ग्रामीण बोली भाषांतील शब्द.

Submitted by कोदंडपाणी on 30 January, 2019 - 06:04

शालींच्या मैत्रचे भाग वाचताना त्यातील पात्रांच्या तोंडात अनेक ग्रामीण शब्द वाचले. काही मजेशीर वाटले. प्रत्येक प्रांताची जशी आपली एक खाद्यसंस्कृती असते तशी एक भाषाही असते. त्यातल्या त्यात ग्रामीण भाषा तर अतिशय गोड असते. त्यात वापरले जाणारे शब्द रोजच्या व्यवहारात वापरले जात असले तरी ते प्रमाण मराठी भाषेत नसल्याने सहसा लिखानात येत नाही. शहरांमधे तर ते बोलण्यातही येत नाही. तर असेच वेगवेगळ्या प्रांतातील ग्रामीण भाषेतील मजेदार, वेगळे शब्द वाचायला मजा येईल. सांगली, कोल्हापुर, नागपुर, नगर, कोकण आणि महाराष्ट्रातील अनेक भागात वेगवेगळे शब्द वापरले जातात ते येथे लिहिले तर सर्वांना ते वाचण्यातला आनंद मिळेल तसेच त्यांचे अर्थही कळतील. उदा. आमच्या जुन्नर भागात वापरले जाणारे काही शब्द:

यळोमाळ: येथे तेथे किंवा दिवसभर
कव्हर: किती वेळ
उलसक किंवा उलीशीक: अत्यंत थोडे.
फिंद्री: खोडकर मुलगी
पाठ: शेळी

तुमच्याकडेही असे काही शब्द असतील तर अर्थासहीत व जमल्यास वाक्यासहीत येथे लिहा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खाली जे मोठे चाक असता त्याला बहुधा कणा म्हणतात. अजून एक ओढ्यात किंवा नदीत खड्डा केलेला असतो त्याला भुडकी म्हणतात. नदीला पाणी असेल तरच त्यावर मोट चालते. पुढे पाणी पडायला दगडात बांधकाम केलेले असते त्याला थारोळं म्हणतात. रक्ताचा थारोळं याच्यावरूनच आलंय. सोंदूर एक लहान दोर असतो ज्याने मोटेचा खालचा भाग घडी पडून वर राहतो व वर आल्यावर तो सोडून मोट खाली होते. कण्यावरून सोंदूर खाली सोडलेला असतो. वर येताना मोट लंबकाप्रमाणे हेलकावत येते म्हणून कणा दोन अडीच फूट रुंद असतो त्यामुळे मोटेला हिसके बसत नाही नाहीतर हिसके बसून मोट लवकर फाटते.

भुडकी माहित नव्हते.
मोटेतले पाणी पडण्याची जी जागा असते तिला मोटवटा म्हणतात. हा साधारण पाच सहा फुट लांब असतो. तो जेथे संपतो तेथे आयताकृती दगडी व थोडा खोल हौद असतो. यात पाणी येते आणि मग पाटाला जाते. त्या हौदाला थारोळे म्हणतात. थारोळ्या शेजारीच दगडी डोण असते. तिचा उपयोग बैलांना पाणी दाखवण्यासाठी व्हायचा.
जनावरांना पाणी दाखवणे म्हणजेच पाणी पाजणे.

मोटेची खुप छान माहिती दिलीत. धन्यवाद.
कोकणात मोटेऐवजी मोठे चाक असते ना विहिरीवर? त्याला काय म्हणतात?

कोकणात जुन्या काळी बैल रहाट असत. साधारण साठ सालपर्यंत असतील. विहिरीच्या मध्यावर मोठं गोल चाक, त्याला ओळीने बांधलेली मडकी असत (रहाट-गाडगे) ते चाक म्हणजे रहाट चालवायला एका बैलाला झापड बांधून विहिरीभोवती गोल प्रदक्षिणा मारायला लावत. त्याबरोबर ते चाक आकाश पाळण्यासारखं गोल फिरून मडकी भरभरून पाणी शेंदले जायचे. त्यानंतर हाताने फिरवायचे लहान लाकडी रहाट आले आणि साधारण ऐशी नव्वद सालापासून पंपानेच पाणी खेचले जाते.

