अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत निरंजन घाटे यांचे विचार

Submitted by प्रकाश घाटपांडे on 17 July, 2019 - 00:11

एक जुना किस्सा आठवतो.
अंनिसच्या मिटींग मध्ये आमच्या एका मित्राने निरंजन घाटे हे शनिपाराला दर्शनाच्या रांगेत उभे असल्याचे दिसले असे सांगितले. त्याने लगेच मिटींगमध्ये टीकेची झोड उठवली . " निरंजन घाटे तुम्ही सुद्धा?" स्टाईलने. मग स्यूडो सायंटिस्ट, भंपक विज्ञानवादी अशी विशेषणे लावायला सुरुवात केली. थोडक्यात सगळ्यांनी त्यांना वाळीत टाकले. मी खालील मुद्दे मांडले
१) निरंजन घाटे हा ही माणूसच आहे
२) त्यांची त्या मागील भूमिका विचारुन न घेताच टीका करणे वैज्ञानिक दृष्टिकोनात बसत नाही व ते मला योग्य वाटत नाही.
३) एवढ्या एका कारणामुळे त्यांनी मराठी विज्ञान साहित्यात दिलेले योगदान लगेच विसरलात काय?
४) कुटुंबातील कुणाच्या तरी वतीने ते प्रतिनिधी या नात्याने पण आले असतील तर?
परिणामी मी निरंजन घाट्यांची वकिली करतो म्हणून मलाच वाळीत टाकायला सुरुवात केली. त्यानंतर बर्‍याच वर्षांनी मी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यावर एकदा निरंजन घाट्यांकडे भेटायला गेलो.गप्पांमधे त्यांना हा किस्सा सांगितला. मला त्यांचे मत जाणून घ्यायचे होते.त्यांचे लहानपण त्या भागात गेले होते. अनेक सुख दु:खाच्या स्मृती तिथल्या गोष्टींशी निगडीत होत्या. त्याच मनोव्यापाराचा भाग म्हणून ते शनिपाराला जात असत. हाच तो सर्वसामान्य माणूस असल्याचा भाग होता. नंतर एकदा पुस्तक पेठेत ते भेटले होते. त्यावेळी ही गप्पात अंधश्रद्धा निर्मूलन हा विषय निघाला त्यावेळी ते म्हणाले कि.समाज बदलायला पुरेसा वेळ दिला पाहिजे. मी त्यावर लिहिल आहे.
वाचत सुटलो त्याची गोष्ट या पुस्तकात ते म्हणतात," गार्डनर चे पुस्तक आणि जॉन ग्रँट च ‘ बोगस सायन्स ऑर व्हाय पिपल रियली बिलीव्ह दीज थिंग्ज ‘ हे पुस्तक वाचताना मला नरेंद्र दाभोळकर आणि श्याम मानव यांच्या पुस्तकांची आठवण झाली. मी या दोघांचीही बरीच पुस्तके वाचली आहेत. श्याम मानव यांची आणि माझी 1978 च्या सुमारास नागपूर मध्ये ओळख झाली. त्यांच्या कार्याचे महत्व मी जाणतो. नरेंद्र दाभोळकरांची आणि माझी ही ओळख होती. