न्यूझीलंड-३ : हा खेळ मिनरल्सचा!

Submitted by ललिता-प्रीति on 23 June, 2018 - 00:18

न्यूझीलंड-१ : माओरी! माओरी!!

न्यूझीलंड-२ : Unique to NewZealand... हे फक्त इथेच!

----------

भूगर्भीय हालचाली म्हटलं की एकतर वज्रेश्वरी-गणेशपुरीची गरम पाण्याची कुंडं आठवतात; किंवा मग थेट कुठलातरी (प्रत्यक्ष न पाहिलेला) जागृत ज्वालामुखी. मध्यंतरी इंडोनेशियातल्या एका जागृत ज्वालामुखीच्या पर्यटनावरचा एक लेख वाचनात आला होता. तो वाचून ते ठिकाण तेव्हाच माझ्या विशलिस्टमध्ये आलेलं होतं. गरम पाण्याची कुंडं लहानपणी पाहिलेलीच होती. त्यामुळे एकदा इंडोनिशियाला एक फेरी केली, म्हणजे चारधामच्या चालीवर भूगर्भीय हालचालींचं द्विधाम पूर्ण झालं असं समजायला हरकत नाही असं मनोमन ठरवून टाकलेलं होतं. पण मग न्यूझीलंडच्या रोटोरुआनं खांद्यावर टॅप करून ‘शुक...शुक’ केलं, आणि सांगितलं, ‘हमारे जैसे भी खडे हैं राहों में...’

रोटोरुआच्या एअरपोर्टवर विमानातून बाहेर पाऊल टाकलं आणि एक वेगळाच वास नाकात शिरला. म्हटलं तर त्याची नोंद घेतली गेली; म्हटलं तर नाही. १०-१५ वर्षं गुजराथच्या अत्यंत प्रदूषित औद्योगिक पट्ट्यात राहिल्यानं अशा वेगळ्या वासाची नाकाला इतकी सवय झाली आहे, की तो वास आल्यावर आधी गुजराथचीच आठवण आली. गुजराथइतका तो वास तीव्र नसल्यानं त्याकडे लगेच दुर्लक्षही झालं.
हॉटेल चेक-इन, आय-साईट, गारठा, बोचरा वारा सगळं झालं. आय-साईटजवळच्या मोठ्या तळ्याच्या काठी (Rotorua Lake) निवांत अर्धा-पाऊण तास फिरलो. आमचं हॉटेल तसं ‘रिहाईशी इलाक्या’तच होतं. आसपास टुमदार बैठी घरं, छोट्या आखीवरेखीव गल्ल्या; बहुतेक घरांच्या परसदाराच्या नाहीतर पार्किंगच्या एका कोपर्‍यात एक-एक उंच, बारीक पाईप उभा केलेला दिसत होता. त्यातून मंदशी वाफ बाहेर पडताना दिसत होती. वाटलं, त्यांची एक्झॉस्टची नाहीतर सेंट्रल हीटिंगची काहीतरी पारंपरिक पद्धत असावी.

निघण्यापूर्वी आम्ही रोटोरुआच्या रकान्यात एकूण ३ गोष्टी टाकल्या होत्या. माओरी शो आणि डिनर, ते पुईया (Te Puia) आणि वाय-ओ-तापू (Wai-O-Tapu). पैकी माओरी शो तर पाहियातच पार पडला होता. (वायटॉमोचा पत्ता आधीच कट झालेला होता.) उरलेल्या दोन्ही गोष्टी geo-thermal activities च्या नावाखाली येत होत्या. म्हटलं, चला, गरम पाण्याची किवी-कुंडं बघून येऊ; काहीतरी वेगळं असलं तर मजा; नसलं तरी आपल्याकडे दिसते तशी बजबजपुरी तिथे नक्की नसणार. पण ते ठिकाण ‘गरम पाण्याची कुंडं’ यापलिकडेही एकदम भारी निघालं. गंमत म्हणजे, प्लॅनिंगदरम्यान geo-thermal activity ही कॅटेगरी एकदा कळल्यावर आणि तिथे जाण्याचं नक्की केल्यावर त्याबद्दल TripAdvisor वर आम्ही आणखी फारशी काही शोधाशोध केलेली नव्हती. थोडक्यात रोटोरुआला पोहोचल्याच्या दुसर्‍या दिवशी दुपारच्या टळटळीत ऊन्हात ते पुईयाच्या तिकीट खिडकीशी आम्ही जाऊन धडकलो तेव्हा आमच्या पाट्या बर्‍यापैकी कोर्‍याच होत्या.

तिथे दोन पर्याय होते - ‘फुल डे पास’ आणि ‘छोटी गाईडेड टूर+फ्री टाईम’. तेव्हा दुपारचा १ वाजून गेलेला होता; त्यामुळे पूर्ण दिवसाच्या पासमध्ये पैसे घालवणे पटेना. म्हणून मग दुसरा पर्याय निवडला. गाईडेड टूर साधारण ३०-४० मिनिटांची होती. पैकी अर्धा अधिक वेळ माओरी संस्कृती, कोरीव कामाचा स्टुडिओ इत्यादी पाहण्यात गेला. पण ती गाईड अगदी बोलघेवडी होती; रंगवून रंगवून माहिती सांगत होती. ते सगळं पाहत, फिरत असताना मधूनच लांबवरची एक गोष्ट सारखं लक्ष वेधून घेत होती. लांब हिरवाईच्या पार्श्वभूमीवर ओसाड, रखरखीत पृष्ठभागातून एकगठ्ठा वाफा बाहेर पडताना दिसत होत्या. पण गाईडच्या मागेमागे फिरताना बघताबघता ते दृष्य नजरेआड होत होतं.

