फुल्लारी ( अभिराम- भाग २)

Submitted by विनीता देशपांडे on 19 June, 2019 - 04:56

फुल्लारी

२.

अभिराम

गंधाली इमोशनली माझ्यावर किती अवलंबून होती हे मला माहित होते. मी तिच्याकडे फक्त एक केस म्हणून बघत होतो. तिच्या आजच्या या परिस्थितीला, दु:खाला, किती ठाऊक नसले तरी मीच जवाबदार होतो.
आता पुढे काय? काय झाले असेल? अवि कुठे असेल? त्याला गंधालीबद्दल माहिती असेल? राधाक्का कशी असेल? प्रश्न आणि प्रश्न, प्रश्नांच्या गुंत्यात मी पुरता अडकलो होतो.

"ऋतु, प्रश्नांचा हा गुंता सोडवायलाच हवा."

"हो अभि, आताशा काही धागेदोरे सापडलेत." ऋतु

गंधालीतील माझी इनव्हॉलवमेंट ऋतुजा शोधायचा प्रयत्न करत होती. तिला आता सर्व सांगायलाच हवे.

“ऋतु, मैत्री कट्ट्यावर आमची मैत्री रुजत होती. मी एस.पी. कॉलेजला असतानाची गोष्ट आहे. अविसोबत ती अंकुर विद्यामंदिरात जात होती. नंतर त्यांच्यासोबत मी जाऊ लागलो. अवि तिच्यात गुंतला असला तरी किती हे कळत नव्हते, त्याने तिला कधी प्रपोज केले नाही आणि गंधालीच्या वागण्यातही त्याच्याबद्दल ओढ असेल असे वाटत नव्हते. आमच्या तिघांची मैत्री एस.पी कॉलेज ते एफ.सी. रोड या रोजच्या प्रवासात फुलत गेली.... बहरत गेली. अवि नसला तर मी व ती दोघे अंकुर विद्यामंदिरात जायचो. ती तिथे शिकायची नंतर हळुहळु शिकवायला लागली. साइन लॅंग्वेज मी तिच्या सहवासात शिकलो.

हा रोजचा अबोल प्रवास, त्यात मी गंधालीला जाणून घ्यायचा प्रयत्न करत होतो. तिचे बोलके डोळे, मी काय शोधायचो कळत नसले तरी ते माझ्याशी बोलतात असा भास होत असे. अवि एफ.टी.आय.आयच्या हॉस्टेलवर रहायचा. गंधाली तिथेच जवळच्या वझेंच्या लेडीज हॉस्टेलमध्ये रहात होती. मी डेक्कनला मित्रासोबत एका खोलीत रहायचो.

कॉलेजमध्ये सायकॉलॉजीवर खूप वाचायचो....खूप चर्चा करायचो...आणि एक दिवस जॉन वाटसन आणि जेम्स ॲग्नेला यांचे बिहेवियरिझमबद्दल वाचले आणि मग डोक्यात तोच विचार, ती उत्सुकता....ती चर्चा....ते प्रयोग,....मग मुकबधीर मुलांच्या बिहेवियरिझमबद्दल विचार करता करता गंधालीकडे मी त्याच दृष्टीने बघू लागलो. "गंधाली व तिचे बिहेवियर..." खूप दिवस डोक्यात होते ते माझ्या....नकळत तिच्याशी संवाद वाढला, ती मला रिस्पॉन्स देत होती आणि मी अनुमान काढत होतो. गंधाली.....हुशार होती, साइन लॅंग्वेज खूप लवकर शिकली. नंतर ती तिच्या सारख्या मुलांना शिकवत होती. सर्व व्यवस्थित सुरु होते. आमच्या त्या भेटी, तिच्या डोळ्यातून ती काय सांगते हे मी नकळत शोधू लागलो. सांकेतिक भाषेत गप्पा होत होत्या. हळुहळु त्या वाढत गेल्या आणि आवडत गेल्या. ती अविला टाळत होती....मला कळत होते. अवि शूटिंगमध्ये बिझी होत गेला. अवि नसला तरी आम्ही भेटत होतो. त्या निशब्द गप्पा..... आजही आठवतात.

