एकटीच @ North-East India दिवस ५

Submitted by सुप्रिया राज जोशी on 2 January, 2020 - 00:44

अनुक्रमाणिका > https://www.maayboli.com/node/72984

10th फेब्रुवारी 2019

Dear Brother Joyston,

तुला मी मराठीत काय लिहिलयं त्याचं एक अक्षरही कळणार नाही, मग उत्तर लिहायची तर वार्ताच नको, तरीही तुलाच पत्र लिहावसं वाटलं.

काल रुमटेक मॉनेस्ट्री मध्ये एक मोंक भेटला, त्याला पाहून कोणालाही तुझीच आठवण व्हावी. तुला प्रभू येशू कडून नि त्याला गौतम बुद्धांकडून प्रेरणा मिळाली. पण ज्या वयात आयुष्याचे सर्वात घसरडे वळण पार करावे लागते, तेव्हाच तुम्ही दोघांनी उभ्या आयुष्यासाठी कठीण व्रत अवलंबले. माझ्यासाठी चेहरा मायने राखत नव्हताच तसे तुझ्या सफेद नि त्याच्या तांबड्या झग्याआड दडलेल्या तुमच्या मनात उमटणारे, उमलणारे आणि उफळणारे दोघांचे विचार किती एकसारखेच आहेत, हे जाणवले. मला त्यालाही ब्रदर म्हणावेसे वाटले. तशी हाक ऐकून त्याला आनंद झाला. Morality (नैतिकता), prayers (साधना) आणि wisdom (प्रज्ञा) यावर तो खूप काही बोलला. इतके कठीण व्रत पार पडतानाही त्याचा उत्साह आणि आनंद ओसंडत होता. या वयात हा काय काय भारी बोलतो ते मी भारावून ऎकत राहिले. मनन चिंतन (reflect) करत राहिले.

माझ्या पेक्षा तुम्ही आयुष्याबद्दल जास्त वाचले आहे. पण मी आयुष्य जास्त अनुभवले आहे. त्याला जे सांगावेसे वाटले तेच तुला लिहायला घेतले. तुमच्यासारखे आयुष्यभर निष्ठेने धार्मिक वाटेवरून चालायचे हे सोपे नाही. कधीतरी ज्या निश्चयाने चालायला सुरुवात केली तोच डळमळल्या सारखा वाटू शकतो मग पुढच्या वाटचालीसाठी पावलांना दिशा कशी मिळणार? पण धुक्याने भरून गेलेल्या वाटेवरचे पुढचे वळण डोळ्याला दिसत नाही अशा परिस्थितीतही पुढचे एक पाउल टाकावेच. चालत रहावे. प्रवास कुठलाही असेना, तो कधी संपेल याची जो वाट पाहतो त्याची वाटेवरचा आनंद लुटायची क्षमता संपलेली असते.

कोणी तुझ्यासारखा धर्माची कास धरून एकमार्गाने चालतो, कोणी माझ्यासारखा आयुष्यभर नवनवीन वाटा शोधतो पण आपापली वाट मात्र प्रत्येकाला एकट्यानेच चालायची असते. आणि आपली वाट आपण कितीही विचारपूर्वक निवडली आहे असे वाटले तरी दुसऱ्याच क्षणी आपल्या वाट्याला काय येणार याचा काही भरवसा नसतो. आयुष्य असे आहे.

आपली वाटचाल सुखकर असावी असे कोणाला वाटणार नाही? पण दुरुन डोळ्याला सुंदर दिसणाऱ्या दुसऱ्या तिसऱ्या वाटेची स्वप्न पहात राहिलो तर आयुष्याची कुठचीच वाट सुखकर वाटणार नाही. पूवी मला स्वप्नांचा नाद होता आता सत्याची ओढ वाटते. उगीच पुढे पाठी बघत चालू नये, पायाखाली बघून चालावे, वळणावळणा वर थांबावे, घेता येईल ते घ्यावे, देत येईल ते द्यावे. काटे सगळ्याच वाटांवर आहेत, पायच इतके कठोर करावे की ते घुसले तरी बोचणार नाहीत, बोचले तरी अनुभव म्हणावा, काटा काढून द्यावा, पुढचे पाऊल टाकावे.

