नवीन अनुभवांसाठीची स्वीकार्यक्षमता

Submitted by राधानिशा on 31 October, 2019 - 15:17

गेम ऑफ थ्रोन्स हेटर्स क्लब धाग्यावर एका ताईंनी " भंगार वाटलं , एक - दोन मिनिटं पाहून बंद केलं " अशी प्रतिक्रिया दिली आहे .. त्यावरून विचारचक्र सुरू झालं .. यातले बरेचसे विचार आधीही येऊन गेले होते पण या निमित्ताने शब्दात उतरवून काढावेत , आपले आपल्याला स्पष्ट होतील आणि इतरांसमोरही मांडता येतील असं वाटलं ..

1 - 2 मिनिटात एखादी गोष्ट भंगार ठरवणं किंवा सौम्य शब्दात आपल्याला ही गोष्ट आवडणारच नाही असं ठरवणं कितपत योग्य आहे ?

1 - 2 मिनिटं जाऊ द्या , एखादी गोष्ट थोडीशीही समजून घेतल्याशिवाय त्यावर " हे मला आवडलं नाही - आवडणार नाही - हे माझ्या आवडीनिवडीत बसत नाही - मला यात इंटरेस्ट नाही " असे शिक्के मारणं कितपत बरोबर आहे ?

बरोबर याचा अर्थ दुसऱ्या कोणाच्या तरी मताने चूक किंवा बरोबर नाही .. किंवा तसं केल्याने कलाकृतीचा किंवा ती आवडणाऱ्या प्रेक्षक - वाचक यांचा अपमान होतो - तुच्छता दर्शवली जाते .... या अर्थाने म्हणायचं नाहीये मला .

कलाकृतीच असं नाही आयुष्यातल्या इतरही गोष्टी यात आल्या . विशेषतः अशा गोष्टी ज्या बहुसंख्य लोक खूप एन्जॉय करताना दिसत आहेत .

अशी गोष्ट अनुभवून पाहावी , थोडी समजून घेण्याचा प्रयत्न करावा , नाहीच आवडली तर दिली सोडून .. पण जर ती आवडली तर त्यातून त्या लोकांना जो आनंद मिळतो तो आपल्यालाही मिळेल .. पण त्या वाटेलाच गेलं नाही तर तो भाग आपल्याला अनभिज्ञच राहील .

अर्थात असंही म्हणता येऊ शकतं - आमच्या आयुष्यात इतर खूप गोष्टी आहेत ज्या आम्ही एन्जॉय करतो , हे नसलं तरी काही बिघडत नाही आमचं . यावर माझ्याकडे म्हणण्यासारखं काही नाही .

पण आवडीनिवडी एवढ्या सिमेंट सारख्या रिजीड असाव्यात की ज्यात नवीन ऍडिशन / बदलाला वावच नाही हे बरोबर आहे का ? मला खरंच कळत नाही ...

मला मात्र अशा कलाकृती किंवा गोष्टी एन्जॉय करणाऱ्या लोकांचा हेवा वाटतो .. आणि कधीतरी का होईना मला त्या अनुभवता याव्यात अशी माझी इच्छा असते .

लहानपणी आईबाबांनी टीव्हीवर कधीतरी शास्त्रीय गायन चालू असलेला एखादा प्रोग्रॅम लावला की माझी चिडचिड व्हायची ... एकच ओळ सतरा वेळा म्हणतात , काय आवडतं यांना हे असलं कंटाळवाणं गाणं असं वाटायचं ... अर्थात आईबाबांना शास्त्रीय मधलं काही विशेष कळतं असं नाही पण निदान ऐकायला तरी आवडायचं ... माझं मात्र शास्त्रीय संगीत ही अतिशय भंगार गोष्ट आहे असं मत बनून गेलं होतं . आणि शास्त्रीय संगीत गायकांबद्दल उगाच एक अढी बसली मनात ... "थोडी वर्षं जाऊ द्या , कोणी ऐकणार नाही हे फडतूस आ - आ - ऊ - ऊ ... सगळे शास्त्रीय गायक बेकार होऊन जातील " असं मी रागाने मनात म्हणायचे ... ( एकूणच कुठल्याही प्रकारची गाणी भावगीत , भक्तिगीत , हिंदी गाणी हा सुद्धा फार आवडीचा प्रांत नव्हता . सिनेमात गाणं आलं की चॅनेल बदलायचं , गाणं संपलं की पुन्हा लावायचा )

पुढे पुलंच्या काही पुस्तकांत शास्त्रीय गायन - वादनाशी संबंधित माहिती वाचली ... आणि आपण समजतो तसं हे बेकार नाही तर खरं तर खूप भारी आहे ... आणि आपलीच या विषयातली समज अगदी तुटपुंजी असल्याने हे किती भारी आहे , हे आपल्याला समजतही नाही .. हे कळून चुकलं आणि भारी वाईट वाटलं .... बरं ते अमुक राग वगैरे आपल्याला या जन्मात ओळखता येणार नाहीत पण निदान कानाला तरी गोड लागेल , ऐकण्याचा प्रयत्न तरी करू असं म्हटलं .... पुढे अगदी शास्त्रीय गायन - वादन फार आवडलं नाही तरी गाणी ऐकण्याच्या प्रयत्नातून मराठी हिंदी गाणी ऐकण्याची तरी आवड लागली ... काहीतरी थोडंस तरी हाती लागलं .

आम्ही एवढी इंग्रजी पुस्तकं वाचली आहेत किंवा या लेखकाची सगळी पुस्तकं वाचली आहेत , अमुक हा माझा आवडता इंग्रजी लेखक आहे ... असं सांगणाऱ्यांचा मला मनात कुठेतरी थोडासा हेवा वाटतो .. कारण मला लहानपणापासून वाचनाची प्रचंड आवड आहे ... वाचायला यायला लागल्यापासून जे मिळेल आणि रुचेल ते वाचून काढलं आहे . पण मराठी भाषेतलीच . मराठी पुढे सेमी इंग्लिश मिडीयम .. पण इंग्रजी वाचता - बोलता येत नाही याची खंत आहे .. कमीपणा म्हणून नाही पण कशाला तरी आपण मुकतो आहोत या भावनेमुळे .

