फुल्लारी (ऋतुजा- भाग १)

Submitted by विनीता देशपांडे on 18 June, 2019 - 10:07

मनोगत

विशेष मुलं आणि मुकबधीर मुलांसोबत काम करतांना जाणवलं त्यांना समजून घेणं खुप अवघड आहे. त्यांना उमजतांना आणि त्यांच्या भावविश्वात डोकावतांना समजलं, त्यांचं एक वेगळं आकाश आहे, त्यांचे रंग वेगळे आहेत, आकार वेगळे, संकल्पना वेगळ्या, अपेक्षा वेगळ्या, अनुमान वेगळे आहेत. भाषा वेगळी आणि कधी कधी त्यांच्यापुढे शब्द ही निशब्द होतात.
त्यांना समजून घेतांना सर्वमान्य सर्वसामान्यांची फुटपट्टी निकामी ठरते. त्यांचा संघर्ष असतो तो स्वत:शी आणि त्यांच्याकडे सहानुभूतीने बघणार्यांआशी. मग ते परिवारातिल सदस्य असोत वा अवतीभवती वावरणारे किंवा त्यांना रोजच्या जगण्यात मदत करणारे. त्यांना कीव नको असते. जीवन जगण्यासाठी ढकलणारे हात नको असतात. त्यांना हवी असते साथ जे त्यांची तगमग समजू शकतील. हवा असतो एक विश्वास जो त्यांच्या आयुष्यात पुढे जाण्याची धडपड समजु शकेल. गरज असते एका प्रेरणेची जी त्यांचे कौशल्य ओळखून निश्चित दिशा देऊ शकेल.
"फुल्लारी" अशाच एका अबोल नायिकेचा प्रवास आहे.
या अबोल नायिकेचा प्रवास तिचे कुटुंब, तिच्या मित्र मैत्रीणींचे स्वगत आणि संवादातून उमगतो. या स्वगत आणि संवादाची प्रयुक्ती अर्थात परिणीती सर्वांना आवडेल अशी आशा करते.

(फुल्लारी-ईबुक प्रकाशित)
_______________________________________________________________________________________________________________________________

फुल्लारी
भाग-१

ऋतुजा

गंधाली, तिचा चेहरा डोळ्यासमोरुन जात नव्हता. कोण आहे ही? कुठून आली? आपल्या घरात इतकी मुले असतांना अबोल गंधालीबद्दल जाणून घेण्याची तळमळ मला कळत नव्हती.
"ऋतु ए ऋतु, अभिराम आला का ग?" माईच्या या प्रश्नाने मी विचारातून जागी झाले.
"येईल ग एवढ्यात." घड्याळाकडे बघत मी उत्तर दिले. डोक्यात मात्र गंधालीचा विचार सुरु होता.
तेवढ्यात दारापुढे रिक्षा थांबल्याचा आवाज आला आणि आम्ही दोघी घाईघाईने माजघरातून अंगणाकडे निघालो.
अभिला बघून झालेला आनंद माईच्या चेहर्‍यावर दिसत होता. फाटकापाशीच नमस्काराचे सोपस्कार झाले. माई खूप प्रेमळ असली तरी वास्तुच्या या कानाकोपर्‍यात तिची शिस्त आणि दरारा होता. आज अभिरामने दरार्‍याच्या या भिंतीला सुरुंग लावला होता. अभिला बघताच सगळे मुले "अभिदादा ... अभिदादा ..." करत त्याच्याकडे झेपावले. त्याच्या येण्याने "आपलं घर" चैतन्याने भारावून गेले होते. मुले अभिला भेटण्यासाठी अंगणात जमली आणि एकच किलबिलाट सुरु झाला. सर्वांना अभिशी बोलायचे होते. तो खूप वर्षांनी या "आपल्या घरात" आला होता. निदान तास दोन तास तरी बच्चेकंपनीतून त्याची सुटका होणार नव्हती. तेवढ्यात गंधाली पाण्याचा तांब्या घेऊन आली. अभिला बघताच थबकली, थोडी दचकली.

