पुरणपोळी - रवा मैद्याची

Submitted by VB on 12 January, 2019 - 13:19
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

चणा डाळ - अर्धा किलो
रवा अन मैदा - पाव किलो प्रत्येकी
सुंठ - अंदाजे एक इंच
५-६ वेलची
गूळ - अर्धा किलो
तूप
मीठ
खायचा सोडा
पाणी
आणि
हळद

क्रमवार पाककृती: 

परातीत थोडे पाणी घेऊन त्यात साफ केलेला रवा अन मैदा घ्यायचा. त्यात चिमूटभर मीठ अन सोडा घालायचा. अर्धा चमचा हळद घालून पीठ घट्ट मळून घ्यावे. दुसऱ्या एका भांड्यात त्यांब्याभर पाणी घालून त्यात पिठाचा मळलेला घट्ट गोळा भिजवून झाकून ठेवा. हे पीठ किमान तास दिडतास तरी भिजवायचे(हा वेळ वर धरला नाहीये).

आता जोवर पीठ भिजतेय, पुरणाची तयारी करायची.
जितका कट हवा त्याच्या सव्वापट पाणी उकळायला ठेवा. पाणी उकळले की त्यात चणाडाळ घालून शिजवायची. फक्त काळजी घ्या की डाळ जास्त शिजायला नको. डाळ एक कण कच्ची असताना त्यातले पाणी काढून घ्या. अन हो आच मंद ठेवा, नाहीतर डाळ करपेल. आता त्या डाळीत चिरलेला गूळ, सुंठ अन वेलची पावडर घालुन नीट मिक्स करून घ्या. गूळ जसा गरम होईल तसे त्याला पाणी सुटते. सो जास्तीचे पाणी आटवून घ्यावे. पाणी आटले की गॅस बंद करून पुरण थोडे गार होऊ द्या. आता गार झालेले पुरण पाटा, पुरण यंत्र वा मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यायचे. आम्ही पुरण चाळणीत वाटून घेतो मस्त बारीक होते. अन मग बारीक वाटलेल्या पुरणाचे गोळे करायचे. आमच्याकडे पुरण भरपूर भरतात त्यामुळे अर्धा किलो डाळीच्या फक्त ११ पुपो होतात.

पुरणाचे गोळे झाल्यावर भिजत घातलेल्या पिठाकडे वळूयात.

पिठाचा गोळा जास्तीचे पाणी काढून परातीत घेऊन नीट मळून घ्यायचा. मळताना हाताला तूप किंवा तेल लावायचे कारण हे पीठ चिकट असते अन मळायला त्रासदायक देखिल ☺️

पुरणाचे गोळे झाले, पीठ मळून झाले की तवा गरम करा. ही पोळी शेकायला खूप नाजूक असते सो आच खूप जास्त ठेवायची नाही अन खूप कमी पण नाही.

पिठाचा बारीक गोळा करायचा अगद लहान पुरीला लागतो तेवढा. तो मैद्यात लोळवून त्याची छोटी पारी करायची, त्यात पुरणाचा गोळा भरून पारीचे तोंड बंद करायचे. अन परत थोडासा मैदा लावून हलक्या हाताने पोळी लाटून भरपूर तूप लावून शेकायची.

गरमागरम पुपो तयार. तुम्हाला हवी तशी खा, दुध, आमरस, गुळवणी सोबत वा नुसती.
आम्ही पुपो गुळवणीत कालवून खातो, सोबत तोंडलावणी ला बटाट्याची भाजी ,पापड अन कटाच्या आमटीचे भुरके☺️

अन हा पूर्ण भरलेल्या ताटाचा फोटो

Screenshot_2019-01-06-21-08-15-442_com.miui_.gallery_0.png

वाढणी/प्रमाण: 
४/५
अधिक टिपा: 

१-सुंठ, वेलची ची पावडर करताना त्यात थोडी साखर घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची.
२-रवा मैद्याची पारी लाटायला अन शेकायला खूप कठीण असते, सो दोन्ही खूप हलक्या हाताने करायचे नाहीतर पोळी फुटते.
३-पुरण वाटताना खूप जास्त कोरडे झाले तर कटासाठी काढलेले थोडेसे पाणी घाला

माहितीचा स्रोत: 
आई
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Ok VB, पुढच्या वेळेस प्रयोग करून पाहते.

पुरणपोळीसारख्या कठीण पदार्थाची इतकी सोपी पाकृ दिल्याबद्दल अगदी मनापासून आभार. मला कालपरवापासून पुपो खावीशी वाटत होती, नवीन पाकृ बघितल्यावर राहवलेच नाही. मस्त वाटले खाताना. थँक्स गं.

