आणि डाॅक्टर काशिनाथ घाणेकर

Submitted by मेधावि on 9 November, 2018 - 23:29

अभिजीत देशपांडे लिखीत आणि दिग्दर्शीत "आणि डाॅक्टर काशिनाथ घाणेकर" सिनेमा काल पाहीला. अभिजित हा आमच्या वर्गमित्राचा भाचा म्हणून अजून कौतुकानं व प्रेमानं पाहीला.

काशिनाथ घाणेकरांची नाटकं आणि त्यांचा सुवर्णकाळ आमच्या पिढीला पहाता किंवा अनुभवता नाही आला, मात्र हा सिनेमा बघताना त्या काळात शिरून, भालजी पेंढारकर, सुलोचनादिदी, डाॅक्टर ह्या अप्राप्य व्यक्तींसमवेत काही क्षण जगल्यासारखं निश्चितपणे वाटलं.

जुनी मुंबई, जुनं शिवाजी मंदीर, जयप्रभा स्टुडीओ, जुने रस्ते आणि जुनी नाटकं पहाताना नाॅस्टॅल्जिक (गतकालविव्हल ) व्हायला झालं. एखाद्या जुन्या वाड्यात अनेक वर्षांनी, सहजपणे आत शिरावं आणि तेथील प्रत्येक वस्तुनं, कोप-यानं, भिंतीनं ठाईठाई आपल्या मनाचा वेध घ्यावा, त्यावर कब्जा करावा, आपल्याला जुन्या दिवसांकडे, जुन्या माणसांकडे, जुन्या आयुष्यांकडे खेचून घ्यावं, त्यांची जीवघेणी आठवण व्हावी, त्यांच्या सुखानं आपणही शहारावं व त्यांच्या दुःखानं आपलेही डोळे भरून यावेत पण तिथून परत निघताना मात्र पाऊल निघू नये असा काहीसा अनुभव आला चित्रपट पहाताना.

अनेक पुस्तकांमधून, चित्रपटांतून आपल्याला माहीत असणारे आपले मराठी चमचमते कलाकार, आपली माणसं, आपल्याला त्यांच्याबद्दल वाटणारं कुतुहल, आदर, प्रेम, अभिमान,अपेक्षा ह्या सर्वांवर बोलतो हा चित्रपट. दिदी, भालजी पेंढारकर, डाॅक्टर ह्यांच्यासारखी वलयांकीत माणसं व त्यांचं सर्वसामान्य जगणं खूप काही सुचवून जातं. Entertainment industry is the most cruel industry हे पुन्हा एकदा ठळकपणे जाणवतं.

सर्व कलाकारांनी झपाटल्यासारखं काम केलंय. सुबोध, लेका तुझं काय करायचं रे? तू ना, वेडा माणूस आहेस. ठार वेडा. मुळात त्याच्या व डाॅक्टरांच्या दिसण्यात, आवाजात, जगण्यात, शरीरयष्टीत भरपूर अंतर आहे, पण त्यानं, (मेकअप आणि काॅस्चुम्सनं पण) ते असं बेमालूम मिटवलंय की खुद्द डाॅक्टरही फसले असते. डाॅक्टरांचं निरागस खळाळतं हास्य, देहबोली, लकबी, संवादफेक, प्रेम, संताप, मिश्कीलपणा, बेभान जगणं, बेतालपणा, रांगडेपणा, धसमुसळेपणा, कलाकार म्हणून होणारी तगमग अशी पकडलिये की तो डाॅक्टर नसून सुबोध आहे हे विसरायलाच्च होतं. सुरुवातीच्या काळातल्या तिशीतल्या व नंतर पन्नाशीतल्या डाॅक्टरांमधला पेहेरावातला सूक्ष्म बदलही जाणवतो. त्याचे ते निळे डोळे ह्रदयाचा ठाव घेतात. सुबोध हा सुबोध म्हणून दिसतो त्याहून छान डाॅक्टर म्हणून दिसतो. थोड्या वेळानं समजेनासं होतं की सुबोध आवडतोय की डाॅक्टर की हे सर्व आधी मनात बघून आता आपल्याला दाखवणारा दिग्दर्शक?

