मार्टिन ऑयर : समीर आणि त्याचं बाळ

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

मार्टिन ऑयरबद्दल आधी एकदा सांगितले होते. 'तो काय करतो?', 'त्याच्याकडे का लक्ष द्यावे/देऊ नये ?' इ. प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हे बघा -
http://www.martinauer.net/
इथले The Poetry Machine अवश्य बघा. ही जर्मन भाषेतील Lyrikmaschine ची इंग्रजी आवृत्ती आहे, हे मूळ जर्मन काव्ययंत्र इंग्रजी यंत्रापेक्षा जास्त विस्तृत आहे. याउप्परही 'तो माणूस कोण आहे?' यासारख्या प्रश्नांमध्ये रस असेल तर हे बघा -
http://www.martinauer.net/author.htm
.
ऑयरचे साहित्य अपघातानेच वाचनात आले. मोठ्यांतल्या छोट्याने छोट्यांसाठी लिहिलेले साहित्य... की मोठ्यातल्या छोट्याने मोठ्यांसाठी लिहिलेले... की आणखी काही ? ते वाचले. आवडले. परत वाचले, जास्त आवडले. असे तीन वेळा झाल्यावर त्याला पत्र लिहिले (लिहावे लागले). 'मला तुमचे साहित्य आवडले, मराठीत अनुवाद करू का?' त्यावर त्याचे उत्तर होकारार्थी आले. तेव्हा काही कवितांचा (स्वैर) अनुवाद करण्याचा प्रयत्न करत आहे. यापुढे साधारण आठवड्याला एक अनुवाद इथे द्यावा असा मानस आहे. मूळ कवितेचा दुवा कवितेच्या खाली आहे.
I would like to express my heartfelt thanks to Mr Martin Auer for giving me the wonderful opportunity of translating his poems into Marathi.
.
समीर आणि त्याचं बाळ
.
समीर एकदा म्हणाला, "मला बाळ होईल."
"हॅ ! मुलांना बाळं होत नसतात काही," सई म्हणाली.
"होतच्चय मला," समीरने तिला सांगितलं.
.
समीरचं पोट वाढतंय.
सईने त्याला विचारलं, "तुझं बाळ कसंय रे ?"
"छान मोठं होतंय. आता तर ते बोलतंसुद्धा,"
"हॅ ! पोटातली बाळं बोलत नसतात काही !"
"माझं बोलतच्चय," समीरने तिला सांगितलं.
.
"मी एकटंच का आहे ?" पोटातल्या बाळाने समीरला विचारलं.
"मी आहे ना तुझ्याबरोबर, बाळा."
.
समीर एकदा बाळाला म्हणाला, "हे बघ, बाहेर घरं आहेत, बागा आहेत, कुंपणंसुद्धा आहेत... आणि हो, निळं आकाश आहे !"
"मला माहितीये," बाळ उत्तरलं.
.
"तुला पोटातून बाहेर यायचंय ?" समीरने एकदा बाळाला विचारलं.
"मी पोटातून बाहेर आलो की मग काय होईल ?"
"सगळंच... जे नेहमी होत असतं ते सगळं."
"हं... बघतो मी," बाळ म्हणालं.
"पण घाबरू नकोस बरं का !"
.
"अरे, तुझं बाळ कुठेय ?" सईने विचारलं.
"ते गेलं निघून बाहेर."
"हॅ ! बाळं काय अशी निघून जात नाहीत."
"माझं तर गेलं," समीरने तिला सांगितलं.
.
समीरला एकदा स्वप्न पडलं सकाळच्या समुद्राचं... गडद अंधार्‍याशा.
"वारा जोरात सुटलाय... ते लांबट करडे ढग बघ कसले जोरात चाललेत !"
"माहितीये मला," बाळ म्हणालं.
त्या सकाळी बाळ समुद्राकडे गेलं आणि वाळूत एकटंच खेळायला लागलं...
"माझ्याबरोबर खेळशील ?" त्याने समुद्राला विचारलं अन् मग समुद्र आणि बाळ एकत्र खेळले.
.
एकदा बाळ परत आलं, "मी मेलो... आणि आता परत तुझ्या पोटात आलोय."
"हं ! खरं तर बाहेर मोठमोठी जहाजं, बोटी, असलंसुद्धा आहे... अन् ती मोठ्ठाली यंत्रं तर बरंच काय काय करू शकतात म्हणे," समीर म्हणाला.
"मला माहितीये."
.
सई म्हणते, "हॅ ! बाळं थोडीच अशी परत पोटात येतात ?!"
"माझं येतं," समीर तिला सांगतो.
----------------------------
मूळ कविता - http://www.martinauer.net/tommy/tommyeng.htm

प्रकार: 

रैना,तुमचे विवेचन फक्त गरजेचे नाही तर अपरिहार्य होते असे मला तर वाटतेय! खरंच ! Happy

नाहीतर मला क्रियेटीव्हीटी चे मार्क>>>माझ्याकडुन तर ९९% ! Happy
*************************************
एक भारतीय मध्यमवर्गीय दोनखांबी कुटुंब : नवराबायको दोघेही नोकरी करतात.
दोघेही संसाराला हातभार लावायला जिवाचे रान करतात...पै पै वाचवतात.....एक वेळ बिना फोडणीचे खावे लागले तरी बेहत्तर पण येणार्‍या बाळाच्या भविष्यासाठी आत्तापासुनच बचत करतात.
त्यात वरून घरकर्जाचे हफ्ते......गाडीचे हफ्ते....आयकर या चिंताही वाहतात.
अशीच किंवा यांच्यापेक्षाही करूण परिस्थीती म्हणजे भारतीय शेतकर्‍यांची !
तसे पाहीले तर देशाच्या विकासामधे खरा हातभार लावणारे हेच लोक. मध्यमवर्गीय आणी शेतकरी ....!एकप्रकारे सोन्याचे अंडे देणारी कोंबडीच म्हणुयात यांना (उपमा म्हणुन!)

दुसरीकडे देशामधे सुव्यवस्था,कायदा(न्याय) आणि संरक्षण या मुख्य उद्देशाने आस्तित्वात आलेले प्रशासन म्हणजे धनगराने पाळलेले श्वान म्हणता येइल ना !(इथेही उपमा म्हणुनच बरंका !).धनगराचा हेतुही तोच असतो कुत्रे पाळायचा...सुव्यवस्था.....संरक्षण वगैरे !

सद्यस्थीतीमधे मात्र भारतात आजकाल चित्र फार विसंगत दिसते......सर्वसामान्य जनता (कोंबड्या) यांना स्वतःच्या मुलभुत हक्कासाठी संघर्ष करावा लागतो....झगडावे लागते.....स्वतःच्या कुवतीची मर्यादा ओलांडावी लागते (भुंकावे लागते)....तर याउलट जे राखणदार म्हणुन नेमले होते ते राजकारणी/पोलीस लोक आपण स्वतःच सोन्याची अंडी देणारी कोंबडी असल्याच्या थाटात कुकुच कू करतात.

