अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत निरंजन घाटे यांचे विचार

Submitted by प्रकाश घाटपांडे on 17 July, 2019 - 00:11

एक जुना किस्सा आठवतो.
अंनिसच्या मिटींग मध्ये आमच्या एका मित्राने निरंजन घाटे हे शनिपाराला दर्शनाच्या रांगेत उभे असल्याचे दिसले असे सांगितले. त्याने लगेच मिटींगमध्ये टीकेची झोड उठवली . " निरंजन घाटे तुम्ही सुद्धा?" स्टाईलने. मग स्यूडो सायंटिस्ट, भंपक विज्ञानवादी अशी विशेषणे लावायला सुरुवात केली. थोडक्यात सगळ्यांनी त्यांना वाळीत टाकले. मी खालील मुद्दे मांडले
१) निरंजन घाटे हा ही माणूसच आहे
२) त्यांची त्या मागील भूमिका विचारुन न घेताच टीका करणे वैज्ञानिक दृष्टिकोनात बसत नाही व ते मला योग्य वाटत नाही.
३) एवढ्या एका कारणामुळे त्यांनी मराठी विज्ञान साहित्यात दिलेले योगदान लगेच विसरलात काय?
४) कुटुंबातील कुणाच्या तरी वतीने ते प्रतिनिधी या नात्याने पण आले असतील तर?
परिणामी मी निरंजन घाट्यांची वकिली करतो म्हणून मलाच वाळीत टाकायला सुरुवात केली. त्यानंतर बर्‍याच वर्षांनी मी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यावर एकदा निरंजन घाट्यांकडे भेटायला गेलो.गप्पांमधे त्यांना हा किस्सा सांगितला. मला त्यांचे मत जाणून घ्यायचे होते.त्यांचे लहानपण त्या भागात गेले होते. अनेक सुख दु:खाच्या स्मृती तिथल्या गोष्टींशी निगडीत होत्या. त्याच मनोव्यापाराचा भाग म्हणून ते शनिपाराला जात असत. हाच तो सर्वसामान्य माणूस असल्याचा भाग होता. नंतर एकदा पुस्तक पेठेत ते भेटले होते. त्यावेळी ही गप्पात अंधश्रद्धा निर्मूलन हा विषय निघाला त्यावेळी ते म्हणाले कि.समाज बदलायला पुरेसा वेळ दिला पाहिजे. मी त्यावर लिहिल आहे.
वाचत सुटलो त्याची गोष्ट या पुस्तकात ते म्हणतात," गार्डनर चे पुस्तक आणि जॉन ग्रँट च ‘ बोगस सायन्स ऑर व्हाय पिपल रियली बिलीव्ह दीज थिंग्ज ‘ हे पुस्तक वाचताना मला नरेंद्र दाभोळकर आणि श्याम मानव यांच्या पुस्तकांची आठवण झाली. मी या दोघांचीही बरीच पुस्तके वाचली आहेत. श्याम मानव यांची आणि माझी 1978 च्या सुमारास नागपूर मध्ये ओळख झाली. त्यांच्या कार्याचे महत्व मी जाणतो. नरेंद्र दाभोळकरांची आणि माझी ही ओळख होती. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे व्रत प्राणपणाने घेतलं होतं आणि त्यातच त्यांचा बळी गेला. पहिल्या अंधश्रद्धा निर्मूलन संमेलनात त्यांची माझी भेट झाली तीच शेवटची. त्यानंतर महिन्याभरातच त्यांचा मृत्यू झाला. संमेलनातल्या माझ्या भाषणातील मुद्दे आणि त्यांचे विचार जुळणारे नव्हते, तरी त्यांच्या कार्याबद्दल मला आदर होता. त्यांनी माझे विचार ऐकून घेतले. त्यावेळी त्यांनी निरोप देताना ‘आपले विचार एकाच प्रकारचे आहेत,पण आपले मार्ग भिन्न आहेत’ असे म्हटले होते.
कुठलीही चळवळ पुढे रेटायची तर नेता आक्रमक असावा लागतो, तरच चळवळ पुढे जाते. मात्र बऱ्याचदा या आक्रमकपणाला, क्रियेला तितकीच आक्रमक प्रतिक्रिया अशा स्वरूपाचं उत्तर मिळतं. दोन्हीही पक्ष अधिक कडवे होत जातात. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीने पुढे देवाला विरोध करायचे सोडले आणि बुवाबाजीला विरोध सुरू केला. मग अनेक बुवा उघड केले . पण बुवांकडे जशी अमाप संपत्ती जमली होती तशी चळवळीकडे नव्हती हे एक, आणि या चळवळीच्या नेत्यांच्या पुस्तकांची भाषा अगदी कोरडी होती. त्यात एक प्रकारची भावना शून्यता असे. तुलनेने मला मार्टिन गार्डनर , जॉन ग्रँट यांची पुस्तके आदर्श वाटतात.ती वाचकाला आपलं करतात.
अंधश्रद्धेबाबत माझ म्हणण थोडं वेगळं आहे.ती गेली कित्येक शतकं समाजात रूढ आहे.ती एका दिवसात जाणार नाही. अशाश्वत जीवन, दारिद्र्य आणि सततची चिंता यामुळे अंधश्रद्धा वाढीस लागते.’ गप्पी मासे पाळा आणि मलेरिया पळवा’अशी घोषणा देता येते. अंधश्रद्धा पळवणारे गप्पी मासे मिळत नाहीत. त्यापेक्षा हळूहळू अंधश्रद्धेच्या पाईकांना फितूर करता आले तर आपोआपच अंधश्रद्धेला म्हणजे मूलतः बुवाबाजीला भगदाड पडतील असे मला वाटते. अंधश्रद्धेचा आणि विज्ञानाचा तसा जवळचा संबंध नाही. अंधश्रद्धा हा मानसशास्त्राचा भाग आहे. ती दूर करायची तर त्यासाठी भक्तांची मनोधारणा बदलणं महत्त्वाचं ठरतं. माझे हे विचार मी स्पष्टपणे मांडत आलोय आणि हळूहळू अंधश्रद्धेवर सतत सौम्य हल्ले चढवत आलोय. मी भू शास्त्राचा विद्यार्थी असल्याने वाहतं पाणी खडकांवर कसा कसा परिणाम करते याची मला कल्पना आहे. विज्ञान लेखन हेच काम करतं .श्रद्धा मानवी जीवनाला घातक असती तर ती उत्क्रांतीत कधीच नष्ट झाली असती.पण ती टिकली. मात्र, ‘अति सर्वत्र वर्ज्ययेत’ या न्यायाने श्रद्धेचा अतिरेक होण्यापासून समाजाला वाचवण हे महत्त्वाचं ठरतं . मार्टिन गार्डनर आणि जॉन ग्रँट यांनी हे काम लेखणीद्वारे कसं करावं याचा आदर्शच घालून दिला आहे ."