एडवर्ड टोलमन वाचल्यावर एकदा माझ्या मनात आले की मी गंधालीवर "ट्रायल ॲन्ड एरर" चा प्रयोग करतोय का? त्याक्षणी माझी मला लाज वाटली होती. खरच सायकोलॉजीचा अभ्यास करता करता मी तिला एक्सप्रिमेंटल म्हणून गृहीत धरले होते का? असे विचार माझ्या मनात येत होते. खरतर आम्हा दोघांना एकमेकांची कंपनी आवडत होती. तिला भेटण्यासाठी मी आधी निमित्त शोधत होतो, नंतर हळुहळु माझा भिडस्त स्वभाव बिनधास्त झाला, नंतर तिला भेटण्यासाठी कारणांची गरज भासत नव्हती. रोज भेटीची ओढ वाढत होती. प्रत्येक भेटीत ती मला नव्याने उमगत होती. तिच्या सांकेतिक भाषेच्या पलीकडचे, तिच्या मनातले मला मात्र उमगले नाही ग ऋतु. गंधाली धीट होती. तिने तिच्या संवादातील अडचणींवर मात केली होती. तिचा आत्मविश्वास जसा जसा वाढत होता, तसा तसा तिच्या स्वभावातील कणखरपणा वाढत होता. आजुबाजुचे लोकं, त्यांच्या नजरा, त्यांच्या स्वभावाचा तिला उलगडा होत असतांना, ती तिला नको असलेल्या व्यक्तींना टाळत होती. तसे तिला व्यवहारज्ञान फार लवकर आले. हुशार असल्यामुळे, स्वत:ला नेमके काय करायचे आणि त्यासाठी लागणारे कष्ट घ्यायची तिची तयारी होती. घरुन जरी पैसे येत असले तरी तिची ओढाताण होत होती. पुढच्या शिक्षणासाठी तसेच पुण्यात रहाण्यासाठी तिला पैशांची गरज होती. गरज पडली तर अवि तिला पैसे देत असे. अविवर अवलंबून रहाणे तिला आवडत नव्हते. स्वत:च्या पायावर उभं रहाण्याची तिची धडपड मला कळत होती. मी तिच्याकडे एक्सप्रिमेंटल दृष्टीने बघत असल्यामुळे ती काय करु शकते किंवा काय नाही याचा अनेकदा विचार केला. खरे सांगायचे तर तिला मदत मी वेळ पडल्यावर पैसे देऊन केली. स्वावलंबी होण्यासाठी तिची तीच धडपड करत होती.

अशातच एक दिवस अंकुरमध्ये एका संस्थेनी खूप कपडे आणून दिले. काही कपडे उपयोगात आणले गेले, काही उरले होते. त्यांचे नेमके काय करायचे या विचारात संस्थेतील लोकं असतांनाच, दिवाकर आजींनी गोधड्या करण्याचा विचार मांडला. बघता बघता गंधाली आणि तिच्यासारख्या सहा-सातजणींसाठी शिवणवर्ग एक आठवडा चालला. एक चांगला दिवस बघून गोधढ्या शिवण्यास सुरवात झाली.

त्या दिवशी गंधाली खूप खुश होती. तिला गोधडी शिवण्याचे २००रुपये मिळाले होते. आम्ही सारसबागेत तळ्यातल्या गणपतीच दर्शन घेतले. ती खूप खुश असली तरी तेवढीच गंभीर होती. तिला काही निर्णय घ्यायचा होता पण घेऊ शकत नव्हती. ऋतु, तिची ही मनस्थिती अविने अचुक हेरली. आजही आश्चर्य वाटते, मला तिची ही तगमग का कळली नाही. कदाचित तिला माझ्याकडून काही अपेक्षा असतील, मला हे कसे कळले नाही. किती मोठी चूक केली मी. आधी अविने मदतीचा हात पुढे केला आणि नंतर मी.