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे व्रत प्राणपणाने घेतलं होतं आणि त्यातच त्यांचा बळी गेला. पहिल्या अंधश्रद्धा निर्मूलन संमेलनात त्यांची माझी भेट झाली तीच शेवटची. त्यानंतर महिन्याभरातच त्यांचा मृत्यू झाला. संमेलनातल्या माझ्या भाषणातील मुद्दे आणि त्यांचे विचार जुळणारे नव्हते, तरी त्यांच्या कार्याबद्दल मला आदर होता. त्यांनी माझे विचार ऐकून घेतले. त्यावेळी त्यांनी निरोप देताना ‘आपले विचार एकाच प्रकारचे आहेत,पण आपले मार्ग भिन्न आहेत’ असे म्हटले होते.
कुठलीही चळवळ पुढे रेटायची तर नेता आक्रमक असावा लागतो, तरच चळवळ पुढे जाते. मात्र बऱ्याचदा या आक्रमकपणाला, क्रियेला तितकीच आक्रमक प्रतिक्रिया अशा स्वरूपाचं उत्तर मिळतं. दोन्हीही पक्ष अधिक कडवे होत जातात. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीने पुढे देवाला विरोध करायचे सोडले आणि बुवाबाजीला विरोध सुरू केला. मग अनेक बुवा उघड केले . पण बुवांकडे जशी अमाप संपत्ती जमली होती तशी चळवळीकडे नव्हती हे एक, आणि या चळवळीच्या नेत्यांच्या पुस्तकांची भाषा अगदी कोरडी होती. त्यात एक प्रकारची भावना शून्यता असे. तुलनेने मला मार्टिन गार्डनर , जॉन ग्रँट यांची पुस्तके आदर्श वाटतात.ती वाचकाला आपलं करतात.
अंधश्रद्धेबाबत माझ म्हणण थोडं वेगळं आहे.ती गेली कित्येक शतकं समाजात रूढ आहे.ती एका दिवसात जाणार नाही. अशाश्वत जीवन, दारिद्र्य आणि सततची चिंता यामुळे अंधश्रद्धा वाढीस लागते.’ गप्पी मासे पाळा आणि मलेरिया पळवा’अशी घोषणा देता येते. अंधश्रद्धा पळवणारे गप्पी मासे मिळत नाहीत. त्यापेक्षा हळूहळू अंधश्रद्धेच्या पाईकांना फितूर करता आले तर आपोआपच अंधश्रद्धेला म्हणजे मूलतः बुवाबाजीला भगदाड पडतील असे मला वाटते. अंधश्रद्धेचा आणि विज्ञानाचा तसा जवळचा संबंध नाही. अंधश्रद्धा हा मानसशास्त्राचा भाग आहे. ती दूर करायची तर त्यासाठी भक्तांची मनोधारणा बदलणं महत्त्वाचं ठरतं. माझे हे विचार मी स्पष्टपणे मांडत आलोय आणि हळूहळू अंधश्रद्धेवर सतत सौम्य हल्ले चढवत आलोय. मी भू शास्त्राचा विद्यार्थी असल्याने वाहतं पाणी खडकांवर कसा कसा परिणाम करते याची मला कल्पना आहे. विज्ञान लेखन हेच काम करतं .श्रद्धा मानवी जीवनाला घातक असती तर ती उत्क्रांतीत कधीच नष्ट झाली असती.पण ती टिकली. मात्र, ‘अति सर्वत्र वर्ज्ययेत’ या न्यायाने श्रद्धेचा अतिरेक होण्यापासून समाजाला वाचवण हे महत्त्वाचं ठरतं . मार्टिन गार्डनर आणि जॉन ग्रँट यांनी हे काम लेखणीद्वारे कसं करावं याचा आदर्शच घालून दिला आहे ."