फार सुंदर धागा, अतिशय सुंदर माहिती मिळतेय.

भाऊकाका चित्र मस्तच.

दोन-तिन फुटांच्या आसपास व्यास असे. >>> त्यापेक्षा जरा मोठी चौकोनी असणारी, घरात पाणी साठवण्याची जागा त्याला हौद म्हणतो आम्ही. माहेरी घरात पाणी साठवण्याचा मोठा चौकोनी हौद आहे कोकणात. सासरच्या घरी नाहीये.

कोकणात पण वेगवेगळ्या ठिकाणी शब्द बदलतात. माहेरी रत्नागिरी जिल्ह्यात आम्ही अंगण म्हणतो त्याला सासरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळे म्हणतात. कुंपण घालतो चीरेबंदी त्याला अजूनही सासरी गडगा हाच शब्द वापरतात.

इरलं शब्द कित्ती दिवसांनी ऐकला. फार गोड शब्द.

आम्हीपण झाडूला केरसुणी म्हणतो. हिर काढलेल्या झाडूला खराटा म्हणतो. काहीजण त्याला केरसुणी म्हणतात. हिर नारळाच्या झावळ्यांतून काढतात.

घराच्या बाहेर सरपण वगैरे ठेवायला वेगळी खोली असते, तिला खोपी म्हणतात आमच्याकडे.

गवार (भाजी) असते तिला सासूबाई बावचा म्हणतात.

हीरा भाषाशास्त्र उत्तम जाणता...
तुमचे प्रतिसाद जेवढे अर्थपूर्ण तेवढेच रंजक आहेत . या अनुषंगाने अजून लिहा. आम्ही आवडीने वाचत राहू. >>> अगदी अगदी.

जुना ठाणे जिल्हा हा एके काळी आदिवासीबहुल होता. अनेक बोली इथे नांदत होत्या. वाडवळ, कोळी, सामवेदी, विश्वकर्मा पांचाल अशा अनेक बोली होत्या. ईस्ट इंडिअन कोळ्यांची वेगळी गोड बोली असे. >>> हो, अजूनही वसई, विरार, पालघर ( आत्ताचा पालघर जिल्हा) भागात बोलत असावेत कारण आम्ही काही वर्ष नालासोपारा इथे राहायचो तेव्हा ट्रेनमध्ये विशेषतः सकाळी वाडवळी भाषा ऐकायला मिळायची.

*आम्हीपण झाडूला केरसुणी म्हणतो. हिर काढलेल्या झाडूला खराटा म्हणतो. * - सिंधुदुर्गात झाडूला ' वाडवण' असंही म्हटलं जात/ जात असे.
मोट माहित असली तरी त्या अनुषंगाने येणारे इतके शब्द व इतकी माहिती केवळ या धाग्यामुळेच मिळाली..फारच छान !
मोटे प्रमाणेच विहिरीतून बागायतीसाठी पाणी काढायला कोकणात ' लाट ' हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकार प्रचलीत होता. कुणी लिहूं शकेल का त्यावर?

मी इथे वाचनमात्र आहे.
चिडकू, तो एखाद्या चित्रपटातला तुकडा उचलून त्याला कॉमेंट्री जोडली असावी.

इथे वाचलेले काही शब्द चित्रपटगीतांत ऐकलेले आठवतात. जसं येरवाळी - मला लागली कुणाची उचकी - पिंजरा.
काही वाक्प्रचारात , म्हणींत- त्यांचा अर्थ इथे उलगडला - मुसक्या आवळणे, गाशा गुंडाळणे.

मला वाटते ही लाट 'गारंबीचा बापु' चित्रपटात पाहीली आहे मी.

