आणि डाॅक्टर काशिनाथ घाणेकर

Submitted by मेधावि on 9 November, 2018 - 23:29

अभिजीत देशपांडे लिखीत आणि दिग्दर्शीत "आणि डाॅक्टर काशिनाथ घाणेकर" सिनेमा काल पाहीला. अभिजित हा आमच्या वर्गमित्राचा भाचा म्हणून अजून कौतुकानं व प्रेमानं पाहीला.

काशिनाथ घाणेकरांची नाटकं आणि त्यांचा सुवर्णकाळ आमच्या पिढीला पहाता किंवा अनुभवता नाही आला, मात्र हा सिनेमा बघताना त्या काळात शिरून, भालजी पेंढारकर, सुलोचनादिदी, डाॅक्टर ह्या अप्राप्य व्यक्तींसमवेत काही क्षण जगल्यासारखं निश्चितपणे वाटलं.

जुनी मुंबई, जुनं शिवाजी मंदीर, जयप्रभा स्टुडीओ, जुने रस्ते आणि जुनी नाटकं पहाताना नाॅस्टॅल्जिक (गतकालविव्हल ) व्हायला झालं. एखाद्या जुन्या वाड्यात अनेक वर्षांनी, सहजपणे आत शिरावं आणि तेथील प्रत्येक वस्तुनं, कोप-यानं, भिंतीनं ठाईठाई आपल्या मनाचा वेध घ्यावा, त्यावर कब्जा करावा, आपल्याला जुन्या दिवसांकडे, जुन्या माणसांकडे, जुन्या आयुष्यांकडे खेचून घ्यावं, त्यांची जीवघेणी आठवण व्हावी, त्यांच्या सुखानं आपणही शहारावं व त्यांच्या दुःखानं आपलेही डोळे भरून यावेत पण तिथून परत निघताना मात्र पाऊल निघू नये असा काहीसा अनुभव आला चित्रपट पहाताना.

अनेक पुस्तकांमधून, चित्रपटांतून आपल्याला माहीत असणारे आपले मराठी चमचमते कलाकार, आपली माणसं, आपल्याला त्यांच्याबद्दल वाटणारं कुतुहल, आदर, प्रेम, अभिमान,अपेक्षा ह्या सर्वांवर बोलतो हा चित्रपट. दिदी, भालजी पेंढारकर, डाॅक्टर ह्यांच्यासारखी वलयांकीत माणसं व त्यांचं सर्वसामान्य जगणं खूप काही सुचवून जातं. Entertainment industry is the most cruel industry हे पुन्हा एकदा ठळकपणे जाणवतं.

सर्व कलाकारांनी झपाटल्यासारखं काम केलंय. सुबोध, लेका तुझं काय करायचं रे? तू ना, वेडा माणूस आहेस. ठार वेडा. मुळात त्याच्या व डाॅक्टरांच्या दिसण्यात, आवाजात, जगण्यात, शरीरयष्टीत भरपूर अंतर आहे, पण त्यानं, (मेकअप आणि काॅस्चुम्सनं पण) ते असं बेमालूम मिटवलंय की खुद्द डाॅक्टरही फसले असते. डाॅक्टरांचं निरागस खळाळतं हास्य, देहबोली, लकबी, संवादफेक, प्रेम, संताप, मिश्कीलपणा, बेभान जगणं, बेतालपणा, रांगडेपणा, धसमुसळेपणा, कलाकार म्हणून होणारी तगमग अशी पकडलिये की तो डाॅक्टर नसून सुबोध आहे हे विसरायलाच्च होतं. सुरुवातीच्या काळातल्या तिशीतल्या व नंतर पन्नाशीतल्या डाॅक्टरांमधला पेहेरावातला सूक्ष्म बदलही जाणवतो. त्याचे ते निळे डोळे ह्रदयाचा ठाव घेतात. सुबोध हा सुबोध म्हणून दिसतो त्याहून छान डाॅक्टर म्हणून दिसतो. थोड्या वेळानं समजेनासं होतं की सुबोध आवडतोय की डाॅक्टर की हे सर्व आधी मनात बघून आता आपल्याला दाखवणारा दिग्दर्शक?