कोंबडी भुंकाया लागली पहाटे
अन् कुत्रं करते कुकूच कु....
कसा हो जमाना आला बघा

या तीन ओळींचा मला हा जो अर्थ लागला तो तर्कहीन वाटला काय कुणाला ?? Uhoh

आता राहीलेल्या कवितेचा अर्थही समजावून सांगू काय ? Happy

चु.भु.द्या घ्या! Light 1

रैना, अनेकानेक धन्यवाद. फार सुंदर उलगडला आहेस. रैनाने सांगितलेलाच अर्थ मलाही लागला होता. त्याला थोडी पुरवणी जोडतो.
.
जीवन क्रूर आहे, विसंगतीने भरलेले आहे (=क्रूर आहे, परत ?)... अशा जीवनात आणखी एका माणसाला आणायचे का ? असल्यास कसे आणि का ? असे प्रश्न या कवितेने माझ्या मनात उपस्थित केले. आमच्या आयुष्यात विसंगती इतकी पुरेपूर आहे की त्या विसंगतीवर भाष्य करणारी कवितासुद्धा त्या विसंगतीतून सुटली नाहीये... (म्हणजे सुसंगती तरी कुठे लागली ? तर विसंगतीमध्येच.)
.
कुठल्याही सृजनाला आपण (समाज) पहिले आडकाठी करतो. नवीन काहीही असेल तर आपली प्रतिक्रिया असते, 'हट् ! असे काही नसतेच.' कारण आपल्याला सगळे माहिती असतेच हो ! समीर जेव्हा सृजनाच्या गोष्टी करतो तेव्हा सई म्हणते, "हॅ ! असले काही नसतेच.' कारण काय ? तर सई ही स्त्री असल्याने 'बाळ, त्याचा जन्म' याबाबत तिलाच सर्व आणि तिला सर्वच ज्ञान असणार अशी तिची खात्री. सई ही आपली वृत्ती. वेळीवेळी समीरने तिला सांगितले की बाळाने असे केले, तसे केले आणि प्रत्येक वेळी सईची प्रतिक्रिया तश्शीच आहे.. 'हॅ ! असे काही होतच नसते.' प्रत्येक नव्या गोष्टीला समाजाची प्रतिक्रिया अगदी तश्शीच असते. चाकोरी सोडून काहीही असले, प्रथा-रुढी यांच्याबाहेर काहीही असले, नवनिर्माण असले की आपल्याला सई भेटते, 'हॅ ! असले काय नसतेच मुळी' असे सांगणारी.
.
मूळ जर्मन भाषेत 'sagt' असे क्रियापद आहे, म्हणजे 'म्हणतो/म्हणते' असा चालू वर्तमानकाळ आहे. पण अनुवाद करताना तोच काल मराठीत जसाच्या तसा वापरला नाहीये. त्यासाठी माझे कारण असे की ही संवादी कविता आहे. म्हणजे त्यात संवाद आहेत म्हणूनच केवळ नव्हे, तर प्रत्यक्ष संवादांचाच वापर करून ती वाचकाशी संवाद साधत आहे अशा अर्थी संवादी. अशी कविता मराठीतही त्याच अर्थाने संवादी व्हावी म्हणून प्रत्येक ठिकाणी वर्तमानकाल वापरायच्या ऐवजी मी फक्त तीन ठिकाणी तो वापरला आहे... 'समीरचं पोट वाढतंय'... 'सई म्हणते'... 'समीर तिला सांगतो'... ते कसे हे सांगतो.
.
ऑयरचा तो कालवापर मला सूचक वाटला. म्हणजे कसा ? तर जीवन अर्थहीन आहे आणि अर्थपूर्णही... इथे 'निळे आकाश'सुद्धा आहे, इथे 'मी आहे ना तुझ्याबरोबर' असे सांगून आश्वस्त करणारी माणसे आहेत, इथे 'समुद्राला विचारले, तर तो आपल्याबरोबर खेळतोसुद्धा'... हेही ऑयर सांगतो. कदाचित अशा गोष्टी आहेत म्हणूनच नवनिर्माण कधीच नाकारले जात नाही, हे मला फार महत्त्वाचे वाटते. बाळ मेल्यावर परत पोटात येते... 'बाळ होणे, बाळाला पोटात ठेवणे' हे समीरकडून थांबवले जात नाही हे खूपच महत्त्वाचे.
.
बाळ परत पोटात येते तेव्हा 'सईने विचारले' असे नाही, तर 'सई विचारते' असे आहे... हे अविश्वास दाखवणे, हेटाळणी करणे प्रत्येकवेळी होणारच आहे... आणि 'समीर तिला सांगतो'...'माझे येते' ! बाकीच्यांचं काय असेल ते असो, 'माझं' येतं ! सृजनप्रक्रिया चालूच राहते. अविश्वास, हेटाळणी असे अडथळे पार करुन आपण परत शर्यतीच्या सुरूवातीला येऊन पोहोचतो... नवनिर्मितीचे चक्र पूर्ण होते... आणखी एक सृजनप्रक्रिया सुरू करताना आपण परत कवितेच्या सुरूवातीला जातो... 'समीरचं पोट वाढतंय'.

    ***
    दिसेल दुसरे ते डोळ्यांविण. सरेल मणक्यामधला ताठा.
    पिशी मावशी वदेल सारे... जपून जा, पण जरूर गाठा ! (विंदा)

    रैनाने पुढील सुधारणा सुचवल्या आहेत -
    "होतयच मला " किंवा " होणाराय मला"/ "माझं बोलतयच (गप्पा मारतयंच) मुळी " हे कसं वाटेल ? गेयता आणि भावार्थ मु़ळ जर्मनच्या जवळ जातो असं वापरलं की. एकदम ते "माईन्स आबर श्योन" वाचून वाटलं की मराठीतील हे कॉन्स्ट्रक्ट फिट्ट्ट बसेल >>>
    त्या मलाही पटल्या. परत एकदा धन्यवाद रैना Happy फक्त का कोण जाणे, 'माझं बोलतयंच मुळी' हा प्रयोग त्यातल्या 'मुळी'मुळे मला बायकी वाटतो Happy असे का वाटते ? कदाचित मी तसे कधी बोललो नाही आणि वाढत असताना माझ्या आसपासच्या मुलांनी तो केल्याचे आठवत नाही, पण मुलींच्या बोलण्यात मात्र असायचा असे वाटते किंवा... हे नक्की सांगता येत नाहीये Happy

