ग्रामीण बोली भाषांतील शब्द.

Submitted by कोदंडपाणी on 30 January, 2019 - 06:04

शालींच्या मैत्रचे भाग वाचताना त्यातील पात्रांच्या तोंडात अनेक ग्रामीण शब्द वाचले. काही मजेशीर वाटले. प्रत्येक प्रांताची जशी आपली एक खाद्यसंस्कृती असते तशी एक भाषाही असते. त्यातल्या त्यात ग्रामीण भाषा तर अतिशय गोड असते. त्यात वापरले जाणारे शब्द रोजच्या व्यवहारात वापरले जात असले तरी ते प्रमाण मराठी भाषेत नसल्याने सहसा लिखानात येत नाही. शहरांमधे तर ते बोलण्यातही येत नाही. तर असेच वेगवेगळ्या प्रांतातील ग्रामीण भाषेतील मजेदार, वेगळे शब्द वाचायला मजा येईल. सांगली, कोल्हापुर, नागपुर, नगर, कोकण आणि महाराष्ट्रातील अनेक भागात वेगवेगळे शब्द वापरले जातात ते येथे लिहिले तर सर्वांना ते वाचण्यातला आनंद मिळेल तसेच त्यांचे अर्थही कळतील. उदा. आमच्या जुन्नर भागात वापरले जाणारे काही शब्द:

यळोमाळ: येथे तेथे किंवा दिवसभर
कव्हर: किती वेळ
उलसक किंवा उलीशीक: अत्यंत थोडे.
फिंद्री: खोडकर मुलगी
पाठ: शेळी

तुमच्याकडेही असे काही शब्द असतील तर अर्थासहीत व जमल्यास वाक्यासहीत येथे लिहा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घडवंची, चौफाळा.
सुतारकामातले शब्द : आउत, आंबूर, करवत, किंकरे, गिरमिट,गुण्या, पटाशी, रंधा, वाकस, समता. कुर्‍हाड, स्वसर्‍याचे खोड, कटावणी, गोलचीचे खोड, घण, सांडस, हातोडा, चामड्याचा भाता.
लोहाराची कामे : नांगराचा फाळ, कुळवेचा पास, पाभारीचे थारोळे आणि चाडदोर, मोटेचे कडे इ. बसवणे. त्याची हत्यारे : भाता, घण, संदन, पोगर
सोनारची हत्यारे: फुंकणीची नळी, वेगवेगळ्या जाडीची तार काढण्यासाठी जंत्रफळी, सोन्याच्या कसोटीचा दगड, सोने आटवण्याची मूस,, छोटी ऐरण, सवागीची पूड्, मोरचूद, सोरा,तेजाब, नवसागर इ.
हे शब्द चिं. वि. जोशी यांच्या हास्यचिंतामणि या पुस्तकातून. (घडवंची आणि चौफाळा सोडून).

हे मुठलं म्हणजे भिरंडेल. रतांब्यांना भिरंडी असेही म्हणतात. हे तेल स्वयंपाकातही वापरीत असत. हे तेल काढणे अतिकष्टाचे काम. रतांबे फोडताना छोट्या होडीसारख्या एका लाकडी भांड्यात फोडीत असत.(भाऊंनी त्याचे नाव लिहिलेय.) त्यात बिया वरच्या बाजूला पडत आणि उतरत्या बाजूला रस खाली ओघळून जमा होई. त्या रसात मीठ घालून पुढे त्यात रतांब्यांची साले पाच सहा वेळा बुचकळवून आणि सुकवून सोले बनवण्यासाठी वापरत. बिया राखेत घोळवून त्यांना चांगली उन्हे देत, आणि खडखडीत सुकल्यावर एखाद्या काठीने/ दंडुक्याने हलके हलके धोपटीत.राखेचे आवरण सुकून पोकळ झालेले असे, ते फुटे आणि आतील बिया बाहेर येत. बियांची आवरणेसुद्धा राखेत अडकून निघून येत. मग बिया वेचून राख दूर करायची. बिया बारीक दळायच्या. हे पीठ मोठाल्या हंड्यांत पाण्यात भिजत घालून मोठ्या जाळाखाली उकळीत. काही वेळाने बियातले तेल निघून येऊन ते पाण्यावर तरंगू लागे. हांडा चुलीवरून खाली उतरला की ते तेल शुभ्र गोठू लागे. मऊसर आणि गरम असतानाच पटापट हातावर घेऊन लोण्यासारखे झेलझेलून त्यातले पाणी काढून टाकावे लागे. त्या सफेद गोळ्याला मुठींनी लांबट आकार देत.