सुमितनं साकारलेले डाॅ लागू पण असेच. सुमीत, साराभाईपासूनच लाडका होता पण इथं मात्र मानलं बाॅस. नक्कल न करताही केवळ देहबोली व संवादफेकीवर कॅरॅक्टर उभं केलंय. मोहन जोशी, आनंद, सोनाली, सुहास पळशीकर व प्रसाद ओक पण अमेझींग. नंदिता, वैदेही पण सरस.

सुलोचनाबाईंचं, डाॅक्टरांचं घर, जुनं फर्निचर, जुने फोन, जुन्या गाड्या....मस्त उभं केलंय. सुलोचनाबाईंचं घर अगदी असंच असेल असं वाटतं. त्यांचे पुरस्कार, सन्मानपत्रेही दिसतात भिंतीवर. ह्या सिनेमात त्या कलाकार म्हणून कमी आणि कणखर आई किंवा कुटुंबप्रमुख म्हणून जास्त जाणवतात.

आता डाऊनसाईड ऑफ द मुव्ही....
चित्रपट हाॅन्टींग आहे..... मनावर गारुड करतो. दुस-या दिवशीही सुखानं जगू देत नाही.... दुसरं तिसरं काही सुचत नाही. सतत आठवत रहातो.
काय करणार? नाईलाज आहे. डाॅक्टरांवरचा चित्रपट आहे. आपल्या अस्तित्वानं समोरच्याला वेड नाही लावलं तर ते डाॅक्टर कसले?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

मीरा.. Proud Proud

===
हीरा,
> प्राण किंचित. > प्राण दिसायला नाहीये एवढा क्लार्क गेबलसारखा पण तशी मिशी ठेवली, कोट हॅट घातला तर करारी, शोभून दिसतो. बाकी गेबलसारखी उंची, भरलेले खांदे ६०च्या दशकातल्या कोणा भारतीय नटाकडे नसतील. प्रदीपकुमार आठवतोय त्यातल्यात्यात. जागते रहो बघताना राज कपूरच्या हडकुळ्या फ्रेमशेजारी तो चांगला वाटला होता.

===
सूलू_८२,
> सुबोध भावे क्लास पेक्षा मासचा अभिनेता आहे. स्वजोबाबत असे म्हणता येत नाही. बालगन्धर्व, लोकमान्य, कटयार सारखे चित्रपट त्याच्या खात्यात आहेत. हा, त्याने फुगे, अगडबम सारखे चित्रपट करणे टाळावे. > अच्छा. माहित नव्हतं. धन्यवाद Happy

सुबोध भावेचा पहिला(?) चित्रपट 'आम्ही असू लाडके' पाहिलाय का कुणी इथे? फार म्हणजे फार सुंदर चित्रपट आणि अभिनय!

'आणि..' आज पाहिला. जबरदस्त अभिनय साऱ्यांचाच. घाणेकरच कसे महान असं दाखवायचा अट्टहास केलेला नाहीये हे फार आवडले. सुबोध भावेने फार जीव तोडून अभिनय केलाय इथे.
खटकलेली गोष्ट: लागू- घाणेकर वाद फार बेगडी वाटतो. त्यांच्यातलं द्वंद्व नीट उभंच रहात नाही. शिवाय घाणेकरांनी खुप नाटकं केली, त्यातल्या ५ नाटकांचाच उल्लेख सतत येतो. सोकुलचा अभिनय अतिउत्तम.

अच्छा. माहित नव्हतं. धन्यवाद >>>>>> तुमचे स्वागत आहे अ‍ॅमी.

प्रदीपकुमार आठवतोय त्यातल्यात्यात. जागते रहो बघताना राज कपूरच्या हडकुळ्या फ्रेमशेजारी तो चांगला वाटला होता. >>>>> आ, जागते रहोमध्ये प्रदीप कुमार होता? माहित नव्हत हे.

कुलवधू सिरियलमधला सुभाचा रोल बेस्ट होता. विविध शेड्स होते त्याच्या भुमिकेला.