pohutu long shot_compressed.jpg

३-४ वेळा असं झाल्यावर मला राहवेना. मी गाईडचं बोलणं अडवून आणि त्या ठिकाणाकडे बोट दाखवून तिला विचारलं- ‘आपण तिथे जवळ जाणार आहोत का?’ हे म्हणजे असं, की हॉटेलात आपण ऑर्डर केलेले पदार्थ आपल्यासमोर येतात आणि तेवढ्यात शेजारच्या टेबलावर त्याहून वेगळं, काहीतरी इंटरेस्टिंग दिसतं आणि आपल्याला वाटतं, ते काय आहे, ते घेऊ या... ‘अफकर्स, वी आऽऽ गोइंग दीअऽ’ ती खणखणीत माओरी टोनमध्ये म्हणाली (Of course, we’re going there.) आणि शेजारच्या टेबलावरचं सिझलर मला एकदम माझ्या पुढ्यात येत असल्याचा भास झाला.
आणि अखेर गाईडेड टूरची शेवटची ५-१० मिनिटं त्या गाईडनं आपला मोहरा त्या वाफाळत्या ठिकाणाकडे वळवला. त्याचं नाव पोहुटू गीझर्स. (Pohutu Geysers) आखीवरेखीव वाटेवरून आम्ही त्याच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलो. तिनं त्याची प्राथमिक माहिती सांगितली आणि आमचा निरोप घेतला. आता त्या परिसरात आमचे आम्ही फिरायला मोकळे होतो.

रुक्ष, ओसाड, वाळवंटी भासणारा परिसर; ओबडधोबड अग्निजन्य खडकांचे गठ्ठे इकडेतिकडे विखुरलेले; ठिकठिकाणाहून वाफा बाहेर पडताना दिसत होत्या. त्या सर्व वाफाळ्यांचा दादा म्हणजे तो पोहुटू. दक्षिण गोलार्धातला सर्वात मोठा गीझर. त्याची शेजारी शेजारी दोन तोंडं असावीत. दोन्ही तोंडं फुरफुरत, फुसफुसत होती. कोण अधिक वाफ सोडतं, अशी दोघांच्यात स्पर्धा लागलेली. पण त्यांच्यात mutual understanding होतं. गाईडच्या सांगण्यानुसार, दोन्ही तोंडं आळीपाळीने साधारण दर अर्ध्या तासांच्या अंतराने erupt होणारी होती. ‘Erupt’ शब्द ऐकल्यावर परत तीच द्विधाम-सिच्युएशन आली. आपल्या दृष्टीने erupt होतो तो केवळ ज्वालामुखी; पृथ्वीच्या पोटातून उसळून वर येण्याचा हक्क केवळ लाव्हारसालाच! पण जगात अनेक ठिकाणं अशीही आहेत की जिथे तो स्वतः न येता आपल्या भालदार-चोपदारांना पाठवतो; ते पुईया हे ठिकाण असंच त्या भालदार-चोपदारांचं आहे.

pohutu-start_compressed.jpg

आणि कसले भारी होते ते भालदार-चोपदार. येण्याची वर्दी दिल्यासारखे अधिकाधिक वाफा सोडत होते. त्या तोंडांच्या भागात अग्नीजन्य खडकाचा एक मोठा गठ्ठा होता; त्याच्या भोवतीनं लाकडी कुंपण घातलेलं होतं. कुंपणालगत हळूहळू पर्यटक गोळा होत होते. आम्हीही त्या गर्दीत घुसलो. कुंपणापलिकडचा खडक अगदी समोर, हाताच्या अंतरावर होता. मला एक असं नेहमी वाटतं बरं का, की जे ठिकाण बघायला गेलो आहोत, तिथल्या दगडा-खडकांना आपण किमान स्पर्श तरी करायला हवा; तिथल्या नदी-समुद्राच्या पाण्यानं पावलं भिजायला हवीत; तिथल्या डोंगरवाटांवरची माती हातापायांना, कपड्यांना लागायला हवी; त्याशिवाय त्या जागेचा संपूर्ण फील आल्यासारखा वाटतच नाही... या यादीत आपण ताजा ताजा अग्नीजन्य खडक हा ‘आयटेम’ही टाकावा असा मात्र कधी विचारही केलेला नव्हता. इथे तो अवचितपणे अगदी समोर आला होता; पण हात लांब करून त्याला स्पर्श करण्याची हिंमत होईना. कुंपण होतं ते एक झालंच; शिवाय त्या गठ्ठ्याच्या मिळेल त्या फटीतून, दिसेल त्या बारीकशा वाटेनं वाफा येत होत्या. पोहुटू-वाफांच्या पुढे त्यांचं अस्तित्व तसं नगण्यच म्हणायचं; पण तरी ‘संत श्री ज्ञानेश्वरान्‌ परमिट दिलेलें आहें ऽऽ’च्या चालीवर त्या डँट के आपलं असणे दाखवून देत होत्या. नीट कान दिले, तर तिथे ‘पोहुटू असेल दक्षिण गोलार्धातला सर्वात मोठाऽऽ, पण म्हणून आम्ही खडकातून बाहेर येऊच नये की काऽऽय!’ हे स्वच्छ ऐकू येत होतं. इतकी ऊष्णता पोटात घेऊन असलेला तो खडक चांगला सणसणीत गरम असणार हे ओघानं आलंच. वार्‍याची झुळूक आली की खडकाच्या दिशेनं जरा गरम हवेचा झोतही जाणवत होताच. त्यामुळे मी त्याला हात लावण्याचा प्लॅन रद्द केला.

