चिठ्ठी भाग 4

Submitted by चिन्नु on 28 December, 2019 - 21:36

चिठ्ठी भाग 3 -
https://www.maayboli.com/node/72835

मुग्धा ओट्यावर हताश होऊन बसली होती. प्यायचं पाणी आलं होतं नळाला. सर्वांना पाणी मिळावं या उद्देशाने शोभाताईंनी नळाचं connection आतवर करून घेतले नव्हते. इतर वेळी सर्व बोअरचं पाणी वापरत. नळाला पाणी आलं की ते भरून झाल्यावर शोभाताईंना एक दोन हंडे-कळशी भरून देत.
शोभाताई बाहेर गेल्यामुळे मुग्धा पाणी भरायला बाहेर आली. ओट्याच्या पायर्यांजवळच खाली नळ होता. तिने कळशी भरायला ठेवली. पण ती काही भरेचना!
कळशी भरली की भिर्रकन अनुची स्वारी तिथं प्रकट व्हायची आणि 'दिदी तेरा देवर दिवाना' - या गजरात ती पालथी करायची! किती नको म्हटलं तरी अनु कुठे ऐकणार होता?
'आज कुणालाच पाणी मिळत नाही ', मुग्धाच्या मनात आलं.
हताशपणे समोर बघत असतांना कोपर्यातून एक सायकल वळली. तिच्यावर स्वार होऊन नीलांबरी येत होती. तिला पाहताच मुग्धाला हायसं वाटलं. 'आज रविवार ना. नीलुला ग्राउंड वर जायचं असेल एनसीसी प्रॅक्टीस साठी'. असा विचार करत मुग्धाने तिच्याकडे पाहून हात हलवला. नीलुने सायकल स्टॅडला लावली व ती फाटक उघडून आत येऊन उभी राहिली न बोलता. तिला पाहताच कळशी ढकलायला जाणारा अनु थबकून मागं झाला. पटकन आपला अवतार नीट करून तो नीलूसमोर उभा राहिला. आणि त्याने तिला कडक सॅल्यूट केला म्हणण्यापेक्षा करायचा प्रयत्न केला. कारण त्या नादात त्याची बोटं उजव्या डोळ्याच्या कोपर्यात खूपसून घेतली. मुग्धा धावली आणि तिने पटकन त्याचे डोळे व गाल चोळले.
"काय करतोयस अनु तू?", असं म्हणत तिनं अनुला ओट्यावर बसवले.
"पोलीसताई..", चाचरत चाचरत अनु म्हणाला नीलुकडे पहात.
"नल्या, नीले,नीलटले, बरी-कॅडबरी, नील्याव सोडून आता मला पोलीसताई म्हणून हाक मारतोस का रे शहाण्या! ", नीलु अनुच्या जवळ येत म्हणाली. "काय दंगा करतोयस इथं? ताईला त्रास देतोयस होय?".
"नाही नाही. मी किनै मुगला पाणी भरायला मदत करत होतो. कळशी भरली म्हणून हाक मारत होतो पण ही इथं बघत बसलीये". अनुने ठोकून दिले.
"बरं का मुगे, पोलीसताई छान रांगोळी काढते, शिकून घे जरा. एक रेघ धड काढता येत नाही तुला. शिकवशील ना पोलीसताई? "
"मुग मुगे काय रे? मुग्धा ताई म्हणायचं आणि कधीपासून माझी रांगोळी छान वाटायला लागली तुला? आधी बरीच नावं ठेवायचास ना? डबे कै काढलेय, निस्त्या रेषा ओढल्या आहेत म्हणून?", नीलुने जरबेच्या सुरात विचारलं.
"ते ना. म्हणजे सुमाक्काने सांगितले ना तू पोलीस झालीस म्हणून..."
"अच्छा अच्छा म्हणून आता मी छान रांगोळी काढते काय? चल तू घरी. आई बोलावतेय तुला "
असं म्हणत अनुला ओढतच फाटकाबाहेर आली नीलु.
'आज रविवार. जयंतशेठ घरी असणार', या विचारानेच अनुची तंतरली होती. त्याने तरीही न डगमगता निकराचा लढा द्यायचे ठरवले.
