न्यूझीलंड-२ : Unique to New Zealand... हे फक्त इथेच!

Submitted by ललिता-प्रीति on 6 May, 2018 - 08:57

न्यूझीलंड-१ : माओरी! माओरी!!

----------

न्यूझीलंडला जायचं तर नेचर-टुरिझमसाठी, असं तिथे जाऊन आलेल्यांकडून ऐकलेलं होतं. आमचंही नेचर वॉक्स, जंगल-ट्रेल्स, समुद्रकिनारे यांनाच प्राधान्य होतं. मानवनिर्मित स्नो-वर्ल्ड, डिज्नी-वर्ल्ड, अम्युझमेंट पार्क्स असल्या गोष्टींवर आम्ही आधीपासूनच फुली मारलेली होती. मात्र जगभरात केवळ न्यूझीलंडमधेच अस्तित्त्वात असणार्‍या काही नैसर्गिक गोष्टी असू शकतात, त्यांचा शोध घ्यावा, हे काही डोक्यात आलेलं नव्हतं. तो उजेड पडला TripAdvisor मुळे.

न्यूझीलंडमधल्या I-site visitor centre च्या मी प्रेमात पडले ती खूप नंतरची गोष्ट म्हणायला हवी. त्याच्या खूप आधीपासून माझं TripAdvisor app सोबतचं प्रेमप्रकरण सुरू झालं. इतके दिवस TripAdvisor च्या लोगोतलं गॉगल लावलेलं घुबड आपल्याकडच्या काही हॉटेल्सच्या दारांवर वगैरे तेवढं पाहिलेलं होतं. त्यांपैकी काही हॉटेल्स खूप काही चांगली असतील असं बाहेरून तरी वाटायचं नाही. त्यामुळे ‘आजकाल काय... पट्टेवाल्यांची पोरंही कालेजात जातात, हो’च्या चालीवर त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. न्यूझीलंड टूरच्या प्लॅनिंगदरम्यान मात्र हे चित्र बघताबघता पालटलं.
नेटवर न्यूझीलंडमधल्या विविध things to do शोधायला गेलं की पहिल्या २-४ सर्च-रिझल्ट्समध्ये हमखास TripAdvisor ची लिंक असायचीच. सुरूवातीला आम्ही न्यूझीलंड टूरिझम खात्याच्या लिंक्स तेवढ्या उघडून पहायचो. इतर लिंक्सकडे तसं दुर्लक्षच करायचो. मग कधीतरी एकदा TripAdvisor वर क्लिक केलं गेलं; आणि मग हळूहळू हे प्रमाण वाढत गेलं. TripAdvisor तुम्हाला विचारतं- कशा प्रकारचं टुरिझम हवंय? नेचर्स अँड पार्क्स बघायची आहेत का? लहान मुलांना आवडेल असं काही हवंय का? शॉपिंगमध्ये रस आहे का? अ‍ॅडव्हेंचर करायचंय का?... ते पाहिलं आणि ‘युरेका!’ झालं.

TripAdvisor वरची सर्वाधिक उपयोगी पडणारी गोष्ट म्हणजे त्या-त्या ठिकाणी जाऊन आलेल्यांनी लिहिलेले reviews. हळूहळू ते वाचायला लागलो. पुढेपुढे तर लहान मूल जसं घरातल्या इतरांनी काहीही सांगितलं तरी एकदा ‘हो, आई?’ करत आईला विचारून खात्री करून घेतं, तसंच व्हायला लागलं. एखाद्या ठिकाणाबद्दल नेटवर अन्यत्र काहीही दिलेलं असू दे, TripAdvisor वर त्याबद्द्ल काय दिलंय हे बघण्याची गरज वाटायला लागली; अमुकतमूक जागेचे फोटो पाहिल्यावर तिथे जावंसं वाटलं तरी त्या जागेचं TripAdvisorचं रेटिंग पाहिल्याशिवाय त्याबद्दल निर्णय घेणे बरं वाटेना. मग कामातून ५-१० मिनिटांचा ब्रेक घेऊन किंवा वेळी-अवेळी, रात्री-बेरात्री अशी शोधाशोध करायला बरं म्हणून त्यांचं app फोनवर डाऊनलोड केलं. देखते देखते ये दोस्ती प्यार में बदल गयी... आणि अंतिमतः TripAdvisor मुळे आम्ही Unique to NewZealand अशा तीन गोष्टी पाहू शकलो. त्यातली एक, म्हणजे वेलिंग्टनमधल्या एका अप्रतिम जंगलात पाहिलेले पक्षी; दुसरे, ख्राईस्टचर्चजवळच्या अकारोआ (Akaroa) इथले चिमुकले हेक्टर डॉल्फिन्स; आणि तिसरे... त्याचीच स्टोरी आधी सांगते.