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंनिस धरून बहुतेक सर्वच लिबरल संघटना ह्या सैलसर बांधणीच्या असतात. घट्ट चिरेबंदी बांधणीच्या नसतात. समाजाच्या, धर्माच्या, रूढींच्या अनेक अंगांशी त्यांचा वाद असतो. या प्रत्येकामध्ये काही जुन्या, कालविसंगत, टाकाऊ गोष्टी असतात त्या लवकरात लवकर नष्ट व्हाव्यात असा त्यांचा रोख असतो. यातली काही मते काही जणांना पटतात व केवळ त्या त्या मतापुरते ते या संघटनांचे पाठीराखे बनतात. संघटनेचे धुरीण अशा अंशतः सहमत लोकांना बाजूला सारीत नाहीत कारण त्या त्या मुद्द्यापुरता त्यांना जनाधार मिळतो. देवदासी प्रथा, नारायण नागबळीसारखी कर्मकांडे, महिला सक्षमीकरण, मूर्तिपूजा न मानणे, बुद्धीप्रामाण्य मानणे, धर्माचे अथवा बुवाबाबांचे जोखड न मानणे इ.अशा क्षेत्रांत वेगवेगळे कार्यकर्ते/ पाठीराखे काम करीत असतात व अंतिम ध्येय गाठताना त्यांची चांगली मदतही होते. शिवाय एकच व्यक्ती सर्वच क्षेत्रात झोकून देऊन काम करू शकत नाही. आपापला एक छोटासा कोपरा निवडून अनेक ठिकाणी अनेकांकडून कार्य चालू असते. मुख्य संघटना ही अशा कार्याचा आणि व्यक्तींचा दुवा बनते. जोरजबरदस्ती, बराकीकरण, केडर, सभासदत्व याची जरूरी राहात नाही. किंबहुना बळाचा वापर न करता बदल व्हावा हेच उद्दिष्ट असते. मग तो अपेक्षित वेगाच्या मानाने हळूहळू झाला तरी चालेल. हे लोक नेहमीच अल्पसंख्य असतात आणि कित्येक उद्दिष्टे त्यांच्या हयातीत गाठली जाऊही शकत नाहीत. पण त्यांनी पाया घातलेला असतो. शिवाय हे बहुविधता मानणारे असतात. सरसकट सपाटीकरण त्यांना मान्य नसते. व्यक्तिस्वातंत्र्याचाही ते आदर करतात. क्रांती ही अल्पजीवी आणि उत्क्रांती चिरकाल टिकणारी हे वाक्य घिसेपिटे असले तरी सत्य आहे.

म्हणजेच घाटे वैयक्तिक आयुष्यात काय करतात याला महत्व राहात नाही. केवळ गरजेचे म्हणून ते काही गोष्टी करतात,>>>> साधना, विज्ञानकथा लेखकाने वैयक्तिक आयुष्यात हे कठोर निरिश्वरवादी व अश्रद्ध असावे अशी लोकांची अपेक्षा असते. त्यामुळे त्यांच्या लेखी वैयक्तिक आयुष्यातील कृतीला महत्व आहेच. अन्यथा उक्ति व कृती यात अंतर असल्याबद्दल दूषणे दिली जातात. आपण त्या व्यक्तीच्या तयार केलेल्या प्रतिमेशी आचरण आपल्या दृष्टीने विसंगत दिसले की आपण दूषणे द्यायला सुरवात करतो.

