नवीन अनुभवांसाठीची स्वीकार्यक्षमता

Submitted by राधानिशा on 31 October, 2019 - 15:17

गेम ऑफ थ्रोन्स हेटर्स क्लब धाग्यावर एका ताईंनी " भंगार वाटलं , एक - दोन मिनिटं पाहून बंद केलं " अशी प्रतिक्रिया दिली आहे .. त्यावरून विचारचक्र सुरू झालं .. यातले बरेचसे विचार आधीही येऊन गेले होते पण या निमित्ताने शब्दात उतरवून काढावेत , आपले आपल्याला स्पष्ट होतील आणि इतरांसमोरही मांडता येतील असं वाटलं ..

1 - 2 मिनिटात एखादी गोष्ट भंगार ठरवणं किंवा सौम्य शब्दात आपल्याला ही गोष्ट आवडणारच नाही असं ठरवणं कितपत योग्य आहे ?

1 - 2 मिनिटं जाऊ द्या , एखादी गोष्ट थोडीशीही समजून घेतल्याशिवाय त्यावर " हे मला आवडलं नाही - आवडणार नाही - हे माझ्या आवडीनिवडीत बसत नाही - मला यात इंटरेस्ट नाही " असे शिक्के मारणं कितपत बरोबर आहे ?

बरोबर याचा अर्थ दुसऱ्या कोणाच्या तरी मताने चूक किंवा बरोबर नाही .. किंवा तसं केल्याने कलाकृतीचा किंवा ती आवडणाऱ्या प्रेक्षक - वाचक यांचा अपमान होतो - तुच्छता दर्शवली जाते .... या अर्थाने म्हणायचं नाहीये मला .

कलाकृतीच असं नाही आयुष्यातल्या इतरही गोष्टी यात आल्या . विशेषतः अशा गोष्टी ज्या बहुसंख्य लोक खूप एन्जॉय करताना दिसत आहेत .

अशी गोष्ट अनुभवून पाहावी , थोडी समजून घेण्याचा प्रयत्न करावा , नाहीच आवडली तर दिली सोडून .. पण जर ती आवडली तर त्यातून त्या लोकांना जो आनंद मिळतो तो आपल्यालाही मिळेल .. पण त्या वाटेलाच गेलं नाही तर तो भाग आपल्याला अनभिज्ञच राहील .

अर्थात असंही म्हणता येऊ शकतं - आमच्या आयुष्यात इतर खूप गोष्टी आहेत ज्या आम्ही एन्जॉय करतो , हे नसलं तरी काही बिघडत नाही आमचं . यावर माझ्याकडे म्हणण्यासारखं काही नाही .

पण आवडीनिवडी एवढ्या सिमेंट सारख्या रिजीड असाव्यात की ज्यात नवीन ऍडिशन / बदलाला वावच नाही हे बरोबर आहे का ? मला खरंच कळत नाही ...

मला मात्र अशा कलाकृती किंवा गोष्टी एन्जॉय करणाऱ्या लोकांचा हेवा वाटतो .. आणि कधीतरी का होईना मला त्या अनुभवता याव्यात अशी माझी इच्छा असते .

लहानपणी आईबाबांनी टीव्हीवर कधीतरी शास्त्रीय गायन चालू असलेला एखादा प्रोग्रॅम लावला की माझी चिडचिड व्हायची ... एकच ओळ सतरा वेळा म्हणतात , काय आवडतं यांना हे असलं कंटाळवाणं गाणं असं वाटायचं ... अर्थात आईबाबांना शास्त्रीय मधलं काही विशेष कळतं असं नाही पण निदान ऐकायला तरी आवडायचं ... माझं मात्र शास्त्रीय संगीत ही अतिशय भंगार गोष्ट आहे असं मत बनून गेलं होतं . आणि शास्त्रीय संगीत गायकांबद्दल उगाच एक अढी बसली मनात ... "थोडी वर्षं जाऊ द्या , कोणी ऐकणार नाही हे फडतूस आ - आ - ऊ - ऊ ... सगळे शास्त्रीय गायक बेकार होऊन जातील " असं मी रागाने मनात म्हणायचे ... ( एकूणच कुठल्याही प्रकारची गाणी भावगीत , भक्तिगीत , हिंदी गाणी हा सुद्धा फार आवडीचा प्रांत नव्हता . सिनेमात गाणं आलं की चॅनेल बदलायचं , गाणं संपलं की पुन्हा लावायचा )

