आणि डाॅक्टर काशिनाथ घाणेकर

Submitted by मेधावि on 9 November, 2018 - 23:29

अभिजीत देशपांडे लिखीत आणि दिग्दर्शीत "आणि डाॅक्टर काशिनाथ घाणेकर" सिनेमा काल पाहीला. अभिजित हा आमच्या वर्गमित्राचा भाचा म्हणून अजून कौतुकानं व प्रेमानं पाहीला.

काशिनाथ घाणेकरांची नाटकं आणि त्यांचा सुवर्णकाळ आमच्या पिढीला पहाता किंवा अनुभवता नाही आला, मात्र हा सिनेमा बघताना त्या काळात शिरून, भालजी पेंढारकर, सुलोचनादिदी, डाॅक्टर ह्या अप्राप्य व्यक्तींसमवेत काही क्षण जगल्यासारखं निश्चितपणे वाटलं.

जुनी मुंबई, जुनं शिवाजी मंदीर, जयप्रभा स्टुडीओ, जुने रस्ते आणि जुनी नाटकं पहाताना नाॅस्टॅल्जिक (गतकालविव्हल ) व्हायला झालं. एखाद्या जुन्या वाड्यात अनेक वर्षांनी, सहजपणे आत शिरावं आणि तेथील प्रत्येक वस्तुनं, कोप-यानं, भिंतीनं ठाईठाई आपल्या मनाचा वेध घ्यावा, त्यावर कब्जा करावा, आपल्याला जुन्या दिवसांकडे, जुन्या माणसांकडे, जुन्या आयुष्यांकडे खेचून घ्यावं, त्यांची जीवघेणी आठवण व्हावी, त्यांच्या सुखानं आपणही शहारावं व त्यांच्या दुःखानं आपलेही डोळे भरून यावेत पण तिथून परत निघताना मात्र पाऊल निघू नये असा काहीसा अनुभव आला चित्रपट पहाताना.

अनेक पुस्तकांमधून, चित्रपटांतून आपल्याला माहीत असणारे आपले मराठी चमचमते कलाकार, आपली माणसं, आपल्याला त्यांच्याबद्दल वाटणारं कुतुहल, आदर, प्रेम, अभिमान,अपेक्षा ह्या सर्वांवर बोलतो हा चित्रपट. दिदी, भालजी पेंढारकर, डाॅक्टर ह्यांच्यासारखी वलयांकीत माणसं व त्यांचं सर्वसामान्य जगणं खूप काही सुचवून जातं. Entertainment industry is the most cruel industry हे पुन्हा एकदा ठळकपणे जाणवतं.

सर्व कलाकारांनी झपाटल्यासारखं काम केलंय. सुबोध, लेका तुझं काय करायचं रे? तू ना, वेडा माणूस आहेस. ठार वेडा. मुळात त्याच्या व डाॅक्टरांच्या दिसण्यात, आवाजात, जगण्यात, शरीरयष्टीत भरपूर अंतर आहे, पण त्यानं, (मेकअप आणि काॅस्चुम्सनं पण) ते असं बेमालूम मिटवलंय की खुद्द डाॅक्टरही फसले असते. डाॅक्टरांचं निरागस खळाळतं हास्य, देहबोली, लकबी, संवादफेक, प्रेम, संताप, मिश्कीलपणा, बेभान जगणं, बेतालपणा, रांगडेपणा, धसमुसळेपणा, कलाकार म्हणून होणारी तगमग अशी पकडलिये की तो डाॅक्टर नसून सुबोध आहे हे विसरायलाच्च होतं. सुरुवातीच्या काळातल्या तिशीतल्या व नंतर पन्नाशीतल्या डाॅक्टरांमधला पेहेरावातला सूक्ष्म बदलही जाणवतो. त्याचे ते निळे डोळे ह्रदयाचा ठाव घेतात. सुबोध हा सुबोध म्हणून दिसतो त्याहून छान डाॅक्टर म्हणून दिसतो. थोड्या वेळानं समजेनासं होतं की सुबोध आवडतोय की डाॅक्टर की हे सर्व आधी मनात बघून आता आपल्याला दाखवणारा दिग्दर्शक?

सुमितनं साकारलेले डाॅ लागू पण असेच. सुमीत, साराभाईपासूनच लाडका होता पण इथं मात्र मानलं बाॅस. नक्कल न करताही केवळ देहबोली व संवादफेकीवर कॅरॅक्टर उभं केलंय. मोहन जोशी, आनंद, सोनाली, सुहास पळशीकर व प्रसाद ओक पण अमेझींग. नंदिता, वैदेही पण सरस.