सुमितनं साकारलेले डाॅ लागू पण असेच. सुमीत, साराभाईपासूनच लाडका होता पण इथं मात्र मानलं बाॅस. नक्कल न करताही केवळ देहबोली व संवादफेकीवर कॅरॅक्टर उभं केलंय. मोहन जोशी, आनंद, सोनाली, सुहास पळशीकर व प्रसाद ओक पण अमेझींग. नंदिता, वैदेही पण सरस.

सुलोचनाबाईंचं, डाॅक्टरांचं घर, जुनं फर्निचर, जुने फोन, जुन्या गाड्या....मस्त उभं केलंय. सुलोचनाबाईंचं घर अगदी असंच असेल असं वाटतं. त्यांचे पुरस्कार, सन्मानपत्रेही दिसतात भिंतीवर. ह्या सिनेमात त्या कलाकार म्हणून कमी आणि कणखर आई किंवा कुटुंबप्रमुख म्हणून जास्त जाणवतात.

आता डाऊनसाईड ऑफ द मुव्ही....
चित्रपट हाॅन्टींग आहे..... मनावर गारुड करतो. दुस-या दिवशीही सुखानं जगू देत नाही.... दुसरं तिसरं काही सुचत नाही. सतत आठवत रहातो.
काय करणार? नाईलाज आहे. डाॅक्टरांवरचा चित्रपट आहे. आपल्या अस्तित्वानं समोरच्याला वेड नाही लावलं तर ते डाॅक्टर कसले?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

कालच बघितला हा चित्रपट. मेधावि, छान परीक्षण लिहीलयं. माझ्या 12 वर्षांच्या मुलालाही खूप आवडला. त्याला हे सर्व कलाकार माहीत नव्हते, तरीही परत येताना स त त 'उसमें क्या है' आणि'कडक'ची उजळणी चालू होती.
सुबोध भावे तर आवडलेच, पण नंदीता धुरींचा संयत अभिनय खूप आवडला. वैदेही परशुरामींनी पदार्पणातच छान काम केले आहे. सोनालीने सुलोचनाबाईंची आई म्हणून होणारी तगमग समरसून दाखवलीय. प्रसाद ओकांचे कामही मस्तच.

सिनेमा चांगला आहे. एका तार्‍याची शोकांतिका वाटते. सुबोध ह्यांनी अप्रतिम काम केले आहे. माझे मत ही लेखिकेसारखे आहे.

कांचन घाणे करांच्या प्रेमात पडते तो सर्व भाग खूप क्युट वाटतो. तुपारे सिरीअल ची आ ठवण होतेच. ती नटी फार गोड व फ्रेश दिसली आहे.
अफेअर बद्दल कळल्यावर पहिली बायको ज्या तुटक पणे कार मध्ये मागे बसते तो सीन, कांचनचा पति गेल्यानंतरचा हंबरडा, नाचरे मोरा वर नाचणारी बालिका, ह्या ठिकाणी गहिवरून येते.

शूर आम्ही सरदार गाणे व भालजी पार्ट मस्त आहेत. ते किती आरामात वावरतात पैरण व शॉर्ट घालून. ह्या सर्व नाटकांच्या जाहिराती मी केसरी मध्ये वाचल्या आहेत. तेव्हा अंडर १२ असल्याने बघायची परवानगी नव्हती. सुमीतचे काम पण चांगले आहे. पण रोल कमी डिफाइन्ड आहे. एक फॉइल सम वा ट्तो.

घाणे करांना तेव्हा प्रॉपर काउन्सेलिन्ग डिटॉक्स ट्रीट मेंट मिळाली असती तर अजूनही उत्तुंग कार्य केले असते व कांचन बाईंना त्यांचा सहवास
मिळा ला असता, पोरीला बाप Sad असे वाटून मन हळहळते.

सुलोचना बाईंचा अंबाबाईची शप्पथ संवाद मिस करू नका.

