आरण्यक : पावसाळ्यातील आरण्यक - (भाग ०३)

Submitted by अ'निरु'द्ध on 23 June, 2019 - 03:36

आरण्यक : पावसाळ्यातील आरण्यक - (भाग ०३)

Aaranyak In Rains...

आरण्यकमधील Flora & Fauna, प्राणी आणि हिरवाई आपण आधीच बघितली.

उन्हाळ्यात आरण्यक अतिशय रुक्ष, कोरडे, उजाड आणि गरम असे. सुरुवातीच्या माझ्या आरण्यकच्या भेटी उन्हाळ्यातल्याच. . . .
(पण तेव्हा त्याचं नाव आरण्यक आहे हे ठरलेलं नव्हतं).

पण त्यातून एक पावसाळी पाण्याचा प्रवाह जातो (अगदी धो-धो पाऊस पडला तरच) असं कळलं.
तोही पहिल्यांदा पाहिलं तेव्हा खूप शुष्क, उजाड होता. थोडासा खोलगट नाल्यासारखा भाग होता खरा पण त्यातून कधीकाळी पाणी जात असेल याची खूणही नव्हती. काठावर संपूर्ण पानगळ झालेले शुष्क साग आणि पळस.

मात्र त्या पावसाळी प्रवाहावर कमीत कमी दोन ठिकाणी बांध घालून पाणी अडवायचं आणि जिरवायचं ठरवलं गेलं आणि अडचणी आल्या तरी मोठ्या जिद्दीने पहिल्या पावसापूर्वी त्याच्यावर दोन बांध बांधले गेले.

मुळात पावसाळा रुक्षातला रुक्ष आणि उजाडातल्या उजाड जमिनीचेही नंदनवन करतो. (पुरेशा पावसाच्या ठिकाणी). पण ह्या बांधामुळे जे पाणी बांधामागे साठलं आणि जास्त पावसाच्या वेळी बांधावरून वाहायला लागलं त्यांनी डोळ्याचं पारणं फेडलं .

हि पावसाळ्यातल्या आरण्यकची काही प्रकाशचित्रे, तुमच्यासाठी. . . .

मुखपृष्ठ : हा आरण्यकचा सिग्नेचर फोटो....

प्रचि १ : आरण्यकवरून पुढे जाणारी ही वळणदार डांबरी सडक. पावसाने भिजलेली…

प्रचि २ : रस्त्यावरून कुंपणाबाहेरून दिसणारे आरण्यक. (Cool) हिरवाईतून दिसणारे ओझरते पिवळे नारिंगी घर…(Of Warm Colours)…

प्रचि ३ : कुंपणाबाहेरूनच दिसणारा आतला वळणदार मातीरस्ता…

प्रचि ४ : हाच मातीरस्ता थोडासा पुढून…

प्रचि ५ : प्रवेशद्वारातून दिसणारे घर (Glimpse of House)…

प्रचि ६ : टप्प्या टप्प्यातील पातळीची जमीन आणि ऊन-सावली (धूपछाँव)...

प्रचि ७ : मधल्या टप्प्यावरची कारवीच्या भिंतीची झोपडी…

प्रचि ८ : हीच झोपडी वरच्या टप्प्यावरून…

प्रचि ९ : आरण्यकच्या रस्त्याकडच्या बाजूने, रस्त्या खालच्या मोरीतून पावसाळी पाण्याचा प्रवाह वाहून नेणारा ओढा. आणि त्याच्यावर बांधलेला दगड,मातीचा बांध... (पावसाळा सुरु होण्याच्या आधी त्याची केलेली मरम्मत)…
(पलीकडच्या काठावर आपट्याच्या झाडाला बांधलेला दगडी पार)…

प्रचि १० : पाऊस सुरु झाल्यावर बांधाने अडवलेले पाणी..

प्रचि ११ : भरलेला ओढा, उजव्या कोपऱ्यात दिसणारा रस्ता आणि त्याखालून पाणी वाहून आणणारी गोलाकार मोरी…

प्रचि १२ : नंतरच्या काही वर्षात बांधाची थोडी वाढवलेली उंची आणि लांबवरुन दिसणारा ओढा..