सुलोचनाबाईंचं, डाॅक्टरांचं घर, जुनं फर्निचर, जुने फोन, जुन्या गाड्या....मस्त उभं केलंय. सुलोचनाबाईंचं घर अगदी असंच असेल असं वाटतं. त्यांचे पुरस्कार, सन्मानपत्रेही दिसतात भिंतीवर. ह्या सिनेमात त्या कलाकार म्हणून कमी आणि कणखर आई किंवा कुटुंबप्रमुख म्हणून जास्त जाणवतात.

आता डाऊनसाईड ऑफ द मुव्ही....
चित्रपट हाॅन्टींग आहे..... मनावर गारुड करतो. दुस-या दिवशीही सुखानं जगू देत नाही.... दुसरं तिसरं काही सुचत नाही. सतत आठवत रहातो.
काय करणार? नाईलाज आहे. डाॅक्टरांवरचा चित्रपट आहे. आपल्या अस्तित्वानं समोरच्याला वेड नाही लावलं तर ते डाॅक्टर कसले?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

सिनेमा खरंच नंतर किती तरी वेळ आठवत राहतो.. अगदी गारुड च
काशिनाथ घाणेकरांनी अनेक नाटकामध्ये भूमिका केल्या पण त्यातल्या फार कमी नाटकांचा ह्या चित्रपटामध्ये उल्लेख झाला आहे. जसे की गुंतता हृदय हे, मला काही सांगायचंय ,सुंदर मी होणार ... वगैरे..
तुनळीवर कुठलेच नाटक उपलब्ध नाहीये. डिजिटल स्वरूपामध्ये डॉक्टरांचा रंगमंचावरचा वावर कुठे पाहायला मिळेल का ?

लेट ७० किंवा अर्लि ८०ज मध्ये दूरदर्शन वर गारंबीचा बापू (घाणेकर, आशालता) बघितल्याचं अंधुकसं आठवतंय. होपफुली, ती प्रिंट दूरदर्शनच्या आर्काय्वज मधे अजुनहि असेल...

चित्रपटात दाखवलेले चिमटा प्रकरण बहुतेक गुंतता हृदय हे मधले होते. त्यात आशा काळे होती डॉक्टरांसोबत.

इबा , होय ए आर रहमान हे भारताला पडलेले एक सुंदर स्वप्न आहे. सुदैवाने तो लवकर बॉलीवूड मधून बाहेर पडून सिम्फनीच्या साम्राज्यात दाखल झाला हे बरे झाले.... व्यक्ती म्हणून तो किती लाजाळू आहे. अगदी मुलांच्या रिएलिटी शो मध्येही तो खूपच अवघडलेला असतो... पण मुलाखती चांगल्या देतो...संगीत त्याच्या पेशीपेशीत आहे...

दारूच्या आहारी गेलेला माणूस तिरस्कारापेक्षा सहानुभूतीला पात्र असतो. बिचार्‍यांच्या शरीरावर स्वतःचा कंट्रोल राहात नाही... शरीरच त्यांच्या व्यक्तीमत्वाला नाचवते

"नाथ हा माझा" पुस्तक वाचलं होतं फार पूर्वी, डिटेल्स आठवत नाहीत पण डिप्रेसिंग आणि घाणेकरांबद्दल एकूणच नकारात्मक मत झालेलं साधारण आठवतंय.

सुबोध भावे ही फारसा काही आवडत नाही, त्यामुळे चित्रपट आपली मराठी वर आला की पाहण्याचा प्रयत्न करीन

ओके. मला मूळ प्रकरण माहीत नाही, चित्रपटात नंतर तिला आशा म्हणून हाक मारली त्यावरून अंदाज. आशा काळे-घाणेकर गुंतता हृदय... च्या जाहिराती आठवताहेत.

रॉहु, याचे वाईट वाटते हो, की बरीच माणसे व्यसनाधीन होऊन आयुष्य व जवळच्यांना गमावुन बसतात. निदान बाबासाहेब पुरंदर्‍यांना तिथे पाहुन जर घाणेकरांनी व्यसनाचा त्याग केला असता तर निदान अजून काही वर्षे जगले असते. चांगले क्षण आयुष्यात लवकर परत येत नाहीत.

ताण घालवायला व्यसन कशाला हवे? संगीत, निसर्गाचे सानिध्य हे खूप असते की. रमेश देवांसारखे लोक विरळेच.

