नवीन अनुभवांसाठीची स्वीकार्यक्षमता

Submitted by राधानिशा on 31 October, 2019 - 15:17

गेम ऑफ थ्रोन्स हेटर्स क्लब धाग्यावर एका ताईंनी " भंगार वाटलं , एक - दोन मिनिटं पाहून बंद केलं " अशी प्रतिक्रिया दिली आहे .. त्यावरून विचारचक्र सुरू झालं .. यातले बरेचसे विचार आधीही येऊन गेले होते पण या निमित्ताने शब्दात उतरवून काढावेत , आपले आपल्याला स्पष्ट होतील आणि इतरांसमोरही मांडता येतील असं वाटलं ..

1 - 2 मिनिटात एखादी गोष्ट भंगार ठरवणं किंवा सौम्य शब्दात आपल्याला ही गोष्ट आवडणारच नाही असं ठरवणं कितपत योग्य आहे ?

1 - 2 मिनिटं जाऊ द्या , एखादी गोष्ट थोडीशीही समजून घेतल्याशिवाय त्यावर " हे मला आवडलं नाही - आवडणार नाही - हे माझ्या आवडीनिवडीत बसत नाही - मला यात इंटरेस्ट नाही " असे शिक्के मारणं कितपत बरोबर आहे ?

बरोबर याचा अर्थ दुसऱ्या कोणाच्या तरी मताने चूक किंवा बरोबर नाही .. किंवा तसं केल्याने कलाकृतीचा किंवा ती आवडणाऱ्या प्रेक्षक - वाचक यांचा अपमान होतो - तुच्छता दर्शवली जाते .... या अर्थाने म्हणायचं नाहीये मला .

कलाकृतीच असं नाही आयुष्यातल्या इतरही गोष्टी यात आल्या . विशेषतः अशा गोष्टी ज्या बहुसंख्य लोक खूप एन्जॉय करताना दिसत आहेत .

अशी गोष्ट अनुभवून पाहावी , थोडी समजून घेण्याचा प्रयत्न करावा , नाहीच आवडली तर दिली सोडून .. पण जर ती आवडली तर त्यातून त्या लोकांना जो आनंद मिळतो तो आपल्यालाही मिळेल .. पण त्या वाटेलाच गेलं नाही तर तो भाग आपल्याला अनभिज्ञच राहील .

अर्थात असंही म्हणता येऊ शकतं - आमच्या आयुष्यात इतर खूप गोष्टी आहेत ज्या आम्ही एन्जॉय करतो , हे नसलं तरी काही बिघडत नाही आमचं . यावर माझ्याकडे म्हणण्यासारखं काही नाही .

पण आवडीनिवडी एवढ्या सिमेंट सारख्या रिजीड असाव्यात की ज्यात नवीन ऍडिशन / बदलाला वावच नाही हे बरोबर आहे का ? मला खरंच कळत नाही ...

मला मात्र अशा कलाकृती किंवा गोष्टी एन्जॉय करणाऱ्या लोकांचा हेवा वाटतो .. आणि कधीतरी का होईना मला त्या अनुभवता याव्यात अशी माझी इच्छा असते .

लहानपणी आईबाबांनी टीव्हीवर कधीतरी शास्त्रीय गायन चालू असलेला एखादा प्रोग्रॅम लावला की माझी चिडचिड व्हायची ... एकच ओळ सतरा वेळा म्हणतात , काय आवडतं यांना हे असलं कंटाळवाणं गाणं असं वाटायचं ... अर्थात आईबाबांना शास्त्रीय मधलं काही विशेष कळतं असं नाही पण निदान ऐकायला तरी आवडायचं ... माझं मात्र शास्त्रीय संगीत ही अतिशय भंगार गोष्ट आहे असं मत बनून गेलं होतं . आणि शास्त्रीय संगीत गायकांबद्दल उगाच एक अढी बसली मनात ... "थोडी वर्षं जाऊ द्या , कोणी ऐकणार नाही हे फडतूस आ - आ - ऊ - ऊ ... सगळे शास्त्रीय गायक बेकार होऊन जातील " असं मी रागाने मनात म्हणायचे ... ( एकूणच कुठल्याही प्रकारची गाणी भावगीत , भक्तिगीत , हिंदी गाणी हा सुद्धा फार आवडीचा प्रांत नव्हता . सिनेमात गाणं आलं की चॅनेल बदलायचं , गाणं संपलं की पुन्हा लावायचा )