दुसर्‍या दिवशी अंकुरच्या दिवेकर आजींना गाठले. त्यांना गंधालीने आणि आम्ही व्यवसायाचा विचार सांगितला. प्रश्न भांडवलाचा होता, अर्थात खूप गुंतवणुक करण्यापेक्षा आधी दहा बारा सेट करुन जवळपासच्या दुकानात विक्रीला ठेवून बघायचे, तसेच संस्थेशी निगडीत लोकांना सांगायचे आणि प्रतिसाद मिळाला की मग पुढचे काय ते ठरवणार होतो. दिवेकर आजी अनुभवी होत्या, त्यांच म्हणणे रास्त होते. मग मी आणि अविने ५००रुपये प्रत्येकी जमवले. यात सचिनने खूप मदत केली. त्याने २०००रुपये जमा करुन दिले शिवाय त्याच्या ओळखीमुळे शिवणकामासाठी लागणार्‍या साहित्यात बरीच सुट मिळाली. अंकुर संस्थेतील दिघेकाकांकडून तात्पुरती शिलाईमशीन वापरायला मिळाली. अशा प्रकारे गंधालीचा स्वतंत्र व्यवसाय सुरु झाला. तान्ह्या बाळांसाठी गादी, लोड, दुपटे, झबले, असे सेट करुन ओळखीच्या दुकानदारांकडे ठेवले, काही संस्थेत विकल्या गेले. आठवत आहे मला पहिल्या ३० सेट मागे गंधालीला १०००रुपयांचा नफा झाला. आपण काही करु शकतो, त्या स्ववलंबनाच्या अभिमानाची चमक मी तिच्या डोळ्यात पाहिली होती.

ती माझ्याबद्दल काय विचार करत असेल हा विचार अधूनमधून यायचा माझ्या मनात. मग कुठले तरी, काही तरी वाचलेले आठवले की तो विचार बाजूला पडायचा. हळुहळु सायकॉलॉजीबद्दल माझे वाचन वाढत गेले, प्रयोग करण्याची उत्सुकता आवरत नव्हती. तिचा स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न, वाढता आत्मविश्वास, स्वावलंबनासोबत वाढलेली जिद्द, चिकाटी, याची तुलना आणि अभ्यास करता करता, तिचा छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद, त्यात सहभागी होणे मी टाळत होतो, तिचे कौतुक करायचे सोडून मी कुठली थेअरी, हेच शोधत बसलो.
बी.एफ स्कीनरच्या "वॉल्डन टू" कादंबरीने तर मला वेड लावले होते. ती वाचल्यावर मी ठरवले होते या क्षेत्रात काहीतरी भन्नाट करायचे. या नादात मी गंधालीला मात्र गिनीपिग केले. मी नेमकी इथेच चुकलो. हे आज कळत आहे.....इतक्या वर्षांनी. काही न बोलता ती मला खूप काही सांगत होती. ते मी जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही. मला हवे ते समजलो.....तिला... गंधालीला समजून घेता आलेच नाही.

सचिनला फोनकरुन कळवले होते. मॅसेज केला होता. स्वप्नाला तो कळवेल. अवि भेटला तर बरे होईल. गंधालीचा गुंता लवकर सोडवता येईल.

"ऋतु, मी तिला असे अर्ध्यावाटेवर सोडायला नको होते. का मला तिच्या भावना जाणून घेता आल्या नाही? काय अर्थ माझ्या या संशोधनाचा? गिनीपिग केला मी तिचा."
"अभि, त्रागा करु नको रे. सापडेल मार्ग, होईल व्यवस्थित सर्व." ऋतु
पूर्ववत होईल सगळं? या प्रश्नाचे उत्तर सध्यातरी कोणाकडेच नव्हते.

