न्यूझीलंड-५ : किवी शहरांतल्या डोंगरांवर (जंगल वॉक्स-ट्रेल्स, भाग २)

Submitted by ललिता-प्रीति on 12 March, 2019 - 02:48

न्यूझीलंड-१ : माओरी! माओरी!! - https://www.maayboli.com/node/65811

न्यूझीलंड-२ : Unique to NewZealand... हे फक्त इथेच! - https://www.maayboli.com/node/66047

न्यूझीलंड-3 : हा खेळ मिनरल्सचा - https://www.maayboli.com/node/66538

न्यूझीलंड-४ : You are here. (जंगल वॉक्स-ट्रेल्स, भाग १ला) - https://www.maayboli.com/node/67789

---------------------

पाहिया, रोटोरुआची भटकंती संपवून वेलिंग्टनला पोहोचलो तोवर अशा आयत्यावेळी ठरवून केलेल्या वॉक्सची जवळपास चटक लागल्यासारखं झालं होतं. वेलिंग्टनच्या वाटेवर असताना नकाशात हॉटेलचा पत्ता वगैरे पाहत होते; तेव्हा हॉटेलपासून जवळच ‘माऊंट व्हिक्टोरिया लूक-आऊट’ नावाचा ट्रेल दिसला. तिथे जायचं हे ओघानं आलंच.
वेलिंग्टनला हॉटेल चेक-इन केलं, i-SITE ची वारी केली, तिथे दुसर्‍या दिवशीच्या ‘झीलँडिया टूर’ची व्यवस्था लावली, तिथून जवळच्याच ‘बेसिन-रिझर्व क्रिकेट ग्राऊंड’मध्ये एक फेरफटका मारला आणि मग माऊंट व्हिक्टोरियाची वाट पकडली.
आमचं हॉटेल आणि आसपासचा रहिवासी भाग एका अर्थानं मा.व्हिक्टोरियावरच वसलेला होता. कारण आम्ही लूक-आऊटच्या दिशेला चालायला लागलो तो चांगलाच चढाचा रस्ता निघाला. जवळपास दहा-एक मिनिटं हाशहुश करत चालत होतो. दोन्ही बाजूंना टुमदार घरं नाहीतर २-३ मजली इमारती दिसत होत्या. पण चढ असा होता की धड फोटो काढायचंही सुचलं नाही.

आमच्या जरा पुढे एक बाई हातात भाजीपाला-वाणसामानाच्या पिशव्या घेऊन चालत होती. रस्त्याच्या शेवटी वस्ती संपून जिथे लूक-आऊटची डोंगरवाट सुरू होत होती, तिथे तिचं घर होतं. घराच्या फाटकातून ती आत शिरून दिसेनाशी झाली, म्हणून ते कळलं. मनात आलं, घरगुती बाजारहाट करून, वजन उचलून असं चढावर चालत यायचं म्हणजे केवढा व्याप आणि ताप! तो देखील आठवड्यातून किमान एक-दोन वेळा तरी करावाच लागत असेल. मग तिथे घरं घेऊन राहणार्‍यांनी काय विचार करून ती ठिकाणं नक्की केली असतील? बरं, ती काही झोपडपट्टी किंवा एखादी अनधिकृत वस्ती वगैरे नव्हती. सगळी व्यवस्थित बांधकामाची मध्यमवर्गीय/उच्च मध्यमवर्गीय घरं होती. पण अशा चढावरची घरं म्हणून ती स्वस्तात पडली असतील का? आम्ही वेलिंग्टनमध्ये होतो ते २ दिवस विकांताचे होते. त्यामुळेच बहुदा सर्व घरांसमोर गाड्या पार्क केलेल्या दिसत होत्या. अशा रस्त्याला पॅरलल पार्किंग करायचं म्हणजे देखील कठीण आणि काटेकोरपणे करायचं काम. अर्थात पुढे त्याचीही सवय होत असणार, म्हणा. त्या पायी चालणार्‍या बाईचं मात्र मला खरंच कौतुक वाटलं.
जंगलवाट सुरू होत होती तिथे एक माहितीफलक होता. त्याच्या चौथर्‍यावर जरा वेळ टेकलो, कारण चढाच्या रस्त्यानं बघताबघता चांगलाच घाम काढला होता.
collage-1.jpg
चांगलं कडक ऊन होतं; तिथल्या बोचर्‍या गारठ्यात त्यामुळे खरं म्हणजे बरं वाटत होतं. अंगावरचं जॅकेटही निघालं, त्यानं अधिकच मोकळं मोकळं वाटायला लागलं. आणि आम्ही उत्साहात पायवाटेनं वर चढायला सुरूवात केली.

