तान्हाजी - Based on True story निरीक्षण

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 January, 2020 - 15:20

मला परीक्षण लिहिता येत नाही म्हणून मोजकी निरीक्षणे लिहितो.

1) पहिल्याच क्रमांकात अंजलीबद्दल लिहिण्याचा मोह आवरत नाही. येस्स, काजोल अगदी तशीच वाटली आहे. अजय देवगणसोबत कौटुंबिक रोमान्स करताना आत्ता बॅकग्राऊंडला "कभी खुशीss कभी गम.." वाजू लागेल असे वाटत राहते. कदाचित तिच्या दृश्यांचे चित्रिकरण करायला पाहुणा दिग्दर्शक म्हणून करण जोहारला बोलावले असावे. अर्थात ते बोअर झाले अश्यातला भाग नाही, पण आजवर भन्साली स्टाईल ऐतिहासिक रोमान्स बघितल्याने हा फरक चटकन लक्षात आला ईतकेच. बहुधा काजोल प्रत्यक्ष आयुष्यात देखील सौं देवगण असल्याने तिला चित्रपटात तानाजीची बायको दाखवली असावी जेणेकरून श्री देवगण यांना अभिनय करताना तो फील येईल. पण आपल्याला मात्र तो येत नाही.

२) लेडीज फर्स्ट नंतर आता सिंघमची बारी. चित्रपट थ्रीडी नसून फोर डी असणार याचा अंदाज ट्रेलर बघूनच आलेला. हा चौथा डी देवगणचा. तो आपल्या अपेक्षा पुर्ण करतो. सिंघमस्टाईल ॲक्शन आणि त्याचा तो आंखो आंखोसे अभिनय करणारा ईन्टेन्स लूक ! या भुमिकेत त्याच्या या दोन्ही कलागुणांना पुरेपूर वाव होता. देवगणने देखील ही संधी वाया जाऊ दिली नाही. त्याला पाहून आपण वॉव म्हणतोच.

३) पद्मावत चित्रपटात रणवीर सिंगने साकारलेला व्हिलन खिलजी भाव खाणारा होता पण शाहीदने सुखद धक्का देत तोडीस तोड टक्कर दिलेली. ईथेही अजय देवगण तानाजी झाला असताना सैफला भाव खायचा फार वाव असेल असे वाटले नव्हते. पण तो तोडीस तोडच्याही एक पाऊल पुढे गेला. मला या चित्रपटातले सर्वात जास्त आवडलेले कॅरेक्टर म्हणजे सैफने साकारलेला उदयभान. हिडीसफिडीस अंगावर येणारा अभिनय न करता तो पुरेशी क्रूरता दाखवतो. वेळप्रसंगी विनोद आणि मनोरंजनही करतो. चित्रपटात ईतर मनोरंजक मसाला फार नसल्याने याची खरेच गरज होती. शिट्ट्या आणि टाळ्या खेचायचे काम मर्द मराठा मावळ्यांकडे असले तरी पब्लिकच्या चेहरयावर हास्य छोटे नवाब सैफ अली खानच उमलवतात.

(विनोदावरून पडलेला एक प्रश्न - त्या काळात "चुतिया" हा शब्द होता का? त्यावरून चित्रपटात विनोद दाखवले आहेत)

४) कथा छोटी आहे. पण पटकथा फुलवता आली असती ते टाळले आहे. संकलन दृष्टीने म्हणाल तर ते छान आहे. पण खटकले ते शिवकालीन काळ म्हणावा तसा उभाच राहिला नाही. तो फिलच आला नाही. तेव्हाची जीवनपद्धती, संस्कृती काहीच कुठेच जाणवत नाही. तानाजीच्या वडिलांचा लढाईत हात कापला जाणे, त्यांनी मृत्युपूर्वी आपल्या हातातले कडे लहान तानाजीच्या हातात सरकावणे, पुढे मोठे होत त्याने प्रतिशोध घेत ते कर्ज फेडणे, असा ऐंशीच्या दशकातील वैयक्तिक फिल्मी अ‍ॅंगल दाखवण्यापेक्षा रयतेवरचे जुलूम खोलात दाखवून ती लढाई स्वराज्याशी आणखी जोडता आली असती. तसेच तान्हाजीचे कोंढाणा व्यतीरीक्त त्या आधीचे काही पराक्रम दाखवता आले असते. पण चित्रपटाचा पुर्ण फोकस कोंढाण्यावरच राहिला आहे.

