सय (कथा)

Submitted by चैतन्य रासकर on 19 November, 2018 - 16:45

दवंडी:
(हळू आवाजात) काथ्याकूटचा नवीन भाग लिहीत आहे, लवकरच पोस्ट करतो.

..............................................................

सय

त्या दिवशी मी त्याला पहिल्यांदा बघितले.
फक्त एक सेकंद, जास्त नाही, त्याची उंची, रुंद खांदे, सावळा वर्ण, ऑफव्हाईट टी शर्ट, त्यावर राखाडी रंगाचे जॅकेट, फेडेड जीन्स, व्हाईट शुज आणि कपाळावरचे विस्कटलेले कुरळे केस.... स्स्स.. एका क्षणात माझ्या नजरेत भरले, मनात भिनले.
क्लास सुरु असताना, तो शांतपणे क्लासमध्ये आला, अगदी अलगद चालत, शेवटच्या बेंचकडे बेंचवर जाऊन बसला.

मी त्याच्याकडे परत बघण्याचे टाळले, क्लास संपला, आपसूकच मी माझा ड्रेस नीट केला, गळ्याभोवती ओढणी गुंडाळली, दोन्ही हातांनी केसांचा बन बांधताना, माझी नजर सावकाश त्याच्यापर्यंत पोहचली, पण त्याचे लक्ष नव्हते, तो शांतपणे, स्थिर, एकटक खिडकीबाहेर बघत होता, खिडकीतून आत येणारा स्ट्रीट लाईट्सचा पिवळा प्रकाश, त्याच्या चेहऱ्यावर पडला होता. काय बरं बघत असेल? कसला विचार करत असेल? मी बघताना, त्याने सुद्धा बघावे, नजरेला नजर भिडावी... पण पण पण.. त्याचं लक्ष का नाहीये?.

मी पुस्तकं पर्समध्ये ठेवली, पर्स खांद्यांवर अडकवत मी त्याच्याकडे बघितले, अजूनही त्याचे लक्ष नव्हते, एवढा कसला विचार करतोय? मी काय करू? इथेच थांबू? त्याच्याशी बोलू? कसं बोलू? बाकीचे काय विचार करतील? आज त्याचा क्लासमध्ये पहिलाच दिवस आहे, बघू नंतर, असा विचार करून, मी घरी निघाले, घरी जाताना तो माझ्या मनात घर करून बसला होता.

मी घरी आले, चपला काढल्या, दार लावले, बेडरूममध्ये आले, बिछान्यावर पहुडले, मी जसे डोळे मिटले तसा तो डोळ्यासमोर आला, पण तो माझ्याकडे बघत नव्हता, तो अजून ही तसाच, खिडकीच्या बाहेर बघत बसला होता, अगदी शांत, निरागस, एकटक खिडकीबाहेर बघत होता, त्याचे कपाळावरचे केस कुरळे आहेत ना? अक्षयसारखे..
अक्षय...
मी पटकन उठून बसले, माझा मोबाईल फोन हातात घेतला, व्हाट्सअॅपवरचे मेसेजेस वाचू लागले.
अक्षय..
मी फोन बाजूला फेकला, पटकन उठून बाथरूममध्ये आले, इअरिंग्स काढल्या, केस मोकळे केले, आरशात बघितले...
अक्षयचा हसरा चेहरा समोर आला.
अक्षय...त्याची ना ती ट्रेडमार्क स्माईल.
नाही नाही नाही.
अक्षयचा विचार नको.
मी बेसिनचा नळ सुरु केला.
अक्षय...
हा का नाही माझ्या डोक्यातून जात?
जुन्या पडक्या जागेत जसा आवाज घुमावा, तसं अक्षयचं नाव मनात घुमले, तसे माझे हात कापू लागले, हातावरच्या शिरा घट्ट झाल्या, वैतागले, रागातच डाव्या डोळ्यातून कॉन्टॅक्ट लेन्स काढू लागले, पण अक्षयमुळे, नेहमीसारखं डोळ्यात पाणी जमा झालं होतं.
स्स्स...
माझं नख डाव्या डोळ्याला लागलं.
कशाला ना ही नखं वाढवायची? मी आरशात बघितले, डाव्या डोळ्याच्या बुबुळाखाली, लाल रंगाची रेघ गडद होत होती.
अक्षय..
ऐ...जा ना रे तू..प्लिज. मी डोळे बंद केले, दीर्घ श्वास घेतला, पुन्हा आरशात बघितले, डावा डोळा लाल झाला होता, दुर्लक्ष केले, उजच्या डोळ्यातून सावकाश कॉन्टॅक्ट लेन्स काढली, मग डाव्या डोळ्यातून लेन्स काढून बेसिनच्या नळाजवळच्या डब्यात ठेवली, डावा डोळा चुरचुरत होता, चेहरा व्यवस्थित धुतला, डोळे धुतले, माझा ओला हात मानेभोवती फिरवत, मी आरशात बघत बसले, लेन्स शिवाय अस्पष्ट दिसत होते, पण डाव्या डोळ्यात पसरत चाललेला गडद लाल रंग....

अक्षय का?
कशाला?
काय गरज होती?

दुसऱ्या दिवशी, क्लास सुरु झाला, सगळेजण मला "डोळ्याला काय झालं?" विचारत होते, माझंच नखं माझ्या डोळ्याला लागलं, हे कोणाला खरं वाटलं नाही, हे सगळं सुरु असताना, मी नकळत अक्षयची.. च्च् सॉरी त्याची वाट बघत होते, त्याचं नाव काय असेल?.
आज परत, तो क्लासमध्ये उशिरा आला, वर्गात येताना 'आत येऊ का?' असं विचारायचा नाही, सरळ, शांतपणे आत यायचा, आज ही तेच राखाडी रंगाचे जॅकेट, फेडेड जीन्स, व्हाईट शुज आणि तीच ती थंड, शांत नजर! बदल ना रे जॅकेट, रंग तरी बदल, बी कलरफुल!!
तो शांतपणे शेवटच्या बेंचवर जाऊन बसला, तो आल्यावर क्लासमधल्या दोन-तीन मुलींनी त्याच्याकडे बघितले, माझी नजर सुद्धा नकळत त्याच्यापर्यंत पोहचायची, तो माझ्या मनात आला होता, पण मला त्याच्या नजरेत यायचं होतं.

