भात करायची आयुर्वेदिक पद्धत

Submitted by सुपर्णा लक्ष्मणतीर्थ on 25 July, 2019 - 09:16

नमस्कार मैत्रिणींनो,
कुटुंबाच्या स्वास्थ्याची वाट स्वयंपाकघरातून जाते, आणि या स्वयंपाकघराची किल्ली घरच्या स्त्रीच्या हातात असते.
आज स्त्री कितीही शिकली, इंजिनिअर झाली, डॉक्टर झाली, न्यायाधीश झाली, शास्त्रज्ञ झाली, शिक्षक झाली, अभिनेत्री झाली, लेखिका झाली, कलाकार झाली, गायिका झाली, उद्योजिका झाली, वैमानिक झाली, अंतराळवीर झाली, मंत्री झाली तरी घराच्या लोकांना पोषक आहार देण्याची जबाबदारी अंतिमतः तिचीच असते.

आज आपण जाहिरातींच्या भडीमारामुळे गोंधळून जाऊन आणि खाद्य पदार्थ डोळे आणि नाकाला सुखावणारे असले पाहिजेत या अट्टाहासाने चुकीच्या गोष्टी आपल्या लाडक्या कुटुंबाच्या पोटात घालत आहोत,

या चुकीच्या अन्नपदार्थामुळे, मधुमेह अक्षरशः साथ पसरावी तसा पसरत आहे. या राक्षसाला वेसण घालण्यासाठी परत गृहलक्ष्मीलाच अवतार घ्यावा लागणार आहे, मात्र या वेळी तिच्या हातात फार फार प्राचीन ज्ञानाचे शस्त्र असणार आहे.

आपल्या जेवणात असणारा मुख्य घटक "भात" हा कसा निवडावा, कसा शिजवावा म्हणजे त्याचे जास्तीतजास्त फायदे आपल्याला मिळतील हे अगदी बारकाईने आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवले आहे, मात्र पाश्चात्य जीवनशैलीच्या कच्छपी लागून आपण ते ज्ञान अडगळीत टाकले.

वास्तविक पाहता इकडे अन्नशास्त्राचा गाढा अभ्यास असणारे सारखे लोक आहेत. मोठे मोठे लेख त्यांनी लिहिले आहेत, आपले प्राचीन ज्ञान पुनरुज्जीवित करायला खरेतर त्यांनी पुढाकार घ्यायला हवा, त्यांना ती प्रेरणा होईल तेव्हा होईल, तो पर्यंत तरी हा अंधार दूर करायचा मी काजवा बनून प्रयत्न करेन.

हे ज्ञान प्रकाशात आणणारा खालील लेख मला व्हाट्सअप्प वर मिळाला, तुम्हा सगळ्यांसाठी मी तो इकडे शेअर करते आहे. तुम्हाला काय वाटते ते जरूर खाली लिहा.

आयुर्वेदाच्या पद्धतीने भात करण्याची पद्धत :-

भात कसा पिकवायचा आणि भात कसा खायचा हे ज्ञान सुमारे २५०० वर्षांपूर्वी भारताने जगाला दिले. एवढी वर्ष भात खाऊनही भारतीयांना डायबेटीस होत नव्हता आणि आज तोच भारत मधुमेहाची राजधानी झालाय. हे कसं काय ? भात बनवण्याच्या पद्धतीतील बदल याला कारणीभूत आहे.

भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) जास्त असल्यामुळे त्याच्याने डायबेटीस होऊ शकतो असे आधुनिक विज्ञान सांगते. गंमत म्हणजे भाताच्या काही विशिष्ट जाती खाल्ल्याने किंवा भातापासून बनवलेले खीर, खिचडी यासारखे काही पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने प्रमेह हा डायबेटीसशी साम्य दाखवणारा 'प्रमेह' हा आजार होऊ शकतो असे आयुर्वेद सांगतो. आयुर्वेदानुसार द्रवरूप कफाला वाढवणारा कोणताही पदार्थ प्रमेह निर्माण करू शकतो. थोडक्यात आधुनिक शास्रानुसार ज्या भाताचा GI जास्त त्याने डायबेटीस होण्याची शक्यता अधिक तर आयुर्वेदानुसार जो भात कफाला वाढवतो त्याच्याने डायबेटीस होण्याची शक्यता जास्त. म्हणजेच आपण भाताची कफ वाढवण्याची प्रवृत्ती कमी करू शकलो तर डायबेटीसला घाबरण्याची गरज नाही. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आयुर्वेदाने सांगितलेला ‘दहा कलमी’ कार्यक्रम वापरला पाहिजे. यातील पाच नियम तांदळाच्या निवडीसंदर्भात आहेत तर पाच नियम भात शिजवण्यासंबंधी आहेत.