      ***
      दिसेल दुसरे ते डोळ्यांविण. सरेल मणक्यामधला ताठा.
      पिशी मावशी वदेल सारे... जपून जा, पण जरूर गाठा ! (विंदा)

      बापरे, हे सगळं वाचून माझा कविता कळण्याबद्दलचा न्यूनगंड चांगलाच पक्का झाला. Sad
      ही कविता छान आहे,मला आवडली,भावली का ते मला नेमक्या शब्दात सांगता येणार नाही. एक मात्र नक्की,त्या आवडण्यामागे इतका सगळा एग्झिस्टांशिअलिस्ट विचार (की अँग्स्ट?) नक्कीच नव्हता. Happy
      ********************************
      द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

      बाकी सगळे ठीक आहे. पण मला जाणवलेला एक मुद्दा... कुणी मांडला नाही. म्हणून लिहावा असे वाटले.
      प्रथम मुलांना बाळ होत नाही म्हणणार्‍या सईचा पुढचा प्रश्न आहे 'तुझे बाळ काय म्हणतेय'. म्हणजे आता तिने ते बाळ आहे हे स्वीकारले आहे. असेच पुढील प्रश्नांचेही. मग ही कविता अविश्वासाकडून स्वीकृतीकडे होणारा प्रवास तर दाखवित नाही? या दृष्टीने पाहीले तर कवितेचा शेवट जास्तच नेमका वाटतो.
      सई म्हणते, "हॅ ! बाळं थोडीच अशी परत पोटात येतात ?!"
      "माझं येतं," समीर तिला सांगतो.

      तो प्रश्न हेटाळणीचा असू शकतो. माझ्या बोटातल्या अंगठीत कोहिनूर आहे असे मी म्हणत असलो आणि एखादे दिवशी बोटात ती अंगठी दिसली नाही तर कोणी मला विचारेल, 'तुझी कोहिनूरवाली अंगठी कुठेय ?' किंवा 'तुझी कोहिनूरवाली अंगठी घालत नाहीस, हरवलीस वाटते' ... तसे काहीसे (विशिष्ट शहरात ज्याला खवचट म्हणतात तसे) Happy मला तो खवचटपणाचा वाटला, त्यामुळे त्याचा वेगळा उल्लेख केला नाही.
      पण तो प्रश्न स्वीकृतीदर्शकही असू शकतो. अविश्वास ते स्वीकृती हा प्रवास आहे का ? असेलही... शॉपेनहॉयर म्हणतो तसे प्रत्येक सत्य ३ स्थितींमधून जाते. पहिले त्याची हेटाळणी होते, मग त्याला तीव्र विरोध होतो आणि शेवटी ते स्वयंसिद्धच आहे असे समजून स्वीकारले जाते ('हे तर सूर्यप्रकाशाइतके लख्ख आहे की, हे आम्हाला माहितीच होते, नवीन काय ?' इ. इ.) Happy

        ***
        दिसेल दुसरे ते डोळ्यांविण. सरेल मणक्यामधला ताठा.
        पिशी मावशी वदेल सारे... जपून जा, पण जरूर गाठा ! (विंदा)

        मस्तच अर्थ आहे. आता पुर्ण कळला (हुश्श!)

        धन्यवाद स्लार्टी/रैना!

        धन्यवाद स्लार्टी, रैना... पण यातून मला अजून काही प्रश्न पडलेत... (disclaimer - मला कवितेतलं फारसं समजत नाही, पण समजून घ्यायची इच्छा आहे)

        १. रैनाने म्हणल्याप्रमाणे याला खरोखरंच महायुध्दाची पार्श्वभूमी आहे काय? (स्लार्टीने दिलेल्या अर्थाप्रमाणे जर घेतली तर सृजनाला विरोध हा नेहमीच होत असतो, त्यासाठी महायुद्धाची पार्श्वभूमी असायची गरज नाही)
        २. ही कविता समजायला जर एवढी अवघड असेल (कवितेत अपेक्षित असलेला अर्थ जर एवढा अवघड असेल) तर ही खरंच लहान मुलांसाठीची कविता आहे काय?

        माझ्यामते मोठ्यातल्या लहानांनी मोठ्यांतल्या मोठ्यांकरता केलेली कविता आहे.

        बाकी याची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
        The Poetry Machine हे कुठेय स्लार्ट्या ? मला का नाही दिसत आहे?
        ~~~~~~~~~

        स्लार्टी- वे टु गो ! मस्तच विवेचन.
        हो रे-जरा बायकी वाटतच, पण मराठीत नक्की असं काहीतरी सापडेलच. माझ्या मेंदूला भुंगा लागलाय, आता सापडल्याशिवाय चैन नाही. बरं एक विचारणार होते- समीर हे नाव का ?

        शॉपेनहॉयर म्हणतो तसे प्रत्येक सत्य ३ स्थितींमधून जाते. पहिले त्याची हेटाळणी होते, मग त्याला तीव्र विरोध होतो आणि शेवटी ते स्वयंसिद्धच आहे असे समजून स्वीकारले जाते >>>> अगदी. अगदी.

        मस्त चर्चा चालू आहे इथे...

        स्लार्टी आणि रैना तुम्ही खूप छान उलगडून सांगितलात अर्थ...

        मला एक प्रश्न आहे पण...
        ही आख्खी कविता एक रूपक म्हणून समोर येते.. कविता वाचताना ते कळतेच...

        कविता कुणाची आहे? कधी लिहिली होती? काय संदर्भ होता? हे माहित नसताना जर नुसती कविता म्हणून वाचली तर किती जणांना कळली?

        रैना, स्लार्टी : तुम्हाला पार्श्वभूमी माहित नसतानाही हा सर्व अर्थ लागला का?

        तसे नसेल तर कवितेने रसिकांशी जो संवाद साधला गेला पाहिजे तसा इथे साधला जात नाही आणि ही कविता मग 'स्वांतसुखाय' ठरते...

        किंवा दुसरे असेही असू शकते की रैना आणि स्लार्टी ला अर्थ झेपला पण ह्यातली रूपके वाचून आणि कुणी उलगडून दाखविल्याशिवाय मला झेपली नाहीत तर तो माझ्या बुद्धीचा दोषही असू शकतो...

        कविता म्हणजे संवाद ... लिहिणार्‍याच्या मनात ज्या भावना येतात त्या तो शब्दबद्ध करतो आणि कगदावर उतरवतो कारण त्याला कुणाबरोबर तरी आपल्या भावना शेअर करायच्या असतात... नाहीतर ती कविता कुठेही प्रसिद्ध तरी कशाला करेल तो.. स्वतःच्या वहीतच लिहून ठेवेल कुणाला दाखवणारच नाही...

        मग अश्या गूढ कवितेचा दर्जा कसा ठरवायचा?

        रैना, स्लार्टी तुमची मते जाणून घ्यायला आवडेल...

        इथल्या बाकी कवी लोकांची मतेही जाणून घ्यायला नक्की आवडेल...