रविवारी राष्ट्रीय दूरदर्शनवर प्रादेशिक सिनेमे दाखवत. त्यात गारंबीचा बापू दाखवला. माझ्या मित्राने आज गरीबांचा बापू नावाचा मराठी सिनेमा आहे घरी जाऊन लाव असे सांगितले होते ते आठवले.

अन्जू,फा, सु भा म्हणजे सुबोध भावे हे न समजणं, ही माझी ऑनेस्ट मिस्टेक होती. (कोडी सोडवता नाही येत.) Happy

बाकी मराठी, हिंदी, इंग्लिश कुठल्याच सिरीयल्स बघण्याचा पेशन्स नाहीये.

आत्ता पाहून आले हा सिनेमा.एक सुरेख सिनेमा पाहिल्याचं समाधान मिळालं.सर्वांचीच कामं मस्त झाली आहेत. सु.भाने कमाल केली आहे.फकत या रोलसाठी बरंच बारीक व्हायला हवं होतं.
डाॅक्टरांचं निरागस खळाळतं हास्य, देहबोली, लकबी, संवादफेक, प्रेम, संताप, मिश्कीलपणा, बेभान जगणं, बेतालपणा, रांगडेपणा, धसमुसळेपणा, कलाकार म्हणून होणारी तगमग अशी पकडलिये की तो डाॅक्टर नसून सुबोध आहे हे विसरायलाच्च होतं. >>>>>> +१.तरीही सुभाचं ऋजू,मार्दवी हसणं अलगद डोकावतं.

जरूर पहाण्यासारखा सिनेमा आहे.

मायबोली हा एक रंगमंच आहे. इथेही अनेक स्टार्स आणि सुपरस्टार्स आहेत. या सर्वांना एकत्र वांधणारा सामूहीक बायोपिक आपण सगळे मिळून काढूयात का ? सर्वांच्या भूमिका अर्थातच सुबोध भावे एकटाच करेल, स्त्री असो अथवा पुरूष, एकटाच पुरे !

आजच बघितला खूप आवडला. you may love may hate but may not ignored अशा प्रकारचे व्यक्तिमत्व होतं डाँ.चे.सादरीकरण पण उत्तम

काल पाहिला. आवडला. सर्वांची कामं जबरदस्त! सु.भा.ची तर मी अगदी सुरूवातीपासून फ्यान आहेच.

(तरी, डॉ.लागू आणि काशीनाथ यांच्यातलं टशन दाखवणारे सीन्स जरा तोकडे पडले असं राहून राहून वाटतंय.)

पाहिला हा सिनेमा. अभिनय उत्तम आहे सर्वांचा . पण घाणेकर येवढे मोठे सुपरस्टार झाले त्यातले सर्व टप्पे नीट दाखवले गेले नाहीत.

एका प्रसंगात इरावती बाईन्ना घरात एक माणूस पडलेला दिसतो आणि नंतर बेडरूम मधे कपाटातून एक बाई धाडकन खाली पडते; त्याचा संदर्भ मला तरी नक्की लागला नाही. कोण अस्तात ते?

कांचन घाणेकरांच पुस्तक खूप पूर्वी वाचल होतं. त्यात शेवटी ते वेगळे रहायला लागतात अस आठवतय. पुस्तक वाचल्यावर - कशाला असल्या माणसाच्या प्रेमात पडली; बर पडली तर एक ठीक पण वेळीच सावरायचं ना. नाहीतरी कोणीतरी एक स्थळ सुचवल होत आणि त्याबद्दल घरी चर्चा पण चालली होती . तिकडे सुखी झाली असती. - असंच वाटल होतं. सिनेमा बघितल्यावर तर खूपच वाटू लागल .
कांचन घाणेकरांची मुलाखत ऐकली आत्ताची. खरच फार संयमित व्यक्तिमत्व. इतकं वेड्यासरखं प्रेम करणारी साथीदार मिळ्णं म्हणजे फार भाग्यवान होते काशीनाथ घाणेकर. इरावती बाई तर फारच आवडल्या.