भाताची निवडणूक

ज्या तांदळाचा दाणा लांब असतो आणि ज्याला सुगंध असतो तो डायबेटीसचे कारण ठरतो असे चरक संहितेत सांगितले आहे. त्यामुळे बासमती, आंबेमोहोर स्पर्धेतून बाद होतात. सुगंध असलेला तांदूळ कधीतरी सणाच्या दिवशीच खावा. International Rice Research Institute आणि University of Queensland यांनी जगातील २३३ तांदळाच्या जातींवर संशोधन केले आहे. या रिसर्चचे प्रमुख डॉ. फिट्सगेराल्ड यांच्या म्हणण्यानुसार “भारतातील सुवर्ण आणि मसुरी तांदळाचा GI ५५ पेक्षा कमी आहे; तर बासमती तांदळाचा GI ६८ आहे असे सांगितले आहे. आयुर्वेदानुसार जे धान्य तुम्ही राहत असलेल्या प्रदेशात तयार होते ते तुमच्यासाठी योग्य असते. म्हणून आपण ज्या ठिकाणी राहतो त्या भागात तयार होणारा तांदूळ खाण्यास योग्य.

ज्या तांदळाचे पीक कमी दिवसात तयार होते तो पचायला हलका असतो. पूर्वी कोकणात साठ दिवसात तयार होणारा साठेसाळीचा भात मिळत असे. पण आता तो क्वचितच बघायला मिळतो. जागतिकीकरणाच्या उत्साहात आपण आपल्या बऱ्याच देशी गोष्टी गमावून बसलो ही त्यातलीच एक.

तांदळावरील आवरण काढण्यासाठी त्याच्यावर जितक्या अधिक प्रक्रिया केल्या जातात तेवढा तो शुभ्र बनतो आणि पचायला जड होतो. म्हणूनच कमी प्रोसेस केलेल्या ब्राऊन राईसची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ब्राऊन राईस खाल्ल्याने तांदळाच्या वरच्या कवचात असणारे पोषक घटक टिकून राहतात. जास्त पॉलिश केल्याने ते निघून जातात.

पूर्वीच्या काळी धान्य घरात साठवून ठेऊन मग वापरण्याची पद्धत होती. साठवून ठेवलेल्या तांदळातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने तो कफ वाढवत नाही. नवीन तांदळाचा भात चिकट होतो आणि जुन्या तांदळाचा भात मोकळा होतो हे आपण पाहतोच. हल्ली धान्य साठवून ठेवण्याची पद्धत बंद झाली आहे. “महिन्याचे रेशन महिन्याला भरा” अशी कामचलाऊ व्यवस्था उदयास आली आहे. या गोष्टीचा फायदा घेऊनच आता दोन वर्ष ‘एज’ (Aged) केलेला महाग तांदूळ काही कंपन्यानी विकायला आणला आहे. याला पर्याय म्हणून भात करण्यापूर्वी तांदूळ थोडे भाजून घेतल्यास त्याच्यातील पाण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होते आणि तो पचायला हलका होतो.

म्हणजेच सुगंध नसलेला, आपण राहत असलेल्या प्रदेशात तयार होणारा, कमी दिवसात तयार होणारा, कमी प्रक्रिया केलेला, एक वर्ष साठवून ठेवलेला किंवा भाजून घेतलेला तांदूळ भात करण्यासाठी योग्य आहे.

ऑपरेशन राईस

आता आपण प्रत्यक्ष भात बनवण्याची कृती म्हणजे 'ऑपरेशन राईस'ला सुरुवात करूया. ‘अष्टांगहृदय’ या ग्रंथात चांगल्या भाताचे गुणवर्णन पुढीलप्रकारे केले आहे.
सुधौत: प्रस्रुत: स्विन्नोऽत्यक्तोष्मा च ओदनो लघुः I
यश्चाग्नेय औषध क्वाथसाधितो भृष्टतण्डुल: II

सुधौत म्हणजे व्यवस्थित धवून घेतलेला, प्रस्रुत म्हणजे पेज काढून घेतलेला, पूर्ण शिजलेला आणि खाताना गरम असलेला भात पचायला हलका असतो. त्याचबरोबर पचनाला मदत करणाऱ्या औषधांनी सिद्ध केलेला आणि भाजून घेतलेल्या तांदळाचा भात पचायला हलका असतो. आता यातील प्रत्येक मुद्द्याचा विचार करू.