पुढे पुलंच्या काही पुस्तकांत शास्त्रीय गायन - वादनाशी संबंधित माहिती वाचली ... आणि आपण समजतो तसं हे बेकार नाही तर खरं तर खूप भारी आहे ... आणि आपलीच या विषयातली समज अगदी तुटपुंजी असल्याने हे किती भारी आहे , हे आपल्याला समजतही नाही .. हे कळून चुकलं आणि भारी वाईट वाटलं .... बरं ते अमुक राग वगैरे आपल्याला या जन्मात ओळखता येणार नाहीत पण निदान कानाला तरी गोड लागेल , ऐकण्याचा प्रयत्न तरी करू असं म्हटलं .... पुढे अगदी शास्त्रीय गायन - वादन फार आवडलं नाही तरी गाणी ऐकण्याच्या प्रयत्नातून मराठी हिंदी गाणी ऐकण्याची तरी आवड लागली ... काहीतरी थोडंस तरी हाती लागलं .

आम्ही एवढी इंग्रजी पुस्तकं वाचली आहेत किंवा या लेखकाची सगळी पुस्तकं वाचली आहेत , अमुक हा माझा आवडता इंग्रजी लेखक आहे ... असं सांगणाऱ्यांचा मला मनात कुठेतरी थोडासा हेवा वाटतो .. कारण मला लहानपणापासून वाचनाची प्रचंड आवड आहे ... वाचायला यायला लागल्यापासून जे मिळेल आणि रुचेल ते वाचून काढलं आहे . पण मराठी भाषेतलीच . मराठी पुढे सेमी इंग्लिश मिडीयम .. पण इंग्रजी वाचता - बोलता येत नाही याची खंत आहे .. कमीपणा म्हणून नाही पण कशाला तरी आपण मुकतो आहोत या भावनेमुळे .

इंग्रजी मालिका बघायला सुरू केल्या तेव्हा त्या समजणार आहेत की नाही याचीच शंका होती पण जेव्हा संवाद आपल्याला समजत आहेत ( सबटायटल वापरून का असेना ) , स्टोरी समजत आहे हे समजलं तेव्हा केवढा आनंद झाला . जगातले भरपूर लोक एन्जॉय करत असलेली एक गोष्ट आपल्यालाही लाभली , आपण त्या गटात समाविष्ट झालो या विचाराने एक समाधान मिळालं .

इंटरनेटने इंग्रजी भाषेतल्या पुस्तकांचा एवढा खजिना समोर उघडा केला आहे पण मालिकेतल्या संवादांपेक्षा पुस्तकातली भाषा अजून कठीण वाटते ... 4 पानं वाचून शीण येतो ... पण आता पुस्तक वाचणाऱ्यांच्या गटातही सामील व्हायचंच , आपण ह्या पासून वंचित राहता नये असा निश्चय करून वाचनाचे प्रयत्न चालू आहेतच ... काही पुस्तकं वाचली आहेत पण ती सोप्या इंग्रजीतली . जी खरी क्लासिक इंग्रजी - लॉर्ड ऑफ द रिंग्ज / शेरलॉक / स्टीफन किंग सारख्या लेखकांची ती वाचायला अजून जमलेलं नाही ....

3 - 4 वर्षांपूर्वी गेम ऑफ थ्रोन्सचा एक एपिसोड पूर्ण पाहिला .. काडी इतका आवडला नाही , शिसारी आली . डाऊनलोड केलेले 4 एपिसोड न बघता डिलीट केले . त्यानंतर 2 - 3 वर्षं तिकडे वळून पाहिलं नाही .... पण मी सदस्य असलेल्या 4 - 5 चित्रपट - पुस्तक - मालिकांच्या फेबु ग्रुप्स मध्ये आवडत्या सिरिअलचा विषय निघालेला असताना निम्म्याहून अधिक लोक गेम ऑफ थ्रोन्सचं नाव घ्यायचेच .... तेव्हा आपल्या आवडीच्या सिरिअल / पुस्तकं आवडणाऱ्या इतक्या लोकांना ही मालिका आवडते तर ती खरंच एवढी वाईट असेल का - असा प्रश्न पडला ... किमान 10 एपिसोड पहायचेच ; आवडले नाही तरी असं ठरवलं ... 4 - 5 एपिसोड स्टोरीची कल्पना यायला लागले आणि एकदा समजल्यावर 15 दिवसात पूर्ण मालिका पाहून संपवली .