न्यूझीलंडच्या नॉर्थ आयलंडमधल्या रोटोरुआनजीक एक अत्यंत लोकप्रिय, चुकवू नये असं ठिकाण आहे - ‘Waitomo Glow Worm caves’. या प्रकारचे ग्लो-वर्म्स जगभरात फक्त न्यूझीलंडमध्येच पाहायला मिळतात, असं कळलेलं होतं. त्यामुळे काही झालं तरी ग्लो-वर्म्स पाहायचेच हे नक्की होतं; वायटॉमो short-list केलेलंही होतं. पण, TripAdvisor मुळे त्यात एक झकास ट्विस्ट आला.
प्लॅनिंगदरम्यानची गोष्ट. जाण्या-येण्याची विमानतिकिटं, हॉटेल-बुकिंग्ज, अंतर्गत प्रवासाची विमान-तिकिटं एवढं पूर्ण करून व्हिजासाठी अर्ज केलेला होता. व्हिजा आला की (आणि आला तर!) मग बाकीचं ठरवू असं म्हणून stand-by mode वर होतो. पण दरम्यान दुनिया की कोई ताकद मला TripAdvisor वर बागडण्यापासून रोखू शकत नव्हती.
तर अशीच एक दिवस तिथे हॉकिटिकाबद्द्ल काय काय दिलंय ते सहज बघत होते. आमचं तिथल्या हॉटेलचं location, तिथून सिटी-सेंटर किती लांब आहे, खादाडीची ठिकाणं, तिथला बीच कसा आहे, वगैरे, वगैरे. तर अचानक आमच्या हॉटेलच्या अगदी समोरच एक जागा मार्क केलेली दिसली; त्या जागेचं नाव होतं ‘Glow Worm Dell’. मी लगेच त्या ठिकाणाचा सर्च मारला. तर कळलं, की तिथेही ग्लो-वर्म्स पाहता येणार होते. एकाने reviews मधे लिहिलेलंही होतं, की ‘वायटॉमोला जाण्यापेक्षा इथे जा; सेम तसेच ग्लो-वर्म्स पाहता येतात, ते देखील अगदी शांतपणे आणि मुख्य म्हणजे फुकटात!’ मी ताबडतोब हॉकिटिकातून बाहेर पडून वायटॉमोत शिरले. तिथल्या ग्लो-वर्म्स केव्‌जबद्दल लोकांनी भरभरून आणि चांगलेच रिव्ह्यूज लिहिले होते; पण ‘तिथे खूप गर्दी असते, त्या केव्‌जमधून इतक्या पटापटा लोकांना नेऊन आणतात की समाधान होत नाही, त्या मानाने पैसे खूपच घेतात,’ असा सर्वसाधारण सूर दिसत होता. मग मी वायटॉमोला कसं जायचं वगैरे शोधलं. रोटोरुआतून तिथे बसनं जावं लागणार होतं. साधारण दीड-दोन तासांचा प्रवास. आम्ही दोघंही motion-sickness चे खंदे कार्यकर्ते असल्यामुळे शक्यतो बसप्रवास टाळण्याकडे आमचा कल असतो. पण ग्लो-वर्म्ससाठी आम्ही ते देखील केलं असतं. मात्र आता TripAdvisor नं ते टाळण्याचा पर्याय दाखवला होता. त्यामुळे व्हीजा आल्यावर आम्ही पहिलं काय केलं तर वायटॉमोवर फुली मारून टाकली. त्यामुळे आमचा रोटोरुआतला किमान अर्धा दिवस वाचला; पैशांचीही बर्‍यापैकी बचत झाली. शिवाय, रोटोरुआला जाणारे आपल्याकडचे समस्त पॅकेज-टूरवाले जिथे ‘नेतातच’, तिथे ‘जायचंच नाही’ असा थोडासा माजही करता आला!

तर, हॉकिटिका...

hokitika-map-1.jpg
...

hokitika-map-2.jpg

“What made you stay here for 3 days??” - हॉकिटिकाच्या आय-साईटमधली मुलगी आश्चर्यानं आम्हाला विचारत होती.

न्यूझीलंडमधला तो आमचा ११वा दिवस होता. आता आम्ही त्या परक्या देशात on our own फिरायला ‘तय्यार’ झालेलो होतो. काळजीपूर्वक, इकडच्या-तिकडच्या खुणा लक्षात ठेवत फिरण्याचं सुरूवातीचं प्रमाण बरंच कमी झालं होतं. पर्यटकांसाठीच्या छोट्या-छोट्या सोयीही इतक्या व्यवस्थित दिसल्या होत्या की रस्ता चुकू म्हटलं तरी चुकणार नाही, याचा आत्मविश्वास आला होता. किवी इंग्रजी आपल्याला व्यवस्थित समजतंय, आपल्या भारतीय इंग्रजीला समोरून लगेच प्रतिसाद येतोय, हे ध्यानात आल्यानं बेधडक रस्त्यातल्या एखाद्याला ‘ओ दादाऽ, या रस्त्यान्‌ समुद्रावर जाता येतंय का?’ हे विचारायला लागलो होतो. (गूगल-मॅप्स दिशा दाखवतं, पण असे विचारत विचारत रस्ते शोधण्याची मजा त्यात नसते.) एका ठिकाणाचा निरोप घेऊन निघालं की पुढच्या ठिकाणचं आय-साईट कुठे आहे ते फोनवरच्या नकाशात शोधून ठेवायचं, त्या ठिकाणी पोचलं की हॉटेल चेक-इन करून आय-साईटपर्यंत शक्यतो चालतच जायचं, हे आमचं ठरून गेलेलं होतं. (आम्ही निवडलेल्या सर्व हॉटेल्सची चेक-इनची वेळ दुपारची असल्यामुळे हे शक्यही व्हायचं.) चालत जाण्याचा मोठा फायदा म्हणजे हॉटेलच्या आसपासचा परिसर आपोआप बघून व्हायचा; खादाडीची ठिकाणं कळायची; स्थानिक बसस्टॉप्स वगैरे दिसायचे; त्या-त्या ठिकाणच्या गारठ्याचा, वार्‍याचा अंदाज यायचा; (एकंदर न्यूझीलंडमध्ये सगळीकडेच बेक्कार वारा होता! एकवेळ थंडी परवडली, पण तो बोचरा वारा नको असं व्हायचं.) थोडक्यात, त्या जागेचा एकूण ‘फील’ यायचा. तर तसंच, हॉकिटिकाच्या आय-साईटमध्ये गेलो होतो. तीन दिवसांच्या मुक्कामात निवांतपणे काय काय करता येईल ते पाहत होतो; आणि तिथली क्लार्क मुलगी आम्हाला विचारत होती - “What made you stay here for 3 days??” त्यावर तिला ‘मेरीऽ मर्रऽऽजी’ असं उत्तर देण्याचा मोह होत होता. चूक तिचीही नव्हती. कारण बहुतेक पर्यटक हॉकिटिका नाहीतर ग्रेमाऊथमध्ये एखादा दिवस थांबून पुढे ‘Franz Josef’ या स्की-रिसॉर्टला, तिथली Fox Glacier बघायला जातात. (ग्रेमाऊथ रेल्वे स्टेशनवरून आम्ही फ्रान्झ जोसेफचीच बस पकडली होती; आणि हॉकिटिकाला बसमधून उतरणारे आम्ही दोघंच होतो.) फ्रान्झ जोसेफचा प्रवास ४ तासांचा, वळणावळणाचा; त्यामुळे आम्ही अगदी नाईलाजास्तव त्यावरही फुली मारली होती. हे सगळं तिला कुठे सांगत बसणार! त्यामुळे आम्ही ‘We just love beaches, you know...’ असं म्हणून तिला स्की-रिसॉर्टवरून बीचवर आणून सोडलं. मग तिनंही त्याचा नाद सोडून दिला आणि पाहियाच्या ख्रिससारखंच आम्हाला हवं होतं ते सगळं ५-१० मिनिटांत मार्गी लावून दिलं. मुख्य म्हणजे, हॉकिटिकातल्या त्या गप्पीष्ट काकूंशी दुसर्‍या दिवशी आमची गाठ घालून दिली. त्यांनीच आम्हाला तिथल्या आसपासच्या परिसराची सैर घडवून आणली. एकीकडे हॉटेललगतचा शांत समुद्रकिनारा होताच अधूनमधून डोकावायला.