खरंतर खूप उशीर झालाय लिहायला. कारण काशिनाथ घाणेकर यांच्याविषयी शालेय वयात असल्यापासून मनात फार कुतूहल होते. त्यात आणि सुबोध भावेचा असल्याने दर्जाबद्दल खात्री होतीच. म्हणून अधाशीपणे पहिल्या दिवशीच जाऊन चित्रपट पाहिला. आणि अपेक्षेस शतप्रतिशत जरी उतरला नसला तरी नव्वद पंच्याण्णव टक्क्यापर्यंत तरी मजल मारलीच. त्यामुळे "चित्रपट कसा आहे रे? बघू का?" असे कोणी विचारले तर माझे थोडक्यात उत्तर असते "मस्त आहे. नक्की बघ. चुकवू नकोस"

इथे बऱ्याच प्रतिक्रिया आल्यात. त्यातून खूप इंटरेस्टिंग माहिती मिळत आहे (जसे कि घाणेकर हिंदी चित्रपटांत सुद्धा आहेत हे आधी माहिती नव्हते). मुळात घाणेकर रंगमंचावर/चित्रपटांत कार्यरत होते तेंव्हा माझे वय लहान होते. शिवाय ग्रामीण भागात असल्याने त्यांची नाटके बघणे वगैरे दूरचीच गोष्ट. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याविषयी वृत्तपत्रांत भरभरून येऊ लागले तसे घाणेकर अधिकाधिक कळू लागले (स्मिता पाटीलच्या बाबत सुद्धा असेच घडले होते). आणि या माणसाला रंगमंचावर पाहण्याचा योग आता कधीच येणार नाही हि रुखरुख कायमची मनाला लागून राहिली. एकेकाळी रंगमंच गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्यसनाधीनपणामुळे झालेला करुण अंत चटका लावून गेला होता. नंतर "नाथ हा माझा" आले. गाजले. पण काही कारणांमुळे वाचायचे राहिले ते राहिलेच.

असो. आता चित्रपटाविषयी. सुबोधचे "बालगंधर्व", "कट्यार काळजात घुसली" हे आधी पाहिले होते. हजारो वर्षांपूर्वीचा किंबहुना चार-पाचशे वर्षांपूर्वीचा काळ दाखवणे तुलनेने सोपे आहे. पण तीस चाळीस पन्नास वर्षांपूर्वीचा काळ दाखवणे तितके सोपे नाही. आसपास केवळ जुनाट वस्तू दाखवून ते होत नाही. कारण हा बदल फार मोठा नसतो. माणसांच्या वृत्तींमधले, बोलण्या वागण्यातले, आणि भोवताली जे सूक्ष्म फरक घडलेत ते दाखवणे हे आव्हान असते. शिवाय, अनेक लोक जे तो काळ प्रत्यक्ष जगलेत तेच प्रेक्षक म्हणून बसलेले असतात. त्यामुळे प्रेक्षकांचे नकळतपणे परिक्षक झालेले असतात. त्या परीक्षेला कसे उतरायचे याचे तंत्र सुबोध आणि टीम ला चांगलेच अवगत झाले आहे. "बालगंधर्व" च्या वेळीच अनेक प्रेक्षक ते पाहून अवाक् झाले होते.

अभिनयाबाबत सुबोध विषयी बोलायलाच नको. पण सर्वांनीच भूमिका अप्रतिम निभावल्या आहेत. अगदी मनापासून कामे केली आहेत. माझ्या दृष्टीने सुबोध नंतर सर्वात भाव खावून गेलेली कोण असेल तर ती वैदेही. वाह. कित्ती गोऽऽऽड काम केलंय तिने! Blush प्रेक्षकांमधल्या अनेकांचा "काशिनाथ" होतो तिचा अभिनय पाहताना (मी सुद्धा त्यातलाच एक Wink ). त्याच्या अभिनयाचा बारकाईने विचार करून त्याला योग्य ते सल्ले देऊन त्याच्या करियरला वेळोवेळी कलाटणी देणारी, त्याला प्रोत्साहित करणारी, नामावलीत सर्वात शेवटी "आणि काशिनाथ" लिहा असे सुचवून त्याचा भाव वाढवणारी इतकी स्मार्ट व गोड मुलगी भेटल्यावर कोण प्रेमात पडणार नाही?