इथे मालिकेचं गुणगान करण्याचा हेतू नाहीये . ज्यांना 4 - 5 किंवा 10 - 1 एपिसोड पाहून पुढे पाहावंसं वाटलं नाही ते लोक आपल्या आवडीनिवडींमध्ये अधिक फ्लेक्सिबल आहेत , अधिक ओपन माईंडेड आहेत आणि आयुष्यात नव्या नव्या गोष्टी अनुभवण्याची त्यांची इच्छा आणि क्षमता दिसून येते .

प्रचंड लोकप्रिय मालिकेचा एक एपिसोड पाहून किंवा प्रचंड लोकप्रिय पुस्तकाची 2 पानं वाचून ते बेकार आहे असं ठरवण्यापूर्वी आणखी थोडासा वेळ खर्ची घालून , थोडसं ओपन माईंडेड होऊन - हे आहे तरी काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करावा , तरी नाही आवडलं तर मग अधिकाराने " मला आवडलं नाही " म्हणता येऊ शकतं . गेम ऑफ थ्रोन्सच्या अनुभवानंतर नवीन मालिका पहायला निवडली तर किमान 4 एपिसोड तरी पाहायचेच , अगदी फार किंवा अजिबात आवडले नाहीत तरी असं ठरवलं .... ब्रेकिंग बॅड आवडत नसताना नेटाने पाहिली आणि जवळपास लास्ट सिजन पर्यंत त्यात गुंतून पाहिली . ऑरेंज इज द न्यू ब्लॅक आवडली नसून 4 एपिसोड पाहिले आणि समजलं ही आपल्याला आवडण्यासारखी नाही ... ( याचा अर्थ मी तिला भंगार म्हणत नाहीये , फक्त मला सूट होणारी नाही , भले अनेकांना आवडत असली तरी . पण हा निष्कर्ष मी 4 एपिसोड नंतर काढला , 5 मिनिटं पाहून नाही . )

मला क्रिकेट , फुटबॉल , टेनिस किंवा कुठल्याही खेळातलं ओ की ठो समजत नाही ... सध्याच्या भारतीय टीम मधल्या सगळ्या प्लेयर्सची नावंही माहीत नाहीत... पण म्हणून मी "ते मॅचबिच बोअर असतं खूप" असं विधान केलं तर किती चुकीचं होईल ... घरात टीव्हीवर मॅच चालू असताना , फोर सिक्स आऊट यांना घरचे उन्मादाने प्रतिक्रिया देत आहेत आणि आपल्या मनाला मात्र त्या उन्मादाचा स्पर्शही होत नाही याचं मला वाईट वाटतं .... कधीतरी ह्या सगळ्या खेळांचे नियम नीट समजून घेऊन , कुठल्यातरी एका टीम किंवा खेळाडूशी भावनिक गुंतवणूक करावी ( फेडरर जिंकला पाहिजे / सेरेना / मारिया/ जोकोविच ) मग आपल्यालाही तो आनंद घेता येईल अशी इच्छा आहे ....

कलाकृतींच्या बाबतीत मला फॅन्टसी जेनर आवडतं तेव्हा डिटेक्टिव्ह - क्राईम - रहस्य किंवा इतर प्रकार मला आवडतच नाहीत हा अट्टाहास घेऊन मी बसले असते तर मला त्या प्रकारातले सिनेमा - मालिका पाहता आणि एन्जॉय करता आल्या नसत्या .

जुनी हिंदी गाणी बोअर - जुने हिंदी चित्रपट कंटाळवाणे असं म्हटलं असतं तर त्यातली काही रत्नं हाती लागली नसती .