किती प्रश्न गंधालीच्या डोळ्यातून ओसंडत होते, तिच्या चेहर्‍यावरचा वैताग, त्या वैतागात भांबावलेली गंधाली बघून मी दचकलेच. एखाद्या कोकरुने केविलवाणे आपल्या आईकडे पहावे तेच भाव अभिरामला बघून तिच्या डोळ्यात उमटले होते. त्याला बघताच तिच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. तिच्यातील सहनसिद्धीने अश्रूंना रोखून धरले होते. तिच्या चेहर्‍यावरील प्रश्न आणि खंत भेदून टाकणारे होते. तिचे अभिकडे रोखून बघणे कासावीस करणारे होते. त्याच्या डोळ्यात गंधालीबद्दल ओळखिचे चिन्ह बघून मघाशी थोपवलेले प्रश्न माझ्या डोक्यात परत पिंगा घालायला लागले.

तिच्या व माझ्या प्रश्नांची उत्तरे अभिरामकडे होती का? निदान अभिरामकडे बघून तरी तसे वाटत होते. नेमके कोणते प्रश्न? कोणती उत्तरे? इथे "आपल्या घरात" आल्यापासून गंधाली एक कोडं होती, कधी न उमगणारी, कधी न उलगडणारी. तिचे अभिकडे असे एकटक रोखून बघणे अभिला असह्य झाले होते. पुढच्या क्षणाला ती माझ्याजवळ पाण्याचा तांब्या देत अभिकडे रागाने कटाक्ष टाकत पाय आपटत खोलीकडे निघून गेली.

मी अभिकडे बघितले, क्षणभर वाटले गंधाली नावाचे हे वादळ फार पूर्वी त्याच्या आयुष्यात आले असावे, माझ्या आयुष्यात तर हे गेल्या तीन वर्षांपासून धुमसतयं. आज या वादळाने मला एका अनामिक वळणावर आणून सोडले होते. मी आभिरामकडे आणि तो माझ्याकडे विमनस्क बघत राहिलो.
सगळ्या मुलांचा समाचार घेत माई, अभि व मी ऑफिसकडे निघालो. तिथे माईंना भेटायला आलेल्या लोकांची गर्दी बघून आम्ही दोघे माजघराकडे निघालो. अभि गंधालीला चांगलाच ओळखत असावा हे माझ्या लक्षात आले होते. सगळं अचानक घडले होते त्यामुळे अभि गांगरुन गेला होता.

तिन्ही सांजेची वेळ होत होती.
दोघेही निशब्द होतो. एक विलक्षण शांतता भवताल पसरली होती.
"चला फुल्लारी फूलों को, सौदा-सौदा फूल बिरोला..." नेगी चाचा रोजसारखे आजही झाडांना पाणी देतांना हे गाणं गुणगुणले आणि ती विलक्षण शांतता भंगली.

"फुल्लारी .... ए फुल्लारी .... " नेगी चाचा गंधालीला फुल्लारी म्हणायचे.

ते तिला कळत होते का नाही, ठाऊक नाही. दोघेही गंधवेडे, झाडं- पानं- फुलं यात खूप रमायचे.
“फुल्लारी ओ फुल्लारी....” चाचांनी परत आवाज दिला. रमा फुलं घ्यायला पळत अंगणात आली.
"क्या चाचा, जिसे आवाज देतो हो उसे तो पता नही है, फिर भी रोज फुल्लारी फुल्लारी चिल्लाते हो. लाओ फुल, मुझे दो. माई पुजा करने आयेगी अभी." रमा

मघाचा अंगणातला कल्लोळ आणि घरी परतणार्‍या पक्ष्यांचा किलबिलाट क्षीण होत होता. केशरी प्रकाशात अनार्त शांतता हळुहळु वास्तुचा ताबा घेत होती. मात्र माझ्या डोक्यातला विचारांचा पिंगा काही केल्या शांत होत नव्हता.
"कोण आहे ही गंधाली? अभि, तू ओळखतोस?" ओसरीवर तुळशी वृंदावनापाशी बसत मी विचारलेच.
"हो, ऋतुजा, तू पण ओळखतेस तिला." अभिराम
"मी? ओळखते? कसे शक्य आहे अभि, गेल्या तीन वर्षांपासून तिच्याबद्दल माहिती शोधण्याचा प्रयत्न करते आहे."
"तुमच्या इथे कशी आली? केव्हा आली?" अभिराम
"तुझ्या काही प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे आहेत, माझ्या काही प्रश्नांची उत्तरे तुझ्याकडे." अभि मावळत्या सूर्याकडे बघत म्हणाला.
"काहीच प्रश्नांची? म्हणजे?"
"तू ओळखतोस न गंधालीला?" मी चिडून विचारले.