"तुमचा स्वयंपाक झाला असेल ना ताई? "
"का? तुमचा नाही झाला का?", नीलूने उलट विचारलं.
"नाही. आम्ही गरीब आहोत. आमच्या कडे डाळ तांदूळ संपलेत. तुमच्या कडे वरणभात झाला असेल ना. आपण जायचं का तुझ्या घरी? मस्त पैकी वरणभात खायला? ". अनुचं डोकं भरधाव चालत होतं. एकीकडे तो नीलुकडून आपला हात सोडवून घ्यायच्या प्रयत्नात होता.
"तू गरीब काय रे? मागच्या आठवड्यात नाही का, ओट्यावर उभं राहून आम्ही श्रीमंत आहोत, आमच्या कडे कांदे आहेत असं ओरडून सांगत होतास सगळ्यांना? चल घरी. तुझ्या बाबांनाच विचारते".
"अं.. म्हणजे तसे नक्की गरीब नाही आहोत आम्ही. घरी शिकरण पोळी आहे केलेली पण वरणभात नाहीये. आणि हो, बाबा नाहीत घरी".
"हो का? कुठे गेलेत तुझे बाबा?"
"औषध आणायला. आईला बरं नाहीये ना!"
"असं का? बरं. मी विचारते हो. चल तू आत."
अनुला त्यांच्या घरात ढकलत नीलूने हाक मारली- "सुमाताई! ".
आता आपली पोल खुलणार या विचाराने कासावीस झाला अनु.
"नीलू, अगं ये ये. आतच ये ना. भजी तळतेय मी. अनु ये रे. दे बरं ताईला. तू पण घे.", भरभर हात चालवत म्हणली सुमा.
"अहो नाही. मला काॅलेज ग्राउंड वर जायचंय. उशीर होतोय. हा मुग्धाला त्रास देत होता. इकडे धरून आणलं त्याला. म्हणे आईला बरं नाहीये."
"अगं हा ऐकतच नाही बघ. काय रे अनु? काय झालंय मला? ", असं म्हणत चार भजी तिने नीलूच्या हातात ठेवली. अनु चुपचाप उभा होता.
"मी निघते सुमाताई. उशीर होतोय. "
"बरं सांभाळून जा बरं. परत आल्यावर गजरा घेऊन जा. ओवून ठेवलाय बघ."
"आता नाही. संध्याकाळी येते", असं म्हणत सायकल दामटत गेली नीलू.
'बरं झालं जयंतशेठ नाहीयेत घरी'. हुश्श झालं अनुला!
"अनु, भजी देऊ का रे तुला? ", असं विचारायला अनु जागेवर होता कुठे? जमेल तितकी भजी दोन्ही हातात कोंबून पसार झाला होता तो शोभाताईंकडे!
"भरलंस का पाणी? नळ नीट बंद केलास का? पाणी सांडलं नाहीस ना?", अनु मुग्धाला दरडावून विचारत होता.
मुग्धाने हसून मान डोलावली.
"ही घे भजी. तुला बक्षीस. नेहमी असंच शहाण्यासारखं वागायचं बरं", असं म्हणत त्याने मुग्धाला भजी देऊ केली.
"हो आजोबा! जेवणारेस का? वरणभात झालाय. घे बरं ताट."
भजी एका वाटीत ठेवत विचारले तिने.
"होssss! ये लिजिये आपका ताट. ये लिजिये आपकी वाटी.", असं म्हणत एक एक वस्तू ताटं पुसणार्या मुग्धाला देऊ लागला तो.
त्याचं ते अदबशीर बोलणं आणि कमरेत वाकणं बघून मुग्धा हसायला लागली. "हे रे काय नवीन? ", तिने हसतंच विचारलं.
तिच्या प्रश्नाला बगल देत काहीसं थबकून मुग्धाकडे बघितलं अनुने.
"ताई चिठ्ठी म्हणजे काय गं?"

चिठ्ठी भाग 5 - https://www.maayboli.com/node/72891

Group content visibility: 
Public - accessible to all site users

थॅक्स सिद्धी.
तुम्ही सर्व वाचक वाचून प्रतिक्रिया देतात तेव्हा लिहायला खूप उत्साह येतो __//\\__