इंग्रजी मालिका बघायला सुरू केल्या तेव्हा त्या समजणार आहेत की नाही याचीच शंका होती पण जेव्हा संवाद आपल्याला समजत आहेत ( सबटायटल वापरून का असेना ) , स्टोरी समजत आहे हे समजलं तेव्हा केवढा आनंद झाला . जगातले भरपूर लोक एन्जॉय करत असलेली एक गोष्ट आपल्यालाही लाभली , आपण त्या गटात समाविष्ट झालो या विचाराने एक समाधान मिळालं .

इंटरनेटने इंग्रजी भाषेतल्या पुस्तकांचा एवढा खजिना समोर उघडा केला आहे पण मालिकेतल्या संवादांपेक्षा पुस्तकातली भाषा अजून कठीण वाटते ... 4 पानं वाचून शीण येतो ... पण आता पुस्तक वाचणाऱ्यांच्या गटातही सामील व्हायचंच , आपण ह्या पासून वंचित राहता नये असा निश्चय करून वाचनाचे प्रयत्न चालू आहेतच ... काही पुस्तकं वाचली आहेत पण ती सोप्या इंग्रजीतली . जी खरी क्लासिक इंग्रजी - लॉर्ड ऑफ द रिंग्ज / शेरलॉक / स्टीफन किंग सारख्या लेखकांची ती वाचायला अजून जमलेलं नाही ....

3 - 4 वर्षांपूर्वी गेम ऑफ थ्रोन्सचा एक एपिसोड पूर्ण पाहिला .. काडी इतका आवडला नाही , शिसारी आली . डाऊनलोड केलेले 4 एपिसोड न बघता डिलीट केले . त्यानंतर 2 - 3 वर्षं तिकडे वळून पाहिलं नाही .... पण मी सदस्य असलेल्या 4 - 5 चित्रपट - पुस्तक - मालिकांच्या फेबु ग्रुप्स मध्ये आवडत्या सिरिअलचा विषय निघालेला असताना निम्म्याहून अधिक लोक गेम ऑफ थ्रोन्सचं नाव घ्यायचेच .... तेव्हा आपल्या आवडीच्या सिरिअल / पुस्तकं आवडणाऱ्या इतक्या लोकांना ही मालिका आवडते तर ती खरंच एवढी वाईट असेल का - असा प्रश्न पडला ... किमान 10 एपिसोड पहायचेच ; आवडले नाही तरी असं ठरवलं ... 4 - 5 एपिसोड स्टोरीची कल्पना यायला लागले आणि एकदा समजल्यावर 15 दिवसात पूर्ण मालिका पाहून संपवली .

इथे मालिकेचं गुणगान करण्याचा हेतू नाहीये . ज्यांना 4 - 5 किंवा 10 - 1 एपिसोड पाहून पुढे पाहावंसं वाटलं नाही ते लोक आपल्या आवडीनिवडींमध्ये अधिक फ्लेक्सिबल आहेत , अधिक ओपन माईंडेड आहेत आणि आयुष्यात नव्या नव्या गोष्टी अनुभवण्याची त्यांची इच्छा आणि क्षमता दिसून येते .

प्रचंड लोकप्रिय मालिकेचा एक एपिसोड पाहून किंवा प्रचंड लोकप्रिय पुस्तकाची 2 पानं वाचून ते बेकार आहे असं ठरवण्यापूर्वी आणखी थोडासा वेळ खर्ची घालून , थोडसं ओपन माईंडेड होऊन - हे आहे तरी काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करावा , तरी नाही आवडलं तर मग अधिकाराने " मला आवडलं नाही " म्हणता येऊ शकतं . गेम ऑफ थ्रोन्सच्या अनुभवानंतर नवीन मालिका पहायला निवडली तर किमान 4 एपिसोड तरी पाहायचेच , अगदी फार किंवा अजिबात आवडले नाहीत तरी असं ठरवलं .... ब्रेकिंग बॅड आवडत नसताना नेटाने पाहिली आणि जवळपास लास्ट सिजन पर्यंत त्यात गुंतून पाहिली . ऑरेंज इज द न्यू ब्लॅक आवडली नसून 4 एपिसोड पाहिले आणि समजलं ही आपल्याला आवडण्यासारखी नाही ... ( याचा अर्थ मी तिला भंगार म्हणत नाहीये , फक्त मला सूट होणारी नाही , भले अनेकांना आवडत असली तरी . पण हा निष्कर्ष मी 4 एपिसोड नंतर काढला , 5 मिनिटं पाहून नाही . )

मला क्रिकेट , फुटबॉल , टेनिस किंवा कुठल्याही खेळातलं ओ की ठो समजत नाही ... सध्याच्या भारतीय टीम मधल्या सगळ्या प्लेयर्सची नावंही माहीत नाहीत... पण म्हणून मी "ते मॅचबिच बोअर असतं खूप" असं विधान केलं तर किती चुकीचं होईल ... घरात टीव्हीवर मॅच चालू असताना , फोर सिक्स आऊट यांना घरचे उन्मादाने प्रतिक्रिया देत आहेत आणि आपल्या मनाला मात्र त्या उन्मादाचा स्पर्शही होत नाही याचं मला वाईट वाटतं .... कधीतरी ह्या सगळ्या खेळांचे नियम नीट समजून घेऊन , कुठल्यातरी एका टीम किंवा खेळाडूशी भावनिक गुंतवणूक करावी ( फेडरर जिंकला पाहिजे / सेरेना / मारिया/ जोकोविच ) मग आपल्यालाही तो आनंद घेता येईल अशी इच्छा आहे ....

कलाकृतींच्या बाबतीत मला फॅन्टसी जेनर आवडतं तेव्हा डिटेक्टिव्ह - क्राईम - रहस्य किंवा इतर प्रकार मला आवडतच नाहीत हा अट्टाहास घेऊन मी बसले असते तर मला त्या प्रकारातले सिनेमा - मालिका पाहता आणि एन्जॉय करता आल्या नसत्या .

जुनी हिंदी गाणी बोअर - जुने हिंदी चित्रपट कंटाळवाणे असं म्हटलं असतं तर त्यातली काही रत्नं हाती लागली नसती .

