ग्रामीण बोली भाषांतील शब्द.

Submitted by कोदंडपाणी on 30 January, 2019 - 06:04

शालींच्या मैत्रचे भाग वाचताना त्यातील पात्रांच्या तोंडात अनेक ग्रामीण शब्द वाचले. काही मजेशीर वाटले. प्रत्येक प्रांताची जशी आपली एक खाद्यसंस्कृती असते तशी एक भाषाही असते. त्यातल्या त्यात ग्रामीण भाषा तर अतिशय गोड असते. त्यात वापरले जाणारे शब्द रोजच्या व्यवहारात वापरले जात असले तरी ते प्रमाण मराठी भाषेत नसल्याने सहसा लिखानात येत नाही. शहरांमधे तर ते बोलण्यातही येत नाही. तर असेच वेगवेगळ्या प्रांतातील ग्रामीण भाषेतील मजेदार, वेगळे शब्द वाचायला मजा येईल. सांगली, कोल्हापुर, नागपुर, नगर, कोकण आणि महाराष्ट्रातील अनेक भागात वेगवेगळे शब्द वापरले जातात ते येथे लिहिले तर सर्वांना ते वाचण्यातला आनंद मिळेल तसेच त्यांचे अर्थही कळतील. उदा. आमच्या जुन्नर भागात वापरले जाणारे काही शब्द:

यळोमाळ: येथे तेथे किंवा दिवसभर
कव्हर: किती वेळ
उलसक किंवा उलीशीक: अत्यंत थोडे.
फिंद्री: खोडकर मुलगी
पाठ: शेळी

तुमच्याकडेही असे काही शब्द असतील तर अर्थासहीत व जमल्यास वाक्यासहीत येथे लिहा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मालवणी भाषेतील इतर काही शब्द --
चावदिस - दिवाळीचा पहिला दिवस (नरक चतुर्दशी)
भोगवना -- घंगाळासारखे मोठे पसरट भांडे
झारंग्या -- मोठ्या जाळी जाळी असणारी भलीमोठी वेताची टोपली.
मांगर -- शेतघर
नरक -- मानवी विष्ठा ( शिवराळ प्रयोग असा (मेल्यांनो, नरक खावा जावा )
आकडी -- कंबरेला कोयते अडकवण्यासाठी वापरली जाणारी लाकडी आकडा असणारी नायलॉनची रश्शी
आवाठ- चार सहा घरांचा समूह
कुणगो/कोपरो - भात शेती करण्यात येणारा जमिनीचा छोटासा तुकडा
कवंडाळ -- एक फळ. याचा उपयोग गणपतीच्या सणाला माटवी किंवा मांडी सजविण्यासाठी होतो.
सोमन/चरचो -- माशाचा एक प्रकार
तलांग/ तलंग -- लहान किंवा पौंगंडावस्थेतील कोंबडी. Happy
येळा -- सागर किनारा (कदाचित संस्कृत 'वेला' चा अपभ्रंश असावा)
चिटकी -- गवारीची भाजी
तवसा -- मोठी काकडी
उभो नाडो --- कामचोर बाई किंवा मुलीसाठी वापरण्यात येणारे विशेषण ( जसे-" अमक्याचा चेडू म्हणजे उभो नाडो )
गवन -- लहान मुलींचा फ्रॉक किंवा झगा
शीक पडणे- आजारी पडणे (इंग्रजी sick असावे )
गुदस्ता -- गेल्या वर्षी (गुदस्ता होवूर इल्ल्लो)
होवूर -- मुसळधार पावसामुळे छोटे ओढे, नाले यांमधून वेगाने वाहणारे पाणी , याचा प्रवाह जोरदार असतो अगदी गाय बैल वाहून जाण्याइतपत
अजून काही देव-देवस्कीच्या संदर्भात वापरले जाणारे शब्द --
(कृपया देव-देवस्की किंवा करणी इ गोष्टींवरून विषयांतर करू नये इथे केवळ बोलीभाषेतील शब्द म्हणूनच पाहावे )
खोटा लाना- तांब्याची तार किंवा जुना तांब्याचा पैसा जो अंगावरून उतारा काढण्याच्या कामी वापरतात
निर्वशी - ज्याचा निर्वंश झाला आहे असा पिशाच्चयोनीतील पुरुष.
पाटाची अवलाद- विधवेला पुनर्विवाहातून झालेली मुले (विधवांच्या पुनर्विवाहात धार्मिक विधी न होता केवळ पाट लावण्याचा विधी होत असे. पाट लावणे हा वाक्प्रचार सुद्धा आहे.)
चाळेगत-- भुताटकीचा प्रकार
अवगत/ अळवत - बाळंतपणात मृत झालेली स्त्री
पडस्ताळा घेणे -- अंगात संचार झालेल्या व्यक्तीकडून समस्यांचे निराकरण करून घेणे