छान, शांत पायवाट; दोन्ही बाजूंना झाडी. आधीच्या अनुभवांवरून लक्षात आलं होतं, की अशा ट्रेल्सच्या वाटेवर व्यवस्थित पाट्या असतात, दिशादर्शक बाण असतात, एकूणच हे ट्रेल प्रकरण निःशंक मनानं जावं असं असतं. त्यामुळे आता मनोमन बाकबूक वगैरे नावालाही नव्हती. साधारण अर्धा तास कच्ची पायवाट होती. वाटेवर दमट माती, बारीक दगड-गोटे, मध्येच कडेला मातीच्या घट्ट ढिगार्‍याच्या आडून अर्धवट बाहेर आलेली एखादी मोठी शिळा; अशा शिळेवर जरावेळ उगीचच टेकल्याशिवाय मला राहवत नाही. म्हणजे तेव्हा मला दम लागलेला असतो, किंवा मी बसायला जागा शोधतच असते असं काही नसतं; पण आधीच्या लेखांमध्ये कुठेतरी म्हटलं तसं, असं केल्याशिवाय त्या ठिकाणाचा ‘फील’ आल्यासारखा वाटतच नाही. एका ठिकाणी तशीच टेकले. डोंगर माझ्यामागे होता, समोर होतं बघताबघता विहंगम फ्रेममध्ये गेलेलं वेलिंग्टन शहर. मात्र एक आहे, शहर अनोळखी असेल तर असा ‘bird’s eye view’ जवळपास वायाच जातो. कुठे कोणती ठिकाणं आहेत, त्यांचं आपांपसातलं रस्त्यावरचं अंतर किती आहे हे माहिती असेल, तर विहंगम दृश्यातल्या बदललेल्या perspective ची मजा असते, ती अशा ठिकाणी येत नाही. तरी त्यातल्या त्यात वरून ‘बेसिन-रिझर्व’ सापडलं; त्यावरून आमच्या हॉटेलची आणि i-SITE ची जागा नक्की केली; याहून अधिक काही करणं शक्य नव्हतं.

IMG_20171111_105344_compressed.jpg

एका ठिकाणी आमची पायवाट पक्क्या रस्त्याला जाऊन मिळाली. हा मा.व्हिक्टोरियावर वाहन घेऊन येण्याचा रस्ता. आम्ही हॉटेलपासून पायी आलो त्या तुलनेत हा पक्का रस्ता बराच लांबून येत असावा असं दिसलं. पक्का रस्ता लागल्यावर थोडीफार वर्दळही लागली. स्ट्रोलर्समधून कच्च्याबच्च्यांना घेऊन निघालेले आई-बाप, विकांत असल्यामुळे हुंदडायला आलेली तरूण पोरंपोरी, खाजगी वाहनं, पर्यटकांच्या दोन-चार बसेस...