बघितला, आवडला. शेवटी जे फोटो दाखवले, त्यातले घाणेकर अगदी किरकोळ शरीरयष्टीचे होतेे. सुबोध घाणेकर म्हणून जास्त देखणा वाटला. ईरावतीबाईंना कांचनविषयी कळते तेव्हाची त्यांची प्रतिक्रिया अगदी फ्लॅट वाटली. कळल्याबरोबर लगेच त्यांना कांचनची काळजी वाटते आणि त्या दोघांना घरी भेटायचा सल्ला देतात ते अविश्वसनिय वाटले. मध्येच त्यांच्या बेडरूममधल्या कपाटातून एक बाई बाहेर पडते तेही काही कळले नाही. बहात्तर नंतर शह्यांशी सालचं कसं काय दाखवलंय शेवटी. लागूंभोवती गर्दी गोळा झालेली असताना घाणेकर गाडी फिरवून मागे जातात व तीच गर्दी त्यांच्याभोवती जमते हे सगळे प्रसंग खरे आहेत की काल्पनिक. सगळ्यांचा अभिनय व गेटप उत्तम जमून आलाय. वैदेही मला फार ग्लॅमरस वाटायची व ती कांचन म्हणून खूपच सुंदर दिसेल असे वाटले होते पण तसे काही झाले नाही. ती कांचनच वाटते तिच्यातल्या गोडव्यासहित. सोकुलपण ट्रेलरमध्ये खटकली होती पण त्यावेळी दीदी साधारण अशाच दिसायच्या हे शेवटचा फोटो बघून कळले. भालजी एका वर्षाची अट घालतात पण मध्ये दहा वर्ष निघून जातात आणि तरी कांचनचे प्रेम तसेच राहते हे बघून आश्चर्य वाटते. एवढ्या चुका करूनही घाणेकरांना परत परत संधी मिळते ही आजच्या काळात अशक्य गोष्ट वाटते. गारंबीचा बापू (की आनंदी गोपाळ) बघून लागू अगदी हलकेच टाळी वाजवल्यासारखे करतात तो सीन छान वाटला.घाणेकरांचे वैयक्तिक आयुष्य बरेचसे लक्ष्मीकांत बेरडेसारखे वाटते.

चित्रपट बघितला, बिनधास्त स्वभावाचे काशिनाथ एखाद्या बाईला कपाटात लपवून ठेवतात हे काही पटले नाही.
' नका सोडून जाऊ ' हे गाणे सुमित राघवन चे माघारी वळणाऱ्या पायांपासून दाखवायला हवे होते, चित्रपटात ते गाणे अमृताचे जास्त वाटते.

ते घाईघाईने मेकप काढून बाहेर का धावतात हे त्यावेळी कळले नाही पण नंतरच्या सीनमध्ये कळते की त्यांना फॅन्सच्या गर्दीतून बाहेर पडायचे असते आणि ती गर्दी नसल्यामुळे ते, ते नाटकच सोडून देतात. अशा ब-याच प्रसंगी ते फारच अविवेकी वाटतात. कांचनशी लग्न झाल्यानंतर ते चहाच्या टपरीवर नविन जोडप्याला बघून नंतर गाडीच्या बाॅनेटवर जाऊन बसतात तो प्रसंगंं नीट कळला नाही.

कांचनशी लग्न झाल्यानंतर ते चहाच्या टपरीवर नविन जोडप्याला बघून नंतर गाडीच्या बाॅनेटवर जाऊन बसतात तो प्रसंगंं नीट कळला नाही.

>>>>>>> तिथे आपल्याला पाहून गर्दी होइल अस त्यांना वाटत असाव किंवा तशी इच्छा असावी. म्हणुन लोकांच्या नजरेत येण्यासाठी केलेला खटाटोप.

झी मराठी अल्फा मराठी असताना 'गारंबीचा बापू ' चित्रपट आणि गाणी दाखवायचे. तेव्हा मला तो चित्रपट कन्टाळवाणा वाटला.

हा खेळ सावल्यान्चा पाहिलाय. पण त्यात घाणेकरपेक्षा आशा काळेन्नाच जास्त स्क्रीन स्पेस होता.

हा खेळ सावल्यांचा,टी.व्हीवर पाहिलाय.आठवत नाही काहीही,पण गोमू संगतीने या गाण्यात हसून मेले होते.अजिबात आवडले नव्हते घाणेकर.