इकडे मी गरम दगड वगैरे विचार करत होते आणि पलिकडे त्या गठ्ठ्यालगतच्या एका निळ्याशार छोट्या तळ्यात (The Blueys) दोन बदकं निवांत पोहत होती! इतकी कमाल वाटली ते पाहून. त्या बदकांकडे मी ज्या नवलाईनं पाहिलं, त्याच नवलाईनं पुढे Queenstown Lake च्या हाडं गोठवणार्‍या गार पाण्यात मजेमजेत डुंबणार्‍या चिल्ल्यापिल्ल्यांकडेही पाहिलं. ते पाणी हाडं गोठवणारं होतं, ते आमच्यासाठी; त्यांच्यासाठी ती lovely, gorgeous weather मध्ये केलेली धमाल होती. त्या बदकांसाठीही तो just another day होता. त्यांना ना त्या वाफांशी काहीही देणंघेणं होतं, ना तिथल्या H2S च्या वासाशी.
गीझर्समधून बाहेर येणारं पाणी त्या तळ्यात साठतं, खालच्या पत्थराच्या फटींमधून पुढे निघून जातं, त्या पाण्यातली मिनरल्स मात्र तळ्यात साचून राहतात, त्यांच्यामुळेच तळ्याला तसा रंग आला आहे, असं तिथल्या एका माहितीफलकावर लिहिलेलं होतं. पुरातन काळात माओरी लोकांचं हे स्नानाचं ठिकाण होतं. गीझर्समधून बाहेर पडणार्‍या ऊष्णतेवर, गरम पाण्यावर अन्न शिजवलं जायचं. आधुनिक काळातही (६०-७० च्या दशकात, बहुतेक) रोटोरुआच्या नागरिकांनी ठरवलं की आपणही त्या ऊष्णतेचा वापर करून घ्यायला हवा. मग ते पुईयापासून उष्णतावाहक पाईप्सचं जाळं शहरात नेण्यात आलं. काही काळ ते चाललं. त्याचा परिणाम असा झाला, की पोहुटूचा दमसास कमी पडायला लागला. एकीकडे त्याच मिनरल्समुळे वगैरे पाईप्स खराब व्हायला लागले. काही वर्षांतच ती सगळी सिस्टीम गुंडाळावी लागली. आणि मग पोहुटू परत एकदा पहिल्यासारखा जोमानं जोर-बैठका काढायला लागला.

... आता पोहुटू-वाफांचा वेग वाढला होता; वाफांबरोबर थोडंथोडं पाणीही उसळायला लागलं होतं. दिवाळीतली झाडं कशी फुलबाजीनं पेटवली की आधी काही सेकंद एकाच ज्योतीनं भसाभस जळतात आणि मग त्यातून कारंज्यासारख्या ठिणग्या उडायला लागतात, तसाच प्रकार होता तो. वाफांचा जोर जसजसा वाढायला लागला, तसतशी जमिनीखालून एक मंदशी पण अखंड घरघर ऐकू यायला लागली. आमच्या आसपासची गर्दीही वाढायला लागली होती. वाटलं, हे सगळं जराशा उंचीवरून पाहता यायला हवं. आसपास पाहिलं, तर आम्ही उभे होतो त्याच्या मागेच ४-६ पायर्‍या चढून जाऊन एक खुली कॅफेटेरियासारखी जागा दिसत होती. आम्ही लगेच गर्दीतून बाहेर पडून तिथे जाऊन उभे राहिलो. आणि तेच बरं झालं; तिथून आसपासचा बराच परिसर एका नजरेत दिसायला लागला. आता जमिनीखालची घरघर, खळबळ अधिक जोरानं ऐकू यायला लागली. पायांनाही ते जाणवायला लागलं. आणि बघता बघता पोहुटूच्या दोन तोंडांपैकी कुठलंतरी एक भसाभस पाणी बाहेर फेकायला लागलं. केवढी ताकद होती त्यात! बाहेर आलेलं पाणी सरळ उंच आकाशात भिरकावलं जात होतं; त्याच्याबरोबर वाफांचे लोळच्या लोळ उठत होते. त्यावेळी आकाश स्वच्छ होतं; पण अध्येमध्ये ढगांचे दाट पुंजकेही दिसत होते. पोहुटूच्या दाट, पांढर्‍या वाफा वरवर जायला लागल्या की नजरेनं त्यांना फॉलो करायचं; बघताबघता त्या ढगांच्या पुंजक्यातल्या एक होऊन विरून जायच्या; नजरेच्या टप्प्यात वाफा कुठे संपत होत्या आणि ढग कुठे सुरू होत होते, ते कळतंच नव्हतं... हा नजरखेळ करत मी बराच वेळ उभी होते. दरम्यान जमिनीखालचा आवाजही खूप वाढला होता. विमान रन-वेवर धावायला लागल्यावर येतो तसा तो आवाज वाटत होता. पोहुटू आता पूर्ण जोमानं उसळत होता. त्याचं पाणी ३० मीटर उंचीपर्यंत उसळतं म्हणे.