आणखी १०-१५ मिनिटांत आम्ही समीटला पोहोचलो. इतका वेळ स्वच्छ ऊन्ह अधिक गार वारा असं दुर्मिळ combination सुखावह वाटत होतं; ते चित्र वर पोहोचताच पूर्णतः बदललं. वर ऊन्ह होतंच, पण प्रचंड सोसाट्याचा आणि अचाट बोचरा वाराही होता. ‘Windy Wellington’चा खरा हिसका तिथे बसला. वरून ३६० अंशात शहराचं अप्रतिम दृश्य दिसत होतं; लांबवर विमानतळाची धावपट्टी दिसत होती; तिथे ये-जा करणारी विमानं दिसत होती; एकीकडे वेलिंग्टन बंदर, त्याच्या जरा डावीकडे आम्ही जिथून आलो तो रहिवासी भाग; आणखी डावीकडे अथांग साऊथ पॅसिफिक सी!

IMG_20171111_102340_compressed.jpg

दूरवर तंद्री लावून एकटक बघत बसावं असं इतकं काय काय समोर होतं, पण तो वारा...!! समीटच्या ठिकाणी मोठा गोलाकार observation deck आहे, कडेला रेलिंग आहे. रेलिंगवर ओळीनं अनेक माहितीफलक होते. १८व्या-१९व्या शतकातला वेलिंग्टनचा इतिहास, त्या बंदराचं महत्व वगैरे बरीच काय काय इंटरेस्टिंग माहिती होती; पण तो वारा...!! धड काही सुचूच देत नव्हता!! फोटो काढायचे तर हात स्थिर ठेवणे कठीण होतं; फोन हातातून उडून जाईल की काय असं वाटत होतं.

समीट डेकवरून काही पायर्‍या खाली उतरून मग पुन्हा थोडी फिरण्यासारखी मोकळी जागा होती. त्या जागेत Richard Byrd या अंटार्क्टिक संशोधकाचं एक छोटंसं स्मारक आहे. स्मारकाचा आकार बर्फाळ प्रदेशात संशोधक ज्या प्रकारच्या तंबूत राहतात तसा आहे. आत Richard Byrd चा अर्धाकृती पुतळा आहे. पुतळ्याच्या मागच्या भिंतीसाठीचे दगड अंटार्क्टिकाच्या एका ग्लेशियरमधून आणलेले आहेत, अशा अर्थाची एक पाटी तिथे जमिनीत लावलेली होती. त्या ग्लेशियरचं नावही दिलेलं होतं. हे एक मला जरासं झेपलं नाही. पर्यावरणवाद्यांनी याला आक्षेप वगैरे कसा घेतला नाही, असा प्रश्न पडला. पण मी त्यावर फारसा विचार केला नाही; कारण स्मारकाची मागची बाजू अधिक इंटरेस्टिंग होती. तंबूच्या आकारातली ती मागची बाजू बरोबर उत्तर-दक्षिण येईल अशी रचना केलेली आहे. तिथे एका मोठ्या माहितीफलकावरच्या नकाशात वेलिंग्टन आणि अंटार्क्टिका खंडाची पॅसिफिक समुद्रातली जागा दर्शवलेली होती. शेजारी लिहिलं होतं, की तंबूच्या त्या रेषेत सरळ उड्डाण केलं तर पुढचा थांबा असेल थेट अंटार्क्टिका खंड.
collage-2.jpg
ते वाचून क्षणभर थबकायला झालं. वेलिंग्टन असं पॅसिफिक समुद्रात ‘शेवटी’ आहे, याची कल्पनाच नव्हती. आपण दक्षिण गोलार्धातल्या एका टोकावर उभे आहोत, हा scenario अंतराळाच्या perspective मधून नजरेसमोर तरळून गेला. तरी कुठेतरी वाटलं, की हवेतून उडत थेट अंटार्क्टिकाला जाता येत असेल, पण न्यूझीलंडच्या साऊथ आयलंडचा एखादा बारीकसा भाग तरी त्या axis च्या वाटेत मध्ये येत असणारच. मग वार्‍याची तमा न बाळगता डोळ्यांवरचा गॉगल काढला, फोनवरचा मॅप उघडला, झूम-आऊट करून अंटार्क्टिकाला मॅपवर आणलं, दुसर्‍या फोनची edge त्या रेषेत ठेवून बघितली, तर खरंच तसंच होतं. (वास्तविक, असा पडताळा करण्याचं मला काही नडलेलं नव्हतं. पण मुळात नकाशे हे माझं आवडतं प्रकरण; त्यात टूर-प्लॅनिंगपासूनच न्यूझीलंडचा नकाशा इतक्या वेळा पाहिला गेला होता, तरी आपल्याला कधीच कसं हे लक्षात आलं नाही, ही टोचणी त्यामागे जास्त होती. असो.)