१ लहान वाटीच्या (रवा+मैदा) पु.पो करून पाहिल्या.१.३०तासाऐवजी तास-सव्वा तास पीठ पाण्यात भिजत ठेवले होते.खायचा सोडा घालायला विसरले.माझे पाककौशल्य(?) असेल,पण पु.पो फुगली नाही,चिरा गेल्या.काठावर नाही.तरी जरा खुसखुशीत झाली.
अर्धी डाळ भांड्यात आणि अर्धी कुकरात शिजवली.मागे कोणी म्हटल्याप्रमाणे गूळ घातल्यावर डाळ कडक झाली,पण झाले पुरण.पुपोकेलीच परत तर कुकरमधेच डाळ शिजवणार.उगाच त्रास नको.

सोडा विसरूनही पुपो मस्त झाल्या या प्रमाणे कणीक भिजवून. मस्त सैल तरी लाटायला सोपं झालं. आता मैदा संपला पण साधी कणीक आणि थोडा रवा घालून दुसऱ्या हप्त्यात करणार. घट्ट गोळा भिजवून पाण्यात ठेवलाय.

मीही करून पाहिल्या ह्या कृतीनं. पण मी काहीतरी चूक केली असावी. खूप चिवट झाल्या. काय चुकलं असावं VB?

पुरणाची एकअजून पद्धत ऐकली.डाळ शिजल्यावर कट काढून कोमट/थंड डाळ मिक्सरमधून काढायची.मग त्यात गूळ घालून शिजवायचे.कोणी अशा प्रकारे केली आहे का आधी?

देवकी तुम्ही म्हणता तसं पुरण करते मी, फरक एवढाच की हँड मिक्सि वापरते डाळ वाटण्यासाठी, गूळ बारीक चिरून घेते आणि दोन्ही एकत्र करून चटका देते

हँड मिक्सि म्हणजे आपले ते पुरणयंत्र का? मला ते विकत घ्यायचे नाही. मागे पुरण वाटताना फु.प्रो.मेला.केवळ पुरणासाठी फु.प्रो.घ्यायचा नाही.नंतर ती चाळणी होती,त्यावर आमची ताई करून द्यायची कधी कधी.यावेळी मी वाटलं(घासलं),तर जाम कंटाळा आला.त्यापेक्षा आता विकतच्याच पुपो आणेन.

मिक्सर खूप चिकट होते, फुप्रो ची पण तीच गत.. तसं होऊ नये म्हणून डाळ जास्त शिजवावी, नेहमीपेक्षा जास्त शिट्या देऊन... जास्तीचे पाणी/कट काढून हँड ब्लेंडर/मिक्सि/पाभा मॅश र / लाकडी रवी वापरून बारीक वाटावे

मिक्सर खूप चिकट होते, फुप्रो ची पण तीच गत.. तसं होऊ नये म्हणून डाळ जास्त शिजवावी, नेहमीपेक्षा जास्त शिट्या देऊन... जास्तीचे पाणी/कट काढून हँड ब्लेंडर/मिक्सि/पाभा मॅश र / लाकडी रवी वापरून बारीक वाटावे>> हो माझा पण हाच अनुभव
मी अश्या चाळणीतून बारीक करते .. वरून छोटा बत्ता किंवा रवी ने गोलगोल घोळलं कि मस्त पुरण होत . ..

siebe.jpg

काल करून बघायची फार ईच्छा होती पण देवकीचा प्रतिसाद वाचून अवसान गळलं .
उद्या धीर गोळा करेन म्हणतेय Happy

प्रतिसाद वाचून अवसान गळलं >>>>>>> अवसान नको गाळू. त्यादिवशी २२-२३ पुपो केल्या.फक्त टाईमलिमिट होतं मला म्हणून प्रत्येक गोष्ट वैतागाची वाटली.

छोटा बत्ता किंवा रवी ने गोलगोल घोळलं कि मस्त पुरण होत . >>>> माझ्याकडे टोपल्यासारखी चाळण आहे. मातोश्रींनी मोठ्या साईजचे घेतली होती माझ्यासाठी.फुलपात्राच्या तळाने घासायचे पुरण.

वर म्हटल्याप्रमाणे मी कणीक जास्त आणि थोडा रवा, मैदा नाही, अशी ४-५ तास भिजवून ठेवली. या सुद्धा पोळ्या खुसखुशीत तरी मऊ झाल्या. मी ३५ केल्या दोन्ही प्रकारच्या मिळून. घरी सगळे जण खूष आहेत!

माझ्याकडे पीठाची चाळण आहे. पुरण करायला मी तीच वापरते.
शिजवलेली डाळ गरम असतानाच वाटायची (मग त्यात गुळ घालून परत गरम करायचे) किंवा पुरण गरम असतानाच वाटले तर पटकन वाटले जाते.