५) जे दाखवले आहे त्यात सगळ्या फ्रेम्स सुंदर आणि भव्यदिव्य करायच्या नादात कृत्रिमता आली आहे. स्वित्झर्लंड वा गेला बाजार सिमला मनालीला जाऊन बागडणे आणि मुंबईतल्याच एखाद्या मॉलच्या स्नो वर्ल्डमध्ये जाऊन सेल्फी काढणे यातल्या आनंदात नैसर्गिक विरुद्ध कृत्रिम अनुषंगाने जो फरक जाणवतो तोच अखंड चित्रपट मला जाणवत राहीला. कदाचित मलाच जे दिसतेय ते गोड मानून घेता आले नसेल हा माझा रसग्रहणदोषही असावा.

६) संवाद ठिकठाक आहेत. मी ऐकलेले की लोकं टाळ्या आणि शिट्ट्या वाजवतात. कुठे ते याची कल्पना नाही. आमच्या शो ला काही जणांनी ओढून ताणून तो प्रयत्न केला पण मग नंतर शांतच राहिले. एखादा मुळातच हौशी ग्रूप असेल तर ते त्यांचे क्रेडीट, मात्र चित्रपट बघताना आपण कुठे उत्स्फुर्तपणे एखादी आरोळी ठोकावी असे मला तरी वाटले नाही. कुठे अंगावर शहारा आला वा डोळे पाणावलेत असेही विशेष झाले नाही.

७) थ्रीडीने मात्र मजा आणली. दोनचार तीरकमान भाले वगैरे घुसले अगदी माझ्या छातीत. एकावेळी तर मी ईतके बेसावध असताना हे झाले की मी प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून डोळ्यावरचा गॉगलच काढून ऊलटा फेकून मारणार होतो. त्यामुळे हा चित्रपट बघावा तर थ्रीडीमध्येच. अन्यथा बघूच नका, पुर्ण पैसे वाचवा. मोबाईलवर बघणार असाल तर त्यातही मजा नाही. वेळही वाचवा. फार काही विशेष ईतिहासातही भर पाडणारा नाहीये. त्यापेक्षा चार पैसे खर्चून चित्रपटगृहातच एक थ्रीडी साहसपट म्हणूनच त्याचा लुफ्त घ्या.

८) गाणी सुपर ड्युपर हिट नसतील पण त्या त्या वेळेस स्फुरण चढवणारी आणि चित्रपटाचा मूड कायम ठेवणारी आहेत. व्यावसायिक चित्रपटाची डिमांड पुर्ण करायला तानाजीला नाचवलेय पण मुळातच अजय देवगणला नाचता येत नसल्याने तानाजी फार काही कॅरेक्टरच्या बाहेर जाऊन नाचलाय असे झाले नाही. शंकरा रे शंकरा गाण्यात तर कोरेओग्राफीही मजेशीर होती. तानाजी मिशीला पीळ देत सलमानला शोभावी अशी स्टेप मारतो आणि सैफ अली खान त्याला आनंदाने कॉपी करतो. पण सगळ्यात भारी होते ते पार्श्वसंगीत. चित्रपटाला तेच तारून नेते. चित्रपट संपल्यावरही जर काही डोक्यात घोळत राहते, म्हणजे अगदी आता हे परीक्षण, ऊप्स निरीक्षण लिहितानाही माझ्या डोक्यात वाजत आहे, तर ते.. राराराss राराह रार राss राह रारा रा रा राहss...

९) शिवाजी महाराज - शरद केळकर. छान छोटी भुमिका. संयत अभिनय. शोभून दिसला. आणि हे फार महत्वाचे होते. कारण महाराजांची आपल्या मनात जी प्रतिमा असते तिला पुर्ण न्याय आदर मानसन्मान मिळणे फार गरजेचे वाटते मला. आणि दुसरे म्हणजे महाराजच दमदारपणे उभे करणे जमले नसते तर तानाजीचीही शोभा गेली असती.

१०) दस बात की एक बात. चित्रपट तांत्रिक अंगाने उत्तम आहे. चित्रपटांचे चाहते असल्यास जरूर बघा. पैसा वसूल वाटेल. पण आज मी काही भारी बघितले ही फिलिंग मला तरी आली नाही. तसेच मला यात रिपीट वॅल्यु देखील दिसत नाहीये. सामान्य जनतेमध्ये मात्र या चित्रपटाला घेऊन उत्सुकता आणि क्रेझ दिसून येते. याचे एकमेव कारण म्हणजे आपल्या मातीतल्या वीराची कहाणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची, त्यांच्या एका मावळ्याची कहाणी आहे. पडद्यावर जेव्हा महाराज येतात तेव्हा लोकं त्या दृश्याला कॅमेरयात कैद करून व्हॉटसपला स्टेटस ठेवत आहेत. यामागे निव्वळ फॅड नसावे, तर ते कुठूनतरी आतूनच येते. तो मोह मलाही आवरला नाही Happy

-------------------------------------------------

अवांतर निरीक्षणे

अ) पॉपकॉर्न खूपच महाग झालेत. न घ्यावेत तर बायको नाराज, घ्यावेत तर खिसा साधू महाराज.