pohutu-full_compressed.jpg

या सगळ्या गोष्टी जशा एका मागोमाग सुरू झाल्या तशाच एकामागोमाग एक कमी कमी होत गेल्या. पुन्हा सगळं जरा थंडावलं. मग आम्ही तिथून हललो. तिथून पुढची पायवाट वर चढत होती. ती दिशा पकडली. पायवाटेच्या दोन्ही बाजूंना कुंपण होतं; कुंपणाच्या पलिकडे वेगवेगळ्या आकाराचे, खोलीचे क्रेटर्स; कुठे करड्या मातकट मातीतून वाफा येत होत्या; मध्येच एखादा खडक हिरवट नाहीतर लालसर रंगाचा झालेला; कुठे दलदलीसारखं दिसणारं काळपट पाणी वाहत होतं; एका खड्ड्यात एकदम मऊशार चिखल खदखदत होता. हा Rotorua Mud ब्यूटी आणि स्किन-केअर इंडस्ट्रीमध्ये खूप प्रसिद्ध आहे, म्हणतात. त्याच्यावर काही प्रक्रिया करून सुपरमार्केट्समध्ये तो विकायला ठेवलेला दिसला. आपल्याकडच्या मुलतानी मिट्टीचंच हे किवी भावंडं म्हणायला हवं. छोट्याशा गोलाकार खड्ड्यांमध्ये खळखळ उकळणारं पाणी तर जिथे तिथे होतं. क्रेटर्सच्या भोवताली खुरटी झाडं होती. त्यांची पानंही मिनरल-डिपॉझिट्समुळे गंज लागल्यासारखी लालसर दिसत होती. म्हटलं तर परिसरावर एक अवकळा आलेली; पण ते होतं सगळं नैसर्गिकच, त्यामुळे नवलाचं. दूर क्षितीजावर हिरव्यागार उंच डोंगररांगा, मग जरा कमी उंचीच्या टेकड्या, त्यांच्यावर जरा विरळ झाडी आणि त्या पार्श्वभूमीवर हा ओसाड परिसर, सगळं एकाच दृष्टीक्षेपात. ती हिरवीगार झाडंही पृथ्वीच्या पोटातूनच वर आलेली, हे पोहुटूही तिथलेच, The Blueys चा निळा रंग तिथलाच आणि H2S ही तिथलाच.

तो H2S हुंगत हुंगत पायवाट जिथपर्यंत जात होती तिथवर वर वर चालत गेलो आणि परत फिरलो. आता परत एकदा पोहुटूच्या उसळण्याची वेळ झाली होती. त्याच्यासमोरच्या कुंपणापाशी आता फारसं कुणी नव्हतं. मी तिथे जाऊन उभी राहिले. पोहुटू परत एकदा जोमानं उसळायला लागला. त्याचवेळी जोरात वाराही वाहत होता. आणि वार्‍याबरोबर त्या पाण्याचे मस्त तुषार एकदम अंगावर आले. गरम खडक को मारो गोली, दस्तुरखुद्द पोहुटूचं पाणीच अंगावर उडलं होतं. अजिबात अपेक्षित नसताना त्या जागेचा संपूर्ण फील येण्यासाठीची माझी अट पोहुटूनं सुफळ संपूर्ण केली होती. मेरा बस चलता, तो हातावरचे, चेहर्‍यावरचे ते ‘मिनरली’ तुषार मी जसेच्या तसे घरी घेऊन आले असते. पण ते काही शक्य नव्हतं.

हॉटेलवर परतलो, तर हॉटेलच्या पार्किंगच्या एका कोपर्‍यातही एक उंच पाईप उभा केलेला दिसला. त्यातूनही मंदशी वाफ बाहेर पडताना दिसत होती. आता पोहुटूमुळे ट्यूब पेटली, की ती एक्झॉस्टची नाहीतर सेंट्रल हीटिंगची पारंपरिक पद्धत वगैरे नव्हती; तर तिथल्या घरांच्या, आमच्या हॉटेलच्या लगेच खालीही पृथ्वी उकळत होती; त्या वाफेला बाहेर पडता यावं म्हणून केलेली ती सोय होती. क्षणभर त्या विचाराने थरारल्यासारखं झालं. त्या पाईपांमधून येणार्‍या वाफेकडे तिथली माणसं सतत लक्ष ठेवून असतील का? वाफांचं प्रमाण वाढलं तर ती त्यांच्यासाठी चिंतेची बाब असेल का? त्यांच्या स्थानिक ‘वेदर फोरकास्ट’मध्ये त्या वाफांचाही उल्लेख होत असेल का? होत असेल सुद्धा; कोण जाणे...

----------

रोटोरुआत येऊन ३६ तास उलटले होते. वातावरणातल्या H2S ची नाकाला कधी सवय झाली कळलंही नव्हतं. आता आम्ही निघालो होतो वाय-ओ-तापूला. हे त्या भागातलं आणखी एक नैसर्गिक नवलाईचं ठिकाण - Geothermal Wonderland. रोटोरुआपासून बसनं साधारण तासाभराचा निसर्गसुंदर रस्ता होता. प्रत्यक्ष ते ठिकाण पुन्हा उजाड, रुक्षच. अशा ठिकाणी एखादं पर्यटनस्थळ असेल असा आपण विचारही करणार नाही. ते पुईयाच्या तुलनेत हा परिसर बराच विस्तीर्ण होता. आत साधारण २५-३० व्ह्यू-पॉईंट्स असलेला मोठा ट्रेल होता. रिसेप्शनपाशी त्याचा नकाशा मिळत होता. नकाशाच्या मदतीनं आपल्याला वाटेल तितका वेळ तिथे रमतगमत फिरता येत होतं.