आमच्या शेतात काम करायला येणाऱ्या स्रिया गरिबीमुळे नाकात किंवा कानात दागिने घालू शकायच्या नाहीत. पण त्यामुळे छिद्रे बुजू नयेत म्हणून हिराची काडी (हिरकुट) टोचून ठेवायच्या ते आठवले. वाईटही वाटले.

झाडुला आज्जी नेहमी लक्ष्मी म्हणायची. मागे उल्लेख झालाय तरी येथे पुन्हा लिहितोय. आज्जी मिठाला साखर किंवा गोड म्हणायची तिळाला हावरी.

तसेच शिळ्या भाकरीचे लहान तुकडे करुन ते विस्तव असलेल्या चुलीवरील तव्यावर रात्रभर ठेवायचे. सकाळी ते चांगले तांबुस, खरपुस व्हायचे. त्यांना कोरके म्हणतात. हे कोरके खिशात घालुन ते खात आम्ही दिवसभर शेतात भटकायचो. काय सुरेख दिवस होते ते.
आंबे मुबलक असले तरी घाटावर आम्हाला फणसाचे फार अप्रुप असे. दोन तिन वर्षातुन कधीतरी खायला मिळे. तेही जर कुणी मुंबईवरुन आणले काही गरे तर. सुरवातीला त्या गरालाच मी फळ समजत असे.

*भाऊ, मी वर बैल रहाटा बद्दल लिहिलंय त्यालाच लाट पण म्हणायचे बहुतेक.* - नाही. कोकणात ' लाट' हा वेगळाच प्रकार होता. त्यांत बैलांचा वापर नसे. ( मलाच माझ्या रांगडया चित्रकलेचा वापर करून त्यावर लिहावं लागणार, असं दिसतंय. Wink )

तसेच गाशा म्हणजे स्लिपिंग बॅगचाच प्रकार होता. >>> अच्छा,त्यावरून तो गाशा गुंडाळणे आलं का!

वाळकावर मागच्या पानांवर लिहिलं गेलंय.पण आज माझ्या बाईबरोबर 'मार्तिन कोली"ची गोष्ट सांगताना तिनेही वाळकाची मला अनोखी असणारी माहिती दिली.वाळूक म्हणजे छोटी काकडी .श्रावणात ज्या काकड्या येतात,त्या मोठ्या असतात.ती पिकलेली वाळकं उभी चिरून त्या भकलातील पाण्यात वात बुडवून नवरात्रात तेवत ठेवतात.
म्हटलं,पाण्याने कशी वात पेटेल? तर म्हणे आमच्या डोळ्यादेखतची गोष्ट आहे.कदाचित तिची आई तेल वगैरे घालत असेल ते तिला माहितही नसेल म्हणून विषय संपवला.
सॉरी फॉर अवांतर.

गाशा हा साधारणपणे प्रवासात वापरायचा प्रकार असायचा. घोड्यावरुन वगैरे फिरताना. त्यामुळे गाशा गुंडाळला की निघायची तयारी व्हायची. त्यामुळे "गाशा गुंडाळा आता तुमचा" म्हणजे "निघा आता"

तसेच पुर्वी ऐनवेळच्या लढाईला सैनिकभरती व्हायची. सैन्य युध्दकुशल असण्याची आवश्यकता नसायची फक्त समोरच्या सैन्यावर दबाव टाकन्यासाठी संख्या महत्वाची असायची. त्यामुळे मिळेल त्याला सैन्यात भरती करत. त्यांची मोजदाद व्यक्तिनुसार न करता घोड्यानुसार करत. म्हणजे किती खोगीर जमा झाले हे पहात. (खोगीर म्हणजे घोड्याच्या पाठीवर बसण्यासाठीचे चामडी आसन.) त्यामुळे मुर्खांच्या किंवा अकुशल लोकांच्या भरतीला 'खोगीर भरती' नाव पडले. जे आपण आजही वापरतो. तसेच सैन्यामुळे मिळालेले अनेक वाक्प्रचार आजही वापरात आहेत. जसे पाचावर धारण बसणे. पाचावर धारण जाणे किंवा बसणे हा धान्याचा बाजार भाव आहे. साधारण एक ते सव्वापर्यंत धारण असेल तर सैन्यात धान्य स्वस्त आहे असे समजले जाई. पण अगदी पाचाच्या वर धारण गेली याचा अर्थ सैन्याला फाके पडणार हे नक्की. त्यामुळे सैन्य घाबरुन जाई. त्यामुळे घाबरण्यासाठी "त्याची पाचावर धारण बसली" म्हणतात. या बाजारभावाविषयी येथे कुणीतरी व्यवस्थित सांगु शकेल बहुतेक.