योवैभूमा, मस्त शब्द दिलेत. यातील आवाठा, तलंग, मांगर आणि तवसा माहीत होते. बाकीचे पहिल्यांदाच वाचण्यात आले. मस्तच.

माझ्या सासरी देवगडची बोली ऐकायला मिळते, जी मालवणीपेक्षा थोडी वेगळी आहे. मला तिथली काय किंवा माहेरची संगमेश्वरी काय कुठलीच स्थानिक भाषा येत नाही. कोकणांत घरातही प्रमाण भाषा सगळीकडे बोलतात त्यामुळे. नाहीतरी आली असती बोलता, मलाही.

डोंबिवलीत आगरी भाषा ऐकायला मिळते, ती इथली बोली भाषा. आगरी कोळी समाज इथला मुळ समाज आहे . डोंबिवलीतले मुळचे रहीवासी आगरी आहेत. आम्ही बाहेरुन आलेलो आहोत, मुळ कोकण आणि नंतर मुंबईत स्थलांतर मग डोंबिवलीकर.

आज दिवाळी अंतर्नादमध्ये दामोदर नायक यांचा झाडापेडांवरचा लेख वाचला. त्यात अनेक नवे शब्द आढळले. त्यातला 'कवाथा' हा एक शब्द लक्ष्यात राहिला. कवाथा म्हणजे माडाचे रोप. वाढलेला माड नव्हे, रोप.
शिवाय माडांची आळीं शिंपण्यासाठी एक मोठा तीन चार फुटांचा लाकडी डाव किंवा खुरप्यासारखे काहीतरी असते. त्याचाही शब्द होता. बाहेरून पाणी उचलून आळ्यांत फेकायचे. माडांची अळी जमिनीपासून थोडीशी उंच असतात म्हणून.
रवींद्र पिंगे यांच्या लेखांत 'राहाळ' हा शब्द अनेक वेळा वाचला आहे.

माचोळी = घरात असलेल्या कपाटाचा तळ आणि जमीन यांच्या मधली फट. वेळेत हमखास सापडाव्यात अशा काही वस्तू ठेवण्यासाठी या जागेचा उपयोग केला जातो.
कोयता = ऊसतोडीसाठी वापरले जाणारे धारदार पाते.
(कोयते कुठे आहेत?
त्या माचोळीखाली बघ.)

गुदस्तावरून आठवले -
मागिंदी = गेल्यावर्षी

योवैभूमा, मस्त शब्द दिलेत. यातील आवाठा, तलंग, मांगर आणि तवसा माहीत होते. बाकीचे पहिल्यांदाच वाचण्यात आले. मस्तच.
शाली
गवन-गावन
शिक-शिकात
पाट
हे आपल्याकडे पण आहेत ना

बहुतांश मावळपट्टा भागात वापरले जाणारे शब्द.
मपलं आणि माह्यावालं = माझे
तुपलं आणि तुह्यावालं = तुझे

नगरप्रांतात संगमनेरला जुनी लोकं समंगनेर किंवा समंगन्यार म्हणतात. तसेच ब्राम्हणवाडा या गावाला बांभुडं म्हणतात.
भरपुर शेती असेल तर त्यातल्या कमी पिकणारा आणि जरा दुर्लक्षीत असा जमीनीची पट्टा म्हणजे हालमखोड.