पुढे पुलंच्या काही पुस्तकांत शास्त्रीय गायन - वादनाशी संबंधित माहिती वाचली ... आणि आपण समजतो तसं हे बेकार नाही तर खरं तर खूप भारी आहे ... आणि आपलीच या विषयातली समज अगदी तुटपुंजी असल्याने हे किती भारी आहे , हे आपल्याला समजतही नाही .. हे कळून चुकलं आणि भारी वाईट वाटलं .... बरं ते अमुक राग वगैरे आपल्याला या जन्मात ओळखता येणार नाहीत पण निदान कानाला तरी गोड लागेल , ऐकण्याचा प्रयत्न तरी करू असं म्हटलं .... पुढे अगदी शास्त्रीय गायन - वादन फार आवडलं नाही तरी गाणी ऐकण्याच्या प्रयत्नातून मराठी हिंदी गाणी ऐकण्याची तरी आवड लागली ... काहीतरी थोडंस तरी हाती लागलं .

आम्ही एवढी इंग्रजी पुस्तकं वाचली आहेत किंवा या लेखकाची सगळी पुस्तकं वाचली आहेत , अमुक हा माझा आवडता इंग्रजी लेखक आहे ... असं सांगणाऱ्यांचा मला मनात कुठेतरी थोडासा हेवा वाटतो .. कारण मला लहानपणापासून वाचनाची प्रचंड आवड आहे ... वाचायला यायला लागल्यापासून जे मिळेल आणि रुचेल ते वाचून काढलं आहे . पण मराठी भाषेतलीच . मराठी पुढे सेमी इंग्लिश मिडीयम .. पण इंग्रजी वाचता - बोलता येत नाही याची खंत आहे .. कमीपणा म्हणून नाही पण कशाला तरी आपण मुकतो आहोत या भावनेमुळे .

इंग्रजी मालिका बघायला सुरू केल्या तेव्हा त्या समजणार आहेत की नाही याचीच शंका होती पण जेव्हा संवाद आपल्याला समजत आहेत ( सबटायटल वापरून का असेना ) , स्टोरी समजत आहे हे समजलं तेव्हा केवढा आनंद झाला . जगातले भरपूर लोक एन्जॉय करत असलेली एक गोष्ट आपल्यालाही लाभली , आपण त्या गटात समाविष्ट झालो या विचाराने एक समाधान मिळालं .

इंटरनेटने इंग्रजी भाषेतल्या पुस्तकांचा एवढा खजिना समोर उघडा केला आहे पण मालिकेतल्या संवादांपेक्षा पुस्तकातली भाषा अजून कठीण वाटते ... 4 पानं वाचून शीण येतो ... पण आता पुस्तक वाचणाऱ्यांच्या गटातही सामील व्हायचंच , आपण ह्या पासून वंचित राहता नये असा निश्चय करून वाचनाचे प्रयत्न चालू आहेतच ... काही पुस्तकं वाचली आहेत पण ती सोप्या इंग्रजीतली . जी खरी क्लासिक इंग्रजी - लॉर्ड ऑफ द रिंग्ज / शेरलॉक / स्टीफन किंग सारख्या लेखकांची ती वाचायला अजून जमलेलं नाही ....

3 - 4 वर्षांपूर्वी गेम ऑफ थ्रोन्सचा एक एपिसोड पूर्ण पाहिला .. काडी इतका आवडला नाही , शिसारी आली . डाऊनलोड केलेले 4 एपिसोड न बघता डिलीट केले . त्यानंतर 2 - 3 वर्षं तिकडे वळून पाहिलं नाही .... पण मी सदस्य असलेल्या 4 - 5 चित्रपट - पुस्तक - मालिकांच्या फेबु ग्रुप्स मध्ये आवडत्या सिरिअलचा विषय निघालेला असताना निम्म्याहून अधिक लोक गेम ऑफ थ्रोन्सचं नाव घ्यायचेच .... तेव्हा आपल्या आवडीच्या सिरिअल / पुस्तकं आवडणाऱ्या इतक्या लोकांना ही मालिका आवडते तर ती खरंच एवढी वाईट असेल का - असा प्रश्न पडला ... किमान 10 एपिसोड पहायचेच ; आवडले नाही तरी असं ठरवलं ... 4 - 5 एपिसोड स्टोरीची कल्पना यायला लागले आणि एकदा समजल्यावर 15 दिवसात पूर्ण मालिका पाहून संपवली .

