आणि डाॅक्टर काशिनाथ घाणेकर

Submitted by मेधावि on 9 November, 2018 - 23:29

अभिजीत देशपांडे लिखीत आणि दिग्दर्शीत "आणि डाॅक्टर काशिनाथ घाणेकर" सिनेमा काल पाहीला. अभिजित हा आमच्या वर्गमित्राचा भाचा म्हणून अजून कौतुकानं व प्रेमानं पाहीला.

काशिनाथ घाणेकरांची नाटकं आणि त्यांचा सुवर्णकाळ आमच्या पिढीला पहाता किंवा अनुभवता नाही आला, मात्र हा सिनेमा बघताना त्या काळात शिरून, भालजी पेंढारकर, सुलोचनादिदी, डाॅक्टर ह्या अप्राप्य व्यक्तींसमवेत काही क्षण जगल्यासारखं निश्चितपणे वाटलं.

जुनी मुंबई, जुनं शिवाजी मंदीर, जयप्रभा स्टुडीओ, जुने रस्ते आणि जुनी नाटकं पहाताना नाॅस्टॅल्जिक (गतकालविव्हल ) व्हायला झालं. एखाद्या जुन्या वाड्यात अनेक वर्षांनी, सहजपणे आत शिरावं आणि तेथील प्रत्येक वस्तुनं, कोप-यानं, भिंतीनं ठाईठाई आपल्या मनाचा वेध घ्यावा, त्यावर कब्जा करावा, आपल्याला जुन्या दिवसांकडे, जुन्या माणसांकडे, जुन्या आयुष्यांकडे खेचून घ्यावं, त्यांची जीवघेणी आठवण व्हावी, त्यांच्या सुखानं आपणही शहारावं व त्यांच्या दुःखानं आपलेही डोळे भरून यावेत पण तिथून परत निघताना मात्र पाऊल निघू नये असा काहीसा अनुभव आला चित्रपट पहाताना.

अनेक पुस्तकांमधून, चित्रपटांतून आपल्याला माहीत असणारे आपले मराठी चमचमते कलाकार, आपली माणसं, आपल्याला त्यांच्याबद्दल वाटणारं कुतुहल, आदर, प्रेम, अभिमान,अपेक्षा ह्या सर्वांवर बोलतो हा चित्रपट. दिदी, भालजी पेंढारकर, डाॅक्टर ह्यांच्यासारखी वलयांकीत माणसं व त्यांचं सर्वसामान्य जगणं खूप काही सुचवून जातं. Entertainment industry is the most cruel industry हे पुन्हा एकदा ठळकपणे जाणवतं.

सर्व कलाकारांनी झपाटल्यासारखं काम केलंय. सुबोध, लेका तुझं काय करायचं रे? तू ना, वेडा माणूस आहेस. ठार वेडा. मुळात त्याच्या व डाॅक्टरांच्या दिसण्यात, आवाजात, जगण्यात, शरीरयष्टीत भरपूर अंतर आहे, पण त्यानं, (मेकअप आणि काॅस्चुम्सनं पण) ते असं बेमालूम मिटवलंय की खुद्द डाॅक्टरही फसले असते. डाॅक्टरांचं निरागस खळाळतं हास्य, देहबोली, लकबी, संवादफेक, प्रेम, संताप, मिश्कीलपणा, बेभान जगणं, बेतालपणा, रांगडेपणा, धसमुसळेपणा, कलाकार म्हणून होणारी तगमग अशी पकडलिये की तो डाॅक्टर नसून सुबोध आहे हे विसरायलाच्च होतं. सुरुवातीच्या काळातल्या तिशीतल्या व नंतर पन्नाशीतल्या डाॅक्टरांमधला पेहेरावातला सूक्ष्म बदलही जाणवतो. त्याचे ते निळे डोळे ह्रदयाचा ठाव घेतात. सुबोध हा सुबोध म्हणून दिसतो त्याहून छान डाॅक्टर म्हणून दिसतो. थोड्या वेळानं समजेनासं होतं की सुबोध आवडतोय की डाॅक्टर की हे सर्व आधी मनात बघून आता आपल्याला दाखवणारा दिग्दर्शक?

सुमितनं साकारलेले डाॅ लागू पण असेच. सुमीत, साराभाईपासूनच लाडका होता पण इथं मात्र मानलं बाॅस. नक्कल न करताही केवळ देहबोली व संवादफेकीवर कॅरॅक्टर उभं केलंय. मोहन जोशी, आनंद, सोनाली, सुहास पळशीकर व प्रसाद ओक पण अमेझींग. नंदिता, वैदेही पण सरस.

सुलोचनाबाईंचं, डाॅक्टरांचं घर, जुनं फर्निचर, जुने फोन, जुन्या गाड्या....मस्त उभं केलंय. सुलोचनाबाईंचं घर अगदी असंच असेल असं वाटतं. त्यांचे पुरस्कार, सन्मानपत्रेही दिसतात भिंतीवर. ह्या सिनेमात त्या कलाकार म्हणून कमी आणि कणखर आई किंवा कुटुंबप्रमुख म्हणून जास्त जाणवतात.