तेच इंग्रजी गाण्यांचं .. ह्यात खूप सुंदर गाणी - प्रकार- बँन्ड्स आहेत , हे ऐकून - वाचून माहीत आहे ... पण प्रत्यक्ष ऐकलेली गाणी हाताच्या बोटावर मोजता येण्याएवढीच.. अर्थ कळत नाहीत .. किंवा समजून घेण्याचे विशेष प्रयत्न केलेले नाहीयेत ... आळशीपणा होतो आहे ... पण पुढे वेगवेगळ्या बँड वगैरे बद्दल नीट समजून घेऊन इंग्रजी गाणी ह्या विषयातलं अज्ञान साफ नष्ट करायचं हा निश्चय आहे ... आधी पुस्तकं वाचायला जमू दे नीट मग गाण्यांकडे वळू असा विचार आहे .

इंग्रजीचा प्रश्न नाहीये ... अमुक मालिका वाईट म्हणणारे अस्खलित इंग्रजी बोलत असतील ..

प्रश्न आयुष्यात न अनुभवलेल्या - प्रचंड / मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असलेल्या गोष्टी नीट समजून घेऊन अनुभवण्याचा - एन्जॉय करण्याचा प्रयत्न करून पाहण्याचा आहे .

या इच्छा कधी प्रत्यक्षात येणार आहेत की नाही माहीत नाही पण मला पोहायला शिकायचं आहे , ट्रेकिंग , कॅम्पिंग , किल्ले चढणं , ज्या गोष्टी या आयुष्यात जमण्यासारख्या आहेत त्या अनुभवायच्या आहेत ( हिमालय चढणं नाही जमणार कदाचित पण एखादा उंच दुर्ग तरी चढता येईल ) ...

आयुष्यात नव्या नव्या गोष्टी - निदान बहुसंख्य लोक ज्या गोष्टीतून आनंद मिळवत आहेत हे स्पष्ट दिसत आहे त्या आपण ट्राय तरी करून पहाव्यात ( सिनेमा - मालिका - संगीत - पुस्तकं ह्या गोष्टी तर जवळपास विनामूल्य आहेत , निदान त्या तरी ) , नाहीच रुचल्या तर दिल्या सोडून पण त्या वाटेलाच न जाऊन आपण स्वतःला एका छानशा अनुभवापासून वंचित ठेवणं बरोबर नाही , असं माझं वैयक्तिक मत आहे ... तुमची मतं जाणून घ्यायला आवडेल .

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राधानिशा, उदाहरणात वैविध्य असले तरी लेखात मला तरी तोचतोच संदेश जाणवला.
पण ............
अतिशय पटला, कळला, भावला.
.
किंबहुना काही दिवसांपूर्वी मी एक पुस्तक वाचले - 'लव्ह प्रिझन मेड अनमेड' ही ऑटोबायोग्राफी आहे अशा कृष्णवर्णिय स्त्रीची जिचे बालपण अ‍ॅब्युसिव्ह व डोमेस्टिक हिंसा पहाण्यात गेले. पुढे ती एका खूनावरुन शिक्षा झालेल्या कैद्याच्या प्रेमात पडली, सपशेल आपटली. तिने त्याच्याकरता वाट पाहीली. तो पुढे तुरुंगातून बाहेर आला, त्या दोघांना एक मुलगाही झाला परंतु लग्न काही वर्क आउट झाले नाही.
या पुस्तकाच्या मध्यावर मला वाटू लागले - काय मूर्ख बाई आहे. What a waste of time reading this book. तरी मी वाचत गेले बरं का. का तर इतका वेळ या पुस्तकात इन्व्हेस्ट केलेला आहे लेट अस हॅव्ह पेशन्स.
काय आश्चर्य मला ते पुस्तक शेवटी शेवटी अतिशय आवडलं , खूपच आदर वाटला मला तिच्या गुणांचा, तिच्या कमिटमेन्टचा.
.
तर सार हेच की कधीकधी वेळ द्यावा लागतो. ताबडतोब शिक्कामोर्तब केलं तर आपलेच नुकसान होते. आपले म्हणणे अगदी योग्य आहे.

माझ्यात मुव्हीज आणि सिरीजबद्दल पेशन्स खूप कमी आहे. पहिल्या दहा मिनिटांत पकड घेतली नाही, विषय आवडला नाही म्हणून मी कितीतरी पिक्चर, सिरीयल्स बंद केलेल्या आहेत. पुन्हा परत त्यांना एक चान्स देऊन वेळ वाया घालवायची रिस्क घ्यावीशी वाटली नाही.
पुस्तकांबाबत जरा जास्त पेशन्स दाखवला आहे.

कधीकधी वेळ द्यावा लागतो. ताबडतोब शिक्कामोर्तब केलं तर आपलेच नुकसान होते. >> +११

हेच म्हणायचं होतं मला ..

खरे आहे, माणसांच्या बाबतीत पण हाच विचार केला पाहिजे, एखाद्यावर लगेच अमुक एक असा शिक्का मारून मत न बनवता समजून घेतले तर कितीतरी गैरसमज टळतील.

पकड न घेतल्यामुळे नाही पण हंगर गेम्स पहिल्या सिनेमात कॅटलीन हरणाची शिकार करत असते हे दृश्य आहे , ते पाहून मी डोक्यात राख घातली आणि 2 मिनिटाच्या आत बंद केला . कारण शिकार म्हणजे हौसेसाठी निरपराध जीवांची हत्या हेच डोक्यात बसलेलं ... पुढे 2 - 4 वर्षांनी पुन्हा एकदा " पाहू तरी " म्हणून नेटाने पाहिला तेव्हा ती शिकार हौसेपोटी नाही तर कुटुंबाची उपासमार होऊ नये म्हणून करत आहे वगैरे सगळा संदर्भ नीट लक्षात आला ... 2 - 3 दिवसात भराभर तिन्ही चित्रपट पाहिले आणि तिन्ही पुस्तकंही लवकरच वाचली ... पुस्तकं जास्त आवडली पण चित्रपटांनीही पुस्तकांना न्याय दिला आहे ... इतर पुस्तकांवर बेतलेल्या सिरीजेसपेक्षा ..

पण 2 मिनिटात जज करण्याचा प्रयत्न केल्याने मधली 2 - 3 वर्षं मी एवढया सुंदर अनुभवापासून स्वतःला वंचित ठेवलं .

10 मिनिटं पाहायचं की नाही हे ठरवायला फार कमी वेळ वाटतो ...