ब) काही लोकांना थ्रीडी चित्रपट बघून झाल्यावर त्या चष्म्याचा मोह का सुटत नाही? घरी नेऊन तो काय डोरेमॉन बघायला वापरणार आहात? काय फायदा मग एखाद्या वीर पुरुषाचा चित्रपट बघून जर तुम्हाला पुढच्याच मिनिटाला क्षुल्लक स्वार्थ सोडता येत नसेल...

क) पिक्चर थ्रीडी आहे, स्पेशल ईफेक्टचा मारा आणि दमदार अ‍ॅक्शन आहे, एकंदरीत दणादण साऊंड असणार आहे.. याची कल्पना असतानाही लोकं तान्ह्या बाळांना का रडवायला पिक्चरला घेऊन येतात?

ड) लोकं शनिवारी सकाळच्या शो ला सुद्धा मोबाईल का सायलेंट ठेऊ शकत नाही? त्यांना श्री नरेंद्र मोदींचा कॉल येणे अपेक्षित असते का?

असो,

मी चित्रपट खरेच पाहिला आहे का? ईथपासून.....
चित्रपटाला खरेच मीच गेलेलो का? ईथपर्यंत.....
या अश्या शंका काही लोकांना वारंवार पडतात. तर फक्त त्यांच्यासाठी म्हणून एक आवर्जून फोटो काढला आहे तो खाली डकवतो, ईतरांनी न पाहता स्क्रॉल केले तरी हरकत नाही Happy
धन्यवाद,
ऋन्मेष

IMG_20200118_193832.jpg(तान्हाजी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला तेव्हापासूनच या फोटोसाठी खास दाढी वाढवायला घेतलेली)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा वरचा फोटो बघून तानाजी म्हणून देवदत्त नागेच शोभला असता असं वाटतेय. आजे देवगण किरकोळ वाटतोय.
चुलत्या हे काय नाव आहे? त्या माणसाने काम चांगलं केलंय जेवढं दिलंय.
पिक्चर बघून स्फुरण वगैरे चढले नाही. घमंड कर गाणं खूप आवडलं, जोशपूर्ण आहे एकदम. काजोल बाईंनी बळंच फुटेज खाल्लंय घरचा मुव्ही म्हणून. भ्राम्हण असा उच्चार? प्रचंड खटकला. ओव्हरॉल ठीक .

आपण मराठी माणसं सतत इतिहासात रमतो. शिवराय , बाजीराव यांच्याशी नाते सांगायला पुढे असतो पण जाणीवपूर्वक सुर्याजी पिसाळ, खंडू खोपडे, अण्णाजी दत्तो यांच्याशी संबंध नाकारतो. आपापल्या जातीचं कौतुक करताना आपल्या जातीत कितीतरी बलात्कारी, भ्रष्ट, हलकट लोक आहेत याकडे कानाडोळा करतो. फेकून द्या जातीची झापडं.

जातीचा ऐतिहासिक अभिमान मुळात का म्हणून बाळगावा? वृथा अभिमानच म्हणावा लागेल. त्या त्या स्टोरीकडे अभिमान म्हणून न बघता एक प्रेरणादायी सत्यकथा म्हणून पूर्ण तटस्थपणे बघता यायला हवं.
आणि आपल्या इतिहासातून दुसर्‍यांना डिवचलं जात आहे का- 'तुमच्याकडे नाही का असं कोणी?' अशी चढाओढ तर लागत नाहीये ना- याचा सहानुभूतीपूर्णच विचार व्हायला हवा. 'आपल्या' इतिहासातून एक प्रकारचा सेन्स ऑफ बिलाँगिंग, सेन्स ऑफ प्राईड मिळतो हे खरंय. पण त्याचं प्रदर्शन करुन इतरांना चिथवू नये. (किंवा मग ते तुमच्या हिस्ट्रीची बॉक्स ऑफिस गणितं मांडू लागले तर त्यांना सिम्पथी दाखवावी, भांडू नये.)

रश्मीचे प्रतिसाद आवडले. खुप जणांना बाजीराव, तानाजी, पेशवे माहिती नव्हते त्यांना त्यांच्या पराक्रमाची माहिती झाली.