        -------
        हे ऐकलेत का? मराठी गझल इ-मुशायरा

        स्लार्टी आणि रैना, दोघाचेही आभार. मा बहुतेक हाच अर्थ लावत होते पण काही काही संदर्भ लागत नव्हते. उदाहरणार्थ समुद्र Happy

        मिल्याचे प्रश्न कधीकधी मलाही पडतात. याच कवितेबद्दल नव्हे तर इतर अनेक साहित्यकृतीबद्दल.

        --------------
        नंदिनी
        --------------

        मिल्या अरे जर कविता एखाद्या कालखंडामधे घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर किंवा एखाद्या भागाच्या संदर्भावर आधारीत असेल, तर त्याचे reference हे सगळ्यांनाच नेहमीच कळतील असे नाहि ना. जसे वरची कविता अगदी प्रसिद्धिसाठी लिहिली असेल तरी महायुद्धानंतर ५० वर्षांनी त्याची तिडीक सगळ्यांना त्याच प्रमाणात जाणवेल असे नाही. (तिथेच ती उलगडून सांगायचे काम येते)

        स्लार्ती, प्रथम तूमचे आभार मानते कारण तुम्ही आम्हाला अशा साहित्याची ओळख करुन दिली. आणि इथे ज्या प्रकारची चर्चा आणि विचार मंथन होत आहे ते पण एका बौद्धिक मेजवानी सारखे वाटत आहे.

        मला वाईट फक्त एकाच गोष्टीबद्दल वाटते कि मी हि कविता आणि त्यावरील विश्लेशण हे एकाच वेळी वाचले. त्यामुळे कोरी पाटी घेउन हि कविता वाचली नाही ह्याचे वाईट वाटते. कदाचित कोरी पाटी घेउन जर कविता वाचली असती तर मला माझे असे काही अर्थ उमगले असते. तीचे वेगळ्या प्रकारे आकलन होउ शकले असते.

        वरती milya ह्यांनी विचारलेले प्रश्ण interesting आहेत आणि मला पण त्याविषयी काही लिहावेसे वाटत आहे, पण सध्या वेळे अभावी लिहु शकत नाही आहे. पण लिहीन नक्कीच लिहीन माझे प्रश्ण आणि विचार.

        फक्त कविता वाचल्यावर मला अजुन एक गोष्ट , अर्थ जाणवला तो म्हणजे,

        पहिल्यांदी बाळ जेव्हा पोटात आहे तेव्हा बाहेरच्या जगाचे वर्णन Tommy (समिर) बाळाला खालील प्रमाणे करतो.
        Tommy is dreaming about the sea, that is dark in the morning.
        "There is the wind", says Tommy, "and long grey clouds that can move so fast!"
        "I know", says the baby.

        पण जेव्हा मेल्यानंतर दुसर्‍यांदी बाळ पोटात जाते, नविन जन्म घेण्यासाठी तेव्हा
        Tommy त्याला बाहेरच्या जगाचे खालील वर्णन करतो.

        "There are ships and boats", says Tommy, "and big machines that can do many things".
        "I know" says the baby.

        म्हणजे कुठेतरी कवीला , जन्म-मृत्यु ह्यांचे सतत चालु रहाणारे चक्र आणि प्रत्येक generation मधे माणसाची होणारी भौतिक प्रगती हे दाखविणे देखिल अभिप्रेत आहे?
        म्हणजे आपली इच्छा असो अथवा नसो मनुष्याला जन्म घ्यावाच लागतो. आणि हि जिवनरहाट चालुच रहाणार आहे युगानुयुगे असे देखिल कविला म्हणायचे असेल काय?

        Tommy खालील ओळी देखिल बाळाला विचारतो,
        "Do you want to be born?" Tommy asks the baby.
        "What will happen then?"
        "Everything that is happening all the time"
        "I will try", says the baby.
        "But don't get a fright!" Tommy says.

        बाकी Jennifer-Ann आणि Tommy हे कशाचे रुपक आहेत ते स्लार्ती ने जे विश्लेशण केले आहे ते पटते.

        रैना आणि स्लार्टी तुमच्या दोघांचही रसग्रहण मस्त. मिल्या, मी ही कविता पहील्यांदा काहीही संदर्भ नसताना वाचली तेव्हाही ती छान वाटली तेव्हा ती मला अगदी हलकीफुलकी वाटली. कळली का? तर रैना आणि स्लार्टी म्हणतोय त्या अर्थी नाही कळली. पण मला जशी कळली तशीही मला आवडली.

        अगदी पहीली ओळ, मुलांना बाळं होतंच नसतात... पण कल्पना करायला काय हरकत आहे शिवाय सध्या अशा काही बातम्या येतात तेव्हा हे अशक्य आहे असं का म्हणा? पुढच्या कडव्यात सईचा प्रश्न खवचट असावा असं मला वाटलं नाही कारण एकंदरीतच कवितेच्या सूरावरुन ती दोघं लहान मुलं असावीत असं मला वाटलं.. त्यामुळे सईचा प्रश्न खवचटपणापोटी नसुन कुतुहलापोटी आहे असं वाटलं.

        मला असं वाटलं की एक लहान मुलगा कल्पना करतोय आपल्याला बाळ होतंय .. झालं तर.. पोटात असणार्‍या बाळाला काय वाटत असेल इ.इ. आणि एक छोटी मुलगी जिला आईशी किंवा इतर बायकांशी बोलून हे माहीतीये की असं होत नाही पण त्याच वेळी समीर म्हणतोय ते तिला exciting वाटतंय...

        त्यातला काळ्या ढगांचा संदर्भ हा काहीतरी अशुभ सांगतोय हे कळलं.. हा बाप बाळाला या जगात एकदा येऊन पहायला हरकत नाही हे सांगतो हे कळलं .

        असो. मजा आली कविता वाचून आणि रैना आणि स्लार्टीची चर्चा वाचूनही .. नव्याने अर्थ कळला त्याच वेळी .. इतक्या सुटसुटीत हलक्याफुलक्या वाटणार्‍या कवितेचे संदर्भ बदलल्यावर अर्थ किती प्रमाणात बदलतो हे खरोखर आश्चर्यकारक ..

