इंद्रधनू

Submitted by पाषाणभेद on 27 July, 2019 - 18:31

इंद्रधनू

(आकाशात इंद्रधनुष्य पाहील्याने माझी मुलगी हरकली आहे अन ती मला बोलावते आहे.)

आकाशी ते इंद्रधनू आले
अहा!
चला बाबा बघा
ते पहा! ते पहा!!

कितीक मनोहर मोदभरे
आकाशीचे रंग खरे
कमान तयाची वाकली
माझ्यासवे पहा बरे

दवबिंदूवर प्रकाश पडूनी
आले ते वर उसळूनी
उल्हासीत झाले मी
चटकन या तुम्ही

वर्ण वरी घेई तांबडा
तदनंतर ये नारंगी पिवळा
चमके तो रंग हिरवा निळा
घेवूनी पारवा जांभळा
आकाशी व्यापली प्रकाशमाला

पर्जन्याचा अधिपती नरेश
भेट जलाचे देई धरेस
त्याच समयी ये सामोरी भास्कर
किरणांस भिडता थेंब नीर
गोफ इंद्राचा घेई आकार

मज न ठावूक;
राहील न राहील ते काळ किती
ये वायू मग जाय क्षिती
साठवूनी घ्या लोचनी
त्वरा करा तुम्ही; बाबा या लवकरी

- पाषाणभेद
२८/०७/२०१९

Group content visibility: 
Public - accessible to all site users