तेच इंग्रजी गाण्यांचं .. ह्यात खूप सुंदर गाणी - प्रकार- बँन्ड्स आहेत , हे ऐकून - वाचून माहीत आहे ... पण प्रत्यक्ष ऐकलेली गाणी हाताच्या बोटावर मोजता येण्याएवढीच.. अर्थ कळत नाहीत .. किंवा समजून घेण्याचे विशेष प्रयत्न केलेले नाहीयेत ... आळशीपणा होतो आहे ... पण पुढे वेगवेगळ्या बँड वगैरे बद्दल नीट समजून घेऊन इंग्रजी गाणी ह्या विषयातलं अज्ञान साफ नष्ट करायचं हा निश्चय आहे ... आधी पुस्तकं वाचायला जमू दे नीट मग गाण्यांकडे वळू असा विचार आहे .

इंग्रजीचा प्रश्न नाहीये ... अमुक मालिका वाईट म्हणणारे अस्खलित इंग्रजी बोलत असतील ..

प्रश्न आयुष्यात न अनुभवलेल्या - प्रचंड / मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असलेल्या गोष्टी नीट समजून घेऊन अनुभवण्याचा - एन्जॉय करण्याचा प्रयत्न करून पाहण्याचा आहे .

या इच्छा कधी प्रत्यक्षात येणार आहेत की नाही माहीत नाही पण मला पोहायला शिकायचं आहे , ट्रेकिंग , कॅम्पिंग , किल्ले चढणं , ज्या गोष्टी या आयुष्यात जमण्यासारख्या आहेत त्या अनुभवायच्या आहेत ( हिमालय चढणं नाही जमणार कदाचित पण एखादा उंच दुर्ग तरी चढता येईल ) ...

आयुष्यात नव्या नव्या गोष्टी - निदान बहुसंख्य लोक ज्या गोष्टीतून आनंद मिळवत आहेत हे स्पष्ट दिसत आहे त्या आपण ट्राय तरी करून पहाव्यात ( सिनेमा - मालिका - संगीत - पुस्तकं ह्या गोष्टी तर जवळपास विनामूल्य आहेत , निदान त्या तरी ) , नाहीच रुचल्या तर दिल्या सोडून पण त्या वाटेलाच न जाऊन आपण स्वतःला एका छानशा अनुभवापासून वंचित ठेवणं बरोबर नाही , असं माझं वैयक्तिक मत आहे ... तुमची मतं जाणून घ्यायला आवडेल .

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओपन माईंड - खुलं मन
म्हणजे एखाद्याचे मन आपल्या इतके खुले नसू(च) शकते आणि तसं नसायचा त्या व्यक्तीला हक्क आहे ह्या दोन्ही गोष्टी खुल्यामनाने स्विकारता यायला हव्या ना ?

का मागणं लई झालं?

सिम्बा यांचा प्रतिसाद पटला पूर्ण ..

हायझेनबर्ग कुणाला राग येईल असे शब्द प्लिज नाही वापरलेत तर बरं होईल ... ओळखीच्या / दोस्ती खात्यातल्या व्यक्तीशी बोलताना - गाढवापुढे वाचली गीता म्हटलं तर ती विपर्यास करणार नाही , भावार्थ समजून घेईल .. पण इथे तुटपुंजी ओळख असलेल्या प्लॅटफॉर्मवर शब्द जपून वापरले तर बरं , शब्दशः अर्थ घेऊन लोक संतापू शकतात ... आणि धाग्याची परिणीती उद्देश कुणीही दुखावले जाण्यात होऊ नये अशी माझी इच्छा आहे ...

शब्दशः अर्थ घेऊन लोक संतापू शकतात >> जनरल म्हणी आणि ऊद्गारवाचक वाक्ये भावनिक पातळीवर वेगवेगळी प्रोसेस करता न येणे हा पुन्हा थॉट प्रोसेसिंग सिंग्युलर असण्याचा पुरावा होईल की. Proud
तसेही मी कुणाला वैयक्तिक वाटेल असे काही लिहिलेले नाही त्यामुळे कोणी संतापेल असे वाटत नाही. पण सिंग्युलर थॉट प्रोसेसिंग असणार्‍या लोकांचे काही सांगता येत नाही म्हणून तुमच्या विनंतीला मान देऊन बदल करतो.

>>> ण काही गोष्टी नॉट माय कप ऑफ टी म्हणून वगळाव्याशा वाटणारच. त्या वाईट किंवा हलक्या आहेत, म्हणून नव्हे.