devil's bath_compressed.jpg

ते-पुईयाचा ‘B/W Show’ म्हटला, तर इथे एकदम ईस्टमनकलर मामला होता. भडक पोपटी-हिरव्या रंगाचं एक तळं (Devil’s Bath), एका तळ्यात हॉट चॉकोलेटसारखं दाट, गरम पाणी, त्याचं नाव Devil’s Inkpot! पोपटी पाण्यात आंघोळ करणार्‍या डेव्हिलनं पेनातली शाई मात्र अगदी नेमस्त रंगाची निवडली होती. कुठे Inferno crater, कुठे Bird’s Nest Crater, अशा ठिकाणी पक्षी घरटं बांधूच कसं शकतील असा विचार करेपर्यंत त्या क्रेटरच्या करड्या आणि कोरड्या पार्श्वभूमीवर आतून एक काळा पक्षी उडत बाहेर आला. आता काय बोलणार त्यावर! निसर्गापुढे हात टेकावे लागतात, ते असे! एक उकळता Oyster pool दिसला. एका तळ्यात मध्यभागी ‘हे १०० डिग्रीचं पाणी आहे बरं का, हात घातलात तर कातडी जळेल’ असा इशारा देणारी लाकडी पाटी दिसली. वाफा आणि ऊष्णता याशिवाय आसपास काहीच नसताना तिथे कोण मरायला हात घालणार! मध्येच उंच Alum Cliffs होते. मळकट हिरवट पिवळ्या रंगाच्या Sulphur Caves तर तोंडी लावायला जिकडेतिकडे होत्या. पण सर्वात भारी होते, Artist’s Palette आणि त्याच्या शेजारचा Champagne Pool!

शँपेन पूल :

champagne pool_compressed.jpg

आर्टिस्ट्स पॅलेट :

artist's pallete_compressed.jpg

या रंगांनाही कारणीभूत होती अशी कुठली कुठली खनिजं नाहीतर मिनरल्स! या दोन्ही तळ्यांच्या मधून चालत जाण्यासाठी छोटासा लाकडी पूल होता. पुलावर उभं राहून खाली वाकलं तर अगदी सहज पाण्यात हात घालता आला असता. माझे हात थोडा वेळ शिवशिवले सुद्धा... पण ते पाणी इतकं गरम दिसतच होतं, की हात घालणे शक्यच नव्हतं. (माझ्यासारख्या शिवशिव्यांसाठीच आधीची ती इशारा देणारी पाटी लावली गेली असणार, हे उघड होतं.)
अत्यंत रुक्ष, ओसाड, भकास वाटणार्‍या परिसरातली झाडं-झुडुपंही तशीच साजेशी होती. मनुका, कनुका आणि मिंगीमिंगी (Manuka, Kanuka, Mingimingi) या तीन जातीची shrubs तिथे सर्वाधिक आढळतात असं कळलं. पैकी मनुका झुडुपाला फुलंही येत असावीत. कारण ऑकलंडपासून सगळीकडच्या दुकानांमध्ये Manuka Honey विकायला ठेवलेला दिसला.
पाय दुखेपर्यंत त्या ट्रेलचा मार्ग फॉलो करत फिरलो. एक डोळा घड्याळावरही ठेवून होतो. कारण बस-ड्रायव्हरनं एक वेळ दिली होती; आणि जवळपास एक धमकीही दिली होती, की त्या वेळेच्या पुढे मी फारफार तर १० मिनिटं थांबणार, मग सरळ निघून जाणार. त्यामुळे निमूटपणे त्या वेळेच्या आधी पाच मिनिटं रिसेप्शनपाशी परतलो. रिसेप्शनपाशी सुंदर गुलाबी फुलांच्या दोन मोठ्या कुंड्या होत्या. आलो तेव्हा त्याकडे लक्षही दिलं नव्हतं. पण आत ३-४ तास नजरेला केवळ रखरखाट दिसला होता; त्या पार्श्वभूमीवर गुलाबी रंगांची फुलं प्रथमच पाहत असल्यासारखे त्या फुलांचे लगेच फोटो-बिटो काढले गेले.

वाय-ओ-तापूमध्ये एक ‘Lady Knox’ नावाचा गीझर आहे, तो दररोज सकाळी १०:१५ वाजता उसळतो असं कळलं होतं. अशी ठराविक वेळ कळल्यामुळे आम्ही ठरवून तिथे गेलो नाही. आदल्या दिवशी ते पुईयातली पोहुटूजवळची गर्दी पाहता तिथेही गर्दी होणार हे उघड होतं. आणि पोहुटू तर दिवसभर परत परत उसळणारे; ती ‘लेडी नॉक्स’ सकाळी एकदाच तोंड दाखवणार म्हटल्यावर तर तिथल्या गर्दीत न जाणे हेच शहाणपणाचं वाटलं.

रोटोरुआतली ही दोन ठिकाणं पर्यटनाच्या लौकिक व्याखेत न बसणारीच; ती पाहिली आणि ‘There’s no such thing as लौकिक व्याख्या; ज्यानं त्यानं आपापल्या व्याख्या बनवाव्यात, त्या विस्ताराव्यात’ हे ज्ञानही पदरात पाडून घेतलं.
तो geothermal प्रभाव असा, की पुढे बरेच दिवस रस्त्यात साचलेलं वगैरे पाणी दिसलं की ‘अरे, हे उकळत का नाहीये’ असं पटकन वाटून जायचं...

----------

Cut to हॉकिटिका...