mt-victoria-lookout-map_compressed.jpg

त्या उत्तर-दक्षिण रेषेनं मा.व्हिक्टोरिया ट्रेलचं सार्थक झालं. पाहिया-रोटोरुआच्या तुलनेत वेलिंग्टनमध्ये अंधार लवकर पडणार याची कुणकूण लागली तसं आम्ही तिथून निघालो. पायवाटेवरून जरासं खाली आल्यावर कानांशी सुसाटणारा वारा आधी बंद झाला; त्यानं कोण हायसं वाटलं!
डोंगरावरून आम्ही खाली उतरत असतानाच आकाशात हळूहळू ढग जमायला लागले होते. रात्री जेवणाच्या शोधार्थ परत बाहेर पडलो, तर किंचित भुरभूर पाऊस पडत होता आणि अचाट बोचरा वारा मा.व्हिक्टोरियावरून खाली रस्त्यांवरही उतरला होता. जेवणानंतर वेलिंग्टन बंदराच्या परिसरात एक फेरफटका मारण्याचं ठरवलं होतं; पण ‘Windy Wellington’नं तो बेत रहित करायला लावला.

----------

Cut to .... १२ दिवसांनंतर, ऑकलंड.

न्यूझीलंड टूरचा शेवटचा दिवस. दिवसभराचा काहीही कार्यक्रम ठरवलेला नव्हता. तरी हाताशी एक अख्खा दिवस होता. त्यामुळे सकाळी नाश्ता वगैरे करून नकाशा धुंडाळत होतो. नेचर ट्रेल, पायपीट, या प्रकारातली दोन ठिकाणं खुणावत होती. एक, One Tree Hill आणि दुसरं, Mt. Eden. पैकी One Tree Hill जरा लांबच पडत होतं. दुसर्‍या दिवशी भल्या पहाटे निघायचं होतं. त्यामुळे तो पर्याय बाद केला.
तुलनेनं माऊंट ईडन जवळ होतं. जरा शोधाशोध केल्यावर कळलं, की तिथून जवळ ‘माऊंट ईडन’ हे ऑकलंडचं उपनगरीय रेल्वे स्टेशन होतं. मग काय! तडक ऑकलंड उपनगरीय रेल्वे सेवा आजमावून बघायचं ठरवून टाकलं. माऊंट ईडनची ट्रेन ‘Britomart’ स्टेशनवरून सुटते असं नेटवर वाचलं. आदल्या दिवशी संध्याकाळी आम्ही ऑकलंड बंदर परिसरात बरंच पायी फिरलो होतो. तेव्हा एक मोठं उपनगरीय रेल्वे स्टेशनही बाहेरून पाहिलं होतं. नकाशात पाहिलं तर आम्ही पाहिलेलं ते स्टेशन ब्रिटोमार्टच निघालं. (आदल्या दिवशी यातलं काहीच डोक्यातही नव्हतं; त्यामुळे स्टेशनचं नाव वगैरे बघून ठेवावं असं काही वाटलं नव्हतं.)