हीरा, धन्यवाद, तपशीलवार माहितीबद्दल.
एकंदरीतच, आमसोलं व मुठलं/ भिरंडेल बनवणं हा मोठा व्यापच असतो. पण रतांब्याच्या ताज्या रसाच॔(आगूळाच॔) सरबत किंवा सोलकडी चवीला अफलातून , हेंही खरं !!

रतांब्याच्या ताज्या रसाच॔(आगूळाच॔) सरबत किंवा सोलकडी चवीला अफलातून , हेंही खरं !!>> अगदीच!!
आम्ही तर ताजी पडलेली कोकमं उचलून फोडून आतला गर ( बियांसकट) मीठ लावून खायचो. बिया न चावता गिळून टाकायचो. कधी काही बाधलं नाही मात्र. आताही तोंडाला पाणी सुटलं नुसत्या आठवणीने!

भिरंडे खायला मजा यायची.अलुबुखारपेक्षा जराशी मोठी असतात.आंबट गोड बिया खायचो.तिकडचे कुळवाडी,भिरिंडाच्या पानांनी पितळेची भांडी लखलखीत करत.त्या पानांनाही आंबट चव असे.

घराभोवतीं , बागायतीत नको त्या गवताचं, छोट्या झाडी-झुडूपांचं 'रान' उगवतं ( विशेषत: पावसाळ्यात) , तें साफसूफ करणं याला सिंधुदुर्गात 'बेणणं' म्हणतात .

जाळ्यांत मिळालेले बारीक सारीक टाकाऊ मासे सुकवून ते माडाना खत म्हणून वापरतात .त्या खताला खाटी म्हणतांत.
माडांच्या ओल्या झापांची ( चुडतं ) पातीं एकमेकात घट्ट व सुबकपणे गुंफून वेताच्या पटटयांच्या चटई सारखीं झापं बनवतात . हयाला ' चुडतं वळणं' म्हणतात. उन्हा पावसापासून संरक्षण म्हणून या वळलेलया झापांचा खूपच व्यापक वापर असायचा. प्लासटीकचा सोपा पर्याय आला व हा वापर किमान झाला आणि चुडतं वळणयाची कला व कसबही आतां दिसेनासं होतंय.

बेणूंक , चुडतां वळूंक. मुठलां करूंक, लाटीन पाणी उपसूंक....काय तरी उपयोगी शिक, मेल्या ! तो खुटो देखील कामाक येता, तां बघ जरा !!20190219_194315.jpg

रागाने कुणालातरी, विशेषतः लहान मुलाना, ओरडणे, याला सिंधुदुर्गात सर्रास ' करवादणे' ' म्हणतात.>> आमच्याकडे पण म्हणतात पण फक्त लहान मुलांवर ओरडल्यावर नाही ..जनरल कोणी जास्त चढ्या आवाजात बोललं कि घरी(कोकणात/रत्नागिरी ) आम्ही म्हणतो कायम .. किती करवादशील ? करवादू नको वगैरे

रागाने कुणालातरी, विशेषतः लहान मुलाना, ओरडणे, याला सिंधुदुर्गात सर्रास ' करवादणे' ' म्हणतात.

कातवणे /कातावणे
@ शाली बराबर ह्ये ना

'टारझन'च्या सिनेमांत तो दोन प्रकारे आरोळी ठोकताना दाखवतात- 1) तो आपलं आगमन जाहीर करतो तेव्हाची व 2) बलाढ्य प्राण्याशी झुंजून तो त्याला मारतो , तेंव्हाची. त्यातल्या पहिल्या प्रकारच्या आरोळीसारखं ओरडणं याला कोकणात ''कुकारी'/ ' कुकारो' म्हणतात. गर्द झाडी, डोंगराळ भाग यामुळे कुणाला हांक मारणं , आपण कुठे आहोत हें सांगणं , इत्यादीसाठी शंख वाजवल्या सारखे तोंडासमोर हात धरून अशी आरोळी ठोकली जाते.

