कैरीचे पन्हे

Submitted by पूनम on 21 April, 2009 - 03:12
लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कैर्‍या, साखर/गूळ, मीठ, वेलदोड्याची पूड, केशर (ऐच्छिक)

क्रमवार पाककृती: 

१. कैर्‍या किमान ४ तास आधी थंड पाण्यात बुडवून ठेवाव्यात. याने चिक असेल, तर संपूर्ण निघून जातो.
२. पाण्यातून काढून, निथळून कूकरमध्ये सर्वात वर एखाद्या झाकणावर आख्ख्या कैर्‍या (देठ न काढता) ठेवाव्यात आणि शिजवाव्यात. जास्त शिट्ट्या लागत नाहीत. ३ शिट्ट्या आणि २ मिनिट बारीक गॅस पुरेल.
३. गार झाल्या की कैरीचा गर काढून घ्यावा.
४. जेवढा गर त्याच्या दुप्पट साखर/ गूळ/ दोन्ही समप्रमाणात कैरीच्या गरात मिसळावे. थोडेसे चवीला मीठ घालावे, वेलदोड्याची पूड घालावी. हवं असल्यास केशराच्या काड्याही. एकत्र करावं.
५. हे टिकवायचं असल्यास, मिश्रण गॅसवर ठेवून एकच चटका द्यावा. हे साखरांबा म्हणून नुसते पोळीबरोबरही मस्त लागते.
६. अन्यथा, ग्लासमध्ये २ चमचे हे मिश्रण घालून, पाणी घालायचं, ढवळायचं.. पन्हं तयार Happy

वाढणी/प्रमाण: 
कैरीवर अवलंबून
अधिक टिपा: 

१. पन्हं करण्यासाठी लागणारा वेळ, गर काढण्यापासूनचा आहे. कैरी पाण्यात बुडवून ठेवलेला वेळ, कूकरचा वेळ धरलेला नाही.
२. पन्ह्यासाठी कैरी हिरवीगार आणि टणक हवी.
३. कैरीला शिरा असल्यास, गर काढल्यानंतर मिक्सरमधून फिरवून घ्यावा.
४. तोतापुरी कैरीही चालेल, ती जरा गोडसर असते. पण पारंपारिक कैरीच्या पन्ह्याची चव आगळीच.
५. शक्यतो पन्ह्यात गूळ घालावा, साखरेऐवजी. गुळाची चव जास्त खमंग लागते. अर्थात, हे आवडीवर अवलंबून आहे Happy

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप खुप धन्यवाद पूनम.. Happy खरंतर तर मला त्या कैर्‍या कश्या उकडायच्या हेच हवं होतं... पाण्यात घालुन उकडल्या तर पन्ह खराब होईल वाटत होतं..आत्ता लगेच कुकर लावणार होते..पण तु म्हणतेस तसं आधी पाण्यात घालुन ठेवते कैर्‍या. संध्याकाळी करेन पन्ह Happy

पूनम, मी मागे देठ व सालासकट उकडल्या तर सगळं कडू झालं होतं (नेहमीच होतं असं नाही असं आई म्हणाली). त्यावर आई म्हणाली सालं काढून शिजव. मग कळलं साबा सुद्धा सालं काढूनच शिजवतात. मी शिरा असोत वा नसोत मिक्सर मधून काढतेच. गॅसवर न चढवता देखिल ८ दिवस (फ्रीज मधे) टिकतं. त्यापुढे उरतच नाही Happy
हे मात्र अगदी खरं, पोळीबरोबर मस्त लागतं.
************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||

आशु मी पण तसच करते ग. मी आधीच पाणी मिक्स करुन ठेवते. तरीपण ४-५ दिवस टिकत (त्यापुढे टिकत का बघायला उरतच नाही). मिक्सर ऐवजी जर हॅन्ड ब्लेंडर असेल तर जास्त सोप जात (ज्यात साठवायच त्यातच ब्लेंडर फिरवायचा. :). कधी कधी गाळुन घेते, गाळल्यावर उरलेल्या गरात मिठ, थोड लाल तिखट, साखर घालायची आणि पोळी बरोबर तोंडीलावण म्हणुन घ्यायच Happy

हे गर वाल एक चटका द्यायच करुन बघेन एकदा. काही प्रिझरव्हेटिव्ह घालुन साठवुन ठेवता येत का १-२ म. साठी? (जस लिंबाच, पाईनॅपलच करतो तस म्हणजे पाकात घालुन वगैरे) कोणी करुन बघीतल आहे का तस काही
-------------------------------------------------------------------------------
मुंबई गटग वृत्तांत इथे वाचा http://www.maayboli.com/node/7035

http://www.youtube.com/watch?v=6_OfAvkxaTI कृपया ही अ‍ॅड बघा.

Donate Eye - Bring Light to Blind

कविता आई करते टिकणारं..पण तिची रेसेपी उद्याच मिळु शकेल.. एक सोप्पा उपाय, गुळांबा / साखरांबा वापरायचा, पन्हं करायला. आई पाणी घालुन साखरांबा मिक्सरमधुन काढते, पन्ह संपलं असेल तर.. वर्षभर पन्ह प्यायला मिळतं... त्यातनं आता तर घरी साखरांबा खाणारं कोणी नाहीये, त्यामुळे आई दोन दोन वर्ष पन्ह करुन संपवते साखरांबा. Happy

अल्पना, हे साखरांबा वाल करुन बघेन एकदा. तू आईला विचारुन इथे रेसिपी देऊ शकशील का टिकणार्‍या पन्ह्याची

-------------------------------------------------------------------------------
मुंबई गटग वृत्तांत इथे वाचा http://www.maayboli.com/node/7035

http://www.youtube.com/watch?v=6_OfAvkxaTI कृपया ही अ‍ॅड बघा.

Donate Eye - Bring Light to Blind

उद्या टाकेन..

पूनम
कैरीच्या पन्ह्यात रेडीमेड खस सीरप एक चमचा(एक ग्लासासाठी) घालून चिल्ड करून पहा. अहाहा अप्रतीम लागते. मात्र यात मुळात पन्ह्यात साखर घालावी लागते. व खस सीरप पण गोडच असते ना म्हणून पन्हं करतानाच अंदाजे थोडी कमी साखर घालावी. व रंग पण मस्त येतो....हिरवा. अर्थातच यात दुसरा कोणताही फ्लेवर वापरायचा नाही.

बर मी हे न वाचता कैर्‍या पाण्यात बिण्यात ठेवून न देता डायरेक्ट प्रेशर कुकरला लावून उकडल्यात. आता वाफ जातेय. बाकीच्या स्वैपाक उरकेल तोवर गार होतील. मग पन्हं करायचं असा प्लॅन होता म्हणून घाईघाईत उकडल्या.
आता ते सगळं कडू होणार का?