नवीन प्रतिसाद वाचले. आपल्याकडे अशी समजूत उगाचच आहे की महाराष्ट्राबाहेर प्रत्येक जण ठरवून फक्त महाराष्ट्राची उपेक्षा करतो. तानाजी, बाजीराव, शिवाजी महाराज वगैरे लोक सर्वांना माहिती व्हावेत याबद्दल जितका कळवळा आपल्याला आहे, तितका बाप्पा रावळ, गुरू गोविंदसिंह, रणजितसिंह, राणी चेन्नम्मा, बिरसा मुंडा इत्यादी लोक माहिती व्हावेत म्हणून आहे का? नसेल तर आपण सर्वच भारतीय एकमेकांच्या प्रांतात होऊन गेलेल्या थोर व्यक्तींबाबत सारखेच अनभिज्ञ आहोत. इतरांना तानाजी माहीत नाही म्हणून टिपं गाळण्यात काहीही अर्थ नाही. आपल्याला तानाजी माहीत असून आपण (मी सुद्धा) आयुष्यात काय दिवे लावले? स्वार्थापलिकडे देशाचा विचार आपण करू शकत नाही. मग काय उपयोग या सर्व व्यक्तींचा वृथा अभिमान बाळगून?

राणी चेन्नम्मा यांच्या नावाने कोल्हापुर ते बेंगलोर अशी एक मेल एक्स्प्रेस आहे. फार वर्षांपुर्वी मी दोनतीनदा त्या एक्स्प्रेसने प्रवास केला. एकदा प्रवास करत असताना सहप्रवाशाला राणी चेन्नम्मा यांच्याबद्दल विचारलं तेव्हा त्या कित्तुर प्रांताच्या राणी होत्या आणि त्यांनी इंग्रजांशी कडवी लढत दिली अशी माहिती मिळाली. नंतर गुगल वर वाचले तेव्हा त्यांच्या बद्दल सर्व इतिहास कळाला. हे सर्व त्या राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसमुळे कळालं. खरेतर रेल्वे खात्याने प्रत्येक राज्यातल्या शुर वीरांगणांची नावे त्या-त्या भागातल्या एक्स्प्रेस गाड्यांना द्यायला हवीत जेणेकरुन त्या शुर स्त्रीया कायम स्मरणात रहातील. शूर स्त्रीयांची नावे अशासाठी की त्यांच्यामुळे आपल्या इतिहासाला झळाली मिळाली. नाहीतर आयत्या मिळालेल्या राजवटीचा, संपत्तीचा गर्व करुन त्यायोगे कपडेलत्ते, दागदागिने यांचा यथेच्छ उपभोग घेणार्‍या आणि त्याचे प्रदर्शन मांडणार्‍या, आचार्‍यांकरवी तुपातला स्वयंपाक करुन चारीठाव सहस्र भोजनावळी घालणार्‍या, सवतींसोबत नाचगाणी करणार्‍या आणि हे कमी की काय म्हणुन कपट-कारस्थाने रचुन इतिहासात अजरामर होणार्‍या बायांची नावे द्या म्हणुन ऊर बडवत पुढे येणार्‍यांची संख्या काही कमी नाही यात शंका नाही.

***
ज्यानीं हा धागा वळवला त्यांना सांगितले तर बरे... रामदासी,रंगेल,वरण भात तुप असा उल्लेख का झाला? मला कोणताही धागा काढायची गरज नाही.. ज्यांना असेल त्यांनी करावा

Submitted by Minal Hariharan on 23 January, 2020 - 08:49>> रामदासी,रंगेल,वरण भात तुप असा उल्लेख का झाला? असा भाबडा प्रश्न विचारुन आपण त्या गावचेच नाही असं दाखवुन काय मिळालं..? रामाचे दास ते रामदासी म्हटलं, खिलजीला रंगेल म्हटलं, आणि वरण्+भात्+तुप अशा कमी दर्जाची प्रथिने असणार्‍या आहारामुळे काटकपणा ऐवजी मांदं चढलेलं असणं अशा अर्थाने लिहिलेल्या वाक्याला तुम्ही तुमच्या वैचारीक मुशीतुन ताऊन-सुलाखुन वड्याचे तेल वांग्यावर काढुन मोकळ्या झालात की हो हरीहरण बाईसाहेब..!! Uhoh

कुठला विषय कुठे नेऊन ठेवलात.. कमाल आहे बुवा..!

छत्रपती शिवाजी राजे आणी छत्रपती संभाजी राजे नसते तर आज महाराष्ट्रात आपले पूर्वज मुघलच बनले असते.

हं

माझा मित्र दिल्लीत रहातो, तो हिंदूच आहे अजून

पण फारशी प्रसिद्ध नसावी बहुतेक. फार कमी उल्लेख आढळतात>>हो फार प्रसिद्ध नसावी तिला देवी .
धन्यवाद अतुलजी.
तुमचे लेख नेहमीच वाचत असते.

हा वरचा फोटो बघून तानाजी म्हणून देवदत्त नागेच शोभला असता असं वाटतेय. आजे देवगण किरकोळ वाटतोय.>>एक्साक्टली.. मी हेच म्हणाले होते 3-4 पेज वर.
कुणिच माझं ऐकलं नाही.
सगळे उगाच काहीही प्रतिसाद देत राहिले.
म्हंटल ठीकय तुमचाच खरं....