क्लास संपला, मी त्याच्यासाठी रेंगाळले, त्याला नकळत न्याहाळत होते, तो पुस्तकं बॅगमध्ये ठेवत होता, मी माझा मोबाइल काढला, काहीतरी टाईप करू लागले, असंच, उगाच. टाईप करताना सावकाश मी त्याच्याकडे बघितले, माझी नजर त्याच्यावर स्थिरावली,स्लिंग बॅग उजव्या खांद्यावर अडकवून तो उभा राहिला.
एकच क्षण, बस्स! मी त्याला, त्याने मला बघितले!!
क्षणार्धात, त्याची नजर नजरेत भरली, मी बघताना त्याने मला बघितले. तो माझ्याजवळून जाताना, मी डोळ्याच्या कोपऱ्यातून बघत होते, पण तो मला बघत होता का?

तिसऱ्या दिवशी, मला त्याच्याकडे बघायचे नव्हते, मी दुर्लक्ष करणार होते, पण आमची परत नजरा नजर झाली, तोच तो, तीच नजरा नजर, तेच बघणं, परत एकदा, सेकंदभर नाही, त्यापेक्षा कमीच. तो मनात रेंगाळत असताना, मी त्याच्या नजरेसाठी रेंगाळत होते. त्याला डोळे भरून बघायचं होतं, जवळून बघायचं होतं, अगदी जवळून, बघत मनात साठवायचं होतं, पण कसं बघू? त्याला बघताना मला कोणी बघितलं तर?
मला त्याच्याशी बोलायचं होतं, पण कसं बोलणार? क्लास संपल्यावर? पण कसं? त्यानेच यावं, बोलावं, अगदी काहीही, कशावरही, केव्हाही, कितीही वेळ! किंवा माझ्याकडे बघून फक्त हसावं, त्याला हसताना बघायचं होतं. त्याला थांबवावं, त्याच्याशी बोलावं, त्याने ऐकावं, असं खूप वाटलं, माझी फक्त नजर पोहचली, पण माझ्या मनातलं? ते त्याच्यापर्यंत कधी पोहचेल?
पण तो कोणाशीच का बोलत नाही? शांत का असतो? एकटाच का शेवटच्या बेंचवर बसतो? त्याचे नाव काय असेल? कसं शोधू? कोणाला विचारू?
मी हाच विचार करत बिछान्यावर पहुडले होते, हा मुलगा कधी आपल्याशी बोलणार? त्याचा आवाज कसा असेल? कसा हसत असेल? म्हणजे हसेल की नाही? पण ..पण..

तो कोणाकडे बघत नाही, कोणाशीच बोलत नाही, वर्गात येताना सुद्धा न विचारता आत येतो... एकटाच बसतो... तो कोणाशीच का बोलत नाही??
मी पटकन उठून बसले, फोनमध्ये बघितले, रात्रीचे पावणे दोन वाजले होते.
हा माझा भास तर नाही ना?
पायात काटा रुतावा तसा हा विचार मनात रुतला..
नाही नाही नाही... हा भास नाही.
धडधड वाढली, हात थरथर कापू लागले, स्वतःला सावरण्यासाठी हाताच्या मुठी आवळल्या, घशाची कोरड वाढली, खांदे जखडले, मान अवघडली, श्वास घ्यायचा प्रयत्न करू लागले, तशीच कशीतरी उठले, किचनमध्ये गेले, फ्रिजमधून पाण्याची बाटली बाहेर काढली, पाणी पिताना ठसका लागला.

भास नको, भास नको, प्लिज..प्लिज प्लिज देवा, भास नको...
मी परत बेडरूममध्ये आले, हात अजून ही थरथरत होते, बेडरूमचे कपाट उघडले, जुने कपाट विव्हळले, कुबट संमिश्र वास नाकात शिरला, माझा तोल गेला तसं कपाटाचे दार पटकन घट्ट पकडले, स्वतःला सावरले... मी तसंच कपाटाकडे बघत बसले, क्षणमात्र...काय बघत होते? हे कपाट कशाला उघडलं?
मी कपाटाचा ड्रॉवर उघडला, ड्रॉवरमध्ये शोधू लागले, पण मला मिळेना, चरफडले, चिडून तो ड्रॉवर बाहेर काढला, बिछान्यावर पालथा केला, ड्रॉवर बाजूला फेकला, मी तसंच पसाऱ्याकडे बघितले, सगळा कचरा होता, कुठल्या त्या पावत्या, कापूस, टाचण्या, सुई दोरा, मळका रुमाल, काडेपेटी, चिल्लर, मेणबत्त्या, जुना मोबाईल, बंद पडलेलं मनगटी घड्याळ आणि..
आणि गोळ्या...
येस्स.. थँक गॉड...
मी पटकन गोळी हातात घेतली, सगळी घेऊ का अर्धी? एक्सपायरी डेट बघू का? पण काही झालं तर? साईड इफेक्ट्स? असं म्हणत गोळी पटकन तोंडात टाकली, पण गोळी विरघळली नाही, गिळता आली नाही, पटकन आत जात नव्हती, म्हणून गोळी चावली, गोळीची कडूशार चव माझ्या अंगात भिनली, मी शिरशिरले, पटकन किचनमध्ये गेले, भरपूर पाणी पिऊन टाकले, तशी मी शांत झाले, हाताची मूठ सैल झाली, माझी मान आपसूकच मागे कलंडली, डोळे मिटून तशीच मागे सरकले, भिंतीचा आधार घेत खाली बसले, पडले, डाव्या कुशीवर पडून राहिले आणि डोळ्यातलं पाणी ओघळत राहिलं...