        मनीष, खरे आहे तुझे म्हणणे (हेच असामीही म्हणाला आहे). म्हणूनच मी या स्पष्टीकरणाला 'पुरवणी' असे म्हटले. हा अर्थ मला दुसर्‍या-तिसर्‍या वाचनात जाणवला. फारतर तू ह्याला undercurrent म्हणू शकतोस. नंतरच्या वाचनात मला राहून राहून सईच्या प्रश्नांचे प्रयोजन काय ? त्यांचा अर्थ काय ? असे प्रश्न पडले. शिवाय, पहिल्यापासूनच बाळ परत पोटातच येणे याकडे लक्ष जात होते. त्यावेळी मला जाणवलेला अर्थ आहे.
        .
        रैना, एक आधुनिक नाव पाहिजे होते, जे बरेच वेळा आढळते. जर्मनमधली वार्‍याची ओळ डोक्यात जरा फिट्ट बसली होतीच. त्यामुळे समीर आपोआपच Happy
        .
        मिल्या, मला ही कविता कशी भावली ते सांगतो. मुळातच मुलाला बाळ होणे ही कल्पना केंद्रस्थानी. ही विसंगती कवितेच्या केंद्रस्थानी असणे हे लक्षात घेणे. समीर बाळाला आश्वस्त करताना चांगल्या गोष्टींबरोबर कुंपणही आहे हे सांगतो. घाबरू नकोस असेही सांगतो, म्हणजे घाबरण्यासारखी स्थिती आहे हे सूचित झाले. समुद्रकिनारी खेळण्याच्या प्रसंगानंतर लगेचच बाळ मरते... त्यामुळे तिथली परिस्थिती परत एकदा वाचली... गडद अंधारा समुद्र, अतिशय वेगाने वाहणारे करडे ढग यांचा बाळाच्या मृत्यूशी संबंध असावा असा अंदाज बांधला आणि त्याचा अर्थ लावण्याचा यत्न केला (नाहीतर परत, त्या समुद्र, ढग वगैरेचा उल्लेख असण्याचे प्रयोजन काय ? हे येतेच.) परत आल्यावरसुद्धा समीर जहाजे, बोटी, यंत्रे वगैरेंचा उल्लेख करतो... तर मध्यवर्ती असलेली विसंगती, या प्रतिमा आणि बाळाचा मृत्यू यावरून एक चित्र तयार झाले... त्यात लेखक जर्मन/ऑस्ट्रियन आहे. त्यामुळे संहार/युद्ध असा पुढचा संबंध लावता आला.
        मला रैनाने सांगितलेले संदर्भ आधी माहिती नव्हते. मी जर्मन शिकलो ते तुटक पद्धतीने आणि माझी जर्मन साहित्याशी तशी तोंडदेखलीच ओळख आहे. त्याचा उपयोग झाला असू शकतो हे आहेच. (हे सर्व मी सुसूत्रपणे मांडू शकलो नाहीये :()
        .
        म्हणजे आपली इच्छा असो अथवा नसो मनुष्याला जन्म घ्यावाच लागतो. >>> वर्षा, हे भारतीय अध्यात्मिकदृष्ट्या म्हणत आहात का ?
        .
        मिल्या, स्वांतसुखाय असेल असे मला वाटत नाही, कारण तू म्हणतोस तसे त्याने प्रकाशितच केली नसती. अर्थात, संदर्भ लागले/माहिती असले तर कविता कळणे सोपे जाईल हे मान्यच. ही कविता फक्त युरोपातील अथवा दुसर्‍या महायुद्धात होरपळलेल्या लोकांबद्दलच बोलत आहे असेही नाही. ही कविता इराकी मुलांबद्दल बोलत आहे, ही कविता अफगाणी समाजाबद्दलही बोलत आहे, ही कविता भविष्यात आणखी कोणाबद्दल बोलू शकेल.
        या कवितेचा दर्जा काय ? ह्म्म... यातील सहजसोपी भाषा, मूळ जर्मन कवितेतील गेयता हे सगळे तर आहेच. ही कविता अजूनही तात्कालिक ठरत नाही, ती संदर्भहीनही ठरत नाही... ही आपली सर्वात मोठी हार आहे. संहाराचा संदर्भ घे किंवा नवनिर्माणाचा संदर्भ घे... ही रूपके समजायला कठीण असतील, पण ती रूपके अजूनही वैश्विक आहेत याची टोचणी ही कविता लावून जाते. म्हणून मला ही कविता आवडली.
        .
        जाता जाता, मीनू आणि आगाऊने काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. खूप वेळा कविता आवडते, पण ते नक्की का हे मलाही सांगता येत नाही. ग्रेसच्या कविता वाचताना तर माझे बहुतेकवेळा असे होते. कविता पूर्ण समजली आहे असे तर मुळीच नसते. थोडा अर्थ लागतोय न लागतोय असे होते, तोही बदलतो. अशा वेळी, 'चला, आपण 'या'पैकी नाही' अशी स्वतःची समजूत घालतो Happy -
        असते ज्यांचे हृदय बँकेत सुरक्षित
        इन्क्रीमेंट आणि प्रमोशन
        वांझेच्या विटाळासारखे निश्चित;
        त्यांना सर्वच असते माहित...
        कविताही !
        (कवी अज्ञात)

          ***
          Freedom is just another word for nothing left to lose... - Janis Joplin

          बाप रे.. म्हणजे मला कळलीच नव्हती कविता! Sad

          मी वाचली तेंव्हा मला वाटलं की -

          समीर बाहेरच्या जगात जे बघतोय त्याचे त्याच्या मनातले पडसाद, तो बाळाचे म्हणून सांगतोय. त्याचे आई वडील तो घाबरल्यावर जसे त्याला समजवत असतील, तसच तो बाळाला समजावतोय. समुद्रावर गेल्यावर त्याला समुद्राशी खेळावसं वाटतयं, पूर्वीचे त्याचे बाहेरच्या जगाचे अनुभव फारसे आश्वासक नाहीयेत. पण समुद्र त्याच्याशी खेळल्यावर तो तयार झालाय बाहेरच्या जगाला पुन्हा एक संधी द्यायला.

          सईला रुढ गोष्टी नक्की माहित आहेत जसे बाळ काय काय करते, त्यामुळे तिला समीरच्या पोटातल्या बाळाबद्दलच बोलणं almost काहीच खर वाटत नाही! पण समीरला त्याने काही फरक पडत नाही कारण त्याचा स्वतःच्या अस्तित्वावर आणि म्हणूनच बाळाच्या अस्तित्वावर विश्वास आहे.I thought this baby is more like his invisible friend ! तो त्याच्या भावना, fears त्या बाळाच्या रुपातून मोकळ्या करतोय.

          मला ही बालकविता वाटली नाही पण positive वाटली.

          बाकीचे हे गहन अर्थ विशद केल्याबद्दल आभार!

          स्लार्टी
          परत एकदा खूप छान विवेचन...

          माझी गाडी पुरुषाचे बाळ येथेच अडली... म्हणजे ते त्याचे सॄजनत्व असावे असा अंदाज बांधून पुढे गेलो पण नंतर सर्व रुपके विशेषतः सई आणि समीरचे संवाद त्याच संदर्भात वापरता वापरता दमछाक झाली खरी...