लग्नानंतर गांवीं गेलों तेंव्हा कुकारा घालून तुला बागायतीत बोलवायचो ना ते आठवलं , कुकर रिपेअर करायला देताना !!20190118_083219_0.jpg

सर्वांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा !

@ शाली
>अलिबागपासुन मालवणपर्यंत नेहमी भटकत असतो पण वर उल्लेखलेल्या बोली ऐकल्या नाही कधी. नेहमी मराठीच ऐकायला आली आहे. असे का? <
नेहमी प्रमाण मराठी ऐकू येण्याची काही कारणे माझ्यामते पुढीलप्रमाणे असावीत
१.प्राथमिक व माध्यमिक तसेच महाविद्यालयीन शिक्षण देखील प्रमाण मराठी भाषेमध्येच होते तसेच दूरदर्शन मालिका, सिनेमा यांचा प्रभाव त्यामुळे मालवणी बोलीभाषेचा वापर कोकणात विशेषत: तळकोकणात कमी होताना दिसतो.
२. तुम्ही स्थानिक लोकांशी कोट्या भाषेत संपर्क साधता हा मुद्दाही महत्वाचा आहे. स्वानुभवातून सांगतो कि आपण प्रमाण मराठीत बोललो की समोरचे देखील प्रमाण भाषेमध्येच प्रतिसाद देतात.
(खेड्यापाड्यातील निरक्षर वर्ग हा अपवाद)
असो बोलीभाषा टिकणे आवश्यक आहे.

>हो पण ती मला प्रॉपर मालवणी वाटत नाही ऐकताना, जी कणकवली, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी भागात बोलतात तिच्याजवळ जाणारी वाटते. <
कुडाळ वेंगुर्ला ,सावंतवाडी या भागामधील मालवणी भाषेवर शेजारच्या कोंकणी भाषेचा प्रभाव आहे. बोलीभाषा जरी मालवणी एकच असली तरीदेखील हेल काढून बोलण्याच्या वैशिष्ट्यामुळे ऐकणाऱ्याला थोडा फरक वाटू शकतो.
त्याचप्रमाणे काही शब्द जसे 'मरे ' 'होSSSSS ' आशे'' इ. काही भागात प्रबलतेने वापरले जातात. (उदा. सध्या सुरु असणारी 'रात्रीस खेळ चाले ' या मालिकेमधील पात्रांच्या तोंडी असणारी भाषा (हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे ;))

अजून काही मालवणी शब्द सांगावेसे वाटतात. (प्रतिसाद फार लांबेल अशी भीती वाटत आहे)
असो.
१. न्हावान - देवाला अभिषेक करून झाल्यावर दिले जाणारे तीर्थ.
२. खांबकाठी - देवस्थानाचे तरंग. ही तळकोकणाची एक खासियत आहे (यामध्ये एका लाकडी खांबाला चार ते पाच जरीकाठी साड्या छान निऱ्या काढून गुंडाळल्या जातात व वर त्यावर देवांचे लाकडी,पितळी किंवा चांदीचे मुखवटे (यात पुन्हा वेगवेगळे प्रकार आहेत ) लावलेले असतात. या खाम्बकाठ्या संख्येने पाच किंवा सहा असतात. देवस्थानच्या वार्षिक उत्सवाच्या दिवशी किंवा पाषाणाकडून हुकूम घेतल्यावर , गावातील मानकऱ्यांच्या द्वारे या खाम्बकाठ्या गावात किंवा देवस्थान परिसरात फिरवतात. खांब उचलणाऱ्या व्यक्तीमध्ये संचार झालेला असतॊ व तिला गावातील लोक आपल्या समस्यांवर उपाय विचारतात. (यालाच पडस्तळा घेणे म्हणतात)
३. पाषाण-- देवळातील दगडी मूर्ती जिच्यावर कौल लावणे हा प्रकार केला जातो व दिलेल्या उत्तरालाल पाषाणाचा हुकूम म्हणतात. अजूनही कोकणात घर बांधणे, लग्नकार्य, गृहप्रवेश किंवा जमिनीच्या खरेदी- विक्री व्यवहारासंदर्भात पाषाणाचे हुकूम घेतले जातात आणि ते अनुकूल असल्याखेरीज गोष्ट पुढे सरकत नाही.
काही भागात यालाच प्रसाद घेणे म्हणतात.
या पाषाणाचाच उल्लेख काही वेळेस मर्याद, गावमर्याद असादेखील करतात.
अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्यासारख्या परंतु कोणाची हरकत नसल्यास...

