नवीन अनुभवांसाठीची स्वीकार्यक्षमता

Submitted by राधानिशा on 31 October, 2019 - 15:17

गेम ऑफ थ्रोन्स हेटर्स क्लब धाग्यावर एका ताईंनी " भंगार वाटलं , एक - दोन मिनिटं पाहून बंद केलं " अशी प्रतिक्रिया दिली आहे .. त्यावरून विचारचक्र सुरू झालं .. यातले बरेचसे विचार आधीही येऊन गेले होते पण या निमित्ताने शब्दात उतरवून काढावेत , आपले आपल्याला स्पष्ट होतील आणि इतरांसमोरही मांडता येतील असं वाटलं ..

1 - 2 मिनिटात एखादी गोष्ट भंगार ठरवणं किंवा सौम्य शब्दात आपल्याला ही गोष्ट आवडणारच नाही असं ठरवणं कितपत योग्य आहे ?

1 - 2 मिनिटं जाऊ द्या , एखादी गोष्ट थोडीशीही समजून घेतल्याशिवाय त्यावर " हे मला आवडलं नाही - आवडणार नाही - हे माझ्या आवडीनिवडीत बसत नाही - मला यात इंटरेस्ट नाही " असे शिक्के मारणं कितपत बरोबर आहे ?

बरोबर याचा अर्थ दुसऱ्या कोणाच्या तरी मताने चूक किंवा बरोबर नाही .. किंवा तसं केल्याने कलाकृतीचा किंवा ती आवडणाऱ्या प्रेक्षक - वाचक यांचा अपमान होतो - तुच्छता दर्शवली जाते .... या अर्थाने म्हणायचं नाहीये मला .

कलाकृतीच असं नाही आयुष्यातल्या इतरही गोष्टी यात आल्या . विशेषतः अशा गोष्टी ज्या बहुसंख्य लोक खूप एन्जॉय करताना दिसत आहेत .

अशी गोष्ट अनुभवून पाहावी , थोडी समजून घेण्याचा प्रयत्न करावा , नाहीच आवडली तर दिली सोडून .. पण जर ती आवडली तर त्यातून त्या लोकांना जो आनंद मिळतो तो आपल्यालाही मिळेल .. पण त्या वाटेलाच गेलं नाही तर तो भाग आपल्याला अनभिज्ञच राहील .

अर्थात असंही म्हणता येऊ शकतं - आमच्या आयुष्यात इतर खूप गोष्टी आहेत ज्या आम्ही एन्जॉय करतो , हे नसलं तरी काही बिघडत नाही आमचं . यावर माझ्याकडे म्हणण्यासारखं काही नाही .

पण आवडीनिवडी एवढ्या सिमेंट सारख्या रिजीड असाव्यात की ज्यात नवीन ऍडिशन / बदलाला वावच नाही हे बरोबर आहे का ? मला खरंच कळत नाही ...

मला मात्र अशा कलाकृती किंवा गोष्टी एन्जॉय करणाऱ्या लोकांचा हेवा वाटतो .. आणि कधीतरी का होईना मला त्या अनुभवता याव्यात अशी माझी इच्छा असते .

लहानपणी आईबाबांनी टीव्हीवर कधीतरी शास्त्रीय गायन चालू असलेला एखादा प्रोग्रॅम लावला की माझी चिडचिड व्हायची ... एकच ओळ सतरा वेळा म्हणतात , काय आवडतं यांना हे असलं कंटाळवाणं गाणं असं वाटायचं ... अर्थात आईबाबांना शास्त्रीय मधलं काही विशेष कळतं असं नाही पण निदान ऐकायला तरी आवडायचं ... माझं मात्र शास्त्रीय संगीत ही अतिशय भंगार गोष्ट आहे असं मत बनून गेलं होतं . आणि शास्त्रीय संगीत गायकांबद्दल उगाच एक अढी बसली मनात ... "थोडी वर्षं जाऊ द्या , कोणी ऐकणार नाही हे फडतूस आ - आ - ऊ - ऊ ... सगळे शास्त्रीय गायक बेकार होऊन जातील " असं मी रागाने मनात म्हणायचे ... ( एकूणच कुठल्याही प्रकारची गाणी भावगीत , भक्तिगीत , हिंदी गाणी हा सुद्धा फार आवडीचा प्रांत नव्हता . सिनेमात गाणं आलं की चॅनेल बदलायचं , गाणं संपलं की पुन्हा लावायचा )

पुढे पुलंच्या काही पुस्तकांत शास्त्रीय गायन - वादनाशी संबंधित माहिती वाचली ... आणि आपण समजतो तसं हे बेकार नाही तर खरं तर खूप भारी आहे ... आणि आपलीच या विषयातली समज अगदी तुटपुंजी असल्याने हे किती भारी आहे , हे आपल्याला समजतही नाही .. हे कळून चुकलं आणि भारी वाईट वाटलं .... बरं ते अमुक राग वगैरे आपल्याला या जन्मात ओळखता येणार नाहीत पण निदान कानाला तरी गोड लागेल , ऐकण्याचा प्रयत्न तरी करू असं म्हटलं .... पुढे अगदी शास्त्रीय गायन - वादन फार आवडलं नाही तरी गाणी ऐकण्याच्या प्रयत्नातून मराठी हिंदी गाणी ऐकण्याची तरी आवड लागली ... काहीतरी थोडंस तरी हाती लागलं .