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रकाश जी यात घाटे यांचे नेमके विचार काय हे मुळीच समजलं नाही. एकीकडे विरोध ज्या गोष्टीचा करायचा तीच गोष्ट करायची व लंगडे समर्थन करायचं हे पटलं नाही.

एकीकडे विरोध ज्या गोष्टीचा करायचा तीच गोष्ट करायची व लंगडे समर्थन करायचं हे पटलं नाही.>>>>

घाटे म्हणताहेत की तुम्हाला समाज करत असलेल्या ज्या गोष्टींचा विरोध करायचा आहे त्यावर तुम्ही थेट हल्ला करून काम होणार नाही, तर ही विरोधाची गोळी शर्करावगुंठीत करून घ्या, म्हणजे अपेक्षित परिणाम मिळायची शक्यता आहे. या संदर्भात अनिस ज्या प्रकारची भाषणे अथवा पुस्तके प्रसूत करते तो प्रकार फारसा कामी येत नाही असे ते म्हणतात. त्याउलट त्यांनी ज्या प्रकारचे लेखन केले अथवा जी नावे दिलीत त्या लेखकांसारखे लेखन केल्यास जास्त चांगला परिणाम साधता येईल.

म्हणजेच घाटे वैयक्तिक आयुष्यात काय करतात याला महत्व राहात नाही. केवळ गरजेचे म्हणून ते काही गोष्टी करतात, त्याचा प्रचार ते करत नाहीत.

खान
प्रत्येक ओळ नीट वाचा समजून घ्या मग दुसरी ओळ वाचा
आणि ह्या पद्धतीने पूर्ण लेख वाचा समजेल तुम्हाला पण लेखकाला म्हणायचे आहे ते

लेख संपादनाचा अवधी असेल तर,
निरंजन घाटेंचे जे काय विचार तुम्ही लेखात लिहिले आहेत ते "ठळक" करा, म्हणजे आम्हाला ते वाचता येतील.

सुमित ठळक केले आहे. परंतु वैचारिक लेख सजग वाचक काळजीपूर्वक वाचतो. व त्यात अवतरणापासून हे घाटेंचे विचार आहेत हे सहज कळते.

निरंजन घाटे यांच्या पुस्तकांच्या प्रस्तावनेतही त्यांची भूमिका थोडक्यात मांडतात.
मला त्यांची भूमिका बऱ्यापैकी पटते.

आर्थिक, सामाजीक आणि मानसिक स्थैर्य आले की माणसाची श्रद्धेवरील श्रद्धा कमी होते. भारतासारख्या देशात जिथे मानसोपचार घेणे कमीपणाचे लक्षण समजले जाते, आणि जिथे मानसोपचाराची खूप कमतरता आहे, तिथे श्रद्धा बऱ्याचदा मानसोपचाराचे काम करते. देव, धर्म, अध्यात्म आपला मेंदूचं आहे हे लोकांना हळूहळू पटवून देणे आणि त्याच बरोबर आर्थिक आणि सामाजिक स्थैर्य वाढत जाणे याने अंधश्रद्धा (आणि श्रद्धा) कमी होत जाईल असे ते म्हणतात.

तुम्ही निरंजन घाटे याना वाळीत टाकले तेव्हा घेतली भूमिका मला एकदम योग्य वाटली.

>>त्याच मनोव्यापाराचा भाग म्हणून ते शनिपाराला जात असत. <<
नाहि पटलं. लहानपणीचं एकवेळ ठिक आहे पण मोठेपणी, ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्यावरहि शनिपारावर तेल टाकावसं वाटणं हे पटणारं नाहि; एस्पेशियली बाहेर जगांत तुम्ही अंधश्रद्धा विरोधक म्हणुन वावरत असाल तर. पुढे घाटेसाहेब म्हणतात कि - "हळूहळू अंधश्रद्धेच्या पाईकांना फितूर करता आले तर आपोआपच अंधश्रद्धेला म्हणजे मूलतः बुवाबाजीला भगदाड पडतील असे मला वाटते...". या वाक्याचा आणि शनिपारावर तेल घालण्याच्या कृतीमुळे अंधश्रद्धेला भगदाड कसं पडेल, हे हि समजलं नाहि...

निरंजन घाटेंनी शनिपाराला तेल का घातले याचे उत्तर त्यांनी स्वतः कुठे दिले आहे? माहित असल्यास इथे लिहावे कृपया.
शनिपाराला तेल घातले यावरून एकदम त्यांना आणि तुम्हाला वाळीत टाकणे हे मला आवडले नाही. जितके लोक जमवता येतील तितके जमवावे, जर ते अंधश्रद्धावाद निर्मूलन करण्यात मदत करत असतील तर त्यांच्या चुका दुरुस्त करून घ्या, त्यांच्याशी बोला.
असे फटकन एखाद्याला झटकून टाकणे अश्याने संघटना होत नाहीत. इथेच नेतृत्व कमी पडते.