‘आधी हॉकीटिका गॉर्ज बघायला जाऊ या... आज त्याचा रंग अगदी अप्रतिम दिसतो आहे...’ ड्रायव्हर काकूंचं हे वाक्य ऐकून जरा प्रश्नच पडला. ‘आज’ म्हणजे? रोज त्याचा रंग वेगवेगळा असतो का? त्या रोजच्या पर्यटकांना हेच सांगत असण्याची शक्यता अधिक होती. पण हरकत नव्हती; त्यांच्या कामाचा तो एक भाग म्हणून सोडून दिलं. काकू मस्त गप्पीष्ट होत्या. मुळात त्या स्वतः टोटल ‘संतूर काकू’ होत्या. त्यांच्या बोलण्यातून त्यांची चिल्लीपिल्ली नातवंडं असल्याचं कळलं होतं. पण त्यांच्याकडे पाहून तसं अजिबातच वाटत नव्हतं. मी अगदी मनापासून त्यांना तशी काँप्लिमेंट दिली. त्या गेली १० वर्षं हॉकिटिकात पर्यटकांना फिरवून आणायचं काम करत आहेत. ड्रायव्हिंग पण अगदी झोकात करत होत्या.

त्यांच्याशी गप्पाटप्पा करत, तिथली अगदी करकरीत कंट्री-साईड न्याहाळत साधारण अर्ध्या तासात गॉर्जपाशी पोहोचलो. गाडीतून उतरता उतरता लक्षात आलं की रिमझिम पावसाला सुरूवात झाली होती. ‘छत्री नाही का? नसायचीच...’ असा चेहरा न करता काकूंनी आम्हाला गाडीच्या सीटखालची एक छत्री काढून दिली. जोडीला सँडफ्लाईजपासून बचाव करण्यासाठी म्हणून एक लोशन लावायला दिलं. न्यूझीलंडच्या साऊथ आयलंडमध्ये, त्यातही पश्चिम किनारपट्टीवरच्या मिलफर्ड साऊंड परिसरात फिरताना या सँड फ्लाईजचा त्रास जाणवतो असं निघण्यापूर्वी नेटवर वाचलं होतं. तिथे जाण्यापूर्वी ते रिपेलण्ट विकत घेण्याचं ठरवलंही होतंच. त्यामुळे काकूंच्या हातातून ती बाटली घेऊन मी त्याच्या लेबलचा फोटो काढून ठेवला. म्हटलं, पुढे उपयोग होईल. बाटली उघडून ते लोशन चेहर्‍याला आणि हातांना फासलं. तर ते चक्क निलगिरी तेलासारखं काहीतरी निघालं! आपल्या नेहमीच्या पाहण्यातला मेडिकल स्टोअरवाला एखाद्या दिवशी अचानक मल्टिप्लेक्समध्ये दिसला तर आधी आपल्याला प्रश्न पडतो, ‘कोण बरं हा... चेहरा खूपच ओळखीचा आहे’ तसंच झालं. तिथे परदेशातल्या त्या पूर्ण अनोळखी जंगलात चक्क आपल्या निलगिरीचा वास नाकात शिरेल याची अजिबात अपेक्षा नव्हती. त्यामुळे तो वास कशाचा हे पटकन लक्षातच येईना. असो. तर ते ‘युकॅलिप्टस’च असल्याची काकूंना विचारून खात्री करून घेतली आणि निघालो.
काही पावलं काकू आमच्या बरोबर आल्या, आणि पुढचा रस्ता दाखवून मागे फिरल्या. त्यांनीही परतायची एक ठराविक वेळ दिली आणि ‘उशीर करू नका’ अशी प्रेमळ धमकीही दिली. त्यांचा तात्पुरता निरोप घेऊन वळलो, आणि दूरवर ती अप्रतिम निळ्या रंगाची दुलई अंथरल्यागत गॉर्ज दिसली. काय कमाल रंग होता! नजर ठरत नव्हती.

hokitika gorge long shot_compressed.jpg

आपल्याला पुढे जायचं आहे, ७-८ टप्प्यांचा ट्रेल पार करायचा आहे, हे लक्षात आल्यावर समोरची पायवाट पकडून चालत निघालो. अधूनमधून एखाद्या वळणावर ती निळी दुलई परत दिसायची; दरवेळी आणखी आणखी जवळ येत जाणारी. आणि तो नजरेला शांत करणारा नितळ, निळा रंग! त्याचं काय वर्णन करणार!
ट्रेलचे टप्पे फॉलो करत करत अगदी नदीच्या काठाशी गेलो. शेवटी जरासा रॉकी पॅच होता; पण तिथवर जाऊन त्या निळ्या पाण्याशी न जाता परत फिरायचं हे शक्यच नव्हतं. पाण्यात पाय बुडवायची खूप सुरसुरी आली होती. पण ढगाळ हवा आणि भुरभूर पावसामुळे हवेत खूपच गारठा होता. त्यात बूट काढून पाय भिजवायला नको वाटलं. पण तरी मी पाण्यात हात बुडवून आलेच. पाण्याचा निळा रंग बोटांनाही लागेल की काय असं वाटावं इतका तो सुंदर, पक्का आणि एकसारखा रंग होता.

hokitika gorge_compressed.jpg

तिथल्या एका माहितीफलकावर त्या निळ्या रंगाची ‘रेसिपी’ लिहिलेली होती - ‘दगडांचा भुगा, त्यात चिमूटभर हिम, आणि पुरातन ग्लेशियर्समधली मिनरल्स असं मिश्रण करून ठेवावं. नदीच्या पाण्यात ते सतत मिसळत राहावं. म्हणजे पाण्याला हा रंग येईल.’ घ्या! म्हणजे, ते पुइयाच्या निळ्या तलावाची आणि इथली, दोन्ही रेसिप्या वेगवेगळ्या निघाल्या; पण अंतिम पदार्थ एकसारखा होता. इथला जरा अधिक ‘अहाहा!’ निळा होता. आसपास छान झाडी होती, स्थानिक पक्षी होते, शांऽत वातावरण होतं. नदीही अगदी संथ होती, पण या सर्व गोष्टींवर तो पाण्याचा ‘मिल्की, टरकॉईज’ रंग कडी करत होता. अशा वेळी डोळे भरून पाहण्यापलिकडे आपल्या हातात काहीही नसतं...