या सगळ्यात मध्येच कधीतरी ती glow worm dell बघायची होती. मध्येच कधीतरी म्हणजे रात्रीच्या अंधारातच. पण ती जागा समोरच होती; मग काय, कधीही जाऊ शकतो, असं करता करता २ दिवस संपले. वायटॉमोची cave आणि ही dell, दोन्हींत काय फरक, असा प्रश्न पडला होता. Cave म्हणजे गुहा, हे माहिती होतं. Dell म्हणजे झाडा-वेलींनी बंदिस्त झालेली जागा, असं गूगलनं सांगितलं. हा अर्थ समजल्यावर पहिला मध्यमवर्गीय विचार काय आला, तर रात्रीच्या अंधारात थेट तिथे शिरण्यापूर्वी दिवसाउजेडी ती जागा एकदा बघून घेऊ. आणि हॉकिटिकातून निघायच्या आदल्या दिवशी संध्याकाळी आम्ही तिकडे वळलो.

हायवेच्या अलीकडे आमचं हॉटेल, आणि पलीकडे ती झाडांची गुहा. हायवेवरून गाड्या रोरावत धावत होत्या. न्यूझीलंडमध्ये आल्यापासून जिथे जिथे रस्ता ओलांडायची वेळ आली होती तिथे ईमानेइतबारे सिग्नल शोधून, तिथल्या खांबावरचं बटण दाबून, रस्ता ओलांडण्यासाठीचा कर्णकर्कश आवाज सुरू झाला की, आणि संपायच्या आत, रस्ता ओलांडला होता. तो आवाज नसताना रस्ता ओलांडायची ही पहिलीच वेळ होती. तेवढी २-४ मिनिटं उगाच बरं वाटलं; आपल्या देशात असल्यासारखं. बाकी, तिथेही आपल्यासारखा राईट हॅण्ड ड्राईव्हचाच नियम आहे, त्यामुळे ट्रॅफिकमध्ये वेगळं काही वाटत नाही... शिस्त सोडल्यास! असं ट्रॅफिकमध्ये काही वेगळं न वाटण्याचा एक माफक (आणि मौखिक) प्रसाद आम्हाला पाहियात मिळाला होता. तिथे एक दिवस सकाळी हॉटेलमधून बाहेर पडून रस्त्याला लागलो होतो. तो हायवे नव्हता, तरी अशाच गाड्या रोरावत धावत होत्या. नेहमीच्या सवयीने रस्त्याच्या उजव्या बाजूने चालत होतो, म्हणजे समोरून येणाऱ्या गाड्या दिसतात. तर, एका वळणावर समोरून एक सुसाट गाडी आली. आम्हाला उजव्या बाजूने चालताना पाहून तो गाडीवाला बुवा सपशेल हैराण झाला. मात्र गाडीचा वेग अजिबात कमी न करता तो खिडकीतून हात बाहेर काढून, डोळे मोठे करून ‘टीss दी आद साss’ असं काहीतरी ओरडत दिसेनासा झाला. ते किवी उच्चारांतलं ‘Take the other side…’ होतं हे आम्हाला त्यानंतर उमगलं. मग लक्षात आलं, की त्या रस्त्याला फक्त डाव्या बाजूलाच फूटपाथ होता आणि तो बुवा आम्हाला तिथून चालायला सांगत होता. त्याचा चेहरा पाहता त्यापुढे त्यानं आम्हाला २-४ शिव्या हाणल्या असल्याचीही दाट शक्यता होती; पण त्याच्या गाडीचा वेग इतका होता, की त्या शिव्या पुढे भलत्याच कुणावर तरी जाऊन धडकल्या असणार. त्यानंतर रस्त्यावर पाऊल टाकलं, की आधी फूटपाथच्या शोधार्थ नजर भिरभिरायची. तर, इतके ते शिस्तशीर आणि नियमबद्ध रस्ते...