चौथ्या दिवशी तो क्लासला आला नाही? का मला दिसला नाही? म्हणजे तो माझा भास होता? त्या गोळ्यांच्या परिणाम झाला? म्हणून तो दिसायचा थांबला?
चौथ्या दिवशी रात्री मी शेवटची गोळी घेतली आणि..... पाचव्या दिवशी तो क्लासला आला नाही.
तो माझा भासचं होता.
मला धड रडता येत नव्हतं.

माझ्याकडच्या गोळ्या संपल्या होत्या, नवीन गोळ्या घेऊ का? नवीन गोळ्या कश्या मिळणार? मी मेडिकल शॉपमध्ये गोळ्या मागितल्या, त्यांनी प्रिस्क्रिप्शन मागितले, आता काय करू? गोळ्या घेतल्या नाहीत तर तो परत दिसेल आणि सहाव्या दिवशी तो परत दिसलासुद्धा.
भर क्लासमध्ये रडावं, मोकळं व्हावं, कारण हा सगळा भास होता, जसा गोळ्यांचा असर संपला, तसा तो परत दिसला. कशाला रे तू आलास? प्लिज जा, निघून जा, मी त्याच्याशी बोलू? पण असं कसं बोलणार? जे समोर नाही त्याच्याशी कसं बोलणार? जरी बोलले तरी मला सगळेजण वेडी म्हणतील, माझ्यावर हसतील...

मी गाडीवरून परत येताना रडत होते, परत ते भास, परत तोच त्रास, परत ती ट्रीटमेंट, का? माझ्याबरोबरचं का? सगळ्याचा तिटकारा आला होता, पण काही इलाज नव्हता,त्या गोळ्या परत घ्याव्या लागणार. मी घरी आले, त्या गोळ्यांसाठी लागणार जुनं प्रिस्क्रिप्शन शोधून काढलं, ते प्रिस्क्रिप्शन माझ्या आवडत्या पुस्तकामध्ये जपून ठेवलं होतं.
मी सोबत, आणखी काही जुन्या पावत्या घेतल्या, एका जनरल स्टोअरमध्ये गेले, सगळ्या पावत्या त्या प्रिस्क्रिप्शन सकट स्कॅन करून घेतल्या, पेनड्राईव्हमध्ये त्या प्रिस्क्रिप्शनची स्कॅन कॉपी सेव्ह करून ठेवली. जनरल स्टोअर मधल्या माणसाला संशय येऊ नये म्हणून प्रिस्क्रिप्शन सोबत सात-आठ जुन्या पावत्यासुद्धा स्कॅन करून घेतल्या.

मी घरी आले, लॅपटॉपवर प्रिस्क्रिप्शनची सॉफ्ट कॉपी ओपन केली, प्रिस्क्रिप्शनची फक्त तारीख बदलायची होती, बस्स!! डॉक्टरचं नाव, दवाखाना वगैरे बदलायची गरज नाही, मग ते प्रिस्क्रिप्शन नवीनच वाटेल, मी जुन्या प्रिस्क्रिप्शन मधली तारीख बदलली, आजची तारीख तिथे नमूद केली, त्या फेरबदल केलेल्या प्रिस्क्रिप्शनची सॉफ्ट कॉपी परत पेनड्राईव्हमध्ये सेव्ह केली, आता मी दुसऱ्या जनरल स्टोअरमध्ये गेले, संशय येऊ नये म्हणून त्या प्रिस्क्रिप्शन बरोबर अजून काही प्रिंट आउट्स काढल्या.
मी स्टोअरमधून बाहेर आले, प्रिस्क्रिप्शनकडे बघितले, येस्स!! एकदम नवीन वाटतंय, पण हा कागद मोठा होता, एफोर साईझ, प्रिस्क्रिप्शनच्या कागदाचा आकार कमी असतो, मी जुनं प्रिस्क्रिप्शन बघितले, त्याचा आकार छोटा होता, मी पटकन नवीन प्रिस्क्रिप्शन फाडून, त्याच्या आकार कमी केला.

मी मेडिकल शॉपमध्ये आले, काही न बोलता शॉप मधल्या माणसाला प्रिस्क्रिप्शन दिले, पण त्यांच्याकडे ती गोळी उपलब्ध नव्हती, ही गोळी अशी तशी कुठे मिळणार नाही, हे मला कळून चुकले, म्हणून मी दूरवरच्या, मोठ्या मेडिकलशॉप मध्ये गेले, तिथे प्रिस्क्रिप्शन दाखवले, त्या दुकानदाराने आधी प्रिस्क्रिप्शन बघितले मग माझ्याकडे बघितले, तो परत प्रिस्क्रिप्शन नीट बघू लागला.
"आहे का?" मी विचारले.
"हो.." असं म्हणून त्याने त्याच्या खिश्यातुन फोन बाहेर काढला.
"काय करताय?" मी विचारले.
"डॉक्टरांना विचारावं लागेल" दुकानदार फोन कानाला लावत म्हणाला.
माझ्या पायाखालची जमीनच खचली, ठोके वाढले, डोळ्यासमोर अंधारी आली, मी कसेतरी स्वतःला आवरले.
"आपलं नाव काय?" त्या दुकानदाराने मला विचारले.
मला काही सुधरत नव्हते.
"तुमचं नाव?" त्याने परत विचारले.
मी माझे नाव सांगितले.
"हॅलो डॉक्टर, या मॅडम आल्या आहेत, तुम्ही यांना हे मेडिसिन सांगितलं आहे का?"
मी पुढचं काही ऐकू शकले नाही, मूर्खपणा केला, काय गरज होती? डॉक्टरांचा नंबर काढून टाकायला हवा होता, पण आता काय करू? माझं डोकं जड झालं, डावा डोळा दुखू लागला, घशातल्या आवंढा वाढला, नकळत मुठी आवळल्या, समोरचं सगळं अंधुक झालं...
"मॅडम..."
तशी मी दचकले, दुकादाराने त्याचा मोबाईल माझ्यासमोर धरला होता, मी काही न बोलता मोबाईल हातात घेतला, कानाला लावला..
"हॅलो" डॉक्टरांच्या आवाज कानावर आदळला.
"हॅलो" मी पुटपुटले.
"ऐकू येतंय ना?" डॉक्टरांनी अत्यंत शांत आवाजात विचारले, पण त्यांच्या आवाजाला रागाची झालर होती.
"हो" मी पुटपुटले.
"उद्या सकाळी ऑफिसला या" डॉक्टर म्हणाले.
मी काही म्हणू शकले नाही.
"ओके?" त्यांनी परत विचारले
"हो" मी एवढंच म्हणू शकले, डॉक्टरांनी कॉल कट केला, दुकानदाराने माझ्या हातातून मोबाईल काढून घेतला, माझं प्रिस्क्रिप्शन परत दिलं, मी यांत्रिकपणे ते हातात घेतलं, दुकानदार मला रोखून बघत होता, मी त्याच्याकडे बघायचं टाळले, त्याला काहीतरी म्हणायचं होतं. त्याच्या समोरून पटकन अदृश्य व्हावे, असं वाटलं. तेवढ्यात दुकानात दुसरं गिऱ्हाईक आले, तशी मी माघारी वळले, भरभर चालत गाडीपर्यंत पोहचले, माझ्या हातातून ते प्रिस्क्रिप्शन खाली पडलं...