मा.ईडनचा हा आमचा ट्रेल सुरू झाला तो आमच्या हॉटेलपासूनच. आदल्या दिवशी निरुद्देश भटकताना फारसं काही जाणवलं नव्हतं; पण आता लक्षात आलं, की ब्रिटोमार्टपर्यंत परत चालत जायचं तर बराच वेळ गेला असता. मग तिथपर्यंत जाण्यासाठी बसची शोधाशोध सुरू केली. हॉटेलपासून जवळच Auckland SkyBusचं (ऑकलंडची सिटी बस) एक ‘airport drop special’ थांबा-cum-कार्यालय-cum-तिकीट घर होतं. तिथे केवळ विमानतळाला जाणार्‍या आणि विमानतळाहून येणार्‍या बसेस थांबत होत्या. तरी आम्ही सरळ तिथेच जाऊन धडकलो आणि ब्रिटोमार्टच्या बसची चौकशी केली. जराशा भलत्या ठिकाणी चौकशी केली गेली तरी कोणतेही ‘लूक्स’ न मिळता व्यवस्थित माहिती मिळते याची गेल्या २-३ आठवड्यांत इतक्या वेळा प्रचिती आलेली होती, की आम्ही निवांत होतो. आणि तसंच झालं. बसस्टॉपवर उभ्या असलेल्या तिकीट तपासनीसानंच आम्हाला माहिती दिली. रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला त्या बससाठीचा स्टॉप होता, तो दाखवला. ती बस थेट ब्रिटोमार्टला जाणारी नव्हती; त्यामुळे दुसर्‍या बससाठी कुठे उतरावं लागेल ते देखील सांगितलं. आम्हाला लगेचच बस मिळाली. बस बदलायची वेळ आली तिथे उतरल्यावर मेंदूतल्या आदल्या दिवशीच्या जीपीएसमुळे ब्रिटोमार्ट स्टेशन जवळ आल्याचं समजलं. मग आम्ही दुसरी बस पकडायचा विचार सोडून दिला आणि पायी निघालो.
जेमतेम ५-१० मिनिटांत स्टेशनला पोहोचलो; स्टेशनात शिरल्यावर लक्षात आलं, की कालच्या रस्त्यापेक्षा आज आम्ही वेगळ्याच वाटेनं आलो होतो! पण तरी exploration केल्यासारखं वाटत होतं ते भारी होतं.
तिकीट काढलं. रेल्वे स्टेशन म्हणावं तर ट्रेन्सचा, रुळांचा कुठे मागमूसही नव्हता. एका ठिकाणी खाली जाणारे जिने दिसत होते. प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी तोच रस्ता होता; पण रेल्वे भुयारी नव्हती; फक्त स्टेशन भुयारी होतं. ४ जिने उतरून गेलो तर खाली ३-४ प्लॅटफॉर्म्स दिसले. स्टेशनावर सगळा शुकशुकाट! एका प्लॅटफॉर्मवर ट्रेन उभी होती.

IMG_20171123_115027_compressed.jpg

आमच्या तिकिटावर जी वेळ लिहिली होती तीच ही ट्रेन किंवा कसं वगैरे विचार करत जरा उभे होतो, तर एक रेल्वे स्टाफपैकी वाटणारा मनुष्य जवळ आला. ‘You guys from India?’ त्यानं चौकशी केली. आम्ही ‘बुगुबुगू’ केल्यावर तो एकदम सैलावला आणि उत्साहानं गप्पा मारायला लागला. तो चेन्नईचा होता, गेली २०-२२ वर्षं ऑकलंडमध्ये तिकीट तपासनीसाची नोकरी करत होता. त्यानं आमचं तिकीट बघितलं. आमची ट्रेन कुठल्या प्लॅटफॉर्मवर आणि किती वाजता येईल ते सांगितलं.
मग त्यानं आपणहून आम्हाला त्या उभ्या असलेल्या ट्रेनच्या इंजिनरूममध्ये नेलं; तिथले consoles, controls वगैरे दाखवले; फक्त फोटो काढू दिले नाहीत, नाहीतर त्याच्या नोकरीवर गदा आली असती, म्हणे. स्टेशनात कुठे सीसीटीव्ही नव्हते का, असा प्रश्न पडला. इंजिनरूममध्ये मला चिंता, की तेवढ्यात ती ट्रेन सुटली तर काय? पण मग म्हटलं, आपण तिकीट तर काढलेलं आहे; ट्रेन सुटली तर या महाभागाला पकडून ठेवायचं; उतरू द्यायचं नाही. पण तसं काही झालं नाही.
आम्ही खाली उतरून परत जरा वेळ गप्पा मारल्या. ऑकलंडमधले train rush hours, नोकरदार माणसांसाठीच्या प्रवासाच्या सोयी; सकाळी साडेनऊ-दहा पर्यंत ट्रेन्सना गर्दी असते, त्यानंतर निवांत असतं, मग संध्याकाळी ६-७ वाजता गर्दी, वगैरे. आम्ही मुंबईहून आलोय, हे कळल्याबरोब्बर त्यानं न्यूझीलंड-भारत आंतरराष्ट्रीय स्नेहसामना सोडून दिला आणि चेन्नई-मुंबई स्थानिक कबड्डी सुरू केली... बाप रे, मुंबईच्या लोकल ट्रेन्स, भयानक गर्दी, मी तो प्रवास करण्याचा विचारही करू शकत नाही, चेन्नईतच छान वाटतं, इत्यादी... मग आम्ही गप्पा आवरत्या घेतल्या आणि आमच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन उभे राहिलो.