हॉकिटिकातला तो हायवेही तसाच. पण हायवे असला आणि शिस्तशीर असला तरी तो सिंगल लेनचाच होता; पळत तो ओलांडला, आणि त्या Dell च्या तोंडाशी गेलो. एक बारीकशी पायवाट आत जात होती. आत गर्द झाडीने वेढलेली जराशी गोलाकार छोटीशी बंदिस्त जागा होती. पायवाटेच्या दोन्ही बाजूंना छोटं रेलिंग लावलेलं होतं. मान पूर्ण वर केली तरच आकाश दिसत होतं. जरावेळ तिथे नुसतेच उभे राहिलो… चहूबाजूंनी गर्द झाडं, झुडुपं… ते ग्लो-वर्म्स इथे नेमके कुठे असतील, रात्रीच्या अंधारात इतक्या झाडीत आपल्याला दिसतील का, कालच यायला हवं होतं का, म्हणजे जरा सराव होऊन आज परत व्यवस्थित पाहता आले असते का, आज रात्री नाही दिसले तर काय, उद्या सकाळी इथून निघायचंय, रोटोरुआला न जाऊन चूक तर नाही ना केली… या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्हाला आणखी ३-४ तासांनी मिळणार होती...
रात्री जेवण उरकून, सामानाची बांधाबांध करून ठेवून दहा-साडे दहाला परत बाहेर पडलो. हायवेवर काळोख, गाड्या तशाच रोरावत धावत होत्या. Dell च्या दिशेनं एक-दोघं रस्ता ओलांडून हॉटेलच्या आवारात शिरताना दिसले. न राहवून त्यांना विचारलं- Could you see the glow worms? त्वरित प्रतिसाद आला - Yep, they’re there, just fantastic! आणि संध्याकाळच्या सर्व प्रश्नांची उत्तरं एका दमात मिळाली.

उत्साहात रस्ता ओलांडून तिथे गेलो. तिथे २-३ गाड्या पार्क केलेल्या दिसत होत्या. काहीजण आत जाताना दिसत होते, काही आतून बाहेर येत होते. एकूण तेव्हा तिथे १५-२० जण तरी होते. त्यात ४-५ तरुण मुलींचा एक ग्रुपही होता. आमच्या पाठोपाठ आत शिरताना त्यातल्या एकीनं आतल्या दिशेला बोट दाखवत मला विचारलं ‘glow worm?’ मी हसून मान डोलावली. मी त्या क्षणी ग्लो-वर्म्सपेक्षा त्या मुलींचाच विचार करत होते. त्या इतक्या रात्री निर्धोकपणे भटकू शकत होत्या त्याचा मला फार म्हणजे फार हेवा वाटत होता.

पायवाटेनं आत शिरलो. संध्याकाळी येऊन गेलो होतो, तरी अंधारात पुढे पाऊल टाकताना बिचकायला होत होतं. आसपास माणसं असल्याचं फक्त जाणवत होतं. पण इकडे तिकडे पाहिलं की नुसता काळा अंधार, बाकी काहीच नाही… साधारण निम्मं अंतर आत आल्याचा अंदाज घेऊन एका जागी थांबलो. ग्लो वर्म्स जवळ जाऊन पाहिले तर दिसतात, की लांबून पाहायला हवेत; त्यांच्या ‘ग्लो’चा आकार केवढा असतो, म्हणजे आपल्या काजव्यांएवढे असतात, की त्याहून लहान, की मोठे… बरेच प्रश्न पडले होते. अंधारात काय शोधायचं हे माहित होतं; पण काय दिसणार आहे हे माहित नव्हतं! अंधाराला नजर सरावायला हवी आहे हे कळत होतं, पण वळत नव्हतं… फार गंमतीशीर २-४ मिनिटं होती ती… अंधारात डोळे फाडफाडून नुसतं इकडे तिकडे बघत होतो… आणि एका क्षणी तो अंधार ठिकठिकाणी चमचमायला लागला! आपल्या काजव्यांहूनही अगदी चिंटूकले, मंद निळसर दिवे, तिथे जिकडे तिकडे सगळीकडे होते! ज्या क्षणी डोळ्यांना ते दिसायला लागले तो क्षण अजूनही मला आठवतोय. कमाल transition होतं ते! आपण संध्याकाळी आलो तेव्हाही हे दिवे इथेच होते; गेली २-४ मिनिटंही असेच होते, फक्त आपल्याला दिसत नव्हते; या विचाराने भारी वाटलं. एकाच जागी काय उभं राहायचं, म्हणून जरा पुढे गेलो, गोल फिरलो, पुढे, मागे, सगळीकडे निळसर चिमुकले डॉट्स; ते दृश्य असलं अफाट होतं की कार्टून्ससारखं माझ्या डोळ्यांतही निळसर ठिपके उमटायच्या बेतात होते. वास्तविक ते वर्म्स त्यांच्या भक्ष्याला आकर्षून घेण्यासाठी चमकत असतात. आपले काजवे त्यांच्याहून बरेच प्रखर म्हणायला हवेत. काजवे इकडेतिकडे उडतात; हे वर्म्स एका जागी स्थिर असतात; खडकांना नाहीतर झाडांच्या फांद्यांना लटकतात. आम्ही त्यांचे फोटो काढण्याचे १-२ निष्फळ प्रयत्न केले आणि सोडून दिले. १५-२० मिनिटं डोळे भरून ते दृश्य पाहिलं आणि तिथून निघालो. बाहेर Dell च्या तोंडाशी एका फलकावर त्या ग्लो-वर्म्सची वैज्ञानिक माहिती दिलेली होती. माहिती वाचण्यासाठी तिथे व्यवस्थित दिवा वगैरेही होता. पण आम्ही तिथे थांबलो नाही; ती माहिती काय नंतर नेटवरही वाचता आली असती; त्या क्षणी आतल्या अंधारात जे पाहून आलो होतो तेच डोळ्यांसमोर असू दे असं वाटत होतं...

टाईमलाईननुसार, Unique to New Zealand च्या आमच्या ‘इजा-बिजा-तिजा’तला हा तिजा होता; पण अनुभव म्हणून पहिल्या नंबरचा!

----------

Cut to ६ दिवस आधी, वेलिंग्टन...

हॉटेलपासून चालत १० मिनिटांच्या अंतरावरच्या आय-साईटमध्ये शिरलो होतो, ‘झीलँडिया’ची चौकशी करायला. TripAdvisor नं आम्हाला या ‘झीलँडिया’च्या दिशेला अक्षरशः ढकललं होतं. ती जागा इथून किती लांब आहे, तिथे जायला बस बरी पडेल की टॅक्सी, वगैरे आमच्या नेहमीच्या प्रश्नांना हसतमुख उत्तर मिळालं - ‘You’ll get a free ride there; the bus leaves from there, every morning at 9:00...’ यातलं पहिलं ‘there’ झीलँडियासाठी होतं, आणि दुसरं, आम्ही उभे होतो तिथून १०-२० पावलांवरच्या बस-स्टॉपसाठी. आमचा दुसर्‍या दिवसाचा to & fro प्रश्नच एका क्षणात मिटला होता.