दुसऱ्या दिवशी, मी सकाळी उठून तडक डॉक्टरांच्या दवाखान्यात गेले, दवाखाना नाही, ऑफिस.
"का केलंत?" डॉक्टर एवढचं म्हणू शकले, त्यांनी राग आवरला, मी सकाळी नाश्ता, चहा न करता तशीच आले होते, अशक्त वाटतं होते, तहान लागली होती, छातीतली जळजळ घश्यापर्यंत आली होती, पोटात ढवळत होते, माझा उजवा हात आपसूकच पोटावरून फिरला.
"काय झालं?" डॉक्टरांनी विचारले.
मी त्यांना डॉक्टरचं म्हणायचे, सायक्र्यट्रिस्ट म्हणणं जड जायचं. डॉक्टरांबद्दल कोणाला सांगितलं नव्हतं, कशाला सांगायचं? काय गरज? लोकं काय सहानभूती देणार नाहीतर नावं ठेवणार.
अक्षय सोडून गेल्यावर, नाही. अक्षयने सोडून दिल्यावर, मी एकटी पडले, दिवसभर खोलीत पडून असायचे, काही करावंसं, जगावंसं, मरावसं वाटायचं नाही, कधीही झोपायचे, उठायचे, दिवस आहे का रात्र कळायचे नाही, मॅगी खायचे, नाहीतर काहीतरी खायला मागवून घ्यायचे, "खूप कंटाळा आलाय" असं सांगायला सुद्धा कोणी नव्हतं, अक्षयच्या आठवणी खरवडत बसायचे, त्याची खूप आठवण यायची, त्यात स्वतःला विसरायचे.

अक्षय सवय होता आणि सवय ना खपली सारखी असते, पटकन काढता येत नाही.

अक्षय शिवाय काहीच करायला नव्हतं, करायचं नव्हतं, दिवसभर खोलीत एकटीने बसायचं, जे समोर येईल, जे वाटेल ते करायचे, पण कधी मनापासून काही करावसं वाटलं नाही, अक्षयने सगळं हिरावून, ओरबाडून घेतलं होतं. अंधाऱ्या वाटेने जाताना, कोणीतरी ओळखीच्या माणसाने हाक मारावी, मग हात पकडून आपल्या सोबत चालावं, अचानक एखाद्या वळणावर अलगद सोडून द्यावं..... मग कळत नाही, पुढे जाऊ का मागे? डावीकडे का उजवीकडे? अशा वेळी, मी सैरभैर झाले, पुढे जोरात धावत जाऊन उडी मारली, अंधाऱ्या गर्तेत बुडाले, खाली पडत राहिले, पण कधी खाली आदळलेच नाही.

अक्षय सोबत नसला तरी, तो जवळ आहे असं वाटायचं, भासायचं, मला जवळ घेतोय, झोप येत नसेल तर थोपटतोय, माझ्या जवळ झोपला आहे, माझ्या कानात काहीतरी कुजबुजतोय असं वाटायचं. अक्षय माझ्या आधी सकाळी उठायचा, माझ्या केसातून हात फिरवायचा, कुरवाळायचा, जागं करायचा, डोळे उघडले की माझ्यासाठी छान स्मित करायचा. मग उचलून घ्यायचा.. भारी वाटायचं
त्याच्यात विरघळून जावं असं वाटायचं, पण तोच विरून गेला.
मी कितीतरी दिवस दोन कप ब्लॅक कॉफी करत होते, मन मान्यच करत नव्हतं की अक्षय सोडून गेला आहे, कधी न परत येण्यासाठी...
तू का असं केलं? का सोडून गेलास? असं त्याच्यावर ओरडायचे, पण तो उत्तर द्यायचा नाही, फक्त हलकेच हसायचा, त्याची नेहमीची स्माईल! पण मग या सगळ्याचा त्रास होऊ लागला, मनाच्या कोपऱ्यात भास वाढू लागले, जळमटासारखे..

भास एकच क्षण होतो.. बस्स.. जास्त नाही, पण तेवढा क्षण कधीच पुरेसा नसतो, म्हणून जास्त त्रास होतो. धुकं विरून गेल्यावर, जसं समोरचं स्पष्ट होतं, तसे माझे हे भास स्पष्ट झाले, इतके स्पष्ट झाले की मी अक्षयशी बोलू लागले, तो तिथं नसताना...

मग मी या डॉक्टरांकडे आले, माझे सेशन्स सुरु झाले, अक्षयबद्दलच बोलायचे, सांगायचे, रडायचे, जितकं बोलावं तेवढं कमी होतं, रात्री अक्षयचे भास झोपून द्यायचे नाही, म्हणून मला डॉक्टरांनी गोळ्या द्यायला सुरुवात केली. मी गेल्या वर्षभर इथेच येत होते, हे ऑफिस अजूनही तसचं होतं, त्याच रंगहीन भिंती, एकच खिडकी, खिडकीला जांभळ्या रंगाचे लांबलचक पडदे, त्यासमोर टेबलवर डॉक्टरांचा लॅपटॉप, काही पुस्तकं, पाण्याची बाटली, कॅलेंडर. डॉक्टर माझ्यासमोर बसले होते, फॉर्मल शर्ट, पॅण्ट, त्यावर निळ्या रंगाचा टाय घातला होता, मला 'स्टडी' करत होते.