आता डाऊनसाईड ऑफ द मुव्ही....
चित्रपट हाॅन्टींग आहे..... मनावर गारुड करतो. दुस-या दिवशीही सुखानं जगू देत नाही.... दुसरं तिसरं काही सुचत नाही. सतत आठवत रहातो.
काय करणार? नाईलाज आहे. डाॅक्टरांवरचा चित्रपट आहे. आपल्या अस्तित्वानं समोरच्याला वेड नाही लावलं तर ते डाॅक्टर कसले?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

मुळात हा बायोपिक का तयार केलाय? असे सिनेमे बघून काय शिकायला मिळणार आहे. बायोपिक हा त्यामधून बोध घेण्यासाठी असतो. मनोरंजनासाठी नाही. संजू काय किंवा घाणेकर काय , कुठलही moral नाही ह्या माणसांना. व्यसनी आणि बायकांचा नाद असणारे असे हे पुरुष.

बाकी सिनेमात सुबोध भावे , सोनाली कुलकर्णी आणि इतर सगळ्यांची कामे सुंदर.

बायोपिक हा त्यामधून बोध घेण्यासाठी असतो. मनोरंजनासाठी नाही.>>>
not necessarily. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात नेमकं काय घडलं- ते बोधप्रद असो वा नसो- हे मांडणं हादेखील उद्देश असू शकतो ना.
आणि बोध घेणं न घेणं प्रेक्षकांवर आहे.

कालच युट्युबवर कांचन घाणेकर यांच्या दोन मुलाखती पाहिल्या. या चित्रपटाविषयी त्यांनी चांगलेच मत व्यक्त केले आहे. तरीही मध्यंतरा नंतरचा भाग अतिरंजित वाटतो असेही त्यांनी सांगितले आहे. काशिनाथ आणि त्यांच्या विषयी समजल्यावर त्यांची आई (सुलोचनादीदी) चिडते त्यांना मारहाण करते वगैरे प्रसंग काल्पनिक आहेत प्रत्यक्षात सुलोचना यांनी केवळ अबोला धरला होता.

>> मस्त आठवण मेधावि...
+१११

>> बायोपिक हा त्यामधून बोध घेण्यासाठी असतो. मनोरंजनासाठी नाही.
असे काही नाही. जनमानसात चर्चिल्या गेलेल्या प्रसिद्ध व्यक्तींच्या आयुष्याचा पट समोर मांडला जातो. त्यातले काय घ्यायचे काय सोडायचे ज्याचा त्याचा प्रश्न.

असे काही नाही. जनमानसात चर्चिल्या गेलेल्या प्रसिद्ध व्यक्तींच्या आयुष्याचा पट समोर मांडला जातो. त्यातले काय घ्यायचे काय सोडायचे ज्याचा त्याचा प्रश्न. >>>>>> ++++++१११११११

असे सिनेमे बघून काय शिकायला मिळणार आहे. बायोपिक हा त्यामधून बोध घेण्यासाठी असतो. >>>>>>> तसेही 'गान्धी', ' डॉ. प्रकाश आमटे' बघून कोणी चान्गला बोध घेतला का?

मुळात हा बायोपिक का तयार केलाय? असे सिनेमे बघून काय शिकायला मिळणार आहे. बायोपिक हा त्यामधून बोध घेण्यासाठी असतो. मनोरंजनासाठी नाही. संजू काय किंवा घाणेकर काय , कुठलही moral नाही ह्या माणसांना. व्यसनी आणि बायकांचा नाद असणारे असे हे पुरुष.
<<
संजु सिनेमात जे म्हंटलय तेच या प्रश्नाचं उत्तर !
‘बॅड चॉइसेस ऑफन मेक अ गुड स्टोरी, और तुम तो बॅड चॉइसेस के किंग हो , संजु’ !
त्याच वाक्याची आठवण आली हा सिनेमा बघताना!
उत्तम कलाकार, नाटकाचे मेगास्टार पण व्यक्ति म्हणून काहीच पॉझिटिव नाही , बेफिकीर ,बेदरकार, बेईमान , व्यसनी आणि नंतर अनप्रोफेशनल सुध्दा !
वाईट वाटलं त्यांनी स्वतःची केलेली इतकी बरबादी बघून.
सिनेमा म्हणून आवडला, अभिनय सगळ्यांचा उत्कृष्ट !

काल हा चित्रपट पाहिला.
कलर्स वाल्या viacom18 ची ही निर्मिती आहे, सुबोध भावे आणि कलर्स 'अश्रूंची झाली फुले' नाटक करताहेत.

चित्रपटाबद्दल आवडला /नावडला अशी काहीच प्रतिक्रिया उमटली नाही. (घरी , दुसरे उद्योग करताना टीव्हीवर पाहिल्याचा परिणाम?)