*त्यामुळे घाबरण्यासाठी "त्याची पाचावर धारण बसली" म्हणतात.* ग्रेट ! शालीजी, आतां हा शब्द वापरताना/ ऐकतांना तुमची आठवण येईलच पण शब्दाची गंमतही दुणावेल !

गाशावरुन एक आठवले. घोड्यावर खोगीर घालायच्या अगोदर एक चामड्याचे तुकडे जोडुन तयार केलेले आच्छादन घोड्याच्या पाठीवर घालायचे. त्याचा बराचसा भाग हा घोड्याच्या दोन्ही पुठ्यांवर येई मग खोगीर आवळत असत व त्यावर गाशा टाकत. या चामडी आच्छादनाला पाखर म्हणत. त्यामुळे घोड्याच्या पुठ्यांना काट्याचा, झुडपांचा त्रास होत नसे. आपण "मायेची पाखर घालणे" असं म्हणतो ती हिच पाखर. मायेची पाखर घालणे हा वाक्प्रचार नसुन ती उपमा आहे. माझ्या आजोबांच्या घोड्याची पाखर आत्ता काही वर्षांपुर्वीपर्यंत आमच्याकडे होती. तिचे नंतर तुकडे पडले.

मोटेचीही एक छान आठवण आहे. विहिरीचे पाणी जितके खोल तितके मोट ओढणाऱ्या बैलांना दुर जावे लागे. एका मोटेला दोन किंवा तिन दोर असत. मोटेच्या भाराने ते ताणले जात. त्यावर बसायला फार मजा येई. अर्थात हे जरा ट्रिकी असायचे पण धोकादायक नसायचे. कारण पायाखालीच जमीन असायची.

जरा अवांतर झाले पण खुप छान आठवणी आहेत या. आणि दुर्दैवाने मुलांना त्या समजावुन सांगता येत नाही कारण त्यांना एकुणच मोट समजत नाही, समजले तरी पुर्वीची माणसे का वेड्यासारखी कष्ट करायची साधं बटन दाबायचे सोडुन हे त्यांना कळत नाही. त्यांनाही दोष देता येत नाही. आज्जी जात्यावर दळायची म्हणुन मला जाते आणि त्याचा खुंटा माहित आहे पण तो खुंटा ठोकायचा एक दगड असायचा त्याला काय म्हणतात तसेच पिठ गोळा करण्यासाठी कुंचा असे त्यालाही विशिष्ट नावे होते ते आता आठवत नाही.

धारण - घराचे २ मुख्य खांब ज्यावर आढे आडवे बसवतात

आढे/ आडे - घराचा छताचा मुख्य आडवा आधार

वळचण - छपराचा भिंती बाहेर आलेला भाग. पावसाचे पाणी भिंती वर उडू नये म्हणून थोडा पुढे घेत. त्याला पत्र्याच्या पागोळ्या सुद्धा असतात.

यावरून वळचणीची गंगा आढ्याला अशी म्हण आली. याचा अर्थ लहान माणसाला मोठी जबाबदारी देणे.