सुधौत – भात शिजवण्यापूर्वी तांदूळ दोन वेळा व्यवस्थित धुवून घेणे आवश्यक आहे. असा धुतलेला तांदूळ १५ ते २० मिनिट तसाच ठेवल्यास भात लवकर शिजतो.

प्रस्रुत, स्विन्न – याचा अर्थ पेज काढून घेतलेला आणि पूर्ण शिजलेला. आयुर्वेदातल्या ‘भावप्रकाश’ या ग्रंथात भात शिजवण्याची प्रक्रिया सविस्तर वर्णन केली आहे. कोणताही पदार्थ चांगला शिजण्याकरिता त्याला सर्व बाजूने समान उष्णता मिळणे आवश्यक असते. हे काम मातीच्या भांड्यात उत्तम प्रकारे होते. हल्ली चीनी मातीपासून बनवलेली भांडी मिळतात त्यामध्ये भात बनवल्यास ते सर्वात उत्तम. हे शक्य नसेल तर बुडाशी जाड असलेले पितळेचे पातेले वापरावे.

भात शिजवण्यासाठी प्रथम तांदळाच्या पाच पट पाणी घेऊन ते उकळू द्यावे. त्यानंतर अगोदर धुवून ठेवलेला तांदूळ त्यात घालावा. थोडा वेळ भात शिजू द्यावा. तांदळापासून भात करत असताना त्यातील स्टार्चमध्ये ‘जिलेटिनायझेशन’नावाची प्रक्रिया घडते आणि या जिलेटिनायझेशनमुळे भाताचा GI वाढतो. त्यामुळे भात जितका अधिक शिजेल तितका त्याचा GI जास्त. आयुर्वेदाने सांगितलेल्या पद्धतीत पाणी अगोदर उकळून घेतलेलं असल्याने भात लवकर शिजतो. ‘शितावरून भाताची परीक्षा’ करून झाली की जास्तीचे पाणी म्हणजे पेज बाजूला काढून घ्यावी आणि भात झाकून ठेवावा. आत कोंडून राहिलेल्या वाफेमुळे भाताची शितं मोकळी होतात. बाजूला काढून ठेवलेली पेजेत जास्तीचे स्टार्च बाहेर पडून जाते. त्यामुळे भाताचा चिवटपणा कमी होतो म्हणजेच त्याचा GI कमी होतो. ही पेज घरातल्या लहान मुलांना द्यायला हरकत नाही. गेल्या २५ – ३० वर्षात आपण भात शिजवायला कुकर वापरायला लागलो त्यामुळे पेज वेगळे काढण्याची पद्धत बंद झाली आणि त्यामुळे डायबेटीसचे पेशंट वाढायला सुरुवात झाली. कुकरमध्ये भात लवकर शिजतो पण पचायला जड होतो.

भाताची कफ निर्माण करण्याची प्रवृत्ती कमी करण्याचा अजून एक उपाय आहे; तो म्हणजे पचनाला मदत करणाऱ्या औषधांसोबत भात शिजवणे. यासाठी मिरे, दालचिनी, हळद यासारख्या मसाल्याच्या पदार्थांचा वापर होतो. यातही भात खाऊन पोट जड होते त्यासाठी मिरे, छातीत कफ साठतो त्यांच्यासाठी दालचिनी आणि ज्यांच्या घरात डायबेटीसची हिस्ट्री आहे त्यांनी हळकुंड घालून भात करावा. दक्षिण भारतात अनेक राज्यात भात हेच दोन्ही वेळचा आहार असतो म्हणून तिथे इडलीतही मिरे घालण्याची प्रथा दिसते ती यामुळेच.

अशा पद्धतीने केलेला भात हा गरम असतानाच खाल्ला पाहिजे असे आयुर्वेद सांगतो.
जे लोक तांदूळ निवडताना आणि भात शिजवताना आयुर्वेदाचा ‘दहा कलमी’ कार्यक्रम पाळतील त्यांनी डायबेटीसला घाबरण्याची आजिबात गरज नाही. या 'तांदूळ आख्यान' ऐकूल्याने तणाव निवळून दोघेही मोकळे झाल्यासारखे वाटले.
मोकळी झालेली माणसं आणि मोकळा झालेला भात दोन्ही मला आवडतात आणि तुम्हाला ?
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणीतरी विषयाला धरून बोला रे... >> माझी पोस्ट 'विषयाला' धरुनच आहे Wink

आयुर्वेदीक भात भरतीच्या /ओहोटीच्या वेळेस खल्ला तर त्याचे परीणाम काय होतिल?