आम्ही एवढी इंग्रजी पुस्तकं वाचली आहेत किंवा या लेखकाची सगळी पुस्तकं वाचली आहेत , अमुक हा माझा आवडता इंग्रजी लेखक आहे ... असं सांगणाऱ्यांचा मला मनात कुठेतरी थोडासा हेवा वाटतो .. कारण मला लहानपणापासून वाचनाची प्रचंड आवड आहे ... वाचायला यायला लागल्यापासून जे मिळेल आणि रुचेल ते वाचून काढलं आहे . पण मराठी भाषेतलीच . मराठी पुढे सेमी इंग्लिश मिडीयम .. पण इंग्रजी वाचता - बोलता येत नाही याची खंत आहे .. कमीपणा म्हणून नाही पण कशाला तरी आपण मुकतो आहोत या भावनेमुळे .

इंग्रजी मालिका बघायला सुरू केल्या तेव्हा त्या समजणार आहेत की नाही याचीच शंका होती पण जेव्हा संवाद आपल्याला समजत आहेत ( सबटायटल वापरून का असेना ) , स्टोरी समजत आहे हे समजलं तेव्हा केवढा आनंद झाला . जगातले भरपूर लोक एन्जॉय करत असलेली एक गोष्ट आपल्यालाही लाभली , आपण त्या गटात समाविष्ट झालो या विचाराने एक समाधान मिळालं .

इंटरनेटने इंग्रजी भाषेतल्या पुस्तकांचा एवढा खजिना समोर उघडा केला आहे पण मालिकेतल्या संवादांपेक्षा पुस्तकातली भाषा अजून कठीण वाटते ... 4 पानं वाचून शीण येतो ... पण आता पुस्तक वाचणाऱ्यांच्या गटातही सामील व्हायचंच , आपण ह्या पासून वंचित राहता नये असा निश्चय करून वाचनाचे प्रयत्न चालू आहेतच ... काही पुस्तकं वाचली आहेत पण ती सोप्या इंग्रजीतली . जी खरी क्लासिक इंग्रजी - लॉर्ड ऑफ द रिंग्ज / शेरलॉक / स्टीफन किंग सारख्या लेखकांची ती वाचायला अजून जमलेलं नाही ....

3 - 4 वर्षांपूर्वी गेम ऑफ थ्रोन्सचा एक एपिसोड पूर्ण पाहिला .. काडी इतका आवडला नाही , शिसारी आली . डाऊनलोड केलेले 4 एपिसोड न बघता डिलीट केले . त्यानंतर 2 - 3 वर्षं तिकडे वळून पाहिलं नाही .... पण मी सदस्य असलेल्या 4 - 5 चित्रपट - पुस्तक - मालिकांच्या फेबु ग्रुप्स मध्ये आवडत्या सिरिअलचा विषय निघालेला असताना निम्म्याहून अधिक लोक गेम ऑफ थ्रोन्सचं नाव घ्यायचेच .... तेव्हा आपल्या आवडीच्या सिरिअल / पुस्तकं आवडणाऱ्या इतक्या लोकांना ही मालिका आवडते तर ती खरंच एवढी वाईट असेल का - असा प्रश्न पडला ... किमान 10 एपिसोड पहायचेच ; आवडले नाही तरी असं ठरवलं ... 4 - 5 एपिसोड स्टोरीची कल्पना यायला लागले आणि एकदा समजल्यावर 15 दिवसात पूर्ण मालिका पाहून संपवली .

इथे मालिकेचं गुणगान करण्याचा हेतू नाहीये . ज्यांना 4 - 5 किंवा 10 - 1 एपिसोड पाहून पुढे पाहावंसं वाटलं नाही ते लोक आपल्या आवडीनिवडींमध्ये अधिक फ्लेक्सिबल आहेत , अधिक ओपन माईंडेड आहेत आणि आयुष्यात नव्या नव्या गोष्टी अनुभवण्याची त्यांची इच्छा आणि क्षमता दिसून येते .

प्रचंड लोकप्रिय मालिकेचा एक एपिसोड पाहून किंवा प्रचंड लोकप्रिय पुस्तकाची 2 पानं वाचून ते बेकार आहे असं ठरवण्यापूर्वी आणखी थोडासा वेळ खर्ची घालून , थोडसं ओपन माईंडेड होऊन - हे आहे तरी काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करावा , तरी नाही आवडलं तर मग अधिकाराने " मला आवडलं नाही " म्हणता येऊ शकतं . गेम ऑफ थ्रोन्सच्या अनुभवानंतर नवीन मालिका पहायला निवडली तर किमान 4 एपिसोड तरी पाहायचेच , अगदी फार किंवा अजिबात आवडले नाहीत तरी असं ठरवलं .... ब्रेकिंग बॅड आवडत नसताना नेटाने पाहिली आणि जवळपास लास्ट सिजन पर्यंत त्यात गुंतून पाहिली . ऑरेंज इज द न्यू ब्लॅक आवडली नसून 4 एपिसोड पाहिले आणि समजलं ही आपल्याला आवडण्यासारखी नाही ... ( याचा अर्थ मी तिला भंगार म्हणत नाहीये , फक्त मला सूट होणारी नाही , भले अनेकांना आवडत असली तरी . पण हा निष्कर्ष मी 4 एपिसोड नंतर काढला , 5 मिनिटं पाहून नाही . )