काशीनाथ घाणेकर हे पडद्यावर कधीच खुलून दिसले नाहीत. गोरा रंग आणि भेदक निळे डोळे या व्यतिरिक्त पडद्यावर लागतो तो चेहेऱ्याचा रेखीव किंवा नीटसपणा त्यांच्याकडे नव्हता. पडद्यावर क्लोझपमध्ये नाकीडोळी नीटसपणा आणि सूक्ष्म भावदर्शन हे खूप आवश्यक असते. एखादाच ओमपुरी, नसीरुद्दीन, स्मिता पाटील अथवा गेला बाजार अमिताभ बच्चन चेहरा नसूनही प्रचंड सूक्ष्माभिनयाद्वारे पडदा जिवंत करतो. घाणेकर पडद्यावर त्या ताकदीचे नट नव्हते. रंगमंचावर थोडा लाउड अभिनय आवश्यक असतो. कधी कधी तो आक्रस्ताळाही वाटू शकतो. श्रीराम लागूंनी हा फरक ओळखला होताच पण म्हणून रंगभूमीवरही त्यांनी कधी लाउड, सवंग, प्लेयिंग टू द गॅलरीज असा अभिनय केला नाही. शिवाय त्यांना देखण्या चेहऱ्याची देणगी होती. त्यामुळे पडद्यावर घाणेकरांपेक्षा लागू कितीतरी पटींनी श्रेष्ठ ठरले. लागूंना पी डी ए सारख्या प्रायोगिक रंगभूमीची पार्श्वभूमी होती. या लोकांकडे अभिनयाची एक वेगळी अशी शास्त्रशुद्ध पठडी असते. घाणेकरांकडे ती नव्हती. ते 'तरुणाईचे लाडके' होतेच होते. पण हे बिरुद क्षणजीवी असते. तरुणाई ओसरली की बिरुदाचा महिमा ओसरतो. कोणताही अभिनेता सदैव ॲंग्री यंग मॅनच्या भूमिकेत राहू शकत नाही. घाणेकर कदाचित स्वत:च्या प्रतिमेत अडकले असतील, नार्सिसससारखे स्वत:च्या प्रेमात पडले असतील, 'आपण सर्वश्रेष्ठ ' या गंडात गुरफटले असतील, कुणास ठाउक. पण एका मनस्वी व्यक्तिमत्त्वाच्या नायकाच्या जीवनपटावर शोकांतिका घडावी हे क्लेशदायक होते. त्यांना स्वत:ला आणि त्यांच्या चाहत्यांनाही.

घाणेकर कदाचित स्वत:च्या प्रतिमेत अडकले असतील, नार्सिसससारखे स्वत:च्या प्रेमात पडले असतील, 'आपण सर्वश्रेष्ठ ' या गंडात गुरफटले असतील, >>>>>> असेच झाले होते म्हणतात. हिरा छान लिहीलयं.

घाणेकर कदाचित स्वत:च्या प्रतिमेत अडकले असतील, नार्सिसससारखे स्वत:च्या प्रेमात पडले असतील, 'आपण सर्वश्रेष्ठ ' या गंडात गुरफटले असतील,>> हे वाचून सध्याच्या एका 'करां'ची आठवण झाली Lol

अतिशय सुंदर विश्लेषण आहे हा लेख म्हणजे. आज हा चित्रपट पाहिला आणि परत वाचला. एकदम चपखल लिहीले आहे!

मस्त आहे पिक्चर. सुबोधला फुटेज जास्त असले तरी कोणा एकाची वेगळी तारीफ करावी यापेक्षा ७-८ जणांनी तोलामोलाचे जबरदस्त काम केले आहे.

एखाद्या जुन्या वाड्यात अनेक वर्षांनी, सहजपणे आत शिरावं आणि तेथील प्रत्येक वस्तुनं, कोप-यानं, भिंतीनं ठाईठाई आपल्या मनाचा वेध घ्यावा, त्यावर कब्जा करावा, आपल्याला जुन्या दिवसांकडे, जुन्या माणसांकडे, जुन्या आयुष्यांकडे खेचून घ्यावं, त्यांची जीवघेणी आठवण व्हावी, त्यांच्या सुखानं आपणही शहारावं व त्यांच्या दुःखानं आपलेही डोळे भरून यावेत पण तिथून परत निघताना मात्र पाऊल निघू नये असा काहीसा अनुभव आला चित्रपट पहाताना. >>> हे सर्वात परफेक्ट वर्णन!

डाॅ. काशीनाथ घाणेकर ह्या वादळाशी माझं पहिलं एनकाऊंटर झालं ते 1986 साली, मी सोळा वर्षाची असताना. डाॅक्टरांचा सुवर्णकाळ ओसरला होता तोवर, मी तो पाहीला नव्हता पण ऐकून मात्र होते. डाॅक्टरांची गाजलेली नाटके न पाहूनही, मी त्यांची फॅन होते. मला डाॅक्टरांचे सिनेमे आवडत. अगदी गोमु संगतीनं मधल्या नाचासकट आवडत. तर, बहुतेक अनेक महिन्यांनी "गुंतता ह्रदय हे" चा प्रयोग बालगंधर्वला लागला होता तो आम्ही पाहीला. मी पाहिलेलं ते त्यांचं पहिलं नाटक. नाटक संपल्या संपल्या भारावून जाऊन रंगपटात डाॅक्टरांना भेटायला गेले.