हल्ली धान्य साठवून ठेवण्याची पद्धत बंद झाली आहे. “महिन्याचे रेशन महिन्याला भरा” अशी कामचलाऊ व्यवस्था उदयास आली आहे. >>>>>
हल्ली एवढी जागा कुठेय वर्षभराचं राशन साठवून ठेवायला. शिवाय अळ्या, टोके, मुंग्या, कॉक्रोचे यांचा त्रास वेगळा. अगदी प्रत्येकाचे घर १००० sqft असेल असे गृहीत धरले आहात वाटते म्याडम तुम्ही.

या गोष्टीचा फायदा घेऊनच आता दोन वर्ष ‘एज’ (Aged) केलेला महाग तांदूळ काही कंपन्यानी विकायला आणला आहे. >>>हे सगळ्यांनाच थोडे विकत घ्यायला परवडते. लोक आपल्या पगारानुसार अन्न धान्य खरेदी करतात. गरीब माणूस लाल रेशन कार्ड वर मिळणारे ३ रुपये किलो वाले तांदूळ विकत घेतो.

मी काल रात्रभर जागून या विषयावर अभ्यास करत होतो, आणि माझ्या अथक परिश्रमानंतर मी असा निष्कर्ष काढला आहे की भरतीच्यावेळी थेट समुद्रकिनारी जाऊन केल्यास त्याचा परिणाम जास्त साधला जाईल म्हणून सगळ्यांनी समुद्रकिनारी राहावयास जावे, जे किनारी राहत असतील त्यांच्यासाठी उत्तमच आहे परंतु जे समुद्रापासून लांब राहत असतील त्यांनी त्वरीत समुद्रकिनारी बंगलो विकत घ्यावे, आणि भरतीच्यावेळी जाणं चांगलं की ओहोटीच्या याचा अभ्यास करण्यासाठी मी एक नवीन कमिटी स्थापन करत आहे, त्याचा अहवाल लवकरच इथे सादर करेन तोपर्यंत जर तुम्हाला आमच्या टीममध्ये जॉईन होऊन या साहसी आणि चित्तथरारक मोहिमेवर यायचं असेल तर विपु करावा.

खरं तर अन्नाची साठवण करूच नये.
शेतात जाऊन ताजी कणसं तोडून भाजून हुरडा खावा, तूर, वाटाण्याच्या शेंगा तोडून सोलून (न सोलता खाणं अजून चांगलं), खाव्यात, शिकार करून शेकोटीवर भाजून खावी.
हवंय कशाला ते स्वयंपाकघर, भांडी कुंडी.

हे office ला येणे म्हणजे अनैसर्गिक आहे, पूरातन काळात कुठेही IT चा उल्लेख नाही.. सर्वांनी लॅपटॉप गुंडाळून घरी जा.. एक मिनिट, घर तरी नैसर्गिक आहे का?

वा, बोकलत जी मैं हू आपके साथ. काय नाव दिलंय मिशनला? मिशन भरती ओहोटी?
Submitted by चक्रम माणूस on 26 July, 2019 - 12:59
>>>> " समुद्रतीरस्य अम्बुवर्धन-अवसर्पतिकाले समुहमलोत्सर्जन प्रयोग: "

अन नारळाचा काथ्या अन करवंतीही खायची ?>>
नाही. काथ्याची दोरी विणायची. करवंट्यांना मध्ये एक भोक पडायचं. दोरीच्या एका टोकाला मोठी गाठ बांधायची आणि दुसरे टोक त्या करवंटीच्या भोकातून ओवून काढायचे. दोऱ्या दोन्ही हातात धरुन करवंट्या पावलांच्या अंगठ्याखाली घेऊन टॉक टॉक करत चालायचं. म्हणजे पायाला काटे टोचणार नाहीत आणि घोडा येतोय समजून शिकारसुध्दा पळून जाणार नाही.

