फुल्लारी भाग-५ चिन्मय

Submitted by विनीता देशपांडे on 25 June, 2019 - 12:42

फुल्लारी

भाग-५

चिन्मय

अभिचा फोन आला. त्याने जे सांगितले ते ऐकण्यासाठी किती वर्षांपासून आतूर होतो. एक वेडी आस होती. बहिण-भावाचे प्रेम होते ते. असच कधी कोणी सोडून जातं का? सारख मनात यायचे. आज आकाश मोकळे झाल्यासारखे वाटत होते. आनंद शब्दात मांडता येत नाहीया सिद्धी. जिच्या सोबत बालपण घालवले, हरवलेल्या त्या बहिणीची माया आज गवसली.

"सिद्धी....आपली गंधाली सुखरुप आहे."

"अंगणात फुलं वेचणारी गंधाली आजही आठवते. शाळेला सुट्ट्या लागल्यावर आम्ही अमरावतीहून, आजीकडून बार्शीटाकळीला यायचो. दोन महिने नुसता धुमाकुळ असायचा. ती पायरीवर वाट बघत बसायची. आमच्या शिवाय कधीच जेवली नाही ती. माझी व तन्मयची कायम भांडण व्हायची, ती गंधालीच सोडवायची. आईचे कित्येक धपाटे तिच्यामुळे हुकलेत. कायम तिचा एकच धाक, गळ्यावर बेटाने क्रॉस करुन शपथ घ्यायला लावायची. आम्ही ती दरवेळेस मोडायचो."

आमच्या आयुष्यात ती अचानक आली आणि अचानक निघून गेली. तिचे अस्तित्व, तिच्या आठवणी मी आजवर गोंजारत जगतोय. तिला कळत होते का माहित नाही आम्ही तिला चपटी म्हणून हाक मारायचो. कित्ती टिंगल केली तरी कधीच चिडली नाही बघ. तन्मय तर खूप छळायचा तिला.
आजही आठवत आहे, संक्रातीला आम्ही सर्व गच्चीत पतंग उडवत होतो. शेजारच्या सुनंदाकाकूच्या अंगणातील झाडात पतंग अडकला. मी एक नंबरचा खोडकर, जिन्याने जायच्या ऐवजी पॅरापिट वरुन सज्ज्यावर उडी मारली. सज्ज्यावरुन खिडकीचा तावदान पकडत उडी मारणार तेवढ्यात पाय घसरला आणि खाली कुंडीवर आदळलो. जबरदस्त मार लागला होता. हात पाय फ्रॅक्चर आणि समोरचे तीन दात पडले होते. त्या वेळेस गंधालीने खूप साथ दिली. माझे ड्रेसिंग तर वार्षिक परिक्षा सुरु होईपर्यंत तीच करत होती.
चित्र काढून रंगवायचा भारी नाद तिला. बागकाम आटपून तास न तास चित्र काढत बसायची. आमचा बगीचा ज्याचे नंतर नर्सरीत रुपांतर झाले, आजुबाजुला चांगलाच प्रसिद्ध होता. हातात जादू होती तिच्या.
ती कोण, कुठली कशी आमच्या अंगणात आली आणि कायमची आमचीच होऊन गेली.

खरं सांगू सिद्धी, प्रणाली प्रकरणात तिला कळले की ती आमची सख्खी बहिण नाही ते. नाहीतर आम्ही तिला कधीच कळू दिले नसते. ते कळल्यामुळे ती आम्हाला सोडून गेली का? हा विचार सतत यायचा माझ्या मनात.

आईची तर फार लाडकी. दोघींना जोडणारा दुवा म्हणजे बाग. आमची परिस्थिती सर्वसाधारण होती. ती हुशार होती. तिच्या शिक्षणासाठी आईबाबांनी खूप धडपड केली.
तिला शिकवण्यासाठी आई बाबांनी आधी स्वत: सांकेतिक भाषेचा अभ्यास केला.
सिद्धी, जशी तू सगळ्या बाबतीत टापटीप असते न तशीच ती पण प्रत्येक गोष्टीत टापटीप असायची. आई-बाबा आम्हाला सतत तिचे उदाहरण द्यायचे.

तन्मय, अवि, ती आणि मी लहानपणी खूप धमाल केली. अंगणात लपंडाव खेळायचो आम्ही. कुठे कुठे लपून बसायची ती. एकदा तर झाडांसाठी खणलेल्या एका खोल खड्यात लपून बसली होती. लपंडाव परत अशा प्रकारे खेळावा लागेल असे कधीच वाटले नव्हते.

लगोरी, क्रीकेट, विटी-दांडू, डबा ऐसपैस, काय काय खेळ खेळायचो आम्ही. तिला धप्पा देता येत नसे म्हणून तिला तन्मयने एक शिट्टी घेऊन दिली होती. तीच शिट्टी दोनदा रात्रीच्या जेवणासाठी, तीनदा अभ्यासाठी, चार वेळा वाजली की अंगणात गोळा व्हायचो. तिला ऐकू येत नसले तरी आम्ही तिच्याकडून याचा सराव करुन घेतला होता. आमचा संवाद म्हणजे खाणा खूणा. नंतर एक दोनदा तिच्या लक्षात आले की भांडे पडल्यावर आम्ही दचकून सगळे येऊन बघतो. मग काय राग आला की दे दणादण भांडी आपटायची ती.
जशी जशी ती मोठी होत होती खोडकर गंधाली कमालीची शांत होत गेली. कदाचित तिच्या संवादातील अडचणीमुळे असेल. अर्थात हा आमचा तर्क होता.
गणपतीची आरास असो की महालक्षमीची, शेजारी कोणाकडे मंगळागौर असो वा डोहाळ जेवण, सजावट गंधाली करत असे. तिच्या हातात कला होती. दिवाळीत तिने काढलेली रांगोळी बघायला आजुबाजूच्या आळीतून लोकं यायची.

ती निघून गेल्यावर आई बाबा खूप खचले. त्यात बाबांना हार्ट अटॅक आला, त्यात ते गेले आणि आई एकटी पडली. आधी यायची इथे अधून मधून. मागील दोन वर्षात तिचा एकच ध्यास "ती येईल परत, आपलं प्रेम तिला परत आणेल." तिचा हाच विश्वास खरा ठरला बघ.

"काय झाले, ती ऋतुकडे कशी पोहचली. सगळा वृत्तांत तिथे पोहचल्यावर कळेल ग. तन्मयला फोनकरुन सांगतो. नागपूर एयर्पोर्टवरुन दोघे टॅक्सीने बार्शीटाकळीला जाऊ. सिद्धी, तुला सर्व माहिती फोनवर अपडेट करतो."

"काळजी घे. मी तुला म्हणत होते न, सापडेल ती, होईल सगळं व्यवस्थित." सिद्धी

खरच, आधी सारखे पूर्ववत होईल?
सध्या या प्रश्नाचे उत्तर नसले तरी पूर्वीची सगळी माणसं भेटणार होती हे नक्की.

क्रमशः

विनीता श्रीकांत देशपांडे

फुल्लारी भाग १
https://www.maayboli.com/node/70330

फुल्लारी भाग २
https://www.maayboli.com/node/70335

फुल्लारी भाग ३
https://www.maayboli.com/node/70355

फुल्लारी भाग ४
https://www.maayboli.com/node/70393

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users