हसत रहावे, पण रडायची लाज वाटू देऊ नये. मन नदीसारखे आहे, त्यातले अनुभव, भाव भावना पकडून अडकवून ठेवल्या तर कुजून जातील. प्रवाहात राहील्या तर गाळ किनारी लागेल नि मन नेहेमी नितळ राहील. वाहत्या नदीच्या सानिध्यात येणारे खडबडीत दगडही गुळगुळीत गोटे बनतात.

काहीबाही असले तरी हे सारे तुला सांगावेसे वाटले. रात्रीच पत्र लिहिणार होते पण होस्टेलमध्ये बांगलादेशचा एक तरुण आला आहे. काल रात्री पोहोचला तेव्हा गेस्ट हाऊस चे दार सताड उघडे नि मालक गायब होता. मग त्याला गाईड करता करता उशीर झाला. इकडे असं आहे की, जो couch आवडला तो occupied नसेल तर सरळ पाठीवरची सॅक उतरवायची नि खुशाल बस्तान ठोकायचे. रजिस्ट्रेशन वगैरे काही प्रकारचं नाही.
डेल्टाने माझ्या बाजूचाच couch घेतलायं. त्यानेही मला बहीण बनवल. मी मराठी आहे हे कळल्यापासून कधी थट्टेने 'मराठी मुलगी' अशी मला हाक मारतो. एरव्ही ताई नाहीतर आक्का म्हणतो.

रात्रीच्या शांत झोपेनंतर सकाळी जाग आल्याआल्या मी पळत खिडकीजवळ गेले. आजही सूर्याने दर्शन दिले नसले तर आजही नथुलापासचं परमिट मिळणार नाही. पण बाहेर कोवळे पिवळे ऊन पडले होते. ते बघून दिल खुश हो गया। पुढच्या फक्त पाच मिनिटांत तयार होऊन मी निघाले.
पण परमिट ऑफिसने सांगितले 'no permit today', बॉर्डर वरची परिस्थिती वाईट आहे. चांगु लेक तर फ्रोझन आहेच पण रस्तेही बर्फाने ब्लॉक केलेत. वर वर सारी धडपड नथुला पास ला जायची असली तरी माझे कान हेच शब्द ऐकायला आतुरले असणार. नाहीतर ते ऐकून मला हायसे वाटले नसते. त्या वेळी माझ्या मनात जो विचार आला की अशा सोनेरी दिवशी त्रिवेणी कसलं सुंदर असेल, त्या एका अस्फुट विचारानेही माझ्या त्या दिवसाच्या वाटचालीला दिशा मिळाली.

सिक्कीम वरून खाली वहाणारी रंगीत Rangeet आणि पलिकडून दार्जिलिंगहून आलेली तिस्ता Teesta या दोघी जिथे भेटतात त्याला त्रिवेणी म्हणून ओळखतात. कांचनगंगेच्या पायाशी जन्म घेतलेली रंगीत झुळूझुळू वहात येते नि प्रबळ तिस्ता च्या प्रवहात मिसळून जाते. दमून भागून आलेलं बाळ दुडूदुडू धावत येउन आईच्या कुशीत उडी मारत नि तिथेच झोपी जात. तसं ते दृश्य दिसतं.
72633571_1020878854912761_7261901891756996688_n.jpg

संगमाच्या काठाशी एकापेक्षा एक सुंदर पॅटर्नचे दगड गोटे नक्षी करून वसले आहेत. तिथेच रेतीचे एक मैदान (delta formation) तयार झाले आहे. दोनच वर्षांपूर्वी याच मैदानावर टेंट टाकून मी, राज, मालविका राहिलो होतो. मनु MIT ला जायच्या आधी आमच्या बरोबर घालवलेली ती शेवटची रात्र. नदीकाठी आम्ही दोघीनी आपापली सिक्रेटस शेअर केली होती. ती रात्र कशी विसरणार? पण त्रिवेणीचा आम नजाराही निव्वळ अविस्मरणीय आहे.