मला क्रिकेट , फुटबॉल , टेनिस किंवा कुठल्याही खेळातलं ओ की ठो समजत नाही ... सध्याच्या भारतीय टीम मधल्या सगळ्या प्लेयर्सची नावंही माहीत नाहीत... पण म्हणून मी "ते मॅचबिच बोअर असतं खूप" असं विधान केलं तर किती चुकीचं होईल ... घरात टीव्हीवर मॅच चालू असताना , फोर सिक्स आऊट यांना घरचे उन्मादाने प्रतिक्रिया देत आहेत आणि आपल्या मनाला मात्र त्या उन्मादाचा स्पर्शही होत नाही याचं मला वाईट वाटतं .... कधीतरी ह्या सगळ्या खेळांचे नियम नीट समजून घेऊन , कुठल्यातरी एका टीम किंवा खेळाडूशी भावनिक गुंतवणूक करावी ( फेडरर जिंकला पाहिजे / सेरेना / मारिया/ जोकोविच ) मग आपल्यालाही तो आनंद घेता येईल अशी इच्छा आहे ....

कलाकृतींच्या बाबतीत मला फॅन्टसी जेनर आवडतं तेव्हा डिटेक्टिव्ह - क्राईम - रहस्य किंवा इतर प्रकार मला आवडतच नाहीत हा अट्टाहास घेऊन मी बसले असते तर मला त्या प्रकारातले सिनेमा - मालिका पाहता आणि एन्जॉय करता आल्या नसत्या .

जुनी हिंदी गाणी बोअर - जुने हिंदी चित्रपट कंटाळवाणे असं म्हटलं असतं तर त्यातली काही रत्नं हाती लागली नसती .

तेच इंग्रजी गाण्यांचं .. ह्यात खूप सुंदर गाणी - प्रकार- बँन्ड्स आहेत , हे ऐकून - वाचून माहीत आहे ... पण प्रत्यक्ष ऐकलेली गाणी हाताच्या बोटावर मोजता येण्याएवढीच.. अर्थ कळत नाहीत .. किंवा समजून घेण्याचे विशेष प्रयत्न केलेले नाहीयेत ... आळशीपणा होतो आहे ... पण पुढे वेगवेगळ्या बँड वगैरे बद्दल नीट समजून घेऊन इंग्रजी गाणी ह्या विषयातलं अज्ञान साफ नष्ट करायचं हा निश्चय आहे ... आधी पुस्तकं वाचायला जमू दे नीट मग गाण्यांकडे वळू असा विचार आहे .

इंग्रजीचा प्रश्न नाहीये ... अमुक मालिका वाईट म्हणणारे अस्खलित इंग्रजी बोलत असतील ..

प्रश्न आयुष्यात न अनुभवलेल्या - प्रचंड / मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असलेल्या गोष्टी नीट समजून घेऊन अनुभवण्याचा - एन्जॉय करण्याचा प्रयत्न करून पाहण्याचा आहे .

या इच्छा कधी प्रत्यक्षात येणार आहेत की नाही माहीत नाही पण मला पोहायला शिकायचं आहे , ट्रेकिंग , कॅम्पिंग , किल्ले चढणं , ज्या गोष्टी या आयुष्यात जमण्यासारख्या आहेत त्या अनुभवायच्या आहेत ( हिमालय चढणं नाही जमणार कदाचित पण एखादा उंच दुर्ग तरी चढता येईल ) ...

आयुष्यात नव्या नव्या गोष्टी - निदान बहुसंख्य लोक ज्या गोष्टीतून आनंद मिळवत आहेत हे स्पष्ट दिसत आहे त्या आपण ट्राय तरी करून पहाव्यात ( सिनेमा - मालिका - संगीत - पुस्तकं ह्या गोष्टी तर जवळपास विनामूल्य आहेत , निदान त्या तरी ) , नाहीच रुचल्या तर दिल्या सोडून पण त्या वाटेलाच न जाऊन आपण स्वतःला एका छानशा अनुभवापासून वंचित ठेवणं बरोबर नाही , असं माझं वैयक्तिक मत आहे ... तुमची मतं जाणून घ्यायला आवडेल .

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निशा,

मुळात तुम्ही GOT fan आहात, असे दिसते. म्हणून GOT हेटर्स क्लब वर जाऊच नये, हा नम्र सल्ला.
एका प्रतिसादामुळे इतक्या दुखावल्या जालं, असे वाटले नव्हते. तसा उद्देशही नव्हता. मुळात हेटर्स क्लब वर फॅनने का जावे? आणि जाऊन आलात तरी तिथल्या प्रतिक्रिया इतक्या मनाला का लावून घ्याव्यात?

..... आणि वाद मलाही घालायचा नाही, पण त्या एका प्रतिक्रियेवर एक धागाच काढलात तेव्हा मला वाटले की तुम्हाला ती प्रतिक्रिया आवडली नाही म्हणून लिहिलेत. पण आता तुमची प्रतिक्रिया वाचून वाटते आहे की खूपच मनाला लागले तुमच्या.
म्हणून प्रतिसाद देते आहे.
तो हेटर्स क्लबच आहे. तिथे टिका होणारच! तुम्ही हा धागा काढण्या ऐवजी GOT fan क्लब काढला असता तर एव्हाना GOT आवडणारे अनेक जण आले असते तिथे (सकारात्मक) प्रतिक्रिया द्यायला. तसा क्लब तुम्ही अजूनही काढू शकता. Happy

ऋन्मेष, उपाशी बोका, माधव,

मुद्दे पटले. छान लिहिले आहेत.