लेखात थोडा तोचतोचपणा आला आहे पण तरीही मूळ मुद्दा पटला. बरेचदा एखादी गोष्ट आवडण्यात किंवा न आवडण्यात त्या वेळच्या मनस्थितीचा मोठा वाटा असतो. तेव्हा दुसर्‍या वेळी पाहताना आपण वेगळ्या मनस्थितीत असलो तर कदाचित वेगळा परिणाम होईल.
अर्थात या सगळ्याचा अट्टहास होऊ नये आणि मूळ रसग्रहणाची उत्स्फुर्तता कायम रहावी! आपल्याला एखादी लोकप्रिय गोष्ट आवडत नाही याचा बाऊ करू नये किंवा दुरभिमान देखील बाळगू नये. There is no point in being addicted to non smoking! (Disclaimer: I do not intend to promote smoking! वाक्याचा शब्दशः अर्थ घेऊन धागा भरकटू नये म्हणून डिस्क्लेमर!)

लिखाणात विस्कळीतपणा आहे. सरमिसळ आहे खूप पण मुद्दा 'नवनवीन अनुभवांना सामोरे जाण्याची तयारी असायला हवी ' हा असेल तर लक्षात आला मान्य ही आहे.
मला तरी खरा आणि खोलवरचा मुद्दा फोमो चा वाटतो आहे. (फियर ऑफ मिसिंग आऊट)

दारूच्या बाबतीत न पिणार्‍याला नेहेमीच असं म्हटलं जातं की 'कम्बख्त तुने तो पी ही नहीं' वरचे सर्व लिखाण फाईंड जीओटी रिप्लेस विथ (प्यायची) दारू करून लेख लिहिला तर कसं वाटेल. आयुष्यात (इन्क्लुडिंग बट नॉट लिमिटेड टू) वयानुसार, एखादी नवीन गोष्ट करायची की नाही आणि त्याकरता देता येऊ शकणारा वेळ आणि प्राधान्यक्रम बदलत असतो. तर सांगायचा मुद्दा चूक आणि बरोबर हे खूप व्यक्ती सापेक्ष आहे. ' जो जे वांछील तो ते लाहो ' हे बरे

एखादी गोष्ट न केल्याने आपले नुकसान होते आहे हे जोवर आपल्याला वाटत नाही तोवर त्या व्यक्तीकरता ते खरे नुकसान नाही. अज्ञानातही सुख असतेच.

ता.क. - 'स्वीकार्यक्षमता' हा शब्द पहिल्यांदाच ऐकला. अजून जरा डागडुजी करून एक छान शब्द तयार होऊ शकतो. जाणकार सांगतीलच.

स्वीकार्यक्षमता' हा शब्द पहिल्यांदाच ऐकला.>> स्वीकार क्षमता असे हवे.

शास्त्रीय संगीत, उत्तम प्रतीचे फिल्मी गैरफिल्मी संगीत, मालिका, चित्रकला नाटके चित्रपट न आव्डून घेणा रे लोक कसे जगत असतील असे वाटले. अभिरुची ही डेव्हलप करायची चीज आहे. पण व्यक्तिसापेक्ष. इतके नीरस वन डायमेन्श नल जगून त्यात आनंद कसा काय मिळवत असतील? जेसीबी कि खुदा ई बघणारे हेच पब्लिक.

हाउसफुल, गोलमाल सीरीज चित्रपटाला फर्स्ट डे फर्स्ट शो जात असावेत.

मुळात साहित्य वाचणे, गाणे ऐकणे आणि चित्रपट पाहणे यात खूप फरक आहे. या सगळ्यात वेगही महत्त्वाचा असतो.
एकतर सुरवातीच्याच काही दृष्यांत अंधारातले चित्रण असले की बघावेसे वाटतच नाही. शिवाय पहिल्या काही मिनिटांत स्क्रीनप्लेने मनाची पकड घेतली नाही की त्यात रसही वाटत नाही. कथानक, दृष्य, पार्श्वसंगित यापैकी एकात तरी प्रेक्षकांना खिळवून ठेवायची ताकद हवी.

हर्पेन तुमचं म्हणणं पटलं .. फोमो सोडून बाकीचं . ते नक्की नाही हे मला माहित आहे . लोकांना विशेष आवड नसलेल्या गोष्टी प्रवास - वेगवेगळ्या प्रकारच्या माणसं यांचाही अनुभव आपल्याला मिळायला हवा असं वाटतं , उदा . गो नी दांडेकरांची प्रवास वर्णनं - माणसांचे अनुभव , पुलंची काही पुस्तकं वाचूनही वाटतं - ही खरी श्रीमंत माणसं .. केवढया सुंदर वैविध्यपूर्ण अनुभवांची श्रीमंती अनुभवली या लोकांनी .. आपल्यालाही एक ना एक दिवस असे अनुभव घेता यावेत असं वाटतं ... तोवर निदान चांगल्या कलाकृतींंमधून मिळणारा आनंद तरी मिळावा असं वाटतं ...

खूप पॉप्युलर आहेत म्हणून मला हिंदी / इंग्रजी ऍक्शनपट आवडत नाहीत किंवा आवडत नाहीत याचा काही खेदही वाटत नाही . पण त्या प्रकारातले 1 - 2 पाहून मग नावड ठरवली आहे .... अनुभव घेऊन मग आवड निवड ठरवावी , लगेच वाईट ( भंगार ) ठरवण्याची घाई करू नये एवढंच मला म्हणायचं होतं .-

आपल्याला एखादी छान गोष्ट मिळणं शक्य असताना आपल्या आडमुठेपणामुळे / नवीन शिकायला तयार नसल्याने ती मिळायची राहू नये हीच खरी इच्छा आहे ... ( प्रतिसादात पण तोच तोचपणा आला आहे , माफ करा Lol

मधुरा ताई , आजच्या काळातल्या एखाद्या भारतीय टीनेजरने रामानंद सागरचं रामायण किंवा बी आर चोप्रा यांचं महाभारत " एचडी नाही ,मोठे आकर्षक भव्यदिव्य देखावे नाहीत , ( सध्याच्या नवीन पौराणिक मालिका पाहिल्या असतील तर फरक चटकन लक्षात येईल ) , कलर डल आहेत , लोकेशन साधी आहेत , म्युजिक बोअर आहे , स्पेशल इफेक्ट्स सी ग्रेड आहेत .. अशा कारणांनी पाहिलेच नाहीत तर लॉस कोणाचा ?

खरं तर काही लॉस नाही . वर हर्पेन यांनी म्हटल्याप्रमाणे .. एखादी गोष्ट न केल्याने आपले नुकसान होते आहे हे जोवर आपल्याला वाटत नाही तोवर त्या व्यक्तीकरता ते खरे नुकसान नाही. 