आय-साईटकडून ‘वेळेच्या आधी १५ मिनिटं हजर रहा’ अशी प्रेमळ सूचनाही मिळालेली होती. त्यामुळे दुसर्‍या दिवशी सकाळी पावणे नऊला दुसर्‍या ‘there’पाशी जाऊन उभे राहिलो. त्यादिवशी रविवार होता; वाटलं होतं, तिथे आणखी काहीजण नक्की असतील. पण कुणीच नव्हतं. रविवारमुळेच कदाचित रस्ते अगदी सामसूम होते; मुंबईतल्या फोर्टच्या एखाद्या गल्लीत उभं असल्यासारखा भास होत होता. तशाच दगडी इमारती, खिडक्यांना कमानी, वगैरे. क्वचित एखादी गाडी जाताना दिसत होती; क्वचित कुणीतरी पायी चालत जाताना दिसत होतं; हवेत चांगलाच गारठा होता; बोचरा वारा होता; आणि त्या free-ride चा पत्ता नव्हता. थंडीत अंमळ कुडकुडतच उभे होतो. नक्की इथेच यायचं होतं ना, बस दुसरीकडून कुठूनतरी निघून गेली नसेल ना, वगैरेही करून झालं. पण तिथल्या बस-स्टॉपसारख्या खांबावर ‘Zealandia Pickup’ असं स्वच्छ लिहिलेलं होतं. त्यामुळे ती जागा सोडायची नाही असं ठरवलं होतं. अजूनही स्टॉपवर, त्या फूटपाथवर, त्या रस्त्यावर आमच्याशिवाय कुणीच नव्हतं. शेवटी सव्वा-नऊला एक मोठी पिक-अप व्हॅन अवतरली. व्हॅनवर बाहेर झीलँडियाचा लोगो दिसला. ‘फ्री’ पिक-अपच्या मानाने गाडी एकदमच टकाटक निघाली. ड्रायव्हर तसा ‘अंकल कॅटेगरी’तला वाटला; भरघोस दाढी, मिश्या; आडदांड शरीर; त्यानं आतून दार उघडलं आणि आम्ही गाडीत पाय ठेवायच्या आधीच उशीर झाल्याबद्दल खणखणीत आवाजात आमची माफी मागितली. आमचा पुढचा पाय पुढे, मागचा मागे राहिला. ‘काय काका, लगेच सॉरी वगैरे कशाला? रविवारचं चालायचंच जरा इकडे-तिकडे...’ यातलं काहीही बोलून उपयोग नव्हता; कारण काकांना १५ मिनिटांच्या उशीरानं अगदी मेल्याहून मेल्यासारखं झाल्याचं त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होतं. गाडी निघाली; काकांनी उशीराचं स्पष्टीकरण द्यायला सुरूवात केली - गाडी सकाळी सुरू होईना, काहीतरी प्रॉब्लेम झाला होता; वगैरे वगैरे. जरा वेळानं त्यांना जाग आली, की झीलँडियाची प्राथमिक माहिती यांना सांगायला हवी. गाडीत पर्यटक असे आम्ही दोघंच होतो. तरी त्यांनी गगनभेदी आवाजात बोलायला सुरूवात केली -
नव्वदच्या दशकात वेलिंग्टनमधल्या जिम लिंच नामक निसर्गसंवर्धकाच्या डोक्यात एक कल्पना आली, की शहराच्या मध्यात अशी एक जागा तयार करावी जी न्यूझीलंडच्या स्थानिक प्राण्या-पक्ष्यांसाठी असेल. मात्र त्याला तिथे प्राणीसंग्रहालय करायचं नव्हतं. नैसर्गिक अधिवास हवा होता. ४-५ वर्षं त्यानं चिकाटीनं याचा पाठपुरावा केला; एका विस्तृत जंगलसदृश विभागाला कुंपण घालण्यात यश मिळवलं; आणि न्यूझीलंडमधून अस्तंगत होऊ घातलेल्या पक्ष्यांच्या, पाली-सरड्यांच्या काही जातींना जाणीवपूर्वक तिथे आणून सोडलं. आज त्या बर्‍याच काहीशे एकरांवर एक अप्रतिम, नैसर्गिक जंगल तयार झालं आहे. सुरूवातीला त्याचं नाव काहीतरी वेगळं होतं; “आता त्याला ‘झीलँडिया - प्राईड ऑफ वेलिंग्टन’ म्हणतात.” काकांनी एका झोकदार वळणावर शेवटचं वाक्य इतक्या प्राईडनं उच्चारलं, की स्वतः जिम लिंचही तितक्या अभिमानानं कधी बोलला नसेल.

१५-२० मिनिटांत झीलँडियापाशी पोहोचलो. ड्रायव्हर काकांचं बोलणं ऐकण्याच्या नादात गाडीच्या खिडकीतून वेलिंग्टनमधली मजा बघायची मात्र राहिली.

zealandia-1.jpg
...

zealandia-2.jpg

तिकीट काढून आत शिरलो. तिथेही फिरण्याचे काही पर्याय होते - २ तास, ४ तास, गायडेड टूर, इ. आम्ही ४ तासांचा पर्याय निवडला. एकतर, त्यादिवशी आम्ही दुसरं काहीही करणार नव्हतो; आणि दुसरं, काकांनी आम्हाला परतीची वेळ दुपारची तीनची सांगितली होती. त्यामुळे हाताशी भरपूर वेळ होता.
तिकीट देणार्‍या मुलीनं तिकिटासोबत झीलँडियाची माहिती देणारं एक फोल्डर हातात कोंबलं. तसंच एक फोल्डर ड्रायव्हर काकांनीही दिलं होतं. (न्यूझीलंडमधून निघेपर्यंत अशी इतकी फोल्डर्स, बुकलेट्स आणि नकाशे जवळ साठले, की परतल्यावर त्या जोरावर Travel to NewZealand चं माहितीकेंद्रही उघडता आलं असतं.)