माफ करा, पण मला या धाग्याचे प्रयोजन समजलेले नाही.
निरंजन घाटे हे विज्ञानकथा लेखक आहेत. ते वैयक्तिक आयुष्यात काय करतात, त्यांची श्रद्धा-अंधश्रद्धा यांच्याबद्दलची मते काय आहेत याचा संदर्भ मायबोलीवर आत्ता इतक्यात कुठे आला आहे का?
जनरल चर्चा करायची असेल ( शास्त्रज्ञ किंवा विज्ञानकथा लेखक वैयक्तिक आयुष्यात विज्ञानवादी असतात का? किंवा असावेतच का? अशा प्रकारची ) तर निरंजन घाटे यांचा नावानिशी उल्लेख करून, त्यांचे विचार, तेही त्यांनीच एका पुस्तकात लिहिलेले, इथे देण्याचे काय प्रयोजन आहे हे धागालेखक म्हणून आपण स्पष्ट कराल का?

अंनिस धरून बहुतेक सर्वच लिबरल संघटना ह्या सैलसर बांधणीच्या असतात.

हे फक्त दाखवण्यासाठी (ताकाला जाताना भांड लपवतात)
मूळ हेतू हा वेगळाच असतो वाईट गोष्टी वर टीका करणाऱ्या संघटना कधीच धर्माच्या (हिंदी) चांगल्या गोष्टी वर चर्चा करत नाहीत .
ही एक ठराविक हेतूंनी प्रेरित चळवळ आहे .
ह्या चळवळीचा हेतू हा समाज प्रबोधनाचा बिलकुल नाही तर वर्चस्वाचा आहे .
आणि बहुसंख्य लोक ह्यांचा हेतू चांगला ओळखतात .

माफ करा, पण मला या धाग्याचे प्रयोजन समजलेले नाही.>>>> ओके समजावण्याचा प्रयत्न करतो

निरंजन घाटे हे विज्ञानकथा लेखक आहेत. ते वैयक्तिक आयुष्यात काय करतात, त्यांची श्रद्धा-अंधश्रद्धा यांच्याबद्दलची मते काय आहेत याचा संदर्भ मायबोलीवर आत्ता इतक्यात कुठे आला आहे का?>>>> नाही. असा काही संदर्भ आला तरच विषय घ्यावा असे माझे मत नाही.

जनरल चर्चा करायची असेल ( शास्त्रज्ञ किंवा विज्ञानकथा लेखक वैयक्तिक आयुष्यात विज्ञानवादी असतात का? किंवा असावेतच का? अशा प्रकारची ) तर निरंजन घाटे यांचा नावानिशी उल्लेख करून, त्यांचे विचार, तेही त्यांनीच एका पुस्तकात लिहिलेले, इथे देण्याचे काय प्रयोजन आहे हे धागालेखक म्हणून आपण स्पष्ट कराल का?>> अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरील निरंजन घाटे या दीर्घकाळ विज्ञान कथा लेखन करणार्‍या सुप्रसिद्ध लेखकाची मते काय आहेत हे वाचकांना कळावे हा हेतु. मग नावानिशीच येणार ना? त्यांच्या मताशी सहमत असणे अंशत: सहमत असणे किंवा अजिबात सहमत नसणे असे मुद्दे चर्चेत येउ शकतात.शास्त्रज्ञ किंवा विज्ञानकथा लेखक वैयक्तिक आयुष्यात विज्ञानवादी असतात का? किंवा असावेतच का? असा जनरल विषय घेता आला असता. पण मला तो घ्यायचा नव्हता. असो.
अवांतर- मूळ मुद्द्यांवर चर्चा अधिक संयुक्तिक होत

माझ्या लहानपणी माझ्या खेडेगावात माझ्या लहानपणी दर दिवसाला कोणीतरी वेगवेगळी मंडळी, बाबा बुवा चमत्कार दाखवणारे, डोंबारी वगैरे मारूती मंदिरात उतरायची. चमत्कार दाखवणाऱ्या बाबाच्या कच्छपी लोक लागत, काही बाया नवऱ्यापेक्षा जास्त त्याची उठाठेव करत. भगत लोक, अंगात येणारे भरपूर होते. ते दाखवत असलेले चमत्कार ही हातचलाखी आहे हे कळायला अंनिस चे काही लोक गावात आले तेव्हा समजलं. इतकी भाबडी, निरक्षर लोक, परिस्थिती ने गांजलेली सहज खेटी घालणं वगैरे प्रकार करत असत.
मी स्वत: अंनिसचे उपकार मानतो की ज्यामुळे अनेक भोंदू शोषकांचं पितळ उघडं पडलं व फार मोठ्या प्रमाणात प्रबोधन झाले.
मात्र निरंजन घाटे यांचे मत व लेखक करत असलेले समर्थन पटत नाही.