"तुम्हाला त्या गोळ्या का हव्या आहेत?" डॉक्टरांनी विचारले.
"मला परत..परत..." मला नीट बोलता येत नव्हते "मला परत तेच भास होतात"
"कसले भास?"
"माझ्या फ्रेंच क्लासमध्ये, एक मुलगा दिसतो"
"कधीपासून?"
"चार- पाच दिवस झाले"
"पण तुम्हाला कसं कळलं की हा तुमचा भास आहे?" डॉक्टरांनी मला विचारले.
"तो कोणाशी बोलत नाही, बघत नाही, म्हणून वाटलं..." मी उत्तर दिले.
"तुम्ही त्याच्याशी काही बोलला का?"
"नाही, काहीच नाही"
"गोळ्या घेतल्यावर भास होणार नाही असं वाटतंय का?" डॉक्टरांनी सावकाश विचारले.
"हो.. मी गोळ्या घेतल्या, मग तो दिसला नाही"
"ओके.."
"काल परत दिसला म्हणजे त्याचा भास झाला, म्हणून गोळ्या घ्यायला गेले" मी स्पष्टीकरण दिले.
"त्या गोळ्या खूप स्ट्रॉन्ग आहेत.." डॉक्टर एवढचं म्हणाले, ते पुढे काही म्हणणार तेवढ्यात मी म्हणाले "प्लिज डॉक्टर, मला भास नकोयत..मला सहन.." असं म्हणत असताना, हुंदका बाहेर आला, मी पर्समधून रुमाल काढला, डोळे पुसले, तो पर्यंत डॉक्टरांनी मला पाणी प्यायला दिले, पाणी पिल्यावर थोडं मोकळं वाटलं, घश्यातला आवंढा विरघळू लागला.
"प्लिज तुम्ही त्या गोळ्या घेऊ नका" डॉक्टर म्हणाले.
मी काही म्हणाले नाही, त्या गोळ्या हव्या होत्या, त्या गोळ्यांमुळेच भास थांबणार होते.
"तुम्हाला हवं असेल तर आपण ट्रीटमेंट परत सुरु करू" डॉक्टर म्हणाले.
नको नको नको, ही ट्रीटमेंट नको, भास नको, त्रास नको, काही नको, हे काहीच नको, मला शांतता हवी आहे, मला हे सगळं ओरडून सांगायचं होतं, पण अंगात काही ऊर्जाच नव्हती.
"कळवते..." असं म्हणून मी कशीतरी उठले, डोके गरगरले, स्वतःला सावरलं, तिथून निघून घरी आले, आज क्लासला जायचं नाही, हे ठरवलं होतं, म्हणून झोपले, पण झोप येत नव्हती, त्या गोळ्या घेतल्यावर छान झोप येते, फ्रेश वाटतं, गोळ्या कशा मिळणार?

मी दुपारी उठले, खोलीला कुलूप लावून बाहेर पडले, आता नेमकं कुठे जायचं होतं हे माहीत होतं.
"अग तू कशी काय?" प्रज्ञाने दार उघडत विचारले
प्रज्ञा माझी मैत्रीण, मी तिच्या घरी आले होते, तिच्या घरात येऊन छान वाटलं, घरात अगरबत्तीचा सुवास पसरला होता, हॉलमध्ये मोठ्या खिडक्या होत्या, भरपूर सूर्यप्रकाश होता, घर छान सजवलं होतं, प्रसन्न वाटलं, टीव्ही चालू होता, कुठलीतरी मालिका सुरु होती, प्रज्ञाने मला बसायला सांगितले, माझ्यासाठी पाणी आणले.
"डोळे किती खोल गेलेत, काल रात्री झोपली नाहीस का?" प्रज्ञा मला पाण्याचा पेला देत म्हणाली.
मी एका घोटात पाणी संपवले, ठसका लागला, प्रज्ञाकडे पेला देत मी म्हणाले "ऐक ना.."
"काय झालं?"
"मदत करशील?"
"सांग तर..."
"मला त्या गोळ्या हव्या आहेत"
"कशाला?" प्रज्ञा पटकन बोलून गेली.
"तुझ्याकडे असतील ना?"
"नाही" प्रज्ञा खंबीरपणे म्हणाली
"प्लिज दे ना.." मी तिचा हात पकडत म्हणाले, प्रज्ञाने तिचा हात माझ्या हातातून हळूच काढून घेतला, ती मागे सरली, तिला काय करावे ते कळेना, तिने टीव्हीकडे बघितले, टीव्ही अजून सुरु होता, तिने टीव्ही बंद केला, माझ्यापासून लांब बसली, लेक्चर द्यायला सुरुवात केली.
त्या गोळ्या चांगल्या नाहीत, सवय लागते, अॅडिक्ट होशील, दुसरं काहीतरी घे, एखादा छंद जोपास, योगा कर, ट्रेकला जा, फिरायला जा, शॉपिंग करत जा असं काहीही निरर्थक सांगू लागली, हे सगळं करून बघितलं होतं, पण भास कधी कमी झाले नाहीत, तिच्या लेक्चरचा वैताग आला.
"असतील तर दे ना. गरज आहे ग..." मी रडक्या आवाजात म्हणाले. रडायचं नव्हतं पण...

प्रज्ञाकडे गोळ्या होत्या, तिला द्यायच्या नव्हत्या, माझे भास मला जगू देत नाही, खूप त्रास होतो असं सांगितलं, तिला दया आली, मी परत रडले, तिने लहान मुलाला जसं थोपटतात तसं थोपटलं, पाणी प्यायला दिलं, कुठलातरी लाडू खायला दिला, मी लाडू कसातरी चावला, गिळला, रडल्यावर जरा मोकळं वाटलं, शांत वाटलं.