पण उत्कृष्ट दर्जाची कथा आणि अभिनयाला ती व्यक्ती मुकली. मालिका - चित्रपट यांच्या बाबतीत , भव्यदिव्य देखावे , ब्राईटनेस या सगळ्यांपेक्षा कथानक , अभिनयाचा दर्जा , संवाद , प्रेक्षकाला कथेत गुंतवण्याची क्षमता या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात ...

आणि स्क्रिन प्ले वगैरे दर्जाचं म्हणत असाल तर इथल्या नवीन स्टार प्लस महाभारताच्या अख्ख्या सिरिअलला जेवढा खर्च आला असेल तेवढा खर्च गेम ऑफ थ्रोन्सच्या एका एपिसोडला केला गेला असेल .. त्यामुळे 10 मिनिटं बघून वाईट ठरवण्याची घाई करू नका ....

पहिल्या एपिसोडचा पहिला सिन पहाटेचा , त्यातही बर्फाळ प्रदेश आणि जंगलातला आहे .. तिथे लख्ख प्रकाश कसा असणार ... पहिले काही सिन कंटाळवाणे असतीलही ... पण जर पात्रांशी कनेक्ट व्हायला झालं तर 2 - 4 एपिसोडमध्ये कथेत विलक्षण गुंतून जायला होतं .

मधुरा ताई , आजच्या काळातल्या एखाद्या भारतीय टीनेजरने रामानंद सागरचं रामायण किंवा बी आर चोप्रा यांचं महाभारत " एचडी नाही ,मोठे आकर्षक भव्यदिव्य देखावे नाहीत , ( सध्याच्या नवीन पौराणिक मालिका पाहिल्या असतील तर फरक चटकन लक्षात येईल ) , कलर डल आहेत , लोकेशन साधी आहेत , म्युजिक बोअर आहे , स्पेशल इफेक्ट्स सी ग्रेड आहेत .. अशा कारणांनी पाहिलेच नाहीत तर लॉस कोणाचा ?

खरं तर काही लॉस नाही . वर हर्पेन यांनी म्हटल्याप्रमाणे .. एखादी गोष्ट न केल्याने आपले नुकसान होते आहे हे जोवर आपल्याला वाटत नाही तोवर त्या व्यक्तीकरता ते खरे नुकसान नाही. 

पण उत्कृष्ट दर्जाची कथा आणि अभिनयाला ती व्यक्ती मुकली. मालिका - चित्रपट यांच्या बाबतीत , भव्यदिव्य देखावे , ब्राईटनेस या सगळ्यांपेक्षा कथानक , अभिनयाचा दर्जा , संवाद , प्रेक्षकाला कथेत गुंतवण्याची क्षमता या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात ...

आणि स्क्रिन प्ले वगैरे दर्जाचं म्हणत असाल तर इथल्या नवीन स्टार प्लस महाभारताच्या अख्ख्या सिरिअलला जेवढा खर्च आला असेल तेवढा खर्च गेम ऑफ थ्रोन्सच्या एका एपिसोडला केला गेला असेल .. त्यामुळे 10 मिनिटं बघून वाईट ठरवण्याची घाई करू नका ....

पहिल्या एपिसोडचा पहिला सिन पहाटेचा , त्यातही बर्फाळ प्रदेश आणि जंगलातला आहे .. तिथे लख्ख प्रकाश कसा असणार ... पहिले काही सिन कंटाळवाणे असतीलही ... पण जर पात्रांशी कनेक्ट व्हायला झालं तर 2 - 4 एपिसोडमध्ये कथेत विलक्षण गुंतून जायला होतं .

आपल्या आडमुठेपणामुळे / नवीन शिकायला तयार नसल्याने >>> हे नाही पटले.

१. जगातले सर्वच्या सर्व अनुभव मला मिळवणे शक्य नाहीये. आणि मिळणार्‍या अनुभवातील 'मला' आवडणारे अनुभव तर त्याहूनही कमी आहेत. मग मी कोणत्या अनुभवावर किती वेळ खर्च करावा हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे.

२. कुठल्याही नविन अनुभवाच्या पाठी न लागता आहे त्या अनुभवात जगण्याची खुमारी तुम्हाला काय कळणार - असे कुणी म्हणाले तर? म्हणजे आजपर्यंत मला १० पुस्तके आणि १२ सिनेमे आवडले. तेच परत परत अनुभवत / त्यांच्या स्मरणरंजनावर मी खुष आहे आता मला नवीन काही नको. यात चुकीचं असं काय आहे?

३. आयुष्य खूप व्यस्त असताना एखाद्या न आवडणार्‍या अनुभवावर तो आवडावा म्हणून वेळ खर्च करणे मला शक्य नाही. आत्ता तो अनुभव मला आवडत नाहीये पुढे आवडेल याची काय शाश्वती? त्यापेक्षा जो काही थोडासा फावला वेळ मिळतोय (आणि आयुष्य खूप व्यस्त असल्यामुळे जो प्रचंड मूल्यवान आहे) तो मी मला आवडणार्‍या अनुभवांवर घालवेन.

४. जी गोष्ट वेळेची तीच पैशांना पण लागू होते.

५. दुसर्‍या अनेकांना आवडतो म्हणून तो अनुभव चांगला असेलच हे कशावरून? (अनेक वेळा तो सुमारच असतो. आणि खूप वेळा त्या अनुभवावर चर्चा करता यावी / इतर चर्चा करताना आपण मागे पडू नये म्हणून बरेच जण तो अनुभव घेत असतात. त्यात त्यांना आनंद मिळतोच असे नाही.)

काही माणसं अशी तर काही तशी. व्यक्ति तितक्या प्रकृती.
एखादी व्यक्ति एखादी गोष्ट सतत तशीच करत असते याच कारण तसे करण्याने त्या व्यक्तिचा काहितरी फायदा होत असतो. म्हणजे तो त्या व्यक्तिचा चॉईस असतो. (जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे केलेला).
कंपनी मधे काहीजण स्पेशलिस्ट असतात काही जनरल मॅनेजमेंट मधे रस घेतात. तसच आहे ते. प्रत्येक चॉईसचे काही फायदे असतात तर काही तोटे. सचिनने म्हणल असत की मला क्रिकेट बरोबर गोट्या, खोखो, पोहोणे हे सगळे करायचे आहे तर तो महान क्रिकेटपटू झालाच नसता. वेगवेगळे लेखक, कलाकार, शास्त्रज्ञ यांच्या बद्दलही असेच म्हणता येइल.
बर हे त्यात्या क्षेत्रातील तज्ञांच झाल. पण सामान्य माणसाला सुद्धा नेहमी चॉइस करावा लागतो. सगळच उपभोगता येइल असे नाही. आणि शेवटी कुठेतरी कंफर्ट झोन असतोच.
आता घरी सिरीयल्स विरूद्ध खेळांचे प्रक्षेपण हे द्वंद्व आपल्या समोरचे नेहेमीचे उदाहरण आहे.