निरंजन घाटे हे शनिपाराला तेल घेउन जाताना दिसले.
घाटे हे फक्त विज्ञानकथा लेखक असतील तर ठिक पण ते अंधश्रद्धाविरोधी काही लिहित असतील आणि विशेषतः तसा प्रचार प्रसार करत असतील तर कसे?
मला हा प्रश्न नेहेमीच गोंधळात पाडतो. माझे काम मानसशास्त्र, व्यसन्मुक्ती, योग अशासारख्या क्षेत्रात चाललेले असते. मी साधी मांडी घालून धड जमिनीवर बसता न येणार्‍या माणसाला योग शिकवताना पाहिले आहे. माझ्या पाहण्यात काही समुपदेशकांना स्वतःच्या वैयक्तीक आयुष्यातील समस्या सोडवणे अजून जमलेले नाही. सर्वावर कळस म्हणजे स्वतःचे व्यसन अजूनही सुटले नसताना व्यसनमुक्तीवर व्याख्याने देणारी, उपदेश करणारी माणसे पाहिली आहेत.
याला एक पळवाट नेहेमी सांगितली जाते. एक म्हणजे "अहो आम्ही माती खाल्ली तुम्ही खाऊ नका म्हणून हा उपदेश" किंवा "त्याच्या वैयक्तीक आयुष्यात तो काय करतोय याच्याशी आपल्याला काय करायचंय?"
प्रामाणिकपणे सांगायचं तर मलाही पूर्वी तसंच वाटायचं पण आता वाटतं माणसं तेवढी भाबडी नसतात. माणसाच्या कृतीत आणी उक्तीत फरक असल्यास त्यांना लगेच कळतो. मग स्वतःची मुले इंटरनॅशनल स्कूलमध्ये घालायची आणि साळसूदपणे बाकीच्यांना मराठी माध्यमाच्या शाळेत जायला आवाहन करायचे या म्हणण्यात दम राहात नाही.
तुम्ही एखादा वसा घेतला असेल तर तुमच्या उक्तीत आणि कृतीत एकवाक्यता असावी ही अपेक्षा गैर आहे असे मला वाटत नाही. अन्यथा लोकांना दांभिकपणाचा वास येतो आणि तुमचे म्हणणे कुणीही गंभीरपणे घेत नाही. यात निरंजन घाटे कुठे बसतात मला माहित नाही कारण त्यांचे साहित्य मी वाचलेले नाही. पण जर ते अंधश्रद्धाविरोधी असं समाजाचं प्रबोधन करत असतील तर मात्र त्यांचे वाग्णे विसंगत वाटते. अर्थात माझ्यासारखा माणुस त्यांना वाळीत टाका, त्यांच्यावर टिकेची झोड उठवा असं म्हणणार नाही आणि करणारही नाही. त्यांची एक मानवी बाजु समजली असंच मला वाटेल. पण त्यानंतर त्यांचे लेखन कितपत गांभीर्याने घ्यावे हा प्रश्न मला नक्के पडेल असं मात्र वाटतं.

अंधश्रद्धेचा आणि विज्ञानाचा तसा जवळचा संबंध नाही. अंधश्रद्धा हा मानसशास्त्राचा भाग आहे. ती दूर करायची तर त्यासाठी भक्तांची मनोधारणा बदलणं महत्त्वाचं ठरतं. माझे हे विचार मी स्पष्टपणे मांडत आलोय आणि हळूहळू अंधश्रद्धेवर सतत सौम्य हल्ले चढवत आलोय. मी भू शास्त्राचा विद्यार्थी असल्याने वाहतं पाणी खडकांवर कसा कसा परिणाम करते याची मला कल्पना आहे. विज्ञान लेखन हेच काम करतं .श्रद्धा मानवी जीवनाला घातक असती तर ती उत्क्रांतीत कधीच नष्ट झाली असती.पण ती टिकली. मात्र, ‘अति सर्वत्र वर्ज्ययेत’ या न्यायाने श्रद्धेचा अतिरेक होण्यापासून समाजाला वाचवण हे महत्त्वाचं ठरतं. >>> हे मला पटलं

तरीही असे म्हणेन की निरंजन घाटे यांचा नावानिशी उल्लेख करून असा लेख लिहिणे म्हणजे अंनिसच्या किंवा तत्सम विचारांच्या अजून काही कट्टर लोकांनी त्यांना वाळीत टाकावे अशी इच्छा मनी धरून लिहिले असावे असा समज होऊ शकतो ह्याचा विचार न करता लिहिले आहे बहुतेक.

तुम्हाला ते पुस्तक पेठेत कधी भेटले आणि त्यांचे ह्या विषयावरचे सद्य / चालू / वर्तमान मत काय आहे ह्या बाबत उलगडा होऊ शकेल का?