शेत आणायचे कुठून?
<<

त्यात काय!
जायचं की कुणा ओळखी पाळखीच्या माबोकराच्या शेतावर वर्षासहल म्हणून. हुरडा आपलाच असां Wink

अन सगळ्यात बेस्ट म्हणजे इथल्या हुशार लोकांनी शेते विकत घेतली पाहिजेत अन किफायतशीर ऑर्गॅनिक शेती कशी करता येते ते भारतातल्या सगळ्या आत्महत्याखोर कामचुकार व फुकट्या शेतकर्‍यांना दाखवून दिलेच पाहिजे. तिथे गोशाळाही चालवल्याच पाहिजेत. शेवटी प्रश्न आपल्या उज्ज्वल परंप्रांचा आहे.

" समुद्रतीरस्य अम्बुवर्धन-अवसर्पतिकाले समुहमलोत्सर्जन प्रयोग: "
<<

"तत्व" मात्र सोडू नका हो.

भरतीचा परिणाम जलतत्वावर होतो की मलतत्वावर, त्यावर संशोधन झालेच पाहिजे.

अतिशययोक्तीचा भाग सोडला, तर बऱ्याच गोष्टी अंमलात आणण्यासारख्या आहेत लेखात.
WILL GIVE A TRY!!!
<<

हे असे लोक आहेत म्हणून जग सुरू आहे! It takes all kinds to make it work. :आदरमोद:

मल इज मोस्टली मेड आऊट ऑफ जल.
<<
चिटिंग नाय हा करायचा, अजिबात चिटिंग नाय. प्रश्न तत्वाचा आहे. ज चा म करूचा नाय.

मंगलोरी लोक इडलीत मिरं, वड्यात मिरी आणि खोबऱ्याचे काप घालतात.

जपानी लोक मोकळा भात खात नाहीत, पेज फेकत नाहीत.

केरळच्या (पद्मनाभपुरम पलेस) महालात भाताची पेज ओतण्यासाठी मोरी आहे. पायावर गरम पाणी येऊ नये म्हणून पावलं ठेवली आहेत त्यावर उभं राहायचं.

आजारी व्यक्तीला पेज देतात ते आयुर्वेदाला धरून नाही का? आमच्याकडे पूर्वापार पेज बनवून खाल्ली / प्यायली जाते.

आयुर्वेदिक मटण चिकन बिर्याणी कशी बनवावी काही आयड्या कोणाला?
>>>>

चरक संहितेत दिलीय माहिती, मांसभात बनवायची!! सर्च करून बघा, Its Tasty Happy

या विषयात रस दाखवणाऱ्या सर्व लोकांना धन्यवाद.

काही जणांनी विषयाला धरून प्रश्न विचारले आहेत.
मी साधी सुधी गृहिणी माझ्याकडे काही तयार उत्तरे नसतात, मी उत्तरे शोधत राहीन, मिळाली की इकडे टाकेनच.

ज्यांना या विषयात गती आहे ते केवळ लेखातील त्यांच्यामते चुका दाखवून थांबले. त्यांची एक शाबासकी किंवा एखादा सकारात्मक प्रतिसाद लेखाची विश्वासार्हता वाढवणारा ठरला असता. पाश्चिमात्य ज्ञानाच्या मागे लागून आपण आपल्याच ठेव्याचे नुकसान करतो याची खंत मनास राहीलच.

बाकी टवाळी करणाऱ्या लोकांबद्दल काहीच बोलणे नाही. टवाळी करणे त्यांचा धर्म, आणि काम करत राहणे हा माझा.

वर कोणीतरी विषय काढला आहे म्हणून, इकडे कोणी पाठिंबा दिला नाही तरी नोंदी ठेवण्याचे माझे काम चालूच आहे, पुरेसा अन्योन्य संबंध काढता आला की निष्कर्ष सर्वांसमोर आणेन.

परत एकदा धन्यवाद.

धन्यवाद. अजून लिहा. शक्यतो स्वत: चे लिखाण करा. उतावळेपणा मुळे तुमची प्रस्तावना न वाचता प्रतिसाद दिला याबद्दल आपली माफी मागतो. धन्यवाद.

बिनवासाचा तांदुळ घ्यावा, तांदुळ भाजावा,बारीक तांदुळ घ्यावा,पेज फेकुन द्यावी .... सगळं स्टार्च फेकून दिल्यावर ते निसत्व अन्न खाल्ल्याने साखर वाढणार नाही हे सरळच आहे. यात कुठे आहे शास्त्र?
शिकलेले लोक असल्या गाढवी पोस्टी फिरवत असतात याचे आश्वर्य वाटते.

Pages