सुबोधने वडिलांच्या अ‍ॅक्सेप्ट्न्स साठी आसुसलेला मुलगा, पत्नि मध्ये सहचरी फॅन शोधणारा, मूल असावे म्हणून मनात कामना धरलेला पती
छानच उभा केला आहे. पन्नाशीतही गुड लुक्स गुड लुक्स गुड लुक्स. दारू सिगरेट च्या व्यसनाने आतून पोखरलेला माणूस कसा दिसावा तसा दिसत नाही तो. डोळे तांबारलेले सुजलेले, खालावलेले शरीर, पांढुरके केस असे वयानुरूप बदल दाखवलेले नाहीत. फक्त सुजकट चेहरा दिसतो.

भाई व ठाकरे दोन्ही सिनेमांची ट्रेलर्स पाहिली. जानेवारीत रिलीज आहेत.

कालच पाहिला.....सुंदर चित्रपट.... विशेषतः. जेव्हा वडिलांची 100व्या प्रयोगानंतर भेट होते...तेव्हाचा सुबोधचा अभिनय सुंदरच....वडील आत्ता कौतुक करतील मग करतील ही आशा त्याच्या डोळ्यात दिसते....मला फार आवडला तो प्रसंग...

मला आवडला .
आम्ही पण थियेटर मधून बाहेर पडतना , “उसमे क्या है“ करत बाहेर पडलो.

>>>घाणे करांना तेव्हा प्रॉपर काउन्सेलिन्ग डिटॉक्स ट्रीट मेंट मिळाली असती तर अजूनही उत्तुंग कार्य केले असते व कांचन बाईंना त्यांचा सहवास
मिळा ला असता, पोरीला बाप Sad असे वाटून मन हळहळते.<<<<
+१

इरावतीबाई स्पेशल असणार. किती शांतपणे सिचुएशन हॅन्डल केली त्यांनी. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यावर वेळीच स्वतःचं आयुष्यही सावरून सहजपणे बाजूला झाल्या.

छान परीक्षण !

काशिनाथ घाणेकरांबद्दल काहीच माहीत नव्हते. आताही फक्त नावच माहीत आहे Happy
एका जुन्या पिढीच्या सुपर्रस्टार(?) बद्दल नव्या पिढीला ओळख होतेय हे छानच आहे. चित्रपटाबद्दल सर्वांकडून चांगलेच ऐकतोय.

प्रतिसादांतून समजले की नंतर दारूमुळे त्यांची वाताहात झाली. यशेच्या नशेत अशी काय कमी असते की यशस्वी लोकांनाही दारूच्या आहारी जावे लागते. चंदेरी दुनियेतील बरयाच व्यक्तीमत्वांची अशीच शोकांतिका आढळते.

सुबोध भावे बद्दल काय म्हणावे.. मराठीतील आमीर खान + कमल हसन आहे. कारकिर्दीत एवढी विविध व्यक्तीमत्वे साकारणे आणि तितक्याच ताकदीने पेलणे हे काही मिमिक्री करण्याईतके सोपे नाही.

बाई दवे, शिर्षकात "आणि" का आहे?

काशिनाथ घाणेकरांचं नाव, नाटकातील इतर सर्वांची नावं सांगून झाली की मग "आणि काशीनाथ घाणेकर" असं अनाउन्स होत असे व नंतर प्रचंड टाळ्यांचा कडकडाट होत असे...

आणि ही पद्धतही त्यांच्यापासूनच सुरू झाली. ' आणि अमुक अमुक' असं नाव वाचलं जाणं हा नंतर बहुमान समजला जाऊ लागला.
चित्रपट इतक्यात पहायला मिळण्याची शक्यता नाही दुर्दैवाने. पण खूप पूर्वी कांचन घाणेकरांचं ' नाथ हा माझा' वाचलं होतं. त्यामुळे काशिनाथ घाणेकरांचा करिश्मा माहिती आहे.

मेधावि छान परीक्षण Happy

ट्रेलर पाहिल्यापासूनच उत्सुकता लागून राहिलीये, अजून बघितला नाहीये.

वैदेही परशुरामींनी पदार्पणातच छान काम केले आहे. >>>>>> हा तिचा पहिला चित्रपट नाहिये. हया आधी कितीतरी चित्रपटात होती उदा. महेश मान्जरेकरचा 'एफ यू ( आकाश ठोसरची नायिका), वृन्दावन ( राकेश बापट).