“ऋतु, मला कसे लक्षात आले नाही. गंधाली ... माझी वाट बघून शिणली असेल. कसे तिने स्वत:ल सावरले असेल?”
विचार केला तरी अंगावर काटा येतो.
माझे असे बोलणे ऐकून ऋतु अवाक झाली. माझ्या डोळ्यातले पाणी बघून तिला बर्‍याच गोष्टींचा उलगडा झाला असावा.

मला तिला अजून संभ्रमात टाकायचे नव्हते.
“ऋतु, मी गंधाली आणि अवि तिघांची मैत्री, मी कळत नकळत तिच्यात गुंतलो. अविला लक्षात आले. आमच्या इतक्या वर्षांच्या सहवासात अविने तिच्याबद्दल त्याच्या भावना कधी व्यक्त केल्या नाही.
मी सांगितले न तुला, माझ्या सोयीने मी सर्व अर्थ लावत गेलो. दुसर्‍यांच्या भावनांचा विचार केला नाही. आधी मला वाटत होते की अवि तिच्यात गुंतला नसावा. तो व्यक्त झाला नाही म्हणून मी असा अर्थ काढला.
मी सायकॉलॉजीचा विद्यार्थी असून मला माझ्या लोकांचे मन कळले नाही. काय उपयोग या शिक्षणाचा?

"ऋतु, माझा आणि गंधालीचा तो निशब्द संवाद रंगत होता. बहरत होता. तिची जिद्द तिच्या यशाचे गमक होते. गोधडी आणि लहान मुलांच्या कपडे शिवण्याचा तिचा प्रयोग यशस्वी झाला. तिचा आत्मविश्वास मला अभ्यासाला प्रेरीत करत होता. हळुहळु तिचा छान जम बसला. अवि शूटिंग निमित्त सतत फिरस्तीवर असायचा. हळुहळु तो आमच्यापासून दूरावत गेला. मनमोकळेपणाने बोलणारा अवि आता शांत झाला होता. तो बहुतेक आपणहून या अनामिक नात्यापासून दूर झाला असावा. तो पुण्यात आला की भेट होत असे. मात्र आमच्या मैत्रीला कुठेतरी तडा गेला होता."

"सचिन, स्वप्ना सर्वांनी जोर दिला की तिला प्रपोज कर. मी तिला प्रपोज वैगरे केले नव्हते. मी तिला आवडत होतो हे नक्की. आमची मैत्री प्रेमात बदलली. शिक्षण संपेपर्यन्त कसलाच विचार करायचा नाही असे आम्ही ठरवले होते.
मी आठवड्यातून तीन दिवस डॉ. ठाकरेंकडे कन्सलटंट म्हणून जात होतो. तिथे अभ्यासाला आणि प्रयोगाला खूप वाव होता. माझे वाचन, अभ्यास, प्रयोग सर्वांचा अवाका वाढत होता. गंधालीला मी काही बाबतीत गृहीत धरून वागत होतो. तिला काय वाटत असेल, काही सांगायचे असेल किंवा माझी तिला कधी गरज भासत असेल असा मी कधीच विचार केला नाही ग ऋतु.
तिचे व्यवस्थित सुरु आहे आणि आम्ही जे भेटतो...तेवढे पुरेसे आहे....तिला आणि मला दोघांना. हा माझा समज, याचीच मी ढाल करुन तिच्याशी वागत होतो, हे मला आज उमगत आहे."

"आज जाणवत आहे उणीव माझ्यात होती. तिचे निशब्द हुंदके ऐकू शकलो नाही. वादळ होऊन आलेला तो दिवस......आजही आठवला की अंगावर काटे येतात. राग-मत्सर काय होते, जे होते त्यामुळे आम्हा तिघांचे आयुष्य उध्वस्त झाले हे नक्की."

क्रमशः.........

फुल्लारी भाग १
https://www.maayboli.com/node/70330

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users