पते की बात आणि पूर्ण अनुमोदन. एखादी कलाकृती नाही आवडली तर 'नॉट माय कप ऑफ टी टुडे' इतकंच म्हणावं हेच खरं. आपण अक्षरशः क्षणोक्षणी बदलत असतो. एखाद्या निराळ्या मनःस्थितीत, एखादा निराळा अनुभव येऊन गेल्यावर, आपल्याला तीच कलाकृती निराळ्या तर्‍हेने भावणार नाही याची काय गॅरेन्टी?
प्रत्येक कलाकृती एखाद्या लोलकासारखी असते. ती एकदा घडली की घडली, तिच्यात बदल होणार नसतो, पण तो लोलक निरनिराळ्या ठिकाणांहून, निरनिराळ्या कोनांतून, निरनिराळ्या प्रकाशात निराळा दिसतो आणि एखाद्या कोनातून तो जसा दिसतो तो आवडूही शकतो!

म्हणजे एखाद्याचे मन आपल्या इतके खुले नसू(च) शकते आणि तसं नसायचा त्या व्यक्तीला हक्क आहे ह्या दोन्ही गोष्टी खुल्यामनाने स्विकारता यायला हव्या ना ? > हो . नाही तर आपलंच मन खुलं नाही हे सिद्ध होईल Wink

वेगवेगळ्या आहेत . लेखनशैली त्यांच्यासारखी वाटली असेल तर मी ती मला कॉम्प्लिमेंट समजेन .. त्यांना इन्सल्ट वाटू दे नको ही प्रार्थना Happy ( डू आयडीच्या संशयातून हा प्रश्न पडला नसेल अशी आशा .. ) .

लेख जरा विस्कळित आहे पण मुद्दा पोहोचला. यात लिहीले आहे तसे माझे अनेकदा झालेले आहे - काही नंतर पाहताना "अरे इतके दिवस आपण का प्रयत्न केला नाही पाहायचा" असे वाटल्याची उदाहरणे आहेत, तशीच पुन्हा प्रयत्न करूनही न आवडलेले, न जमलेले अशीही आहेत.

एखादी कलाकृती नाही आवडली तर 'नॉट माय कप ऑफ टी टुडे' इतकंच म्हणावं हेच खरं. आपण अक्षरशः क्षणोक्षणी बदलत असतो. >> टोटली!

>>> काही नंतर पाहताना "अरे इतके दिवस आपण का प्रयत्न केला नाही पाहायचा" असे वाटल्याची उदाहरणे आहेत, तशीच पुन्हा प्रयत्न करूनही न आवडलेले, न जमलेले अशीही आहेत.
अगदी! आणि काही 'हे आपल्याला तेव्हा का बरं इतकं आवडलं असेल' असा प्रश्न नंतर पडलेलीही उदाहरणं आहेत. Happy

हो. नॉट माय कप ऑफ टी टुडे. Happy लेखाचा विचार पटला. कशावरही (मोस्टली) फुली मारायची घाई करू नये.

हर्पेन, फोमो मुळे बघतात हे फारसं पटलं नाही. फोमोमुळे सुरुवात नक्की होते, पण नंतर फक्त फोमो आहे म्हणून शेकडो तास त्यात दिले असं अ‍ॅनेकडॉटली माझ्या बाबतीत तरी नाही होत. मी कित्येक शो फोमो मुळे सुरू केले. त्यातले बहुतांश आवडले आणि बघत राहिलो. आपण समविचारी/ समआवडीच्या लोकांबरोबर आपोआप जुळतो आणि मग आपल्याला फोमो तेच देतात आणि ते आपल्याला साधारण आवडतं.
माबोवर बिगबॉसचा फोमो मला येतो. मग ३-४ आठवडे मी बघतो. पण मग नॉट माय कप ऑफ टी फॉर धिस सीझन म्हणून दोन्ही वेळा सोडून दिला. पण परत पुढचा सीझन आला की काय करायचं हे तेव्हा ठरवेन. मुद्दाम बिग बॉसचं उदाहरण दिलं. Proud