त्या क्षणी गंधाली हे कोडं अभिच सोडवू शकतो असे मला वाटायला लागले होते. आज अभिचे "आपल्या घरात" येणे, गंधालीची व त्याची अचानक भेट होणे, तिच्या डोळ्यात झळकलेल्या ओळखीच्या खुणा, तिला भेटल्यापासून अभिची झालेली विचित्र अवस्था. मला काहीच उमगत नव्हते.

मुलांचा शुभंकरोतीचा घोष माजघरात घुमू लगला.

"तुला चिन्मय आठवतो का ऋतु?" अभिराम
"हो, आठवतो न, चिन्मय जगताप आणि हो त्याचा भाऊ तन्मय तो सुद्धा आठवतो."
"त्यांना एक बहीण होती. आठवत का?” अभिराम
"हो, पुसटशी आठवते न. अविला चिडवायचे तिच्या नावावरुन. कधी भेटले नव्हते तिला. ते अमरावतीपासून दूर रहायचे.

"हो, बार्शीटाकळीला रहायचे " अभि
“हो... तिथेच. तू चिन्मय, तन्मय, अवि आपण गप्पा करत असतांना तिचा विषय हमखास निघायचा.”
“मी पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला आले आणि नंतर काय झाले काही माहित नाही रे मला. गंधाली तिचे नाव बरोबर न रे अभि."
"हो, ....तुमची गंधाली म्हणजे चिन्मय व तन्मयची बहीण गंधाली जगताप" अभिराम म्हणाला.

आता मात्र मला काय बोलावे, काय करावे काहीच सुचत नव्हते. गेल्या तीन वर्षांपासून मी गंधालीबद्दल तपास करत होते. काही केल्या थांग लागत नव्हता. गंधाली, जेमतेम २२-२३ वर्षाची, सावळीशी निळसर टप्पोरे डोळे, थोडंस चपटं पण अपरं नाक, कुरळे केस, नेटका बांधा, सतत गंभीर आणि स्वत:ला कायम कामात गुंतवून ठेवणारी, अनावर विचारांना टाळण्याचा तिचा तो प्रयत्न माझ्या नजरेतून सुटला नव्हता.

"अभि, याचाच अर्थ ही अबोल गंधाली मला ओळखत होती तर, मी तिच्या अस्तित्वाचा शोध घेत आहे हे माहिती असून तिने मला का कळू दिले नाही? का?"
तिला बघितल्यावर नेहमी वाटायचे, मनामध्ये झंझावात घेऊन फिरणारे हे एक अबोल वादळ आहे, हा झंझावात नेमका काय हे आता शोधायचे होते. माझा पत्ता आणि "आपलं घर" या संस्थेबद्दल तिला कोणी सांगितले असणार? ती माझ्यापर्यन्त कशी पोहचली? हिच्या आयुष्यात नक्की काय घडले असेल? ती मला ओळखत होती हे कळल्यावर एक क्षण खूप राग आला, क्षणातच विरुन गेला. हे कोडं आता सोडवायलाच हवे, या निर्धाराने मी उठली. स्तब्ध आणि विचारात हरवलेल्या अभिरामला हाक मारली तर दचकत अभिरामने माझ्याकडे बघितले.

