श्रावण अंतरीचा

Submitted by पुरंदरे शशांक on 13 August, 2019 - 09:52

श्रावण अंतरीचा

नकोच आकाशी फुलणारे
इंद्रधनुचे रेशीम तोरण
घोर निराशा संपून जाता
मनात उमलत जातो श्रावण

हिरवाईचे लोभसवाणे
चित्र अंतरी जरा उमटता
निर्मळतेचा झरा घेऊनी
मनात झुळझुळ वाहे श्रावण

मंद सुगंधी जाईजुई वा
प्राजक्ताचा सडा नसू दे
माणूसकीचा लेश अंतरी
दरवळणारा होतो श्रावण

असो नसो वा त्या जलधारा
मोहक रंगांची ती पखरण
निष्कपटशा ह्रदयातूनही
क्षणात वेडा फुलतो श्रावण

बाह्य जगाचे बंध भ्रमाचे
वितळून जाता प्रशांत चित्ती
तनामनातूनी लहरत जातो
प्रसन्न निश्चल मृदूतम श्रावण

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम मस्त! खासच!

निष्कपटशा ह्रदयातूनही
क्षणात वेडा फुलतो श्रावण.......... Happy Happy

वाहवा

सुंदर ... वाचायच्या आधी कल्पना नव्हती आली ह्या मनातल्या श्रावणाची ... म्हणूनच खूप आवडली.