हा मिनरल्सची किमया न्यूझीलंडहून परतल्यावरही पुढे कैक दिवस नजरेसमोरून हटणार नव्हती!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलं आहेस. रोटोरुआ लेकच्या कडेनेही ट्रेल्स आहेत, तिथे आम्ही गेलो होतो. तिथे तर अक्षरशः दहा फुटांवर खदखदणा-या मातीचे खड्डे होते. सल्फरमुळे पिवळी पडलेली झुडुपं तर थेट एखाद्या हॉरर सिनेमातल्यासारखी दिसतात नाही? Happy

ती माती, खनिजं असलेले पॅक्स, सोप्स विकत घेतलेस की नाही? मी घेतले हौसेखातर Proud

रच्याकने, वायटामो केव्ह्जला आम्ही गेलो होतो. आम्ही तर मंत्रमुग्ध झालो. ब्लॉगवर टाकेन तो भाग तेव्हा जरूर वाच.

पूनम,
तुझा ब्लॉग मी फॉलो करते आहेच.

पॅक्स वगैरे विकत घेतले नाहीत. Lol

हॉकीटिकात आमच्या हॉटेलसमोरच एक ग्लो वर्म डेल होती. तिथे आम्ही ग्लो वर्म्स पाहिले. (त्यामुळे Waitomo ला जायचं नाही असं ठरवलं. अधिक जानकारी के लिए पढें भाग-२ Proud )

वा वा !! मस्त झालाय हा भाग पण !!
जिओथर्मल अ‍ॅक्टिव्हिटींची प्रस्तावना वाचल्यावर हॅ आमच्या यलोस्टोनात तर फक्त ह्याच आहेत! असं झालं.. Wink पण तू वर्णन खूप भारी केलं आहेस. Happy

बाकी दोन "छत्रिणीं"चं एकाच देशाचं वेगवेगळ्या शैलीतलं वर्णन वाचायला खूप मजा येते आहे. Proud

मी घेतले हौसेखातर >>>> ओह तरीच तू हल्ली नचिकेतच्या मोठ्या बहिणीसारखी दिसायला लागली आहेस. Proud

ललिता, तुझ्या ह्या लेखमालेचा ढाचा छान आहे. फक्त शेवटी एक प्लॅनिंग बद्दल लिही. म्हणजे न्युझिलंडला ट्रीप प्लॅन करणार्‍यांना त्याचा उपयोग होईल. Happy

छान चाललीये लेखमाला Happy मी दक्षिण बेट केलंय (पाच दिवस एकट्याने फिरून...) पण लिहू शकलो नाही Lol
तुमच्या दक्षिण बेटाच्या प्रवासवर्णनाच्या(ही) प्रतिक्षेत Happy

हॅ आमच्या यलोस्टोनात तर फक्त ह्याच आहेत! >>> हो, लिहिताना ‘तुमचा’ यलोस्टोनच आठवला होता... Lol म्हणून तिथे `हम भी खडे हैं राहों में' लिहिलेलं खोडून `हमारे जैसे' केलं Wink

प्लॅनिंगबद्दल नक्की लिहीन... या वेळी तो तर माझ्या फारच जिव्हाळ्याचा विषय ठरलाय Proud

तुमच्या दक्षिण बेटाच्या प्रवासवर्णनाच्या(ही) प्रतिक्षेत >>> हर्षल चव्हाण, यातलं हॉकिटिका दक्षिण बेटावरच येतं. `न्यूझीलंड-२ : युनिक टू न्यूझीलंड' मध्येही हॉकिटिकातल्या ग्लो-वर्म डेलवर लिहिलंय. शिवाय एक पार्ट ख्राईस्टचर्चजवळच्या अकारोआवर आहे. ते पण दक्षिण बेटावरचंच एक ठिकाण.

लले, वाचलं ते होकिटिकाच्या ग्लोवर्म्सबद्दल. पण तरीही बंद गुहेमधला अनुभव तुम्ही घ्यायला हवाच होतात. आम्हाला तर हॅरी पॉटरच्या सहाव्या भागातल्या केव्हमध्ये शिरल्यासारखं वाटत होतं, हळूहळू पुढे सरकणारी होडीही होती :भीती: आणि नंतरचं ते लक्ष लक्ष दिव्यांचं दर्शन!!! ऑस्समली स्पीचलेस मेस्मरायजिंग मोमेन्ट!

हर्षल चव्हाण, मीही माझ्या ब्लॉगवर आता दक्षिण न्यु झीलंडबद्दल लिहिणार आहे येत्या काही महिन्यात. ललिचं हे वाचून घ्या तोवर, मग माझ्या ब्लॉगवर या Lol
आम्ही दोघी 'छत्रिणी' दिसेल त्याला एनझेडबद्दल सांगतोय सध्या. क्या करे! देशच तसा आहे :बदामः

ओह तरीच तू हल्ली नचिकेतच्या मोठ्या बहिणीसारखी दिसायला लागली आहेस. >> पग्या, या वाक्याकरता तुला भेट म्हणून या पुढे तू मला मारलेले पाच टोमणे माफ! Proud

जरूर Happy

आम्ही दोघी 'छत्रिणी' दिसेल त्याला एनझेडबद्दल सांगतोय सध्या. क्या करे! देशच तसा आहे >>> खरंच! माझं तर सध्या 'गेल्या वर्षी या वेळी काय करत होतो...' हे पण सुरू असतं Lol