मला हा चित्रप ट म्हणजे कथानायका च्या व्यक्तित्वातले ठळक पैलू आणि आयुष्यातली ठळक वळणं दाखबणार्‍या
प्रसंगांची, त्यात जिथे मुख्य अभिनेत्याला दाद घेण्या च्या जागा मिळतील अशा प्रसंगांची मालिका वाटली. त्यांत एकसंधपणा कमी वाटला.
सुबोध भावेचं काम एकंदरित आवडलं. जो काशिनाथ घाणेकर चित्रपटात दाखवायचा होता, तिथपर्यंत नेण्यात ते यशस्वी झाले.
फक्त काशिनाथ घाणेकरांचे ३-४ चित्रपट पाहिलेले असल्याने सुबोधचा आवाज सॉफ्ट वाटला.

इतर भूमिकांमध्ये सोनाली कुलकर्णी सुलोचनाबाईंसारखी दिसलीय, पण तिनेही आवाजाची पट्टी , संवादफेक तीच ठेवलीय. डिट्टो भालजींच्या भूमिकेतले मोहन जोशी.

तुलनेत सुमीत राघवन आणि प्रसाद ओक यांचे डॉक्टर लागू आणि प्रभाकर पणशीकर त्या दोघांच्या अधिक जवळ जाणारे वाटले.

डॉ वि. डॉ असा सामना, रादर सवालजवाब खरंच प्रत्यक्षात रंगला होता का? आणि गर्दीला दर्दी टाइप उत्तर डॉ लागूंनी दिलं होतं का? त्यांच्या प्रतिमेत तेवढं बसत नाही.
अभिनयाच्या दोन पद्धतींमधला फरक , मराठी रंगभूमीने घेतलेलं वळण यांचं प्रतीकात्मक चित्रण म्हणून तो प्रसंग असावा.
डॉ लागूंनीही ऐतिहासिक नाटकात भूमिका केलेली आहे. इथे ओशाळला मृत्यू हे असावं. यात संभाजीची भूमिका अनेकांनी केली होती. कुलदीप पवार , किरण भोगलेंपर्यंत. त्याबद्दल सुधा करमरकर यांनी लिहिलेला लेख वाचला होता. त्यात ऐति हासिक नाटकातही डॉ लागू वास्तव वादी शैलीतच काम करीत असं लिहिलं होतं. नाटक बघायल की भाजी आणायलाचा संदर्भ तो असावा.
शेवटी श्रेयनामवलीत इथे...चं श्रेय वि वा शिरवाडकरांना दिलेलं दिसलं.

मला हा चित्रप ट म्हणजे कथानायका च्या व्यक्तित्वातले ठळक पैलू आणि आयुष्यातली ठळक वळणं दाखबणार्‍या
प्रसंगांची, त्यात जिथे मुख्य अभिनेत्याला दाद घेण्या च्या जागा मिळतील अशा प्रसंगांची मालिका वाटली. त्यांत एकसंधपणा कमी वाटला.>> सहमत!

शेवटी किती दाखवणार नी काय काय दाखवणार? वेळेचे बंधन येतेच. कुठेतरी थांबायलाच हवे, काहीतरी निर्णय घ्यायलाच हवा. घाणेकर अनेकापर्यंत पोचवायचे होते , ज्यांना त्यांच्याबद्दल अगदी कमी माहिती होती त्यामुळेचा आयुष्यातली महत्वाची वळणेच दाखवावी लागणार.

भाईएवढा वाईट नव्हता तरी. जे घडलं होतं तेच दाखवलं निदान नव्वद टक्के असं म्हणता येईल. कांचन घाणेकर यांनी मुलाखतीत म्हटले आहे की त्यांच्या आईने त्यांना मारले नव्हते, फक्त अबोला धरला होता घाणेकरांबद्दल कळल्यावर. मृत्यूही जसा दाखवला आहे तसा नव्हता. मीठमसाला लावल्याशिवाय लोकांना आवडणार नाही असा समज असावा. पण बायोपिकमध्ये जे जसे आहे तसेच दाखवावे. टोन डाऊन करावे गरज पडल्यास पण भडकपणे दाखवू नये. काल्पनिक कथानक बनवावे आणि वाटेल तेवढा मीठमसाला लावावा. कोणाच्या आयुष्याशी (मरणोत्तर का असेना) खेळू नये.

वर आलेल्या बहुतान्शी प्रतिक्रियाशी सहमत, चित्रपटातुन डॉक्टरान्च विक्षिप्त व्यकिमत्व समोर येत राहत, इतका ताकदिचा कलाकार पण इतका मुडी, सन्तापी , तरेव्हाइक? खरतर त्यानी सन्यम राखला असता तर एकाच वेळी मराठी चित्रपट आणी नाटकातला उत्तुन्ग आणी मोस्त पॉप्युलर कलाकार होण्याच भाग्य लाभल असत, मला त्याची रन्गभुमीची कारगिर्द अगदिच माहिती नव्हती आनी चित्रपट सुद्धा ठळकपणे आठवणारे दोनच पाठलाग आणी एकटी.
सगळे कलाकार आवडले, सगळ्यानी समरसुन काम केलय, कान्चन घाणेकर म्हनून वैदेही खुप गोड दिसलीये , बहुतान्शी सगळ्यानी भुमिका समजुन स्वतःच काहितरी दिलिये, कॉपी कॅट वाटत नाही...

Pages