गॉट फक्त फोमो मुळे सुरू केली. पण मग त्यातील कथा आणि मुख्यत्त्वे संवाद फारच आवडू लागले. सध्या एचबीओ सबस्क्रिप्शन बंद आहे, ते घेतलं की रीरन करणार आहे.
२४, लॉस्ट हे शो त्या काळी अजिबात बघितले न्हवते. पण फार ऐकलं होतं. रेफरंसेस मध्ये ऐकायचो. अमेरिकेत आल्यावर २४चा फक्त एक सीझन बघू शकलो. नंतर अजिबात आवडेनाशी झाली. १० वर्षे आधी बघितली असती तर तेव्हा आवडली ही असती. लॉस्ट नेटाने पूर्ण केली. पण केली हे कबुल करायची लाज वाटते. Proud
काही चांगलं असेल तर नक्कीच अनुभव घ्यावा पण बेकार असेल (आणि गाठीशी वेळ असेल) तर आवर्जुन अनुभव घ्यावा. चर्चेत पॅशनेटली मतभेद व्यक्त करता येतात. स्मार्ट जोक करता येतात. दवडलेल्या वेळाचा एकदम सदुपयोग करता येतो. Happy

काही 'हे आपल्याला तेव्हा का बरं इतकं आवडलं असेल' असा प्रश्न नंतर पडलेलीही उदाहरणं आहेत >> हो हे माझे बरेचदा होते Happy नॉट माय कप ऑफ टी टुडे ही कॉन्सेप्ट पटली.

काही चांगलं असेल तर नक्कीच अनुभव घ्यावा पण बेकार असेल (आणि गाठीशी वेळ असेल) तर आवर्जुन अनुभव घ्यावा. चर्चेत पॅशनेटली मतभेद व्यक्त करता येतात. स्मार्ट जोक करता येतात. दवडलेल्या वेळाचा एकदम सदुपयोग करता येतो. Happy >>कोलोरॅडोचा "ग्रीन टी" पिऊन मायबोलीवर लिहायला घेतले की अगदी असेच होते... ते ही विनासायास, एकदा अनुभव घेऊन बघच. Proud

पकड न घेतल्यामुळे नाही पण हंगर गेम्स पहिल्या सिनेमात कॅटलीन हरणाची शिकार करत असते हे दृश्य आहे , ते पाहून मी डोक्यात राख घातली आणि 2 मिनिटाच्या आत बंद केला . >> कॅटलीन नव्हे ... कॅटनिस.

ट्राय किया नही जाता, हो जाता है....
पाडगांवकरांची एक ओळ आहे - फुलपाखरू झाल्याखेरीज फूल नसतं आपलं... ज्याचा जसा पिंड तशा त्याच्या आवडी. त्या पलिकडे शोधाशोध करणे म्हणजे गवताच्या गंजीत सुई शोधणे. सापडेलही पण वेळ, श्रम, आणि पैसा ह्याचे त्रैराशिक गडबडेल....

स्वतःचा पिंडं माहित असता तर आणखी काय हवं होतं? Happy
पिंडं स्टॅटिक सिंग्युलर न रहाता व्हेरिएबल डिक्लेअर झालाय. Happy

पण हे केवळ ज्याची त्याची आवड कॅटेगरीबद्दल नाही. तो वरती उल्लेख केलेला "टुडे" महत्त्वाचा आहे. नंतर आपल्यालाच वाटते की अरे आपण हे आधी कसे मिस केले.

Shrek मधल्या त्या ऑल स्टार गाण्याच्या ओळी आठवतात Happy
So much to do, so much to see
So what's wrong with taking the back streets?
You'll never know if you don't go (go!)

व्हेरियेबल असणं हा ही एक प्रकारचा पिंडच आहे >> Lol
भल्या भल्या लोकांनी म्हणुन ठेवलंच आहे ना. की गंजीत सुई मिळाली तर बेस्टच. पण ती मिळे पर्यंतची शोधाशोध (सुई मिळाल्यावर (... हे सांगायचं ते भले भले लोक विसरतात ) हाईंड साईट मध्ये) जास्त मजा देते. Proud

लेख पुर्ण वाचला नाही पण...

1 - 2 मिनिटात एखादी गोष्ट भंगार ठरवणं किंवा सौम्य शब्दात आपल्याला ही गोष्ट आवडणारच नाही असं ठरवणं कितपत योग्य आहे ?

हे जमलेच पाहिजे !

आयुष्य लिमिटेड असते. असले निर्णय घेऊन झटपट पुढच्या
एखाद्या नवीन गोष्टीकडे वळता आले पाहिजे.