प्रज्ञाने आतल्या खोलीकडे बघत हाक मारली "आई..."
हाकेला उत्तर आलं नाही, म्हणून ती उठून आतल्या खोलीत गेली, मी हॉलमध्ये बसून राहिले, प्रज्ञाची आई झोपली असावी, तिने आईला झोपेतून उठवले, आईसोबत काहीतरी बोलू लागली, पण अचानक प्रज्ञाचा आवाज वाढला, काहीतरी बिनसले, त्या खोलीत काहीतरी पडले, मला आवाज ऐकू आला, तशी मी हळूच आतल्या खोलीजवळ गेले, आतमध्ये पाहिलं.
प्रज्ञा तावातावाने बोलत होती, पण तिच्यासमोर कोणीच नव्हते....
ते बघून, माझा हात आपसूकच तोंडावर गेला, भीतीची सणक मणक्यातून थेट मेंदूत शिरली, माझा तोल गेला, मी भिंतीचा आधार घेतला, पण माझी पर्स खाली पडली, त्या आवाजाने प्रज्ञा बोलायची थांबली, तिने माझ्याकडे वळून बघितले, तिची थंड नजर बघून मी अजूनच घाबरले.
"अगं आईला आठवतच नाहीये, त्या गोळ्या कुठे ठेवल्या ते...." प्रज्ञा मला म्हणाली.

मी काहीच बोलू शकले नाही, बोलताच आले नाही, कोणीतरी गळा दाबतंय, श्वास घ्यायला त्रास होत आहे, असं वाटले, मी हळूच पर्स उचलली आणि तिथून पळाले, कशीतरी सोसायटीच्या पार्किंगमध्ये आले, पण प्रज्ञा मागे आली नाही, तिने हाक सुद्धा मारली नाही, मी पटकन गाडी सुरु केली, तिथून निसटले.

प्रज्ञासुद्धा या गोळ्या घेत असे, आमचा एकच डॉक्टर होता, तिलाही माझ्यासारखा आजार होता, आमची मैत्री त्या डॉक्टरांच्या ऑफिसबाहेर झाली होती, आमची मैत्री आहे हे कधी डॉक्टरांना कळू दिले नाही. पण तिचा आजार या थराला जाईल असं कधी वाटलं नव्हतं.
या आजाराला दोन तीन नावं होती, मी कधी लक्षात ठेवली नाहीत, कारण कोणाला या आजाराबद्दल काही सांगायचं नव्हतं. मला तर हा आजार वाटतचं नाही. एखाद्याची आठवण येणं हा कसा काय आजार असू शकतो? आठवण आली, की बोलावसं वाटतं, गप्पा माराव्यात असं वाटतं. मग ती व्यक्ती समोर नसली म्हणून काय झालं?

संध्याकाळ झाली होती, मी क्लासजवळ आले, पण मला क्लासला जायचे नव्हते, स्कूटर पार्क केली, काही खाल्ले नव्हते, पाय गळून गेले होते, चक्कर येत होती, आमच्या क्लासजवळ एक बसटॉप होता, मी तिथे जाऊन बसले, प्रज्ञाचा तो चेहरा माझ्या डोक्यातून जात नव्हता, तिचे कॉल्स येऊन गेले होते, मी तिला रिप्लाय दिला नाही, मी तिला काय बोलणार??
मळमळत होते, उलटी होईल असे वाटले, पण काही खाल्लेच नाही तर उलटी कशी होईल?

आता काय करू?
गोळ्या तर मिळणार नाहीत म्हणजे परत भास सुरु होणार? मला काही सुचत नव्हते, मी फोन बाहेर काढला, मेसेजेस वाचले, फेसबुकवर बघितले, काही विशेष नव्हते. मला अक्षयची खूप आठवण आली, तो असता, तर त्याने समजून घेतलं असतं, समजावलं असतं, माझी काळजी घेतली असती. त्याला मेसेज करू? मी अक्षयचा नंबर डिलीट केला होता, पण नंबर पाठ होता, नंबर सेव्ह केला, त्या नंबरचा व्हाट्सअॅप डिस्प्ले फोटो बघितला, पण तिथे कुठलाच फोटो नव्हता, तरीही त्या नंबरवर मेसेज केला.
"फ्री आहेस का? भेटशील?"
मेसेज पाठवला, उत्तर मिळाले नाही, थोडावेळ वाट बघितली, उत्तर आले नाही, म्हणून त्या नंबरवर फोन केला, पण फोन लागला नाही, सहा सातवेळा प्रयत्न केला पण फोन लागला नाही, फोन हातात धरून मेसेज बघत बसले, मेसेज डिलिव्हर झाला होता, पण मेसेजला उत्तर आले नाही, अक्षय प्लिज, प्लिज, प्लिज रिप्लाय कर ना.. परत एकदा बोल ना..
मला राहवले नाही, मी दुसरा मेसेज केला.
"माझ्या फ्रेंच क्लास समोरच्या कॅफेमध्ये तुझी वाट बघतेय, प्लिज ये..."
पण मेसेजला उत्तर आले नाही.
हा उत्तर का देत नाही? इतका का माज करतोय? याने मला ब्लॉक केलं? मी त्याला ब्लॉक केलं होतं म्हणून रागावला?

या विचारांचा उद्वेग माझ्या मनात सुरु होता, मी रस्ता क्रॉस केला, क्लाससमोरच्या कॅफेत आले, त्या कॅफेमध्ये कोणीच नव्हते, मी पटकन कोपऱ्यातल्या टेबलजवळ बसले, वेटरने पाणी आणून दिले, मी आजूबाजूला बघितले, दोन मुले माझ्या अवताराकडे बघू लागली, मी दुर्लक्ष केले, मेनूकार्ड बघितले, व्हेज सँडविच मागवले, मग टेबलवर डोकं ठेवून, स्वतःला शांत करायचा प्रयत्न केला, थोड्यावेळाने मला वेटरने उठवले, सँडविच दिले, कोल्ड कॉफी मागवली, सँडविच खाऊ लागले, परत फोनकडे बघितले, अक्षयकडून उत्तर आले नव्हते.