छान परीक्षण. ट्रेलर पाहिल्यापासूनच उत्सुकता लागून राहिलीये >>>+१ मलाही बघायचा आहे हा चित्रपट. न्यू जर्सीत लागणार असेल तर कृपया इथे आधी कळवा कोणीतरी.

हा चित्रपट सर्वस्वी लेखक्/दिग्दर्शक अभिजित देशपांडे याचा आहे असं ऐकण्यात येतंय. त्याच्या वयावरुन तरी त्याने घाणेकरांची नाटकं, किंवा त्यांची प्रचंड लोकप्रियता पाहिलेली असेल असं वाटत नाहि. असं असुनहि घाणेकरांसारखं गुंतागुंतीचं व्यक्तिमत्व पडद्यावर चित्रीत करण्याचं शिवधनुष्य त्याने पेललेलं दिसतंय. सुबोध भावे लाल्याच्या भूमिकेत थोडाफार चालवुन घेता येईल पण संभाजीच्या भूमिकेत्/पेहेरावात अगदिच कैच्याकै वाटतोय...

@ऋन्मेऽऽष: शिर्षकात "आणि" का आहे ? त्यावेळी डॉ. घाणेकर सारख्या वलयांकित स्टारचं नाटक हाउसफुल्ल करण्यासाठी अशी जाहिरात करायचे. आणि हेच सिनेमाच्या नावांत वापरलं आहे.
इतर अभिनेत्यांच्या पार्श्वभुमीवर मुख्य स्टारला हायलाईट करण्यासाठी, महत्व देण्यासाठी !
आजकाल देखील नाटकांच्या / सिनेमाच्या जाहिरातीत ही स्टाईल वापरतात.

चित्रपट म्हणून पाहिला आणि ठिकठाक वाटला. सुबोध, प्रसाद ओक, आणि बाकी सर्व एकदम पर्फेक्ट कलाकार, ना कम ना ज्यादा. सर्वानीच अगदी जीव ओतून काम केलं आहे.
मला काशिनाथ घाणेकरांबद्दल फारसं माहिती नव्हतं/आणि नाही. नाथ हा माझा मी शाळेत असताना वाचलं (किमान वीसेक वर्श झाली असतील) त्यामुळे सर्व विस्मरणात. फार रिलेट करू शकले नाही.
पण सुबोध हा मराठीचा सुपरस्टार आहे हे नक्की.

उगीच डोक्यावर घेतले आहे घाणेकरांना ... काही हिट चित्रपट आणि नाटकं केलीत त्यांनी परंतु त्यांची इतर सहकलाकारांबरोबरची वागणूक नक्कीच समर्थनीय नव्हती

एक मूव्ही म्हणून चांगला आहे - वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे एका तार्‍याची शोकांतिका म्हणून.
बायोपिक म्हणून कसा आहे ते मी तो काळ पाहिलेलाच नसल्यामुळे सांगू शकत नाही.

इरावती घाणेकरांचं काम केलेलीच नटी 'एलिझाबेथ एकादशी'त त्या मुलांची आई झाली होती हे भावाने सांगितल्यावर आठवलं - ती फार दात आवळून बोलते, आणि काही ठिकाणी (उदा. घाणेकरांच्या कपाटातून लपलेली फॅन बेशुद्ध होऊन बाहेर पडते तो प्रसंग) तिच्या तोंडचे संवाद फार कृत्रिम वाटतात. त्यातल्या त्यात तिचं काम कमी आवडलं.

तसंच सुपरस्टार वगैरे ठीक आहे, पण एन्ट्रीलाच टाळी मिळवणारा हा पहिला नट असेल हे खरं वाटलं नाही.
पण त्याआधीचा बालगंधर्व इत्यादींचा प्रेक्षकवर्ग काहीसा उच्चभ्रू आणि त्यामुळे मर्यादित होता - घाणेकरांइतकं 'मासेस'चं आणि त्यातही तरुणाईचं प्रेम त्यांना मिळालेलं नसण्याची शक्यता आहे असंही मत त्यासंदर्भात ऐकलं.