योवैभूमा सुंदर माहिती.
न्हावान शब्द सुरेख आहे. अजुन वाचायला आवडेल. नक्की लिहा.

कोकणात गेल्यावर आम्ही घाटावरचे असल्याने अर्थातच प्रमाण मराठीतच संपर्क साधतो. त्यामुळेच बहुतेक वरील भाषा ऐकायला येत नसेल. दुसरं म्हणजे आम्ही पर्यटकांचे कोकण पाहतो, खरे कोकण खरे तर आम्हाला माहितच नाहीए बहूधा.

धन्यवाद.
तरंग काठ्यांचे छायाचित्र. सौजन्य -- google
अजून काही सांगतो--
१. हुकूम घेणे -- हा देवाचा कौल घेण्याचा विधी आहे. यामध्ये भाताच्या साळी किंवा फुलाच्या पाकळ्या पाषाणाच्या म्हणजे देवाच्या मूर्तीच्या डाव्या व उजव्या अंगाला गुरव किंवा घाडी समाजातील व्यक्ती (थोडक्यात वंश परंपरेने कौल लावण्याचे काम करणाऱ्या व्यक्ती,, त्यांना 'वस' असेही म्हटले जाते )लावले जातात व ज्या व्यक्तीच्या प्रश्नासंदर्भात कौल घ्यावयाचा असतो ती व्यक्ती मनामध्ये वा जाहिररित्या प्रश्न विचारते. सर्वसाधारणपणे उजवा कौल होय व डावा नाही या स्वरूपात घेतला जातो यालाच ' मर्याद उजयान बोलता ','मर्याद पोटाळता ', 'आकारान सांगल्यान ' किंवा 'मर्याद डाव्यांन बोलता ' असे म्हणतात. काही काही वेळा हा संपूर्ण विधी संपूर्ण दिवसभर चालतो व काहीच उत्तर मिळत नाही किंवा काही वेळेस काही मिनिटात काम होते. काही विज्ञानवाद्यांच्या मते, कौल हा ठराविक वेळी व ठराविक ऋतूमध्येच लावतात व त्यामुळे एकाच साच्याचे उत्तर येते ( इथे कोणाचेही मतखंडन करण्याचा हेतू नाही हे लक्षात घ्यावे)

२. आसरांचो मांड: आसरा म्हणजे साती (संख्येने सात) आसरा. साधारणपणे श्रावण महिन्याच्या मंगळवारी किंवां शुक्रवारी आसरांचा मांड भरतात. मांड म्हणजे एक पाटावर आंब्याची सात किंवा पाच पाने, एक पानसुपारीचा विडा व नैवेद्यासाठी गूळ खोबरे , भाताच्या किंवा वरीच्या लाह्या ,दूध साखर असे साहित्य मांडून आंब्याच्या पानावर व विड्यावर हळद कुंकू , अक्षता वाहून पूजा करतात व सांगणे करतात.
यासोबतच 'अकवारणी वाढण्याचा ' कार्यक्रम असतो म्हणजे कुमारिका मुलींची पूजा. यामध्ये कुमारिका -जिला मासिक पाळी सुरु झालेली नाही अशा मुलींना (संख्येने सात) व एक लहान मुलगा त्याला काना म्हणतात. (कदाचित कान्हा असावे). या मुलींचे पाय धुवून त्यांच्या टाळूला तेल लावले जाते.
आसरा हा शब्द अप्सरा शब्दाचा अपभ्रंश असावा. आसरा या नेहमी पाणवठ्याच्या ठिकाणी असतात म्हणून या कुमारीकारूपी आसरांची बोळवण पाणवठ्याच्या जागी केली जाते.
मांड होळीचा देखील असतो. सर्वसाधारणपणे गावहोळी व देवहोळी साजरी केली जाते. परंतु तळकोकणामध्ये होळी हा सण तितक्या मोठ्या प्रमाणावर साजरा होताना दिसत नाही जितक्या मोठ्या प्रमाणावर तो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होतो.