ट्रेन आली, रिकामीच होती. आत चढलो. समोरच एका छोट्या फलकावर ‘कृपया, रेल्वे क्रॉसिंगपाशी मोबाईल हेडफोन्स काढून ठेवा’ अशी पाटी दिसली. (इतका वेळ मुंबई लोकल ट्रेन्सशी काही कनेक्शनच होत नव्हतं, ते इथे झालं.) पुढच्या ‘पार्नेल’ स्टेशनला काही कॉलेजवयीन मुलं डब्यात चढली. त्यांच्या आपांपसांत जोरजोरात गप्पा सुरू होत्या. तिथल्या तरुणाईचे गप्पांचे विषय जाणून घेऊ म्हणून मी जरा कान टवकारले तर ती मुलं बिचारी अभ्यासाबद्दलच बोलत होती. मग मी तो नाद सोडून दिला. पुढचं स्टेशन ‘न्यू मार्केट’. हे एक जंक्शन आहे. आमची ट्रेन स्टेशनात थांबली, पुन्हा जराशी उलट्या दिशेला गेली आणि मग मार्गस्थ झाली. तिसरं स्टेशन ‘माऊंट ईडन’.

IMG_20171123_123546_compressed.jpg

आम्ही उतरलो. निर्मनुष्य स्टेशनाचा एक फोटो काढला आणि जिना चढून वर रस्त्यावर आलो. तिथून माऊंट ईडनची वाट शोधायला फारसं जड गेलं नाही.

Travel sites वर याचा उल्लेख ‘Mt Eden Volcano Walk’ असा केला जातो. साधारण दीड-दोन किमीचं अंतर; स्वच्छ, डांबरी पायवाट, भरपूर झाडी; मात्र संपूर्ण चढाचा रस्ता आहे; सवय नसेल तर धाप लागतेच. आम्ही पायपिटीच्या दृष्टीनंच निघालो होतो, त्यामुळे तो प्रश्न नव्हता.
वास्तविक माऊंट ईडन हा एक मृत ज्वालामुखी आहे. काही हजार वर्षांपूर्वी त्याचा शेवटचा उद्रेक झाला होता. समीटच्या जरासा अलिकडे एक मोठा crater दिसतो. तिथे आता सगळं हिरवंगार गवत आहे. मात्र क्रेटरच्या आत उतरू नये अशा पाट्याही तिथे दिसल्या. त्यामुळे तो मृत नसून सुप्त ज्वालामुखी असावा का, अशी शंका आली.

IMG_20171123_133834_compressed.jpg

क्रेटरच्या कडेकडेने वरती जाण्याची वाट आहे. चालताना खाली ऑकलंड शहर दिसत होतं; इथे परत तेच, एक ऑकलंड स्काय टॉवर वगळला तर इतर काहीच ओळखीचं नव्हतं; असं म्हणेम्हणेपर्यंत खाली ‘ईडन पार्क क्रिकेट ग्राऊंड’ दिसलं.

