझ्यामते बड्बडगीत नक्कीच नसावे.बडबडगीत समजायला सोप्पं असतं, एवढा गहन अर्थ त्यात नसतो.
नयनीश, तुलाही जमलंय की विश्लेषण करायला. आणि मला तू म्हणतोस त्याप्रमाणे काहीतरी असावं असं वाटतंय.
रैना, या
रैना, या विवेचनावरून, कविता पुन्हा वाचल्यावर नकळत भय इथले संपत नाही ओळी आठवल्या आणि कालवल पोटात.
थोडा थोडा अर्थ लागतोय असं वाटतय
ठकी: ए तुझं
ठकी: ए तुझं बाळ कुठे गेलं रे ?
टॉमी: ते जगात पळून गेलं
ठकी: श्या, अशी बाळं कधी जगात पळतात वाटतं
टॉ: होच्च कै. माझं (बाळ) गेलयच मुळी पळून
टॉमी उजाडताना अजून गडद दिसणा-या समुद्राचं स्वप्न पाहतोय.
टॉ: अरे, तिथे वारा आहे, आणि लंबोळके राखाडी सुसाट ढगही (प्रतिकात्मक-तोफा/क्षेपणास्त्र व.
जगण्याला अर्थ आहे , अनर्थ ही !!!!!! हीच मध्यवर्ती कल्पना)
टॉ: माहितीये
बाळं झेपावलं की समुद्राकडे.
सकाळी एकटंच वाळूत खेळत बसलं
ए माझ्याशी खेळ ना रे, सागराला म्हणालं आणि समुद्र खेळत बसला की.
बाळ:मी मरुन गेलो होतो रे (जगण्यातले सगळे उत्तमच मेले होते त्या काळात, युद्धातील धुमश्चक्रीत)
आता तुझ्या पोटात परत आलोय (आत्ता कुठे माणसाला विवेक सुचतोय)
टॉ: समुद्रात तारु आहेत आणि अगडबंब मशीनीही (उपयुक्त म्हणून जहाजं आहेत, साहसफरी आहेत तशी विद्वंसक वृत्तीही)
माहितीये .
ठकी: बाळ कधी पोटात परत येतात वाट्टं
टॉ; माझं आलयच्च मुळी. ( सोप्या शब्दात : आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमेजल्यावाचूनी (व्. व् .व)
कुणा मोठ्ठ्या मनाच्या लहानग्याला, किंवा लहान मनाच्या मोठ्ठ्याला पडलेला हा प्रश्न आहे. इतक्या क्रुर आणि अनिश्चीत जगात जगण्याचे प्रयोजन ते काय ?सर्व निसर्गनिर्मीतीचे मानवाने हव्यासापायी खांडोळे केले आहे. अशा ह्या एवंगुणविशिष्ट जगात अर्भकांना जन्म देऊन त्यांना निकोप बालपण आणि जीवनदृष्टी आपण देऊ शकू ?जगण्याला अर्थ आहे , अनर्थ ही !!!!!!
१. आपण टॉमी आहोत. इतिहासाचे रक्तरंजीत ओझे आपल्या खांद्यावर आहे, तो क्रुस आपण वाहतो आहे. आता निदान नीरक्षीर बुद्धीला जागे करा. मारण्यापेक्षा जगण्याची /जगवण्याची कारणे शोधा. ती पुढील पिढ्यांच्या सुपूर्द करा. काय करु नये एवढं जरी त्यांना कळलं तरी इतिहासाची कावड आपल्या डोक्यावर वाहण्याचे सार्थक झालें.
२. अर्भक हे टॉमीच्या (आपल्या, युद्धकालीन काळपुरुषाच्या) मनातील निरागसतेचे प्रतीक म्हणून कविता वाचून पहा.
३. पूरुष का जन्म देतोय ? मला वाटतं जर्मन मध्ये Vaterland म्हणतात त्याचा संदर्भ आहे. आपण मातृभूमी म्हणतो , ते पितृभूमी (भावार्थः आपली भूमी : homeland), नाझींनी तो शब्द शब्दश: वापरून वापरून चोथा केलेला होता (जर्मनी आमची , नाही कुणाच्या बापाची. वगैरे. )
दुसरं - पुरूषी महत्वाकांक्षेने बघता बघता पेट घेतला आणि राष्ट्रीय स्फुल्लींगा बरोबरच वंशवाद चेतवला. पाहता पाहता महायुद्ध पेटलं. करोडो करोडोंची होरपळ झाली./कत्तल झाली.
हे मी खूप तोडमोड करुन आणि खिचडी करुन सांगीतले आहे. टायपायला अवघड जाते समजवताना.
स्लार्टी: चु. भू: द्या घ्या.
जियो रैना!!!
जियो रैना!!! काय सहजगत्या समजावून सांगितलस!! मान गये!!!
तुझे आणि स्लार्टीचे आभार
वा, रैना.
वा, रैना. लगेहाथ पायांचा फोटो टाक जरा. आता ते तू म्हणतेस तोच अर्थ बरोबर असू देत म्हणजे झालं.
श्यामली -
श्यामली - अगदी अगदी- भय इथले संपत नाहि आणि घर थकलेले संन्यासी, हळूहळू भिंत ही खचते, आईच्या डोळ्यामधले नक्षत्र मला आठवते.
मानस्मी- आनंदी टोन- अगदी. पण जपानी लहान मुलांच्या अॅटी न्युक कथा आणि अशा कविता वाचल्या की वाटतं ती आनंदाची ठेव त्यांच्या नशीबात नाही. त्यांना इतिहासाचे फार मोठ्ठे ओझे वागवायचे आहे.
तसंही प्रस्थापितांची बडबडगीतं वेगळी आणि भ -भाकरीचा चंद्र पाहत आपल्या देशातले ही लाखो लोक जगले आणि जगताहेत. आणि कारकुनांच्या पिढीची- पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठ्ठा
आता ते तू म्हणतेस तोच अर्थ बरोबर असू देत म्हणजे झालं. सायो-नाहीतर मला क्रियेटीव्हीटी चे मार्क.
>>>पण जपानी
>>>पण जपानी लहान मुलांच्या अॅटी न्युक कथा आणि अशा कविता वाचल्या की वाटतं ती आनंदाची ठेव त्यांच्या नशीबात नाही. त्यांना इतिहासाचे फार मोठ्ठे ओझे वागवायचे आहे
ह्यावरुन 'कुणीतरी' अर्धवट पोस्ट केलेली 'अनवाणी गेन' ची गोष्ट आठवली.
रैना, तू स्पष्ट केलेल्या अर्थावरुन मला जपान, हिरोशिमा नी त्या काळातली मुलंच आठवली.
रैना, तुला
रैना,
तुला creativity चे पैकी च्या पैकी मार्क..
जपानी लहान मुलांच्या अॅटी न्युक कथा - एखादी साईट असेल तर सांगशील का? (मीही नेटवर शोधेन).
तुमच्या लोकांची "Depth of thought" पाहुन थोडासा "न्युनगंड" च आलाय्..वाचन वाढवायला हवे
धन्यवाद..
धन्यवाद
धन्यवाद रैना... मला शाळेच्या परीक्षेतला "ससंदर्भ स्पष्टीकरण द्या" प्रश्न आठवला..
मस्त
मस्त उलगडलेस रैना....
Pages