प्रचि १३ : पाऊस वाढला कि प्रवाहाचा जोरही वाढतो आणि पाण्याची धार अशी वळीदार / घेरदार/ Pleated पडद्यासारखी पडते आणि जास्त पुढेही पडते..

प्रचि १४ : हा प्रवाहाला अडवणारा बाल आरुणी…

(हा बांध एकदम सुरुवातीचा जुना आहे. आता त्यात प्रचि १२ प्रमाणे बदल आहेत.)…

प्रचि १५ : हा ओढा पुढे "S" आकाराचे वळण घेऊन आरण्यकबाहेर पडतो, त्याचे हे पहिले वळण…

प्रचि १६ : तेच वळण पुढे कंटिन्यु ... अगदी १८०° मध्ये…

प्रचि १७ : शंकासुर आणि शाल्मली (कांटेसावर) यातून दिसणारा गढूळलेला ओढा…

प्रचि १८ : हे वळण पुढे जाऊन दुसऱ्या बांधामागे एका छोट्याशा तळ्यामध्ये परिवर्तित होतं…
(वळणाच्या शेवटी गढूळलेलं पाणी दिसेल पहा..)

प्रचि १९ : आजूबाजूच्या निसर्गाला प्रतिबिंबित करणारं हे तळं. मात्र यातलं पाणी आता निवळलेलं…

प्रचि २० : आरण्यक मध्ये एक छोटासा उंचवटा, टेकडी आहे. तिच्यावरून दिसणार हेच तळं, फक्त विरुद्ध बाजूने…

प्रचि २१ : तळं ज्याने अडवलं आहे तो हा दुसरा बांध. एका काठाला दिसणार कहांडोळ (पांढरीचे झाड.)
(याचे पांढरे खोड रात्रीच्या वेळी थोड्याशा प्रकाशातही चमकते, आणि या झाडाचा रात्री जो आकार दिसतो म्हणून याला भुताचे झाड असंही म्हणतात)…

प्रचि २२ : बांध लांबून कमी उंचीचा वाटलं तरी जवळ जवळ पावणे सहा फूट उंच आहे. (त्याचा हा पुरावा…. Happy ) पाण्याचा जोर / फोर्स जास्त असला कि पाणी जास्त पुढे पडतं आणि माणूस अर्धा अधिक प्रवाहामागे दडला जातो.
(प्रचि मध्ये चेहऱ्यावरून निरागस न वाटणारा पण प्रत्यक्षात कोक पिणारा माझा मित्र)…

प्रचि २३ : पाण्याचा जोर जास्त असला तर चिल्ली पिल्ली पूर्णपणे प्रवाहामागच्या पोकळीत (गॅप मध्ये) मावू शकतात. हे दोघंजण पूर्णपणे पाण्यामागे आहेत, फक्त पाणी स्वच्छ असल्यामुळे दिसतायंत. एकदा का त्या पोकळीमागे गेलं कि मग मुलांचे धबधब्याच्या प्रवाहाबाहेर फक्त हाताचे पंजे बाहेर काढणं, फक्त मुंडकं बाहेर काढणं (आणि इतरांना घाबरवण्याचा प्रयत्न करणं) असे खेळही चालू होतात.
(बऱ्याच मोठ्यांनाही हा मोह न आवरता आल्याचं मी पाहिलेलं आहे.)…

प्रचि २४ : तळ्याच्या आणि कहांडोळीच्या मागे असलेल्या टेकडीवर तिथल्याच बांबूंपासून आणि झाडांच्या फांद्यापासून बांधलेले रेलिंग.
(पूर्वी सुकलेल्या झाडांपासून बनवलेली एक प्रेमिकांची लाकडी बैठकही इथे होती [लव्हर्स बेंच])…