श्री. छत्रपति शिवाजीमहाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर आणा. मराठा तितुका मेळवावा - तर हे जणू कुणाला आपल्या संघटनेतून हाकलून कसे देता येईल याचीच वाट पहात असतात.

दोन महाराष्ट्रियन नि तीन गट. मग हळूहळू एखाद्या गटाविरुद्ध लढायला मुसलमान, ख्रिश्चन, चिनी लोक आणायचे नि त्यांच्या अंधश्रद्धा आपण बाळगायच्या!

पण आपले डोके भडक! एकदम एक घाव दोन तुकडे - फक्त आपआपसात - परकीयांचे पाय चाटायचे! धन्य धन्य महाराष्ट्रीय संघटना!!

झक्कींचा नवा अवतार ?
नन्द्या९९ हा आयडी आहे की गेला ? काल अजून एक आयडी गेला आणि तुम्ही आलात. सदस्यसंख्या कायम राहिली.

आपण ज्या पार्टीत/संस्थेत/संघटनेत आहोत तिचं संविधान /नियम क्लियर कट आहे. अशा नियमांविरोधात वागले तर हकालपट्टी झालीच पाहिजे. घाटे हे अंनिसच्या एकशे ऐंशी अंशात चालत होते.

घाटपांडे सर
तुम्ही स्वतः अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संबंधित आहात असे अनेकदा सांगता. मात्र अनेक वेळी तुम्ही गोंधळात टाकता. फल ज्योतिषावर पण तुमचा विश्वास आहे कदाचित.. तो विषय नाही इथे याची कल्पना नाही.

अंधश्रद्धा निर्मूलन हा प्रबोधनाचा विषय आहे. शिक्षकी पेशा आहे. ही नोकरी नाही. तर समाज प्रबोधनाचा वसा घेतलेली संघटना आहे. या संघटनेचा सदस्य कुणाला म्हणता येईल ? ज्याने रजिस्ट्रेशन केले आहे त्याला म्हणावे का ? ज्याने वर्गणी दिलेली आहे त्याला म्हणावे का ? की ज्याने हे विचार समजून घेतले आहेत, ज्याचा या विचारांवर विश्वास आहे आणि ते सत्य आहे याची खात्री पटली आहे व त्याबरहुकूम आपले आचरण आहे त्याला म्हणावे ?

या प्रश्नात तुमच्या प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे.
आपण जो विषय शिकवणार आहोत त्यावर आपला स्वतःचाच विश्वास नसेल तर आपण समोरच्याला कसे शिकवणार ? तेल घेऊन जाणे ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा यावर सदस्यांचे एकमत नसेल तर तुमच्या शिकवण्यात, अभ्यासक्रमात अथवा आकलनात दोष आहे असे म्हणावे लागते. जर इतर सर्व सदस्यांचे एकमत असेल आणि एकाचे भिन्न मत असेल (इथे मतभेदांचा प्रश्नच येत नाही) तर तिथे त्या सदस्याच्या बाबतीत समजुतीत घोटाळा आहे असे म्हणावे लागते.

आपण चार लोकांना जी गोष्ट करायला सांगणार आहोत त्याच्या बरोबर विरोधात आपला एखादा गडी वागत असेल तर बाकीचे कोणत्या तोंडाने बदलायला सांगणार आहेत ?

फितूर करून घ्यायला ही काही रणांगणातील लढाई नाही. ज्या विचारांचा प्रसार करायचा आहे त्याची लाज वाटता कामा नये. आपल्या आप्तेष्टांपुढे माझे अमूक तमूक विचार आहेत असे खणखणीतपणे सांगता येत नाही त्या व्यक्तीची अवस्था ना घर का ना घाट का अशी होऊन जाते. मग अशी व्यक्ती सर्वांना खूष करण्याच्या नादात दोन्हीकडे स्पष्टीकरणे द्यायला लागते.