या चित्रपटातील अनेक संवाद दाद देण्यासारखे आहेत. "क्या बात है" असे सहजउद्गार कित्येकदा निघाले असतील. त्यातल्या त्यात तो प्रसंग. कित्येक महिने भेटायचे नाही अशी अट घातलेली असते. तेव्हा काशिनाथची शेवटची भेट घेऊन ती जायला निघते, तेंव्हा काशिनाथमधला असुरक्षिततेची भावना बाळगणारा "टिप्पिकल" प्रियकर जागा होतो आणि तिला विचारतो,

"ह्या काही महिन्यांच्या काळात तू अजून कोणाच्या प्रेमात तर पडणार नाहीस ना?"

तेंव्हा त्याच्या या प्रश्नाला उत्तर म्हणून नाक वर करून ती एकच वाक्य बोलते "असली बायको हवी आहे तुला?" खल्लास! वैदेहीने साकारलेली कांचन अवघ्या चार पाच शब्दात कित्ती काही सांगून जाते. काशिनाथला निरुत्तर करते.

काशिनाथ आपल्या पहिल्या पत्नी इरावती यांना कांचन विषयी सांगतो तो प्रसंग सुद्धा असाच लक्षात राहतो. स्तिमित करणारा प्रसंग आहे. दररोज भेटणाऱ्या आणि पुतणीचे वय असलेल्या मुलीच्या प्रेमात आपला नवरा पडलाय असे समजूनही इरावती शांत राहतात. त्यांना ना धक्का बसतो ना त्या अस्वस्थ होतात. क्षणभर वाटून जाते किती ती वैचारिक परिपक्वता आणि समजूतदारपणा होता त्यांच्यात. पण तसे वाटणारे आपण उल्लू बनलेले असतो हे नंतरच्या एका प्रसंगामुळे ध्यानात येते.

दाद घेणारा अजून एक प्रसंग म्हणजे "लाल्या"ची स्टेजवरचा पहिला प्रवेश. हा प्रसंग सुद्धा केवळ अप्रतिमरित्या दाखवला गेलाय.

अनेक साहित्यिक-राजकारणी-कलाकार यांच्यात त्याकाळात छुपे वा उघड वाद वगैरे झाले. त्यातले काही गाजलेही. तो काळच तसा होता. अत्रे-फडके, ठाकरे-अत्रे, वपू-पुलं, दादा कोंडके-व्ही. शांताराम इत्यादी. पण डॉ. घाणेकर Vs डॉ. लागू असा सामना सुद्धा कधीकाळी रंगला होता हे माहित नव्हते ते या चित्रपटामुळे कळले. पणशीकर-घाणेकर हे अखंड मैत्रीचे नाते सुद्धा या चित्रपटामुळे कळले.

चित्रपटात जाणवलेल्या काही त्रुटी:

१. त्याकाळात काशिनाथ यांच्याबाबत एक गोष्ट सातत्याने माध्यमांतून येत होती. ती म्हणजे एक काळ असा होता कि मराठी नाटके केवळ डॉ. घाणेकर यांच्यामुळे चालत. घाणेकर असले म्हणजे "पैसा वसूल" असे समीकरण होते. त्या काळात काशिनाथ यांना निर्मात्ते "कॅश"नाथ असे संबोधत. हा महत्वाचा मुद्दा चित्रपटात राहून गेला आहे (किंवा कुठे ओझरता उल्लेख वगैरे आला असेल तर माझ्या ध्यानात आलेला नाही)

२. छ. संभाजी महाराजांची भूमिका करताना एका दृश्यात केवळ काशिनाथ हे एकटेच स्टेजवर असतात आणि आपल्या आक्रमक अभिनयाने अवघे स्टेज भारून टाकतात. नाट्यरसिकांसाठी तो केवळ अविस्मरणीय अनुभव असायचा असे खुपदा वाचले आहे. चित्रपटात हा मुद्दा सुद्धा राहून गेला आहे.