टुडे ची अ‍ॅडिशन पटली.

अमु क तमुक आवडून घेतलं पाहिजे किंवा पाहिलं / अनुभवलं पाहिजे - त्याची कारणंआणि, ही आणि ही आहेत.
तसंच तमुक तमुक आवडता कामा नये किंवा निवडू नये किंवा किमान अमुकच्या आधी तरी ठेवू नये ... या, या आणि या कारणांसाठी.

अशी विधानं हे या लेखामागचं कारण असावं.
अर्थात समजून घेणं हाही एक चॉइस , एक पिंड असेल तर हे सगळ्यांना समजेलच असं नाही.

मी दुखावले गेलेले नाही .. मनाला वगैरेही लागलेलं नाही...
पूर्वीही टीव्हीवर क्रिकेट इत्यादी खेळातलं आपल्याला काही समजत नाही , समजणाऱ्यांंना किती आनंद मिळतो , एखाद्या पुस्तकात पत्ते खेळण्याचं वर्णन आलं की हेही आपल्याला येत नाही , लोक किती एन्जॉय करतात - शिकलं तर सहज समजेल आणि आपल्यालाही एन्जॉय करता येईल .... आपण नवीन शिकायचा / अनुभवायचा प्रयत्न न केल्या यापासून वंचित राहिलो आहोत वगैरे विचार होतेच मनात , पण ते विस्कळीत - अंधुक होते .. त्यामुळे लिहून व्यक्त करायचे की नाही हे निश्चित नव्हतं ... तुमची प्रतिक्रिया हे निमित्त झालं पण त्या प्रतिक्रियेवर हा धागा नाहीये .

मी GOT फॅन आहे पण एवढी कट्टर वगैरे नाही की कोणी त्याबद्दल वाईट बोललं तर मला वाईट वाटेल .. माझ्या आवडत्या मालिकांपैकी ती एक आहे एवढंच . आणि मी वर अनेक प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे तुम्ही एक एपिसोड पाहून , कथानक किंचित समजून मग कितीही नावं ठेवली असती तरी मला काहीच वाटलं नसतं ... सुरुवातीच्या 10 मिनिटात कथानकाचा 1 % ही अंदाज येत नाही , ती पाहून वाईट ठरवता आहात हे पटलं नाही ... ते कारण मला जेन्यूईन वाटलं नाही , प्रिज्यूडीस मधून वाईट ठरवली असंही वाटलं इतर भारतीय मालिकांशी तुलना केलेली पाहून .. जेव्हा की तुलना करण्यासाठी त्या दोन्ही फार वेगळ्या गोष्टी आहेत ( comparing apples and oranges ) .

इतर भारतीय मालिकांशी तुलना केलेली पाहून .. जेव्हा की तुलना करण्यासाठी त्या दोन्ही फार वेगळ्या गोष्टी आहेत.>>>>>>> मी कुठे तुलना केली? तुम्ही करत होतात तेव्हा मीच तुम्हाला म्हणाले होते की 'फ्रिजमधल्या कृत्रिम बर्फांची तुलना हिमनगाशी करू नका.'

विदेशी आधी देशी मालिका पहा हा मुद्दा वेगळा आहे. त्यात तुलना नाहीये. Made in India ला सपोर्ट आहे असं समजा. Happy

मी दिलेली कारणे, वैज्ञानिक कारणे नाहीयेत जी सिद्ध करून दाखवता येतील. बरोबर कि नाही?
आवड निवड वेगवेगळी असते प्रत्येकाची.

माझ्या प्रतिसादाचा उल्लेख तुमच्या धाग्यावर आणि तुमच्या प्रतिक्रियांमध्ये जाणवला मला. म्हणून वाटलं की तुम्हाला लागली का काय ती प्रतिक्रिया!

तसं नसेलच तर ठिक आहे. Happy

पाश्चिमात्य Game of thrones हे 100% महाभारत आणि कामसूत्र ह्या दोन भारतीय ग्रंथावर आधारलेले आहे हे सिद्ध करणारे रिसर्च एवढ्यातच वाचनात आले.

असल्या फालतू गोऱ्यांच्या मालिका हे लोक अगदी भक्तीभावाने पाहतात. पण त्यांनी BR चे महाभारत, (जुनी मालिका) रामायण, रामानंदचे श्री कृष्ण मात्र पाहिलेले नसते! आणि मग सांगत सुटायचे हॉलिवूड कसे भारी आहे, कसल्या भारी कथा असतात वगैरे वगैरे...... >>

मला वाटलं तुलना केली आहे . बहुतेक माझा गैरसमज झाला . प्रतिक्रिया लागावी एवढी गेम ऑफ थ्रोन्स क्लोज टू हार्ट नाही .. लागली असती तर तसंही सरळ सांगितलं असतं ...

{मी कुठे तुलना केली? तुम्ही करत होतात तेव्हा मीच तुम्हाला म्हणाले होते की 'फ्रिजमधल्या कृत्रिम बर्फांची तुलना हिमनगाशी करू नका.'}
तुलना करू नका म्हणत तुलनाच केलीय की.