तुमच्या केस मधे (नाव नसते दिले तर खूप बरे झाले असते) ही जी व्यक्ती आहे तिने तेल घेऊन जायचे काम स्वतःहून स्विकारले की जवळच्या व्यक्तींचे मन दुखवायचे नाही म्हणून स्विकारले हे समजले नाही. त्या व्यक्तीचे विचार जर आप्तेष्टांना ठाऊक असतील तर त्यांनीही या व्यक्तीस असे काम न सोपवणे न्यायसंगत झाले असते. या व्यक्तीच्या मतांचा आदर करणे हे आप्तांचेही काम आहे. ठाऊक असूनही काम सोपवले असेल तर चुकीचे आहे.

मात्र जर ही व्यक्तीच आपले विचार जाहीर करत नसेल तर त्यांना दोष देता येत नाही.
अशा परिस्थितीत जवळच्या व्यक्तींना या व्यक्तीचे विचार माहीत होत नसतील तर संबंधित व्यक्ती अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रसार कशी काय करणार ? या व्यक्तीला लोकांना न दुखावणे महत्वाचे वाटत असेल तर मग यातच आयुष्य निघून जाईल.

विचार स्पष्ट असतील तरच त्यावर चर्चा होते. अल्पमतात आहे म्हणून विरोधी मत कसे मांडावे अशा मनःस्थितीत असलेले शून्य काम करू शकतात.

महात्मा फुलेंनी घरच्यांचा विचार न करता आपले मत मांडले. त्यांच्या घरच्यांनी त्यांना हाकलून दिले. जवळ जवळ सर्वच समाजसुधारकांना नवा विचार पेरताना संघर्षाला तोंड द्यावे लागलेले आहे. संघर्षाला घाबरून मतच मांडले नाही तर पुढचे काम झालेच नसते.

प्रबोधनाच्या क्षेत्रातील व्यक्तीने लोकप्रिय असण्याची अपेक्षा ठेवू नये. अप्रियतेची तयारी असणारेच हे काम करू शकतात. हे माझे मत आहे.

महात्मा फुलेंनी घरच्यांचा विचार न करता आपले मत मांडले. त्यांच्या घरच्यांनी त्यांना हाकलून दिले.
>> ही नवीनच माहिती आहे. माझ्या वाचनात कधीच आलेलं नाही. जाणकारांनी प्रकाश टाकावा.

जन्म होण्यापूर्वी सुक्ष्म शरीर धारण करून अनेक वर्षे साधना केली व अवताराची वेळ/आज्ञा झाल्यावरच प्रकट झालो महाराजा.

घाटपांडे सर
तुम्ही स्वतः अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संबंधित आहात असे अनेकदा सांगता. मात्र अनेक वेळी तुम्ही गोंधळात टाकता. फल ज्योतिषावर पण तुमचा विश्वास आहे कदाचित.. तो विषय नाही इथे याची कल्पना नाही.>>>>>

एखादा राजकीय पक्ष, संघटना, कल्ट, बिरादरी वगैरे यात तुम्ही जरा काही वेगळे बोललात की तुम्ही नेमके कोणाच्या बाजूचे? असा प्रश्न तुम्हाला त्या समूहातून प्रत्यक्श अप्रत्यक्षपणे विचारला जातो. अशा या आपण आणि ते या कृष्ण धवल द्वैतात विचार करणार्‍या लोकांना मधाला ग्रे एरिया दिसत नाही. किंवा असही म्हणता येईल कि त्यांना रंगीत दिसत नाही फक्त कृष्ण धवल दिसते. समूह विचार वर्तनाच्या उन्मादात त्यांचा मेंदु स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता गमावून बसतो. गल्लत गफलत गहजब या राजीव सान्यांच्या पुस्तकात अशा अनेक सामाजिक दृष्टीकोनांचा विचार केलेला आहे.तस म्हणल तर प्रत्येक श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते.अंधश्रद्धा या शब्दाला काळी किनार आहे. चिकित्सेशिवाय ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा. कधी कधी तो समजूत, धारणा,भावना अशा अर्थानेही वापरला जातो जेव्हा तुमचे प्रतिसाद गोंधळात टाकतात असे जेव्हा कुणी म्हणत तेव्हा मला फार बर वाटत. याचा अर्थ समोरच्याची विचारप्रक्रिया चालू झाली आहे असे मी समजतो.
आता ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातून सुसंवाद या पुस्तकात मी दुसर्‍या आवृत्तीच्या निमित्ताने मधे काही गोष्टी नमूद केल्या आहेत
http://mr.upakram.org/node/777#comment-12763