जुन्या काळात साधारण अशी घरं बांधत. देशी कौलं वापरत. नंतर मंगलोरी कौल वापरायला सुरुवात झाली.
https://www.youtube.com/watch?v=P73REgj-3UE

लाठ हे एक खोल खड्ड्यातून किंवा विहिरीतून पाणी उपसायचे मेकॅनिझम असते. ठाणे जिल्ह्यात त्याला ढाकवा म्हणतात. ज्या विहिरींना कठडा नसतो अशा ठिकाणी हे वापरतात. खड्ड्याच्या काठावर जरा अलीकडे लाकडाचे एक मजबूत बेचके ( Y आकाराचा जाड फांदीचा तुकडा ) जमिनीत भक्कम पुरतात. मग एक चांगली मजबूत सरळ फांदी त्या बेचक्यामध्ये अशी बसवतात की तिचे एक टोक बेचक्याजवळ येईल आणि दुसरे खड्ड्याच्या मध्यापर्यंत पोचेल. शिवाय बेचक्याच्या आधाराने ती काठी तरफेसारखी वर खाली हलू शकेल. या काठीला बेचक्याजवळच्या टोकाला एक जड चौकोनी शिळा व्यवस्थित बांधून बसवतात. दुसऱ्या टोकाला एक लवचिक बांबू अथवा जाड सुंभ बांधतात जो विहिरीच्या आत पोचू शकेल. या बांबूच्या अथवा सुंभाच्या टोकाला विहिरीतून पाणी भरून घेण्यासाठी एक लाकडाचे अथवा लोखंडाचे अर्धगोलाकार भांडे बसवतात. या विहिरीवर एक मजबूत वासा/ फांदी बेचक्यापासून पुढे आडवा बसवलेला असतो. दगडाच्या वजनामुळे बेचक्यातल्या फांदीचे एक टोक जमिनीवरच राहाते. पाणी काढण्याच्या वेळी दुसऱ्या टोकाकडून खाली आलेल्या सुंभाला अथवा वाश्याला थोडा जोर लावून खाली खेचायचे आणि विहिरीवर बांधलेल्या फळी/ फांदीवर उभे राहून पाण्याचे भांडे विहिरीत बुडवायचे. भांडे वर आणताना थोडासा जोर पुरतो कारण काठीच्या एका टोकाला जड शिळा तर दुसऱ्या टोकाला लांब दोराने/ बांबूने टांगलेले पाण्याने भरलेले भांडे अशी तरफ तयार होते. पाण्याच्या भांड्याची भुजा टेकूपासून लांब झाल्याने भांडे वर खेचायला जोर कमी लागतो. ते भांडे पुरेसे खेचून काठाजवळ आणायचे आणि बाहेर रिकामे करायचे. हे करताना काठीच्या दुसऱ्या टोकाला बांधलेल्या वजनामुळे ती आपोआप वर जाते. पाणी साठवण्याची अथवा वाहून जाण्याची सोय केलेली असतेच.
ही क्रिया फक्त एकदोनदाच बघितली आहे त्यामुळे हे वर्णन बरोबर असेलच असे नाही. जाणत्यांनी दुरुस्ती करून भर घालावी.

हीरा, मीं हीच 'लाट ' म्हणत होतो. सिंधुदुर्गात यात थोडासाच फरक असतो /असायचा. *आणि विहिरीवर बांधलेल्या फळी/ फांदीवर उभे राहून पाण्याचे भांडे विहिरीत बुडवायचे * - ही फळी विहिरीच्या कांठापासून खालच्या दिशेने तिरकी लावलेली असते. पाणी काढणारा पाण्याच्या रिकाम्या भांडयावर ( याला 'कोळंबं' म्हणतात) पाय ठेवून , त्याला जोडलेल्या बांबूला घट्ट धरून खालच्या दिशेने फळीच्या मध्यावर उडी मारतो. त्यामुळे बांबूला जी ' मोशन' मिळते तीचा फायदा घेत कोळंबं पाणयापर्यंत नेणं व पाण्यात बुडवून काढणं सोपं जातं पण ताकद लागतेच. ती लय सांपडली कीं अखंड एकेक तास सहजपणे लाटेने पाणी काढणारे पाणीदार झिलगे ( तरूण) मीं पाहिले आहेत.