"गंधाली हे कोडं सोडवायलाच हवे."
"हम्म ....” अभिराम
"चिन्मय, तन्मय, अवि कुठे असतात? त्यांचे पत्ते किंवा फोन नंबर काही आहे का?" अभिराम
"नाही रे, मी पुण्याला असतांना नियमित भेटायचो आम्ही. त्या आठवणी, ती मस्ती, त्या गप्पा आजही आठवतात. प्रत्येक भेटीत पुढची भेट ठरवायचो. नंतर हळुहळु सगळे आपापल्या आयुष्यात गुंतत गेले, मग्न झाले. भेटीची ओढ कमी होत गेली, मैत्रीतील ओलावा कोरडा होत गेला. भेटणे कमी झाले, नंतर मात्र सगळ्यांशीच संपर्क तुटत गेला. सर्वांचे व्याप वाढलेत, प्रत्येकाच्या आयुष्यात इतर लोकं आलेत आणि अमरावतीच्या ज्ञानमाता हायस्कूलच्या पटांगणात विणलेले ते मैत्रीचे गोफ इथे आल्यावर सैल झाले.
मी पुण्यात असेपर्यंत गंधाली तिथे आली नव्हती. मग दादाचा अपघात झाला. तो अचानक गेल्यामुळे मला इथे सणसवाडीला माईसाठी यावे लागले. बारामती-सणसवाडी या फेर्‍या, या फेर्‍याकरत मी शिक्षण पूर्ण केले.
एकदा पुण्यात गेले होते तेव्हा अवि भेटला होता. नेहमीप्रमाणे घाईत होता. त्यामुळे औपचारिक बोलणे झाले. इतर विषयांवर फार काही बोलता आले नाही."

"ऋतु, तेव्हा वाटले नव्हते असे काही घडेल आणि जीवाभावाची मैत्री एका वळणावर अशी शोधावी लागेल. ते वेडे स्वप्न, त्या वेड्या आशा, सर्व कुठे, कसे अन केव्हा हरवले कळलेच नाही. अनाहूत आमच्या सर्वांमध्ये परकेपणाची दरी तयार झाली. एकमेकांची रोजनिशी ठेवणारे आपण आज कोण, कुठे, काय करतात काहीच माहित नाही." अभिराम

"अभि, ऋतु या, प्रसाद घ्या रे पोरांनो." माईंनी तुळशीपुढे उदबत्ती ओवाळत म्हंटले.

"अभिराम, कसा आहेस बाळा? तू भारतात येणार कळले होते, वेळात वेळ काढून इकडे आलास ते बरे झाले. सांगलीच्या एका संस्थेचे लोकं आले होते, म्हंटलं त्यांचे काम उरकून मगच तुझ्याशी बोलावे." माई

"मी मजेत माई, तुझी तब्येत बरी दिसत नाही. दम्याचा त्रास काही कमी झाला का? " अभिराम
"तो काय, मी जाईन तेव्हाच जाणार. ते असो. तुझे संशोधन कुठपर्यंत पोहचले? डॉक्टरेट केव्हा मिळणार?" माई

"माई, त्याला अवकाश आहे. कमीतकमी तीन वर्ष चालेल माझे संशोधन. त्याचेच काम होते म्हणून भारतात आलो." अभिराम

"मुक्काम आहे ना रे, की लगेचच जाणार?" माईने विचारले
"आहे दिड दोन महिने. इथले काम आटोपले की जाईन." अभिराम

माई अभिरामशी बोलण्यात मग्न होत्या. अनेकांचे हालहवाल, खुशाली, कोण कुठे असतो, कोणाचे लग्न झाले, कोणाचे ठरले...

"माई, तुमच्या गप्पा झाल्या असतील तर कामाचे बोलू का आम्ही? मी जरा चिडून विचारले. गंधालीबद्दल बोलायला मी अधीर झाले होते.

"हो ग हो... स्वयंपाकघर बोलवतय मला" माई पायरीचा आधार घेत उठत म्हणाल्या.

माई निघताच माझ्या चेहर्‍यावरचे अधीर भाव टिपत अभिने थेट गंधालीचा विषय काढला.