प्रत्यक्षातला तानाजी धिप्पाड होता की नाही, हे माहीत नाही. तो त्याच्या कामामुळे अजरामर झाला की दिसण्याने? समजा तो किरकोळ शरीरयष्टीचा असता आणि तसेच दाखवले असते तर त्याचे शौर्य फिके पडले असते का?

दोन : या चित्रपटाने चांगला गल्ला कमवला याबद्दल "आपण" अभिमान बाळगण्यासारखं काय आहे? चित्रपट मनोरंजक आहे , म्हणून त्याने गल्ला कमवला.

तीन - शिकलेल्या इतिहासात तानाजी उदयभानशी लढताना धारातीर्थी पडला. चित्रपटात तोच किल्ला जिंकून घेतो. (बाजीप्रभूंना तानाजीवर सुपर इंपोज केलेले दिसते) उदयभानला तोफेला बांधून दरीत ढकलतो असे दाखवले आहे.
तानाजी उदयभानशी लढताना धारातीर्थी पडला असे दाखव ले असते तर तो हिरी म्हणून अपयशी ठरला असता का?

चार - उदयभानचे दैत्यीकरण केले नसते तर तान्हाजी हिरो ठरला नसता का?

निर्माता, दिग्दर्शक, अभिनेत्याचे हे आडाखे आहेत आणि ते बहुतांशी प्रेक्षकांना काय रुचेल याचा विचार करून बांधले आहेत. असं मानावं का?
अन्यथा इतिहास बदलायचं कारण दिसत नाही.

या धाग्यावर तानाजीची तुलना पानिपतशी केली गेली आहे. पानिपत चित्रपटात मराठ्यांचा विजय झाला असे दाखवले असते तर तो चित्रपट हिट झा ला असता का? लोकांना आवडला असता का?

निर्माता, दिग्दर्शक, अभिनेत्याचे हे आडाखे आहेत आणि ते बहुतांशी प्रेक्षकांना काय रुचेल याचा विचार करून बांधले आहेत. असं मानावं का? >> असंच वाटतंय. प्रेक्षकांमध्ये खरा इतिहास (शाळेत शिकलेला) माहीत असणारे, आठवणीत असणारे किती असणार? त्यापेक्षा अशी ष्टोरी रचून जास्त गल्ला भरता येईल असाही विचार असावा.

2 पाने मागच्या नाच पोस्ट मध्ये अडिशन-
शिवाजी महाराज आणि युवा संभाजी गोंधळ घालताना पोत नाचवतात, असा प्रसंग वाचलेला आठवतो , बहुतेक छावा कादंबरी.
ते सुत धरून डायरेक्टर ला नाचाचा स्वर्ग गाठता आला असता, आणि मग चित्रपट स्वर्गवासी Happy

शिवाजी महाराज आणि युवा संभाजी गोंधळ घालताना पोत नाचवतात, असा प्रसंग वाचलेला आठवतो , बहुतेक छावा कादंबरी.>>हो ते मलाही आठवलेलं. पण उगाच गोंधळ होईल म्हणून मी लिहिलं नाही,.
शिवाजी महाराज आणि संभाजी दोघेही अष्टमीला जोगवा मागायचे आणि पोत नाचवायचे. संबंध रात्रभर गोंधळ घातला जायचा.
संदर्भ : छावा कादंबरी
ते सुत धरून डायरेक्टर ला नाचाचा स्वर्ग गाठता आला असता, आणि मग चित्रपट स्वर्गवासी Lol

हा पक्का ब्रिगेडी आहे, ब्राह्मणद्वेष असा उसळून येतोय बाहेर
देव त्याचं भलं करो

हा पक्का ब्रिगेडी आहे, ब्राह्मणद्वेष असा उसळून येतोय बाहेर
देव त्याचं भलं करो

Submitted by आशुचँप on 24 January, 2020 - 03:54>> कोण बरं.. नाव कळेल का..?