३. जुना काळ दाखवताना जे रेस्टॉरंट वारंवार दाखवले गेले आहे ते त्यामानाने फारच डिसेंट दाखवलेय. त्याकाळात कदाचित इंग्लंडमध्ये तशी रेस्टॉरंट असतील, आपल्याकडे नाही असे उगीचच वाटून गेले.

बाकी चित्रपट एकदम कडॅऽऽऽक Happy

ता.क. चित्रपट पाहून झाल्यावर राहून राहून वाटत होते कि हिंदीतले त्याकाळातले लोकप्रिय संगीतकार "शंकर जयकिशन" आणि अभिनेत्री "स्मिता पाटील" ह्यांच्यावर सुद्धा असे बायोपिक निघायला हवेत. मी तर नक्की बघेन. त्यातल्या त्यात जयकिशन ची भूमिका करणारा सुबोध पाहायला फार आवडेल

पेस्ट करणे अस्थानी आहे मला मान्य आहे. पण काशिनाथच्या शेवटच्या प्रयोगाचा प्रत्यक्श दर्शी साक्शीदाराने लिहिलेल्या या लेखाचे मूल्य प्रचंड आहे म्हेणून लोकसत्तातून कॉपी करत आहे. घाणेकर समजायला त्याने मदत होइल असे वाटते.

Blog : काशिनाथ घाणेकरांच्या शेवटच्या प्रयोगाची मनाला चटका लावून जाणारी गोष्ट
मराठी रंगभूमीच्या पहिल्या सुपरस्टारचा असा झाला करुण अंत..

सुरेश आकोटकर

‘आणि.. डॉ. काशिनाथ घाणेकर’ यावर्षी हा एक चांगला चित्रपट पाहिल्याचे समाधान वाटले. या महान कलावंताची अखेर अमरावतीला झाली. यावर काही ठिकाणी नाट्यप्रेमींची मत-मतांतरे वाचली. घाणेकर यांच्या रंगभूमीवरील शेवटच्या प्रयोगाबद्दल चित्रपटात दाखवले त्यापेक्षा वास्तव थोडे वेगळे आहे. त्या घटना दाखविता आल्या असत्या तर चित्रपटाचा शेवट आणखी परिणामकारक ठरला असता असे वाटते. त्यामुळे नक्की काय घडले याचा साक्षीदार म्हणून डॉ. घाणेकरांच्या शेवटच्या प्रयोगाबद्दल लिहितो आहे. ‘वनिता समाज’च्या प्रांगणात हा प्रयोग झाला होता. त्या काळी अमरावतीला नाट्यगृह नसल्यामुळे बहुतांश नाटकं याच छोट्याशा जागेत व्हायची. प्रयोगाच्या वेळी अमरावतीला पाऊस नव्हता. चित्रपटात मात्र जोरदार पाऊस दाखवलाय. प्रयोग झाला, हेही खरे आहे. कारण मी त्या प्रयोगाला हजर होतो. नाटक ‘तुझे आहे तुजपाशी’ होते. चित्रपटात ‘अश्रूंची झाली फुले’ सांगितले. घाणेकरांचा अभिनय चांगला झाला नाही. प्रेक्षक उभे राहून त्यांची खिल्ली उडवू लागले. न राहवल्याने पहिल्या अंकानंतर मी एका मित्रासोबत विंगेत गेलो. आमच्या मागे आणखी काही प्रेक्षक आले होते. मध्येच एका तरुणाने आम्हाला अडवले, घाणेकरांना भेटू दिले नाही. मी नियतकालिकेतून लिहीत असतो असा परिचय दिल्यावर काय बोलायचे ते माझ्याशी बोला असे ते म्हणाले. आम्ही म्हणालो की त्यांचे काम खूपच वाईट होत आहे. त्या गृहस्थाने सांगितले की त्यांनी मद्यपान वगैरे केले नसून त्यांची प्रकृतीच ऐनवेळी खूप बिघडली आहे. येथील डॉक्टरांनी औषधोपचार केले आहेत. मी त्यांना विनंती केली की घाणेकरांच्या तब्येतीविषयी प्रेक्षकांना सांगून पुढील अंक बंद करा, घाणेकरांना विश्रांतीची गरज आहे हे प्रेक्षक समजून घेतील. पण ते आमचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. नाटक बंद केल्यामुळे पुढील प्रयोगासाठी चांगला संदेश जाणार नाही असे त्यांच्या बोलण्यावरून वाटत होते. तो विदर्भ दौरा असल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रपूरला वगैरे जायचे आहे म्हणून ते बोलले. शेवटी कसेबसे नाटक पार पडले.