हा विषय इथे नाही हे विषय दुसरीकडे जाऊ नये म्हणून म्हटले होते. तुमच्या म्हणण्यावर वेगळी चर्चा करूच आपण. पण बाकीचा प्रतिसाद दुर्लक्षिण्यासारखा का वाटला ? जर त्यावर चर्चा झाली तर पहिल्या भागावर आपण चर्चा करू शकतो. संदर्भ सोडून निवडक कोट केल्यावर कसे होणार ?

तुम्ही कोट केलेला भाग हा तुमच्या लिखाणामुळे गोंधळात पडण्याचे उदाहरण देण्यासाठी आहे. इथेही स्पष्टता नाही. अनेक गोष्टी गृहीत धराव्या लागलेल्या आहेत. तुम्ही उर्वरीत प्रतिसादावर लक्ष द्याल ही अपेक्षा आहे.

ग्रे एरीया असेल तर त्या संघटनेत आपण प्रवेश घेऊ नये. जोपर्यंत सुस्पष्ट चित्र उभे राहत नाही तोपर्यंत आपण अमूक एका संघटनेशी संबंधित आहोत असे सांगू नये. संघटना म्हतली की शिस्त, नियम आणि स्पष्ट विचारसरणी आली. त्यात शंका असतील तर त्याचे निरसन होईपर्यंत सदस्यत्व घेऊ नये.

देवावर टीका करू नये हे न पटल्याने मी मित्र मागे लागूनही कधीच सदस्य झालो नाही. तुम्हालाही हा मार्ग होताच. सदस्य न होताही सुसंवाद साधता येतो.

थॆनोस आपटे अंधश्रद्धा निर्मूलन व्हावे यावर अनेकांचे एकमत असते पण मार्गांमधे भिन्नता असते. प्रत्येकाला आपलाच मार्ग योग्य वाटतो. व तो दुसर्‍याला पटवण्याचा प्रयत्न तो करत असतो. पिंडे पिंडे मतिर्भिन्न: असो!
वेळोवेळी इथे व अन्य ठिकाणी बरेच लिहिले आहे. त्यामुळे तेच तेच लिहायचा कंटाळा येतो.

संघटनात्मक शिस्तीबाबत मी बोलत आहे. तुमच्या या लेखात घाटे हे समितीचे सदस्य होते का हे ही स्पष्ट झालेले नाही. समिती (संघटनेचे ) सदस्य असतील तर मग प्रश्न उभे राहतात. जर नसतील तर त्यांचे मार्ग भिन्न असू शकतात. त्यावर चर्चा होऊ शकते.

तुमच्या कंटाळ्याला मी काहिच करू शकत नाही. इथे जे लिहीले आहे त्यावर चर्चा होत आहे. आपण जो उर्वरीत भाग दुर्लक्षित केला आहे त्यात कंटाळा येण्यासारखे असेल तर मी आपली रजा घेतो.
तसदीबद्दल क्षमस्व !

घाटे हे समितीचे सदस्य पदाधिकारी वा सक्रिय कार्यकर्ते वगैरे नाहीत. समिती अनेक हितचिंतकांना स्वतःशी जोडून घेत असते. मायबोलीवर अंधश्रद्धा या विषयावर उत्खनन करुन आपण आतापर्यंत माहिती करुन घेतली असेलच.

मायबोलीवर अंधश्रद्धा या विषयावर उत्खनन करुन आपण आतापर्यंत माहिती करुन घेतली असेलच. >>> अजून कोण कोणत्या विषयांवर आपण धागे काढणार आहात याची कल्पना दिलीत तर कामे बाजूला ठेवून उत्खनन करीन म्हणतो. लेखकाची जबाबदारी नाही हे मला पूर्णपणे पटलेले आहे. मौलिक सूचनेबद्दल आभार आपले.