बचाळी = तोंडातील दात
गचुंडं = मान (ही शक्यतो धरतात. गचुंडं धरुन बाहेर काढणे.)
वाफसा = पावसानंतर जमीन सुकुन काम करण्याच्या योग्यतेची होणे.

*माडांची आळीं शिंपण्यासाठी एक मोठा तीन चार फुटांचा लाकडी डाव किंवा खुरप्यासारखे काहीतरी असते. * - हीरा, त्याला ' करलं ' म्हणतात.
'राहाळ' म्हणजे पाट, कालवा असावा असं मलाही वाटतं. मालवण भागात यालाच ' व्हाळ' म्हणतात. ( पुर्वीची माझी''व्हाळा'वरची सचित्र पोस्ट -
https://www.maayboli.com/node/25403 )

( *रवींद्र पिंगे यांच्या लेखांत ....* यांचा गांव जयगड बंदरालगतचा. आधीच गोड, त्यांत गांवचा विषय आला कीं भावूकतेने अधिकच मधाळ होतं त्यांचं लिखाण ! माझाही आवडता लेखक)

कोयता = ऊसतोडीसाठी वापरले जाणारे धारदार पाते.
(कोयते कुठे आहेत?)

>>>>>>>
ऊसतोडणी कामगारांची संख्या ठरवण्यासाठी पण हा शब्द वापरतात. कुणी मुकादमाला विचारलं तुझ्याकडं किती कोयते आहेत आणी त्याने सांगितलं २४ तर त्याच्याकडे ऊस तोडणी कामगार ( स्त्री-पुरूष मिळून )२४ लोक आहेत

आमच्याकडे कोयत याला म्हणतात.
आडसर (शहाळं), फणस सोलायला पुढची धारदार बाजू आणि नारळ फोडायला मागची रुंद बाजू वापरतात.

शेतकामातलं असंच अवजार अर्धवर्तुळाकार, हलकं, अधिक धारदार असतं त्या ला विळा म्हणतात.

घरच्या , नारळ खवण्याच्या आणि भाज्या चिरण्याच्या यंत्राला/ विळीला आढाळा म्हणतात.

भाज्या चिरण्याच्या यंत्राला/ विळीला आढाळा म्हणतात.>>>> आमच्याकडे आडाळा म्हणतात.

होकाल = नवरी,उपवर तरुणी
असोला/असोली = न सोललेली,आवरण न काढलेला नारळ किंवा सुपारी.
बेडो= सुपारी,बेडे अनेकवचन

शेतकामातलं असंच अवजार अर्धवर्तुळाकार, हलकं, अधिक धारदार असतं त्या ला विळा म्हणतात. <<< हो.
विळ्याचे दोन प्रकार असतात.
दातरी विळा: याची धार दातेरी असते. हॅकसॉ सारखी.
माटा विळा: याची धार सलग/गुळगुळीत असते.

विळा हा मुख्यत: ज्वारी, बाजरी, मका, गहू, भात, वैरणीचे गवत इ. कापण्यासाठी वापरतात.

विळ्याची लहान आवृत्ती म्हणजे खुरपे, जे खुरपणी/भांगलणीसाठी (तण काढण्यासाठी) वापरतात.

दरवर्षी सुगीला सुरूवात होण्यापूर्वी घरातले सगळे विळे गोणपाटाच्या पिशवीतून धार करण्यासाठी लोहाराकडे दिले जात. त्याला ‘विळे लावणे‘ म्हणतात.
(सुगी तोंडावर आली पण त्याने अजून विळे लावून दिले नाहीत.)