प्रचि २५ : ज्यावेळेला पावसाचा जोर वाढतो तेव्हा प्रवाह जाण्यासाठी केलेल्या भागाव्यतिरिक्त बांधाच्या उंच भागावरूनही पाणी वहायला लागतं…

प्रचि २६ : उजवीकडचा बांध आणि धबधबा मानवनिर्मित….
तर डावीकडे कातळावरुन पडणारा छोटासा नैसर्गिक धबधबा…

प्रचि २७ : धबधब्याचा थोडासा क्लोज – अप…

प्रचि २८ : पावसाळी ओढा, बांध, धबधबा याना ओलांडून पुढे आलं कि विहिरीकडे जाणारी ही वाट…

प्रचि २९ : विहिरीकडे जाणारा उताराचा रस्ता आणि बच्चे कंपनीसाठी वेलीचा नैसर्गिक झुला…

प्रचि ३० : पाण्याची कमतरता भासायला लागल्यावर विहिरीसाठी चार/पाच वर्षांनी खणलेला हा खड्डा..

प्रचि ३१ : आणि त्यानंतर अनंत अडचणी सोसून दोन वर्षांनी ही बांधलेली विहीर…

प्रचि ३२ : विहिरीजवळच्या आरण्यकच्या हद्दीवरून दिसणारं मत्स्यपालनासाठी बांधलेलं हे शेजाऱ्याचे शेततळे…

प्रचि ३३ : विहिरीपासून दुसऱ्या अंगाने घराकडे आलं कि एक छोटासा भाग टिपिकल गावाकडची किंवा रानावनातली चौथऱ्यावरची उघडी मंदिरं असतात ना, तसं मंदिर बांधण्यासाठी ठेवलाय. त्यात लावलेली देवचाफा, कांचन हि झाडे…

प्रचि ३४ : त्याच्या अलीकडची जागा पावसाळी भाजीपाला, लागवड यासाठी राखलेली. त्यातला हा मका, भेंडी, इतर भाजी...

प्रचि ३५ : देवळाकडून घराकडे येतानाची हि जागा…

प्रचि ३६ : खडकाळ भागावरचे बांबू, करंज…

प्रचि ३७ : झाडावरती चढलेली ही रानकरांदा, त्याची वेल..

प्रचि ३८ : कुठूनतरी आणलेलं आणि गेल्या पावसाळ्यात आंब्याच्या झाडावर स्थानापन्न केलेलं Orchid (ऑर्किड)…

(जगेल की नाही याची शंका होती पण आता रुजलंय ते.. प्रतिसादात फोटो डकवतो नंतर..)

प्रचि ३९ : रातांबा / कोकम… (मनीमोहोर फेम.. )

प्रचि ४० : आपोआप आलेली सुंदर लाल रंगाची अळंबी (Mushroom)…

प्रचि ४१ : अळंबीचा क्लोज-अप…

प्रचि ४२ : पावसाळ्याची बहार - रंगांची उधळण..
हा बहुधा अस्वन..

प्रचि ४३ : पावसाळ्याची कमाल : गवताचे दुरंगी पान..

प्रचि ४४ : हिरवाईमधला चुकार लाल/किरमिजी रंग..

प्रचि ४५ : अगदी वारुणी-रन्गी (Wine Red) असलेला रान-द्राक्षं घोस..

प्रचि ४६ : अहाहा !!! काय झळाळी आहे…
(पावसाळी थेंब ल्यायलेलं हे रानद्राक्षाचं पान…)

प्रचि ४७ : कंटोळ्याची (रानभाजी, काहीजणं कर्टुली ही म्हणतात) वेल… आणि फुलं…

प्रचि ४८ : किड्याचे नक्षीकाम / कातरकाम…

प्रचि ४९ : थेंब पावसाळी…

प्रचि ५० : घराकडे नेणारी गवत वाट…

प्रचि ५१ : घराजवळचा हा इको पॉन्डचा प्रयोग. यातल्या लिली आणि नदीवरून आणलेली पाण्यातली झाडं, रामबाण कापूस वगैरे खूप सुंदर फुलतात… इथे आता फुलपाखरु उद्यानही (Butterfly Garden) वाढतंय..