मला वाटलं तुलना केली आहे . >>>>>> स्वदेशी अभियान होतं ते. Lol Make in India!
स्वदेशी न पाहता विदेशी कलाकृती पाहणे आणि त्याचेच गुणगान गाणे अयोग्य आहे, हा मुद्दा आहे त्यात.

एका व्हिडिओची लिंक देते. बघा. मजेशीर आहे.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2289054261223577&id=10000357...

हे ऐका ईथे आहे गेम ऑफ थ्रोन्स , महाभारत आणि कामसुत्राचे निरूपण २:३० मिनिटांना संदर्भ येतो.

मग ह्याच महंतांचा अजून एक भारताचा महान ईतिहास आणि महाभारताच्या विषयाला स्पर्श करणारा सत्संग ईथे बघा

हे निरूपण करणारे महंत खूप प्रसिद्ध महंत आहेत बरं. मी ह्यांचे सगळे सत्संग नेहमीच मनोभावे बघतो.

मी मधुरा , व्हिडीओ पाहिला .. हसू आलं ..मजेशीर आहे . ह्या लोकांच्या लहानपणी विदेशी मालिका भारतात नक्कीच नसतील , तरी यांच्या आईबाबा - आजी यांनी रामायण महाभारत सांगितलं नसेल का , वाचनात आलं नसेल का किंवा टीव्ही वरही पाहिलं नसेल का असा प्रश्न पडला ... यांच्या आई बाबांना या प्रश्नांची अचूक उत्तरं देता येतील का , कुणास ठावूक .. त्याबद्दल यांना दुर्दैवी म्हणायचं का असाही प्रश्न पडला ... कारण संस्कृती माहीत नसल्याने भौतिक तरी काही नुकसान झालेलं दिसत नाही .. हसत खेळत बोलत होते म्हणजे चार चौघांसारखंच आयुष्य चालत असावं ... त्यांच्या आईबाबांचं सुद्धा पूर्ण आयुष्य त्यावाचून काही अडलेलं दिसत नाही आणि यांचंही अडताना दिसत नाहीये ... शहरातला व्हिडीओ म्हणून आपण हसतो , काय ही नवी पिढी ... हेच प्रश्न गावातल्या शेतकरी - सुतार - लोहार - इतर कष्टकरी वर्गातल्या लोकांना विचारले तर ते अचूक उत्तरं देतील याची गॅरंटी आहे का ? तरी त्यांची आयुष्यं गेलीच व्यवस्थित ... राम हा देव , कृष्ण हा देव एवढं पुरे झालं त्यांनाही आयुष्यभर ... अख्खी महाकाव्यं माहीत नसल्याने कोणाचं काही अडत नाही .
रामायण महाभारत पूर्ण माहीत असलेल्यांना संस्कृती माहीत असल्याचा अभिमान वगळता नक्की काय फायदा होतो हाही प्रश्न आहे ... कंस कोणाचा मामा हे माहीत असलेल्या कँडीडेटला ते माहीत नसलेल्या कॅन्डीडेट पेक्षा नोकरी देण्यात प्राधान्य दिलं जातं की ऍडमिशनला 4 टक्के कमी आहेत पण त्याला महाभारतातली नाती माहीत आहेत म्हणून ऍडमिशन दिली जाते .... की हे नॉलेज बघून पगार निश्चित होतो ... महाभारत माहीत असलेल्या शेतकऱ्याच्या पिकाला दलाल चार पैसे अधिक देतो का की बँक कर्जमाफी देते ?

संस्कृतीच्या अभिमानाच्या मानसिक समाधानाशिवाय पुराणकथा माहीत असल्याने नक्की काय फायदा होतो हा प्रामाणिक प्रश्न पडला आहे ... बरं माहीत असल्याने किती जण रामासारखे पिताभक्त / वचन पाळणारे किंवा कृष्णासारखे मुत्सद्दी वगैरे होतात हाही एक प्रश्न आहेच .. रामायण तोंडपाठ असलेले वडिलांनी जर " माझ्या ह्या दुसऱ्या बायकोने सांगितलं आहे घर - प्रॉपर्टी - सेविंग्ज माझ्या मुलाच्या नावावर करून द्या , तुमची काही हरकत नाही ना ? " असं विचारलं तर काय प्रतिक्रिया देतील असाही मजेशीर विचार येतो ...

सध्याच्या पिढीला जर प्रत्यक्ष "आयुष्यात काही उपयोग होणार नसेल किंवा मनोरंजनही मिळणार नसेल तर जुन्या ज्ञानात इंटरेस्ट नाही असं या व्हिडिओ वरून वाटतं . स्टार प्लसची महाभारत पाहणारा एकही प्रेक्षक मिळाला नाही प्रश्न विचारणाऱ्यांना ... Sad