पण तरीही बंद गुहेमधला अनुभव तुम्ही घ्यायला हवाच होतात. >>> मोशन-सिकनेसवाल्यांची दु:खं काय सांगू! एखादा बसप्रवास टाळण्याचा पर्याय दिसला की आम्हाला जग जिंकल्याचा आनंद होतो. Proud

तिथल्या खाद्य संस्कृतीबद्दल पण वाचायला आवडेल >>>

स्मि, पहिल्या भागात एका माओरी डिनरबद्दल लिहिलं आहे.
प्लस तिथले विविध स्वादाचे मफिन्स आणि इतर बेकरी प्रॉडक्ट्सही खूप खाल्ले आम्ही. (आपल्याकडे 'मफिन्स' या नावाखाली जे विकतात ते म्हणजे गिर्‍हाईकांची शुद्ध फसवणूक आहे असं माझं आता मत बनलं आहे Proud )

न्यूझीलंड-स्पेशल कडक्क फिल्टर कॉफी जवळपास रोज घेतली. कारण सगळीकडे आम्ही स्टुडिओ अपार्टमेंट्समध्ये राहिलो; आणि सगळीकडे फिल्टर, मायक्रोवेव्ह ओव्हन, आणि त्या कॉफीची पाकीटं असायचीच.

रोटोरुआत एका बेकरीत एक `नमकीन pie' खायला मिळाला. तो भारी होता. रोटोरुआतच `काऊंटडाऊन' सुपर मार्केटमधून चणे-दाणे गटातले स्थानिक पदार्थ घेतले. ते खूप आवडले. मग पुढे प्रत्येक ठिकाणे ते घेतलेच.

हेझलनट फ्लेवरची कॉफी इत्यादी मला आवडत नाही फारशी; मात्र न्यूझीलंडमध्ये मी प्रथम नुसते हेझलनट्स खाल्ले, आणि ते मला खूप आवडले.
ड्राय-फ्रूट गटातलं क्रॅनबेरीही मी या टूरमध्ये प्रथम खाऊन पाहिलं. ते पण मला खूप आवडलं. त्यावरही आम्ही आडवा हात मारला होता. दिवसभर फिरताना पाठीवरच्या सॅकमध्ये मफिन्स, या सुक्या क्रॅनबेरीज आणि फळं असायचीच.

सॅलड्स, स्थानिक फळं खूप खाल्ली.

नॉन-व्हेजमध्ये बीफ आणि पोर्कचे पदार्थच अधिक दिसले. त्यामुळे काही नॉनव्हेज ऑर्डर देताना चिकनची डीश शोधावी लागायची. बीफ-पोर्कची आजवर कधी पोटाला सवय नाही; उगीच प्रवासात पोट बिघडायला नको, हे त्यामागचं एकमेव कारण.

हॉकिटिकात मुद्दाम एका स्थानिक पिझ्झा जॉइंटला गेलो; तिथला पिझ्झा छान आणि वेगळ्याच खमंग स्वादाचा होता.
ख्राईस्टचर्चमध्ये स्थानिक भाज्या वापरून केलेली लझान्याची एक डीश खाल्ली, पण ती जरा सपक वाटली.
ख्राईस्टचर्च आणि आसपास 'कँटरबरी चीझ' मिळतं, ती देखील न्यूझीलंडची खासीयत आहे. ते खाल्लं, इकडेही घेऊन आलो. आपल्या सवयीच्या चवीपेक्षा त्याची चव आणि स्वाद जरा अधिक आंबूस आणि कमी मिठाचा; (त्यामुळे घरच्या चीझ फॅ.क्ल.कडून त्याला ५ पैकी ३ स्टार्स मिळाले. Lol ) ते गरम असताना जास्त छान लागतं.

वेलिंग्टन-झीलँडियाच्या कॅफेटेरियात एक कमाल चवीचं `रेड पम्पकीन सूप' मिळालं. नावाला सूप, पण होतं लापशीइतकं दाट. पण ऑसम्म चव होती.

वेलिंग्टनलाच आमच्या हॉटेलच्या समोर चक्क एक `नवरंग डेअरी' होती Lol वेलिंग्टनमध्ये एक दिवस भुरभूर पाऊस, सोसाट्याचा वारा आणि थंडी होती. त्या वार्‍यात बाहेर पडून खादाडीची ठिकाणं शोधणं नको वाटलं, तेव्हा त्या नवरंग डेअरीतून तिथलं मॅगी आणि अंडी आणून हॉटेलरूममधल्या कंडक्शन टॉपवर शिजवून खाल्ली Lol

क्वीन्सटाऊनमध्ये एक खूप जुनं चॉकलेट-प्रॉडक्टचं दुकान दिसलं - पॅटॅगॉनिया. शनिवार-रविवार तिथे झुंबड गर्दी होती. तिथलं स्थानिक चॉकोलेट आणि आईसक्रीम बेस्ट होतं.

आणि हो, अकारोआच्या समुद्रात मिळणारा salmon ही खाल्ला. त्याला किवी मत्स्यप्रेमींमध्ये विशेष स्थान आहे. आम्ही खाल्ली ती त्याची डीश इतर खूप घटकपदार्थ नसलेली अशी होती, सौम्य, तो मासा एकदम टेंडर शिजलेला; त्याचा स्वाद त्यामुळे पूर्णपणे कळला; आवडलाही.

मस्त चालू आहे ही मालीका
उदर भरणावर एक स्वतंत्र भाग हवा असं प्रतिसादात नाही उरकायचं