प्रचि ५२ : खाली उजव्या कोपऱ्यात गच्चीतून दिसणारे घराचे उतरते छप्पर आणि गच्चीतूनच दिसणारा प्राजक्त आणि सप्तपर्णी.
मागे चिंच…

प्रचि ५३ : निघताना गाडीत बसल्यावर विंडशिल्डवरच्या पाण्यामुळे धूसर (Blur) दिसणारे आरण्यक.
इथून निघताना कैकांचे डोळेही ओले, धूसर होतात आणि मने तर सर्वांचीच......

आणि म्हणूनच पावसाळ्यातल्या ह्या निसर्गाचा, पावसा-पाण्याचा, झर्या-ओढ्याचा, चिंब भिजण्याचा अनुभव घेण्यासाठी आरण्यक या काळात आप्त-मित्रांनी, सग्यासोयर्यांनी अगदी वार लावून, प्रसंगी शुद्ध मनाने भांडून Happy गजबजलेले असते..

या मालिकेतील आधीचे भाग...

आरण्यक - घराभोवतालचे सखेसोबती : (भाग ०१)
https://www.maayboli.com/node/64916

आरण्यक - हिरवाई (भाग – ०२ अ)
https://www.maayboli.com/node/67470

आरण्यक - हिरवाई (भाग – ०२ ब)
https://www.maayboli.com/node/68137

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाली,
पहिल्या वहिल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद... _/\_

साधना, आपलेही आभार....
आणि मंडळी प्रत्यक्षातही तिथेच पहा जेव्हा जमेल तेव्हा..

जबराट!! अशा धुंद वातावरणात काळ जणू थांबलाय असं वाटतं. पाण्यात कितीही वेळ डुंबलं तरी मन भरत नाही. धन्यवाद. पावसाचा तजेला फोटोंमध्ये उत्तम उतरला आहे.

अप्रतिम प्रचि आणि वर्णन.
ही निसर्ग सौंदर्याने नटलेली जागा याची देही याची डोळा बघण्यासाठी काय करावे लागेल?
रच्याकने निरूदा तुम्ही जो अॉर्कीडचा प्रचि दिलाय ना तसे अॉर्किड आमच्या आंब्याच्या झाडांवर खुप येतात.ते एकप्रकारचे बांडगुळच आहे जे काढून टाकावे लागतात नाहीतर झाडाचा जीवनरस शोषून घेवून झाडाला हळूहळू मारतात.

सुंदर !

एवढे फोटो असूनही सम्पल्यावर असं वाटलं अरे, एवढेच ! आणखी असायला हवे होते.

खुप सुंदर!
या वेळी आम्ही बारवी डॅमवरुन जाताना आप्पांना नक्की थांबायला सांगेन अरण्यकला. पाऊस पडला की त्यांची या रस्त्याने एक चक्कर ठरलेली असते अगदी.

निरुदा सुंदर फोटो तुमचे निरीक्षण आणि हिरवाई. पुन्हा त्या आपल्या ग्रुपच्या पिकनिकच्या आठवणींना उजाळा मिळाला.

कित्ती सुंदर आहे आरण्यक.....तुमच्या आरण्यक मधे आम्हाला पण यायला मिळेल का ? Happy
हे रेसॉर्ट आहे की प्रायव्हेट जागा आहे तुमची ?

भारीच ! असेच भरपूर फोटो टाका आणि आमच्या डोळ्यांची तहान भागवा !! Happy किती छान आणि गारेगार वाटलं बघून हे .. मस्तच

स्वदेशी, 'सिध्दि', JayantiP, मंजूताई, दत्तात्रय साळुंके, वावे, स्वाती२, सुनिधी, हर्पेन, VB, anjali_kool

सर्वांचे उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल आभार..