मला रामायण महाभारत दोन्ही प्रिय आहेत ... पण ती माहीत नसल्याने जगात / देशात कोणाचं काही बिघडलेलं मला आजवर दिसलेलं नाही . भगवद्गीता न समजणे हे एक नुकसान असू शकतं महाभारत माहीत नसल्याने , माझ्यामते .. पण महाभारत माहीत असलं तरीही भगवद्गीता आयुष्यात इम्प्लिमेंट करू शकणाऱ्यांच्या / करू इच्छिणाऱ्यांच्या संख्येबाबत साशंकताच आहे ... तेव्हा तेही नुकसान फार जणांचं होत नसेल , रामायण महाभारत माहीत नसल्याने . शिवाय चांगल्या कथेपासून जे मनोरंजन मिळालं असतं त्यालाही मुकावं लागलं , .. ठीक आहे पण याबद्दल त्यांना कमीपणा / लाज वाटायला हवी / ते कशाला लायक नाहीत - असं वाटणं बरोबर आहे का ? ( तुम्ही नाही म्हणत , व्हिडीओ पोस्ट करणाऱ्याने कॅप्शन टाकलं आहे , पकोडे तलने के लायक नहीं वगैरे )उत्कृष्ट कलाकृतीच्या आस्वादाला ते मुकले .. पण मनोरंजन / आस्वाद ही गोष्ट तुम्हाला या बाबतीत महत्वाची वाटत नसावी .. संस्कृती माहीत असलीच पाहिजे हा तुमचा आग्रह आहे .. पण का माहीत असली पाहिजे , त्याचा मनोरंजन सोडून इतर काही उपयोग होतो का याबद्दल जाणून घ्यायला आवडेल .

तरी कोणी रामायण महाभारत / जुनी संस्कृती माहीत असल्याचे फायदे नीट समजावून सांगायला तयार असेल तर मी माझी चूक आणि अज्ञान मान्य करायला तयार आहे .

जुन्या मालिका आता यू ट्यूबवर जाऊन पाहिल्याने त्या निर्मात्यांना काही लाभ होतो का?
(मेक इन इंडियाबाबत प्रश्न)

स्वदेशी मालिकांना प्राधान्य द्यायचे असेल तर सध्या टीव्ही - पेड वेब मालिका पहाव्या लागतील ना?

अर्थात स्वदेशीचा मुद्दा कायच्या कायच्या काय आहे.

निशा,

व्हिडिओची लिंक फक्त मनोरंजन म्हणून दिली. अर्थात, काही वाचलेले, पाहिलेले नसेल तरी तोटा होतो की नाही किंवा वाचल्या, पाहिल्या, माहिती असल्यामुळे फायदा होतो का नाही हा ज्याच्या त्याच्या मानण्या न मानण्याचा भाग झाला.

'महाभारत-रामायण माहिती नसलेले लोक अमुक-तमुकलाही लायक नाहीत.' असे कॅप्शन त्या फेबुकराने टाकले आहे, त्याच्याशी मी सहमत नाही.
पण प्रत्येक भारतीय व्यक्तीला रामायण-महाभारत माहिती असायला हवे हे माझे मत आहे.
सत्याचा अंती विजय होतो, स्त्रीच्या अपमानाचा बदला ह्या बाळबोध गोष्टींच्याही पलिकडल्या त्या कथा आहेत. तो खरा इतिहास देखील आहे. मग तो माहिती असण्याने तोटा नक्कीच होत नाही.

अवांतर: रामसेतू अवशेष, जलमय झालेल्या द्वारकेचे अवशेष, पांडव लेणी अजूनही टिकून आहेत. स्थापत्य कला काय तोडीची असेल नै त्या काळी? Happy

सत्याचा अंती विजय होतो, स्त्रीच्या अपमानाचा बदला ... Sad रामायण महाभारत लोकांनी एवढं सिरियसली घेतलं असतं तर आज एवढी गुन्हेगारी आणि स्त्रियांचं शोषण दिसलं नसतं भारतात ... त्यामानाने रामायण महाभारत ही ज्यांची संस्कृती नाही त्या विदेशांतच स्त्रियांना जास्त हक्क , जास्त सुरक्षितता , जास्त स्वातंत्र्य , जास्त कायद्याचं संरक्षण असलेलं दिसून येतं . स्त्रीला महान मानणाऱ्या आपल्या संस्कृतीत वाढलेल्या लोकांनी जेवढे स्त्रीलिंगी गर्भपात केले आहेत तेवढे विदेशात झालेले असतील असं वाटत नाही .. Sad . बलात्कार झाला तर त्या बाईशी लग्न करायला कोणी तयार नसतात , बहुतेक लोक ती कलंकित - त्याज्य झाली आहे , तिच्या आयुष्यात यापुढे काही राहिलं नाही - बरबाद झाली आहे , अशी तिला वागवतात .. विदेशात असं होण्याचं प्रमाण खूप कमी आहे कारण योनीशुचितेला इथल्याएवढं अवाजवी महत्व तिथे नाही . बलात्कारित जाऊ द्या , साध्या विधवांच्या पुनर्विवाहांचं प्रमाण इथे कितीतरी कमी आढळेल . विधवा स्त्री पत्नी / सून नको असते ही एक गोष्ट आहेच .. शिवाय काही समाज ( नक्की नावं आठवत नाहीत ) असे आहेत की त्यात अजून विधवांना पुनर्विवाहाची परवानगी नाही ... जरी तरुण वय असेल तरी . कुटुंब ते कन्सिडरच करत नाही , कोणी विषय काढला तर अब्रह्मण्यम अशी प्रतिक्रिया देतात .. पळून जाण्याची हिम्मत वगैरे अर्थातच नसते .. सो त्यांचं आयुष्य अक्षरशः कुजवतात ... शिक्षण कितीजणींपर्यंत पोहोचलं आहे आणि किती जणींना शिकून स्वतःच्या पायावर उभं राहू देतात ; स्वतःच्या नोकरी किंवा विवाहाचे निर्णय स्वतः घेऊ देतात , तुम्हाला कल्पना असेलच .