दारू सिगरेट च्या व्यसनाने आतून पोखरलेला माणूस कसा दिसावा तसा दिसत नाही तो.----नाथ हा माझा मधे हे आलय, इतकी दारु पिऊ नका, अस दुस्र्या डाक्टर कडुन सांगाय्ला गेल्यावर, हा माणुस लिर्व्हर ओके अस्ल्या चा रिपोर्ट देतो . त्यांना हार्ट अट्क येऊन गेला होता ४०त च. मि स्वतः डाक्ट्र्र्र्र आहे, अस म्हणन असायच त्यांच

सिनेमाबद्दलचा लेख आवडला. बघायला जाताना थोडी तयारी करता येईल.
लहान असताना घाणेकरांच्या नाटकाच्या जाहीराती असत पेपरात. अश्रूंची झाली फुले हे घाणेकरांचे, नटसम्राट हे लागूंचे आणि थँक यू मिस्टर ग्लाड तसेच डॉक्टर तुम्ही सुद्धा या जाहीराती असत. पण नाटकाच्या बाबतीत लिमिटेड वर्तुळात आवड होती. आम्ही फार तर बालनाट्ये बघत असू. दूरदर्शनवर अखेरचा सवाल आणि मधुकर तोरडमल यांच्या गगनभेदी नाटकातले काही प्रसंग दाखवत (तो कार्यक्रम कोणता हे आठवत नाही). त्यातला तोरडमलांचा अत्यंत नाटकीय अभिनय पाहून नाटकं म्हणजे अत्यंत नाटकी असा समज झाला. मात्र अमोल पालेकरांचं आपलं तर बुवा असं असतं पाहील्यावर नाटकं पहायला सुरूवात झाली. तेव्हां अर्थातच घाणेकर नव्हते.

घाणेकरांचे सिनेमे मात्र टीव्हीवर आले. ते पाहताना सुपरस्टारपद वगैरे कधी जाणवले नाही. दादा कोंडकेच निर्विवाद मराठी सिनेमात सुपरस्टार होते.

मी त्या वर्तुळात नसल्याने मतभेद होण्याची शक्यता आहे. तसेच वयही नव्हते. मात्र त्याच वयात हिंदी मराठी कलाकारांचे स्टारडम जाणवत असे हे ध्यानात आहे. माझ्यापर्यंत घाणेकरांचे स्टारडम आले नाही कधी. ही माझ्या वर्तुळाची अपूर्णता असेल कदाचित.

त्यामुळेच आता ते जाणून घेण्यासाठी तर पहायचाच आहे. मात्र एक गोष्ट म्हणून आणि एक सिनेमा म्हणून पाहणार हे नक्की.

घाणेकरांइतकं 'मासेस'चं आणि त्यातही तरुणाईचं प्रेम त्यांना मिळालेलं नसण्याची शक्यता आहे असंही मत त्यासंदर्भात ऐकलं.
<
स्वाती,
नसण्याची म्हणायचय कि असण्याची ? Happy
इतक्यात कोण्या सेलिब्रिटीचा इंट्रव्ह्यु पहात होते, कोणाचा विसरले पण ते म्हणत होते कि तरुणाईचं भयंकर प्रेम, तुफान टाळ्या- शिट्ट्या मिळायचं त्यांना कारण लाल्या हे मुळात बंडखोर, प्रोफेसरांची टर उडवणे वगैरे प्रकारताल कॅरॅक्टर होतं, ते कॉलेज क्राउडला खूप अपिल होयचं.

घाणेकरांइतकं मासेस, त्यातही तरूण वर्गाचं प्रेम त्यांच्या पूर्वसुरींना मिळालं नसण्याची शक्यता - असं म्हणायचं होतं गं. Happy

संभाजी काय आणि लाल्या काय - रिबेल हेच सूत्र होतं ना. मराठीतला अ‍ॅन्ग्री यंग मॅनच हा!

बरोबर स्वाती, कॅरॅक्टर्सच अशी होती आणि अर्थात त्यांनी केलही असेल उत्तम काम !
घाणेकरांच्या नाटकांच्या सीडीज आहेत का उपलब्ध ? ते नाटकात कशी कामं करायचे उत्सुकता आहे !

न्यू जर्सीत लागणार असेल तर कृपया इथे आधी कळवा कोणीतरी.>>>> सोनाली १८ ला एडिसन मधे शो आहे २ चा बिग सिनेमा ओक ट्री.

Pages