रच्याकने -
अंनिसच्या मिटींग मध्ये आमच्या एका कार्यकर्ता मित्राला निरंजन घाटे हे शनिपाराला तेल घेउन जाताना दिसले. >>>
अंनिस ची सभा शनिपारापाशी होती का?
तुमच्या कार्यकर्त्या मित्राने त्यांना 'शनि'वर तेल वाहताना बघितले का?
तुमचा कार्यकर्ता मित्र पण तिकडे तेल वहायलाच गेला होता का? तो विज्ञान लेखन करतो का?

अंनिसच्या मिटींग मध्ये आमच्या एका कार्यकर्ता मित्राला निरंजन घाटे हे शनिपाराला तेल घेउन जाताना दिसले. >>>
अंनिस ची सभा शनिपारापाशी होती का?

वरील वाक्य 'अंनिसच्या मीटिन्गमधील आमच्या एका मित्राला.....' असे किंचित बदलून लिहिले असते तर कदाचित वेगळा आणि अधिक स्पष्ट अर्थ निघाला असता. मीटिंगमधल्या एका मित्राला निरंजन घाटे हे शनिपारापाशी भेटले होते, असे म्हणायचे असेल कदाचित. म्हणजे ती मीटिंग शनिपारापाशी नव्हती आणि मित्र आणि श्री घाटे यांची 'ती' दृष्टिभेट आधी झाली होती असे स्पष्ट कळले असते.

तरीही असे म्हणेन की निरंजन घाटे यांचा नावानिशी उल्लेख करून असा लेख लिहिणे म्हणजे अंनिसच्या किंवा तत्सम विचारांच्या अजून काही कट्टर लोकांनी त्यांना वाळीत टाकावे अशी इच्छा मनी धरून लिहिले असावे असा समज होऊ शकतो ह्याचा विचार न करता लिहिले आहे बहुतेक. >>
तसा समज झाला तर तो त्याच्या आकलनाचा भाग आहे त्याला मी काही करु शकत नाही. फार तर तसे ते नाही एवढेच म्हणू शकतो.

तुम्हाला ते पुस्तक पेठेत कधी भेटले आणि त्यांचे ह्या विषयावरचे सद्य / चालू / वर्तमान मत काय आहे ह्या बाबत उलगडा होऊ शकेल का?>>> पाच सहा महिन्यांपुर्वी. पुस्तकात जे त्यांनी लिहिले आहे तेच त्यांचे तेव्हाचे ही मत होते.
अंनिस ची सभा शनिपारापाशी होती का?>>> नाही तेव्हा ती आपटे प्रशालेत होत असे.
तुमच्या कार्यकर्त्या मित्राने त्यांना 'शनि'वर तेल वाहताना बघितले का?
>>> नाही फक्त लाईनीत उभे असल्याचे पाहिले.

तुमचा कार्यकर्ता मित्र पण तिकडे तेल वहायलाच गेला होता का? तो विज्ञान लेखन करतो का?
रस्त्यावरुन जाताना पाहिले. तो विज्ञान लेखन करत नाही.

अतिरिक्त - मला निरंजन घाट्यांचे अंधश्रद्धा निर्मूलना बाबत मत पटते
समांतर- साधारण अशाच प्रकारचे मत नारळीकरांनी माझ्या ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.... चे लोकसत्तामधे परिक्षण लिहिले त्यात व्यक्त केले आहे.,

http://faljyotishachikitsa.blogspot.com/2006/09/blog-post_11585851119053...

अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरील निरंजन घाटे या दीर्घकाळ विज्ञान कथा लेखन करणार्‍या सुप्रसिद्ध लेखकाची मते काय आहेत हे वाचकांना कळावे हा हेतु.>>
मग या विषयावर किंवा एकंदरीत त्यांच्या लेखनामागची भूमिका स्पष्ट करणारी एखादी सविस्तर मुलाखत वाचायला जास्त आवडली असती मला तरी.
ते एकदा शनिपाराजवळ शनीला तेल वाहण्यासाठी (?) उभे होते की ते नियमितपणे/ वारंवार तसं करतात/ करत असत का? ते नियमितपणे तसं करत असतील, तर का? त्यांच्या इतरही काही श्रद्धा/अंधश्रद्धा आहेत का, हे आणि असे बरेच मुद्दे इथे महत्त्वाचे आहेत.

हा लेख निरंजन घाटे यांची वकीली केल्यासारखा वाटतो. याऐवजी अंधश्रद्धेचे पर्यायाने अंनिसच्या कार्यपद्धती वर लिहून त्यात शनिपाराचा किस्सा लिहून, घाटे यांच्या विचारांचा सारांश व त्यावर तुमचं स्वत:चे म्हणणं मांडायला हवे होते असे वाटते.

या लेखातून एक शिकायला मिळाले.
लेखकाने काही गोष्टी स्पष्ट केल्या नसतील तर फुकटचा चांगुलपणा म्हणून गोष्टी गृहीत धरत प्रतिसाद देत बसू नये. आधी सगळं ठरवून घ्यावं, धा प्रश्न इचारायआला लागले तरी चालत्याल.