"गंधालीबद्दल मला बरेच काही माहिती आहे. मध्यंतरी मी पी.जी साठी आय.आय.पी.आर. बंगलोरला जायच्या आधी रांजणवाडीला गेलो होतो. तेव्हा राधाक्काची धावती भेट झाली होती. तेव्हा अवि भेटला. भेटला काय दिसला. गंधालीबद्दल मी विचारणार होतो. तेव्हा कळले गंधाली त्याच्यासोबत नाही ते. तो पर्यंत मी ती त्याच्यासोबत असेल या भ्रमात होतो. तो मला न भेटताच निघून गेला. मी तेव्हापासून हिचा शोध घेतो आहे. आधी सांग इथे ती नेमकी कधी, कशी, केव्हा आली. हे कळले तर मला काही तरी लिंक लागेल ऋतु." अभि

साधारण साडे तीन वर्षे झाले असतील. ती पुण्याहून आली. एफ.टी.आय.आय.चे अधिकारी आले होते तिला सोडायला. त्यांचे डिटेल्स मिळतील आपल्याला रेकॉर्डसमध्ये. तेव्हा नेमकी इथे मी नव्हते रे. दिक्षित काकू होत्या, त्यांनी रेकॉर्डवर जी माहिती भरली तिच माहिती आहे आम्हाला. आजवर तिला भेटायला कोणी आले नाही. ना ही कुठे जाते, त्यात ती बोलू शकत नाही. तेव्हापासून मी हे अबोल कोडं सोडवायचा प्रयत्न करत आहे. मी एका दमात त्याला माहिती पुरवली.

चिन्मय-तन्मयची ती बहिण आहे ऐकल्यावर मला हायसे वाटत होते. राधाक्काला फोनकरुन सांगायला हवे, त्यांची गंधाली सुखरुप आहे. हा विचार येताच आश्चर्य वाटले, नक्की काय झाले असेल? एक आदर्श कुटुंब म्हणून रांजणवाडीत प्रसिद्ध असलेल्या या जगतापांची लाडकी लेक एका संस्थेत रहाते आहे आणि कोणाला माहिती नाही?

अभिरामची तगमग मला कळत होती.
"मला वाटले अवि नक्की लग्न करेल तिच्याशी." मी विचारले
"अवि? नाही ग ऋतु. आम्ही चेष्टा करायचो त्याची. तो फारसा सिरियस नाही वाटला तिच्याबद्दल, कधीच नाही आणि तो सिरियस नाही बघून नंतर आम्ही चिडवायचे बंद केले." अभिराम

"आणि तू .....तुझ्या आयुष्यात केव्हा आली ती. " हा प्रश्न विचारताच अभि ने विषयांतर केल्याचे जाणवले, हे कोडं सोडवायाचा धागा सापडला या नादात मी अभिला परत प्रश्न विचारला नाही.

"मंगल, गंधाली कुठे आहे?" मी ओसरीवरून उठत आवाज दिला. दोघांच्या मनात एकच विचार ती इथे कशी आली?
"स्वयंपाकघरात असेल नाहीतर गच्चीवर कपड्यांच्या घड्या घालत असेल" मंगल

स्वयंपाकघरात नाही बघून आम्ही दोघे गच्चीवर गेलो तर गंधाली एका कोपर्‍यात रडत बसली होती. अभिरामला बघताच ती धावत येऊन त्याच्या कुशीत शिरली. अनेक वर्षांपासून दाटलेल्या अश्रूंना आज तिने मोकळे केले होते.
तिचे उमाळे थांबत नव्हते. अभिने तिला थोपटत बाजूला केले. हे मात्र मला अनपेक्षित होते. माझे एक कोडं सुटले असले तरी दुसरे पुढे तयार होते. अभिराम, माझा मावसभाऊ, आमच्यात बहिणभावाच्या नात्यापेक्षा मैत्री अधिक होती. गंधाली, त्याच्या आयुष्यात केव्हा आली, त्यांच्यातील नात्याची वीण, हे बंध, हे सारे काही त्या क्षणी माझ्या जाणीवकक्षेच्या पलीकडचे होते.

तेवढ्यात माईंनी निरोप पाठवला. आम्ही तिघेही माईच्या खोलीत आलो. गंधालीचे उमाळे कमी होत नव्हते. माईंना बघून तिला आणखिनच रडू येत होते.
ती शांत होईपर्यंत थोडा वेळ लागला.
"ये गंधाली........" मायेनी तिला जवळ घेत माईंनी त्या विलक्षण शांततेची तीव्रता कमी केली खरी आता ते अबोल पोर व्यक्त कसे होणार? याचाच विचार आम्ही तिघेही करत होतो.