<<<
1 - 2 मिनिटात एखादी गोष्ट भंगार ठरवणं किंवा सौम्य शब्दात आपल्याला ही गोष्ट आवडणारच नाही असं ठरवणं कितपत योग्य आहे ?

1 - 2 मिनिटं जाऊ द्या , एखादी गोष्ट थोडीशीही समजून घेतल्याशिवाय त्यावर " हे मला आवडलं नाही - आवडणार नाही - हे माझ्या आवडीनिवडीत बसत नाही - मला यात इंटरेस्ट नाही " असे शिक्के मारणं कितपत बरोबर आहे ?
>>>

कदाचित ती प्रतिक्षिप्त क्रिया असेल. मनात आलेला विचार पटकन बोलून दाखवला इतकेच. एखादी कलाकृती आवडते की नाही, हे ५ मिनिटात कळतेच की. एक उदाहरण देतो: पॉल क्ली हा स्विस कलाकार खूप प्रख्यात आहे, असे ऐकून होतो म्हणून मुद्दाम बर्नला त्याच्या म्युझियममध्ये गेलो. पहिल्या ७-८ फ्रेममध्येच माझ्या मनात पण अगदी हाच विचार आला की "काय फालतू आहे". पण आता आलोच आहे, निव्वळ या कारणासाठी २-३ तास घालवून पूर्ण म्युझियम बघितले पण वेळ वाया गेला असेच वाटले.

गेम ऑफ थ्रोन्स हेटर्स क्लब धाग्यावर आलेली प्रतिक्रिया तुमच्या अपेक्षेनुसार न्हवती म्हणून तुम्हाला ती "फालतू" असं लिहिलेली प्रतिक्रिया आवडली नाही, असा तर प्रकार नसेल ना?

फरक इतकाच आहे की आपण बर्याचदा आपले मत स्पष्ट आणि लगेच सांगत नाही. उदा. एखाद्या कडे जेवायला गेलो तर २-४ घासातच कळते की जेवण उत्तम आहे की ठीकठाक आहे की यथातथा आहे. त्याच्यासाठी पूर्ण जेवण संपायची गरज नसते. फक्त आपण ते बोलून दाखवत नाही इतकेच.

<<< अशी गोष्ट अनुभवून पाहावी , थोडी समजून घेण्याचा प्रयत्न करावा , नाहीच आवडली तर दिली सोडून .. पण जर ती आवडली तर त्यातून त्या लोकांना जो आनंद मिळतो तो आपल्यालाही मिळेल .. पण त्या वाटेलाच गेलं नाही तर तो भाग आपल्याला अनभिज्ञच राहील . >>>
प्रश्न हा आहे की मी मुद्दाम वाट वाकडी करून अशी काही गोष्ट अनुभवून पाहावी का? व्यक्तिशः मला नेहमी जाणवते की माझ्याकडे या जगात लिमिटेड वेळ आहे, त्यामुळे मी तो वेळ मला आवडेल त्या गोष्टीत घालवतो. जर मला माहीत असेल की मला काय आवडते तर मी मुद्दाम नवीन काही अनुभवण्यात माझा वेळ घालवावा का? त्यामुळे माझे मत माधव यांनी दिलेल्या प्रतिसादाशी सहमत आहे.

लिमिटेड वेळ हा खरंच लिमिटेड आहे का यावर परत विचार करावा. कुणाचा असेल किंवा कुणाचा नसेल ही. माझ्या बाबतीत तो नाहीये असं लक्षात आलंय. ट्राय केलं आणि आवडलं की अचानक अनलिमिटेड वेळ दिसलाय मला.
मी बराच वेळ फुकट दवडतो. भारी गोष्टी सापडल्या की हा वेळ फ्री अप होतो. अगदी सिरियलाईझ केल्या तरी सगळ्या गोष्टी होतील इतका वेळ माझ्या आयुष्यात आहे. नॉक नॉक. अर्थात कधी एकदम आहे चा नाही होईल ते सांगता येणार नाहीच. Happy

( पण आवडीनिवडी एवढ्या सिमेंट सारख्या रिजीड असाव्यात की ज्यात नवीन ऍडिशन / बदलाला वावच नाही हे बरोबर आहे का ? मला खरंच कळत नाही ... )

उपाशी बोका , तुम्ही जे लिहिलं आहे तोच विचार अंधुकसं माझ्या मनात आला होता की मला काय आवडतं हे एखाद्याला पक्कं माहीत असेल तर ते चांगलं की वाईट ? म्हणूनच मी मला खरंच कळत नाही असं लिहिलं आहे .