तेवढ्यात तो आला!! क्लासमधला मुलगा!! तो जसा कॅफेमध्ये आला, तसं मी त्याला ओळखलं, एका क्षणात!! तेच राखाडी रंगाचे जॅकेट, फेडेड जीन्स, पांढरे शूज, कुरळे केस, नाही नाही नाही. हा भास आहे, मला त्याच्याकडे बघायचं नव्हतं, हा भास नको होता, मी सुन्न झाले, काय करावं ते कळेना, सँडविच कसतरी तोंडात कोंबून संपवलं, पाणी पीत सगळं गिळलं, मला ठसका लागला, मी चोरून त्याच्याकडे बघितलं, तो तसाच खिडकी शेजारच्या टेबलवर बसला होता, खिडकीबाहेर बघत होता, शांतपणे, एकटक...मी टेबलवर डोकं ठेवलं, स्वतःला शांत करायचा प्रयत्न केला, त्या मुलाकडे बघायचं नव्हतं, घाम फुटला होता, धडकी भरली होती.
तेवढ्यात माझ्या समोरच्या खुर्चीत कोणीतरी येऊन बसलं. मी हळूच वर बघितलं..
अक्षय...
माझ्याकडे बघून गोड हसत होता, नेहमीची स्माईल..
मी पण त्याच्याकडे बघून हसले, बरं वाटलं, छान वाटलं, कितीतरी दिवसानंतर अक्षयला बघत होते, तसाच दिसत होता, नेहमीसारखा...

मी अक्षयच्या मागे बघितले, राखाडी रंगाचे जॅकेट घातलेला तो मुलगा माझ्याकडे येत होता!! हा कशाला माझ्याकडे येतोय? मला काय करावे ते कळेना, मी त्याच्याकडे बघायचे टाळले.
"आर यु ओके?" त्या मुलाने माझ्याजवळ येत विचारले.
मी समोरच्या खुर्चीकडे बघितले, अक्षय निघून गेला होता.. नेहमीसारखा..
मला क्षणभर वाटलं होतं की, अक्षयला माझा मेसेज मिळाला, तो माझ्यासाठी इथे आला, माझ्याकडे बघत हसतोय, पण खरं असं काही नव्हतं, हा फक्त माझा भास होता, नेहमीसारखा...
"हॅलो.."
"येस्स.." मी भानावर आले.
"कॅन आय सीट हिअर?" त्या मुलाने मला विचारले.
"शुअर"
तसा तो माझ्यासमोरच्या खुर्चीत बसला, जिथे एका क्षणापूर्वी अक्षय बसला होता, अक्षय नाही, त्याचा फक्त भास. जेवढ्या अचानक भास झाला, त्याच गतीने विरूनसुद्धा गेला.

हा राखाडी रंगाचे जॅकेट घातलेला मुलगा थोडाफार अक्षय सारखा दिसत होता, थोडसं साम्य होतं, कपाळावरचे केस, चेहऱ्याची ठेवण, बस्स बाकी नाही. कदाचित हा माझ्यापेक्षा चार पाच वर्षाने लहान असावा. आमची ओळख झाली, त्याने त्याचं नावं विभोर असं सांगितलं. विभोर बोलत असताना, मी फोनकडे बघितले, अक्षयला व्हाट्सअॅपवर केलेले मेसेज डिलिव्हर झाले होते, 'सीन' झाले होते, पण मेसेजला काहीच उत्तर आले नव्हते, पण अक्षयचा व्हाट्सअॅप डिस्प्ले फोटो आता स्पष्ट दिसत होता, त्या फोटोत अक्षय त्याच्या बायको सोबत उभा होता, अक्षयने कडेवर त्याच्या छोट्या मुलाला घेतले होते, सगळेजण फोटोत हसत होते, आनंदी दिसत होते.

विभोर मला काहीतरी विचारत होता. माझं अजिबातच लक्ष नव्हतं. मी त्याला थांबवत विचारले.
"क्लासमध्ये तू खिडकीबाहेर काय बघत असतोस?"
विभोर गोंधळला, त्याला हा प्रश्न अनपेक्षित होता, अडखळत उत्तर देऊ लागला.
"मागच्या आठवड्यात या सिटीत शिफ्ट झालोय..."
"म्हणून तू खिडकीबाहेर बघत असतोस?" मी पटकन विचारले.
यावर विभोरला कसनुसा हसला.
"तसं नाही.. पण घरची आठवण येते म्हणून क्लासमध्ये लक्ष लागत नाही" विभोर म्हणाला.
मी पुढे काही म्हणू शकले नाही, डोळे मिटले, अश्रू लपवले, खाली बघत रुमालाने डोळे पुसले.
आठवणींचे व्रण कधी पुसले जाणार?

क्लासची वेळ झाली होती, विभोर निघून गेला, मी कॅफेच्या बाथरूममध्ये गेले, आरशात बघितले, माझे डोळे खोल गेले होते, अक्षयच्या आठवणी पोखरत होत्या, अशक्त करत होत्या, पण आता त्या गोळ्यांची गरज नव्हती, कारण विभोर हा भास नव्हता, तो थोडाफार अक्षयसारखा दिसत होता, बस्स एवढचं!!

मी स्वतःला सावरलं, तोंड धुतलं, केस नीट बांधले. स्वतःचा अवतार ठीक केला, बिल दिले, बाहेर आले. मला जरा हुशारी वाटली, मी क्लासला जाताना, फोन काढून व्हाट्सअॅप बघितले, अक्षयचा रिप्लाय आला नव्हता, त्याचा रिप्लाय कधी येणारच नव्हता, कारण तीन वर्ष माझ्याबरोबर एकत्र राहिल्यावर अक्षयने घरचे सांगतील त्या मुलीशी लग्न केलं, त्यालाl छान संसार मिळाला, मला मिळाल्या त्या फक्त आठवणी आणि त्याचे न संपणारे भास..