. द्रौपदीच्या अपमानाने मोठं युद्ध होऊन अपरिमित प्राणहानी झाली म्हणून आज मुली रात्रीच्या एकट्या बिनधास्त फिरू शकतात , कामाच्या ठिकाणी स्त्रियांच्या शोषणाचा प्रयत्न होत नाही , गरिबांच्या मुली वेश्याव्यवसायात ढकलल्या जात नाहीत कारण भारतीयांच्या मनात स्त्रियांबद्दल प्रचंड आदर किंवा वाईट वागलं तर परिणामांची भीती आहे ; अशीही काही परिस्थिती दिसत नाही ... जे मुळातच सभ्य ( स्त्रियांचा गैरफायदा कुठल्याही परिस्थितीत घेणार नाहीत ते या अर्थाने ) असतात ते महाभारत वाचल्याने सभ्य झालेले नसतात . आणि उरलेले जे भीतीपोटी चांगले वागतात त्यांना जी काही थोडीफार भीती असते ती कायद्याची .. दैव किंवा नियती ह्याची शिक्षा देईल ( जशी कौरवांना झाली ) याची नाही .

तुमच्या प्रतिक्रियेत विरोधाभास जाणवला निशा.

आजची स्त्रीची परिस्थिती आणि महाभारत यात काय संबंध?
'अपरिमित प्राणहानी' - युद्धात ती होणारच.
कलियुगात महायुद्ध झाली तेव्हाही ती झालीच होती की.
आणि महाभारत केवळ द्रौपदी करता झालेले नव्हते असे म्हणले तर?
त्या युद्धाला अनेक कारणे होती. केवळ द्रौपदीकरता युद्ध करायचे असते तर कृष्ण-बलराम आणि नारायणी सेना पुरेसे होते की वस्त्रहरण झाले तेव्हाच कौरवांना समाप्त करायला. तेरा वर्षे वाट पाहिलीच नसती.

महाभारत वाचलेला प्रत्येक जण सभ्य बनेल असे कुठे म्हणाले मी? मी केवळ माहिती असायला हवे असे म्हणाले.

गुन्हे घडतात ते वर्तमानकाळात दंड नियमांचा वचक नसल्याने. इतिहासाचा त्याच्याशी काही संबंध नाही.

रामायण महाभारत लोकांनी एवढं सिरियसली घेतलं असतं तर>>>>>> व्हिडिओ पाहिलात ना? बघा किती सिरियसली घेतात ते. Biggrin

प्रत्येक भारतीय व्यक्तीला रामायण-महाभारत माहिती असायला हवे हे माझे मत आहे >>

प्रत्येक भारतीय व्यक्तीला रामायण-महाभारत माहिती असण्यापेक्षा चांगला माणूस आणि चांगला नागरिक बनण्याचं शिक्षण मिळणं गरजेचं आहे असं मला वाटतं ... सत्याचा अंती विजय वगैरे आजच्या काळात निरर्थक गोष्टी झाल्या आहेत ... स्त्रीशी वाईट वागल्याने दैवी शिक्षा भोगावी लागेल / कायद्याची शिक्षा भोगावी लागेल या भीतीपेक्षा मुळातच स्त्रीशी वाईट वागण्याची इच्छा उत्पन्न होऊ नये असे संस्कार असले पाहिजेत ... किंवा लाच घेतल्याने / भ्रष्टाचार केल्याने / कोणाचं अधिकाराचा वापर करून शोषण केल्याने काही वाईट परिणाम भोगावे लागतील या भीतीने नाही तर मुळातच ती कृत्यं करण्याचा पिंडच होऊ नये असे संस्कार - upbringing असलं पाहिजे ... ते आईवडील - शिक्षक - आजूबाजूला पाहून होणारे संस्कार यांच्या हातात असतं .. रामायण महाभारत माहीत असल्याने लोक चांगले किंवा वाईट होत असतील का हा एक संशोधनाचा विषय आहे .

रामायण महाभारत माहीत व्हायला त्या मालिका बघायची काय गरज?
माझ्या लहानपणी चांदोबात रामायण यायचं. महाभारत मालिका यायच्या आधीच त्यातला ढोबळ घटनाक्रम, व्यक्तिरेखा हे सगळे माहीत होते. कुठे वाचलं ते आठवत नाही.
रामायण महाभारतावर आधारित मालिका आहेत म्हणून भक्तिभावाने , देशाभिमान तळपत ठेवून पहा हे कायच्या काय आहे.

महाभारत वाचलेला प्रत्येक जण सभ्य बनेल असे कुठे म्हणाले मी? मी केवळ माहिती असायला हवे असे म्हणाले. >>

ओके .. मग कशासाठी माहिती असायला हवी , त्या माहीतीचा उपयोग काय ... हे स्पष्ट करू शकाल का ? की जनरल नॉलेज म्हणून , सूर्यमालेतल्या ग्रहांची नावं , देशाच्या आजवरच्या पंतप्रधानांची नावं अशी माहिती प्रत्येकाला असायला हवी त्या प्रकारचा हा आग्रह आहे का ? पुस्तकी माहिती , जी फार फार तर एखाद्या इंटरव्ह्यू मध्ये किंवा परीक्षेत जनरल नॉलेज चेक करायला विचारतील बाकी प्रत्यक्ष आयुष्यात शून्य उपयोग असलेली ... पण जनरल नॉलेज हवंच असा काहींचा आग्रह असतो ... तसा रामायण महाभारत माहीत हवंच असा तुमचा आग्रह आहे का ....?