असा एक दक्षिणाने काढलेला धागा आठवतो - https://www.maayboli.com/node/50944

आणखी काही शब्द -

गवतार = गोमूत्र
सड = ज्वारी, बाजरी, तूर इ. ची काढणी केल्यावर त्याच्या रोपांच्या बुडख्याचा जमिनीत मुळासहीत, आणि जमिनीवर राहिलेला काही इंचाचा भाग. तुरीचा सड एकदम डेंजर. पायात घुसला तर फार दमवतो.
गार = उकिरडा (मुख्यत: शेण आणि पालापाचोळ्याचा. ज्यात रोज गोठा स्वच्छ करून जमा झालेले शेण/पाचोळा टाकले जाते. त्यातून वर्षाकाठी नैसर्गिकरित्या तयार झालेले उत्तम प्रतीचे शेणखत मिळते. )
माळवं = भाजी (डोक्यावर पाटीत आपल्या शेतातील भाजी घेऊन दारोदार जाऊन विकणाऱया बाईला माळवंवाली म्हणतात).
ईळ = दिवस (ईळभर = दिवसभर)
रोज = दिवस (चाररोज = चार दिवस)
(ईळ आणि रोज वेगवेगळ्या संदर्भात वापरले जातात. )
बडवणे/चोपणे = घरातली भुई उकरून, पाणी शिंपून झाल्यानंतर तिला चोपून सपाट/गुळगुळीत करण्यासाठी असलेला लांबोडका लाकडी ओंडका. एका लांबोडक्या बाजूला धरायला मूठ असते. हे वापरण्यासाठी पायांवर बसावे लागते.
धुमूस = घरातली भुई उकरून, पाणी शिंपून झाल्यानंतर तिला चोपून सपाट/गुळगुळीत करण्यासाठी असलेले लोखंडी वजनी अवजार. दोन इंच उंचीची भरीव आणि साधारण पाऊण फूट व्यासाची एक लोखंडी चकती असते. वरच्या वर्तुळाकार पृष्ठभागावर केंद्रस्थानी बांबूचा चारपाच फूट उंचीचा दांडा ठोकून बसवण्याची सोय (भोक) असते. धुमूस उभे राहून वापरतात. यावरून धुमश्या कुटणे असा वाक्प्रचार आहे.
वईल = चुलीला जोडून असलेली उपचूल, जिला जळण घालण्यासाठी वेगळे तोंड नसते, तर मुख्य चुलीतून आतून तिकडे जाळ जाण्यासाठी बोगदा असतो.
बेस्तरवार = गुरूवार.
भातकुंड = तांदळातला आख्खा साळीचा दाणा (वर ललिताने त्याला भातगोटा असा शब्द दिला आहे).
पान लागणे = सर्पदंश.
लांबडं = साप ( भितीमुळे 'साप' असे थेट नाव घेतले जात नाही. त्याऐवजी 'लांबडे').
पैरा / पुट्टा करणे = शेतातल्या कामासाठी संघ बनवून त्या संघातल्या सगळ्यांच्या शेतातली कामे मिळून सगळ्यांनी करणे.
उदा.
- माझा आणि त्याचा पैरा आहे.
- ती माझ्या पुट्ट्यात नाही. शेवंतीच्या पुट्ट्यात आहे).
उक्ते = होलसेल, रेडीमेड.
भांगलण = शेतात बसून खुरप्याने शेतातले तण काढणे. यात एका ओळीतल्या दोन रोपांमधले तण काढता येते.
तिरावडे = भांगलताना चिखलात बसण्यासाठी बनवलेली छोटी खुर्ची. (साधारण ०.७५ x १ फूट आकाराची एक फळी दुसर्‍या एका थोड्या लहान आकाराच्या फळीला मध्ये बांबूच्या दांड्याने जोडलेली असते. मोठी फळी चिखलात सपाट बसते आणि वरच्या लहान फळीवर माणसाने बसायचे. एका जागी बसून तिथले तण काढायचे. मग तिरावडे उचलून पुढे ठेवायचे, तिथले तण काढायचे. असे करत करत शेताच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत जातात. सहज उचलून घेऊन जाता येईल असे असते).
काकरी = पिकांच्या रोपांची ओळ.
पात = भांगलताना समजा एकाच वेळी मी पाच काकर्‍या तण काढण्यासाठी ( in parallel ) घेतल्या, तर ती माझी पात.
कोळपणे / बिलंगणे = कोळपा / बिलंगा नावाच्या अवजारांच्या साहाय्याने तण काढणे. कोळपा मनुष्यबळावर अथवा बैलांनी ओढला जातो. यात दोन ओळींमध्ले तण काढता येते. पण एका ओळीतल्या दोन रोपांमधले तण काढण्यासाठी खुरप्याने भांगलण्याला पर्याय नाही).
कोळपा आणि बिलंगा ही दोन वेगळी अवजारे आहेत.
ढू = डोह.
हेळ = मोठा डोह (पण बांधीव विहिरीपेक्षा लहान).
अर्धं पत्र = मरणाची बातमी घेऊन आलेले पत्र. ( पूर्वी मृत्युची बातमी कळवताना पत्रात, अमुकामुक व्यक्तीस या तारखेस देवाज्ञा झाली, इतकेच लिहून पत्र पाठवले जायचे. बाकी पत्र कोरेच राही त्यावरून 'अर्धे पत्र' असा शब्दप्रयोग).
रॉण्ड = बैलगाड्यांची शर्यथ (राऊंड या इंग्रजी शब्दाचा अपभ्रंश असावा).