रामानंदांच्या मालिका नव्हत्याच आवडल्या मला.

बी. आर. चोप्रांचे महाभारत जे आहे, त्याचं कथानक खिळवून ठेवणारं आहे. आपल्या संस्कृतीतले आहे. ज्या काळात ते बनले त्या काळी vfx जास्त प्रचलित नव्हतेच. तरीही त्यांनी उत्तम करण्याचा प्रयत्न केला.
संवाद अत्यंत सुंदर आहेत त्यातले. कथेचा वेगही उत्तम आहे.

त्याची तुलना कुठल्यातरी परप्रांतीय काल्पनिक कलाकृतींशी करू नका. हिमनगाची तुलना फ्रिजरमध्ये तयार झालेल्या बर्फाशी करण्यासारखे आहे ते.

आधुनिक महाभारत मालिकाही उत्तमच आहे. त्याचे संगित, दृष्य, vfx मस्तच आहे. काही गोष्टी वाढवल्या असल्या तरी मुळ गाभा महाभारत आहे. त्यामुळे कथानक मस्तच आहे.

पण got एखाद्याला पाहावेसे वाटतं नसेल तर तो मोठ्या उत्तम कलाकृतीचा आस्वाद घ्यायला मुकलाय असे का वाटते तुम्हाला?
तसही ती मालिका पाहायची मला इच्छा नाही.

स्विकारक्षमता म्हणजे acceptability ना? exploration नाही.
===

हार्पेन आणि माधव यांचे प्रतिसाद आवडले.
===

१. 'बहुसंख्य' म्हणजे कोण? मिडियाला ऍक्सेस असणारे आणि मोठमोठ्याने आवाज करू शकणारे का?

२. बहुसंख्याना क्यूंकीं साँस भी कभी बहू थी, मानबा आवडत असेल तर तेपण बघत बसायचं का?

३. पुलंच शास्त्रीय संगीताबद्दल जे मत आहे ते बहुसंख्याच मत आहे कशावरून? कि पुलं काहीतरी म्हणतात म्हणून सगळ्यांनी शासं शिकत बसायचं?
===

'लोकप्रिय गोष्टींना हुच्चभ्रू लोकांनी नावं ठेऊ नयेत' हा मुद्दा असेल तर तो मान्य आहे. पण त्यासाठी गॉट, शासं ही उदा चुकीची आहेत असं वाटतं. ट्वायलाइत, फिफ्टी शेड्स, गढुळाच पाणी किंवा मुंगडा ही गाणी <- ही योग्य उदा आहेत Proud

पहायची इच्छा नाही त्याची परप्रांतीय - परक्यांची मालिका वगैरे ही कारणं असतील तर ठीकच आहे .. तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे . पण 5 मिनिटं पाहून भंगार म्हणणाऱ्या व्यक्तीने मनात " ही परक्यांची ; ती चांगली असणारच नाही , उगाच कशालाही लोक डोक्यावर घेतात , ह्यापेक्षा आमच्या अमुक अमुक कितीतरी ग्रेट " इत्यादी पूर्वग्रह मनात ठेवूनच ती पाहिली आहे असं वाटतं , तेव्हा कुसळाएवढा दोषही मुसळाएवढा भासू शकतो ... तुम्ही काय पाहायचं आणि काय नाही हे सांगण्याचा / आग्रह करण्याचा मला अजिबातच अधिकार नाही ... पण जर तुम्ही एक एपिसोड पाहून - मला ऐतिहासिक काळ वगैरे मालिका फार आवडत नाहीत / मला त्यातली हिंसा आवडली नाही - किळस आली / मला त्यातले लैंगिक दृश्यं- घृणास्पद वाटली , मला स्टोरीच आवडली नाही / मला कुठल्याच कॅरॅक्टरशी कनेक्शन जाणवलं नाही ... यातलं किंवा याप्रकारचं कारण दिलं असतंत तर ठीक होतं ..

पहिले सीन काळोखात आहेत , म्युजिक आकर्षक नाही ही कारणं उगाच काहीतरी कारणं दिल्यासारखी आहेत .. खरंतर पहायची का नाही याचं स्पष्टीकरण कुणाला द्यायची तुम्हाला गरज नाही , परक्यांची / विदेशी पहायची नाही एवढं म्हणूनही तुमचा मुद्दा मांडता आला असता ... पण थोडीशी पाहून भंगार म्हणणं म्हणजे सुरुवातीपासून भंगारच म्हणायची आहे , पण न बघता म्हणता येत नाही म्हणून त्यासाठी थोडीशी पाहिल्यासारखं करायचं असं वाटतं .

असं करण्याची काहीच गरज नव्हती खरं तर .... सॉरी काही चुकीचं बोलले असेन तर .

लेखातला विचार पोचला.
हा विचार नवे खाद्यपदार्थ, नवं तंत्रज्ञान यांच्यासाठीही लागू होईल.

पण काही गोष्टी नॉट माय कप ऑफ टी म्हणून वगळाव्याशा वाटणारच. त्या वाईट किंवा हलक्या आहेत, म्हणून नव्हे.

_--_------
चोप्रांच्या महाभारताच्या कथानकाचं श्रेय त्यांचं नाही. त्यामुळे त्या मालिकेच्या कथानक सोडून अन्य बाबींवरच बोलायला हवं.

हा विचार नवे खाद्यपदार्थ, नवं तंत्रज्ञान यांच्यासाठीही लागू होईल.>> बरोबर. मला सुशी व इतर जपानी पदार्थ आजिब्बात आवडत नाहीत. कितीही छान असले तरी.शेफ मोरीमोटो ला फॉलो करते तो एक छान व्यक्ती आहे म्हणून. पर वो खाना अपने बस का नही. तसेच मला अ‍ॅपलचे आय ओ एस उगीच वापरायला आवडत नाही. छान असेल मोठे पण नाही आ वडत आपले विंडोज अँड्रॉइन्ड बरे असे वाटते.