आज दिवस मिळाला तशी खटपट करून तिथे नदीकाठी कोणी टेंट देईल का याची चौकशी सुरू केली. थोडी फोनाफोनी केल्यावर एक बंदा सापडला. 'हे कसं माझ्यासाठी सारंच जुळून येतं?' असं कोणी कधी मला विचारतं, ते मला नाही सांगता येणार. पण आजचा हा टेंट वाला बंदा इथेच गँगटोकच्या जवळ कामासाठी आला होता. मला त्याने थेट त्रिवेणी पर्यंत लिफ्ट ऑफर केली.

त्रिवेणी ला पोहोचले. तिस्ता नदीच्या काठावर माझा टेंट तयार होता आणि एक टेबल-खुर्ची टाकली होती. मी इथे बसल्या बसल्या तुला पत्र लिहायला घेतले. सूर्य मावळला तसा त्याने माझ्या टेबलावर एक कंदील आणून ठेवलाय. चांदणं पसरलं तशी शेकोटी पेटली. माझं पत्रलिखाण चालूच आहे. लवकरच पत्र संपवीन व पोस्ट करेन. इथे इंटरनेट नाही, त्यामुळे अडकून बसेल नि पोहोचेल तेव्हा पोहोचेल.
tent.jpg

तो इकडचा केटर टेकर सुद्धा निघून गेला. जाता जाता शेकोटी भडकवत ठेवण्यासाठी तेल दिले तेव्हा विचारले, "आप को अंधेरे में डर तो नहीं लगेगा?"
मी म्हटलं, "मैं बच्चा थोडे ही हू के अंधेरेसे डरू?"
"हा लेकिन आप अकेले होगे"
"डर तब लगना चाहीये जब कोई आसपास हो। जब कोई है ही नहीं तो डर किसका?"
नाही म्हणायला माझी राखण करीत माझ्या टेंट बाहेर रात्रभर एक कुत्रा बसून राहिला.
शांत वातावरणात नदीच्या प्रवाहाचा आवाज ऐकू येत होता, मधेच वाऱ्यामुळे टेंट फडफडायचा नाहीतर बाहेर माझी राखण करीत बसलेला कुत्रा भुंकयचा तेव्हा वाटायचं कुणाच्या पपावलांची आहट तर लागत नाही ना? मग निपचित पडून मी संकटाची चाहूल कानांना टिपता येतेय का ते चाचपडून पहायची. मोठ्या मोठ्या बाता केल्या तरी मन ताब्यात ठेवणे इतके सोपे नाहीये ना?

ब्रदर, मनातली एक गोष्ट सांगू? का कोण जाणे पण मॉनेस्ट्री मला परत एकदा बोलावते आहे. प्रवासाच्या आणि एकंदरीत आयुष्याच्या गणिताची आकडेमोड चुकवायची नाही तर तो हातचा धरून मगच उत्तर काढायचे आहे हे एवढे कळते आहे. म्हणजे उद्या ही नथुला पास ला टांग देउन मॉनेस्ट्री ला जायचे? बघूया काय जमते ते. पण पुढच्या वेळेस मॉनेस्ट्री मध्ये जाईन तुझ्या, माझ्या, सर्वांच्या मनाच्या शक्ती साठी, शांती साठी निवांत प्रार्थना करेन. तुला जरी या पत्रातले काहीही कळले नाही तरी माझी प्रार्थना तरी तुझ्यापर्यंत पोहचेलच ना?

तुझी
(ताई वगैरे तू आयुष्यात कधी म्हटलं नाहीस, आणि मॅडम चिडवलंस ना तर तुझी एकेक सिक्रेटस इकडेच पोस्ट करेन.)
सुप्रिया

वाचकासाठी नोट्स

ब्रदर - मी शेल्टर डॉन बोस्को साठी काम केले तिथे priest होण्यासाठी आलेल्या तरुण मुलांना ब्रदर म्हणातात.
मालविका , MIT - मालविका आमची मोठी लेक जी MIT Boston ला पुढच्या शिक्षणासाठी जाण्याआधी आम्ही इथेच त्रिवेणी ला तिच्याबरोबर एकत्र वेळ घालवला होता.

teeta.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जरा बोर झालं!.