ब्रिगेड-ब्राम्हण जरा जातीय अस्मिता बाजूला ठेवून पाहिलं तर- 'काही' ब्राम्हण पेशव्यांचं जरा जास्तच कौतुक करतात. पेशवे म्हणजे ग्रेटच, काय ते अटकेपार झेंडे, शनिवारवाड्यात वाटीभर तुपासोबत रोज पुरणपोळी आणि शिक्रण, पूर्ण साम्राज्य जणू काही पेशव्यांच्या मुठीत इत्यादी.
आता हे अतिशयोक्तीपूर्ण दावे समोरुन लोक किती वेळ गप ऐकून घेतील? मग लोकांनी मुद्दे काढले- पानिपतची चुकलेली गणितं, बाजीरावाचं मस्तानी व मद्यपान यामुळे पेशवाईच्या कर्तव्यात झालेलं दुर्लक्ष, शनिवारवाड्यावर फडकलेला युनियन जॅक - वगैरे- तर लगेच म्हणायचं की लोक ब्राम्हणद्वेष करतात. आय मिन कम ऑन!
त्यापेक्षा ब्राम्हण समाजानेच जरा पेशवाईचं ऑब्जेक्टिव्हली अ‍ॅनालिसिस करा की. पेशवे कर्तबगार होतेच पण आदर्श नव्हते. अटकेपार झेंडे लावायला ब्रम्हवृंद एकटा गेला नव्हता. समस्त मराठे बलुतेदार यांनी तो विजय मिळवला होता. स्वराज्याचा चारी बाजूंनी विस्तार करुन बलाढ्य साम्राज्य निर्माण करण्याचं श्रेय शाहूछत्रपतींचं होतं. बाजीरावाला सुद्धा शाहू सांगत त्याप्रमाणे काम करायला लागत असे. शाहूमहाराज असेतोवर पानिपत किंवा इतर कुठलंही नुकसान साम्राज्याचं झालं नव्हतं. पेशव्यांनी शक्य असूनही समाजात स्त्रिया व शूद्र यांची स्थिती सुधारण्यासाठी कुठे काय प्रयत्न केलेले दिसले नाहीत. (थोरले माधवराव हा एक अपवाद!).

सो आपण उगाच बढाया न मारता बॅलन्स्ड दृष्टीने पाहायला हवं.

ज्याला कळायला हवंय त्याला कळेल
इतपत पुरेसे स्पष्ट लिहिलं आहे

नवीन Submitted by आशुचँप on 24 January, 2020 - 04:24>> त्याला कळेल न कळेल हा भाग निराळा पण सर्वांनाच ते कळालं तर बरंच नाही का..?

सनव तुमचाच बॅलन्स ढळलाय जरा Proud
इथे तान्हाजी बाफावर जातीची चर्चा का मुळात? इथे पानिपताचा आणि पेशव्यांचा संबंध काय? एखाद्याच्या पराक्रमाची महती ठरवण्यासाठी जात का लक्षात घ्यायची? जातीचा मुद्दा बाजूला ठेवा असे सो कॉल्ड बॅलन्स्ड वाटणारे विधान करून "ब्राह्मण च पेशव्यांचे कौतुक करतात" हे विधान कशाच्या जोरावर? पेशव्यांच्या अटकेपार झेंडे लावण्यात त्यांच्या सैन्यातल्या इतर जातीच्या लोकांचा हात होता ही मखलाशी असेल तर मग शिवाजीराजांच्या सैन्यात आणि कारभारात इतर जाती सामील नव्हत्या असे काही होते का? की तिथे क्रेडिट महाराजांचे आणि बाजीरावाच्या आणि रघुनाथरावा च्या पराक्रमाचे क्रेडिट त्यांच्या सैन्यातल्या सर्व जातींचे? याला तुम्ही बॅलन्स्ड विधानं म्हणता ? ज्याच्या त्याच्या पराक्रमाचे क्रेडीट अथवा नाकर्तेपणाचा दोष त्या त्या व्यक्तीला द्या की. त्या व्यक्तीच्या पिढ्यांनपिढ्याना किंवा संपूर्ण जातीला का?
माबोवर ठराविक आयडींचे जातीय अजेन्डे कधीही लपलेले नाहीयेत. जातीनुसार सरसकटीकरण बघून फ्रस्ट्रेट व्हायला होते पण बहुतेकदा काही लिहायचे टाळलेच जाते. आत्ता या बाफावर ही चर्चा अगदीच रिडिक्युलसली अस्थानी वाटून का कुणास ठाऊक लिहिले. अजून विचारच करतेय की लिहायची गरज काय होती. Happy

नाहीतर आयत्या मिळालेल्या राजवटीचा, संपत्तीचा गर्व करुन त्यायोगे कपडेलत्ते, दागदागिने यांचा यथेच्छ उपभोग घेणार्‍या आणि त्याचे प्रदर्शन मांडणार्‍या, आचार्‍यांकरवी तुपातला स्वयंपाक करुन चारीठाव सहस्र भोजनावळी घालणार्‍या, सवतींसोबत नाचगाणी करणार्‍या >>>>>>>. ' बाजीराव मस्तानी' चित्रपटात मस्तानी आणि काशीला नाचताना दाखवलय ते खर घडलेल नाहीये. तसच काशीबाईन्ची चूक नसताना त्यान्च्यावर बाजीरावान्नी अन्याय केलाय. ती कर्तव्यपरायण पत्नी होती. मस्तानीचा पण काही दोष नाही. त्या काळात काय घडलय हे आपल्याला माहीत नाही त्यामुळे उगाच कुणाला नाहक नावे ठेवू नये.