तिकीटं घेऊन पुढे झालो, तर झीलँडिया स्टाफपैकी एक मावशी येणार्‍या पर्यटकांना प्राथमिक माहिती देत होत्या. Rather, ती माहिती ऐकल्याशिवाय त्या कुणाला पुढेच जाऊ देत नव्हत्या असं दिसलं. मग काय, आमच्या पुढचा ग्रूप पुढे सरकेपर्यंत निमूटपणे थांबलो. त्या मावशी तसं का करत होत्या हे थोड्याच वेळात समजलं. झीलँडिया जंगलात शिकारी प्राणी किंवा पक्ष्यांची अंडी खाणारे साप-उंदीर इत्यादी प्राणी अजिबात नाहीत. म्हणजे ते जंगल जाणीवपूर्वक अशा प्राण्यांपासून मुक्त ठेवलं गेलं आहे. तर, त्या मावशी तिथे येणार्‍या प्रत्येकाकडची बॅग, पर्स, पिशवी जे काही असेल ते स्वतः जातीने तपासत होत्या. कुणाच्या बॅगेत घरचे पाळलेले उंदीर किंवा साप नाहीत ना, हे पाहत होत्या. ‘घरनं कुणी साप-उंदीर कशाला बरोबर आणेल?’ ही माझ्या मनातली शंका मावशींना स्पष्ट ऐकू गेली बहुतेक. कारण त्या चेहर्‍यावरचं स्मितहास्य तसंच ठेवत पण जरा यांत्रिकपणे ‘Believe me, people bring along such pets... What if a rat jumps out... we just can’t afford it here’ असं म्हणाल्या. बोलता बोलता आमच्या सॅकमध्ये पार आतपर्यंत हात कोंबून आतल्या वस्तू उलट्यापालट्या करून, मग सॅक बाहेरून चाचपून, दाबून बघून त्यांनी मनाचं समाधान करून घेतलं आणि आम्हाला पुढे जाऊ दिलं. पुढे बराच वेळ ‘बॅगेत उंदीर’ या नुसत्या कल्पनेनंच मला कसंसं होत होतं. पण ती कसंसं करणारी कल्पना बाजूला सारून झीलँडियानं कधी मनाचा ताबा घेतला ते कळलंच नाही.

पुढचे ४ तास आमच्या अवतिभोवती घनदाट जंगल आणि चहूबाजूंनी विविध पक्ष्यांचं अखंड मंजूळ कूजन, इतकंच होतं! वाहनांचे आवाज नाहीत, माणसांचा गोंगाट नाही; ढगाळ हवा, वेलिंग्टन-स्पेशल बोचरा गारठा, हिरवी शांतता, व्यवस्थित आणि भरपूर दिशादर्शक असणारे विविध मार्ग... पायांची साथ असेल तितकं आपण नुसतं भटकायचं; अधेमध्ये जरावेळ टेकायला बाक दिसत होते; पक्ष्यांची माहिती देणारे फलक होते; मात्र त्या माहितीचा मारा केलेला नव्हता.

zealandia-3.jpg
...
zealandia-4.jpg

पायवाटांवर बर्‍याच ठिकाणी जाड वाळू टाकलेली होती. त्यातून चालणार्‍या पावलांचे आवाज आणि विविध दिशांनी विविध पक्ष्यांचे आवाज... बहुतेक सगळे पक्ष्यांचे आवाज अनोळखीच; पण अगदी वेगळे आणि लक्षात राहणारे. बहुतेक सगळे पक्षी केवळ जगाच्या त्या भागात आढळणारे; काही तर केवळ न्यूझीलंडमध्येच असणारे - किया, टुई, पुकुपुकू; ही नावं लक्षात राहिली कारण त्यांचं कूजन फार वेगळंच आणि सुंदर होतं. पाहियापासून ते आवाज ऐकत आलो होतो; त्यांच्या विशिष्ट धाटणीमुळे ते कानांनी अगदी लक्षात ठेवले होते. ते केवळ याच देशात आढळणारे पक्षी आहेत हे झीलँडियात फिरताना समजलं आणि काहीतरी अडव्हेंचरस केल्यासारखी कॉलर ताठ करून घ्यावीशी वाटली. कानांचा वेध घेणारं एखादं कूजन ऐकू आलं की पावलं आपोआप थबकायची; वाळूतल्या पावलांचाही आवाज थांबावा आणि फक्त त्या पक्ष्याचा आवाज ऐकत उभं राहावं असं वाटायचं.

ठिकठिकाणी पक्ष्यांसाठी खास घरटी, फीडर्स ठेवलेले होते. तिथे आसपासचे पक्षी माणसांना न बुजता अगदी समोर, शेजारी येऊन बसत होते. ‘पक्ष्यांना खायला घालू नये’च्या सूचना सगळीकडे होत्या; सगळीकडे त्या पाळल्या जात होत्या. एखादा पक्षी अगदी समोर येऊन बसला, की त्याला निरखावं, की डोळे मिटून फक्त त्याचा आवाज ऐकावा, की त्याचे फोटो काढावेत, असा प्रश्न पडत होता. पैकी फोटो काढण्याचा विचार सोडून देणे हे सर्वात सोपं होतं. ते आम्ही केलं. पक्ष्यांची एक से एक कूजनं कानांनी पीत, मनात साठवत जंगलात भटकत राहिलो.