          आता जाईजुईला वेगळाच अर्थ लागलाय... म्हणजे एकाच कवितेत अनेक पदर लोकांना दिसत आहेत आणि तसे अर्थ लावायचे झाले तर ही कविता कालातीत ठरते. आणि स्वांतसुखाय ही नक्कीच नाही हे मलाही पटलेच होते मी फक्त एक शक्यता वर्तवली होती

          पण अजून एक प्रश्न मनात उरतोच माझ्या ... की ही कविता एखाद्या माबो. कराने त्याची म्हणून प्रसिद्ध केली असती तर त्याचे इतके अर्थ पदर लोकांना लागले असते का? किंवा ते जाऊंदे, हीच मार्टिनची म्हणून पण स्लार्टी ह्या आयडीने न टाकता कुणी वेगळ्या आयडी ने टाकली असती तर सर्वांनी इतक्या गंभीरपणे घेतली असती का? (कारण स्लार्टी आणि त्याच्या ज्ञानाविषयी सर्वांनाच आदर आहे) Happy

          जाऊदे हे खूपच कीस काढणे झाले...

          रस्त्याच्या कडेने : ती 'अज्ञात' नाहीये रे बाबा Happy ती सुरेश भटांची आहे
          -------
          हे ऐकलेत का? मराठी गझल इ-मुशायरा

          मिल्या.. मी तरी प्रत्येक कविता सिरीअसली घेते "प्राणीसृष्टीवर केलेल्या कवितांसकट" ! फक्त अगदीच पचका (स्वतःचा किंवा कवीचा) झाल्याशिवाय प्रतिक्रिया देत नाही. कारण जरा काही खुट्ट झालं की तलवारीच निघतात. रसग्रहण किंवा सुधारित आवृत्ती रहाते बाजूलाच आणि नको ती चर्चा सुरू होते.

          हे मात्र खरे की स्लार्टी किंवा अजून कोणीही आपल्याला जे भावतय ते सगळ्यांपर्यंत पोहचवायचा प्रयत्न करत आहेत. आणि त्या त्या प्रकारात रस असणारी माणसं त्या चर्चेत सहभागी होत आहेत, आपापल्या परीने त्या साहित्याचे अर्थ लावत आहेत. Happy तसे पाहिले तर मार्टीनबुवानं न लिहिता ही कविता "कवी विश्वनाथ" अशा कोणी समकालीन व्यक्तीने भारतात लिहिली असती तर स्लार्टींच्या आणि पर्यायाने आपल्या अनुभवकक्षेत तरी आली असती का? Happy त्यामुळे असं वाटून घेऊ नका.

          हे जे काही आहे... ते जबरदस्तं आहे. कविता नाही. इथली निर्भेळ चर्चा! कविता वाचल्यावर माझ्याही डोक्यावरून गेली. दोन्-तिनदा वाचूनही. पण रैना, स्लार्टी ह्यांचं विवेचन, आणि पुढली चर्चा... बेफाम आहे.
          कविता ज्याला "कळणं" म्हणतात तशी अजूनही कळलीच नाहीये. Sad कारण आपल्या हातांनी जेवल्याशिवाय कसं पोट भरल्यासारखं वाटत नाही ना, तस, इतका गहन अर्थं उलगडून दाखवूनही... मी पुन्हा वाचल्यावर तोच अर्थं प्रतीत होत नसल्याने, कळली, आवडली म्हणता येत नाहीये.

          पुन्हा अशी कविता समोर आली तर मी त्यांच्याइतका वेगळा विचार करून ती कविता समजून घेऊ शकेन का? नक्की नाही. अजून ती प्रक्रिया सुदृढ झालेली नाही. पण हे वारंवार व्हायला हवं. अशा कविता अनुभवकक्षेत (जाईचा शब्दं), आणणं, आणि त्यावरची चर्चाही....
          धन्यवाद, लोक्स.

          स्पष्ट सांगतो, तद्दन भिकार आहे. श्याम मनोहर आठवले.
          असो. हे सगळे "काय वाट्टेल ते" (माणूस, बेडूक आणि उप्पिटम स्टाईल) लिहिणारे कवी/लेखक तुम्हालाच लखलाभ.

          (आम्ही लखू रिसबूड नाही आवडलेल्याला ट्रॅश आणि न कळलेल्याला अप्रतिम म्हणणारे)

          वर खूप कोड्यात(तिढ्यात) बोललो.... त्यामुळे सर्वांनी वा अनुवादकाराने सोयीस्कररित्या माझ्या पोस्टला दुर्लक्ष केलेय.... म्हणुन कोणत्या आकसेपोटी हे लिहीत नाही आहे.
          स्लार्टीचे आणि रैनाचे विवेचन/स्पष्टीकरण मला आवडले..... मनापासुन.
          मिल्या या आयडीने म्हणल्याप्रमाणे स्लार्टीच्या ज्ञानाविषयी आदर आहेच ! कदाचित माझी पहिली प्रतिक्रिया ही द्राक्षे आंबट आहेत म्हणनार्‍या कोल्ह्यासारखीही असेल.(तिच समजुत करुन घेतली आहे आता!)
          पण एक सांगा हे कवितेतले गर्भातित अर्थ लावण्यासाठी वाचकाची बौध्दीक पातळीही तेवढी उंच हवी ना?... आणि जर त्या उच्च दृष्टीकोनाने पाहीले तर सगळे जगच सुंदर दिसेल..अर्थपुर्ण दिसेल! आणि मायबोलीवरचे काही सुमार समजल्या जाणार्‍या कविताही आशयातित वाटू लागतिल ! मला सतिश चौधरीच्या त्या सुमार(मायबोलीवरच्या प्रतिष्टीत कविंचे/वाचकांचे तसे मत आहे!) कवितेतल्या त्या तीन वाक्यांचा बेमतलबपणे(आउट ऑफ स्कोप जाउन) अर्थ सांगायचा तोच प्रयत्न होता...कि जर शोधायचे झाले तर कशातही देव सापडू शकतो!
          मार्टीन ऑयर विषयी मला आधी काहीच माहीती नव्हती....त्याच्या कवितांना कशाचा रेफरंस देवून वाचावे हे पण नव्हते माहीती....आम्ही आपले ती अशीच एक कविता असेल म्हणुन वाचली...आणि त्यावर सरळ सरळ प्रतिसाद दिला. तो चुकीचा होता हे पटतेय आता......पण हे तुमच्या स्पष्टीकरणांनंतर!

          माझ्या आजोंबाना ही कविता वाचुन दाखवली तर ते वेड्यात काढतील मला..!
          अर्थासहित सांगितल्यावर कदाचित कौतुकही करतील...त्यांनाही माहित आहेतच ओ पहिल्या वा दुसर्‍या महायुध्याचे परिणाम.
          त्यासाठी क्रमप्राप्त म्हणुन मी आधी त्यांना पार्श्वभुमी समजावून सांगेन ...मग कविता वाचेन!

          म्हणुन तर म्हणलं कि ते अपरिहार्य होते...
          मलाही अर्थ कळाल्यावर ही कविता आवडली.