इथे मालिकेचं गुणगान करण्याचा हेतू नाहीये . ज्यांना 4 - 5 किंवा 10 - 1 एपिसोड पाहून पुढे पाहावंसं वाटलं नाही ते लोक आपल्या आवडीनिवडींमध्ये अधिक फ्लेक्सिबल आहेत , अधिक ओपन माईंडेड आहेत आणि आयुष्यात नव्या नव्या गोष्टी अनुभवण्याची त्यांची इच्छा आणि क्षमता दिसून येते .

प्रचंड लोकप्रिय मालिकेचा एक एपिसोड पाहून किंवा प्रचंड लोकप्रिय पुस्तकाची 2 पानं वाचून ते बेकार आहे असं ठरवण्यापूर्वी आणखी थोडासा वेळ खर्ची घालून , थोडसं ओपन माईंडेड होऊन - हे आहे तरी काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करावा , तरी नाही आवडलं तर मग अधिकाराने " मला आवडलं नाही " म्हणता येऊ शकतं . गेम ऑफ थ्रोन्सच्या अनुभवानंतर नवीन मालिका पहायला निवडली तर किमान 4 एपिसोड तरी पाहायचेच , अगदी फार किंवा अजिबात आवडले नाहीत तरी असं ठरवलं .... ब्रेकिंग बॅड आवडत नसताना नेटाने पाहिली आणि जवळपास लास्ट सिजन पर्यंत त्यात गुंतून पाहिली . ऑरेंज इज द न्यू ब्लॅक आवडली नसून 4 एपिसोड पाहिले आणि समजलं ही आपल्याला आवडण्यासारखी नाही ... ( याचा अर्थ मी तिला भंगार म्हणत नाहीये , फक्त मला सूट होणारी नाही , भले अनेकांना आवडत असली तरी . पण हा निष्कर्ष मी 4 एपिसोड नंतर काढला , 5 मिनिटं पाहून नाही . )

मला क्रिकेट , फुटबॉल , टेनिस किंवा कुठल्याही खेळातलं ओ की ठो समजत नाही ... सध्याच्या भारतीय टीम मधल्या सगळ्या प्लेयर्सची नावंही माहीत नाहीत... पण म्हणून मी "ते मॅचबिच बोअर असतं खूप" असं विधान केलं तर किती चुकीचं होईल ... घरात टीव्हीवर मॅच चालू असताना , फोर सिक्स आऊट यांना घरचे उन्मादाने प्रतिक्रिया देत आहेत आणि आपल्या मनाला मात्र त्या उन्मादाचा स्पर्शही होत नाही याचं मला वाईट वाटतं .... कधीतरी ह्या सगळ्या खेळांचे नियम नीट समजून घेऊन , कुठल्यातरी एका टीम किंवा खेळाडूशी भावनिक गुंतवणूक करावी ( फेडरर जिंकला पाहिजे / सेरेना / मारिया/ जोकोविच ) मग आपल्यालाही तो आनंद घेता येईल अशी इच्छा आहे ....

कलाकृतींच्या बाबतीत मला फॅन्टसी जेनर आवडतं तेव्हा डिटेक्टिव्ह - क्राईम - रहस्य किंवा इतर प्रकार मला आवडतच नाहीत हा अट्टाहास घेऊन मी बसले असते तर मला त्या प्रकारातले सिनेमा - मालिका पाहता आणि एन्जॉय करता आल्या नसत्या .

जुनी हिंदी गाणी बोअर - जुने हिंदी चित्रपट कंटाळवाणे असं म्हटलं असतं तर त्यातली काही रत्नं हाती लागली नसती .

तेच इंग्रजी गाण्यांचं .. ह्यात खूप सुंदर गाणी - प्रकार- बँन्ड्स आहेत , हे ऐकून - वाचून माहीत आहे ... पण प्रत्यक्ष ऐकलेली गाणी हाताच्या बोटावर मोजता येण्याएवढीच.. अर्थ कळत नाहीत .. किंवा समजून घेण्याचे विशेष प्रयत्न केलेले नाहीयेत ... आळशीपणा होतो आहे ... पण पुढे वेगवेगळ्या बँड वगैरे बद्दल नीट समजून घेऊन इंग्रजी गाणी ह्या विषयातलं अज्ञान साफ नष्ट करायचं हा निश्चय आहे ... आधी पुस्तकं वाचायला जमू दे नीट मग गाण्यांकडे वळू असा विचार आहे .