जशी क्लासची वेळ झाली, तशी मी क्लासमध्ये आले, क्लासवरून नजर फिरवली, सगळे विद्यार्थी माझ्याकडे बघत होते, मी खिडकीजवळच्या बेंचकडे बघितले, तो बेंच रिकामा होता, आज विभोर क्लासमध्ये लवकर आला होता, पहिल्याच बेंचवर बसला होता, माझ्याकडे बघून हलकेच हसला.

काही विद्यार्थी मला गुड इव्हनिंग म्हणाले, तेव्हा मी छान, खोटं हसले. पर्स टेबलवर ठेवली, पर्समधून पुस्तक बाहेर काढलं, डस्टरने फळा पुसला, खडू हातात घेऊन फळ्याकडे बघितले, डोळे मिटून घेतले, तसा अक्षयचा हसरा चेहरा समोर आला...

मी डोळे उघडले आणि शिकवायला सुरुवात केली...

*समाप्त*
................
- चैतन्य रासकर
chaitanyaras@gmail.com

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त्,, Happy वाटलच होत शेवटी काहीतरी धक्का असणार.सुरुवातीला ती पण विद्यार्थीनी वाटत होती मला.

वाटलच होत शेवटी काहीतरी धक्का असणार.सुरुवातीला ती पण विद्यार्थीनी वाटत होती मला.+१११

छानच झालीये कथा Happy
काथ्याकुट येऊ द्या लवकरच Happy

@अंकु @किल्ली
तुम्ही ट्विस्ट आधीच सांगून राहिले हो.. Happy इतर वाचकांना कथा वाचण्याआधीच ट्विस्ट कळून जाईल

जमलिये,
त्याच रंगहीन भिंती, एकच खिडकी, खिडकीला जांभळ्या रंगाचे लांबलचक पडदे,>>
हे वाचुन वाटलं तो डॉक ही कल्पनेतला असावा किंवा फेक डॉक असावा..
रच्याकने
दवंडी ची नोंद घेण्यात आलिए..

१. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. प्रतिक्रिया वाचून छान वाटलं. नवीन लेखन करण्यासाठीचा उत्साह द्विगुणित झाला.
२. ही कथा लिहणं फारच अवघड गेलं, अजिबात जमत नव्हतं, पण अशी कथा लिहायची होती. रोज दोन ते तीन तास ही कथा लिहीत होतो, आठ ते नऊ दिवस कथा पूर्ण करायला लागले, मग अजून दोन दिवस कथेत बदल करायला लागले. काही ओळी लिहायला बराच वेळ गेला, पण मजा आली.
३. 'आठवणी' हा खूप छान विषय आहे, यावर विनोदी, रहस्य, वैज्ञानिक कुठल्याही प्रकारच्या कथा लिहिता येऊ शकते. अशाच विषयावर "स्मृती काढा" ही कथा लिहिली होती, पण ती कोणालाच आवडली नव्हती Proud पण ही कथा आवडली हे बघून छान वाटलं.
४. या कथेत अजून एक उप कथानक असं होतं की कथा नायिकेला असं वाटतं की विभोर हा अक्षयचा लहान भाऊ आहे आणि त्यामुळे तो त्याच्या सारखा दिसतो, पण हा भाग गाळला, कारण कथा किचकट होतं होती.
५. "तुझी आठवण, मनात साठवण" असं नाव देत विनोदी ढंगाने कथा लिहायची होती, पण तो मोह टाळला. Happy

@अॅमी
कथेबद्दल अरेरे आहे का कथेच्या पात्राबद्दल? Proud
@अग्निपंख
आधी कथेचं नाव सैरभैर ठेवलं होतं, पण या नावाबाद्ल मी पण सैरभैर होतो Proud म्हणून मग नाव बदललं.
@पद्म
कथेतला ट्विस्ट हा अंधश्रद्धेसारखा असतो, मानायचा की नाही हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. मी आपल्या सगळ्या कथा वाचल्या आहेत, त्यातून बरंच काही शिकायला मिळालं, पण बरोबर एक वर्ष झालं, आपली नवीन कथा आली नाही, वाट बघत आहे.

मला आवडली कथा, मी तुमच्या इतर कथा वाचल्या नाहीयत.

आणि चांगले केलेत विनोदी नाही केलीत, ग्रीप नसता चढला इतका.

> कथेबद्दल अरेरे आहे का कथेच्या पात्राबद्दल? > पात्राबद्दलच की, निवेदिका, प्रज्ञा....
वर एका प्रतिसादात अनघा. म्हणतेय तसं "एकटेपणा / मानसिक आजार भितीदायक रंगवला आहे."

लिहताना लेखकाच्या मनात कायकाय चालू असते याबद्दलचा प्रतिसाद अवडला.

अशाच विषयावर "स्मृती काढा" ही कथा लिहिली होती, पण ती कोणालाच आवडली नव्हती
>>>> मला आवडली होती स्मृती काढा Happy पण या कथेवरून "स्मृती काढा"पेक्षा अव्यक्त ची आठवण झाली.

आवडली कथा. जमलीये.
प्रलि वर अशीच छोटीशी छान कथा आहे ना.
त्यातच बदल केला का?

@अनिश्का.
धन्यवाद Happy

@कटप्पा
धन्यवाद, काथ्याकूट वाचा ना

@असामी
कथानायिका अक्षय बरोबर तीन वर्ष राहत होती,पण मग अक्षय कथानायिका सोडून दुसऱ्या मुलीशी लग्न करतो, या धक्यातून कथानायिका अजून बाहेर आलेली नाही, विभोर अक्षय सारखा थोडाफार दिसतो किंवा तिला असं वाटतं, म्हणून तिला विभोर आवडला, पण त्यांचं पुढे जमेल असं वाटतं नाही.

@चैत्रगंधा
अरे हो.. ही कथा अव्यक्त सारखीच आहे

@स्वस्ति @कोमल १२३४५६ @वृंदा देशमुख @Namokar @अॅमी @मीरा..
मनापासून धन्यवाद Happy

@ सस्मित
हो.. प्रतिलिपीवर सैरभैर नावाची कथा पोस्ट केली होती, सहाशे शब्दांची होती, त्यात बदल करून मग ही लिहिली.

Pages