आजपर्यंत मला १० पुस्तके आणि १२ सिनेमे आवडले. तेच परत परत अनुभवत / त्यांच्या स्मरणरंजनावर मी खुष आहे आता मला नवीन काही नको. यात चुकीचं असं काय आहे? <<< माधव, यात चुकीचं असं काहीच नाही. पण या वाक्यातल्या 'माझ्या अश्याप्रकारच्या स्मरणरंजनास' एखाद्याने वरच्या वर भंगार (किंवा तत्सम) म्हणून संबोधने योग्य नसेल.

तुमच्या मुद्द्यांशी सहमत. प्रत्येकाने 'हे' पण करून बघायला हवे, 'त्यात' काय मजा आहे तीही अनुभवायला हवी, असेच करत राहिले तर नुसती दमछाक होणार.
(कॉलेजच्या दिवसातला किस्सा आठवला. तेंव्हा बसने प्रवास होत असे. प्रत्येक वेळी बसमध्ये इतकी गर्दी की, आतल्या दाबाने 'एखाद्या दिवशी बस फुटायची' असे वाटे. अश्यात एके दिवशी अनपेक्षीतपणे मला बसमध्ये चक्क बसायला रिकामी सीट मिळाली. गर्दीही विरळच होती. जिथे बसमध्ये चढून उभे राहणे दुरापास्त व्हायचे, तिथे मला चक्क बसायला मोकळी सीट मिळाली म्हणजे हवेत तरंगण्यासारखीच गत झाली. गंमत म्हणजे पुढच्या थांब्यावर पुन्हा माझ्या पुढच्या बाजूच्या २-३ सिटा एकदम रिकाम्या झाल्या. हे बघताच मी प्रतिक्षिप्तक्रियेप्रमाणे माझ्या सीटवरून उठलो आणि रिकाम्या झालेल्यांपैकी एका सीटवर जाऊन बसलो. नंतर मनात विचार आला की मला नेमके काय हवे होते? रिकामी आरामदायी सीटच ना? ती तर माझ्याकडे होतीच. मग मला निवांतपणे प्रवासाचा आनंद घेत बसायला काय हरकत होती? आता परत एखादी सीट रिकामी झाली तर तिकडेही जायचे का? असे करत थांबा येईपर्यंत नुसते सिटाच बदलत बसायचे का?
तरीपण रोजच्या रोज त्या गर्दीच्या बसमधून कसेबसे उभे राहून जाणेच फक्त माहीत होते, त्या बसमध्ये एक सीट रिकामी मिळाल्यावरही दुसरी रिकामी मिळाल्यावर तत्काळ तिचा ताबा घेण्याचा मोह आवरला नाही.

बरे, नुसते सिटा बदलत राहूनच आनंद मिळत असेल तर? तो तरी का सोडा? असेही आहेच की. Lol )

२. बहुसंख्याना क्यूंकीं साँस भी कभी बहू थी, मानबा आवडत असेल तर तेपण बघत बसायचं का? >>

बहुसंख्यांना आवडणारी गोष्ट बघत बसायचं असं कुठे म्हटलं आहे ... क्यूँकी सास भी / मानबाची पाच मिनिटंही पुरेशी आहेत , हे आपल्याला आवडणार की नाही समजायला .

३. पुलंच शास्त्रीय संगीताबद्दल जे मत आहे ते बहुसंख्याच मत आहे कशावरून? कि पुलं काहीतरी म्हणतात म्हणून सगळ्यांनी शासं शिकत बसायचं?

>> पुलंचं शास्त्रीय संगीताबद्दलच मत नाहीये .. त्यांनी वर्णन केलं आहे त्यांना त्या गायन - वादनाचं .. त्यावरून हे आपल्याला वाटतं तसं क दर्जाचं नाही तर जर समजत असेल त्यातून खूप आनंद मिळण्यासारखं आहे एवढं समजलं . सगळ्यांनी शिकावं वगैरे असं अजिबात नाही .. फक्त काहीवेळा आपल्याला आवडत नाही ती गोष्ट - ती न समजल्याने आवडत नाही , जर ती समजली तर त्यातून आनंद मिळू शकतो .. हा मुद्दा मांडायचा होता . पण आपल्याला जी गोष्ट समजलीच नाहीये त्याला वाईट शिक्का मारायची घाई का ..

मानबा समजायला 5 मिनिटं पुरेशी आहेत , मग खुशाल म्हणा भंगार .. पण GOT किंवा कुठलीही लोकप्रिय इंग्रजी मालिका समजायला 5 - 10 मिनिटं पुरेशी आहेत का ? ऍट लिस्ट स्टोरी समजून घ्या आणि मग नावं ठेवा .

लोकप्रिय गोष्टींना हुच्चभ्रू लोकांनी नावं ठेऊ नयेत' हा मुद्दा असेल तर तो मान्य आहे >> हा मुद्दा नाहीये . नावं जरूर ठेवावीत पण काय आहे ते थोडंसं तरी समजून घेऊन मग ठेवावीत ... टवायलाईटचं उदाहरण घेतलंत म्हणून - टवायलाईट अजिबात आवडला नाही असं एखाद्याला म्हणायचं असेल तर का आवडला नाही याची 1 - 2 तरी पटण्यासारखी कारणं देता यायला हवीत .. स्टोरीचा अंदाज यायला प्रत्येकाला कमी - अधिक वेळ लागेल पण तो यायच्या पूर्वीच " वाईट आहे " असा शिक्का मारू नका असं सांगायचं आहे , 10 - 15 मिनिटं चित्रपट पाहून किंवा 6 -7 पानं वाचल्यानंतर हे आवडणार नाही याची खात्री पटलीतर ठीक आहे किंवा ते जेनरच आवडत नसेल तर तेही ठीक आहे ... पहाच असा आग्रह अजिबात नाही . पण एखादी लोकप्रिय कलाकृती जेव्हा तुम्ही स्वतःहून पाहायला घेता ( कुतूहला पोटीही असेल की का एवढं चांगलं म्हणत आहेत अमुक कलाकृतीला ) तेव्हा ते काय आहे हे समजल्याशिवाय " आवडलं नाही " हा शिक्का मारू नका, आधी समजून घेण्याचा प्रयत्न करा , समजल्यावर आवडण्याचे चान्सेस वाढतील असं मला वाटतं .