समुद्राच्या भरति-ओहोटीचा प्रभाव, हें कोकणातल्या नद्यांचं एक वैशिष्ठ्य . नदी, खाडीच्या ( नदीचा समुद्रा नजीकचा भाग) प्रवाहाला भरति- ओहोटीनुसार समुद्राच्या दिशेने व विरूद्ध दिशेने जी ओढ असते , ती तिथल्या वाहतुकीसाठी महत्वाची असते. या प्रवाहाच्या ओढीला सिंधुदुर्गात टाण म्हणतांत ( बहुधा, ताण असं मूळ रूप असावं ).

अरे किती छान धागा आहे हा...
माझ्या पप्पांच्या गावी माणगावला वर उल्लेखलेले बरेच शब्द वापरतात.

शिडी ला निसनं म्हणतात.
मापटी पण सर्रास पायली, मण, आदोली, टीपरी अशीच मोजतात. मम्मी अजुन पण कुकरला भात लावायला सांगायचं असेल तर आम्हांला, १ टिपरीचा भात लाव' म्हणुनच सांगते.
व्हायन पण वापरात आहे गावी.
झाडु - भुतारी
सासरी (रत्नागिरिला) शहाळ्याला शेलं म्हणतात.

बाकी आठवतील तसे लिहिन.

*सासरी (रत्नागिरिला) शहाळ्याला शेलं म्हणतात.* - सिंधुदुर्गात यालाच अडसारही म्हटलं जातं.

बायकांचं वेणी- फणीचं साहित्य ठेवायला छोटीशी पेटी असे , जी कुठेही सोयीच्या ठीकाणी नेतां येत असे. त्या पेटीच्या झांकणाच्या आंतल्या बाजूला आरसाही बसवलेला असे. त्या पेटीला पेटूल म्हणत.

पावसाळ्यात खराब झालेलं अंगण ( खळं ) पुन्हा माती घालून व ती थोपटून घट्ट व सपाट करणं कटकटीचं काम असे. थोपटण्यासाठी क्रिकेटच्या बॅटसारखी पण त्याहून जाड व जड लाकडी पटटी वापरत . त्याला पेटणं म्हणतांत. तसं खळं करणं यालाही तोच शबद वापरतात उदा. ' रे मेल्या, मुंबैकर येतले आतां. आमचां खळां पेटूक कधीं येतस ?' . बहुतेक, पेटणे हा पिटणेवरून आला असावा.

त्याला पेटणं म्हणतांत.
>>> पुणे जिल्ह्यात याला चोपणी म्हणतात

याचसारखे धान्य बडवायला असते त्याला मोगरी म्हणतात

चोपणी आम्च्याकडे माणगावला पण वापरतात.

गवत भरायची/वाहुन न्यायची बांबुची मोठी टोपली असते, नेहमीच्या टोपलीपेक्षा जरा वेगळी तिला 'हारा' म्हणतात.

व्हकाल, आडाळा, सोरगत या शब्दांचे मूळ कन्नड भाषेत असावे का? अड्डळी हा कारवार प्रांतातला विळी ह्या अर्थाचा शब्द मला माहीत आहे. व्हक्कल नावाचा शब्दसुद्धा असतो. त्याचा अर्थ बहुधा वंश किंवा वंशहिस्सा असा असावा. गोव्यात पोफळींना छोटा माड या अर्थाने माडी म्हणतात. अनेक वचन माडयो. पहारीला पारय . लाकडाच्या पहारीला ठाणे जिल्ह्यात खोदा. लहान ओढ्याला पर्‍ह्या. ठाणे जिल्ह्यात अनेक छोटे ओहोळ बहुधा समुद्राला मिळतात. कारण डोंगर आणि समुद्र यातील अंतर छोटे ओढे मिळून नदी बनण्याइतके नसते. अशा ठिकाणी ह्या ओढ्यांची मुखे ही खाड्या बनतात. त्यांमधून भरतीच्यावेळी खारे पाणी आत येते. वरच्या अंगाला शेती असते. शेतीत हे पाणी घुसू नये म्हणून ओढ्यांवरच्या मोर्‍यांना झडपा असतात. ओहोटीच्या वेळी त्या उघडल्या की वरच्या अंगाच्या गोड्या पाण्याचा प्रवाह पुढच्या शेतीसाठी वाहू लागतो. भरतीच्या वेळी त्या बंद करून ठेवाव्या लागतात. या रचनेला उघडी म्हणतात.