मला असं वाटतं जे धर्माला वाहून घेतात ते काही खूप ग्रेट वगैरे नसतात. आपलं कसं way ऑफ life असतं शाळा, अभ्यास, नोकरी, करियर तसंच त्यांच पण असतं. बहुतांशी मंडळी ही त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी असं धर्माला वाहून घेतात. एकदा असं कुठे जॉईन केलं की ती संस्था धार्मिक अभ्यास शिकवते. पुरेसं शिक्षण आणि preaching चा अनुभव आला की छान बोलता येतं. सगळी सुखं हात जोडून उभी असताना किंवा possibility दिसत असताना आणि physically, mentally काही प्रॉब्लेम कोणी धर्माला वाहून घेईल असं वाटत नाही. म्हणून मला नारद आणि शेतकऱ्याची गोष्ट खूप आवडते.

चिंतन आवडलं.
तुमची भाषा, तिला चढवलेले अलंकार फार सुंदर आहेत.
नद्यांच्या संगमासाठी वापरलेली उपमा किती यथार्थ आहे ते पुढला फोटो पाहून दिसलेच.
'वार्ता नको', हे मराठीत आहे का? मी गुजरातीत ऐकलंय.
'अर्थ'साठी वापरलेला मायेने मराठी आहे का?

तरी माझी प्रार्थना तर तुझ्यापर्यंत पोहीचेलच ना?
कुणाच्या पावलांची आहट तर लागत नाही ना?
सूर्य मावळला तसा त्या माझ्या टेबलावर एक कंदील आणून ठेवलाय.
माझ्यासाठी चेहरा मायने राखत नव्हताच तसे

गोंधळलेला वाचक....

तुमचं साहसी प्रवास वर्णन ऐकून आपण पण निघावं कुठेतरी एकटीनेच अस फार वाटतंय पण तुमच्या इतकी एकटीने रात्री बेरात्री प्रवास करायची आणि एकटीने राहायची हिम्मत होणार नाही कदाचित..खूप धाडसी आणि बिंदास्त आहात तुम्ही..
लिखाण पण खूप इंटरेस्टिंग आहे..पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा..!

पत्रातील काही ओळी quote करुन ठेवण्यालायक आहेत. त्या ओळींसाठी हा लेख माझ्या निवडक 10त!
पु.भा.प्र! Happy

किन्ग ऑफ नेट आणि भरत
खर आहे की शब्द मराठी नाहीत आणि किंग ने सांगितले त्या तर स्पेलिंग मिस्टेक्स Sad
लेखिका म्हणून माझे लीमिटेशन आहे ते.
कधी कधी आजुबाजूचे जे बोलतात ते आपल्या बोलण्यात सवयीने येते. बोली भाषा असते तशीच पत्र लिहिली कारण ती कुठे प्रसिद्ध करावी म्हणून लिहिली नव्हती ना.
आता स्पेलिंग मिस्टेक एडीट करेन. धन्यवाद

खूपच धन्यवाद मन्या ... मी काही लेखिका नाही पण आपण लिहितोय तर कोणी वाचल की आत्मविश्वास वाढतो. Lol

किन्ग ऑफ नेट आणि भरत
खर आहे की शब्द मराठी नाहीत आणि किंग ने सांगितले त्या तर स्पेलिंग मिस्टेक्स Sad
लेखिका म्हणून माझे लीमिटेशन आहे ते.
कधी कधी आजुबाजूचे जे बोलतात ते आपल्या बोलण्यात सवयीने येते. बोली भाषा असते तशीच पत्र लिहिली कारण ती कुठे प्रसिद्ध करावी म्हणून लिहिली नव्हती ना.
आता स्पेलिंग मिस्टेक एडीट करेन. धन्यवाद>>>>>>>>
धन्यवाद!!