इंग्रजीचा प्रश्न नाहीये ... अमुक मालिका वाईट म्हणणारे अस्खलित इंग्रजी बोलत असतील ..

प्रश्न आयुष्यात न अनुभवलेल्या - प्रचंड / मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असलेल्या गोष्टी नीट समजून घेऊन अनुभवण्याचा - एन्जॉय करण्याचा प्रयत्न करून पाहण्याचा आहे .

या इच्छा कधी प्रत्यक्षात येणार आहेत की नाही माहीत नाही पण मला पोहायला शिकायचं आहे , ट्रेकिंग , कॅम्पिंग , किल्ले चढणं , ज्या गोष्टी या आयुष्यात जमण्यासारख्या आहेत त्या अनुभवायच्या आहेत ( हिमालय चढणं नाही जमणार कदाचित पण एखादा उंच दुर्ग तरी चढता येईल ) ...

आयुष्यात नव्या नव्या गोष्टी - निदान बहुसंख्य लोक ज्या गोष्टीतून आनंद मिळवत आहेत हे स्पष्ट दिसत आहे त्या आपण ट्राय तरी करून पहाव्यात ( सिनेमा - मालिका - संगीत - पुस्तकं ह्या गोष्टी तर जवळपास विनामूल्य आहेत , निदान त्या तरी ) , नाहीच रुचल्या तर दिल्या सोडून पण त्या वाटेलाच न जाऊन आपण स्वतःला एका छानशा अनुभवापासून वंचित ठेवणं बरोबर नाही , असं माझं वैयक्तिक मत आहे ... तुमची मतं जाणून घ्यायला आवडेल .

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओके, पण खूप सुंदर चर्चेचे सार काय - नवीन अनुभव स्वीकार करा एक्सेप्ट रामायण- महाभारत. ते माहिती नसेल तर जुनेच अनुभव चालू ठेवा कारण रामायण-महाभारत वाचन ह्या नव्या अनुभवाचा काही फायदा नाही. राईट? Wink Happy

सीमंतिनी, तू काय लिहिलंयस ???? ते प्रोसेस करता करता वॉचडॉग किक करुन गेला. क्लासिक इनफायनाईट लूप आहे हा! Rofl

नवीन अनुभव स्वीकार करा एक्सेप्ट रामायण- महाभारत >>

हे सार अजिबात नाही .. अमुक माहिती असलंच पाहिजे / ते नसलं तर त्या माणसांना लाज वाटली पाहिजे / हेच सगळ्यात ग्रेट आहे / ह्याच्या तुलनेत बाकीचे जे सजेस्ट करत आहेत ते फालतू दर्जाहीन आहे - असे विचार नसतील तर बरं एवढंच .. काय वाचायचं / माहीत करून घ्यायचं हे ज्याचं त्याला ठरवू द्यावं ..

आपल्याला वाटत असेल तर जरूर सांगावं " रामायण महाभारत फार सुंदर आहे , प्रत्येकाने वाचून पहावं असं आहे , तुम्ही अजून वाचलं नसेल तर वाचा / पाहा . " हे सजेशन आहे . मग त्यांना वाटलं तर ते जरून पाहतील / वाचतील .

पण सजेशन आणि आग्रह ह्यामध्ये फरक आहे .. संस्कृती माहीत असलीच पाहिजे हा आग्रह आहे .. तोही एकवेळ ठीक आहे .. कारण आग्रह कोणावर लादता येत नाही .. पण आपलं महाभारत - आपली संस्कृती माहीत नाही आणि इंग्रजी सिरिअलची / पुस्तकाची कसली कौतुकं सांगता हा तुच्छतादर्शक ऍटीट्यूड झाला - जो खटकण्यासारखा आहे . आणि असा संस्कृती माहीत असणं श्रेष्ठ असा ऍटीट्यूड जर असेल तर त्याचं कारण समजावून सांगण्यासाठी संस्कृती माहीत असण्याचे काही फायदे सांगता आले पाहिजेत .. नाहीतर त्याचं श्रेष्ठत्व सिद्ध होत नाही . जनरल नॉलेज हा मुद्दा असेल तर ठीक आहे कारण त्यात श्रेष्ठ कनिष्ठ असा भाव व्यक्त होत नाही .