निशा,

माझा प्रतिसाद नीट वाचाल का? मी लिहिलेले पूर्णपणे न वाचताच, एखादाच परिच्छेद किंवा मधलेच एखादे वाक्य वाचून तुमचा गैरसमज होतो आहे.

मग कशासाठी माहिती असायला हवी , त्या माहीतीचा उपयोग काय ... हे स्पष्ट करू शकाल का ?>>>>>>> तुम्हीच दिलेत उत्तर. Happy
जनरल नॉलेज!
कारण गीता आचरणात आणणे आजवर कोणालाच जमले नसावे. (अर्जुनला युध्दात आचरण करणे जमले होते, पण पूर्णपणे नाही! भीष्मांसमोर आणि द्रोणांच्या मृत्यूनंतर हळवा झाला होता तो.)

जनरल नॉलेजसारख्या सिंपल गोष्टीसाठी तुमचं हे मत असेल तर ठीकच आहे ... भारतीयांना आपल्या संस्कृतीचा अभिमान असलाच्च पाहिजे या आग्रहातून तुमचं - " प्रत्येक भारतीय व्यक्तीला रामायण-महाभारत माहिती असायला हवं " हे मत निर्माण झालं असावं असं मला वाटलं होतं .

भारतीयांना आपल्या संस्कृतीचा अभिमान असलाच्च पाहिजे.>>>>>>>>>>>असे असेल तरी यात चुकीचे काहीच नाही.
पण अभिमान असा लादला नाही जाऊ शकत. तो आतून वाटावा लागतो.

इतिहास माहिती असणेही पुरेसे आहे. Happy

100 % आचरणात आणलेली मोजकी माणसं असतीलही जगाच्या पाठीवर ... आपल्याला जितकी जमेल तेवढी जरी अवलंबता आली तरी पुरेशी आहे असं वाटतं ... जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर वासांसी जीर्णानी आठवून निर्विकार राहणं 99 % लोकांना अशक्य आहे ... आपल्याला आत्मा बित्म्याशी घेणंदेणं नसतं ... त्या शरीरात त्या आत्म्याने जे व्यक्तिमत्त्व धारण केलेलं असतं ते परत कधीच दिसणार नाही , जे आपल्यावर प्रेम केलेलं असतं ते परत कधीच मिळणार नाही एवढंच आपल्यापुरतं सत्य असतं आणि तेच असह्य असतं . बाकी तो आत्मा पुढे नवीन शरीर धारण करेल किंवा नाही या सगळ्याने आपल्याला काही फरक पडणार नसतो ..
असो .

100 % स्थितप्रज्ञ व्हायला जमणं कठीण पण पण प्रयत्न करत राहीलं ; कर्तव्य सर्वात महत्वाचं म्हणून ते करत राहीलं ; मायामोहातून पूर्ण सुटणं पुढची गोष्ट - पण कुठल्या गोष्टी मायेने निर्मिलेल्या आणि मुक्तीत अडथळे ठरतील अशा आहेत हे ओळखता तरी आलं तरी मार्ग पूर्ण ढळणार नाही , स्वार्थापोटी कोणाला वेदना होतील असं वर्तन हातून घडणार नाही .. तसूतसूने तरी स्पिरीच्युअल प्रगती होत राहील ... कर्तव्याच्या मार्गावरून ढळायला होणार नाही ... चुकीच्या मार्गावर पाऊल पडणार नाही ...

>;;रामायण महाभारत माहीत व्हायला त्या मालिका बघायची काय गरज?
हो हल्ली मूल नुसतं घरातून बाहेर पडलं तरी परत येताना त्याला रामायण सांगितलेलं असतं कुणीतरी. भारताच्या चराचरात रामायण आहे आता.

त्या शरीरात त्या आत्म्याने जे व्यक्तिमत्त्व धारण केलेलं असतं ते परत कधीच दिसणार नाही , जे आपल्यावर प्रेम केलेलं असतं ते परत कधीच मिळणार नाही एवढंच आपल्यापुरतं सत्य असतं. >>>>>>>> +१

कुठल्या गोष्टी मायेने निर्मिलेल्या आणि मुक्तीत अडथळे ठरतील अशा आहेत हे ओळखता तरी आलं तरी मार्ग पूर्ण ढळणार नाही , स्वार्थापोटी कोणाला वेदना होतील असं वर्तन हातून घडणार नाही .. तसूतसूने तरी स्पिरीच्युअल प्रगती होत राहील ... कर्तव्याच्या मार्गावरून ढळायला होणार नाही ... चुकीच्या मार्गावर पाऊल पडणार नाही ...>>>>>>> हे छान लिहिले आहेत. Happy

@निशा
अर्थात! काही न पटलेल्या गोष्टीही आहेत तुमच्या प्रतिसादात. पण जे मला पटले ते छान लिहिले आहेत. म्हणून तेव्हढेच quote करून टाकले. काही मतभेद असतील तरी निदान काही बाबींमध्ये आपण सहमत आहोत. Happy

Pages