हुबलाक - बावळट

हुलचुंद(अ) - लहरी. (ता. माळशिरस जि.सोलापुर)

मोट- बैलांच्या साहाय्याने पाणी उपसण्याचे रचना/ यंत्रणा
नाडा- जाड दोर
सैंदर- कमी जाडीचे दोर
पखाल- म्हशीच्या कातडी पासून बनवलेली खूप मोठी पिशवी
धाव - बैल मागेपुढे चालण्याची उतरती जागा.
धाव - बैलगाडीच्या लाकडी चाकावर बसवलेली लोखंडी चक्री.
जू- बैलांच्या मानेवरील लाकूड
शिवळा- बैलांना जूवाला जूपण्याचे कातडी पट्टा असलेले लाकडी दांडके.
आरी- बैलांना टोचण्यासाठी खिळा जोडलेली काठी.
डोहण्या- घुंगरू बसवलेला जाड व आखूड चाबूक.

उपळ- विहिरीतील पाण्याचे झरे
सुडी रचणे- कापलेले ज्वारी बाजरी सारखं पिक गोलाकार उभे रचणे.
वळ्हयी / वळ्ह इ - कडबा, चारा आडवा रचणे.
पेंढी - वाहतूक करण्यासाठी पिकाची बांधलेली जुडी.
पाचुंदा- पाच पेंढ्या.
सरमाड- बाजरीचा वाळलेला चारा.

राजापूर कोतापूर बाजूला लहान मुलांना दटावताना कांडेचोर हा शब्द ऐकला आहे. काय अर्थ आहे त्याचा. एखादा प्राणी आहे का

बांबूच्या पट्ट्यांपासुन जसं "सुप" बनवतात तशीच एक छोटी उभट चौकोनी टोपली बनवतात. त्याला "रवळी/रोवळी" म्हणतात. भिजवलेले तांदुळ वगैरे निथळत ठेवायला रवळी वापरतात. पुर्वी सर्रास दिसणारी रवळी आताशा अजिबातच दिसत नाही. पण रवळी ऐवजी रवली असा उच्चार केला तर त्याचा अर्थ होतो "राहीली". "रवळी खंय रवली?" म्हणजे "रवळी कुठे राहीली?"

होळी/शिमग्याच्या दिवशी पोरंसोरं चित्रविचित्र पोषाख करुन घरोघरी जातात. त्याला रोंबाट म्हणतात. हल्ली याच्या स्पर्धा पण होतात. कधीकधी नुस्ता गोंधळ/आरडाओरडा/पसारा याला पण रोंबाट म्हटले जाते

आमच्या कडे दिवाळीच्या अगोदर पाच दिवसांपासून दिवाळी पर्यंत घरोघरी गाई व देव ओवाळण्यासाठी मुले पणत्या /दिवे घेऊन जात असत. तेव्हा जी गाणी म्हणत त्यात चावट गाणी असत त्याची आठवण झाली.

बांबूच्या पट्ट्यांपासुन जसं "सुप" बनवतात तशीच एक छोटी उभट चौकोनी टोपली बनवतात. त्याला "रवळी/रोवळी" म्हणतात. >>> आमच्या कडे पण असते, रवळी. लग्न कार्यात पिंपळाच्या झाडाची पुजा करण्यासाठी जाताना दिवा, हळकुंड,अगरबत्या, आगपेटि आणि असे दुसरे सामान रवळीत ठेवुन घेवुन जातात.

Pages