निरंजन घाटे यांचे विचार काय हे माहीत नाहीत.
ते विज्ञानलेखक असून वाटी घेऊन जातात तर त्यांनी लिहीलेल्या विचारांशी ते प्रामाणिक राहण्याचा काय संबंध ?
विज्ञानलेखक श्रद्धाळू किंवा अंधश्रद्धाळू नसतो असे गृहीतक कुणी मांडले ?
नास्तिक भयकथा लिहीत नाही किंवा लिहू नये असे कुणी म्हटले ?
विज्ञानलेखक विज्ञाननिष्ठ असल्याचा दावा करीत आहे का ?
असे बरेचसे प्रश्न आहेत.

>>पण जर ते अंधश्रद्धाविरोधी असं समाजाचं प्रबोधन करत असतील तर मात्र त्यांचे वाग्णे विसंगत वाटते.<<. +१
आणि दुसरी विसंगती(?) हि कि शनिपाराला जाउन (फॉर व्हॉटेवर रिझन) अंधश्रद्धेच्या पाइकांना फितूर कसं करतात ते हि स्पष्ट झालेलं नाहि. हे म्हणजे आमची ती श्रद्धा, आणि तुम्हि करता/ठेवता ती अंधश्रद्धा!.. Happy

१ एका पुस्तकातले तीन परिच्छेद इथे छापले आहेत.
प्रताधिकाराचं काय झालं ?
२ < अंनिसच्या किंवा तत्सम विचारांच्या अजून काही कट्टर लोकांनी त्यांना वाळीत टाकावे अशी इच्छा मनी धरून लिहिले असावे असा समज होऊ शकतो> दुसराही परिणाम होऊ शकतो. अंनिसच्या विरोधात काही लोकांच्या भावना अधिक तीव्र होऊ शकतात. एखाद्याने आपली धार्मिक श्रद्धा/अंधश्रद्धा कोणत्याही कारणाने पाळली म्हणून त्यांना वाळीत टाकले..
३. प्रसंग कधीचा आहे? खूप जुना असावा, असं दिसतंय. जर त्या नंतर (त्यामुळे असं नव्हे) समितीने आपली भूमिका मवाळ केली असेल किंवा घाटे म्हणतात तसा मार्ग अवलंबिला असेल, तर ते अधिक स्पष्टपणे यायला हवं होतं.
माझं मत होतंय लेखकाला अंनिसविरोधात लिहिण्यासारखं काही दिसलंय म्हणून लिहिलंय.

घाटे यांचे विचार अजिबातच पटले नाहीत.
फुलेंचे उदाहरण दिले होते. सावित्रीबाईंवर शेणाचा मारा झाला. पण त्यानंतर विधवा पुनर्विवाह आणि स्त्री शिक्षणाचा मार्ग खुला झाला. एखादी गोष्ट समाजात घट्ट रूजलेली असताना त्यावर घणाघाती प्रहार करावा लागतो.
समाजमन हे डोहातल्या पाण्यासारखं असतं. त्यात छोटासा खडा टाकला तर किंचितशी आंदोलने निर्माण होऊन निमिषार्धातच पाणी निवळते. पण भली मोठी शिळा आणून टाकली तर डोहातले पाणी डचमळते. तसेच समाजमनाच्या बाबतीत होत असते.

https://youtu.be/HLBT4GgMwBY?t=1885
इथे फुलेंनी केलेले प्रहार आहेत. याचे परिणाम काय वाईट झाले ? तेव्हां आताच्या पेक्षा वाईट परिस्थिती होती. तेव्हां या लोकांनी धाडस केले. तर पुढच्यांनी अजून पुढे जायला हवे. मात्र ते जर म्हणत असतील की जैसे थे स्थितीच ठेवावी. लोकांना वाईट वाटेल असे बोलू नये तर मग आपण पुढे आलो कि मागे गेलो याचा विचार व्हायला हवा.

वेद देवांनी लिहीले नाहीत जे समाजमनाचा विचार न करता फुलेंनी सांगितले. एखादा विचार सुरूवातीला अल्पसंख्य असू शकतो. पण तो चुकीचा नसेल तर बोललाच पाहीजे. आपला त्यावर विश्वास असायला हवा. यानंतर सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. त्यात हजारो अनुयायी येत गेले आणि महाराष्ट्रभर सत्यशोधक आंदोलन उभे राहीले. हे मुळावरच घाव घालत होते. अंधश्रद्धा निर्मूलनाचे आंदोलन त्यापुढे किरकोळच वाटते. तरी देखील जे चूक ते चूक म्हणायचे धाडस का होत नसेल ?

महादेवशास्त्री रानडेंना फुलेंनी जरठविवाहाबाबत खडे बोल सुनावले होते. जरठविवाह ही अगदीच सामान्य बाब असतानाच्या काळात रानडेंनी उतरत्या वयात लहान वयाच्या म्हणजे अकरा वर्षाच्या मुलीशी विवाहाचा घाट घातला. रानडे हे सुधारणावादी होते. त्यांचा दबदबा होता. मात्र फुलेंनी त्यांना स्पष्टपणे सुधारकांनी असे केले तर आंदोलन पुढे नाही मागे गेले असे म्हणावे लागेल हे सुनावले होते.