लेखाचा विषय चांगला होता,
सुरवातीला चर्चा सुद्धा चांगली होत होती.
नंतर धाग्याचे माकड झाले.
आणि ते करण्यात धागाकर्तीचाच सक्रिय सहभाग दिसत आहे

असो....

राधानिशा, Happy जर नवीन अनुभव स्वीकारले पाहिजे ही भूमिका असेल आणि कुणी "आपली संस्कृती माहीत नाही आणि इंग्रजी सिरिअलची / पुस्तकाची कसली कौतुकं सांगता हा तुच्छतादर्शक ऍटीट्यूड" आणला तर त्या "खटकण्यासारख" काय आहे. रोज रोज आयुष्यात किंवा मायबोलीवर लोक तुच्छ ऍटीट्यूड देत आहेत का? नाही, मग हा अनुभव नवा आहे. मग तो का खटकला? कारण असे नकारात्मक अनुभव स्वीकरणे आपला पिंड नाही. मग आपल्याला जर असे नकारात्मक नवे अनुभव स्वीकारणे जमत नसेल तर इतरांनी त्यांच्या दृष्टीने नकारात्मक अनुभव स्वीकारावे ही अपेक्षा ठेवावी का? (हे तुकाराम महाराजांकडे साखर खाणारा मुलगा येतो ती गोष्टीसारखं झालं. त्याला साखर खाऊ नको सांगायला महाराजांनी २१ दिवसानंतर बोलावले. का तर आधी मी साखर सोडली पाहिजे मग सांगितले पाहिजे).

माझी आणि चर्चेतील इतर आयडी यांची काही ओळख नाही. पण आपला डिप्रेशनचा धागा वाचला होता, आवडला होता, आणि ह्या धाग्यावर जरा अपेक्षाभंग झाला म्हणून थोडे स्पष्ट लिहीले. आपण पुढे लिहीत चांगले चांगले लिहीत राहाल आणि मी वाचत राहील. Untill then..

मी ज्या प्रकारचे अनुभव म्हटले होते ( कलाकृती / न केलेली गोष्ट ज्यातून बरेच लोक आनंद घेत आहेत ) आणि तुम्ही ज्या प्रकारचे म्हणत आहात ( आयुष्यात येणारे सकारात्मक / नकारात्मक अनुभव ) हे दोन खूप वेगळ्या प्रकारचे आहेत .

मी म्हटलेल्या अनुभवात ते घेण्याचा त्या व्यक्तीला चॉईस आहे .. ह्या गोष्टीला जर तुम्ही थोडा अधिक वेळ दिलात / समजून घेतलीत तर ही गोष्ट कदाचित तुम्हाला आनंद देऊ शकेल असं सजेशन आहे .. हे तुम्ही केलंच पाहिजे / अनुभवलंच पाहिजे / हे तुम्हाला माहीत असलंच असा आग्रह नाही .

तुच्छतादर्शक ऍटीट्यूड ह्या अनुभवातून कोणालाही आनंद मिळण्याची काही शक्यता नाही किंवा तो घ्यायचा की नाही ठरवण्याची चॉईसही दिली जात नाही , तो लादला जातो . तुच्छतादर्शक भावाच्या श्रेणीत प्रत्यक्ष आयुष्यातल्या अनेक वाईट अनुभवांची भर घालता येईल ... आपल्याला वाईट शब्द वापरल्याचा अनुभव , मारहाण झाल्याचा अनुभव , आर्थिक फसवणूक झाल्याचा अनुभव ...

मी म्हटलेले अनुभव आणि तुम्ही म्हणता आहात त्या प्रकारचे नकारात्मक अनुभव ह्यांचा एकमेकांशी दूर दूरवर काही संबंध नाही / त्यात काहीही साम्य नाही .ह्या प्रकारचे अनुभव हे नवीन म्हणून स्वीकारण्यासारखे नाहीत - ते खटकले तर बोलून दाखवणंच योग्य आहे .

आता GOT किंवा महाभारतावर झालेल्या बोलण्याचा इथे अजिबात काही संबंध नाही , तो विषय पूर्ण संपलेला आहे . तुम्ही जे नवीन अनुभव स्वीकारण्याबद्दल बोललात त्यालाच अनुषंगून दिलेली ही प्रतिक्रिया आहे ... मालिकेला तुच्छ म्हटल्याने मी बोलत आहे असा भलता अर्थ कुणी कृपया काढू नये .

चांगलं लिहिण्याच्या शुभेच्छेकरता धन्यवाद ...

Pages