ज्या उर्वरीत प्रतिसादाकडे आपण दुर्लक्ष केलेले आहे, तो तिथे नाही असे समजावे ही विनंती.

ज्या उर्वरीत प्रतिसादाकडे आपण दुर्लक्ष केलेले आहे, तो तिथे नाही असे समजावे ही विनंती.>>> दुर्लक्ष नव्हे तो वाचलेला आहे. अंशतः मान्य आहे. मान्य नसलेला भाग ही मत भिन्नता आहे. मला स्वतःला घाटे यांचे विचार पटतात. आपल्या या मायबोलीवरील आयडी चे वय १० म ३ आ असले तरि हा आपला नवा आयडी असावा.

आपण चर्चा व्हावी म्हणून प्रस्ताव ठेवलेला आहे. त्या विषयावर मतं जाणून घ्यावी म्हणून आपल्याला काय वाटते असा प्रश्न विचारला आहे. मात्र सोयीचा भाग घेऊन त्यावरच प्रतिसाद देत आहात हे काही पटण्यासारखे नाही. लोकांची मतं चुकीची असतील तर चर्चा व्हावी. माझा आयडी नवा की जुना हा तुमच्या आस्थेचा विषय असू शकेल कदाचित...

मात्र सोयीचा भाग घेऊन त्यावरच प्रतिसाद देत आहात हे काही पटण्यासारखे नाही.>> मान्य आहे. पण गैरसोयीचा भाग हा मतभिन्नता म्हणून मान्य केलेला असतो.
लोकांची मतं चुकीची असतील तर चर्चा व्हावी.>>> मी चुकीची अस म्हणत नाही. त्याला मी वेगळी मत म्हणतो. जी आपल्याला मान्य वा अमान्य असू शकतात. आत्ता मान्य असली तरी भविष्यात अमान्य होउ शकतात वा उलट हे अर्थात गृहीत आहेच.
माझा आयडी नवा की जुना हा तुमच्या आस्थेचा विषय असू शकेल कदाचित...>>> उत्सुकतेचा. जुना असेल तर पुनरावृत्ती टाळता येते.पुर्वीच्या चर्चांमधे हे विषय वा प्रतिवाद वा प्रतिसाद येउन गेलेले असतात. त्या लिंका शोधून देत बसणे वा कॊपी पेस्ट करण कधी कधी कंटाळवाण वाटत. अस मला वरती म्हणायच होत.

घाटे जर समितीचे सदस्य नसतील तर मग जुन्या झालेल्या शिळ्या कढीला ऊत येणार हे स्वाभाविक आहे. अंनिस च्या मराठी पोर्टलवरचे काही लेख याबाबतीत खूपच स्पष्ट आहेत. तसेच अन्य काही समाजधुरीणांचे देखील.

निरंजन घाटेंनी शनिपाराला तेल का घातले याचे उत्तर त्यांनी स्वतः कुठे दिले आहे? माहित असल्यास इथे लिहावे कृपया.>> आनंद म्हसकर त्यांचे लहानपण त्या भागात गेले होते. अनेक सुख दु:खाच्या स्मृती तिथल्या गोष्टींशी निगडीत होत्या. त्याच मनोव्यापाराचा भाग म्हणून ते शनिपाराला जात असत. हे त्यांच्याशी बोलण्यावरुन मला झालेले आकलन मी मांडले आहे. तेल हा महत्वाचा मुद्दा नाही. तेल व हार घेउन उभे होते का नुसते उभे होते हे गौण आहे. जनरली भाविक लोक तिथे तेल व हार घेउन उभे असतात. ते शनिपारावर दर्शनाच्या लाइनीत दिसले ना? मग फाउल. विज्ञानकथा लेखक म्हणुन आपल्या मनात काही प्रतिमा असते त्याला या दृष्याने छेद दिला हा तो मुद्दा.

Pages