व्हकाल शब्दावरून एक फार पूर्वी ऐकलेली मालवणी म्हण आठवली. " बारा वर्सांच्या व्होकलेन् उचललो करो, आव्स् म्हणता मजो कुसवोच बरो." म्हणजे, बारा वर्षांच्या, घोडनवरी झालेल्या मुलीने एक साधा कर्‍हा उचलला तर तिच्या आईला कोण कौतुक वाटले. ती म्हणते, माझी कूसच इतकी चांगली,(की अशी मुलगी माझ्या कुशीत निपजली!). ह्या वरून त्या काळी बारा वर्षांच्या मुली सौ.कां. होण्याच्या मार्गावर असायच्या ही समाजस्थिती कळून येते.

@ अंजू
अहो, देवगडची बोली अशी काही वेगळी बोली नाहीये , देवगडात मालवणीच बोलली जाते. रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन सिंधुदुर्ग नवा जिल्हा झाला त्यावेळी रत्नागिरीच्या सीमेवरील काही गावे देवगड तालुक्यामध्ये समाविष्ट झाली असावीत. राजापूर, संगमेश्वरकडची भाषा वेगळी आहे. ती मालवणी नाही.

देवगड ,मालवण आणि वेंगुर्ला या तालुक्यांना समुद्रकिनारपट्टी लाभल्याने भौगोलिकदृष्ट्या त्यांना खालाटी (खालच्या बाजूचे) व इतर तालुक्यांना वलाटी (वरच्या बाजूचे) म्हटले जाते. वेंगुर्ला, दोडामार्ग या भागात भाषा जरी सारखी असली तरी उच्चारांमध्ये फरक आहे. जास्त हेल काढून बोलली जाते. (विषयांतर झाल्यासारखे वाटते आहे. असो , क्षमस्व)