रानडे आणि घाटे मला एकाच जागी दिसतात. किमान रानडे कृतिशील सुधारणावादी होते. घाटेंच्या कार्याबाबत फारशी माहिती नाही. माझ्या मते जी आंदोलने अशा प्रकारे स्पष्ट बोलण्याला विरोध करतात ती पुरोगामी आंदोलनातील अडसर आहेत.

श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन्हींवर प्रहार करणा-या ओ माय गॉड आणि पीके या दोन सिनेमांनी जो धंदा केला त्यावरून घाटेंनी आपली मतं तपासून घ्यावीत असे म्हणावेसे वाटते.

<<आपण ज्या पार्टीत/संस्थेत/संघटनेत आहोत तिचं संविधान /नियम क्लियर कट आहे.>>
म्हणजे तुमचे म्हणणे असे आहे का की
आपल्याला एकदम १०० टक्के परिपूर्ण, कुठलाहि दोष नसणारे लोक हवेत. कुणाचीहि कसलिहि चूक आम्ही खपवून घेणार नाही. तसे कुणि नाही मिळाले तर संस्था नि संस्थेचे मुख्य कार्य खड्ड्यात गेले तरी चालेल.

म्हणजे मुख्य उद्देश काय? नुसतीच अंधश्रद्धा नसलेले १०० टक्के परिपूर्ण, कुठलाहि दोष नसणारे लोक जमा करायचे की समाजातून अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचे प्रयत्न करायचे?
आणि कुणा अंधश्रद्धा असणार्‍या माणसाला उपरति झाली की आपण या संस्थेत जाऊन स्वतःच्या नि इतरांच्या अंधश्रद्धा दूर कराव्यात, तर त्याने चुकून जरी काही केले, किंवा पूर्वी तो अंधश्रद्ध होता याचे पुरावे गोळा करून त्याला हाकलून द्यायचे?
अंधश्रद्धा नसलेले १०० टक्के परिपूर्ण, कुठलाहि दोष नसणारे लोक जमेस्तवर वाट बघायची?

मला म्हणायचं होतं:- की घेतले न व्रत हे आम्ही अंधतेने. मनुष्य जर बुध्दिमान असेल तर आपले विचार नि कृति हे परस्परविरोधी नाहीत ना याची काळजी घेईलच. अंनिसच्या धोरणात शनिला तेल अर्पण करण्यासारखी गोष्ट बसणं शक्यच नाही.

झक्कीसर
१०० टके मतं कुणाचीही जुळणे शक्य नाही. पण धोरणे बाय अ‍ॅण्ड लार्ज मान्य असायला हवीत. तरच एकत्र येऊ शकतो. तुम्हाला सहकारी बँक उभी करायची असेल तर नियम, अटी आणि संस्थेची धोरणे मान्य असतील तरच एकत्र येण्यात अर्थ आहे. नाहीतर त्या संस्थेचं खोबरं झालंच समजा. इतर किरकोळ मतभेद कायमही ठेवता येतात किंवा मिटवताही येऊ शकतात. मात्र तीव्र स्वरूपाचे आणि मुळालाच बाधा आणणारे मतभेद असतील तर संस्था टिकतील का ?

काल अजून एक आयडी गेला आणि तुम्ही आलात. सदस्यसंख्या कायम राहिली.
नाही ना. आज दोन आयडी गेले. संख्या परत कमी झाली.

भरत,
१ एका पुस्तकातले तीन परिच्छेद इथे छापले आहेत.
प्रताधिकाराचं काय झालं ?>>>>
तुम्हाला हे प्रताधिकाराचे उल्लंघन झाले आहे असे म्हणायचे असावे. हा विषय बौद्धिक संपदा शी निगडीत आहे. इथे यावर झालेली चर्चा पहा http://aisiakshare.com/node/7218 उपक्रमावर देखील त्यावेळी फेअर युज याविषयावर चर्चा झाल्याचे स्मरते. अशी कायदेशीर कारवाई झाली तर मला ती इष्टापत्ती वाटेल असो. तो मुख्य विषय नाही.

माझं मत होतंय लेखकाला अंनिसविरोधात लिहिण्यासारखं काही दिसलंय म्हणून लिहिलंय.>>>>>>> आपणही कृष्ण धवल द्वैतात अडकलात. वर मी गल्लत गफलत गहजब या राजीव सान्यांच्या पुस्तकाविषयी लिहिले आहे. त्यात अशा प्रकारच्या विचारश्रेणीविषयी बरेच काही लिहिले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन व्हावे याविशयी एकमत आहे पण त्याचे मार्ग काय असावेत याविषयी विविध मतप्रवाह आहेत. मी ते जवळून पाहिले आहेत. अंनिस ही संघटनेपेक्षा चळवळ अधिक आहे. वर हीरा यांनी संघटनात्मक विषयावर लिहिले आहेच.