केल्या बाई काल पुरणपोळ्या !
माझी गत देवकीसारखीच झाली. चिरा गेल्या आणि पोळ्या कडक झाल्या.पण गरम गरम असताना तोंडात अगदी विरघळत होत्या.थंड चिवट लागल्या.
मी अर्धा किलो ऐवजी एक कप प्रमाण घेतलं.
माझ्या मते , पीठात रवा जास्त झाला. रव्याचा वास आणि रवाळपणा जाणवत होता. मैदाची elasticity कमी वाटली. त्यामुळे उंडे बनवतानाही फुटत होते.
पुरण मात्र मस्त बनले.
डाळ कुकरला लावून 5 शिट्या काढल्या.मग जास्तीच पाणी काढून डाळ घोटून घेतली. Nonstic pan मध्ये ती सरसरीत डाळ आणि चिरलेला गुळ आटवायला ठेवला. पण मध्ये मध्ये जाडसर डाळ दिसत होती. म्हणून बर्यापैकी आटलेलं गरम पुरण परत गाळणीवर वाटून काढलं. अगदी लुसलुशीत.
आयुष्यात पहिल्यांदाच अथपासून इतिपर्यंत पुरणपोळ्या केल्या. पहिला प्रयत्न थोडा फसला ,पण भारी confidence आलाय.

तरी जाणकारांनी शंकानिरसन करावे :
1. पाण्यात भिजवलेलं पीठ मळायला घेतलं तेव्हा मेदूवड्याच्या पीठापेक्षा किंचित घट्ट होतं. जामच तेल आणि मेहनत लागली मळायला. माकाचु ??
2.पोळया , थंड झाल्यावर चिवट का झाल्या असाव्यात ??
3. रवा कमी घ्यावा तर नक्की काय प्रमाण घेऊ ?

स्वस्ति कशानेही मोजले तरी 1:1 प्रमाण ठेवता येते. भिजवलेला गोळा पाण्याखाली जाईल इतके पाणी ओतायला हवे भांड्यात.

स्वस्ति,
चिवट झाल्या म्हणजे तेलाने नीट मळलं नाही पीठ भिजवल्यावर.

कणीक कमी भिजली. रवा मैदा वेगळा लागला म्हणजे नीट भिजला नाही. >>> मी ४तास ठेवली होती.
स्वस्ति कशानेही मोजले तरी 1:1 प्रमाण ठेवता येते. >>> हां , मीही तसंच घेतलं, पण रवा हाताला लागत होता म्हणून माझा आपला अंदाज.
चिवट झाल्या म्हणजे तेलाने नीट मळलं नाही पीठ भिजवल्यावर. >>> ठीकेय. हे सुधारून बघेन , next time.
अजून 3-4 पोळींचं पुरण उरलयं.. परत सगळा घाट घालायची ईच्छा होतेय पण आता आठवडाभर कठीण आहे. Happy

सर्वांना मनापासून धन्यवाद Happy

पाण्यात भिजवलेलं पीठ मळायला घेतलं तेव्हा मेदूवड्याच्या पीठापेक्षा किंचित घट्ट होतं. जामच तेल आणि मेहनत लागली मळायला. माकाचु ??>>
मि तुनळीवर.. शेफ मनोहर यांची पा.कृ पाहुन पु.पो बनवल्या फक्त गव्हाचं पिठ वापरुन.. नो रवा नो मैदा खुपच लुसलुशीत झाल्या अन चविष्ट..
मनोहर यांनी पिठ मळुन झाल्यावर पिठाचे गोळे तेलाने भरलेल्या बाऊलमध्ये थोडावेळ ठेवले होते... माझ्याकडे इतका वेळ न्हवता पिठ मळले अन लगेच पु.पो बनवल्या अगदि छान झाल्या लुसलुशीत. Happy

मि तुनळीवर.. शेफ मनोहर यांची पा.कृ पाहुन पु.पो बनवल्या फक्त गव्हाचं पिठ वापरु>>>> हो मीही तो भाग पाहिला होता,पण पचनी पडला नाही.रवामैद्याच्या ४ पोळ्या केल्यानंतर नुसता मैदा भिजवताना पाणी जास्त झाल्यामुळे तेल जास्तच घालावं लागलं पण एकदम सॉफ्ट झाल्या.

अजून 3-4 पोळींचं पुरण उरलयं....... सकाळी पोळ्या करताना ते वापरून टाका.ब्रेकफास्ट पण होईल पुरणही संपेल.

अरे वाह छान गप्पा झाल्या की ईथे पुपोवर Happy

आज बर्याच दिवसांनी माबोवर आले सो हे सगळे आधी मिसले होते मी

जाड रवा असेल तर पिठ निट भिजायला खुप वेळ लागतो, साधारण ७-८ तास अन तरी सुद्धा थोड्या वातड/ कडक होतात कधी कधी.

मी केल्या होत्या होळीला, छान मऊसुत झाल्या होत्या Happy

तसे गव्हाच्या पोळ्या पण मऊ होतात पण रवा-मैद्याची चव आम्हाला जास्त आवडते.

Pages