वरण्+भात्+तुप अशा कमी दर्जाची प्रथिने असणार्‍या आहारामुळे >>>>>> वरण- भात तुप हे आरोग्याला घातक आहे? पहिल्यान्दा वाचतेय हे मी.

मागे आमदार राजू शेट्टी यांनी ( की दुसरे कोण ते लक्षात नाही ) म्हणले होते की सैन्यात ब्राह्मण नसतात. ते विधान त्या बाफावर मी खोडले होते. थोडा वाद पण झाला होता. वस्तुस्थिती ही आहे की सर्व क्षेत्रात ब्राह्मण आहेत, आणी ते शारीरीक कष्टाने जरी नसले तरी शिक्षणाने पुढे असतात. महाराष्ट्रात महाराजांच्या आधीपासुन शेती वा इतर कष्टकरी क्षेत्रात ब्राह्मणांव्यतीरीक्त लोक पुढे होते. ब्राह्मण ज्ञानदानात होते.

पूर्वी केलेल्या चूका ब्राह्मण समाजाने कधीच मागे टाकल्यात. शिक्षणातले महात्मा ज्योतिराव फुले आणी सावित्रीबाई फुले यांचे महान कार्य कधीच कोणी विसरणार नाही, पण त्यांना शाळेसाठी ज्यांनी आपली जागा दिली ते ब्राह्मणच होते, भिडे आडनाव त्यांचे . स्त्री शिक्षण व समाजकार्यात दुसरे अग्रेसर नाव म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे व आगरकर.

पण आताचा समाज व राजकारणी नेते एवढे ब्राह्मण द्वेष्टे आहेत की ते कधीही या वर उल्लेखलेल्या लोकांचा मान राखत नाहीत किंवा त्यांचे योगदानही मानत नाहीत.

कुणीतरी विचारले की या धाग्यावर हा वाद का पेटला तर इथे बघा.

https://www.maayboli.com/node/73073?page=2

<<<<<<< हो ना.. मावळे काटकच असणार. लेचेपेचे असायला ते थोडीच वरण(गोडं)+भात+तुप+लिंबु खात असतील..?

Submitted by DJ.. on 21 January, 2020 - 19:15>>>>>> म्हणून मी डिजेंना म्हणले की ब्रिगेडी विचारातुन बाहेर या.

तुमच्या भाच्यांसमोर आता आहे तो सुपरमॅन तानाजी, दे दणादण उड्या मारून, अचाट शक्तीचे प्रयोग करुन, सगळ्या खलनायकांचा एकहाती बिमोड करणारा

त्यांना जेव्हा पुस्तक द्याल वाचायला तेव्हा खरा तानाजी असा नव्हता, तो शूरवीर होता, त्याने पराक्रमाने सिंहगड जिंकून दिला हे खरे असले तरी आधीच्या चित्रपटीय मालमसाल्यामुळे तो नीरस वाटण्याची शक्यता आहे.

असे चित्रपट बघून कोणालाही इतिहासाची गोडी निर्माण होत नसते, तसे वाटत असल्यास फार मोठा गैरसमज आहे.

Submitted by आशुचँप on 23 January, 2020 - 15:11

>>>>>>

सहमत आहे.
तानाजी, शक्तीमान, बाहुबली... हे सर्व एकाच पंक्तीतले वाटणार बालप्रेक्षकांना.
आपल्या मातीतल्या वीरांना कुठल्याही परीस्थितीत प्रसिद्ध करायचे आहे असा हेतू ठेवायचा का?

वरण्+भात्+तुप अशा कमी दर्जाची प्रथिने असणार्‍या आहारामुळे >>>>>> वरण- भात तुप हे आरोग्याला घातक आहे? पहिल्यान्दा वाचतेय हे मी.

नवीन Submitted by सूलू_८२ on 24 January, 2020 - 07:53 >> आरोग्याला घातक? असं कुठे लिहिलंय का मी?? मनाचे श्लोक काय सांगता ताई??

<<<<<< हो ना.. मावळे काटकच असणार. लेचेपेचे असायला ते थोडीच वरण(गोडं)+भात+तुप+लिंबु खात असतील..?

Submitted by DJ.. on 21 January, 2020 - 19:15>>>>>> म्हणून मी डिजेंना म्हणले की ब्रिगेडी विचारातुन बाहेर या.