एखादी गोष्ट करून न बघताच दिसकार्ड करणे, नुसतीच जीवाच्या कर्माला म्हणून करून बघणे, न्यूट्रल मनाने करून पाहणे, त्यात इंटरेस्ट निर्माण होई पर्यंत करून बघणे, त्यात प्राविण्य मिळे पर्यंत करून बघणे या वेगवेगळ्या पातळ्यांबद्दल लोकांची गल्लत होते आहे का?
वर सचिन गोट्या खेळण्यात इंटरेस्ट घेत बसला असता तर... वगैरे कमेंट वाचली म्हणून प्रश्न पडलाय.
मला वाटत नाही लेखिका अमुक एक गोष्ट आवडून घ्या असे म्हणते आहे .
पण पुरेशी शिते खाता भाताची परीक्षा करणे बरोबर नाही असे काहीसे त्यांचे म्हणणे आहे.

प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्यावेळी वेगवेगळी अपील होत असते.

समजा मला भोपळ्याची भाजी आवडत नाही, पण म्हणून दर वेळी ती आवडणारच नाही असे गृहीत धरणे चूक आहे, दाक्षिणात्य, पंजाबी, बंगाली पद्धतीने केलेली भाजी कदाचित आवडू शकते. पण ते कळण्यासाठो भाजी चाखण्याचा अनुभव घेत राहायला हवे.
अगदी माझ्या घरीच नेहमीच्या पद्धतीने बनवलेली भाजी असेल तरी कधी मलाच कडकडून भूक लागल्याने चांगली वाटू शकतेच Happy

एखादे गाणे पहिल्या ऐकण्यात अजिबात आवडत नाहीत, नंतर ती भिनत जातात, रहमान च्या बहुतेक गाण्यात मला हा अनुभव येतो.
शेक्सपिअर ची नाटके वाचायला/पाहायला त्याच्या भाषेमुळे आपल्याला कदाचित आवडणार नाहीत, पण तेच कथानक भारतीय संदर्भ घेऊन आले की आवडते, त्या वेळी " शेक्सपिअर च्या नाटकावर आधारित" म्हणून मला आवडणारच नाही असा ग्रह डोक्यात ठेऊन चालणार नाही.

आपल्या सोई सवडीने का होईना पण नवीन अनुभव घेत राहिले पाहिजे.

स्विकारक्षमता म्हणजे acceptability ना? exploration नाही. >> नवीन अनुभवांसाठीची स्वीकार्यक्षमता असे शिर्षक असल्याने मला exploration जास्ती जवळचे वाटले. लेखामधे सुद्धा तोच अर्थ अभिप्रेत दिसत आहे. असो. लेखाचा उद्देश वेगळा दिसत आहे आता.

जुन्या जाणत्या माणसांनी ह्यासाठी "गाढवाचंना गुळाची चव काय" असे म्हणून ठेवले आहेच. आपण फक्तं आपलं गाढव निवडायचं झालं.

निशा,

तुम्हाला हवी ती च कारणे मी द्यावीत, असे कुठे आहे?
आणि मुळात तो GOT हेटर्स क्लब होता. मग तिथल्या एका प्रतिक्रियेवर अख्खा लेख लिहावा, असे का वाटले तुम्हाला?

तुम्हीच मान्य करता आहात की काय बघावे आणि काय नाही हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे.
संपला विषय!

बाकी आता 'मुद्द्यावर गुद्दे!(?)' वादविवाद स्पर्धेचे एकमेव स्पर्धक आणि स्वयंघोषित विजेते इथे येतीलच विषय वाढवायला.

म्हणून हा.मा.शे.प्र.

मूळ लेखातला पॉईंट कळला आणि पटला. काही प्रतिसादही आवडले.
सिम्बा +१
ओपन माईंड - खुलं मन हवं हेच म्हणायचंय ना?

ओपन माईंड - खुलं मन हवं हेच म्हणायचंय ना? >> ओपन माईंड नसण्यापेक्षा सिंगल माईंड असणं हे मुख्य कारण असते अशा लोकांच्या नावडी मागे. अशा लोकांचे फक्त 'हे आवडले नाही' असे नसते तर ते नावड जोपासतात.
ओपन किंवा कोल्ज्ड माईंड (प्रोग्रेसिव किंवा कंझर्वेटिव) असा झगडा जनरेशन वा परिस्थितीमधल्या गॅपमुळे आपोआप येतो. आपले महत्व प्रस्थापित करण्याचे किंवा ह्या झगड्यातून काही लाभ मिळवण्याचे ईप्सित असल्यास जाणूनबुजून देखील असा झगडा ऊभारला जातो.

पण ईथे प्रॉब्लेम सिंगल माईंडेड (singular thought processing) असण्याचा आहे. सिंगल माईंडेड असल्यास (कॉम्लेक्स थॉट प्रोसेस न करू शकणे, आकलनक्षमता, भाषा पूर्णपणे न समजणे ) जे समजले नाही, बुद्धीला झेपले नाही ते ते सगळे वाईट, त्याज्य असा त्रागा केला जातो. जसे काम करण्यात आळशी माणसे असतात ज्यांना कुठलेही काम कटकट वाटते तशीच singular thought असणारी व्यक्ती विचार करण्यात आळशी असते. विचारांना आव्हान, मेंदूला ताण देऊ पाहणारी कुठलीही गोष्ट ते नाकारतात.
ह्यात व्यक्तीमत्वही बराच रोल प्ले करते. एखादा नाही बॉ.. हे काही आपल्याला झेपत नाही म्हणून शांत बसेल. पण ईगोईस्टिक व्यक्ती हे कसे वाईट आहे असे सांगण्याचा, पटवण्याचा प्रयत्न करू पाहते.
अशा सिंगल माईंडेड व्यक्तींपुढे कितीही गॉट गीता वाचा ऊपयोग शून्य.

ऊदा. स्टॉक मार्केट जे मुख्यतः गणित (Computational or Quantitative) आणि काही प्रमाणात मानवी स्वभाव (Behavioral Science) ह्यावर बेतलेले असते ते आपल्याला झेपले नाही की स्टॉक मार्केट म्हणजे जुगार असे ठोकून देत फिरायचे.. खरे तर बहुतांश जुगार सुद्धा गणितावरच आधारलेला असतो.

Pages