नाटकात डॉ. घाणेकर स्टेजवर लडखडत होते. त्यांना खोकल्याची उबळ येत होती. अधेमधे सोबतची पात्रे त्यांच्या पाठीवरून हात फिरवत त्यांना सांभाळून घेत होती. त्या महान नटाला अशा अवस्थेत पाहून कसेसेच वाटत होते. काही प्रेक्षक उभे राहून त्यांची हुर्यो उडवू लागले. डॉ. आपले संवाद थांबवून हे बघत होते. घाणेकरांच्या मनाला हे खूप लागले असावे. कारण प्रयोग संपला त्या रात्रीच त्यांचे निधन झाले. रेल्वे स्टेशनजवळच्या एका हॉटेलमध्ये ते थांबले होते . त्या काळी मोबाईल नव्हते. फोनही कमीच. प्रयोगाचे स्थळ आणि हॉटेल यामधले अंतर म्हणजे रेल्वे पुलाची दोन टोकं, एवढे कमी. चित्रपटात मात्र उशीर झाला आहे आणि चिंताग्रस्त होऊन डॉक्टरांची प्रयोगाला येण्याची वाट बघणे सुरू आहे असे दाखवले आहे. डॉ. रात्री गेल्यामुळे सकाळच्या वृत्तपत्रात बातमी आली नाही. यामुळे घाणेकर गेल्याचे अमरावतीकरांना कळले ते तिसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रातून. त्यामुळे ते गेले त्या दिवशी त्यांना निरोप देण्यासाठी गर्दी होणे शक्यच नव्हते.

वृतपत्रातून माहीत झाल्यानंतर मात्र अमरावतीत शोकसभा होऊन श्रद्धांजली वाहण्यात आली. २ मार्च १९८६ ला रविवारी घाणेकर गेले. मित्रांकडून कळले की त्या दिवशी नाटकातल्या टीमपैकी केवळ एक सहाय्यक मागे थांबला होता. मग अमरावतीच्या पत्रकारांनी आणि काही सहका-यांनी पुढाकार घेऊन शवविच्छेदन करणे, नातेवाईकांशी संपर्क साधणे आदी बाबींची पूर्तता केली. यात दुपार टळून गेली. नंतर सायंकाळ होता होता त्यांचे पार्थिव मुंबईला पाठविण्यात आले.

काशिनाथ घाणेकर 'तुझे आहे तुजपाशी'मध्ये पण काम करायचे हे माहिती नव्हतं मला !

सिनेमात त्या प्रसंगातलं नाटक का बदललं असावं? काही कॉपीराईटचा वगैरे इश्यू असावा का? - असं मनात आलं.

रश्मी म्हणून काही घाणेकरानी व्यसने सोडली नाहीत.
एक किस्सा वाचला होता.
त्यातला व्यक्तीचा मित्र आणि तो विनोबा भावेना भेटायला पवनार अश्रमात भेटायला गेले होते. भेटीत त्यांनी व्यक्तीने विनोबाजींचे दर्शन घेतले. त्याचा मित्र दर्शन घेण्यासाठी विनोबांच्या चरणांवर वाकला असता त्याच्या शर्टच्या वरच्या खिशात असलेल्या सुट्या सिगरेट्स टप टप विनोबांच्या पायावर पडल्या. विनोबांनी शांतपणे काहीही न बोलता एकेक सिगरेट उचलून त्या मित्राच्या खिशात परत ठेवून दिली. या प्रसंगाने तो मित्र इतका खजील झाला की त्याने सिगरेट कायमची सोडून दिली.

असे काही घाणेकरानी केले असते तर घाणेकरांच्या वाईट वाटन्याला काही अर्थ होता....