<कधी कधी आजुबाजूचे जे बोलतात ते आपल्या बोलण्यात सवयीने येते. बोली भाषा असते तशीच पत्र लिहिली कारण ती कुठे प्रसिद्ध करावी म्हणून लिहिली नव्हती ना.>
बरोबर. पण आता वाटलं तर प्रकाशित करताना एक हात फिरवा.

आय अ‍ॅम सॉरी पण तुम्ही घेतलेल्या अवाजवी व अनावश्यक रिस्कस ( धोके) वाचून, माझा विरस झालाय. I am put off. ज्याअर्थी तुम्ही इथे अनुभव मांडत आहात त्याअर्थी तुमच्यावर काहीही अनावस्था प्रसंग ओढवला नसावा परंतु त्या कल्पनेनेच माझ्या अंगावर काटा येतो आहे.
वाचत राहीन. प्रतिसाद द्यायला जमेलच असे नाही Sad

आय अ‍ॅम सॉरी पण तुम्ही घेतलेल्या अवाजवी व अनावश्यक रिस्कस ( धोके) वाचून, माझा विरस झालाय. I am put off. ज्याअर्थी तुम्ही इथे अनुभव मांडत आहात त्याअर्थी तुमच्यावर काहीही अनावस्था प्रसंग ओढवला नसावा परंतु त्या कल्पनेनेच माझ्या अंगावर काटा येतो आहे.
वाचत राहीन. प्रतिसाद द्यायला जमेलच असे नाही
नवीन Submitted by सामो on 3 January, 2020 - 09:56
>> पहिल्या लेखापासून हेच विचार मनात येत होते. काही प्रतिसाद हार्ष दिले गेले माझ्याकडून.
आता कळलं की लेखिकेने या भागात अगोदर प्रवास करुन भरपूर माहिती जमवलेली असावी.
बॅकपॅकर हे बहुतेक फुकट/ स्वस्त गोष्टींच्या मागे असतात. आवळा देवून कोहळा काढायच्या मागं असतात. लिफ्ट मागणे वगैरे.
महाराष्ट्रातील पोलिस म्हणाले असते आम्ही तूला आमंत्रण दिलं होतं का? दुसरे कामधंदे नाहीत काय? कुठून कुठून येतात.

खूपच धोके पत्करले असेच वाटले.
काळवेळ सांगून येत नाही असे मानणारे आम्ही. तुम्ही म्हणता कितीही काळजी घेतली तरी काही गोष्टी टळत नाहीत, म्हणून धोका पत्करावा का?
मतभिन्नता असू शकते.
पाडगावकरांची जिप्सी कविता आठवली.

पुढील भाग पोस्ट करा प्लीज. निगेटिव्ह कमेंटकडे दुर्लक्ष करा.तुमचा आगळावेगळा प्रवास वाचायला मजा येत आहे!

थोडे एडीट करून टाकावे असा विचार केला होता पण तेवढे करायला रोज नाही वेळ मिळणार हे कळले
जसे आहे तसेच टाकले तरच नेमाने होईल ... उद्या नक्की टाकेन.

त्रयस्थपणे वाचले तर यात खूप धोके दिसतात, सांसरिक सामान्य माणूस हे धोके बघून मागे हटेल. पण असे धोके घेणारे तेव्हाची काळवेळ व लोक पाहून धोके घेतात हा माझा अनुभव आहे. अर्थात अपघात वेळ सांगून घडत नाही हे खरे आहेच. लेखिका आधी त्या भागात मुक्काम ठोकून असल्यामुळे तिथे काय घडू शकते ही कल्पना तिला आहे. आणि तसेही पहाडी लोक प्रचंड विश्वासपात्र आहेत.

हा भाग अतिशय सुंदर झालाय. गुळगुळीत गोटे बनण्यापर्यंतचा आतला प्रवास आणि मग ती संगमावरची रात्र दोन्ही मस्तच.