Submitted by रश्मी.. on 24 January, 2020 - 08:37>> बघा रश्मी.. वैणी, कशा प्रकारे माझ्या वाक्याचा ध चा मा करून टाकलाय. मला सांगा, वरण(गोडं)+भात+तूप+लिंबू हा काय जी.आय. मानांकन असलेला आहार आहे का? Proud

अहो तुम्ही अन् त्या सुलू_८२ ताई दोघीही माबोच्या जुन्या जाणत्या आणि समजूतदार आयडीज. माझ्यासारखे कितीतरी जण तुम्हा दोघिंशी वेळोवेळी सल्लामसलत करत असतात. तरीही तुम्ही दोघीही "मिलन हरिहरण" आणि "अस्मानी" या दोन भगिनी निवेदितांच्या जाळ्यात अलगद अडकलेत आणि मला टार्गेट करून मी न बोललेल्या/लिहिलेल्या गोष्टींसाठी जबाबदार धरलेत. Uhoh

Submitted by maitreyee on 24 January, 2020 - 18:05>>>
चांगली पोस्ट.

आत्ताच पाहून आलो. चित्रपट अप्रतिम आहे यात वादच नाही. 3D मध्येच पहायला हवा. Based on True story हे अगदी परफेक्ट. सिनेमॅटीक लिबर्टी घेतली आहे अनेक ठिकाणी. माझी काही निरीक्षणे:

१. दृश्ये भव्य दिव्य प्रभावी वगैरे आहेत खरी. पण अनेकदा आपण कॉम्पुटर गेम बघत आहोत असे वाटते.

२. सर्वात भाव खाऊन गेलाय तो सैफ अली खान. अजय देवगन पेक्षाही सैफ खूपच प्रभावी झालाय (हेमावैम). प्रत्यक्षात उदयभान कसा होता याचा कधी फारसा विचार केला नव्हता. पण सैफने पडद्यावर तो खूप प्रभावीपणे साकारलाय.

३. शेवट रुचला नाही. फारच नाटकी वाटला. इतकी मोठी ऐतिहासिक योद्ध्याची व्यक्तिरेखा "बेस्ड" म्हणून वापरली आहे आणि शेवटी मात्र शोले मध्ये बच्चन उर्फ जय मरतो त्याहूनही तद्दन फिल्मी वाटावे असे काहीसे दाखवले आहे. हि सिनेमॅटीक लिबर्टी मात्र अजिबात रुचली नाही.

४. प्रत्यक्ष इतिहासात उल्लेख केलेला शेवटचा शेलारमामाचा प्रसंग चित्रपटात पूर्णपणे वगळला आहे ते सुद्धा खटकले.

हे सगळे असले तरी एकुणात खूप मस्त चित्रपट आहे. दहा बारा वर्षांपूर्वी सिनेमा निर्मितीचे वेड डोक्यात घेतले होते. तेंव्हा तानाजी मालुसरे यांची इतकी मोठी पराक्रमाची गाथा आहे, पण त्यांच्यावर अजून एकही चित्रपट का निघाला नसेल? असे खूप तीव्रतेने वाटले होते. नाही म्हणायला "सिंहगड" म्हणून एक कृष्ण-धवल चित्रपट पूर्वी निघाला होता. पण तो फार म्हणजे फारच जुना आहे. (बहुतेक व्ही. शांतारामानी बनवला होता). त्यामुळे त्या विषयावर चित्रपट बनवायचे आम्ही काही मित्रांनी खूप खूप डोक्यात घेतले होते. त्याची चाचपणी करण्यासाठी पुण्यातच ऑडीशनसाठी आलेल्या कॉलेजच्या मुलांशी बोलताना तानाजी मालुसरे कोण होते हे पुण्यातच अनेक मुलांना माहित नाही हे पाहून प्रचंड आश्चर्य आणि वाईट पण वाटले होते. त्या सर्व पार्श्वभूमीवर एक दैदिप्यमान इतिहास घडवणारा योद्धा नवीन पिढीसमोर त्यांना आवडेल अशा स्वरूपात थोडाफार अतिरंजित कॉम्पुटर गेम सारखा का असेना पण आलाय आणि ते सुद्धा राष्ट्रीय पातळीवर हे नक्कीच सुखावणारे आहे.

> नाहीतर आयत्या मिळालेल्या राजवटीचा, संपत्तीचा गर्व करुन त्यायोगे कपडेलत्ते, दागदागिने यांचा यथेच्छ उपभोग घेणार्या आणि त्याचे प्रदर्शन मांडणार्या, आचार्यांकरवी तुपातला स्वयंपाक करुन चारीठाव सहस्र भोजनावळी घालणार्या, > हा खवचटपणा आवडला.
वर्तमानकाळातले म आं जावरचे स्त्रीवाद कोळून पिलेले लोक या असल्यांच्या हक्कासाठीच ऑनलाइन लढा देताना दिसतात Wink

Pages