मालवणी भाषेतील अजून काही शब्द:
पाटलन / पाटलोन -- पॅन्ट (हिंदी पतलून चा प्रभाव)
व्हायन -- छोटे उखळ जे जमिनीत बसवलेले असते (वर उल्लेखलेली ,नको नको जावया , व्हायन चाटून खावया हि गोष्ट प्रसिद्ध आहे असे वाटते. Happy )
काईलतो -- स्वयंपाकघरातील एक भांडे (उलथण्यासारखे )
भानशेरा - स्वयंपाकघरातील हातपुसणे किंवा गरम भांडे उचलण्यासाठी वापरात येणारे कापड
बारदान -- पायपुसणे
गवातगुळा -- अस्ताव्यस्त/ अव्यवस्थितरित्या पडलेले कपडे, अंथरुणे वगैरे , चोळामोळा या अर्थानेदेखील वापर
भूतुर -- __च्या आतमध्ये
माझ्याहारी , तुझ्याहारी--- माझ्याकडे , तुझ्याकडे ; इथे हारी हा अक्षरसमूह प्रमाण मराठीतील __कडे याप्रमाणे वापर (जसे शब्दयोगी अव्यय )
धगवणे -- जाळणे (होळी धगवल्यानी / धगवली ) धग- अग्नीची दाहकता आणि त्यावरून क्रियापद
वाटाप - कांदा -खोबऱ्याचे वाटण
हटाटिवळी- टिटवी
हेडो - कसाई किंवा गुरे विकत घेऊन ती कसायांना विकणारे
पोवता - राखी / पोवत्याची पोरणिमा -- राखी पौर्णिमा
धोंडस- काकडीचा किस (मोठे तवसे), गूळ आणि तांदळाचा रवा वापरून बनविलेला एक गोड पदार्थ. यालाच काही ठिकाणी 'टोपातले' म्हणतात.
उंबाळ-- पावसाळयात जमीन जलसंपृक्त झाल्यावर जमिनीखालून पृष्ठभागावर येणारे पाणी
वाढवण-- हिरकुंडाची झाडू , kharata
मुगडो -- वाढवणीची मूठ जी काथ्याच्या रश्शीची असते व ज्यात माडाच्या झावळ्यांचे तासलेले हिर गुंफलेले असतात.
मेंगेनी कुर्ली -- अतिशय संथगतीने काम करणाऱ्या स्त्रीसाठी उपहासात्मक विशेषण
इवाय-- व्याही
घळ-- आंबे उतरवण्यासाठी लांब काठीला झोळी बांधलेले साधन,झेला
बेंडकी -छोटी बेडकी , बेंडूक-- बेडूक , मोठे बेडूक जे माडाच्या मुळाशी न्हाणीघरातले पाणी वाहुन झालेल्या चिखलात सहज दिसतात.
आडाळो -- भाजी कापण्याची विळी
हुमन-- घुबड , बारशाच्या दिवशी संध्याकाळी तिला घुगऱ्या टाकल्या जातात
आळु का बाळू -- हा एक बाळाच्या बारशाच्या दिवशी केला जाणारा रिवाज आहे . ज्यामध्ये सवाष्ण स्त्रिया बाळाला पाळण्यात घालण्याच्या पूर्वी दगडी वरवंटा कापडात गुंडाळून पाळण्याच्या खालून वर असे गोल फिरवतात व मग बाळाला पाळण्यात घालतात.
कावाकोंबडी --भारद्वाज पक्षी
खण -- कातळावरील चिरे काढून झाल्यावर पडलेला मोठा घडीव खड्डा. ज्यात पावसाळ्यामध्ये पाणी साठवले जाते
कनो/ कने-- ओल्या सारवणात हाताच्या तीन बोटानी काढली जाणारी चुन्याची रांगोळी जी सारवण सुकल्यावर पुढच्या सारवणापर्यंत पक्की राहते
किसपाट -- कस्पट
उंडगो - उनाड या अर्थाने विशेषण
न्हेसान- कंबरेला नेसूचे कपडे जसे स्त्रियांसाठी-साडी इ व पुरुषांसाठी पॅण्ट
धगड-- नवरा ( शिवराळ वापर असा --आवशीचो धगड तुझ्या )

व्हकाल शब्दावरून एक फार पूर्वी ऐकलेली मालवणी म्हण आठवली. " बारा वर्सांच्या व्होकलेन् उचललो करो, आव्स् म्हणता मजो कुसवोच बरो." म्हणजे, बारा वर्षांच्या, घोडनवरी झालेल्या मुलीने एक साधा कर्‍हा उचलला तर तिच्या आईला कोण कौतुक वाटले. ती म्हणते, माझी कूसच इतकी चांगली,(की अशी मुलगी माझ्या कुशीत निपजली!). ह्या वरून त्या काळी बारा वर्षांच्या मुली सौ.कां. होण्याच्या मार्गावर असायच्या ही समाजस्थिती कळून येते.

@हीरा. होय. तुम्ही म्हणता ते योग्य आहे. माझ्या आजीचे (आईच्या आईचे) लग्न तेराव्या वर्षी झाले होते. कऱ्हा उचलणे वरून अजून एक वाक्प्रचार आठवला तो म्हणजे करा फुटणे म्हणजे लग्न होणे. हा वाक्प्रचार उपहासानेच वापरला जातो जसे '....तरी बरा हा अजून करो फुटत नाय हा ता '

Pages