@देवकी = कोकणातले तवस म्हणजेच वाळूक होय. त्याच्या लहान कोवळ्या रुपाला शहरात काकडी म्हणतात).

कोकणातील विहिरींना पाणी वर असल्याने लाट व रहाट तर देशावर विहिरी खोल असल्याने मोट दिसते.
लाट चे प्रत्यक्ष दर्शन !
https://www.youtube.com/watch?v=u9Z407G4G3w

भाऊ, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. आता आठवले. होय, उडी मारावी लागतेच. आणि त्या भांड्याला कोळंबेच म्हणतात. हा शब्द आठवतच नव्हता. धन्यवाद.
चिडकू यांनी दिलेल्या यू ट्यूब च्या दुव्यामध्ये ह्याला रहाट म्हटले आहे ते चुकीचे आहे. रहाटाला दोन चाके मधल्या आसाने जोडलेली असतात. चाकांना आर्‍यांऐवजी टोकाला खुंटीसारखा गोलाकार असतो ज्यामुळे तो गाडा फिरवणे सोपे जाते. रहाट हा शब्दच रथ या शब्दावरून आलेला आहे.

मोट हा बल्कमधे पाणी काढण्याचा प्रकार. शेताला पाणी देण्यासाठी रहाट उपयोगाचा नाही.
रहाटाने शेंदून काढलेलं पाणी घरच्या/पिण्याच्या रोज वापराच्या "आडा"साठी ठिक आहे.
शेतीला पाणी देण्यासाठी मात्र मोट, किंवा तत्सम मोठे भांडे.
मोट ही लाकडी सांगाड्याला चामड्याची खोळ करून बनवलेली. तितकं पाणी "शेंदायला" २ बैल लागतात. ती मोट वर आली की शेतकरी त्या दोरावर बसतो, ज्यामुळे विहिरीजवळ बांधलेल्या हौदात मोट ओतली जाते. तिथून पाणी पाटाला. बैल उलट चालत मागे आले की मोट परत विहिरीत जाते.
हे सगळं लहानपणी पाहिलं अन केलं आहे. आजकाल लिफ्ट अन मोटर.

Pages