फक्त नवीन पिढीनेच पहावा. जुन्या पिढीला आधीच माहीत आहे, घाणेकर काय होते. त्यांच्यापेक्षा शंकर घाणेकर हे कितीतरी चांगले अभिनेते होते.

अतुलजी, मस्त परीक्षण

घाणेकर हिंदी चित्रपटांत सुद्धा आहेत हे आधी माहिती नव्हते >>>>>>> तो नन्दाचा 'वादिया तेरा दामन वाला' चित्रपट होता त्यात काशिनाथ घाणेकर होते.

https://www.youtube.com/watch?v=EuwFeXU0_jg

स्मिता पाटील" ह्यांच्यावर सुद्धा >>>>>> स्मिता पाटिल वर बायोपिक झालेला आवडेल. Happy

त्यांच्यापेक्षा शंकर घाणेकर हे कितीतरी चांगले अभिनेते होते. >>> हे त्यांचे मोठे भाऊ होते ना. मी ऐकलंय फक्त की हे चांगले अभिनेते होते. ते गेले तेव्हा पेपरमध्ये वाचलं. नाथ हा माझा मध्ये पण वाचलंय. पण ते पुस्तक आवडलं नाही अजिबात त्यामुळे कसंतरी पूर्ण केलं एवढंच. फार अगदी बारकाईने आठवत नाही त्यामुळे.

अभिलाषा (१९६८) मध्ये काशिनाथ घाणेकर सेकंड लीड मध्ये होते. हीरो संजय आहे. वादियां तेरा दामन हे संजय -नन्दा आणि काशिनाथ - नंदा असे वेगवेगळे चित्रीत झाल्याचे दिसते. चित्रपटात संजय व काशिनाथ भाउ भाउ असल्याचे वाटतेय.. महाबळेश्वरच्या घिशा पिट्या लोकेशनवरचे तेहीउन्हाळ्यात शूट केलेले गाणे...

काशिनाथ दादी मा या हिन्दी चित्रपटातही होते. ते दंत वैद्य होते . त्या पिढीत ते फॅन्स मध्ये ' काश्या ' नावाने उल्लेखले जात. सध्या नाना पाटेकरची जशी क्रेज आहे तशा स्वरूपाची त्यांची त्या वेळी होती यावरून लोकप्रियतेची कल्प्ना यावी.
स्टायलिश अभिनेत्याची स्टाइल हा यू एस पी होतो तशी ती त्याची मर्यादाही होते...
लोकप्रियता व्यवस्थित 'पचवलेली' उदाहरणे म्हणून दिलीप कुमार, अमिताभ, गावसकर, तेन्डुलकर, धोनी देता येतील. विराट त्यात येन्याची शक्यता कमी वाटते

>>> लोकप्रियता व्यवस्थित 'पचवलेली' उदाहरणे म्हणून
ए आर रहमान! मला त्याच्या म्यूझिकमधला मॅडनेस, करिअर मॅनेजमेन्टमधलं धोरण, स्वच्छ कारकीर्द आणि ऑलमोस्ट सूफी संतासारखा वावर हे सगळं एकाच व्यक्तीत कसं नांदतं याचं कायम अप्रूप वाटत आलेलं आहे!

>>> काशिनाथ दादी मा या हिन्दी चित्रपटातही होते
'ऐ माँ, तेरी सूरत से अलग भगवान की सूरत क्या होगी' त्यातलंच आहे का गाणं?

त्या गृहस्थाने सांगितले की त्यांनी मद्यपान वगैरे केले नसून त्यांची प्रकृतीच ऐनवेळी खूप बिघडली आहे. येथील डॉक्टरांनी औषधोपचार केले आहेत. मी त्यांना विनंती केली की घाणेकरांच्या तब्येतीविषयी प्रेक्षकांना सांगून पुढील अंक बंद करा, घाणेकरांना विश्रांतीची गरज आहे हे प्रेक्षक समजून घेतील. पण ते आमचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. >>>>>>> हे वाचून वाईट वाटलं.सिनेमाचा शेवट तसाच दाखवायला हवा होता.

Pages