          यापुढे साधारण आठवड्याला एक अनुवाद इथे द्यावा असा मानस आहे>>>>>>

          एक नम्र विनंती आहे कि यापुढचा अनुवाद करताना हा विवेचनाचा भाग जरासा त्यातच आधी स्पष्ट करा....थोडक्यातच....कारण मी समजू शकतो कि सगळं जर सांगितले तर त्या कवितेतली मजा निघून जाइल..तसेच इतरांनाही त्यांचे स्वतःचे अर्थ लावायला....व्यक्त करायला... मोकळिक मिळेल !

          पु. ले. शु.

          प्रकाश

          कविता मला खुप आवडली आणि त्यावरील चर्चा सुद्धा. काही चर्चेमधे पुढे आलेले मुद्दे विचार करण्याजोगे आहेत.

          जर शोधायचे झाले तर कशातही देव सापडू शकतो! >>>

          प्रकाश अगदी मी १००% सहमत ह्या वाक्याशी. कुठल्या चष्म्याने कलाकृतीकडे बघायचे हे आपणच ठरवायचे असते. आणि देवच शोधायचा झाला तर तो कशातही देव सापडु शकतो. हे अगदी अध्यात्मिक वाक्य आहे.

          milyaa विचारत आहेत तो प्रश्ण देखिलतिशय योग्य वाटला.

          >>>पण अजून एक प्रश्न मनात उरतोच माझ्या ... की ही कविता एखाद्या माबो. कराने त्याची म्हणून प्रसिद्ध केली असती तर त्याचे इतके अर्थ पदर लोकांना लागले असते का? किंवा ते जाऊंदे, हीच मार्टिनची म्हणून पण स्लार्टी ह्या आयडीने न टाकता कुणी वेगळ्या आयडी ने टाकली असती तर सर्वांनी इतक्या गंभीरपणे घेतली असती का? >>>

          मिल्याने संयुक्तिक प्रश्न उपस्थित केला आहे.
          मी आधीच सांगितले की मलाही ऑयर अपघातानेच सापडला, त्याच्या संकेतस्थळावर गेलो तेव्हा मला त्याच्याबद्दल काहीही माहिती नव्हते. समोरच 'टॉमी' दिसली, वाचली. आवडली, परत वाचली, आवडली... (हे मी सुरुवातीलाच सांगितले आहे).
          उच्च गणल्या गेलेल्या साहित्यिकांचे सर्वच साहित्य आपल्याला आवडते असे नाही. समोर नाव 'कुसुमाग्रज' दिसले तरी मी तरी लगेच भारावून जात नाही. पण त्या नावाचा फायदा हा नक्कीच होतो की मी ती कविता वाचतो. एरवी ती कविता वाचेन याची शाश्वती नाही. हे मी कबूल करतो. तरीही त्यांची प्रत्येक कविता मला आवडतेच असे मुळीच नाही.
          ग्रेसच्या कवितांवरून एकदा वादंग झाला. काही मित्रांचे म्हणणे होते की ते तशी गूढ-दुर्बोध कविता लिहू शकतात... काहींचे म्हणणे असे की तसा आवेश आणता येईलही, पण कितीही आवेश आणला तरी काव्य आणता येत नाही Happy
          'टॉमी' आवडल्याने ऑयरचे इतरही साहित्य वाचले. मग जाणवले की 'टॉमी' ही कविता कवीला अपघाताने नाही झालेली (ती fluke नाही).
          माझ्या दृष्टीने, चांगली कविता = अंतर्मुख करणारी, विचार करायला भाग पाडणारी, भाषासौष्ठव असलेली, अभिजात असलेली, कल्पनासौंदर्य असलेली... यांपैकी एक अथवा जास्त गोष्टी मला दिसल्या तर ती कविता माझ्यासाठी चांगली. या निकषांमध्ये निर्माता येत नाही. पक्षी, माझ्या लेखी साहित्याचा दर्जा हा साहित्यिकनिरपेक्ष आहे. (ही चर्चा निखिलरावच्या कवितेखाली प्रतिसादांमध्ये झाली आहे.)
          कधीकधी एखादी कविता मला चांगली वाटण्याच्या सीमारेषेवर असते. तर अशा वेळी मी तरी 'संशयाचा फायदा' देतो, कवीला आणि मलाही. असेच करावे असेही नाही Happy
          .
          प्रकाश, तुझ्या प्रतिक्रियेवरून मी असा समज करून घेतला की तुला ती कविता आवडली नाही. १ + १ = २ हे पटवता येईल आणि तसेच आहे याचा आग्रहही मी धरेन. 'एखादी कविता आवडावीच' हे कसे पटवता येईल ? यात कसला इगो आणायचा डोंबल ? Happy असा आग्रह मलाच कोणी केला, तर 'तो आग्रह करतोय' या कारणासाठीच मी त्याच्याकडे दुर्लक्ष करेन Happy दुसरे म्हणजे, तुला कविता समजली नाही असे मी म्हणू शकत नाही, कारण ते मला खरेच माहिती नाही. ते तूच सांगू शकतोस. फक्त ती प्रतिक्रिया मला तिरकस वाटल्याने माझा असाही समज झाला की, तू 'निष्कर्ष' आधीच काढला आहेस. अशा वेळी, मी चर्चा कशी आणि काय करणार ?
          .
          जर बौद्धिक पातळी खरंच उंच असेल तर उलट सगळे जग सुंदर दिसणार नाही, अर्थपूर्णही वाटणार नाही. तीच गोष्ट उच्च दृष्टीकोनाची. भाबडी बुद्धी, भाबडा दृष्टीकोन उच्च असू शकतो का ? हा चर्चेचा मुद्दा होय. सर्व जग सुंदर दिसणे याचा अर्थ असा की सौंदर्य सगळ्यात आहे, विद्रुपतेतही. याचा अर्थ असा नव्हे, की विद्रुपताच सुंदर आहे. तसे करणे म्हणजे वास्तव नाकारणे होय. कुरूपता स्वीकारावी लागतेच. पण 'उच्च' दृष्टीकोनाचे लोक बहुतेक तिथेच थांबत नाहीत, ते पुढेही जातात. असे सुचवायचे असेल तर ते मला पटते.
          प्रत्येक ठिकाणी खोल अर्थ काढायचा म्हटला (=देव शोधायचा म्हटला) तर काढता येईल हे मान्य. मला काही प्रश्न पडतात - १. अर्थ 'काढावा लागत असेल' तर मुळातच का काढायचा ?
          २. कुठे खोल अर्थ काढायचा आणि किती खोलवर काढायचा हे कळण्याचे तारतम्य कसे येते ?
          या प्रश्नांची उत्तरे मी माझीच शोधतो.

            ***
            Freedom is just another word for nothing left to lose... - Janis Joplin

            स्लार्टि, रैना: विवेचन छान केले आहे!

            मी ही कविता स्लार्टिने इथे टाकण्याअगोदर वाचली होती. बहुदा त्याने दिलेल्या लिंक वरुनच तिथे पोचलो होतो. आवडली होती, पण विश्लेषण केले नव्हते.