तीसेक वर्षांपुर्वी निरंजन घाट्यांच्या कथांचे पुस्तक मुलांकरिता आणले होते. सायन्स फिक्शन च्या नावाखाली "काहीही" लिहिलं होतं. या असल्या कथा वाचून मुलांच्या मनात 'वैज्ञानिक अंधश्रद्धा' निर्माण होतील या भीतीने ते पुस्तक मुलांना वाचायला न देता तसेच रद्दीत जमा केले.

निरंजन घाटे हे अंधश्रद्धा निर्मुलनाबाबत नेमका काय विचार करतात हे जाणण्याची त्यामुळे उत्सुकता राहिलीच नाही. त्याचप्रमाणे विजय भटकर यांनीही डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येच्या तपासप्रकरणात तत्कालीन कमिशनर गुलाबराव पोळ यांनी केलेल्या प्लँचेट प्रकाराचे समर्थन केल्यापासून विज्ञानवादी मंडळीही अंधश्रद्धाळू असतात याची खात्री पटली आहेच.

विज्ञानवादी मंडळीही अंधश्रद्धाळू असतात याची खात्री पटली आहेच.
>> बरोबर बिपीन जी. अनेक नवीन कामांची सुरुवात करताना विज्ञानवादी लोक पूजा करताना दिसतात. अध्यात्मातील बाबा, गुरू उद्घाटनाला बोलावतात.

सर्वांच्या प्रतिसादांवर प्रतिक्रिया व्यक्त करणे शक्य नाही व ते अपेक्षित ही नाहि. धाग्याच्या पुर्वार्धात निरंजन घाटे हे शनिपाराच्या भाविकांच्या लाईनी त दिसले हा प्रसंग. 1994-95 च्या अलिकडे पलिकडे असावा. अंनिसची साप्ताहिक मिटिंग ही आपटे प्रशालेत खुप वर्षे चालत होती. ती सर्वांसाठी खुली व अनौपचारिक स्वरुपाची असायची. त्याचे स्वरुप याविषयावर माहिती व चर्चा अशी असायची. मूळात अंनिस ही विचारांची व विवेकाची चळवळ आहे. तो एक व्यापक परिवर्तनाचा भाग आहे.हीरा यांनी वर अशा लिबरल संघटनात्मक बाबीवर सविस्तर लिहिल आहे.
मी 2007 मधे स्वेच्छानिवृत्ती नंतर निरंजन घाट्यांना माझ्या फलज्योतिष या विषयाच्या अनुषंगाने भेटायला गेलो होतो. तेव्हा साहिजिकच हा विषय निघाला. तेव्हा झालेल्या चर्चेतील मला जे आकलन झाले ते मी धाग्यात मांडले आहे
आता धाग्याचा उत्तरार्ध हा निरंजन घाटे यांची अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरील मते त्यांच्याच शब्दात अवतरणार दिली आहेत. ती मते मला स्वत:ला पटतात. कारण मी ही अंनिसच्या अनौपचारिक बैठकीत हीच भूमिका मांडत आलो आहे. माझ्या ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी..... प्रश्नोत्तरातून सुसंवाद. हे पुस्तक वाचल्यावर अंनिसतल्या काही जहाल मतप्रवाहाच्या लोकांना असा प्रश्न पडला की पुस्तक फलज्योतिषाचे समर्थन करते की विरोध. म्हणजे पुन्हा द्वैत मांडणी. मग दुसर्‍या आवृत्तीच्या निमित्ताने मनोगतात त्याबद्दल थोडे विवेचन केले आहे. त्याची लिंक चर्चेत दिली आहे पण पुन्हा देतो. http://mr.upakram.org/node/777#comment-12763 जिनियस लोकांनी ते पुस्तक जरुर वाचावे उपक्रमावर ते लेखमाला स्वरुपात उपलब्ध आहे.
आता निरंजन घाट्यांची मते ही कुणाला मान्य असतील कुणाला अंशत: मान्य असतील कुणाला अजिबात मान्य नसतील. याला मी केवळ मतभिन्नता आहे असे न म्हणता ते समाजातील विविध विचारप्रवाह आहे असे समजतो. मायबोलीवरच डॊ दाभोकरांच्या हत्येच्या तपासासाठी प्लँचेट चा वापर केला म्हणुन अंनिसने गुन्हा दाखल करणे योग्य कि अयोग्य? ही चर्चा घडवून आणली होती त्याचा दुवा https://www.maayboli.com/node/49918 त्यात मी माझी भूमिका मांडली आहेत.
आता प्रतिक्रियांविषयी. काहींनी प्रतिक्रिया या विचारपुर्वक दिल्या आहेत तर काहींनी प्रतिक्रिया दिल्यानंतर विचार केला आहे असे जाणवते. फार खोलात जाणार नाही. काही लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त न करता फक्त वाचन करुन विचार केला असेल. व्यक्त झाले नाहीत याचा अर्थ विचार केलाच नाही असे नाहि. प्रतिक्रिया देणारे विविध वयोगटातील विविध विचारश्रेणीतील विविध संस्कारात वाढलेले असणार हे उघड आहे. या निमित्त विचार मंथन झाले हे काही कमी आहे का?

Pages