वाटेवर अनेक लहान-मोठी तळी होती. प्रत्येक तळ्याची काहीतरी कथा होती. कथा म्हणजे पुराणकथा अशा अर्थानं नव्हे, तर संवर्धनाची गोष्ट अशा अर्थानं. अमूक तळ्याचं पाणी सजीवसृष्टीसाठी घातक बनलं होतं, मग शास्त्रज्ञांनी त्या पाण्यावर हे-हे प्रयोग केले, त्या पाण्यात अमूक प्रकारचं शैवाल चांगलं निपजलं, मग त्यावर गुजराण करणारे किडे तिथे आले, त्या किड्यांमागोमाग अमूक पक्षी आले... एवढं वाचलं की आपसूक नजर समोरच्या पाण्याकडे वळायची आणि तिथे ते पक्षी बसलेले दिसायचे. आधी आपलं त्यांच्याकडे लक्ष कसं गेलं नाही या विचारानं नवल करत आपण त्यांना निरखायचं आणि पुढे व्हायचं; हे सगळं आपोआप घडत होतं. तळ्यांच्या कथा तशा तिथे फलकांवर लिहिताना त्या लोकांना हे अपेक्षित होतं की नाही माहिती नाही; पण त्यामुळे मजा येत होती.

पुढची ५०० वर्षं ते जंगल तसंच ठेवायचं असं जिम लिंच अँड कंपनीनं ठरवलं आहे, म्हणे! त्या ५०० वर्षांपैकी एका कणभर टाईम-स्लाईसमध्ये त्या जंगलाला आपले पाय लागले; ‘संवर्धन’ म्हणजे काय त्याचा किलबिलता डेमो आपण पाहू शकलो; या विचारानं ‘पंख बिना उडूं..ऽऽ’ झालं. TripAdvisorचं ऐकलं म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून घ्यावीशी वाटली. हाँगकाँग-ऑकलंड विमानात शेजारच्या बाईनं अगदी आवर्जून सांगितलं होतं, की मोठ्या शहरांच्या बाहेरचा न्यूझीलंड बघा; शहरांमध्ये वेळ घालवू नका. हे खरंच; पण मी त्यात भर घालून म्हणेन, झीलँडियासारख्या अपवादांकडेही लक्ष ठेवा.

तर, टाईमलाईननुसार, Unique to New Zealand च्या आमच्या ‘इजा-बिजा-तिजा’तला हा इजा होता; पण अशी काही यादी आपल्या खाती जमा होणार आहे हे तेव्हा मनात रजिस्टर व्हायचं होतं...
ते झालं पुढे २ दिवसांनी, ख्राईस्टचर्चमध्ये.

Cut to Akaroa, ख्राईस्टचर्चपासून दोन-अडीच तासांचा निसर्गसुंदर बसप्रवास करून आम्ही आता क्रूझमधून निघालो होतो, ‘हेक्टर डॉल्फिन्स’ पाहायला.

akaroa-1.jpg

आमच्या दोन्ही बाजूंना लांबवर उंचच्या उंच खडक; समोर दूरवर दोन्ही बाजूंनी विंचवाच्या नांगीच्या टोकासारखे एकमेकांच्या दिशेला येऊन थांबलेले होते. दोन्हींच्या मधल्या साधारण २ किमीच्या ‘फटीतून’ दक्षिण पॅसिफिक समुद्राचं पाणी आत शिरलेलं. काय सुरेख पाणी दिसत होतं ते... निळ्या-हिरव्या रंगाचं! बोटवाला आसपासची भौगोलिक माहिती सांगत होता. मध्येच एकदा त्यानं डाव्या बाजूला अगदी खडकापाशी बोट नेऊन जरावेळ थांबवली. आम्ही लगेच बोटीच्या काठाशी उभे राहून खाली पाण्यात, किनार्‍यावर बघायला लागलो. वाटलं, आपला हेक्टर डॉल्फिन्सचा स्टॉप आला की काय. पण बोटवाला खाली नव्हे तर वर पाहायला सांगत होता. अक्षरशः अंगावर येणारा तो अजस्त्र खडक म्हणजे कैक वर्षांपूर्वी साचलेला लाव्हारस होता. ज्वालामुखीच्या अनेक उद्रेकांमुळे त्याचे एकावर एक असे ३-४ तरी जाड थर साचलेले होते. त्या थरांच्या मधल्या सीमारेषा अगदी स्पष्ट दिसत होत्या.

akaroa-2.jpg
...

akaroa-3.jpg

दोन थरांच्या वयातलं अंतर किती असेल कोण जाणे; एकूण ती रचना तयार होऊनच लाखो वर्षं झालेली; पण सर्वात वरचा थर सर्वात तरूण आणि अगदी खालचा सर्वात म्हातारा, म्हणून दोन्हींत पटकन काही फरक करता येतो का असं पाहायचा प्रयत्न केला; पण जमलं नाही. हलणारी बोट, असह्य बोचरा वारा, ही कारणंही होतीच.
आम्ही त्या २ किमी फटीच्या जसजसे जवळ जात होतो, तसतसा वार्‍याचा वेग अचाट होत होता. हा पॅसिफिक समुद्रातला ‘roaring forties’चा प्रदेश आहे हे बोटवाल्याकडून कळलं आणि वार्‍याने त्रासलेल्या आमच्या चेहर्‍यांचा अचानक ट्रान्सफर-सीन झाला.
बोटीत एक पामेरियन-टाईप दिसणारं कुत्र्याचं पिल्लू होतं. बोटीवरच्या कर्मचार्‍यांसारखाच एक गणवेश त्या पिल्लालाही घातलेला होता. म्हटलं, जरा अतीच लाड त्या पिल्लाचे. पण तसं नव्हतं. ते पिल्लू म्हणजेही ‘क्रू’चा एक भागच होतं. कसं? कारण डॉल्फिन्स जवळ आले की त्यांचं आपांपसांतलं कम्युनिकेशन या पिल्लालाही समजणार होतं. बोटवाल्याच्या म्हणण्यानुसार ते पिल्लूच आपल्याला डॉल्फिन्स कुठे असतील ते सांगणार होतं. आणि तसंच झालं. इतका वेळ उगीच इकडे तिकडे करणार्‍या त्या पिल्लाचे कान अचानक ताठ झाले. अचानक कुठल्यातरी कामगिरीवर निघाल्यासारखं ते हुशारीनं कशाचा तरी वेध घ्यायला लागलं; बोटवाल्यानं आधी सांगून ठेवलेलंच होतं, पाण्यात डॉल्फिन्स शोधू नका; त्यापेक्षा पिल्लाकडे लक्ष ठेवा. बघताबघता ते पिल्लू वाघ मागे लागल्यासारखं सुसाट वेगाने बोटीवर इकडे तिकडे धावाधाव करायला लागलं. आणि थोड्याच वेळात एकेक करत ते डॉल्फिन्स आमच्या बोटीच्या आसपास दिसायला लागले. आधी एकेकटे आणि मग जत्थ्याने. फिक्या करड्या रंगाचे, तुकतुकीत कांतीचे, बोटीहून अधिक वेगाने पाण्यात पोहत होते; डॉल्फिन-स्पेशल गोलाकार उडी मारत होते.