IMG_20171123_132514_compressed.jpg

इथे ते रग्बी ग्राऊंड म्हणून ओळखलं जातं. रग्बीच्या सामन्यांव्यतिरिक्त वेळ उरला तर तिथे क्रिकेटच्या मॅचेस होतात. (आम्ही आदल्या दिवशी क्रिकेट ग्राऊंडला कसं जायचं त्याची चौकशी केली होती, तेव्हा ही माहिती मिळाली होती.)
रमतगमत, फोटो काढत समीटला पोहोचलो. मध्येच ऊन्ह, मध्येच ढग येत होते; हवा छान होती; मुख्य म्हणजे वेलिंग्टनसारखा हैराण करणारा वारा नव्हता.

समीटपाशी एक अतर्क्य गोष्ट पाहिली.
अशा ठिकाणी अनेकदा असते तशी तिथे एका चौथर्‍यावर जगभरातल्या विविध प्रमुख शहरांची दिशा आणि अंतरं दर्शवणारी एक मोठी गोलाकार पितळी पाटी लावलेली होती. जो-तो तिथे जाऊन आपापल्या ओळखीची नावं शोधत होता, त्याचे फोटो काढत होता; त्यात काही फार नवल नव्हतं. आम्हीही दिल्ली शोधलं; त्याऐवजी मुंबई दिसल्यावर खूष झालो. पाऊस-वार्‍यामुळे ती पाटी जराशी काळी पडली होती, मात्र पाटीवरचं ‘बीजिंग’चं नाव तेवढं लख्ख चमकत होतं.

IMG_20171123_140120_compressed_0.jpg

ते कसं काय, हा प्रश्न पडेपडेपर्यंत त्याच्या उत्तराचा ‘live demo’ मिळाला! दहा-एक मिनिटंच आधी तिथे एक मोठी बस भरून चिनी पर्यटक आले होते. त्यातले काही त्या पाटीपाशी जमले; त्यांनीही त्यांच्या ओळखीचं नाव शोधलं असणार; ते दिसल्या दिसल्या अनेक दिवस हरवलेलं मांजरीचं चिमुकलं पिल्लू अचानक सापडलं तर त्याला कसं कुरवाळू तसं त्यांनी त्या बिजींग शब्दाला अक्षरशः कुरवाळायला सुरूवात केली. सर्वांच्या चेहर्‍यांवर जुन्या हिंदी सिनेमातल्या अंध, म्हातार्‍या ‘माँऽऽ’सारखे भाव. आसपास उभ्या असलेल्या आमच्यासारख्यांना ते चिनी ‘बिजींग ऽऽ बिजींगऽऽ’ करत तिथे बोट दाखवून सांगत होते; मोठमोठ्या आवाजात मागच्यांना बोलावत होते; मग मागून आलेले बिजींगला कुरवाळण्याचं काम पुढे सुरू ठेवत होते. असं त्यांचं पुढची ५-१० मिनिटं सुरू होतं. मी अक्षरशः अवाक्‌ होऊन ते पाहत होते. हे नुसतं कुणी मला सांगितलं असतं तर माझा विश्वास बसला नसता. पण चकाकत्या बिजींगचा धडधडीत पुरावा समोर होता. (बिजींगलगतच मॉस्कोचंही नाव होतं; collateral damage मुळे ते पण चकाकत होतं.) ही देशप्रेम व्यक्त करायची अनोखी पद्धत म्हणायची? की जागतिक पातळीवरचं exposure नसल्याचा परिणाम म्हणायचा? की चायना-मेड social conditioning म्हणायचं? काही कळेना. त्यांतल्या कुणालातरी कारण विचारण्याची माझी फार इच्छा होती. पण परदेशात ग्रूपनं फिरणार्‍या चिनी पर्यटकांना एकतर इंग्रजी बोलता येत नाही, किंवा त्यांच्याशी बोलायला गेलं तर ते उत्तर द्यायला अजिबात उत्सुक नसतात, असा माझा एकंदर अनुभव; त्यामुळे तसाही विचारून फारसा उपयोग झाला नसताच. त्या अचाट आणि अतर्क्य गोष्टीचा अर्थ लावायचा मी बराच वेळ प्रयत्न करत राहिले...
दीड-दोनपर्यंत तिथे निवांत वेळ काढला आणि मग परत फिरलो.
माऊंट ईडनला काही अंतरापर्यंत वाहनं आणण्याची सोय आहे. मोठ्या टूरिस्ट बसेससाठी पार्किंगचीही जागा आहे. पार्किंगच्या ठिकाणी एका बाजूच्या लॉनवर २-३ मोठे कापडी फलक अंथरून ठेवले होते; फलकांवर काही चित्रं, फोटो आणि चिनी लिपीतला मजकूर दिसत होता.