>>>>>>>><<<<<<<<

"दिक्षित काकू, गेल्या तीन ते चार वर्षांपूर्वीचे रेकॉर्ड्स दाखवता का? ऑफिसमध्ये टेबलावरचा पसारा आवरत मी म्हणाले.
रेकॉर्ड्सवरुन गंधालीची माहिती काढणे तसे सोप्पे होते. तिच्या आयुष्यात असे काय घडले असावे, तिला आमच्या आश्रमात येऊन रहावे लागले, या विचारांनी डोक्याला मुंग्या आल्या होत्या, त्यात अभिराम व गंधाली या दोघांमध्ये नक्की काय नातं? हे दोघे इतक्या जवळ केव्हा आली ? काहीच कळत नव्हते, नेमकी कोणत्या टोकाने हा गुंता सोडवावा हे मला कळत नव्हते.

"घे गंधालीची फाईल." त्या भयाण शांततेचा भंग दिक्षीत काकूंनी केला.
फाईलमध्ये तिचे मेडिकल रिपोर्ट, इतर तत्सम माहिती होती. कौटुंबिक माहितीचा रकाणा रिकामा होता.

ज्यांनी तिला या आश्रमात सोडले त्यांची माहिती होती. डॉ.प्रथमेश दांडेकर आणि अनिरुद्ध हसबनिस या एफ.टी.आय.आयच्या दोन वरिष्ठ अधिकार्‍यांची नावे होती. त्यांच्याशी संपर्क साधून गंधालीबद्दल काही माहिती मिळते का बघायला हवे. माझ्या मनात विचार आला.

"अवि एफ.टी.आय.आयमध्येच कामाला होता. काहीतरी माहिती निश्चित मिळेल" अभि
"उद्दा सकाळी फोन करुन बघते."
आधी मला गंधाली-अभि-अवि या त्रिकूटाचे कोडे सोडवायचे होते. नंतर ज्यांना संपर्क साधता येईल त्यांच्याकडून माहिती घेऊन हे कोडं सोडवायचा प्रयत्न करायचा होता.

या तिघांमधे नक्की काहितरी घडले असावे आणि त्या कारणामुळेच गंधाली घर सोडून या संस्थेत आली असावी. माझे स्वत:शीच तर्क साधणे सुरु होते. आधी अभिला गाठायला हवे. त्याने बरेच काही सांगितले असले तरी सगळेच सांगितले नव्हते. नेमके तेच मला जाणून घ्यायचे होते.

अवि, कुठे असेल? सचिन, स्वप्ना कुठे असतील? माझ्या मनात प्रश्नाचे काहूर दाटले होते.

आता गंधालीला माझ्याबद्दल, या संस्थेबद्दल कोणी माहिती दिली असेल हा प्रश्न अजून अनुत्तरीत होता. याचे उत्तर माझ्या दृष्टीने खूप महत्वाचे होते.

गंधालीला विचारुन बघू का? मनात विचार आला खरा. सांगायचे असते तर तिने आधीच सांगितले असते.

अभि, जरा डिटेलमध्ये सांगशील का?
काय? अभि
तू, गंधाली आणि अवि, तिघांबद्दल. सगळं ऐकायच आहे मला.
आत्तापर्यन्त मला तुमच्या तिघांमध्ये खूप छान आणि जिवापाड मैत्री होती एवढेच काय ते कळले आहे.
मी तुमच्या मैत्रीचा हा गोफ कुठे आणि कसा निखळला हे जाणण्याचा प्रयत्न करते आहे. कदाचित याच्यातच काही प्रश्नांची उत्तरे दडली असतील.

