कणीक-रवा शंकरपाळी

Submitted by देवीका on 22 October, 2019 - 03:14
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

पाव वाटी गाईचे रवाळ ताजं तूप,
पावूण वाटी साखर पुरेशी आहे, तुम्हाला हवी असल्यास १ वाटी घ्या,
पाव वाटी बारीक रवा चाळलेला,
दिड वाटी रवाळ कणीक चाळलेली,
चवीला मीठ, वेलची पूड,
तळणाला तूप

क्रमवार पाककृती: 

पाव वाटी गाईचे ताजं रवाळ तूप हाताने परातीत फेटून झाले की त्यातच १ वाटी साखर फेटायची, हाताच्या उष्णतेने विरघळते. अगदी पाण्यावर तरंगतं का पहायचं हे मिश्रण. मग त्यातच बारीक रवा पाव वाटी आणि दिड वाटी कणीक घालून घोळायची, ब्रेड क्रम्स होतील तसे. मग किंचीतच वेलची व मीठ घालायचे. व झाकून ठेवायचे.

एक तासाने कोमट दूध लागेल तसे घालून कुटायचे नाहितर फूड प्रोसेसर मध्ये हळू हळू दूध घालून एकजीव करायचे, पीठ पातळ नाही करायचे आहे दूध घालून आणि परत १५ ते २० मिनिटाने झाकून मग ५-१० मिनिटे हातानेच मळले की लगेच तळायचे तूपातच. मस्त हलक्या खुसखुशीत होतात.
कुटाणा वाटेल पण मस्त लागतात. तेलकट होत नाहीत. पीठ घट्ट ठेवायचे पण रवा कुटून किंवा मळून एकजीव करायचा. मग फोड येत नाहीत शंकरपाळीला.

अधिक टिपा: 

१) सर्व मापाला एकच वाटी वापरा. पीठ पातळ वाटल्यास आणखी लागेल तशी कणीक टाकून मळा. शंकरपाळी हसत हसेल तेलात तर सुद्धा कणीक टाकून पीठ तसेच परत मळा, जराही पाणी न घालता.
२)तूप जुनं असेल तर वास येतो शंकरपाळीला नंतर म्हणून ताजंच घ्या. तूपाचं आणि साखरेचे मिश्रण हलके करायला बीटर वापरा. मस्त हलकं होतं.
३)मध्यम आचेवर तळा.
४)पीठ घट्ट असु द्या पण रवा मस्त कुटून एकजीव करून घ्या कणीकेत. सोपे म्हणजे, फूड प्रोसेसरमध्ये फिरवा.
५)साखर कमी घातली तरी चालेल. पावूण कप सुद्धा चालते.
६)तेलात तळू शकता पण खूपच घट्ट पीठ आणि ज्यास्त कुटणं होइल रवा भिजण्याकरता आणि तेलकट होवु शकतील. तेलकट होतातच असे नाही पण कशाला तेलात तळा, खावून बघा साजूक तूपातल्या. दिवाळी आहे तर कशाला हात आखडता घ्या.

७)ह्या प्रकारे केल्यास प्रमाणावर ताबा रहातो. मावेल तसा मैदा टाकण्याच्या कृतीत खुपच प्रमाण होते व जागरण होते. तळणं, काटणं खुपच नकोसे होते.

माहितीचा स्रोत: 
मातोश्री
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान पाकृ, फक्त एक सांगू का? ते तेवढं "वास मारतो" बदला ना प्लिज, शंकरपाळ्यांना वास येतो असं लिहा.

कणकेच्या करताना खुप सांभाळून तळावे लागते, नाहितर एकदम काळ्या होतात. तशाही काळ्याच दिसतात मैद्यापेक्षा. दिसायला गोर्‍या मैद्याच्या बर्‍या वाटतात. Wink

वास मारतो Proud हे एकदम मुंबई मराठी का? Wink

देविका, थॅंक्यु ! थॅंक्यु ! माझ्या 'युक्ती सुचवा..... ' वरच्या पोस्टला रिस्पॉन्स म्हणून तू एकदम सहीच, क्रमवार आणि मोजमापानीशी लिहिलंस. खूप आभारी आहे.
मी आधी प्रवासात होते आणि नंतर कित्येक तास माबो उघडत नव्हतं त्यामुळे वाचता येत नव्हतं.

उद्या सकाळी तुझ्या रेसिपीने शंकरपाळे नक्की. Happy आणि हो तुला दिवाळीच्या शुभेच्छा ! Happy

झंपी, गोड गोष्ट गरम तेलात टाकल्यामुळे कॅरमलाईझ होणार आणि त्यात गव्हाचं पीठ गोरं नसतंच. त्यामुळे काळपट शंकरपाळे असतील हे गृहीत धरलं आहेच. वरून गोऱ्या आणि आतून दुष्ट मैद्यापेक्षा आम्हाला सावळ्या गव्हाच्या शंकरपाळे चालतील. Proud

तुलाही दिवाळीच्या शुभेच्छा Happy

धन्यवास सर्वांना.

अतिशय घाईत लिहिली होती. सर्व सुचवलेले बदल केलेत.

सर्वांना धनत्रयोदिशीच्या व येणारी दिवाळीच्या आगामी शुभेच्छा!

अतिशय घाईत लिहिली होती. सर्व सुचवलेले बदल केलेत.>>>>> Happy केले गं तुझ्या रेसिपी ने शंकरपाळे. छान झाले, पण एक घाणा मऊ पडला Sad म्हणजे शेवटचा घाणा असा झाला. बाकी छान झाले. थँक्यू.

झंपी,
नाही होत काळ्या कारण रवा ज्यास्त प्रमाणात आहे.

धनुडी, तळताना सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा शंकरपाळी कढईत टाकताना, मग मध्यम आच ठेवायची.
खुप शंकरपाळी टाकली की कढईतील तापमान कमी होते आणि लवकर लाल होतात पण नंतर कच्च्या असल्याने मउ पडतात.

मीही दरवर्षी कणकेचेच शंकरपाळी बनवते.
हो तळताना फार काळजीपूर्वक तळावी लागतात. मोठया फ्लेम वर तळल्यास काळपट होतात. आणि चवीलाही मैद्याचीच काकणभर छान लागतात.
आम्हा दोघा नवराबायकोना पोटाच्या अनेकानेक व्याधींनी पछाडलेले असल्याकारणाने मैदा पूर्णपणे वर्ज्य केला आहे फक्त केक मधून जातो तेवढाच.
फक्त मी रवा थोडासाच घालते
एवढ्या प्रमाणात कधी टाकून केले नाहीत.
ह्यांनी जास्ती खुसखुशीत होतात का?
फोटो हवा होता.
धनुडी तुम्ही फोटो टाकायला हवा होता.
आता फराळ संपला असल्याने पुढच्यावर्षी पर्यंत वाट पाहावी लागेल Lol