>>>>रच्याकने निरूदा तुम्ही जो ऑर्कीडचा प्रचि दिलाय ना तसे ऑर्किड आमच्या आंब्याच्या झाडांवर खुप येतात.ते एकप्रकारचे बांडगुळच आहे जे काढून टाकावे लागतात नाहीतर झाडाचा जीवनरस शोषून घेवून झाडाला हळूहळू मारतात.<<<

@ किट्टु२१,
हे दोन झाडांवर प्रयोग म्हणून केलंय..
हे ऑर्किड हवेतील ओलावा मुळांमधून शोषतं. झाडामधून नाही.
हे COMMENSALISM चं उदाहरण आहे.
It is an interaction between two species in which one species is benefitted (उदा. ऑर्किड) and the other species is neither harmed nor benefitted (उदा. आंबा) which is Host.
The species that benefits is the commensal and the other is the host.
ऑर्किड फक्त आधार घेतं. आंब्याचं खरबरीत खोड ह्यासाठी उत्तम समजलं जातं. दुसरं चिंचेवर केलंय..
तरीही माहिती घेतो.
अभिप्रायाबद्दल आणि आपुलकीबद्दल धन्यवाद..

@ मनीमोहोर, >>>एवढे फोटो असूनही सम्पल्यावर असं वाटलं अरे, एवढेच ! आणखी असायला हवे होते.<<<
अहो हेच फोटो मला नेहमी वाटतं जास्त होतात म्हणून मी घाबरत घाबरत टाकतो.. आणि मग थोडे डिलिटावेत का..? हा ही विचार करतो..
दुसरं म्हणजे जास्त फोटोमुळे लेख हेवी होऊन उघडायला वेळ लागत असावा.... म्हणूनही लोक वाचायचा प्रयत्न करुन सोडून देत असावेत, असा एक कयास..

@ वैशाली हरिहर, >>>या वेळी आम्ही बारवी डॅमवरुन जाताना आप्पांना नक्की थांबायला सांगेन अरण्यकला. पाऊस पडला की त्यांची या रस्त्याने एक चक्कर ठरलेली असते अगदी.<<<

स्वागत, कळवा नक्की कधी ते..

@ जागू >>>पुन्हा त्या आपल्या ग्रुपच्या पिकनिकच्या आठवणींना उजाळा मिळाला.<<<

अगदी, अगदी.. Happy

@ स्मिता श्रीपाद >>>हे रेसॉर्ट आहे की प्रायव्हेट जागा आहे तुमची ?<<<

रिसाॅर्ट नाही... ही एक खाजगी जागा आहे..

सगळ्यांचे प्रतिसादाबद्दल आभार.... _/\_

निरु, तुमच्या नक्की कोणत्या कोणत्या धाग्यावर प्रतीसाद् द्यावेत हे कळेनासे झाले आहे. ते गाणे आहे ना, सुरज की गर्मीसे.. त्यातली एक ओळ आहे. पानी के प्यासे को तकदीरने जैसे जी भरके अमृत पिलाया. तसेच काहीसे झालेय. मुळात एवढा देखणा निसर्ग आधी पहायला ( प्रत्यक्ष ) मिळाला नाही. नुसते नेतवरील फोटोवर समाधान मानते. आता हे अनूभवायलाच हवे.
धन्यवाद, इतक्या रम्य सफरीसाठी.

@ विक्रममाधव , प्रतिसादाबद्दल धन्यवाद...

@ रश्मी.. काय बोलू... _/\_ _/\_

निरुदा, निव्वळ अप्रतिम ! हे सर्व नंदनवन फुलवायला बरेच प्रयत्न केले असणार तुम्ही आणि भरपूर वेळही लागलेला असणार. दंडवत घ्या _/\_

पृथ्वीवरचा स्वर्ग काश्मीरमधून महाराष्ट्रात आलेला माहित नव्हता. नुसते फोटो बघूनच डोळे निवले. प्रत्यक्ष अनुभवताना काय होत असेल!

नुसत्या फोटोंबद्दल बोलायचे झाल्यास २३, ४१ आणि ४६ खूप आवडले. पण एकूण एक फोटो सुंदरच आहेत.

Pages