मुळ्याची कोशिंबीर

Submitted by योकु on 21 November, 2019 - 16:22
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दोन मुळे
एक मोठा टोमॅटो
२ हिरव्या मिरच्या
मूठभर कोथिंबीर
मीठ, साखर चवीनुसार
अर्धा चमचा (मोहोरी + जिरे)
मोठा चमचाभर तेल
अर्धी- पाउण वाटी दही

क्रमवार पाककृती: 

मुळे, स्वच्छ धूवून, शेंडा- बुडखा काढून, सोलून जाड किसावे
टोमॅटो धूवून बारीक चिरून घ्यावा
कोथिंबीर स्वच्छ धूवून बारीक चिरून घ्यावी
हिरव्या मिरचीचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत
एका भांड्यात मुळ्याचा कीस, चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, दही, साखर, मीठ घालून व्यवस्थित कालवून घ्यावं.
एका कढल्यात तेल तापवून मोहोरी जिर्‍याची फोडणी फुलवावी यात हिरव्या मिरच्या जरा होऊ द्याव्यात आणि ही चळचळीत फोडणी कोशिंबीरीवर ओतावी.
नीट मिसळून गार करत ठेवावी कोशिंबीर फ्रिजात. जेवतेवेळी जरा गार कोशिंबीर खायला चांगली लागते. विशेषतः दह्यातल्या कोशिंबीरी गार जास्त चवीष्ट लागतात

वाढणी/प्रमाण: 
कोशिंबीरीप्रमाणे
अधिक टिपा: 

जेवायला वेळ असेल तर दही, मीठ आणि साखर आयत्यावेळी घालावं. नाहीत्र पाणी सुटतं कोशिंबीरीला
मुळा फार उग्र वाटत असेल तर किसून झाल्यावर जरा मीठ लावून, थोडावेळ ठेवून पाणी पिळून घेऊन मग वापरावा. नंतर अर्थातच कोशिंबीरीत मीठ जपून वापरावं.
साधंच दही वापरायचंय

माहितीचा स्रोत: 
बायडी. तिच्या हातची ही कोशिंबीर अफलातून चवीची होते
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्र, दुसरं काहीही टाक पण मुळ्याची कोशिंबीर वगैरे नको. मला मुळा फक्त माझ्या पद्धतीने केलेल्या पराठ्यातच खाववतो.

मला खूप आवडते मुळ्याची कोशिंबीर. मी दाण्याचा कूट घालते थोडा तरी. आणि टोमॅटो नाही घालत. आता घालून पाहीन.

मला पण खूप आवडते मुळ्याची कोशींबीर. मी बहुतेक करुन त्यात दा कू तरी घालते किंवा भिजलेली ह डाळ वाटून घालते.
पण टोमॅटो घालून कधी केली नाही. तेव्हा करणं आलं.
योकुच्या रेसिपीमधे बरेचदा एखादा हटके घटक असतो जो रेसिपी ट्राय करायला खूणावत राहातो. योकु, खूप खूप धन्यवाद!

टोमॅटो घालून कधी केली नव्हती कोशिंबीर. दाण्याचे कूट मात्र घालते मी.

फोडणी ऐवजी नुसती काळ्या मिर्‍याची पूड घातली तरी छान लागते.

मस्त आहे.

मला खूप आवडते मुळ्याची कोशिंबीर. मी दाण्याचा कूट घालते थोडा तरी. आणि टोमॅटो नाही घालत. आता घालून पाहीन. >>> मम.

दही ताकातल्या कोशिंबिरीला मी शक्यतो तुपाची फोडणी करते. थोडासा ओवा आणि मिरपूड घालते मुळ्याच्या कोशिंबिरीत.

पण टोमॅटो घालून कधी केली नाही. तेव्हा करणं आलं.
योकुच्या रेसिपीमधे बरेचदा एखादा हटके घटक असतो जो रेसिपी ट्राय करायला खूणावत राहातो. योकु, खूप खूप धन्यवाद! >> अगदी अगदी .

योकु कधी ही फोटो देत नाही तरी रेसिपी करून बघावीशी वाटते.

योकोबा, आजीची रेसिपी सोडून बायडीच्या नादी लागलास व्हय? Wink

मुळ्याचा चटका म्हणतात याला. दह्यातलाच असतो. >>> भिजवलेली हरभरा डाळ वाटून घातली असेल तर त्याला आम्ही चटका म्हणतो, नाही तर कोशिंबीर.

मै, टोमॅटोऐवजी डाळिंबाचे दाणे पण मस्त लागतात.

<<योकोबा, आजीची रेसिपी सोडून बायडीच्या नादी लागलास व्हय? Wink

Biggrin

मस्त आहे, मी सुद्धा टोमॅटो घालत नाही, आता घालून बघेन Happy

>>>> भिजवलेली हरभरा डाळ वाटून घातली असेल तर त्याला आम्ही चटका म्हणतो, नाही तर कोशिंबीर.>>> हां ते देखील!! शक्य आहे. मी विसरुन गेलेय बर्‍याच पाककृती. धन्यवाद सिंडरेला.