पण वरचे काही जणांचे प्रतिसाद वाचून - सुरुवातीला लगेच आवडणारी गोष्ट नंतर आवडली असं होणारेही बरेच लोक जगात आहेत ... तेव्हा ही गोष्ट व्यक्तिसापेक्ष म्हणावी लागेल . आणि कलाकृती 5 मिनिटात आवडेल की अर्धा तास हे त्या त्या कलाकृती वर आणि त्या त्या व्यक्तीवरही अवलंबून आहे , सरसकटीकरण करता येणार नाही .

प्रतिक्रिया मला आवडली नाही खरं आहे . पण वाईट म्हटलं आहे म्हणून नाही . त्यांनी मालिकेचे 2 -3 एपिसोड / किमान 1 एपिसोड बघून आणखी 100 वाईट शब्द वापरले असते तरी मला काही वाटलं नसतं .. तिथे इतर लोकांनी 1 सिजन पाहून कंटाळा आला वगैरे म्हटलंच आहे की , त्यांच्या प्रतिक्रिया मला आवडल्या नाहीत असं काही झालं नाही .. शिवाय तो माझा धागाही नाही .. माझ्या गॉट वरच्या धाग्यावर तो अर्धा / पूर्ण वाचून - हे फार कंटाळवाणं वाटतं आहे , मला आवडणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली असती तरी मला वाईट वाटलं नसतं .... पण सुरुवातीची 10 मिनिटं ( ज्यात कथानकाचा काहीच अंदाज येत नाही ) पाहून त्यांनी वाईट ठरवली हे पाहून थोडंसं फ्रस्टेट व्हायला झालं .... कल्पना करा तुम्ही मित्राजवळ तुम्हाला खूप आवडलेल्या एखाद्या चित्रपटाची खूप स्तुती केली आहे आणि तो पहिली 5 - 7 मिनिटं बघून बंद करून टाकतो तर तुम्हाला काय वाटेल .. ( तुमचा स्वभाव वेगळा असेल , तुम्हाला काही वाटणारही नाही , पण मला मात्र फ्रस्टेटेड वाटेल ) पण तेवढंच कारण नव्हतं हा धागा काढण्याचं ... इथे बाकीही अनेक लोकं असतील जी आयुष्यातल्या अनेक अनुभवांवर आधीच आवडणार नाही हा शिक्का मारून 4 हात लांब राहत असतील ... त्यांनी क्षणभर तरी आत्मावलोकन करावं , कदाचित एखाद्या अनुभवाच्या बाबतीत ते वाईट ठरवण्याची घाई न करता थोडा वेळ देतील .. आणि तो अनुभव त्यांना काहीतरी चांगलं देईल मग ते मनोरंजन असेल किंवा वेगळ्या प्रकारचा आनंद ... म्हणून धागा काढला ... त्या ताईंशी वाद घालायचा उद्देश असता तर त्याच धाग्यावर घातला असता .

ट्राय केलं आणि आवडलं की अचानक अनलिमिटेड वेळ दिसलाय मला.
>>>>

आवडलं तर ...

पण आवडल नाही तर पुढे जाऊन आवडेल या भरवश्यावर किती वेळ द्ययचा हा ईथे प्रश्न आहे. लिमिटेड वेळ ईथे पिक्चरमध्ये येतो.

> मला काय आवडतं हे एखाद्याला पक्कं माहीत असेल तर ते चांगलं की वाईट ? > चांगलंच आहे. त्यांच्या स्वतःसाठी. फायदा/नुकसान जेकाही होणार ते त्यांचं होणार आहे, त्यांच्या स्वतःच्या निर्णयामुळे. As long as they are okay with it, others shouldn't have any problem. कळपप्रवृत्तीमुळे गर्दीचा भाग बनण्यापेक्षा किंवा उच्चभ्रू(स्वघोषित?) च्या दबावाखाली येऊन, स्वतःची इच्छा नसताना काहीतरी करण्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःपुरता पटकन निर्णय घेतलेला चांगलाच आहे.

Pages