कैर्‍या आणि बाळकैर्‍या यांच्या आकारात जितका फरक तितकाच आपल्या माहितीचे मोठे डॉल्फिन्स आणि हेक्टर डॉल्फिन्स यांच्यातला फरक. हे चिमुकले आकाराचे डॉल्फिन्स जगभरात केवळ न्यूझीलंडमधल्या अकारोआच्या पाण्यातच दिसतात. इतके छोटेसे, गोंडस ते मासे; त्यांना असा uniqueness जपण्याची खरं म्हणजे काही गरज नव्हती. जगभरात ते जिथे जिथे गेले असते तिथे सगळीकडे त्यांच्यावर spotlight पडलाच असता; पण तरी त्यांचं आपलं अकारोआ एके अकारोआ! त्यांच्यासाठी आमच्यासारख्यांना जीव मुठीत धरून दोन-अडीच तासांचा बसप्रवास करायला TripAdvisor नं भाग पाडलं होतं...

यानंतर तीनच दिवसांनी आम्ही हॉकिटिकातले ग्लो-वर्म्स पाहणार होतो; बाकी कशाच्याही आधी TripAdvisor ला ‘5-star rating’ देणार होतो. गंमत म्हणजे आम्ही पाहिलेल्या या तीन Unique to NewZealand गोष्टींपैकी एकाचेही धड फोटो आम्हाला काढता आले नाहीत. पण त्या गोष्टी होत्याही तशाच; हौशी फोटोग्राफर्सना सहजी कॅमेरात पकडता न येणार्‍या...

----------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा लेख पण छान आहे. आवड ले. ट्रिप अ‍ॅडवायझर ची मी पण फॅन आहे. खाते बनवले की हवी तशी टूर बनवता येते. हॉटेल सर्च पण मला महत्वाचा वा टतो. मला सिंगापूर मध्ये जिथे जनरल भारतीय राहतात तिथे अजिबात राहायचे नव्हते. मुस्तफा मार्केट वगैरे च्या शेजारी, किश नर रोड वर पार्क रॉयल आहे तिथे वगैरे. मी एक मस्त ऑर्चर्ड रोड च्या वॉकिन्ग डिस्टन्स मधले हॉटेल शोधले ते तेथिल हेरिटेज साइटच्या मध्येच होते. व सर्वत्र जाणे येणे अगदी सोयीचे. टूर वाले किंवा एजंट तुम्हाला त्यांच्या सोयीचे भ्रमण व जेवण करवतात. तसे करायचे नाही. ट्रिप अ‍ॅडवायझर वरून स्वतः टूर चांगली आखता येते.

वा !एकदम वेगळीच युनिक आहेत तिन्ही ठिकाणे!! ग्लो वर्म्स्बद्दल वाचून आमचा पोर्टो रिको मधे बायोल्युमिनिसन्ट बॅक्टेरिया चा ग्लो बघायला भयंकर अंधारात खाडीमधे कयाकिंग करत धडपडत गेल्याचा अनुभव आठ्वला Happy

ह्या भागाची वाट पाहत पाहत होतो. छान चाललीय सहल. क्रू मधल्या कुत्र्याच्या पिल्लाची डॉल्फीनशी दोस्ती खास आवडली.

पु भा प्र.

मस्त मस्त! हा ही लेख आवडला.

आम्ही ते वर्म्स वायटामोलाच पाहिले. मस्त अनुभव होता तो. खूप घाईत वगैरे केल्यासारखे वाटले नाही.

तुम्ही स्वतः गाडी तेथे चालवली नसेल आणि बसचा ही प्रवास जर कमी केलात तर तुम्ही तेथे फिरलात तरी कसे याची उत्सुकता आहे Happy कारण आम्ही पूर्ण पब्लिक ट्रान्स्पोर्ट ने फिरलो आणि एक दोन ठिकाणी त्यामुळे थोड्या मर्यादा आल्या होत्या.

मिलफोर्ड साउण्ड किंवा त्यासारखेच काही पाहिलेत का? "त्यासारखे काही" असलेच तर तेथेच जवळपास असू शकेल Happy

फारएण्ड,
आम्हीही पब्लिक ट्रान्सपोर्टनेच फिरलो; थोडक्यात, बसचा प्रवास आम्ही फार काही टाळू शकलो नाही. Sad

सर्व प्रकारच्या प.ट्रा.ने फिरायचं असं निघायच्या आधीच ठरवलं होतं. बस, ट्रेन, टॅक्सी, विमान सगळं वापरलं.
नॉर्थ - साऊथ आयलंडदरम्यानचा बोट-प्रवासही करायची इच्छा होती. वेलिंग्टन-पिक्टन-नेल्सन-काहुरांगी नॅशनल पार्क असा महत्त्वाकांक्षी रूटही आखला होता. पण बोट प्रवास जेमतेम अर्ध्या-एक तासाचा आणि पुढे नॅशनल पार्कपर्यंत बरंच अंतर बसनेच जावं लागणार असं दिसल्यावर तो नाद सोडून दिला. त्यात वेळही बराच गेला असता.

मिलफोर्ड साऊण्डला गेलो ना... तिथेही मोठा बस प्रवास झालाच.