"गंधालीला तुझ्या संस्थेबद्दल माझ्याकडूनच कळले असणार. तात्या गेले तेव्हा ती आणि अवि मला स्टेशनवर सोडायला आले होते. तेव्हा मी अविला तुम्हाला हे कळवायला सांगिताले होते. तेंव्हाच बारामतीच्या घरचा आणि सणसवाडीच्या या संस्थेचा पत्ता आणि फोन नंबर दिला होता." अभि
"तसेही तुझ्याबद्दल, माईबद्दल आणि या संस्थेबद्दल अवि, सचिन, स्वप्ना, परेश, चिन्मय, तन्मय सर्वांनाच ठाऊक होते." अभि

थांब तुला सांगतोच सर्व.
“अवि, गंधाली, रांजणवाडीत शेजारीशेजारी रहात होते. बार्शीटाकळी ते अमरावती रोज प्रवास शक्य नसल्याने शिक्षणासाठी चिन्मय आणि तन्मय अमरावतीला आपल्या आजोळी रहायला आले. आपल्या घराच्या मागे एक मारोती मंदीर आहे न, तिथेच पलीकडे त्यांचे आजोळ होते. नंतर पुढच्या शिक्षणासाठी ते पुण्यात आले. पाठोपाठ अवि कोरिओग्राफी शिकण्यासाठी पुण्यात आला. जगताप काका आणि राधाक्काने बघितले पुण्यात गंधालीसारख्या हुशार मुलीला शिकण्याची आणि जीवनाच्या पुढच्या प्रवासात तिला गरजेचे ते मिळवणे शक्य आहे. नक्की आठवत नाही, गंधालीला पुण्यात शिक्षण घेता यावे म्हणून कोणीतरी मदत केली. त्यांनी एका नातेवाईंकाचे घर भाड्याने घेऊन तिघांच्या रहाण्याची व्यवस्था केली. अविला एफ. टी.आय.आय मध्ये प्रवेश मिळाला. तो होस्टेलमध्ये रहात होता. मी एस.पी कॉलेजला ऍडमिशन घेतली होती. चिन्मय व तन्मय सी.ओ.इत होते. रोज आम्ही गुडलक हॉटेलजवळ एका झाडाखाली भेटायचो. तो आमचा मैत्री कट्टा. चिन्मय - तन्मय या दोघांनी पुढच्या शिक्षणासाठी पुणे सोडले आणि गंधाली घर सोडून होस्टेलवर रहायला आली. होस्टेलवर गेल्यानंतर कळत नकळत अविचा आणि तिचा संपर्क वाढत गेला.

अविमुळे गंधालीला एफ. टी.आय.आय. मधे अनेक जण ओळखत होते. तुला माहित आहे आपला अवि एक नंबर अवलिया, शुटिंगनिमित्त सतत बाहेर असायचा...... अभि बोलत होता, मी ऐकत होते.....किती वेळ लोटला ठाऊक नाही.

नेहमीप्रमाणे नेगी चाचा फुल्लारीचे गाणं गुणगुणत होते. त्यांच्या गढवालमध्ये चेतमासात अर्थात एप्रिलच्या सुमारास सगळीकडे अनेकप्रकारची फुले उमलतात. ते गावातल्या पोरी वेचून आणतात, त्या पोरींचा देवीम्हणून सन्मान केला जातो. गंधाली आल्यापासून आमची बाग कायम बहरलेली. म्हणूनच ते तिला फुल्लारी म्हणत असे.

क्रमशः..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यांना समजून घेतांना सर्वमान्य सर्वसामान्यांची फुटपट्टी निकामी ठरते. त्यांचा संघर्ष असतो तो स्वत:शी आणि त्यांच्याकडे सहानुभूतीने बघणार्यांआशी.
- एक ना अनेक कितीतरी वाक्ये सुरेख लिहीली आहेत.
भाव-भावनांचा गुंता जाणवतो.
- विषय सुद्धा वेगळा आहे.
विनितादी पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

हे वाचलय आधी कुठेतरी. ( कदाचित ई साहित्य प्रतिष्ठानमध्ये... ) करेक्ट मी इफ आय अ‍ॅम राँग.

तेव्हाही आवडलेलं आणि आत्ताही. Happy

काय झेपलं नाय. उगाच शब्दबम्बाळ फाफटपसारा आहे. पुढचे भाग वाचेन असे वाटत नाही...