IMG_20171123_142909_compressed.jpg

माझी उत्सुकता चाळवली. मी जवळ जाऊन पाहिलं, तर त्यातले काही फोटो ओळखीचे वाटले. ते तियानानमेन चौकातल्या त्या काळ्या घटनेबद्द्लचे होते. रणगाड्यासमोर हात पसरून उभा असलेला एक मनुष्य - हा फेमस फोटोही होता. चिनी मजकुरात एकच इंग्रजी वाक्य दिसलं. ते कसल्याशा संघटनेचं होतं; आणि एकूण फलकांमधून चिनी कम्युनिस्ट नेत्यांचा निषेध केला असावा असं दिसत होतं. त्या वरच्या कुरवाळू चिन्यांची बस तिथेच शेजारी उभी होती. तिथे येणार्‍या चिन्यांना ते फलक दिसावेत असेच अंथरलेले होते. आता मला उत्सुकता वाटली, की कुरवाळू चिनी हे फलक पाहून कशी प्रतिक्रिया देत असतील? की या फलकांचा परिणाम म्हणून तो वरचा चकाकता पुरावा होता? काही कळायला मार्ग नव्हता. ते चिनी खाली परतेपर्यंत थांबून ते काय करतात बघावं असाही एकदा विचार आला. पण पोटात कावळे कोकलत असल्यामुळे मी तो सोडून दिला.

खाली उतरून रस्त्यावर आलो. एका दुकानात चौकशी करून बस-स्टॉप शोधला आणि बसनं दुपारनंतर हॉटेलवर परतलो.
पाहियात पहिल्या दिवशी जसं काहीतरी achieve केल्यासारखं वाटलं होतं, तसंच परत वाटलं. न्यूझीलंडमधला शेवटचा दिवस ध्यानीमनी नसलेल्या प्रकारे सार्थकी लागला होता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! चकाकणारं बीजिंग ही गंमतच आहे Happy
कन्याकुमारीला विवेकानंद स्मारक जिथे आहे, तिथे अशी exact दक्षिण दिशा दाखवणारा फलक आहे आणि त्या दिशेला पुढे समुद्रात एक लहानसा खडक आहे. भारताचा दक्षिणेकडचा हा शेवटचा बिंदू असं वाटून एकदम वेगळंच वाटतं त्या खडकाकडे बघताना!

वा.. मस्त लिहिलस एकदम ! मला वाटलं सोडून दिलीस की काय ही मालिका!
ईडन पार्कला काहि म्युझियम वगैरे नाहीये का?

मी ते मा व्हिक्टोरीयाचं सुरूवातीला माननीय व्हिक्टोरीया वाचत होतो.. :|

माननीय व्हिक्टोरीया >>> Lol

ईडन पार्कला काहि म्युझियम वगैरे नाहीये का? >>> आम्ही त्या क्रिकेट ग्राऊंडवर गेलो नाही; त्यामुळे काही कळायला मार्ग नव्हता.
बेसिन रिझर्वला म्युझियम आहे असं समजलं, म्हणून चौकशी केली, तर तिथे मॅचेस असतील तेव्हाच म्युझियमही खुलं असतं असं कळलं.