            ही कवीता समजाऊन घेण्याचा लोकांचा आटापिटा वाखाणण्याजोगा आहे. नीट समजावली तर 'क्लिष्ट' बाब देखिल सोपी वाटते.

            --------------------------------------------------------------
            ... वेद यदि वा न वेद

            आवडली होती, पण विश्लेषण केले नव्हते.>> पण तुला समजली होती का ते नाही लिहिलयस Happy

            स्लार्टी, बहुतांशी पटले ... Happy
            मी लिहीलेले तिरकस वाटले हे जास्त पटले........खरे सांगायचे झाले तर मी पहिल्यांदा कवितेला आत घुसायला जास्त वेळ नाही दिला आणि उतावीळपणे प्रतिसाद दिला.....आणि मग आधीच दिलेल्या प्रतिसादांना परत न्याय देण्याचा प्रयत्न केला....!

            कधीकधी एखादी कविता मला चांगली वाटण्याच्या सीमारेषेवर असते. तर अशा वेळी मी तरी 'संशयाचा फायदा' देतो, कवीला आणि मलाही.>>> Happy

            काही मुद्दे खटकले आहेत...शेवटच्या परिच्छेदामधले...जे मांडले आहेत ते नाही....अभिप्रेत असलेले!...पण असो ! मला वादासाठी वाद सुरु करायचा नाही...पण ही वरची चर्चा काही चांगल्या कारणांसठी माझ्या लक्षात राहील ! आणि ती तशीच राहू द्यायची आहे !

            हा अनुवादाचा आणि चर्चेचा उपक्रम स्तुत्य आणि वंद्य आहे...चालुद्या.

            धन्यवाद!

            प्रकाश

            छान मुद्दे चर्चिले जातायत. सगळ्यांचेच आभार.
            कितीही आवेश आणला तरी काव्य आणता येत नाही>> अगदी, अगदी !!

            मिल्या / मानस्मी - पार्श्वभूमी माहित नसतानाही >>> पार्श्वभूमी माहित होती कारण मध्यंतरी मी बरेच Anti Nuke/Anti War Literature शोधत होते. त्याची सुरवात ही मायबोलीवरुनच झाली. एकदा ( साधारण २.५ वर्षांपूर्वी कोणीतरी मायबोलीवर arvindguptatoys.com ची लिंक दिली होती. त्या वेळेला मी जपान मध्ये होते. भाषेच्या वनवासात असल्यामूळे ही साईट पाहून फारच हरखून गेले. भारावून लगोलग त्यांना मेल केली (मी काही करु शकते का म्हणून) आश्चर्य म्हणजे गुप्ताजींचे त्वरीत उत्तर आले की जपानी Anti Nuke/Anti War गोष्टी अनुवादीत करु शकता म्हणून. माझं जपानी ज्ञान तिथवर पोचलं नव्हतं तरी ईंग्रजीतून शोधाशोध चालू केली. मग वाचत गेले, फारच बाळबोध वाटत राहिलं, तनामनात उतरेना. हिरोशीमा पाहिलं आणि तिथे मात्र त्या सगळ्या धडपडीचं सार सापडलं, तिथे पिसमेमोरियल मध्ये मुलांची पुस्तकं विकत घेतली आणि वाचत गेले, The Story of Barefoot Gen अनुवादित करुन मायबोलीवर टाकायला सुरवात केली. ती अजूनही पूर्ण झाली नाही, पण वाचनाचे गाडे त्यामानाने खुपच पुढे सरकले. वाचताना अनेकदा कळत नकळत शिकलेल्या जर्मन साहित्याशी तुलना होत होती. आउअर माहित नव्हता, तो स्लार्टीमूळे कळला.
            हिरोशीमा नी ह्या सगळ्या शब्दांमागच्या त्या अटळ शोकांतिकेचं चित्ररुप दर्शन असं घडवलं की दृष्टांत दॄष्टांत म्हणतात तो हाच !!!! एक तरी विश्वनागरिक त्या शांतीस्मृतीसंग्रहालयानी तयार केलाय. एकदा सचित्र हिरोशीमा मायबोलीवर टाकतेच.
            असो. मी काय केलं ह्यासाठी नाही, तर विचारांचा प्रवास कसा होतो आणि कुठेकुठे कायकाय गवसत गेले ह्यासाठी लिहीलेय. शब्दार्थ आणि अन्वयार्थ गवसायला एक समज तयार होईपर्यंत थांबावेच लागते असे मला अलिकडे वाटायला लागलेय. ह्यालाच प्रगल्भ होणे म्हणत असतील कदाचीत.

            आता एवढे कष्ट (?)घेऊन अर्थ का लावायचा ? कारण ते शब्द/ त्या प्रतिमा/ त्या रचना आणि आपले विचार छळतात म्हणून.
            साधं, सोपं, सरळ, सुबोध लोकं का लिहीत नाहीत ? छंदबद्ध सोप्पी कविता कुठे गेली ?
            आयुष्य नाही का कठीण झालेय ? प्रत्येक पिढीचे संघर्ष वेगळ्या पातळीवर असतात. तसाच प्रत्येक साहित्यकृतीचा आत्माही. अगदी सोप्प्या शब्दात सांगायचे तर परिकथेतील राजकुमाराचे नेहमी राजकुमारीशीच लग्न होते. वास्तवात किती राजकुमार/ राजकुमारी सुखाने नांदू लागतात ?

            दूर्बोध म्हणजेच ग्रेट असेही नाही- किंवा Emperor's New Clothes सारखं ही होतं ब-याचदा हे ही मान्य. अगदी जीव खाऊन अर्थ समजवून घ्यायची तयारी असती तर एव्हाना युलिसिस वाचून झालं असतं ! असो.

            एक महत्वाचा मुद्दा - "साधना" महत्वाची /"गुरु"ही. तानसेन भलेही गाईल पण ऐकायलाही कानसेन हवेतच. भेळेच्या कागदापासून वाट्टेल ते वाचत गेलं की कधीतरी कुठेतरी ताळमेळ लागतो. मग कशाला भेळेचा कागद म्हणायचं आणि कशाला साहित्य याचं आपल्या परिने उत्तर सापडत जातं.

            रैना,
            एक महत्वाचा मुद्दा - "साधना" महत्वाची /"गुरु"ही. तानसेन भलेही गाईल पण ऐकायलाही कानसेन हवेतच. भेळेच्या कागदापासून वाट्टेल ते वाचत गेलं की कधीतरी कुठेतरी ताळमेळ लागतो. मग कशाला भेळेचा कागद म्हणायचं आणि कशाला साहित्य याचं आपल्या परिने उत्तर सापडत जातं. >>>> जीयो. सुंदर शब्दात मतितार्थ आणी तत्व पटवून दिलेस.

            Pages