रंगपटात डाॅ. एकटेच होते. इतर कोणीच आलं नव्हतं भेटायला. मी संकोचून दाराबाहेर उभी होते. त्यांचं लक्ष वेधायला दारावर टकटक केलं. त्यांनी गर्रकन वळून पाहीलं माझ्याकडे आणि, "अगं ये ये ...आत ये...बस बरं...आवडलं का नाटक?" असं विचारलं. मी भारावून, भांबावून बघत होते. नाटक आवडल्याचं सांगितलं. महानंदा वाचून कल्पना केलेला "बाबूल" थेट तसाच दिसल्याचंही सांगितलं. डाॅ. खूष होते. तितक्यात चहावाला आला. मलाही चहा विचारला. मी नको म्हणाले. चहावाला डाॅक्टरांसाठी एक कप चहा ठेऊन निघून गेला. डाॅक्टर निवांत होते. गप्पा मारायच्या मूडमधे होते. कुठं शिकतेस, काय शिकतेस, घरी कोण कोण, वाचन किती करतेस, नाटकं बघतेस की नाही? बरंच काही. मग म्हणाले, अगं तू एक काम कर...आज थोडा चहा घेच माझ्याबरोबर..."हे बघ, मी कपातून घेतो, तू बशीतून घे." मी मान डोलावली. चहा झाला. मग मी सही मागीतली. त्यांनी "अरे हो की..गप्पांमधे ते राहीलंच असतं की..असं म्हणून सही केली. जमवलेल्या इतर सह्या पण कौतुकानं पाहील्या. सहीच्या खाली लिहीलं, If u laugh, everyone laugs with u, but if u cry, u cry alone. मग मला म्हणाले, "कायम लक्षात ठेव हे. आनंद साजरा करायला खूप जण असतात मात्र दुःखात कायम एकटेच असतो आपण". मी खूपच भारावून गेले होते. माझा आवडता नट माझ्याशी, फक्त माझ्याशी मोकळेपणानं गप्पा मारत होता. ते उद्या नागपूर दौ-याला जाणार असल्याचं सांगितलं. निघताना त्यांच्याशी हस्तांदोलन करून मी निघाले. खूप खूष होते...... पण....नंतर लगेचच्या दुस-या किंवा तिस-याच दिवशी त्यांचं नागपूर दौ-यात देहावसान झाल्याची बातमी पेपरला आली. खूप धक्का बसला, खूप वाईट वाटलं. हा तुफान कलाकार, मनस्वी माणूस काही मिनीटांकरता का होईना, पण माझ्या आयुष्यात वीजेसारखा चमकून गेला होता.

लेख आवडला. हिरा यांची प्रतिक्रिया आणि मेधावी यांची वरची आठवण पण छान.
काल मस्कत मराठी मंडळाने स्पेशल शो आयोजित केला होता. ६००+ प्रेक्षकांची उपस्थिती होती. मध्यांतरात सगळ्यांनाच 'कडक' चहा पाहिजे होता Happy
सिनेमा आवडला. सर्वच कलाकारांचे काम आवडले. 'नाथ हा माझा' आधी वाचल्याने सिनेमातल्या गोष्टी नवीन नव्हत्या.
तो काळ, त्यांची नाटकं, सिनेमे, त्या वेळेचा मिडीया ( हा मोठ्ठा फरक!) काहीच पाहिला नसल्याने 'नाथ' हे पुस्तक फार बोल्ड वाटलं होतं. आवडलंच नव्हतं. काल सिनेमा पाहताना एक प्रकारे पुस्तकाची उजळणी झाली आणि कांचन घाणेकरांच्या प्रामाणिक लेखनाचं कौतुक वाटलं .

एक प्रतिभावान, ताकदीचा , मनस्वी आणि स्वतःच्याच प्रतिमेत अडकलेला कलाकार म्हणून घाणेकरांचं कौतुक वाटलंच, तितकंच त्यांची शोकांतिका पाहून वाईट वाटलं.

मेधावि, छान लिहिलेस. ..... लेख व वरची आठवण. मी अजुनही घाणेकरांचे काहीही नाटक वा सिनेमा पाहिले नाही. नुसते ऐकुन होते तरी सिनेमा आवर्जुन पाहिला. आता नेटवर त्यांचे जे चित्रपट, नाटके मिळतील ती पहायची आहेत.

Pages